शनिवार, २३ मे, २०२६

2896. पुन्हा एकदा नीट

  मुग्धाची आई मंजुश्री मुग्धाची वाट पहात होती. मुग्धा नीट परीक्षा द्यायला सेंटरवर गेली होती. तिला अंदाज होताच.. मुग्धा हसत हसत येणार, कारण तिने फिल्डिंगच तशी लावली होती. तिच्या नवऱ्याचा मध्येच फोन आला..
'काय आली काय मुग्धा?
'नाही अजून.. हॉलच्या बाहेर आली कीं लावेल फोन..
एव्हड्यात मंजूला मुग्धाचा फोन येतो आहे असे दिसलें...
'तिचा फोन येतो आहे.. मग करते मी फोन तुम्हाला..
असे म्हणून मंजुने मुलीचा फोन घेतला...
'बोल ग. कस काय?
'येस मम्मा.. शंभर टक्के..
'सेम टू सेम काय?
'केमिस्ट्री,झुवालॉजी सेम.. बायोमध्ये थोडे बदल होते.. पण सहाशेवर निश्चित..
'देव पावला..तू लवकर घरी ये.. पण बाबांना काही बोलू नकोस.. त्याना फक्त पेपर सोपे गेलेत म्हणून सांग.
'त्याना मी कशी सांगेन ममा.. तू माझ्यासाठी शिरा करून ठेव, तोपर्यंत मी पोचतेच..
मंजूला समाधान वाटलं.. गेले वर्षंभर टेन्शन होत.. गोलमाल करायला लागलं आणि ते सुद्धा नवऱ्यापासून लपवून.
मंजुने नवऱ्याला फोन लावला.
'अहो.. मुग्धाचा फोन आलेला.. खूष आहे ती.. सहाशेवर निश्चित म्हणते आहे..
'कमाल आहे... कधी फारसा अभ्यास करताना दिसत नव्हती आणि मूळची पण हुशार नव्हे.. तरी म्हणते सहाशेच्यावर?
'अहो.. क्लासमध्ये अभ्यास करायची, घरी करत नसेल कदाचित..
'बर बर.. म्हणत मुग्धाच्या बाबांनी फोन ठेवला. 
तेव्हडयात मंजूच्या लक्षात आले.. माधवला म्हणजेच तिच्या भावाला फोन करायला हवा, त्यानेच तर हे घडवून आणले..
तिने तिच्या भावाला.. माधवला फोन लावला.. पण तो बिझी येत होता.. तिच्या लक्षात आले, माधवला अनेकांचे फोन येत असणारं, आपल्यासारखे अनेकजण त्याच्या लिस्टमध्ये असणारं..
लेकीने गोड शिरा करायला सांगितलं हे मंजुच्या लक्षात आले.. गाणे गुणगुणत ती किचनमध्ये आली.. तिने रवा बशीत घेतला, निवडून घेतला.. एका पातेल्यात तूप ओतलं आणि गरम करायला घेतल, एव्हड्यात माधवचा फोन आलेला तिला दिसला..
'काय मंजू.. खूष ना?
'होय रे बाबा.. मुग्धाने फोन केलेला.. सहाशेच्या वर जाईन म्हणते आहे..
'निश्चित जाईल, म्हणजे ज्या मुलांना नोट्स मिळाल्यात.. ती सर्वच मुलांची मेडिकल ऍडमिशन पक्की.
'हो.. बर झालं बाबा... तू त्या मुल्लासरांची गाठ घालून दिलीस, नाहीतर मुग्धा मेडिकलला जाऊ शकली नसती.
'हो ताई.. बर आठवलं.. त्या मुल्लासरांना अजून दिढ लाख दयायचे आहेत, लक्षात आहे ना..
'हो.. नवऱ्याला न सांगता पैसे जमवणे फार कठीण असते रे माधव, विशेष करून नोकरी न करणाऱ्या बाईला.. बांगडया गेल्या आता पाटल्या..
'पण भावोजीना कळले नाही ना अजून?
'माधव, डुप्लिकेट दागिने कोस्मेटिक्सच्या दुकानात मिळतात ते एव्हडे ओरिजिनल सारखे दिसतात... बायका फसतात तेथे पुरुष फसयला काय?
'हो ग.. आणि एकदा मुग्धा डॉक्टर झाली कीं खोऱ्याने पैसे मिळवील.. मग हवे तेव्हढे खऱ्या सोन्याचे दागिने कर..
  खळखळून हसत मंजुने फोन ठेवला.
शिरा करता करता मंजू विचार करत होती..'आपली एकुलती एक लाडकी मुलगी, आपली आणि तिची पण इच्छा, तिने डॉक्टर व्हावे, साधे नव्हे.. सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर.. ज्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंटशिवाय भेटता येत नाही.. अशी डॉक्टर.. पण.. मुग्धा फारशी हुशार नव्हती, म्हणजे दहावीत तिने मिळविले नव्वत टक्के.. पण सध्या नव्वद टक्के म्हणजे काय.. सर्वांनाच मिळतात.. पण मेडिकलला ऍडमिशन म्हणजे, त्यात नीट परीक्षा.?.. त्याचा अडथळा कसा पार करणार?  त्या परीक्षेत साडेपाचशेपेक्षा मार्क्स हवेत.. देशात वीस लाख मुले ही परीक्षा देतात.. त्यात मुग्धा कुठे बसणार? काही लोक पैसे भरून ऍडमिशन घेतात म्हणे.. बरेच डॉक्टर्स लोक आपल्या मुलांना पैसे भरून कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेतात.. पण आपला नवरा असे कदापि करायचा नाही.. नायब तहसीलदार आहे पण पाच पैसे लाच घेणार नाही.. सारे नियमाला धरून..
या विचारात असताना आपला भाऊ.. माधव, एकदा घरी आला असताना मी त्याला म्हंटले..
'माधव.. मुग्धाला मेडिकलला जायचे आहे रे, पण..
'पण काय?
'ती फारशी हुशार नाही रे आणि तिला अभ्यासाचा कंटाळा.. नीटची परीक्षा असते ना..
'अग नीटच्या परीक्षेचेचे टेन्शन घेऊ नकोस... तुला काय वाटते गेल्या काही वर्षात जे मेडिकलला गेलेत ते खरेच हुशार होते.. त्यातील काही हुशार होते हे खरे.. बाकी..
'बाकी काय?
', पैसे मोजले तर प्रश्न दोन दिवस आधी कळतात.. तशी रॉकेट्स सुरु आहेत..
'काय सांगतोस?
'तस हे सर्वांनाच सांगत नाही मी.. फक्त जवळच्या माणसांना.. उघड झालं तर सगळे आत जातील.. मी मुग्धासाठी प्रयत्न करतो.. पण बारा पंधरा लाख तरी दयायला लागतील आणि गुपित ठेवावे लागेल.. भावोजीना मात्र सांगू नकोस.
शिरा करता करता मंजू मागील आठवत होती. बारावी परीक्षा झाली आणि एक दिवस माधवचा फोन आला..
'ताई.. मी व्यवस्था केली आहे, पण या कानाचे त्या कानाला कळता नये.. नाहीतर सगळे आत जातील.. केमिस्ट्री आणि झुवोलोजीचे पेपरसेटर कळले आहेत.. मुल्ला नावाचा माणूस आहे नागपूरचा.. तो फिल्डिंग लावतो आहे..आता त्याचा तुला डायरेक्ट फोन येईल.. ओके..
मंजू आठवू लागली...
आणि अचानक एकदा एक अनोळखी नंबरवरुन कॉल आला..
'आप मंजुजी हैं?
'हा..
'मैं मुल्लासरके ऑफिससे बात कर रही हूं..
'हा..
'माधवसरने आपको बोला होगा..
'हा..
'यदी आप इंटरेस्टेड हैं.. तो मैं मेसेज करती हूं.. वो नंबरपर फाईव्ह पेटी जमा करो.. और मुझे उसका स्क्रिनशॉट भेंजो..
'पाच लाख..?
'टोटल आठ लाख देना पडेगा.. पर कन्फर्म करनेका पाच.. बादमे देढ.. देढ दो बार.. और ये दो दिनमे..
त्या मुलीने फोन ठेवला.. पाठोपाठ एक मेसेज आला.
त्यावर एका बँकेचा अकाउंट नंबर आणि कोडनंबर आला.
    हे सारे आठवत असताना बाहेर स्कुटर वाजली.. तिने ओळखले मुग्धा आली.. तिने गॅस बारीक केला आणि ती लगबगिने दार उघडायला गेली.
आईला बघताच मुग्धा धावली आणि तिने आईला कडकडून मिठी मारली..
'आई शेवटी आपण जिंकलो.. शिरा दे आधी..
'हो बाई.. शिरा करून तुझीच वाट पहाते आहे... सहाशेच्या वर निश्चित ना? कारण त्या मुल्लाना अजून दिढ द्यायचे आहेत..
'हे शेवटचे ना आई? आणि नाही दिले तर?
'अग त्या लोकांचे हात वरपर्यत पोचलेले असतात.. ते पासाचे नापास करू शकतात.. सारी यंत्रणा पोखरली आहे ग यांनी..
'पण आता हे पैसे कसे जमवणार?
'मुग्धा.. बाबांना लपवून पैसे उभे करणे सोपे नव्हे.मी हे सर्व माझ्या जबाबदारीने तुझ्यासाठी केल... बाबांनी पैसे खाल्ले असते तर असे पैसे सहज देता आले असते.. पण तुझे बाबा म्हणजे तत्वाचा माणूस.. पहिले पाच लाख देताना आईने लग्नात घातलेल्या बांगडया विकल्या.. मग दिढ लाख देताना चेन विकली.. आता पाळी या पाटलीची..
'पण आई.. बाबांना कळले नाही ना अजून?
'त्यांचे माझ्या दागिन्याकडे लक्षच नसते.. त्यांची पुस्तके आणि वाचन..डुप्लिकेट दागिने घालून सध्या मी मिरवते आहे..
'आई.. तू काळजी करू नकोस.. मी फक्त डॉक्टर होउदे.. तुझे सर्व दागिने परत तूझ्या गळ्यात घालते कीं नाही बघ..
'हो ग बाई.. तू मोठी हो.स्वतः पैसे मिळव.. आमच्यासारखे नवऱ्यावर अवलंबून  राहू नकोस..
'बघच आई... मी किती पैसे मिळवते ते..
दोघी शिरा खाता खाता बोलत होत्या.
आपली सोन्याची पाटली विकून मंजुने मुल्लासरांचे पैसे पुरे केले. पुन्हा एकदा डुप्लिकेट पाटली तिच्या हातात आली.
    रिझल्टला वेळ असल्याने मुग्धाने नॉर्थ ईस्टची ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. तिच्या बाबांनी आनंदाने सर्व खर्च केला.. ट्रिपचे फोटो ती आईबाबांना पाठवत होती आणि प्रत्येक ठिकाणची वर्णने पण टाकत होती.
मुग्धाला फिरायला, ट्रेकिंग करायला फार आवडे.. पण शाळेचा आणि मग नीट परीक्षेचा अभ्यास असल्याने तिला हा छंद बाजूला ठेवायला लागला होता.
  मंजू आनंदात होती.. मुग्धा ट्रिप एन्जॉय करत होती.. आता काही दिवसात नीट परीक्षेचा निकाल लागायचा होता.. त्यात ती सहाशेच्यावर स्कोर करणार होती.. मग टॉप मेडिकल कॉलेजमध्ये किंवा एम्समध्ये तिला ऍडमिशन मिळणार होत.... पण?
अचानक टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या..
"नीट परीक्षेत गडबड... सरकारने परीक्षा रद्द केली.. पुन्हा नीट परीक्षा होणार.
   मुग्धाने मोबाईलवर ही बातमी वाचली. तिच्या काळजात धस्स झाले.. तिने टीव्ही लावला.. तीच बातमी होती.
एव्हड्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला..
'नीट परीक्षा रद्द केल्याची बातमी आहे... परत परीक्षा होणार आहे.. मुग्धाला फोन करून सांग आणि बोलावून घे..
'हो.हो.. बोलावते तिला..
धडधडत्या काळजाने तिने उत्तर दिले.
तिने माधवला फोन लावला.. कारण नीटसाठी त्यानेच फिल्डिंग लावली होती... माधवचा फोन बंद होता..तिने त्याच्या बायकोला म्हणजे मधूला फोन लावला.. तिचाही फोन बंद.. तिने माधवच्या शेजाऱ्यांना फोन लावला.. त्यांनी सांगितले.. काल पासून त्यांचे घर बंद आहे.. बरीच लोक त्यांना शोधत आहेत.
मंजुने रडत रडत मुग्धाला फोन लावला..
'अग बाई.. नीट परीक्षेतील घोटाळा बाहेर आला आहे..
तिकडे मुग्धाला धक्का बसला.
किंचाळून तिने विचारले..
'काय? घोटाळा बाहेर आला? परीक्षा रद्द?  परत परीक्षा होणार? अरे देवा.. मला मग मेडिकल विसरायला हवं..
'अग गधडे.. या तूझ्या नीट पायी माझे दहा लाखाचे दागिने विकले.. त्या माधवच्या नादाला लागून, आता तो आणि मधू नाहीसे झालेत..तू ताबडतोब इकडे ये बघू.. मला कस तरी होतंय.. बर हे मी नवऱ्यापासून दडवून केलंय..
टीव्हीवर बातम्या येत होत्या.. भारतभर छापे टाकणे सुरु होते.सी बी आयकडे प्रकरण गेले होते.. पेपर फोडणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतले जात होते.. आणि मुल्लाला अटक झाल्याची बातमी आली.. एकएकजण ताब्यात येत होता..
  दोन दिवसांनी मुग्धा घरी आली. आल्या आल्या रडायला लागली..
'आई.. मी किती स्वप्न पाहिलं होत माहित आहे... मी मोठी डॉक्टर होणार होते.. मोठं हॉस्पिटल बांधणार होते.. मोठी गाडी...
चिडून मंजू ओरडली..
'जळूदे तुझं हॉस्पिटल.. आणि गाडी.. स्वतः अभ्यास करायचा नाही.. आणि डॉक्टर व्हायचंय तुम्हाला... तूझ्यापायी माझ्या नवऱ्याशी खोटे बोलले मी... त्याला न सांगता दागिने विकले आणि लंकेची पार्वती झाले.. तुम्हा मुलांना फक्त डॉक्टर व्हयचंय असत किंवा इंजिनीरिंग किंवा शासकीय अधिकारी.. बस्स.. खूप पैसे मिळवायचे असतात.. त्यासाठी आम्हा पालकाचा बळी जातो.. तूझ्या हट्टापायी मी माधवला शब्द टाकला आणि त्याने असा अघोरीं मार्ग सांगितला.माझीच चूक झाली.. मी एका चरित्र्यवान सरकारी अधिकाऱ्याची बायको आहे.. हे मी विसरले...आता सीबीआय चौकशी करते आहे.. पेपर फोडणारे शिक्षक, क्लासवाले सापडले आहेत.. मुल्लाला पकडले आहे.. कदाचित मुल्लाकडे कुणाकुणाला पेपर दिलेत.. याची लिस्ट मिळाली तर..
भोवळ येऊन मंजू खाली कोसळली आणि मुग्धा..'आई, आई करत.. धावली.
सीबीआयने नीट परीक्षा गैरव्यवहाराची पाळेमूळे खणली.. मुल्लाचे सर्किट सापडले... माधवला अटक झाली.. 
दुसऱ्यादिवसाच्या पेपरमध्ये आणि चॅनेलवर ठळक बातमी होती..
'नीट परीक्षेतील गैरव्यव्हार पैकी मुख्य आरोपी मुल्ला कडून पैसे देऊन आपल्या मुली साठी पेपर मिळविल्याबंद्दल नायब तहसीलदाराला अटक आणि नोकरीतून बडतर्फ.

     प्रदीप रामदास केळुस्कर 9422381299/9307521152.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...