शनिवार, २३ मे, २०२६

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती.
“अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आलोय. चूल, स्वयंपाक, झाडू-पोछा. एवढंच ना ! आणि वरून तिचं हे दुखतं, ते दुखतं. नाटकच चाललेलं असतं जणू ! जसं आम्ही कधी कामच केलं नाही.”
आणि माझ्या बायकोला सांगायला गेलो तर ती सरळ तोंड करून बोलायलाही तयार नव्हती. फक्त शांतपणे सगळं ऐकत होती.
अशावेळी. मला आईचंच बोलणं खरं वाटलं. खरंच तर आहे. आईसुद्धा किती काम करायची आधी. पण माझ्या बायकोचं मात्र वेगळंच नाटक आहे. पण मी तरी काय करणार? दोघींमध्ये भरडला जाणार तर मीच होतो. म्हणून बायकोशी बोलायला तिच्या मागे गेलो.
मीही रागात बोलून गेलो,
“अगं, कितीसं काम असतं? मला बघ. सकाळपासून बाहेर असतो, दिवसभर काम करतो. संध्याकाळी थोडा आराम करावा म्हटलं तर तुझी कटकट सुरू असते.”
पण बायको काही ऐकणाऱ्यांपैकी नव्हती. समोर आईही नव्हती की बोलताना तिला काही संकोच वाटेल. ती म्हणाली,
“ठीक आहे पतिदेव... एक दिवस तुम्ही माझं आयुष्य जगून बघणार का?”
मीही म्हणालो,
“ठीक आहे ! करीन. त्या दिवशी तू काहीच काम करू नकोस. फक्त बसून राहा. दिवसभर इकडे-तिकडे शेजाऱ्यांकडे जाणं, उरलेल्या वेळेत माहेरच्यांशी फोनवर बोलणं. हे सगळं बंद केलंस तर दोन तासांत काम संपेल.”
बायको एकदा हसली आणि म्हणाली,
“नाही नाही पतिदेव... तुम्हाला पूर्ण घरकाम करायचं नाहीये. फक्त माझ्या वाट्याचे तीनच काम करायचे आहेत.”
“फक्त तीन कामं...? सांग बरं कोणती?” मी विचारलं.
ती म्हणाली,
“पहिलं काम - मी कपडे धुवेन, तुम्ही फक्त ते वाळत टाका.
दुसरं - मी भांडी घासेन, तुम्ही फक्त ती जागेवर लावा.
आणि तिसरं - मी घर झाडून-पुसून घेईन, तुम्ही फक्त कचरा टाका.”
मी मिश्किल हसत म्हणालो,
“तू पण ना... तुला आरामाची चांगली संधी देत होतो, तीच घालवते आहेस. चालेल, उद्या तयार राहतो.”
---
सकाळ झाली. सगळ्यांचा चहा-नाश्ता झाला. त्यानंतर बायकोने सगळी भांडी धुवून टोपलीत ठेवली.
मी ती लावायला पुढे गेलो, तर ती म्हणाली,
“अहो अहो पतिदेव. आधी भांड्यांवरचं पाणी निथळू द्या. मग हे चिनी कप तिकडे समोर ठेवायचे. आणि हो, आधी कपड्याने पुसून घ्या. या प्लेट्स सिंकखालच्या कपाटात ठेवायच्या. त्या वेगळ्या-वेगळ्या ठेवा, एकावर एक ठेवल्या तर त्यात ओलसरपणा येतो. आणि ही चहाची किटली खिडकीजवळ उन्हात ठेवा म्हणजे वास जाईल. आणि आईंचा औषधाचा ग्लास त्यांच्या खोलीत नीट कोरडा करून ठेवायचा.”
मी तिचं सगळं ऐकत भांडी लावायला लागलो. भांडी लावत लावत पंधरा मिनिटं कधी गेली समजलंच नाही. काय करणार... चिनी मातीची भांडी होती... जपून ठेवावी लागत होती. फुटली तर? रोज आई माझ्या बायकोला बोल लावते... आज मला ऐकावं लागू नये म्हणून भीती वाटत होती.
---
नंतर बायकोने झाडू काढला आणि कचरा तसाच ठेवला. मी कचरा टाकायला निघालो तर ती म्हणाली,
“पतिदेव, कचरा वेगळा टाका. ओला कचरा वेगळा, सुका वेगळा. आणि किचनमध्ये भाजी साफ केली होती ना, त्यातलं गवत, देठ वगैरे खाली गाईला टाका. सोबत कालच्या पोळ्याही ठेवल्यात.”
मी एका हातात ओला कचरा, दुसऱ्या हातात सुका कचरा आणि किचनचा कचरा घेऊन अंगणात आलो. कॉलनीत आधीपासूनच गाय उभी होती. तिला पोळी खाऊ घालायला लागलो तर तिने थोडं खाल्लं, थोडा कचरा पसरवला. पुन्हा झाडू घेऊन साफ करावं लागलं.
कचऱ्याच्या गाडीचा आवाज येत होता - “गाडीवाला आला, घरचा कचरा काढा...” पण गाडी अजून आली नव्हती. बहुतेक प्रत्येक ठिकाणी थांबत येत असावी. म्हणून बाहेर उभा राहिलो. एकटं उभं राहून कंटाळा आला म्हणून मोबाईल काढून बोलायला लागलो.
पाच... दहा मिनिटांनी गाडी आली. कचरा टाकून परत घरात आलो.
अजून १५-२० मिनिटं गेली होती...
---
थोडा वेळ बसलो. बायको सगळ्या खोल्यांतून कपडे गोळा करत होती धुण्यासाठी.
मी विचार केला, “आता कपडे धुवायला वेळ लागेल, तोपर्यंत थोडा आराम करतो.”
इतक्यात बाथरूममधून धपाधप आवाज यायला लागला. असं वाटत होतं जणू ती कपडे धुत नव्हती. दिवसाचा सगळा राग त्यांच्यावर काढत होती. मी रागाने बाथरूमजवळ गेलो आणि म्हणणारच होतो,
“राग काढायचाच असेल तर माझ्यावर काढ...”
तेवढ्यात पाहिलं तर ती माझीच जीन्स घासत होती, ज्यावर काल मी भाजी सांडली होती.
मी माझे शब्द तोंडातच गिळले.
---
थोड्या वेळाने ती दोन बादल्या कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका. आणि हो, ही साडी सावलीत टाका, रंग जातो तिचा. आणि हे शर्ट-पॅन्ट उलटे करून टाका म्हणजे रंगही जाणार नाही आणि ऊनही लागेल. सगळ्या कपड्यांना क्लिप लावा. आणि दूर-दूर टाका म्हणजे नीट वाळतील. कधी पाऊस येईल सांगता येत नाही.”
मी फक्त मान हलवत छतावर गेलो.
छतावर जाऊन एकेक कपडा वेगळा टांगायला लागलो. पॅन्ट उलटी केली... शर्टची बटणं लावली... कपडे टांगताना पाहिलं तर कॉलरवरचे आणि पॅन्टवरील डाग गेले होते. मनोमन बायकोचं कौतुक वाटलं.
मुलांचे छोटे छोटे कपडे वाळत घालणं तर फार अवघड वाटलं. जसा टाकायचो तसाच वाऱ्याने उडायचा. एका हाताने कपडा पकडायचा, दुसऱ्याने क्लिप लावायची. कसाबसा अर्धा तास गेला.
इतक्यात शेजारच्या आजीही त्यांच्या छतावर आल्या. आता त्यांना नमस्कार करणं भाग होतं. दुर्लक्ष करून निघालो असतो तर काय विचार केला असता कोण जाणे! म्हणून त्यांच्याशीही थोडं बोलावं लागलं.
---
खाली आलो तर बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. सिंकमध्ये पुन्हा भांड्यांचा ढीग जमा झाला होता. कढई, तवा, चमचे, मिक्सरचा जार, लाटणं, पाट.. मध्येच चहाचे कप पुन्हा आलेले.
तिने सगळी भांडी धुतली आणि सगळ्यांना जेवण वाढायला लागली.
सगळे जेवले आणि पुन्हा सिंकमध्ये भांड्यांचा ढीग जमा झाला.
मी सकाळची भांडीच लावत होतो, तोपर्यंत तिने दुसरी भांडी धुवून ठेवली आणि दयाळूपणे म्हणाली,
“आता राहू द्या... दुपारी लावा.”
मी पाहिलं... सकाळपासून ती एकदाही बसली नव्हती. फोनलाही हात लावला नव्हता.
मी थोडं हसत विचारलं,
“काय गं, आज एकदाही फोन घेतला नाहीस?”
ती हलकंसं हसून म्हणाली,
“तुम्हालाच तर फोन करते मी.आज तुम्ही घरी आहात, मग कशाला करू?”
मी म्हणालो,
“का? माहेरी कोणाला फोन करत नाहीस? आई तर म्हणते दिवसभर मोबाईलवर असतेस.”
ती निर्विकारपणे म्हणाली,
“माझ्यासारख्याच माहेरच्या बायका पण कामात व्यस्त असतात. सणासुदीला थोडं बोलणं होतं. आई म्हणाल्या ते बरोबरच म्हणाल्या. मुलांच्या ट्युशनवाले, गॅसवाले, डिशवाले, कुरिअरवाले. अर्धी कामं आजकाल मोबाईलवरच होतात.”
---
मुलं शाळेतून आली. तिने पुन्हा गॅस लावला. मुलांच्या आवडीचं खायला केलं. टिफिन पुन्हा सिंकमध्ये आले. प्लेट्स जमा झाल्या. तिने त्या धुतल्या.
मग पुन्हा झाडू काढला. दुसऱ्यांदा घर झाडत होती.
इतक्यात आईचा आवाज आला - “चहा कर!”
ती चहा करायला गेली. पुन्हा चहाची भांडी सिंकमध्ये.
मुलांचे शाळेचे कपडे बाथरूममध्ये आले. ती पुन्हा कपडे धुवायला लागली. दुसऱ्या दिवशी शाळेत तेच घालायचे होते.
मी किचनमध्ये धुतलेल्या भांड्यांचा ढीग पाहूनच घाबरत होतो. इतक्यात ती मुलांचे कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका.”
---
असं करत करत पूर्ण दिवस गेला.
संध्याकाळचा नाश्ता झाला. पुन्हा भांडी.
रात्रीचं जेवण झालं. पुन्हा भांडी.
संपूर्ण दिवस हेच चक्र सुरू होतं.
आता मीच या कामाला कंटाळलो होतो.
खरंच... मला बायकोची दया आली.
ज्या गोष्टी फक्त वाळत टाकताना मला आळस येत होता, त्या ती आधी धुते, घासून चमकवते, मग वाळवते, नंतर इस्त्री करून जागेवर ठेवते. रोज रोज हे सगळं करून ती किती कंटाळली असेल.
आणि काही वर्षांपासून तर तिने माझ्याकडे काही मागणंसुद्धा बंद केलं होतं.
कुठेतरी तिच्या या शांत स्वभावामुळे मलाच ती गर्विष्ठ वाटायला लागली होती.
---
रात्री मी तिला म्हणालो,
“आज मला कळलं तू दिवसभर किती काम करतेस आणि किती नीट करतेस.”
“पण एक सांग. तू माझ्या आईशी नीट बोलत का नाहीस? त्यांची काळजी घेतेस तरी त्या तुझ्यावर रागावलेल्या का असतात?”
ती म्हणाली,
“आज तुम्ही एक दिवस माझ्या वाट्याचं थोडंसं काम केलं, तेव्हा तुम्हाला माझी अवस्था कळली. आईजी तर हे आयुष्य स्वतः जगलेल्या आहेत. रोज स्वतःच्या डोळ्यांनी मला पाहतात. तरी समाधानी नसतात. चुका काढतात. माझ्या शरीराच्या वेदनांना नाटक समजतात.
सांगा बरं... मी किती वेळा स्वतःची सफाई देत राहू?
बोलले तर उद्धट...
न बोलले तर गर्विष्ठ...
त्यांचं एकच असतं - ‘आमच्या काळात... आमच्या काळात...’
पण पतिदेव... काळ निघून जातो... बदलतोही.
पण आयुष्य जगायचं असतं. ते कोणाच्या मर्जीप्रमाणे बदलत नाही.
त्यांच्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या. आपल्या काळात वेगळ्या आहेत.
त्या अजूनही भूतकाळात जगत आहेत आणि मी आजमध्ये जगते आहे.”
---
एका स्त्रीला वाईट तेव्हा वाटत नाही जेव्हा एखादा पुरुष तिला कमी लेखतो. कारण पुरुषाला कदाचित कल्पनाही नसते की जबाबदाऱ्या पेलता पेलता ती त्याच्या वयापेक्षाही कितीतरी मोठी झालेली असते. जेव्हा तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, तेव्हाच तिचं लग्न लावलं जातं.
जेव्हा ती घर सांभाळायला शिकते, तेव्हाच मुलांची जबाबदारी येते आणि ती स्वतः अजून मनाने लहानच असते.
आणि जेव्हा ती घर आणि मुलं दोन्ही सांभाळायला शिकते.
तेव्हा तिच्याकडून अपेक्षा केली जाते की आता पैसेही कमवावेत.
पण तेवढा आत्मविश्वास तिच्यात उरलेला असतो का?
तो तर कधीच तिच्या जवळच्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उणेदुणे काढून संपवलेला असतो.
आणि ती समाजात फक्त उपहासाचा विषय बनून राहते. फक्त म्हणून की ती चार भिंतींच्या आत राहते.
खरं तर, हे आमच्या स्त्रियांचं रोजचंच आयुष्य आहे.
म्हणूनच एका वेळेनंतर आम्ही स्वतःबद्दल स्पष्टीकरण देणं सोडून देतो.
आणि शांततेलाच आपला दागिना मानून अंगावर चढवतो.
स्त्रीला खर्‍या अर्थाने वाईट तेव्हा वाटतं जेव्हा एक स्त्रीच तिची किंमत ओळखत नाही.
बायकोचं बोलणं ऐकून मी नि:शब्द झालो.

2899. योग

     त्याचं काही केल्या लग्न जमेना, लग्न तर करावसं वाटतं होतं पण जमत नव्हतं. प्रत्येक वेळी नकारच येत होता, असं नाही...पण जमेचना.
   दिसायला छान उंचापुरा, शिकला-सवरलेला, व्यवसाय उत्तम स्थितीत चाललेला, उच्चभ्रू वस्तीत स्वत:चं घर, घराशी दोन चार चाकी उभ्या. आणखी संसाराला काय लागतं?
पण तरी योग येत नव्हता. वय उलटून चाललेलं. तसा तो समंजस होता. पण, ‘बाकी सगळं माझ्याकडे आहे, मग लग्न का नाही?’ या हट्टी प्रश्नापुढं त्याचा समंजसपणा कमी पडत होता.
म्हणून तो एकदा ज्योतिषाकडे गेला. पत्रिका बघून ते म्हणाले, “गेल्या जन्मात तुम्ही जिला फसवलंत, तिनं तुमच्या लग्नाच्या दिवशी आत्महत्या केली होती. आता तिनं पुन्हा जन्म स्विकारल्याशिवाय तुमची सुटका नाही.”
हे ऐकून त्याला गम्मत वाटली. मग त्याला छंदच लागला. दिसला ज्योतिषी की दाखव पत्रिका असं होऊन गेलं. एकदा ज्ञानी पुरुषासमोर तो अपघातानं पोहोचला. त्यानं अधिकारवाणीनं त्याची कानउघाडणी केली आणि तेच कारण सांगितलं, जे आधी एकानं सांगितलं होतं.
     त्यानं खूप विचार केला आणि आपल्या गतजन्मीच्या प्रेयसीला कळवळून म्हणाला, “गेल्या जन्माचं तर मला काही आठवत नाही. तरी मी तुझी मनापासून क्षमा मागतो. पण मी काय म्हणतो, काळ हा सर्व दुःखावर औषध आहे आणि आपण दोन्ही अर्थानं काळ पार केलाय. मी तर दुसरा जन्मही घेतलाय आणि तू तिथंच अडकून आहेस? मग ही कोंडी सुटायची कशी?
“माझं ऐक, तू आता माझ्याच पोटी जन्म घे. मागच्या जन्मीचं सोड. प्रियकर म्हणून मी नालायक ठरलो असेन. पण मुलगी म्हणून पोटी आलीस तर बघ. बाप म्हणून मी तुला किती सुखात ठेवेन ! देवदयेनं सोन्याचा चमचा तुझ्या तोंडी देऊ शकेन, अशी आपली परिस्थिती आहे.”
त्यानं नक्की कुणाला प्रार्थना केली आणि ती कुणी ऐकली देव जाणे. पण ती फळली. जे गेल्या पंधरा वर्षात जमलं नाही ते पंधरा दिवसात जमलं !
जी मुलगी सगळ्यात आधी पाहिली होती, तीच पुन्हा संपर्कात आली. अजून तशीच साधी, सोज्वळ, सुंदर. तेव्हा तिच्या पत्रिकेत दोष होता, म्हणून ती नाकारली गेली होती. 
त्यानं विचार केला, आता या वयात आणखी कसली अपेक्षा ठेवायची? आहे ते आयुष्य मजेत जगायचं.
तो परत त्या ज्योतिषाकडे गेला, ते म्हणाले, “तुला लग्न करायची दुर्दम्य इच्छा आहे ना? मग उरकून घे. आता पत्रिका बघत बसू नकोस.”
मग त्यानं लग्न केलं. दोघेही खूप सुखात होते. पंधरा वर्ष वाया घालवल्याची हूरहूर दोघाना जाणवत होती, इतके ते एकरूप झाले.
पण तरी ती म्हणायची, “बाळा शिवाय काय आहे आयुष्यात? जन्मभर शेजार-पाजार्‍यांची मुलं खेळवली. पण माझ्याच पोटी मूल नाही? हा कस्ला नतद्रष्ट योग!”
थोडी प्रतिक्षा करावी लागली. पण एकदा तिला चाहूल लागली. तिला दिवस गेले, डॉक्टर म्हणाले, 
“वयाचं मनावर घेऊ नका. सगळं उत्तम आहे.”
डॉक्टर सहज म्हणाले, “बाळानंच तुमच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलंय. ते येईल.”
त्याला एकदम त्याच्या प्रेयसीला केलेली प्रामाणिक प्रार्थना, विनवणी जे काही होतं ते आठवलं. नक्की कुणाला प्रार्थना केली? कोणाला ये म्हटलं? कोण यायला तयार झालं? सगळंच अगम्य अकालनीय !
मी तिला फसवलं, म्हणून तिनं आत्महत्या केली; तरी तिचा माझ्यावर अजून इतका विश्वास की माझ्या सांगण्यावरून ती पुन्हा जन्म घेण्याची रिस्क उचलायला तयार झाली?
म्हटलं तर मनाचे खेळ. पण जी अस्तित्वातच नाही, तिच्याबद्दल त्याला विलक्षण अनुकंपा वाटली, आदर वाटला. तिनं जन्म घ्यायच्या आधीच जणू त्यांच्या नात्याचा आलेख तयार होता.
यथावकाश त्यांना मुलगीच झाली. मुलीची पत्रिका बनवायला ते ज्योतिषाकडे गेले. मुलीसोबत तिच्या आईची पत्रिका बघताना ते चकीत झाले.
त्या आईच्या पोटी अपत्य सुखाचा योगच नव्हता…!!!

- चंद्रशेखर गोखले

2898. अधिकस्य अधिक फलम्

 एक दिवस माय लेकी बोलत होत्या. गरोदर मुलीने पोटावरून हात फिरवत आईला विचारलं, "सर्व व्रतात श्रेष्ठ असं कोणतं व्रत जेणेकरून माझं येणारं बाळ सुदृढ, हुशार तर होईलच शिवाय मी केलेल्या व्रताचं पुण्य बाळ जन्मल्यापासून बाळाला मिळेल? "
आई म्हणाली, "छान प्रश्न विचारलास बाळा. मी आज हे व्रत तुला सांगते पण तू प्रॉमिस कर, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाहीस. मनोभावे हे व्रत करशील आणि चार  सखींना पण करायला लावशील. ह्या व्रताने तेजस्वी, निरामय, प्रज्ञावान संतती होते जी दीर्घायुषी व तुझ्या पुण्याने यशस्वी होते " 
"हो आई, नक्की करेन मी हे व्रत, कधी सुरु करावं?" 
"हे व्रत गरोदर राहिलं की सुरु करावं आणि बाळ निदान दोन वर्षाचं होईपर्यंत सुरु ठेवावं. आटपाट नगर असो वा मेट्रो शहर असो, हाऊसवाईफ असो वा वर्किंग वूमन असो, झोपडीतली असो वा बंगल्यातली, काळी असो वा गोरी असो कुठलीही स्त्री गरोदर राहिली की तिने संकल्प करावा, मी बाळाला सहा महिने फक्त आणि फक्त माझंच दूध (exclusive breastfeeding ) पाजणार आणि कमीत कमी दोन वर्ष तरी स्तनपान चालू ठेवणार ! हा संकल्प तिने तिच्या घरच्यांना विशेषतः आई व सासूला आणि तिच्या स्त्री रोग तज्ञाला ठासून सांगावा म्हणजे व्रत मनोभावे करता येतं वं खंड पडत नाही.  गरोदरपणात संकल्प केला की  व्रताची सुरुवात डिलिव्हरी झाल्या झाल्या करावी. त्यासाठी काय करावं? थोडं स्ट्रॉंग व्हावं, नॉर्मल होवो अथवा सीझर, बाळाला लगेच छातीला लावावं, चीक दूध पाजावं - ही पूजेतील पहिली फलदायी पायरी आहे. साखर पाणी वा मध असे दुसरे काही आजीने चाटवल्यास कोप होऊन व्रताचा भंग होतो त्यामुळे आधीच तशी कल्पना सगळ्यांना द्यावी. पूजेचे मुख्य पद म्हणजे बाळाला पाळण्यात न ठेवता आईच्या कुशीतच ठेवावे व भूक लागेल तेव्हा अंगावरच पाजावे " आई म्हणाली.
"त्याने काय होते आई? " मुलीने विचारले. 
" बाळ जेवढे जास्त छातीवर ओढणार तेवढे आईचे दूध वाढते. ह्या व्रतादरम्यान फॉर्मुला पावडर, गायी म्हशीचे पाणी टाकलेले दूध वं बाटली ह्या गोष्टी बाळासाठी पूर्णपणे वर्ज्य कराव्या. व्रतादरम्यान एकदा तरी लॅकटेशन तज्ञाचे दर्शन जरूर घ्यावे त्यामुळे व्रत पूर्ण होण्यासाठी मदत होते. मोदक खाल्याने गणपती बाप्पा मोदक देणाऱ्यावर खुश होतो तसा बाळंतीणीला पौष्टिक आहार दिल्याने आई सासू ह्यांनाही पुण्य लाभते. हे व्रत मनापासून, न कंटाळता कमीत कमी दोन वर्ष केल्यास बाळाला पुढची सत्तर ऐन्शी वर्षे आरोग्य लाभते, बाळ हुशार होते, ऍलर्जी - जंतू संसर्ग - स्थूलता - डायबेटीस ह्या सटव्या त्याचं काहीही वाकडं करू शकत नाहीत. तू देखील हे व्रत श्रद्धेने कर... " आई 
" आई, जसं अधिक मासात अधिक पुण्य करावं तसं ह्या व्रतात मी अधिक काय करू शकते? " लेकीने विचारलं. 
"बरवा प्रश्न केलास बाळा. आपल्या बाळाचं पोट भरण्याचं व्रत तर अगदीच साधं आहे पण आपल्याबरोबरीने दुसऱ्या बाळांचं क्षुधाशमन केल्यास तुला अगणित पुण्य लाभेल " आई म्हणाली.
" तेच! त्यासाठी काय करावं? " 
" तुला भरपूर दूध येऊ लागलं, बाळाचं पोट भरून जर दूध एक्सट्रा उरू लागलं तर मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस, आईचं बहुमूल्य दूध फेकू नकोस ! मिल्क बँकेत म्हणजेच मानवी दुग्ध पेढीत जा आणि ते दूध दान कर. तुझ्या बाळाची झोळी आशीर्वादाने भरून जाईल " आईने सांगितलं. 
" पण आई, असं कसं कुणाचं दूध कुणाला वापरणार? आणि माझ्या बाळाला कमी पडलं तर? शिवाय ह्याचा मला काय फायदा? " लेकीने साशंक होऊन विचारलं. 
" दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे मानवी दुग्ध दान! दान केलेल्या दुधावर प्रक्रिया करून ते निरजंतूक करून मगच वापरतात. तू जर दुग्ध दान केलंस तर तुझं दूध वाढतं शिवाय तुला छाती भरणे, दुधाच्या गाठी होणे अशा समस्या होत नाहीत आणि पुण्य मिळतं ते वेगळंच. हे अत्युच्च दान तू केल्यास तुला श्रेष्ठतम फळ मिळेल " 
" आई, तू केलं होतंस हे दान? " मुलीने आईला विचारलं.
आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली, " बाळा, तू काचपेटीत आणि मी ICU त होते तेव्हा एका अज्ञात मातेने मिल्क बँकेत दान केलेल्या दुधाने तुला मरणाच्या दारातून परत आणलं, मी आजही त्या  मातेची आभारी आहे आणि तिच्या लेकरासाठी आजही मी सुख मागते. " 
"हो आई? " लेकीने हात जोडून मनोमन त्या मातेचे आभार मानले.
"माझी इच्छा आहे तू हे दान करावं. रक्तदान, अवयव दान हे सुद्धा महत्वाचे पण लक्षात ठेव दुग्ध दान हे तू आई म्हणून बाळाला पाजत असतानाच करू शकते, नंतर कधीच नाही म्हणून ही गुपित दानाची संधी सोडू नकोस आणि तुझ्या बाळाचं भविष्य उज्वल कर "
"हो आई, माझ्या घराजवळ कोणती मिल्क बँक आहे हे मी गुगल मातेला प्रश्न विचारून नक्की शोधेल, गरज पडली तर माझी भगिनी गुगल जेमिनी हिची मदत घेईन.  अधिक महिन्याप्रमाणे अधिक फळ देणारं दुग्धदानाचं महाव्रत मी नक्की करेल " 
जशी ह्या ' शिशु क्षुधा शमन' व्रताची महती तिला कळली तशी प्रत्येक स्तनदा मातेला ती कळो आणि त्या मिल्क बँकेत दुग्धदान करोत. 
ही शेकडो जीव वाचवणारी कहाणी लाईक शेयर कमेंट करून करा सुफळ संपूर्ण 

©️®️ डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर

2897. वस्तूस्थिती

     जोपर्यंत घराघरात पुरुषी कारभार होता तोपर्यंत आदर होता, भावना होत्या. मर्यादा होत्या. यामुळेच  संस्कृती टिकून होती. अर्थात यात महिलांचा सहभाग होताच
       1991 च्या ग्लोबलायझेशन पासून काॅम्प्युटरायझेशन, आयटी  क्षेत्रावर ताबा मिळवण्यात महिला यशस्वी झाल्या. त्यातही काही गैर नव्हते. परंतू मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या नादात त्या मुलींना स्वैर सोडले त्यांच्या आईने, हे वास्तव आहे.
     आपली मुलगी पैसे कमावते, या गर्वात महिलांना आपली मुलगी स्वैराचार करते याचा अभिमान वाटायला लागला. आपली मुलगी सकाळी उशिरा पर्यंत झोपून रहाते, बाहेरच खाणं ऑर्डर करते, मित्रांबरोबर फिरायला जाते, रात्री उशिरा घरी येते,मुलां सारखी वागते, सॅटर्डे संडे कुठे असते माहीत नाही. विकेंड कसा साजरा करते बापाने विचारले तर मुलीपेक्षा तीच्या आईलाच जास्त राग येतो. "मला मेलीला,आयुष्यभर घरात कोंडून ठेवलेत पण मी मुलीच्या बाबतीत हे ऐकणार नाही." असेच पुरुषांना ऐकून घ्यावे लागेल.
      कुलधर्म कुलाचार  याचे किती जणींना भान आहे ? वडीलधाऱ्यांचा आदर करावा, रामप्रहरी व तिन्हीसांजा देवासमोर दिवा लावलाच पाहिजे, आपल्या घरातून कोणीही रिकाम्या पोटी जाऊ नये. आपल्या घरी कोणीही अपमानित होऊ नये. घरात पूर्ण कपड्यातचं फिरावे, हे सर्व आईने करावयाचे संस्कार आहेत. पण मुली घरात शाॅर्टवर फिरतात याची बापाला लाज वाटते तर आईला अभिमान वाटतो. आपल्या सर्व अत्रृप्त इच्छा महिला आपल्या मुलींच्या रुपाने पूर्ण करुन घेत आहेत.
     लग्नाच्या मिरवणुकीत महिला व मुली रस्त्यावर नाचतात, त्यांचे घामाने भिजलेले अंग अनोळखी लोक न्याहाळतात तेव्हा घरच्या कर्त्या पुरुषाची मान शरमेने किती खाली जाते याचा विचार किती महिला करत असतील ? काही बोलावे तर, "आम्ही नाचू नयेच का, आम्ही आनंद व्यक्त करुच नये का ? हे ऐकुन घ्यावे लागेल.
       मुलींच्या लग्नाचे बहुतेक निर्णय मुलगी व आई दोघीच घेणार, वडीलांनी मध्ये बोलणे गुन्हा होत चाललाय. मुलगी आणि तीची आई यांच्यात एक मैत्रीच नात होत चालल आहे ही चांगली बाब असली तरी, मुलीच्या फाॅरवर्ड विचाराला आई कडून चालना मिळते म्हणून ही मैत्री आहे, एखाद्या आईने चालीरीती शिकवायचा प्रयत्न केला तर लगेच त्या आईला तू जुन्या ,मागासलेल्या विचारांची म्हणून हिणवायचे.
       स्वतःच्या पायावर उभे असलेल्या मुलींची माहेरी, सासरी मनमानी न विचारलेली बरी. फक्त पॅकेज पाहून मुलगा पसंती, लग्न म्हणजे फक्त धिंगाणा, सासरी गेल्यानंतर जुने मित्र रहाणारच. नविन नवर्याला वेळ देण्याऐवजी मैत्री चा उदोउदो, सासरची मंडळी एकदम बेकिंमत. मुलाच्या आईवडिलांची स्वतःच्या घरातच निर्वासित अवस्था. एवढे करुनही किती दिवस संसार टिकणार हे कुणी सांगु शकत नाही. कारण एकतर मुलींची सहनशीलता कमी होत चालली त्यात आईची फुस आणि स्वतःच्या पायावर उभे असल्याचा माज. शहरी मुलींची वागणूक पाहिल्यावर कोणत्याही वडीलांना आपल्या मुलीची लाज वाटेल.
      कोणतीही तमा न बाळगता घटस्फोट होत आहेत वर मुलगा नामर्द होता असे बिनधास्त सांगितले जाते. याला मुलींच्या आईची पाठराखण असते.
       तालुका किंवा खेड्यातील बायांचा वेगळाच खाक्या, बारावी नापास मुलीलाही पुण्यातला इंजीनियरच हवा. त्यांच्या आईंना इंजीनियरच काम काय असतं ते माहिती नाही, इंजीनियर शब्दाच स्पेलिंग येत नाही. तरीही जावई इंजीनियर पाहिजे तोही दहा लाखा वरील पॅकेजचा. काहींना वाटेल, मग खेड्यातील मुलींना इंजीनियर मिळूच नये का ? तर मिळावा नं पण त्या मुलाच्या अपेक्षांना तुम्ही उतराना...
     मुलींच्या आईच्या अपेक्षा पाहून त्या माऊलीला विचारावस वाटत. बाईग तुझ्या बापान वयाच्या कितव्या वर्षी घर बांधले ? तुझ्या नवर्यान आजवर किती रुपये कमावले ?, तू वयाच्या कितव्या वर्षी लाख रुपये पाहिलेस ? स्वत: एसटी मध्ये अर्ध्या तिकिटा साठी कंडक्टरला भांडतेस, तुझ्या नवर्याने रेशनच्या साखरे साठी खोटे आधारकार्ड बनवून घेतले. आणि तूला जावयाचा थ्री बीएचके हवा, दारात लग्ना आधीच फोर व्हिलर हवी, स्वतःच आयुष्य, "साधा भात-फोडणीच वरण..., फोडणीचा भात- साध वरण" खाण्यात गेलं,परवाच्या भाकरीत कालच्या पोळ्यांना एकत्र करुन फोडणीचे तुकडे तू खाल्लेस , हे तूझ्या लेकीला सांगून बाहेरच खाण ऑर्डर करणे थांबवायला सांग.
    बाईग मुलींच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतेस, तर तुझ्या मुलाच्या संसारात त्याच्या सासरवाडीची ढवळाढवळ तूला चालेल का ?
     सर्वच महिला अशा आहेत असे अजिबात नाही. अनेक महिलांनी अत्यंत प्रतिकुल स्थितीतही स्वतःच्या हिमतीवर घर तोलून धरलेली उदाहरणे आहेत तर काही पुरुष अपेक्षांचा डोंगर वाढवतात. बायकोच्या पदरा आडून आपला स्वार्थ साध्य करतात.
       संसार सुरु करण्यासाठी त्या मुलाची काय दमछाक होत असेल, तोही माणूस आहे. घाण्याच्या बैला पेक्षा जास्त त्याला संसारा भोवती फिरावे लागणार याचा विचार कुणी करीत असेल का ?
       महिलांनो आणि मुलींनो आपल्या अपेक्षांना आवर घाला. मध्यमवर्गीय संसार थाटण्यात काही कमीपणा नाही. घरातील एकच भाकरी अर्धीअर्धी खाल्लात तर नवरा बायको चे प्रेम नक्कीच वाढेल. जेमतेम बचत करुन एखादी वस्तू खरेदी करुन पहा, तुमच्या आनंदाला पारावार रहाणार नाही.
       संस्कृती जपा, कुलधर्म कुलाचार, सणवार साजरे करा.मोठ्यांचे मानसन्मान ठेवा, घराचे घरपण सांभाळा. बचत करा, हौसमौज घरच्यां बरोबर करा, आयुष्य फार सुंदर आहे. फक्त पैसा / पॅकेज म्हणजेच सर्वकाही, हे मनातून काढून टाका. शेवटी लग्न ही एक व्यवस्था आहे आणि संसार म्हणजे तडजोड आहे हे विसरुन चालणार नाही.
    
                 🙏🏻 कटूसत्य 🙏🏻

2896. पुन्हा एकदा नीट

  मुग्धाची आई मंजुश्री मुग्धाची वाट पहात होती. मुग्धा नीट परीक्षा द्यायला सेंटरवर गेली होती. तिला अंदाज होताच.. मुग्धा हसत हसत येणार, कारण तिने फिल्डिंगच तशी लावली होती. तिच्या नवऱ्याचा मध्येच फोन आला..
'काय आली काय मुग्धा?
'नाही अजून.. हॉलच्या बाहेर आली कीं लावेल फोन..
एव्हड्यात मंजूला मुग्धाचा फोन येतो आहे असे दिसलें...
'तिचा फोन येतो आहे.. मग करते मी फोन तुम्हाला..
असे म्हणून मंजुने मुलीचा फोन घेतला...
'बोल ग. कस काय?
'येस मम्मा.. शंभर टक्के..
'सेम टू सेम काय?
'केमिस्ट्री,झुवालॉजी सेम.. बायोमध्ये थोडे बदल होते.. पण सहाशेवर निश्चित..
'देव पावला..तू लवकर घरी ये.. पण बाबांना काही बोलू नकोस.. त्याना फक्त पेपर सोपे गेलेत म्हणून सांग.
'त्याना मी कशी सांगेन ममा.. तू माझ्यासाठी शिरा करून ठेव, तोपर्यंत मी पोचतेच..
मंजूला समाधान वाटलं.. गेले वर्षंभर टेन्शन होत.. गोलमाल करायला लागलं आणि ते सुद्धा नवऱ्यापासून लपवून.
मंजुने नवऱ्याला फोन लावला.
'अहो.. मुग्धाचा फोन आलेला.. खूष आहे ती.. सहाशेवर निश्चित म्हणते आहे..
'कमाल आहे... कधी फारसा अभ्यास करताना दिसत नव्हती आणि मूळची पण हुशार नव्हे.. तरी म्हणते सहाशेच्यावर?
'अहो.. क्लासमध्ये अभ्यास करायची, घरी करत नसेल कदाचित..
'बर बर.. म्हणत मुग्धाच्या बाबांनी फोन ठेवला. 
तेव्हडयात मंजूच्या लक्षात आले.. माधवला म्हणजेच तिच्या भावाला फोन करायला हवा, त्यानेच तर हे घडवून आणले..
तिने तिच्या भावाला.. माधवला फोन लावला.. पण तो बिझी येत होता.. तिच्या लक्षात आले, माधवला अनेकांचे फोन येत असणारं, आपल्यासारखे अनेकजण त्याच्या लिस्टमध्ये असणारं..
लेकीने गोड शिरा करायला सांगितलं हे मंजुच्या लक्षात आले.. गाणे गुणगुणत ती किचनमध्ये आली.. तिने रवा बशीत घेतला, निवडून घेतला.. एका पातेल्यात तूप ओतलं आणि गरम करायला घेतल, एव्हड्यात माधवचा फोन आलेला तिला दिसला..
'काय मंजू.. खूष ना?
'होय रे बाबा.. मुग्धाने फोन केलेला.. सहाशेच्या वर जाईन म्हणते आहे..
'निश्चित जाईल, म्हणजे ज्या मुलांना नोट्स मिळाल्यात.. ती सर्वच मुलांची मेडिकल ऍडमिशन पक्की.
'हो.. बर झालं बाबा... तू त्या मुल्लासरांची गाठ घालून दिलीस, नाहीतर मुग्धा मेडिकलला जाऊ शकली नसती.
'हो ताई.. बर आठवलं.. त्या मुल्लासरांना अजून दिढ लाख दयायचे आहेत, लक्षात आहे ना..
'हो.. नवऱ्याला न सांगता पैसे जमवणे फार कठीण असते रे माधव, विशेष करून नोकरी न करणाऱ्या बाईला.. बांगडया गेल्या आता पाटल्या..
'पण भावोजीना कळले नाही ना अजून?
'माधव, डुप्लिकेट दागिने कोस्मेटिक्सच्या दुकानात मिळतात ते एव्हडे ओरिजिनल सारखे दिसतात... बायका फसतात तेथे पुरुष फसयला काय?
'हो ग.. आणि एकदा मुग्धा डॉक्टर झाली कीं खोऱ्याने पैसे मिळवील.. मग हवे तेव्हढे खऱ्या सोन्याचे दागिने कर..
  खळखळून हसत मंजुने फोन ठेवला.
शिरा करता करता मंजू विचार करत होती..'आपली एकुलती एक लाडकी मुलगी, आपली आणि तिची पण इच्छा, तिने डॉक्टर व्हावे, साधे नव्हे.. सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर.. ज्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंटशिवाय भेटता येत नाही.. अशी डॉक्टर.. पण.. मुग्धा फारशी हुशार नव्हती, म्हणजे दहावीत तिने मिळविले नव्वत टक्के.. पण सध्या नव्वद टक्के म्हणजे काय.. सर्वांनाच मिळतात.. पण मेडिकलला ऍडमिशन म्हणजे, त्यात नीट परीक्षा.?.. त्याचा अडथळा कसा पार करणार?  त्या परीक्षेत साडेपाचशेपेक्षा मार्क्स हवेत.. देशात वीस लाख मुले ही परीक्षा देतात.. त्यात मुग्धा कुठे बसणार? काही लोक पैसे भरून ऍडमिशन घेतात म्हणे.. बरेच डॉक्टर्स लोक आपल्या मुलांना पैसे भरून कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेतात.. पण आपला नवरा असे कदापि करायचा नाही.. नायब तहसीलदार आहे पण पाच पैसे लाच घेणार नाही.. सारे नियमाला धरून..
या विचारात असताना आपला भाऊ.. माधव, एकदा घरी आला असताना मी त्याला म्हंटले..
'माधव.. मुग्धाला मेडिकलला जायचे आहे रे, पण..
'पण काय?
'ती फारशी हुशार नाही रे आणि तिला अभ्यासाचा कंटाळा.. नीटची परीक्षा असते ना..
'अग नीटच्या परीक्षेचेचे टेन्शन घेऊ नकोस... तुला काय वाटते गेल्या काही वर्षात जे मेडिकलला गेलेत ते खरेच हुशार होते.. त्यातील काही हुशार होते हे खरे.. बाकी..
'बाकी काय?
', पैसे मोजले तर प्रश्न दोन दिवस आधी कळतात.. तशी रॉकेट्स सुरु आहेत..
'काय सांगतोस?
'तस हे सर्वांनाच सांगत नाही मी.. फक्त जवळच्या माणसांना.. उघड झालं तर सगळे आत जातील.. मी मुग्धासाठी प्रयत्न करतो.. पण बारा पंधरा लाख तरी दयायला लागतील आणि गुपित ठेवावे लागेल.. भावोजीना मात्र सांगू नकोस.
शिरा करता करता मंजू मागील आठवत होती. बारावी परीक्षा झाली आणि एक दिवस माधवचा फोन आला..
'ताई.. मी व्यवस्था केली आहे, पण या कानाचे त्या कानाला कळता नये.. नाहीतर सगळे आत जातील.. केमिस्ट्री आणि झुवोलोजीचे पेपरसेटर कळले आहेत.. मुल्ला नावाचा माणूस आहे नागपूरचा.. तो फिल्डिंग लावतो आहे..आता त्याचा तुला डायरेक्ट फोन येईल.. ओके..
मंजू आठवू लागली...
आणि अचानक एकदा एक अनोळखी नंबरवरुन कॉल आला..
'आप मंजुजी हैं?
'हा..
'मैं मुल्लासरके ऑफिससे बात कर रही हूं..
'हा..
'माधवसरने आपको बोला होगा..
'हा..
'यदी आप इंटरेस्टेड हैं.. तो मैं मेसेज करती हूं.. वो नंबरपर फाईव्ह पेटी जमा करो.. और मुझे उसका स्क्रिनशॉट भेंजो..
'पाच लाख..?
'टोटल आठ लाख देना पडेगा.. पर कन्फर्म करनेका पाच.. बादमे देढ.. देढ दो बार.. और ये दो दिनमे..
त्या मुलीने फोन ठेवला.. पाठोपाठ एक मेसेज आला.
त्यावर एका बँकेचा अकाउंट नंबर आणि कोडनंबर आला.
    हे सारे आठवत असताना बाहेर स्कुटर वाजली.. तिने ओळखले मुग्धा आली.. तिने गॅस बारीक केला आणि ती लगबगिने दार उघडायला गेली.
आईला बघताच मुग्धा धावली आणि तिने आईला कडकडून मिठी मारली..
'आई शेवटी आपण जिंकलो.. शिरा दे आधी..
'हो बाई.. शिरा करून तुझीच वाट पहाते आहे... सहाशेच्या वर निश्चित ना? कारण त्या मुल्लाना अजून दिढ द्यायचे आहेत..
'हे शेवटचे ना आई? आणि नाही दिले तर?
'अग त्या लोकांचे हात वरपर्यत पोचलेले असतात.. ते पासाचे नापास करू शकतात.. सारी यंत्रणा पोखरली आहे ग यांनी..
'पण आता हे पैसे कसे जमवणार?
'मुग्धा.. बाबांना लपवून पैसे उभे करणे सोपे नव्हे.मी हे सर्व माझ्या जबाबदारीने तुझ्यासाठी केल... बाबांनी पैसे खाल्ले असते तर असे पैसे सहज देता आले असते.. पण तुझे बाबा म्हणजे तत्वाचा माणूस.. पहिले पाच लाख देताना आईने लग्नात घातलेल्या बांगडया विकल्या.. मग दिढ लाख देताना चेन विकली.. आता पाळी या पाटलीची..
'पण आई.. बाबांना कळले नाही ना अजून?
'त्यांचे माझ्या दागिन्याकडे लक्षच नसते.. त्यांची पुस्तके आणि वाचन..डुप्लिकेट दागिने घालून सध्या मी मिरवते आहे..
'आई.. तू काळजी करू नकोस.. मी फक्त डॉक्टर होउदे.. तुझे सर्व दागिने परत तूझ्या गळ्यात घालते कीं नाही बघ..
'हो ग बाई.. तू मोठी हो.स्वतः पैसे मिळव.. आमच्यासारखे नवऱ्यावर अवलंबून  राहू नकोस..
'बघच आई... मी किती पैसे मिळवते ते..
दोघी शिरा खाता खाता बोलत होत्या.
आपली सोन्याची पाटली विकून मंजुने मुल्लासरांचे पैसे पुरे केले. पुन्हा एकदा डुप्लिकेट पाटली तिच्या हातात आली.
    रिझल्टला वेळ असल्याने मुग्धाने नॉर्थ ईस्टची ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. तिच्या बाबांनी आनंदाने सर्व खर्च केला.. ट्रिपचे फोटो ती आईबाबांना पाठवत होती आणि प्रत्येक ठिकाणची वर्णने पण टाकत होती.
मुग्धाला फिरायला, ट्रेकिंग करायला फार आवडे.. पण शाळेचा आणि मग नीट परीक्षेचा अभ्यास असल्याने तिला हा छंद बाजूला ठेवायला लागला होता.
  मंजू आनंदात होती.. मुग्धा ट्रिप एन्जॉय करत होती.. आता काही दिवसात नीट परीक्षेचा निकाल लागायचा होता.. त्यात ती सहाशेच्यावर स्कोर करणार होती.. मग टॉप मेडिकल कॉलेजमध्ये किंवा एम्समध्ये तिला ऍडमिशन मिळणार होत.... पण?
अचानक टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या..
"नीट परीक्षेत गडबड... सरकारने परीक्षा रद्द केली.. पुन्हा नीट परीक्षा होणार.
   मुग्धाने मोबाईलवर ही बातमी वाचली. तिच्या काळजात धस्स झाले.. तिने टीव्ही लावला.. तीच बातमी होती.
एव्हड्यात तिच्या नवऱ्याचा फोन आला..
'नीट परीक्षा रद्द केल्याची बातमी आहे... परत परीक्षा होणार आहे.. मुग्धाला फोन करून सांग आणि बोलावून घे..
'हो.हो.. बोलावते तिला..
धडधडत्या काळजाने तिने उत्तर दिले.
तिने माधवला फोन लावला.. कारण नीटसाठी त्यानेच फिल्डिंग लावली होती... माधवचा फोन बंद होता..तिने त्याच्या बायकोला म्हणजे मधूला फोन लावला.. तिचाही फोन बंद.. तिने माधवच्या शेजाऱ्यांना फोन लावला.. त्यांनी सांगितले.. काल पासून त्यांचे घर बंद आहे.. बरीच लोक त्यांना शोधत आहेत.
मंजुने रडत रडत मुग्धाला फोन लावला..
'अग बाई.. नीट परीक्षेतील घोटाळा बाहेर आला आहे..
तिकडे मुग्धाला धक्का बसला.
किंचाळून तिने विचारले..
'काय? घोटाळा बाहेर आला? परीक्षा रद्द?  परत परीक्षा होणार? अरे देवा.. मला मग मेडिकल विसरायला हवं..
'अग गधडे.. या तूझ्या नीट पायी माझे दहा लाखाचे दागिने विकले.. त्या माधवच्या नादाला लागून, आता तो आणि मधू नाहीसे झालेत..तू ताबडतोब इकडे ये बघू.. मला कस तरी होतंय.. बर हे मी नवऱ्यापासून दडवून केलंय..
टीव्हीवर बातम्या येत होत्या.. भारतभर छापे टाकणे सुरु होते.सी बी आयकडे प्रकरण गेले होते.. पेपर फोडणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतले जात होते.. आणि मुल्लाला अटक झाल्याची बातमी आली.. एकएकजण ताब्यात येत होता..
  दोन दिवसांनी मुग्धा घरी आली. आल्या आल्या रडायला लागली..
'आई.. मी किती स्वप्न पाहिलं होत माहित आहे... मी मोठी डॉक्टर होणार होते.. मोठं हॉस्पिटल बांधणार होते.. मोठी गाडी...
चिडून मंजू ओरडली..
'जळूदे तुझं हॉस्पिटल.. आणि गाडी.. स्वतः अभ्यास करायचा नाही.. आणि डॉक्टर व्हायचंय तुम्हाला... तूझ्यापायी माझ्या नवऱ्याशी खोटे बोलले मी... त्याला न सांगता दागिने विकले आणि लंकेची पार्वती झाले.. तुम्हा मुलांना फक्त डॉक्टर व्हयचंय असत किंवा इंजिनीरिंग किंवा शासकीय अधिकारी.. बस्स.. खूप पैसे मिळवायचे असतात.. त्यासाठी आम्हा पालकाचा बळी जातो.. तूझ्या हट्टापायी मी माधवला शब्द टाकला आणि त्याने असा अघोरीं मार्ग सांगितला.माझीच चूक झाली.. मी एका चरित्र्यवान सरकारी अधिकाऱ्याची बायको आहे.. हे मी विसरले...आता सीबीआय चौकशी करते आहे.. पेपर फोडणारे शिक्षक, क्लासवाले सापडले आहेत.. मुल्लाला पकडले आहे.. कदाचित मुल्लाकडे कुणाकुणाला पेपर दिलेत.. याची लिस्ट मिळाली तर..
भोवळ येऊन मंजू खाली कोसळली आणि मुग्धा..'आई, आई करत.. धावली.
सीबीआयने नीट परीक्षा गैरव्यवहाराची पाळेमूळे खणली.. मुल्लाचे सर्किट सापडले... माधवला अटक झाली.. 
दुसऱ्यादिवसाच्या पेपरमध्ये आणि चॅनेलवर ठळक बातमी होती..
'नीट परीक्षेतील गैरव्यव्हार पैकी मुख्य आरोपी मुल्ला कडून पैसे देऊन आपल्या मुली साठी पेपर मिळविल्याबंद्दल नायब तहसीलदाराला अटक आणि नोकरीतून बडतर्फ.

     प्रदीप रामदास केळुस्कर 9422381299/9307521152.

2895. ताटातील शेवटचा घास

 एक सामाजिक कथा -भूक, अन्नाची नासाडी आणि बदलती विचारसरणी.
अध्याय 1: मुंबईतील लग्न, लखनऊची भूक
नोव्हेंबर 2026. मुंबईच्या बांद्रा येथे उद्योगपती सिंघानियाजी यांच्या मुलीचे लग्न.
1200 पाहुणे, 80 लाखांचे बजेट.
12 प्रकारचे स्टार्टर, 25 प्रकारचे मुख्य जेवण, 15 प्रकारच्या मिठाया.
इव्हेंट मॅनेजर म्हणाला,
"सर, जवळपास 30% अन्न वाया जाईल."
सिंघानियाजी हसून म्हणाले,
"होऊ दे... लग्न रोज होत नाही."
त्याच रात्री 1350 किलोमीटर दूर लखनऊच्या ऐशबाग भागात 70 वर्षांच्या राधा आजी आपल्या तीन नातींसोबत झोपल्या होत्या .
कुसुम (11 वर्षे), नंदिनी (8 वर्षे) आणि छोटी गुडिया (5 वर्षे).
दोन वर्षांपूर्वी कोविडमध्ये मुलगा आणि सून गेले होते.
1000 रुपयांची पेन्शन.
आजी लोकांच्या घरी पीठ दळणे, भाजी चिरणे अशी कामे करत होत्या.
त्या रात्री तिन्ही मुली उपाशी झोपल्या.
गुडिया म्हणाली,
"आजी... पोटात खूप भूक लागली आहे."
आजीने तिला पाणी दिले आणि म्हणाल्या,
"बाळा... स्वप्नात लाडू खा... उद्या शाळेत जेवण मिळेल."
पण दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे शाळा बंद होती...
अध्याय 2: Robin Hood Army ची अनन्या
25 वर्षांची अनन्या, आयटी कंपनीत नोकरी करत होती.
आठवड्याच्या शेवटी ती Robin Hood Army साठी स्वयंसेवक म्हणून काम करत होती.
तिचं काम — लग्न समारंभ आणि पार्ट्यांमधील उरलेलं अन्न गोळा करून गरजूंना पोहोचवणे.
त्या रात्री ती सिंघानिया यांच्या लग्नस्थळी पोहोचली.
मॅनेजर म्हणाला,
"मॅडम, 400 लोकांचं अन्न उरलं आहे. शाही पनीर, दाल मखनी, नान, गुलाबजाम — सकाळी हे सगळं कचर्‍यात जाईल."
अनन्या आणि तिच्या टीमने 3 गाड्या भरल्या.
2 तासांत मुंबईतील 5 झोपडपट्ट्यांमध्ये 350 लोकांना अन्न दिलं.
नंतर तिला लखनऊ चॅप्टरकडून मेसेज आला —
"ऐशबागमध्ये राधा आजी आणि 3 मुली... दोन दिवसांपासून चूल पेटलेली नाही."
अनन्याने लगेच फ्लाइट बुक केली.
सकाळी 6 वाजता ती लखनऊला पोहोचली.
तिच्या हातात 40 लोकांचं अन्न होतं.
मित्र म्हणाले,
"तू वेडी झाली आहेस का?"
अनन्या म्हणाली,
"भुकेला पिनकोड नसतो."
अध्याय 3: ताटातील शेवटचा घास
सकाळी 7 वाजता ती ऐशबागच्या गल्लीत पोहोचली.
राधा आजींनी दरवाजा उघडला.
त्या खूप अशक्त दिसत होत्या.
आत गुडिया तापाने बेशुद्ध होती.
अनन्याने अन्नाचा डबा उघडला.
गरमागरम शाही पनीरचा सुगंध पसरला.
नंदिनी धावत आली आणि म्हणाली,
"ताई... हे स्वर्ग आहे का?"
राधा आजी म्हणाल्या,
"बेटी... आम्ही दलित आहोत... लोक आमची भांडी वेगळी ठेवतात..."
अनन्याने त्यांचा हात धरला आणि म्हणाली,
"आई... भुकेला जात नसते. हे अन्न कचर्‍यात जाणार होतं... तुम्ही खाल्लंत तर अन्नदेवता आनंदी होतील."
तिने पहिला घास आजींना भरवला.
गुडियाला दाळीचं पाणी दिलं.
काही वेळात ती म्हणाली .
"आजी... स्वप्नातला लाडू खरंच आला..."
आजींच्या डोळ्यात अश्रू आले...
अध्याय 4: 40 ताटांचा हिशोब
अनन्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावलं.
रिक्शाचालक, विधवा महिला, अपंग लोक .
40 लोकांनी पोटभर जेवलं.
एका वृद्धाने सांगितलं.
"आम्ही लग्नात सुरक्षा रक्षक म्हणून उभे असतो. पण आज पहिल्यांदा पनीर खाल्लं."
अनन्याने आजींचं राशन कार्ड तपासलं. 3 महिन्यांपासून त्यांना धान्य मिळालं नव्हतं.
ती सरकारी कार्यालयात गेली आणि त्यांचं राशन पुन्हा सुरू करून दिलं.
जाण्यापूर्वी गुडियाने कागदावर छोटंसं हृदय काढून लिहिलं.
"अनन्या ताईंसाठी."
अध्याय 5: 2028 - परतफेड
दोन वर्षांनंतर...
गुडिया आता शाळेत जाते.
आजींना शिवण मशीन मिळाली.
कुसुम आता Robin Hood Army ज्युनिअर टीममध्ये काम करते.
प्रत्येक रविवारी ती उरलेलं अन्न गरजूंपर्यंत पोहोचवते.
सिंघानिया यांच्या कंपनीने नवीन नियम केला.
"प्रत्येक कार्यक्रमातील उरलेलं अन्न NGO ला दिलं जाईल."
आज 12 शहरांमध्ये दररोज 800 किलो अन्न वाचवलं जात आहे.
अध्याय 6: तुमच्या ताटात काय उरतं?
भारतातील भुकेचं वास्तव-
दरवर्षी हजारो कोटी रुपयांचं अन्न वाया जातं.
लाखो लोक उपाशी झोपतात.
एका लग्नातील उरलेलं अन्न शेकडो लोकांची भूक भागवू शकतं.
चूक कुठे होते?
आपण प्रतिष्ठेसाठी 50 पदार्थ ठेवतो.
पण माणुसकीसाठी एक डबा भरत नाही.
शेवटचा संदेश
भूक जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी पाहत नाही.
आज रात्री जेवताना तुमच्या ताटाकडे बघा.
जर एक घाससुद्धा वाया जाणार असेल,
तर लक्षात ठेवा -
कुठेतरी एखादी गुडिया उपाशी पोटी
"लाडूचं स्वप्न" पाहत झोपली.

2894. नदीच्या मधोमध एक नाव बुडाली

     नदीच्या मधोमध एक नाव बुडाली. याची तक्रार राजापर्यंत पोहोचली. खटल्याची सुनावणी राजाच्या दरबारात झाली.
राजाने खलाशाला विचारले, "नाव कशी बुडाली?"
राजा: नावेला छिद्र होते का?
खलाशी: नाही महाराज, नाव अगदी व्यवस्थित होती.
राजा: तुम्ही नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते का?
खलाशी: नाही महाराज, प्रवाशांची संख्या नावेच्या क्षमतेच्या आतच होती आणि मी यापेक्षा जास्त प्रवासी घेऊनही अगणित वेळा नाव चालवली आहे. 
राजा: वादळासारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली नव्हती, नाही का? 
खलाशी: महाराज, हवामान आल्हाददायक होते आणि नदी पूर्णपणे शांत होती.
राजा: तू दारू प्यायला होतास का?
खलाशी: नाही महाराज, तुम्ही या लोकांना विचारून स्वतःची खात्री करून घेऊ शकता. ते सुद्धा माझ्यासोबत पोहून जिवंत परत आले.
महाराज – मग, काय चुकले? एवढा मोठा अपघात कसा झाला?
खलाशी – महाराज, होडी नदीतून हळू हळू, कोणताही धक्का न लागता पुढे जात होती. तेवढ्यात, होडीतील एका माणसाने आत थुंकले. मी सुकाणू थांबवले आणि त्याला जाब विचारत विचारले, “तू होडीत का थुंकलास?”
तो उपहासाने म्हणाला, “माझ्या थुंकण्याने होडी बुडेल का?”
मी म्हणालो, “होडी बुडणार नाही, पण तुझ्या ह्या घृणास्पद कृत्यामुळे आम्हाला किळस आली आहे. सांग, जी होडी तुला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्या छातीवर घेऊन जाते, तू तिच्यात का थुंकत आहेस?”
राजा – मग?
खलाशी – महाराज, माझ्या बोलण्याने तो चिडला आणि म्हणाला, "आम्ही नदी पार करण्यासाठी पैसे देतो. तुम्ही आणि तुमची नाव आमच्यावर काही उपकार करत नाही आहात."
राजा (आश्चर्याने) – पैसे देण्याचा काय अर्थ आहे? तो नावेत थुंकणार आहे का? बरं, पुढे काय झालं?
खलाशी – महाराज, तो माझ्याशी वाद घालू लागला.
राजा – नावेतले इतर लोक काय करत होते? त्यांनी आक्षेप घेतला नाही का?
खलाशी – हो, नावेतल्या अनेक लोकांनी त्याला विरोध करण्यासाठी मला साथ दिली.
राजा – तेव्हा त्याचं मनोधैर्य खचलं असेल, त्याला आपली चूक कळली असेल?
खलाशी – तसं काही नव्हतं, महाराज. बोटीत काही लोक होते जे त्याच्या बाजूने उभे राहिले. बोटीत दोन गट पडले आणि प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये भांडण सुरू झाले.
राजा – धावत्या बोटीत भांडण, तुम्ही त्यांना समजावून सांगितले नाही किंवा थांबवले नाही?
खलाशी – मी त्यांना थांबवले, महाराज. मी हात जोडून त्यांची विनवणीसुद्धा केली. मी म्हणालो, बोट सध्या एका नाजूक परिस्थितीत आहे; बोटीतील कोणतीही हालचाल आपल्या सर्वांच्या जीवाला धोका निर्माण करेल. पण त्यांनी ऐकले नाही. ते सर्व एकमेकांवर तुटून पडले आणि खोल प्रवाहात होडीचा तोल गेला, महाराज...

कथेचा सारांश
या कठीण काळातही, राष्ट्रविरोधी आघाडीतील अनेक लोक देशाच्या नावेवर थुंकत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही संयम ठेवावा, जेणेकरून होडीचा तोल गेल्यास बाकीच्या लोकांचा जीव जाणार नाही. शहाण्यांसाठी एवढा इशारा पुरेसा आहे या संकटाच्या काळात शहाणपणाचे निर्णय घ्या.

🌸जय हिंद🌸

2893. अन्यायाचा प्रतिकार

 त्या दिवशी मी स्टाफरूममध्ये वह्या तपासत बसले होते. तेवढ्यात कालिंदी मला शोधत आली. 
 मला पाहून ती म्हणाली “ इथे आहेस होय? मी तुला वर्गांमध्ये शोधत होते.” मी म्हटलं “ हा तास मोकळा असतो माझ्यासाठी. इथे नसणार तर दुसरीकडे कुठे असणार?”
 ती म्हणाली “ तुझं तपासण्याचं काम बाजूला ठेव आणि वाचनालयात जाऊन इरावतीला भेटून ये. तू सकाळपासून भेटली का तिला?”
 मी उत्तरले “ नाही गं. सकाळपासून वाचनालयात जायला वेळच मिळाला नाही. 
  मी विचारले “तिला का भेटायला सांगत आहेस? काही समस्या?”
 ती म्हणाली “ तसंच काहीतरी. ती कमालीची अस्वस्थ वाटत आहे. हा, हूं शिवाय काही बोलतच नाही. डोळे तर असे भरून आल्यासारखे वाटत आहेत की जास्त काही बोललं तर झरझर  अश्रू वाहतील. तूच हाताळू शकशील तिची मन:स्थिती.”
मला खूपच नवल वाटलं. असं काय बिनसले असणार? घरी की शाळेत? मुळात इरावती सहनशील, हंसतमुख व खेळकर स्वभावाची होती.  मी झपझप वाचनालयाकडे निघाले. वाचनालयात पाऊल टाकताच वृंदाने नि:श्वास टाकला. जणू तिला म्हणायचे होते की बरं झालं आलीस. वृंदाने  इरावती कुठे बसली होती ते हातानेच निर्देश करून सांगितले. ती एका कपाटाच्या पाठीमागे एका छोट्या टेबलापाशी बसून रजिस्टरमध्ये नोंदी करत होती. मी तिच्याजवळ गेले व तिला हाक मारली तसं दचकून तिने मान वर केली. तिची अवस्था बघून मला धक्काच बसला.  तिचे डोळे अपमान, निराशा आणि दु: खाने तारवटले होते. तिने तिचे ओठ घट्ट मिटले होते. भावनांचा आवेग तिने मोठ्या मुष्किलीने नियंत्रणात ठेवला होता.  तिची अवस्था बघून मला खूप वाईट वाटले. पण त्या वेळी काय झालं हे विचारणे चूक ठरले असते. मी तिला म्हटले “ इरावती, शाळा सुटली की आज तू माझ्याबरोबर घरी येणार आहेस.” 
तिने नाही म्हणायचा निष्फळ प्रयत्न केला पण  मी थोडी ना तिचं ऐकणार होते. मी तिला म्हटलं “ मी दोन क्रमांकाच्या फाटकातून बाहेर पडते. तू फाटकापाशी माझी वाट बघ. नाहीतर असं कर  माझा सायकलरिक्शावाला चंदर तिथे थांबलेलाच असेल. तू आपली रिक्शात बसून घे. मी येतेच शक्य तितक्या लवकर.”
शाळा सुटल्याचा घंटानाद होताच मी फाटकाच्या रोखाने निघाले. मनांत म्हटलं आजतरी काही कामासाठी कुणी थांबवू नये. मी फाटकाजवळ येताच माझी नजर  इरावतीला शोधू लागली. ती कुठेच दिसेना म्हणून मी निराश झाले पण तेवढ्यात चंदर माझ्यासमोर येऊन म्हणाला की मॅडम अगोदरच रिक्शात बसल्यात. मी जाऊन रिक्शात बसले. इरावती खाली मान घालून विचारात गढून गेली होती. मी चुपचाप बसले. नेहमी घरी पोहोचेपर्यंत चंदरची टकळी चालत असे. आजूबाजूला झालेल्या सर्व घटनांची बित्तंबात तो माझ्यापर्यंत पोहोचवत असे. पण तो काही न बोलता रिक्शा चालवत होता. मामला गंभीर आहे त्याने ओळखले होते. घरी पोहोचताच इरावतीने स्व:ला सोफ्यावर झोकून दिले व हमसाहमशी रडू लागली. येवढा वेळ दाबून ठेवलेले अश्रूंचे लोट वाहू लागले. मी तिच्याजवळ बसले व तिच्या पाठीवर हात फिरवू लागले. त्या क्षणी तिला काही विचारणं चुकीचं होतं हे मी ओळखून होते. भावनांचा आवेग शांत होणे आवश्यक होते. मी तिला त्याच अवस्थेत सोडून जेवणाचं टेबल लावायला गेले. मी परत तिच्याजवळ आले तेव्हा ती थोडीफार शांत झाली होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले
”इरा, चल. हात पाय धुवून घे. भूक लागली असेल नं?”
          ती आज्ञाधारकपणे उठली व न्हाणीघराकडे गेली. टेबलापाशी आली तेव्हा ती बरीच सावरलेली वाटली.  आम्ही जेवायला बसलो. मी वाढत होते आणि ती भराभर जेवत होती. तिने काल रात्रीपासून काही खाल्ले नसणार हे माझ्या लक्षात आले. जेवणं झाली तसं मी तिला म्हटलं 
“ तू शयनगृहात जाऊन आराम कर. मी आटपून येतेच.”
         खोलीत येऊन पहाते तर इरावतीला गाढ झोप लागली होती. मानसिक थकवा आणि पोटात अन्न नाही. मी आरामखुर्चीत बसले. माझ्या मनांत विचारांचं काहूर माजलं होतं. मी मनात म्हटलं 
“ शाळेत नाही तर घरी काही तरी गोंधळ झाला असणार. ती व तिचा नवरा एकमेकाशी प्रेमाने व समंजसपणे वागत हे मी जाणून होते. शिवाय इरावती साध्यासुध्या कारणावरून डोक्यात राख घालणारी नव्हती. मग नक्की काय झालं की ही सुशिक्षित, स्वत:च्या पायावर उभी असलेली, दोन मुलांची आई कोलमडून गेली.”
         ती शाळेत येऊन अवघे सहा महिने झाले होते. शिक्षिकेची कुठलीच जागा रिकामी नसल्यामुळे तिने शाळेच्या वाचनालयात मदतनीस म्हणून नोकरी स्वीकारली होती. कार्यकारिणी मंडळाने शिक्षिकेची जागा निर्माण होताच तिचा विचार केल्या जाईल असे आश्वासन दिले होते. काही दिवसातच इरावतीने तिच्या कामाची छाप उमटवली. ती मेहनती व कामात तत्पर होती. सर्वांशी मिळतं घेण्याची कला तिच्याजवळ होती. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तिने अनेक योजना आखल्या होत्या. तिचं सांसारिक आयुष्य देखील व्यवस्थित असलं पाहिजे. विशालबद्दल म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल ती नेहमी सकारात्मक बोलत असे. एकदा ती ओझरतं बोलून गेली होती की तिने आई वडिलांची नाराजी पत्करून लग्न केलं होतं व तिचा निर्णय बरोबर होता हे त्यांना पटत नव्हतं. तिने स्पष्टपणे काही सांगितल्याशिवाय तिला काही मदत करता नसती आली हे मला उमजले. साडेचारच्या सुमारास मी तिला उठवलं व म्हणाले 
“ इरावती, चल उठ. चहा टाकते.
चहाचा ट्रे टेबलावर ठेवत मी तिच्याकडे नजर टाकली. ती बरीच तरतरीत दिसत होती. मी विषयाला हात घालायचा ठरवलं. मी तिला म्हणाले 
“ इरावती, घरी काही समस्या उत्पन्न झाली आहे हे मी ओळखून आहे. स्वत:शीच कुढत राहिलीस तर ते कुणाच्याच फायद्याचं नाही. मोकळेपणी मला सांगितलंस तर काही मार्ग निघेल. तुझ्या पदरात दोन मुलं आहेत हे कदापिही विसरू नकोस.”
तिने मान डोलावली व म्हणाली “ हो गं. मला नाही सहन होत हा रोजचा मन:स्ताप. कीती वाटतं की सर्व काही पूर्वीसारखं व्हावं. मला हा गुंता सोडवायला तुझी मदत हवी आहे.”
मी तिला म्हटलं “ तू तुझं गाऱ्हाणं सांगणार असशील तर मार्ग सापडणं कठीण जाईल पण तू जर एका त्रयस्थाच्या नजरेतून जे घडले ते सांगितले तर कदाचित पुढची वाट दिसेल. टाळी कधीच एका बाजूने वाजत नाही.”
ती म्हणाली “ आलं लक्षात माझ्या तुला काय म्हणायचे आहे. माझा अंदाज आहे की विशालचं डोकं फिरायला मी नाही पण माझ्या घरचं कोणीतरी कारणीभूत आहे. नंतर सर्वच बिनसत गेलं.”
 ती म्हणाली “ दोन महिने झाले, माझी सासू आमच्याकडे येऊन. या पूर्वीही त्या आमच्याकडे आलेल्या आहेत. त्या वेळेस आल्या तेव्हा माझ्याशी खूप प्रेमाने वागायच्या. घरकामात मदत करायच्या. विशालजवळ माझं खूप कौतुक करायच्या.”
ती पुढे म्हणाली “या वेळेस आल्या तर त्यांचं माझ्याशी वागणं संपूर्णत: बदलेलं. आल्या दिवसापासून मला घालून पाडून बोलतात. माझी कुठलीच गोष्ट त्यांना पसंत पडत नाही. सतत घरात धुसफुस. मुलांना पंण हिडिस फिडिस करतात. मागे आल्या तर मुलांचं कोण कौतुक! 
आता माझ्या लक्षात येत आहे की पहिले आठ दिवस विशालला पण आईचं वागणं खटकायचं. तो मला त्यांचं बोलणं मनावर घेऊ नको असं समजवायचा. मध्यंतरी दोन दिवस तो बाहेरगावी गेला होता. तेथून आल्यापासून त्याने पण मला वेठीला धरायला सुरवात केली. गेले कित्येक दिवस  सासू आणि नवरा दोघंही मला सळो की पळो करून सोडताहेत. माझी चूक काय हेच समजत नाही.”
ती पुढे म्हणाली “ येवढंच नाही. विशालच्या बहिणीच्या नवऱ्याची इथल्या कारखान्यात दोन वर्षांसाठी बदली झालीय.ते दिल्लीला एकत्र कुटुंबात राहतात म्हणून मुलांना तिथेच ठेवलंय. हायस्कूल मध्ये शिकणारी मुलं. त्यांची शाळा  न बदललेली बरी. मुलांना बघायला आजी आजोबा, काका काकी आहेत. नवरा बायको आलेत. कारखान्याच्या अतिथिगृहात रहात आहेत. दर शनिवारी दोघांचा मुक्काम आमच्याकडे. त्याला पण माझी ना नाही. पण सासूबाई वेगळाच खेळ खेळताहेत.
         दर शनिवार रविवार मुलीचं माहेरपण मी करायचं. नणंदबाई नुसत्या बसून राहतात आणि तऱ्हेतऱ्हेची फर्माईश करतात. त्यांच्या नवऱ्याला ऊठसुठ दूधाचा चहा लागतो. इकडे स्वयंपाक, तिकडे चहा. माझी येवढी तिरपीट उडते. रविवारी संध्याकाळी ते दोघं परततात. त्यांच्याबरोबर तीन चार पदार्थ पाठवायला लागतात कारण ते दोघं अतिथिगृहात राहतात. माझा प्रत्येक शनिवार, रविवार स्वयंपाकघरात जातो. मुलांकडे बघायला वेळ मिळत नाही. बाहेर जाणं तर बंदच. नणंदबाई फार चालाख आहेत. दर वेळेस परत जातांना माझी एखादी वस्तू आवडली म्हणून उचलून घेऊन जातात. मागच्या रविवारी माझी सिल्कची साडी आवडली म्हणून घेऊन गेल्या. त्याच्या अगोदरच्या रविवारी  माझं ब्रेसलेट त्यांच्या पसंतीस उतरलं. सर्व मला त्रास देण्यासाठी करताहेत. त्या घरच्या खूप श्रीमंत आहेत. माझ्या वस्तूंची त्यांना काय किंमत?
        सासूबाई त्यांना प्रोत्साहन देतात. त्यांचे म्हणणे की माहेरवाशीणीचं मन कसं मोडायचं. त्यांच्या लग्नाला सतरा अठरा वर्ष झाली असतील. आतापर्यंत माहेरवाशीण? तेही धाकट्या भावाकडे येऊन? दर शनिवार, रविवार धिंगाणा घालायचा भावाच्या संसारात? जे पटत नाही ते सहन करायचा खूप त्रास होतो. कुटुंबातील सर्वांनी एकत्र यावं, एकमेकाच्या सहवासाचा आनंद लुटावा हे खरं पण एक दुसऱ्याची सोय सुद्धा बघायला हवी. त्यात विशाल माझ्यावर का रागावून बसला आहे हे समजत नाही. मला समजून घेणारा, माझ्या भावना जपणारा ,कोमल मनाचा  माझा मित्र, सखा, जोडीदार ज्याच्या विश्वासावर मी माझ्या आईवडिलांची नाराजी पत्करली तो असा कसा दुरावला?
            काल तर कळस झाला. रविवारी सायंकाळी नणंद आणि तिचा नवरा परत जातात. मी त्यांच्याबरोबर द्यायचा डबा तयार केला. तेवढ्यात नणंदेच्या नवऱ्याला कुणाचा फोन आला.  फोनवर बोलून झालं तसं ते विशालला म्हणाले की चल जरा बाहेर जाऊन येऊ. ते गेले तर त्यांचा परत येण्याचा पत्ता नाही. मुलांची जेवणं झाली व त्यांना झोपवले. नऊ वाजले तरी परत आले नाही. शेवटी मी सासूला आणि नणंदेला जेवण वाढलं. मी त्या दोघांची वाट पहात बसले. अकरा वाजले. त्या दोघी झोपी गेल्या. मी न जेवता ताटकळत बसले.
        रात्री दोन वाजता ते दोघे उगवले. त्यांना पाहून मला धक्काच बसला. दोघही दारू पिऊन तर्र. एकमेकाला कसेबसे सांभाळत काहीतरी अर्थहीन बरळत घरात शिरले व पुढच्या खोलीतल्या गालिच्यावर पसरले.  सारी रात्र मी रडून काढली. विशाल असं काही करेल याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. मदिरा, धूम्रपान या बद्दल त्याला आकर्षण नव्हतं असं तो नेहमीच म्हणत असे. मग आज तो या अधोगतिला कसा गेला? त्यांच्या संसाराचं कीती सुंदर चित्र रंगवलं होतं त्या दोघांनी ! या पुढे आयुष्याची हीच तऱ्हा असणार आहे की काय अशी भीती वाटते.”
इरा स्वत:मधे दंग होऊन बोलत राहिली. मी तिच्या समोर बसले आहे हे बहुदा ती विसरून गेली होती. माझ्यासमोर तिच्या विफलतेचं चित्र उभं राहिले. तिला नक्की काय सल्ला द्यायचा हे थोडंफार लक्षात आलं.
मी तिला म्हटले “ इरावती, नको त्रास करून घेऊ. झालंय काय की सर्वांनी त्यांच्या मनात काही कारणास्तव असलेला राग तुझ्यावर काढायचा ठरवलं आहे. तूच का कारण तू प्रत्युत्तर न देतां सहन करत होतीस. तू जर सुरवातीलाच अरेला का रे केलं असतंस तर कदाचित त्यांच्या रागाला खीळ बसली असती. पण अजुनही उशीर झालेला नाही.
        उघड उघड तुझ्या सासूला एकटेपणाचा त्रास होत असणार. बरोबरची प्रेमाची माणसं देवाघरी जातात. मुलं त्यांच्या संसारात रममाण होतात. शरीर साथ देत नाही. स्वत:ला सांभाळता आलं नाही तर कोणावर तरी राग काढतात. विशालच्या बाबतीत मी म्हणेन की त्याच्या कामात काही अडचणी येत असल्यामुळे तो निराश झाला असला पाहिजे. कोणीतरी त्याला त्रास देत असला पाहिजे. तुझ्याजवळ मन मोकळं करण्याऐवजी, तुझ्यावर रागावण्याचा चुकीचा मार्ग त्याने निवडला. जीवनात असे प्रसंग येतात. सर्व नेहेमीच सुरळीत चालत नाही.
तुझ्या नणंदेबद्दल मी म्हणेन की तिच्या मनात असूया निर्माण झाली असणार. “
इरावती म्हणाली “ माझ्याबद्दल असूया कारणच काय? अगं, खूप धनाढ्य सासर आहे तिचं.”
मी तिला म्हणाले “ पैशाने सर्व काही विकत घेता नाही हे मी तुला सांगायला पाहिजे का? तुझ्याजवळ खूप काही असलं पाहिजे जे तिला मिळालं नाही.
इरावतीने विचारले “ ते काय?”
 मी म्हणाले “ तू सुस्वरूप, सुशिक्षित आहेस. स्वत:च्या पायावर उभी आहेस. विशाल तुला जपतो. तुमच्या दोघांमध्ये जे सामंजस्य आहे ते तिच्यात व तिच्या नवऱ्यात नसेल.”
 मी पुढे म्हणाले “ कुणाचे विचारांचे घोडे कुठे धावतील हे आपण सांगू शकत नाही पण आपल्या विचाऱांच्या घोड्यांवर नियंत्रण ठेवतां आलं पाहिजे. अशी हतबल होऊ नकोस. अन्यायाचा प्रतिकार करायला शीक. किंबहुना तो एकच मार्ग आहे. तुझ्याभोवती तुला सुखासमाधानंचं वातावरण हवं असेल तर ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला लागतील. तीर मारायचा पण वाया जाऊ द्यायचा नाही. तो असा पण मारायचा नाही की जखम फार खोल होईल. तो असा मारायचा की शत्रुपक्षाला योग्य तो संदेश मिळेल.”
 इरावती हसून म्हणाली “ अन्यायाचा प्रतिकार करावाच लागणार आणि तो मी करेन. आता निघायला हवं. तुझ्याकडे आले खूप बरं वाटलं. नाहीतर मला आज घरी जावसंच वाटत नव्हतं”
तिला बसमध्ये बसवून मी घरी परतले तर वाटेत शाळेचा राखणदार समोर आला.
तो म्हणाला “ बाई. इरावतीबाईंना  बसमध्ये बसवून परत जाताहात का?”
मी म्हटले “ तुला कसं माहित?”
तो म्हणाला “ मी बघितलं होतं तुम्हा दोघींना जातांना. नंतर त्या बाईंचे साहेब आले होते त्यांना शोधायला. दोघंजण होते.”
मी विचारलं “ मग ते ॲाफिसमध्ये गेले की काय?” तो म्हणाला “ मी त्यांना ॲाफिसमध्ये जाऊ दिले नाही. सांगितलं आत महत्वाची मिटींग चालू आहे. कोणाला आत सोडायचे नाही. ते तुमच्या घराचा पत्ता मागत होते. पण मी म्हटलं तुम्ही कुठे राहता ते मला माहित नाही. नंतर ते परत गेले”
           दर दोन दिवसांनी माझ्याकडे येणारा राखणदार चांगलाच चालाख होता. दोन दिवसांनी मी इरावतीला भेटायला गेले. ती पूर्वीसारखी हसतमुख वाटली.
 मला पाहताच ती म्हणाली “ तुझ्याचकडे येणार होते. आज मी शाळा सुटली की तुझ्याबरोबर घरी येणार आहे. खूप काही सांगायचे आहे” आम्ही दोघी रिक्शात बसलो. चंदरने एकदा मागे वळून पाहिले आणि त्याने नेहमीची टकळी सुरु केली.  जेवता जेवता इरावती म्हणाली “ त्या दिवशी मी घरी गेले. बघते तर  टी व्हीवरच्या मालिकेप्रमाणे विशाल पुढे व घरातले बाकी लोक त्याच्या पाठीमागे उभे राहून माझ्याकडे रागाने बघत होते.
 विशाल रागाने म्हणाला “ कुठे होतीस येवढा वेळ? ही काय परतायची वेळ झाली?”
 मी शांतपणे म्हटले “ काल रात्री दोन वाजता दारू पिऊन तर्र होऊन परत येणं तुझ्यासाठी बरोबर होतं? ते जर बरोबर असेल मी काही तास मैत्रीणीकडे घालवले ते बरोबरच आहे.”
          मी सर्वांनाच तीर मारायचे ठरवलं होतं. मी सासूबाईंना म्हटले “ आई, काय झालं की तुम्हाला आजकाल माझी कुठलीच गोष्ट पटत नाही. गेल्या वर्षी तुम्ही आलात आपण दोघी कीती प्रेमाने राहिलो होतो. काही कष्ट असतील तर मनमोकळेपणी सांगा. मी आणि विशाल अवश्य मदत करू. पण सतत धुसफुस करू नका”
      नणंदबाईंना मी म्हटलं “ दीदी, मी काही सांगायची आवश्यकता आहे का? तुम्हाला कळतंय की तुम्ही इथे येऊन कशाप्रकारे वागता ते? तुमच्या वागण्यात काही बदल होणार असेल तर तुमचं या घरात स्वागत होईल नाहीतर ……”
       कुठल्या हक्काने तुम्ही माझ्या वस्तू उचलून घेऊन जाता? वस्तूंचं महत्व नसतं. त्या परत विकत घेतल्या जाऊ शकतात. पण प्रत्येक वस्तूशी काही आठवणी निगडीत असतात. माझ्या आठवणींवर तुम्ही घाला का घालता”
मी विशालला सर्वांच्या समोर म्हटलं की तुला जर वाटत असेल की तू आपल्या संसाराच्या चिंध्यां करशील व मी त्या चिंध्या गोळा करून रडत भेकत जोडून संसार करीन तर तसं होणार नाही. आपल्या संसारात दोघांचे साहचर्य असणे आवश्यक आहे. तुला स्वत:वर नियंत्रण ठेवायला लागेल.  आपण दोन मुलांचे पालक आहोत हे विसरतां कामा नये.”
       मला आश्चर्याचा धक्का बसला. मी विचारले “ तू येवढं सगळं तू एकाच वेळेस ऐकवलंस आणि त्यांनी ऐकून घेतलं?”
 ती म्हणाली “ होय कारण मी बोलले ते सत्य होतं. रात्री जेव्हा आम्ही एकांतात भेटलो तेव्हा विशाल ढसढसा रडला आणि त्याने माझी क्षमा मागितली. तो माझ्यावर रागावला होता कारण तो जेव्हा दोन दिवसांसाठी गावी गेला होता तेव्हा तेथे माझा भाऊ आला होता. भाऊ महागड्या हॅाटेलमध्ये उतरला होता. नव्या, कोऱ्या गाडीतून हिंडत होता आणि विशालला वाटत होतं की तो त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होता. व्यवसायानिमित्त ते एकमेकाच्या सहवासात येतात. मी त्याला म्हटलं की तू वड्याचं तेल वांग्यावर काढू शकत नाहीस. माझ्या कुटुंबामध्ये व तुझ्यात आर्थिक तफावत आहेच. त्यावरून तू डोकं फिरवायला लागला तर ते चूक आहे.”
 त्याने  मला परत परत सांगितले की झालेला घोटाळा परत कधीही होणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे.झालं गेलं विसरून आम्ही पुढे जायचं ठरवलं आहे.”
 जेवणं आटोपून आम्ही दोघी पुढच्या खोलीत आलो तेवढ्यात मोटरसायकलचा हॅार्न ऐकू आला. चट्कन इरावती खिडकीजवळ गेली व म्हणाली “ विशाल मला ध्यायला आला आहे. निघते मी आता.”
 मी म्हटले “ अगं, वर बोलव की त्याला.” त्यावर ती म्हणाली “ तो नाही येणार वर. त्याने मला अगोदरच सांगितले आहे.”
 मी विचारले “ पण का?”
 इरावती म्हणाली “ त्याला तुझ्यासमोर यायची लाज वाटते.”
मी म्हटले “ तू मारलेला तीर जरा जास्तच लागलेला दिसतोय.”
                     
नीला प्रधान
 ( पार्लेकर कायस्थ मासिकात प्रकाशित कथा)
कथाविश्व आपलं आवडतं पान. लाईक केलंय ना✨

2892. काॅर्पोरेट फॅमिली म्हणजे काय?

 काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक पोस्ट वाचली होती. केनियातील एका काउन्सलरने सांगितलेली ती कथा होती. घरात काम करणाऱ्या मोलकरणीची. त्याच्या बायकोनं घरकामात मदत करायला एक मोलकरीण ठेवली होती. पहिल्या दिवशी ही मोलकरीण घरी आली तेव्हा तिनं आपल्या मुलांना तिला “आंटी” म्हणायला सांगितलं. मुलांनी कारण विचारलं. आईनं उत्तर दिलं. आंटी म्हटलं की नातं जिव्हाळ्याचं वाटतं. घरचं वाटतं. मुलाला समजावलं. “ती आपल्या कुटुंबाचा भाग आहे.”
पंधरा वर्ष ती बाई त्या घरात काम करत राहिली. मुलांना लहानाचे मोठं होताना त्यांची आजारपण, हट्ट, शाळेचे दिवस, परीक्षा, सगळं त्या मोलकरीणीने सांभाळलं. पण तिच्या पगारात कधी वाढ झाली नाही. ती कुटुंबाचा भाग होती पण तिचं जेवण मात्र नेहमी वेगळ्या टेबलावर होत असे किंवा घरातील सर्व जण जेवल्यानंतर. तिला झोपायला वेगळी खोलीही होती. 
एक दिवस तिने पगार वाढवण्याची मागणी केली. मुलगा पंधरा वर्षांचा झाला होता. आई म्हणाली, “आता तिला आंटी म्हणायची गरज नाही. ती फक्त मोलकरीण आहे.” 
काही महिन्यांतच ती बाई कामावरून काढून टाकली गेली. कारण मुलगा मोठा झाला होता. तिची गरज संपली होती. लगेच दुसरी बाई कामावर ठेवली गेली आणि तिलाही “आंटी” म्हणायला सुरुवात झाली.
ही गोष्ट वाचताना स्वतःच्या कॉर्पोरेट जगाची खरी गोष्ट समोर आली. दहा वर्ष होऊन गेली. मी आयटीमध्ये आहे. आजवर अनेक टाऊनहाॅल ऐकलेत, कंपनीच्या मालकांची भाषणं ऐकली आहेत. जवळपास प्रत्येक कंपनीच्या टाऊनहाॅल मध्ये, सीईओ च्या भाषणात एक वाक्य खूप वापरते – “We are a family.”
पहिल्यांदा जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा मला हे वाक्य खूप आवडलं होतं. ऑफिस म्हणजे दुसरं घर. सहकारी म्हणजे कुटुंब. एकमेकांना मदत करणारी माणसं. सगळे एकत्र पुढे जाणारे. ऐकायला खूप छान वाटतं.
पण आयुष्य जसजसं पुढे सरकत गेलं तसं लक्षात आलं की हे वाक्य खरं नसतं. तो फक्त एक दिखावा असतो.
नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही काही मित्र एका प्रोजेक्टवर काम करत होतो. रात्रीचे अकरा-बारा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसायचो. कधी कधी रात्री दोन वाजेपर्यंतही काम चालायचं. टीम लीडर नेहमी म्हणायचा, “Guys, we are not just colleagues, we are family.”
आम्हालाही तेव्हा वाटायचं, खरंच आपण सगळे एकत्र आहोत. कंपनीसाठी मेहनत करतोय. कंपनी मोठी झाली की आपणही मोठे होऊ. पण एका वर्षानंतर प्रोजेक्ट संपला. क्लायंटने बजेट कमी केलं. आणि अचानक कंपनीने काही लोकांना काढून टाकायचा निर्णय घेतला. त्या लिस्टमध्ये आमच्या टीममधला एक मुलगा होता. जेव्हा त्याला रिलीव्ह केलं. तेव्हा समजलं इथं कुणी सख्खं नसतं. कालपर्यंत जो माणूस त्या “फॅमिली” चा भाग होता, तो एका दिवसात बाहेरचा झाला.
तकंपनी आणि कुटुंब यात फार मोठा फरक असतो. कुटुंबात एखाद्या व्यक्तीची परिस्थिती खराब झाली तर घरचे त्याला सोडून देत नाहीत. उलट जास्त साथ देतात. पण कंपनीत परिस्थिती खराब झाली की सर्वात आधी माणसंच बदलली जातात. कोविड मध्ये अनेकांनी याचा अनुभव घेतलाय आणि आता एआयच्या जमान्यातही घेत आहेत. इथं प्रत्येक जण रिप्लेस होतो. कितीही डिपेडन्सी असो.
काही वर्षांपूर्वी माझ्या बंगळूर पुणे वाऱ्या वाढत चालल्या होत्या. दर आठवड्यात पुण्याहून बंगळूर ला ऑफिसला जाणं म्हणजे एक वेगळंच युद्ध होतं. नुसती पळापळ. रविवारी दुपारी फ्लाईटनं जायचं म्हणून २~२.३० ला घर सोडायचं. साडे पाचच्या फ्लाईटने रात्री आठपर्यंत बंगळूर एअरपोर्ट ला उतरायचं तिथून परत तासभर कॅबनं हाॅटेलवर. 
सोमवार ते गुरुवार काम करून मध्यरात्री परत पुण्यात यायचं. शुक्रवारी वर्क फ्रॉम होम. परत पुढच्या आठवड्यात सायकल रिपीट. खाणं वेळेत नाही की झोपणं वेळेत नाही. एकंच लक्ष्य..ऑफीसचं काम. आयुष्यात एवढा वैतागून सोडणारा कुठलाही काळ नव्हता. कारण काय तर कंपनीचा एकच आदेश “You still need to come to Bangalore office.”
परिणाम स्वरूप नंतर सर्जरी आणि मानसिक ताणतणाव वाढला. सर्जरीनंतर ही ऑफीसच्या काम वाढतंच राहिलं. पण ऐनवेळेस अप्रायझल ला मॅनेजर विसरला. विसरला असं ऑफिशियल कारण दिलं. त्या दिवसांत मला पुन्हा त्या “फॅमिली” शब्दाचा अर्थ समजला.
काॅर्पोरेट फॅमिली म्हणजे काय?
काम करा जसं कुटुंबासाठी करतात.
त्याग करा जसं कुटुंबासाठी करतात.
निष्ठा ठेवा जशी कुटुंबासाठी ठेवतात.
पण पगार, प्रमोशन किंवा लेऑफच्या वेळी अचानक आपण फक्त एक एम्प्लॉयी नंबर होता.
माझ्या एका मित्राचा एआय आल्यानंतरचा अनुभव तर अजून जास्त वाईट होता. तोही एका आयटी कंपनीत होता. दहा वर्ष त्या कंपनीत काम केलं. अनेक प्रोजेक्ट्स डेलिव्हर केले. क्लायंटशी चांगले संबंध ठेवले. एआय आलं आणि एक दिवस कंपनीने स्ट्रक्चर बदलायचा निर्णय घेतला. काही महिन्यांतच त्याला सांगितलं – “Your role is no longer required.” दहा वर्षांचं नातं एका ईमेलमध्ये संपलं. महिन्यात रिलीज.
कंपनीवर विश्वास ठेवणंही चुकीचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कंपनी आणि तुमचं नातं हे भावनिक नसतं. ते व्यावसायिक असतं. तुम्ही कंपनीला value देता. कंपनी त्यासाठी तुम्हाला पैसे देते. इतकंच.
कधी कधी आपल्याला चांगले मॅनेजर भेटतात. खरोखर साथ देणारे. काळजी घेणारे. कौतुक करणारेही. अशा लोकांमुळे काम करणं आनंदाचं होतं. पण ते सुद्धा एका सिस्टमचा भाग असतात. त्यांच्याही हातात सगळं नसतं.
माझ्या करिअरमध्ये मला दोन प्रकारचे मॅनेजर भेटले. एक असे की ज्यांच्यासाठी टीम म्हणजे खरोखर टीम होती. ते मार्गदर्शक होते. एखादा प्रॉब्लेम आला तर ते स्वतः पुढे येऊन उभे राहायचे. ही मंडळी आजही सोबत आहे आणि दुसरे असे की ज्यांच्यासाठी टीम म्हणजे फक्त नंबर. डेडलाईन पूर्ण झाली की ठीक. नाही झाली तर प्रेशराईज करून काम करा. नाहीतर डच्चू.
दोन्ही प्रकारच्या लोकांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली की आपली ओळख आपल्याच कामावर उभी राहते. कंपनीवर नाही. आजकाल अनेक लोक नोकरीला खूप भावनिक पद्धतीने पाहतात. “ही माझी ड्रीम कंपनी आहे.” “ही कंपनी माझं दुसरं घर आहे.” 
काही अंशी ते खरं असू शकतं. पण आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली की घर आणि ऑफिस यात एक स्पष्ट रेषा असते. घरात तुम्ही माणूस असता. ऑफिसमध्ये तुम्ही प्रोफेशनल असता. घरात तुमची किंमत तुमच्या नात्यांमुळे असते. ऑफिसमध्ये तुमची किंमत तुमच्या कौशल्यामुळे असते.
म्हणूनच या सगळ्या अनुभवांनंतर माझा नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. आता मी कंपनीबद्दल वाईट विचार करत नाही. पण अपेक्षाही ठेवत नाही.
मला चांगला मॅनेजर भेटला तर मी त्याचा आभारच आहेत. टीम चांगली असेल तर त्यांच्यासोबत मनापासून काम करता येतं. पण त्याचवेळी माझी स्किल्स वाढवत राहतो. नवीन गोष्टी शिकत राहतो. कारण मला माहित आहे..आजची परिस्थिती कायम रहाणार नाही. आज प्रोजेक्ट आहे. उद्या नसेल. आज मॅनेजर चांगला आहे. उद्या बदलेल. आज कंपनी वाढतेय. उद्या आपलाही बाजार उठेल.
गेल्या दोन वर्षापासून एक छोटासा नियम मी स्वतःसाठी ठेवला आहे कंपनीशी नातं प्रामाणिक ठेवा, पण स्वतःची ओळख कंपनीवर अवलंबून ठेवायची नाही. आपल्याला जेवढं होतं तेवढंच काम करायचा. स्वतःला बर्न करून ठेवायचं नाही. आपण रिप्लेस होऊ शकतो. कितीही डिपेन्डसी असली तरीही.
ट्विटर पोस्टमधल्या मोलकरणीची गोष्ट हेच सांगते. पंधरा वर्ष तिला “आंटी” म्हटलं. पण तिची खरी ओळख बदलली नव्हती. ती कामगारच होती. फक्त शब्द बदलले होते.
कॉर्पोरेट जगातही तसंच असतं. “फॅमिली”, “कल्चर”, “टीम स्पिरिट” हे सगळे शब्द अनेकदा ते फक्त शब्दच असतात. 
आपण स्किल value देतो कंपनी त्या value साठी पैसे देते. बाकी सगळं बोनस आहे. एकदा का ही गोष्ट समजली की नोकरीतला ताण थोडा कमी होतो. अपेक्षा वास्तववादी होतात. आणि माणूस स्वतःवर जास्त लक्ष देऊ लागतो. 
कधी कधी मला वाटतं आपल्या गावाकडच्या लोकांना ही गोष्ट आधीपासून माहित होती. ते काम करायचे, पण स्वतःची जमीन, स्वतःचं घर, स्वतःची ओळख सोडत नसत. शहरात आल्यावर आपण ती साधी शहाणपणाची गोष्ट विसरलो.
आजवरचा आयुष्याचा अनुभव एकच सांगतो काम करायचं, मनापासून करायचं, पण स्वतःची किंमत विसरू द्यायची नाही. कारण कोणतीही कंपनी कायमस्वरूपी आपली नसते. आपण तिथं फक्त एक नोकरदार असतो. पण आपली मेहनत, आपलं कौशल्य आणि आपला स्वाभिमान हेच कायम आपल्यासोबत राहतो. त्यासाठीच कायम प्रयत्नशील रहायचं.
गणेश सुवर्णा तुकाराम

2891. निसर्ग

      बस म्हैसुर वरुन उटीकडे निघाल्या पासून आशीषला जाणवलं की नेहा चा मूड-आॕफ झाला होता. पुण्याहून म्हैसूरचा ट्रेनचा प्रवास खूप मस्त झाला होता त्यांचा. नवविवाहीत जोडी हनीमूनला जाताना जी हूरहूर, उत्सुकता, आकर्षण या मिश्र भावना असतात त्या त्याच्या आणि तिच्याही देहबोलीतून दिसत होत्या.  आज सकाळी देखील म्हैसूरला पॕलेस पाहून, थोडंसं शाॕपींग करुन आणि हलका लंच करुन ते त्या उटीच्या एसी व्होल्वो बसमधे बसले होते. पण तेंव्हापासून नेहाचे काय बिनसले होते कोण जाणे? ती फारसे बोलत नव्हती. खिडकीशी असूनही बाहेर न पाहता ती डोळे मिटून बसली होती. कदाचित तिला बस लागत असावी म्हणून नेहा शांत झाली आहे असा त्याने विचार केला. खरंतर वाटेमधे लागणारे मधुमलाई नॕशनल पार्क, अधेमधे दिसणारे प्राणी याबद्दल तो तिच्याशी बोलायला उत्सुक होता.पण तिचा एकंदर नूर पाहून आशीष गप्पच राहिला.
उटीत संध्याकाळी पाच वाजता बस पोहोचली. 
बाहेर चांगलच थंड वातावरण होतं. 
नुकताच पावसाचा शिडकावाही होउन गेला असावा. 
प्रसन्न वातावरण होतं. 
आशीषने आठवड्याचे उटीचे वेदर फोरकास्ट गुगलवर पाहिले होते.
उन्हाळा असूनही अठरापेक्षा जास्त तापमान असणार नव्हते. 
असेच वातावरण त्यालाही अपेक्षित होते... मधुचंद्राला पोषक...!!
म्हणून दोघांनीही स्वेटर, विंड चिटर बरोबर घेतले होतेच. 
त्यांचे हाॕटेलही आशीषने नेटवर खूप शोध घेउन मग फायनल केले होते. हाॕटेलचे लोकेशन हिल टाॕप वर, व्हॕली फेसींग पाॕश रुम्स,  छान शाकाहारी जेवण, उत्कृष्ट सर्वीस या सर्व गोष्टींचे रिव्यू ब-याच ट्रॕव्हेल साइट्सवर पाहून त्याने हे थोडेसे प्रिमियम हाॕटेल निवडले होते. शेवटी हनीमून ही घटना आयुष्यात एकदाच घडते. त्यात तडजोड का करा, असा विचार त्याने केला होता. 
बाहेर पडताच सरळ टॕक्सी करुन त्यांनी हाॕटेलकडे कूच केले. 
उटीला पोहोचल्यावर नेहाला बरे वाटेल ही आशा फोल ठरली.
आशीषने हळूच तिच्याकडे पाहिले... तिचा चेहरा अजून ओढलेलाच होता. त्याने चिअर अप करण्यासाठी तिचा हात हातात घेतला. तिने त्याच्याकडे पाहिले व कशीनुशी हसली. 
'नेहा... बरं वाटतय ना तुला?'  त्याने तिला विचारलं..
'हो...' ती गडबडून म्हणाली... 'मी ठीक आहे..'
'नाही बसमधे बसल्यापासून तू काहीच बोलत नाहीयेस म्हणून...' तो काळजीने म्हणाला. 
'आईची आठवण येतेय...' ती त्याला तोडत बोलली. 
हाॕटेल येइपर्यंत मग दोघाही काही बोलले नाहीत. 
हाॕटेलमधे आल्यावर त्यांचे रितसर छान स्वागत झाले. 
रुम मधे जातानाच रिसेप्शनने सांगीतले की इव्हिनींग स्नॕक्स आणि चहा-काॕफी टेरेस रेस्टाॕरंटमधे तयार आहे त्यांनी जरुर लाभ घ्यावा. 
आशीषला चांगलीच भूक लागली होती. नेहा आणि तो पटकन फ्रेश होउन त्या रेस्टाॕरंट मधे आले. तिथे आल्याबरोबर सारा थकवा पळून गेला. 
 टेरेस रेस्टाॕरंट मधून दिसणारे दृष्य अतिशय मोहवणारे होते. 
लांब लांब हिरव्या पर्वत रांगा... धुक्याच्या दुलई पांघरुन पहूडलेली समोरची ती खोल दरी... आकाशात काळ्या ढगांआडून अस्ताकडे निघालेल्या सुर्याची लालसर छटा... सारेच नयनरम्य आणि अद्भुत...!!  
सँडवीच आणि काॕफी घेतल्यावर छान तरतरी आली होती. 
नेहाचा चेहराही आता जरासा खुलला होता.
बरीच इतर हनीमून कपल्सही आजूबाजूला दिसत होती. हिल स्टेशन्सवर त्यांना ओळखणे तसेही फार अवघड नसते. एकमेकांना जवळ घेउन फोटो, सेल्फी घेण्यात सारे कपल्स मग्न होते.
आशीषने सूचकपणे नेहाकडे पाहिले... पण तिने त्याची नजर टाळली. 
काहीतरी नक्कीच बिनसलय हे आशीषला एव्हाना लक्षात आलं होतं. पण नेहा स्वतःहून सांगेपर्यंत  विषय काढायचा नाही असे त्याने ठरवले. 
रुमवर परतल्यावर आशिषने बॕग अनपॕकींग केले व तो आंघोळीला गेला. शाॕवरखाली गरम पाण्याने आंघोळ करुन तो मूडमधे बाहेर आला. बेडवर बसलेल्या नेहाजवळ येउन त्याने आपले केस झटकले. तीच्या अंगावर पाणी उडाले तशी ती लाजली. चटकन बेडवरुन उठत ती म्हणाली... 'मीही शाॕवर घेउन येते..'
तिचा मूड थोडा लाइट करण्यासाठी आशीष मिष्कीलपणे म्हणाला
'म्हणत असशील तर कंपनी द्यायला मी पुन्हा येउ शकतो...'
तीने आपले हसू दाबत उत्तर दिले 
'नको काही... तू टिव्ही बघ... तुझे आवडते न्यूज चॕनेल्स...'
नेहा तिची प्लॕस्टीक बॕग घेउन आंघोळीला गेली. 
'हंss...!! दिज लेडीज...!!' असे स्वतःशीच म्हणत त्याने टी शर्ट व जीन्स चढवत रिमोटने टिव्ही आॕन केला. 
थोड्या वेळाने बाथरुमचा दरवाजा उघडला. आशीषची नजर नेहाकडे गेली. ती तोंडावर हात ठेउन रडू दाबत होती... पण तिला भरुन येत होतं.
तिने आशिषकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहिले. 
आशीषने चटकन टिव्ही बंद केला व उठून तिच्याकडे आला.
'अरे नेहा... तू रडतीहेस...काय झालं...? ए वेडाबाई...बोल ना...!'
नेहा नकळत त्याच्या मिठीत शिरली...व रडत रडत म्हणाली
'आशीष..आय अॕम साॕरी...!'
आशीषला काही कळेना...
'ए... अगं नेहा... साॕरी काय म्हणते...? आय कॕन अंडरस्टँड... तुला घरची आठवण येत असेल...'
'आशीष... साॕरी... माझा प्राॕब्लेम झालाय रे...' नेहा अजून रडत होती. 
आशीषला काही कळाले नाही... तिचा हात धरत तो म्हणाला
'नेहा... अगं तुझा प्राॕब्लेम माझा प्राॕब्लेम... काय झालय ते सांग बरं...'
'आशीष आय अॕम रिअली साॕरी... माझ्याकडून मिसकॕलक्यूलेशन झाले... माझे पिरीयड्स आलेत...' असे म्हणत ती बेडच्या टोकावर बसून परत रडू लागली. 
आशीषला आता सगळी टोटल लागली. त्याला काय 'झालय' आणि  नेहा एवढी अपसेट का झालीय हे उलगडायला लागले. त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तो सुन्नपणे तिथेच बेडवर तिच्या शेजारी बसून राहिला. 
नेहा काहीतरी बोलत होती... कसं तिचं मंथली कॕल्क्यूलेशन साखरपुड्यापासून बिघडत गेले... कसे घरातले देवकार्यामुळे लग्नापर्यंत तिने पिरीयड्स गोळ्या घेउन घेउन पुढे ढकलले होते.
हे पिरीयड्स तिला खरे तर पुढच्या आठवड्यात अपेक्षित होते. पण शेवटी अघटीत झाले होते. हनीमुनला येउन तिची पाळी सुरु झाली होती. 
'इट्स ओके नेहा... इट्स ओके...' एवढच म्हणत आशीष जडपणे उठला आणी रुमचा दरवाजा उघडून बाहेर पडला. 
नेहाला लक्षात आलं... आशीषचा प्रचंड मूड-आॕफ झाला होता.
या हनीमूनसाठी त्याने खूप आधीपासून प्लॕनींग केल होतं... दोनच महिन्यापूर्वी झालेल्या त्यांच्या साखरपुड्यापासूनच तयारी सुरु करत  त्याने ट्रेन बुकींग्ज, हाॕटेल रिझर्वेशन, बस टिकीट्स वगैरे सर्व काही स्वतः केले होते. 
हनीमून हा प्रत्येक नवविवाहीत युगुलासाठी खूप खास असतो. तिच्या मूर्ख पणामुळे आज या सर्व आनंदावर विरजण पडले होते... तिच्या स्वतःच्या आणि आशीषच्याही... तेही उटीपर्यंत आल्यानंतर. 
ती तशीच डोके टेकून बेडवर बराच वेळ रडत बसली. 
नंतर तिचा डोळा कधी लागला हेच तिला कळाले नाही. 
आशीष दरवाजा उघडून आत आला... तशी ती जागी झाली. 
त्याने तिच्याकडे पहात स्माईल केलं. 
'रडूबाईचे रडून झालं का...?' 
तो तिच्याजवळ आला व आपल्या हातातली कॕरीबॕग तिला दिली. 
'काय आणल आहेस...?' असे म्हणत तिने कॕरीबॕग उघडली. 
त्यातून डोकावणारा तो हिरव्या कलरचा सॕनीटरी पॕडचा मोठा पॕक तिने पाहिला आणि तिला ओशाळायला झाले. एक स्त्री असून आपण जे आणायला विसरलो ते आशीष इतक्या तत्परतेने आपल्यासाठी घेउन आला हे पाहून तिला भरुन आले. 
'तुझा  ब्रँड आणि साइज मला ठाउक नव्हता नेहा... पण साधारण अंदाज लावून आणलाय... बघ तुला होईल की बदलून आणू...'
'नको...' नेहा डोळे पुसत म्हणाली... 'बरोबरच आणलाहेस... हुशार आहेस..'
' अगं हुशार... तिथे दुकानात माझी किती फाटली होती माहित आहे...? त्या मेडीकल वाल्याला तरुण मुले चाचपडत काँडोम पॕकेट मागतात... मी पहिलाच असेन जो सॕनीटरी नॕपकीन्स मागायला आलो होतो...'
असे म्हणत आशीष जोरात हसायला लागला.
नेहा हसत त्याच्या मिठीत शिरली व म्हणाली 'थँक्यू आशीष... हे सारं समजून घेतल्याबद्दल...'
आशीषने ज्या पाॕजीटीव्हली तिची परिस्थिती स्विकारली होती ते पाहून तिला परत भरुन आले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले हे पाहुन आशीषने तिला बेडवर बसवले व तिच्या पायाशी गुडघ्यावर बसत तो म्हणाला..
'ए वेडाबाई... दोन महिन्यापूर्वी तुला आंगठी घातली तेंव्हापासूनच तुझी सारी सुखदुःख माझी झाली... तुझे प्राॕब्लेम्स माझे झाले. तुला बसमधे बसल्यापासूनच त्रास होत होता बहुधा... म्हणून तू गप्प गप्प होतीस... पण मला लक्षात आले नाही... साॕरी! पण यापुढे तसे होणार नाही. तुझ्या प्रत्येक प्राॕब्लेमचा मला भाग बनव... माझ्यापरीने होईल ते मी नक्की करेन नेहा...'
नेहा ने त्याचे डोके हलकेच तिच्या मांडीवर घेतले व त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली... 'इतकं समजून घेतल पुरुषांनी तर आम्हा बायकांना आणखी काय हवं रे आशीष...? पण मी मात्र चुकले रे... साॕरी...'
तिचे दोन्ही हात हातात घेत तिला उठवत  खिडकीशी नेत  आशीषने पडदा दूर केला व  म्हणाला...
'नेहा... हे बघ... जे झालय तो निसर्ग नियम आहे. निसर्गाने आपले काम केलय... त्याबद्दल आपण काही करु शकत नाही... तु त्याबद्दल अजीबात गिल्टी फिलींग ठेउ नको...'
मग समोरच्या डोंगर द-यांकडे हात दाखवत तो म्हणाला
'हो... पण पुढचे पाच दिवस हा समोरचा निसर्ग तर आपण एन्जाॕय करु शकतो ना? एवढं भरभरुन दिलय त्याने की पाच दिवस नाही पाच महिनेही कमी पडतील आपल्याला हे सर्व पहायला... काय मॕडम... बरोबर ना...?'
'बरोबर...' म्हणत हसत नेहा आशीषच्या कुशीत शिरली. 
तिला प्रकर्षाने जाणीव झाली की देवाने एक परफेक्ट सांगाती तिच्या आयुष्यात दिला होता. 
त्या जाणीवेने नेहा मोहोरली... 
बाहेरचा 'हिरवा' निसर्गही लाजून मोर पंखी झाला होता...!!

-सुनील गोबुरे

2890. ॐ गं गणपतये नमः

 डॉ. वरद हे शहरातले नामवंत हार्ट सर्जन. त्यांच्या कौशल्याने आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांनी आजपर्यंत अपयश कधीच पाहिले नव्हते.
आज राजचे ऑपरेशन होते. त्यासाठी काल पन्नास हजार रुपये अ‍ॅडव्हान्स भरले होते. साधारणतः एका तासाने राजला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलें जाणार होते. राजची पत्नी नेहा खूप काळजीत होती.
“मॅडम, तुमचे दीड लाख रुपयांचे पेमेंट बाकी आहे.”
“सर, मी सकाळीच डॉक्टरांच्या अकाउंटला ट्रान्स्फर केले आहे.”
“मॅडम, पण पैसे अजून क्रेडिट झालेले नाहीत.”
नेहाने बँकेला फोन केला.
“मॅडम, KYC चा प्रॉब्लेम आहे. तुम्ही उद्या बँकेत येऊन एक सही केलीत, तरच पेमेंट होईल.”
“पेमेंट मिळाले नाही, तर मी ऑपरेशन करणार नाही,” डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले.
नेहाने गयावया केली, पण डॉक्टर पाझरले नाहीत.
“पुढच्या दहा मिनिटांत पैसे मिळाले नाहीत, तर आजचे ऑपरेशन कॅन्सल करू. साधारण दोन आठवड्यांनंतर जी डेट उपलब्ध असेल, तेव्हा ऑपरेशन करू.”
“डॉक्टर, पण तुम्हीच तर सांगितले होते ना की ऑपरेशन त्वरित करावे लागेल?”
“हो, पण पैसे त्वरित भरावे लागतील, हेही सांगितले होते. विसरलात का?”
“एका दिवसाची मुदत द्या, प्लीज,” नेहाने विनवणी केली.
“अहो मॅडम, हे गुंतागुंतीचे ऑपरेशन आहे. काही बरेवाईट झाले, तर तुम्ही मला फक्त दोष द्याल; बाकीचे पैसे नाही.”
काय ते दुर्दैव! पैसे असूनही त्या पैशांचा उपयोग करता येत नव्हता.
“पुढच्या पेशंटला घ्या,” डॉक्टरांनी सांगितले.
नेहाच्या मैत्रिणीने तिच्या ओळखीतील, पण तशा कमी अनुभवी सर्जनशी बोलून दोन दिवसांनंतरची डेट घेतली आणि राजला तिथे तातडीने शिफ्ट केले.
डॉ. वरदच्या सहकाऱ्यांनी पुढच्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. प्राथमिक तपासणी करून गुंगीचे इंजेक्शन दिल्यवर डॉ. वरद ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाले.
ॲापरेशनसाठी इन्स्ट्रुमेंट हातात घेण्यापूर्वी गणरायाच्या फोटोला वाकून नमस्कार करायचा हा त्यांचा शिरस्ता होता.
“अरे, गणरायाला कुठे हलवले?”
“असं काय विचारता, सर? बाप्पा तर समोरच आहे.”
“हो खरंच की," डॉक्टर म्हणाले.
“पण आज बाप्पा प्रसन्न वाटत नाही… उदास वाटतो.”
“सर, किती प्रसन्न मुद्रा आहे गणरायाची! तुम्ही ठीक तर आहात ना?” असिस्टंटने विचारले.
“मला थोडं पाणी द्या,” डॉक्टर म्हणाले.
असिस्टंटने पाणी आणून दिले. डॉक्टरांनी ग्लास तोंडाला लावला… पण पाणी पिण्याआधीच ते धाडकन कोसळले.
क्षणात सर्व काही संपलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमधील बातमी पाहून रीना म्हणाली,
“नेहा, अगं राज खूप लकी आहे.”
“काहीही काय, रीना! आपल्याला लवकरची डेट मिळाली खरी, पण हे डॉक्टर कमी अनुभवी आहेत… म्हणजे रिस्क आलीच ना?”
रीना क्षणभर थांबली. नेहाच्या डोळ्यांत पाहत ती हळूच म्हणाली—
“नेहा… काल संकष्टी चतुर्थी होती.
तुझा कडकडीत उपवास होता.
तू मनोमन फक्त एकच प्रार्थना केली होतीस—
‘बाप्पा, माझा राज वाचू दे.’
पैसे होते… पण KYC चा अडथळा आला.
ऑपरेशन गरजेचं होतं… पण डॉक्टरांनी नकार दिला.
सगळं आपल्याला अडचण वाटत होतं.
पण आज कळतंय.
तो अडथळा नव्हता, तर ते राजचं संरक्षण होतं.”
नेहाला काहीच समजले नाही. ती रीनाकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होती. रीनाने तिला पेपरमधील बातमी सांगितली.
“जर काल डॉ. वरदनी राजचं ऑपरेशन केलं असतं,
आणि ऑपरेशनदरम्यानच ते गेले असते…
तर राजचं भविष्यच तिथे थांबलं असतं.”
नेहा काही क्षण गप्प राहिली. शब्द थांबले, श्वास थांबला.
हळूच तिने राजच्या कपाळावर हात ठेवला आणि मनातल्या मनात पुटपुटली—
गणराया, तूच आमचा पाठीराखा.
नेहाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते—
भीतीचे नव्हे… तर कृतज्ञतेचे आणि नकळत तिच्या ओठांवर मंत्र उमटला—
 “ॐ गं गणपतये नमः.” 

 दिलीप कजगांवकर, पुणे     ✍️

2889. मूर्ती

     आमच्या दाणीकाकांकडे श्रीरामाची एक शिसवी लाकडाची दोन अडीच फुटी पुरातन रेखीव, सुंदर मुर्ती होती. तो धनुर्धारी राम होता. प्रसन्न हास्य चेहर्‍यावर विलसत होतं आणि एक हात त्यानं कटीवर मोठ्या रुबाबात ठेवलेला होता.
अलंकार तर असे धारण केले होते की, त्रैलोक्याचं वैभवच जणू तो मिरवत होता. गळ्यातला तुळशीचा पायघोळ हार अगदी त्याच्या कोमल श्रीचरणकमलांपर्यंत आलेला दाखवला होता. इतकं सगळं असून तो एकटा होता. त्याच्या शेजारी त्याला साजेशी सीतामाई नव्हती.
रामाला एकटं ठेऊ नये, असं काकांच्या आईला फार वाटायचं… म्हणून ती आयुष्यभर तितकीच सुंदर, त्या मुर्तीला अनुरुप अशी सीतामाईची मुर्ती शोधत होती. श्रीराम एकटा असू शकतो… पण सीतामाई एकटी कशी असणार?
दाणीकाकांची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी होती, तरी सीतामाईचा शोध त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. तरीही आईसाठी ते म्हैसूर, बेंगलोरपर्यंत गेले, गुजरातेत फिरले… पण योग जुळून येईना. त्यांच्याकडचा श्रीरामाचा फोटो पाहून ती मुर्ती विकत घ्यायला अनेक जण पुढं आले; पण सीतामाई कुणाकडेही नव्हती.
काकानी प्रयत्न खूप केले… प्रवास खूप केले, अनेकाना भेटले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांची आई श्रीरामाला एकटाच ठेऊन गेली. इतरांना मुलाबाळांच्या लग्नाची आस असते, ही म्हातारी श्रीरामाच्या जोडीदाराची चिंता वाहत गेली.
दाणीकाकांच्या मनाला फार लागलं. कारण आई जातानाही त्या विषयीच बोलत होती. अशी काही फार आजारी नव्हती पण तरी थकली. खाण्यावरची तिची वासनाच उडाली.
काकांची मुलगी मुकी होती. दिसायला मोहक पण मुखातून एक शब्द उमटायचा नाही. काकांची आई मात्र फक्त तिचंच ऐकायची…
तिनं कॉफी आणली की बळेबळे का होईना, घोट घोट कॉफी प्यायची. जे काही हितगुज चालायचं, ते तिच्याशीच चालायचं. आजी काय बोलतेय, ते तिला कळायचं आणि तिचे मुके हुंकार आजीला कळायचे.
शेवटी शेवटी काकाना वाटायला लागलं, श्रीरामासाठी सीतामाईचा शोध हा प्रतिकात्मक आहे… मनातून आजीला नातीच्या लग्नाची आस लागून राहिलीय!
पण कांता लहान असतानाच आजीनं बजावलं होतं, “नक्षत्रासारखी मुलगी आहे… आता ती मुकी निपजली, ते आपले आणि तिचे भोग. पण म्हणून तिच्यासमोर कुणी डोकं धरून बसायची गरज नाही. झालं लग्न, आनंद आहे. नाही झालं, तर माझी श्रीरामावरची भक्ती वाया जायची नाही… तो घेईल तिची काळजी.”
https://whatsapp.com/channel/0029VaDinBXFcowDhOwBNW0y
आणि खरंच तो नियम या घरानं आजपावेतो पाळला. आजीमुळं घरचे सगळेच तिच्याशी बोलक्या मुलीशी संवाद साधावा तसे बोलायचे. त्याचा परिणाम असा झाला की कांताला ओठांच्या हालचालीवरून समोरच्याच्या बोलण्याचा अंदाज यायला लागला. 
पण तरी, आजीसोबतचा तिचा संवाद वेगळाच असायचा. आणि तिच्याशीच बोलताना आजीचे शेवटचे शब्द होते, “श्रीरामा, तुला एकट्यालाच ठेऊन जावं लागणार बहुतेक… असो! शेवटी तुझी इच्छा! आम्ही हेका धरून काय होणार?” आणि ती गेली.
आता कांता खरच मुकी झाली. दाणीकाकाना ते जाणवयचं. त्यावर उपाय म्हणून त्यानी तिला जवळच्या आर्ट स्कूलमधे हॉबी क्लासला घातलं. रोज संध्याकाळी ती पेंटींग्जचे धडे घ्यायला जायला लागली. ओघवती रेष हातात होतीच पण आता त्याला पोषक वातावरण मिळालं.
एकदा सरानी सांगितलं, “नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी स्केच करून आणा.”
कांताकडे श्रीरामाची मूर्ती होती. तिनं त्याचीच ओघवत्या रेषेत वेगवेगळी स्केचेस केली. ती चित्र पाहून अख्खं आर्ट स्कूल खुळावलं. चित्र छानच होती पण मुर्तीचं अलौकीक सौंदर्य आणि डौल मोहवून टाकणारा होता.
मग शानबाग सर, पेडणेकर सर खास मूर्ती पहायला घरी आले. त्यांनी त्या मुर्तीची सिलॅबसप्रमाणं माहिती दिली. त्यात दाणीकाकांना काही स्वरस्य नव्हतं.
आणि मग या ना त्या कारणानं आर्ट स्कूलमधलं कुणी ना कुणी कांतासोबत घरात डोकावायला लागलं. त्यातच ललीत परिमू सारखा देखणा काश्मीरी शिल्पकार घरी आला. मूर्ती पाहून त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. तसा काही तो आस्तिक नव्हता, पण तरी ती मुर्ती बघून गुंगून गेला.
मग काकानी सीतामाईच्या शोधाची टेप त्याच्यासमोरही वाजवली. तो आत्मविश्वासानं म्हणाला, “मी आणतो तुमच्या श्रीरामासाठी साजेशी सीतामाई!”
काकांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. आनंदून ते म्हणाले, “कशी… कधी… कुठे…???”
तो शांतपणे म्हणाला, “आत्ता ती अंतराळात आहे. तिला मी अवतीर्ण करेन…”
आणि तो कामाला लागला… प्रिया मचोरीयावर त्यानं वेशभुषेचं काम सोपवलं. तो श्रीमंत उद्योजकाचा मुलगा होता. पैशांची त्याला कमतरता नव्हती आणि श्रीमंतीचा माज नव्हता.
एक-दोन मॉडेल्स बघितल्यावर त्याची नजर कांतावर स्थिरावली… तिचे टपोरे काळेभोर डोळे, सरळ नाक आणि गालात दडून बसणारं हास्य, काहीसे कुरळे लांबसडक केस…
मग आणखी काय हवं! प्रिया मचोरीयानं सीतेला टिपिकल बनारसी पेहेराव दिला, जो कांताला विलक्षण सूट झाला आणि कांता सीतामाईच् रूप घेऊन ललीतसमोर उभी राहू लागली. ललीतला हवे असलेले हावभाव कांताला मुद्रेवर मुद्दाम आणावे लागत नव्हते, ती अंतर्बाह्य तेच अनुभवत होती!
आणि सीटींग्ज मागं सीटींग्ज पार पडायला लागल्या. हातात वरमाला घेतलेली काहीशी सल्लज तरी मिलनासाठी आतूर सीतामाई भूतलावर अवतीर्ण व्हायला लागली, तशीच ती कांतेच्या हृदयातही साकार व्हायला लागली. त्याचे परिणाम आता घरात जाणवायला लागले.
आणि खरंच एक दिवस ललीतनं त्या मर्यादा पुरुषोत्तमाशेजारी त्याला साजेशी विलक्षण सौंदर्य लाभलेली, हातात वरमाला घेतलेली, अबोल सलज्ज सुकुमारी सीतामाई उभी केली.
प्रतिमा पाहिल्यावर दाणी कुटुंबाला आपल्या लेकीत दडलेल्या अलौकीक सौंदर्याची जाणीव झाली. कुठलाच कलाकार बिदागीशिवाय काम करत नाही. ललीतनंही ‘इस हाथसे दो, और उस हाथसे लो’, म्हणतात तसं सीतामाईची प्रतिमा त्यांना देऊन त्यांची जानकी आपल्याकडे घेतली. 
दाणीकाकांनीही जनक राजाची भूमिका मोठ्या आनंदानं पार पाडत आपल्या लेकीची पाठवणी त्या जादूचे हात असलेल्या शिल्पकारासोबत केली.
आज या पाठवणीला कित्येक वर्षं उलटून गेली आहेत आणि ती श्रीराम-जानकीची मूर्ती ‘अभिजात कलेचा आदर्श नमुना’ म्हणून गणली जातेय.

— चंद्रशेखर गोखले

2888. राघवच्या मॅडम

 अंजलीला आठवी, नववी मराठी आणि दहावीच्या दोन वर्गाचे इतिहासाचे तास मिळाले. शिवाय ती नववी A ची क्लासटीचर पण होती. मराठी शिकवायला मिळणार म्हणून ती आंनदीत होती. कारण ती कथा कविता मध्ये रमणारी होती. पुस्तके वाचायची तिला लहानपणापासूनची आवड.
   रत्नागिरी कॉलेजमधून तिने M. A. केले, बी. एड केले. पण तिला नोकरी मिळाली नाही. सगळीकडे पैसे घेऊन नोकरी. रत्नागिरीत ती क्लास मध्ये शिकवायची. नोकरीची पाच वर्षे वाट बघून शेवटी तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न करून दिले आणि ती मुंबईत आली.
उमेश तिचा नवरा एका फार्मा कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर होता. तिचे सासरे शिक्षण खात्यातून निवृत्त झाले होते,सासू बँकेतून निवृत्त झाली होती.
खरं तर तिला नोकरी करायची गरज नव्हती, पण तिला घरी करमत नव्हते. तिला शिकवायची आवड होती.. तिला अनेक कविता तोंडपाठ होत्या. नाटकातले सवांद तोंडपाठ होते. मराठीसोबत इंग्लिश वाचन होते. या सर्वांचा उपयोग व्हावा असे तिला वाटायचे.
ती शिक्षिकेचा नोकरीसाठी प्रयत्न करत होती.. अनेक ठिकाणी अर्ज, इंटरव्हू झाले.. पण काम होत नव्हते.. पण.. आणि अचानक एका इंग्लिश स्कुलमध्ये मराठी शिक्षकाच्या नोकरीसाठी जाहिरात आली. तिच्या सासऱ्यांनी ती जाहिरात पाहिली.. आणि ते तिला म्हणाले..
'अंजली.. या सेंट थॉमस स्कुल 
मध्ये मराठीसाठी शिक्षक हवाय.. तू अर्ज कर..
'पण बाबा.. मी किती अर्ज केले? त्त्यांचे कुणाला घ्यायचे हे आधीच ठरलेले असते.. उगाच त्रास होतो..
'पण या शाळेत तू अर्ज कर.. या शाळेला वरच्या वर्गाची परवानगी माझ्या काळात मी दिली होती. त्या संस्थेशी अजून माझे चांगले संबंध आहेत.. तू सर्व सर्टिफिकेट जोडून अर्ज तर कर.. पुढचे मी पहातो.
   अंजलीने अर्ज केला.. तिचा इंटरव्हू झाला आणि तिची मराठी विषयासाठी निवड पण झाली. तिच्या नवऱ्याला उमेशला ते फारसे आवडले नव्हते.. पण स्त्री स्वातंत्र्यची त्याला जाणीव नव्हती. त्याने तिला सांगितले..
'अंजली..आपली परिस्थिती उत्तम आहे आणि तूझ्या नोकरीवर आपण अवलंबून नाही.. पण तुला नोकरी करायची आहे, तुझे वाचन, लेखन याचा तुला उपयोग व्हावा.. यासाठी तुला मुलांना शिकवता शिकवताना स्वतःला आनंद मिळवायचा आहे..या साठी तू नोकरी करणार आहेस हे उत्तम पण एक लक्षात ठेव, तुला काही त्रास होत असल्यास कधीही नोकरी सोडू शकतेस..
त्याचा हात हातात घेत अंजली म्हणाली..
'होय रे अमित.. तुमच्या पाठिंब्यावरच मी नोकरी स्वीकारणार आहे.
अंजली खूपच आनंदात होती, बऱ्याच दिवसापासूनचे तिचे स्वप्न पुरे झाले होते.. तिने ठरवले मुलांसमोर जाताना टापटीपीत जायचे, ती कॉलेजमध्ये असताना काही प्रोफेसरमंडळी आणि मॅडम गबाळ्या वेशात यायचे, शाळेत असतानाचे शिक्षक चारचार दिवस दाढी पण करायचे नाहीत.. बाईकडे दोन नाहीतर तीन साड्या असायच्या.. त्यावर म्याचिंग करायचे पण त्यांना जमायचे नाही, चप्पल कसल्यातरी प्लास्टिक्सच्या असायच्या.. आपण तसे करायचे नाही.. त्यात ही इंग्लिश शाळा, इथे मध्यमवर्ग आणि श्रीमंतांचीच मुले येणार.. मग आपण अव्यवस्थित राहून कसे चालेल?
तिने काही चांगल्या साडया निवडल्या, त्यावर मॅचिंग ब्लाउज शिवून घेतले. छान रंगाचे पंजाबी ड्रेस विकत घेतले.चार प्रकारचे सॅन्डल्स घेतले.
एक तारिखला ती शाळेत जॉईन झाली. स्टाफ मधील सह शिक्षकांची तिने ओळख करून घेतली. बरीच सिनियर मंडळी होती.पण तिच्याच वयाची एक शिक्षिका होती.. स्वाती. 
  अंजलीने ठरविले, स्वाती बरोबर दोस्ती करायची. एक तर ती मराठी भाषिक होती आणि तिचेपण दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.
ती स्वाती बरोबर कॅन्टीनमध्ये गेली.
'स्वाती.. तुझे कुठले विषय ग?
'मॅथ्स.. आठवी आणि नववी..
'तुझे?
'मी मराठी आठवी आणि नववी.. दहावी एक वर्ग इतिहास.. नववी क्लासटीचर. कसा आहे ग नववीचा वर्ग?
'मला काही त्रास नाही.. पण हे इंग्लिश स्कुल.. बहुतेक श्रीमंतांची पोर..आपण पण सांभाळून राहायचं..
'हो.. मी तशी तयारीतच असणारं ग आणि मी रत्नागिरीत क्लास मध्ये शिकवलंय.. पण हा साठ मुलांचा वर्ग..
त्या दिवशी वर्गावर जायचे नव्हते.फक्त नवीन मुलांची ओळख आणि स्वागत करणे. दुसऱ्या दिवशी अंजली छान साडी नेसली, त्याला मॅचिंग ब्लाउज घातला, मस्त लाल गुलाब केसात माळला. स्टाफ रूममध्ये तिला स्वाती भेटली.
'छान दिसतेस ग अंजली..
'हो ग स्वाती.. मला टापटीप राहायला आवडत.. आणि ही माझी पहिलीच नोकरी ना.. मी एक्सायटेड आहे पहिल्या दिवसाला.. आज नववीला मराठी तास..
'बेस्ट लक अंजली..
'थँक्स.. तुला पण बेस्ट लक..
     नववीची हजेरीपट घेऊन अंजली वर्गात गेली. तिने आपली ओळख करून दिली.
'मी मिसेस अंजली कामत... याच वर्षी या शाळेत जॉईन झाले. तुमची क्लासटीचर आणि मराठी विषय शिकविणार.. तुमची ओळख करून द्या..
एक एक मुलगा, मुलगी आपली  ओळख करून देत होती. अंजलीच्या लक्षात आले.. ही मुले खात्यापित्याची असल्याने तशी थोराड होती.. तेराचवदा वर्षांची मुले. तिने हजेरी घेतली आणि मराठी कविता शिकवायला घेतली.. तिला कविता फार आवडायच्या.. विशेष करून प्रेमकविता. त्या कविता वाचताना ती रंगून जायची. आज तिने कुसुमाग्राजाची कविता शिकवायला सुरवात केली..
....'पुरे झाले चंद्रसूर्य.. पुऱ्या झाल्या तारका.....
'पुरे झाले नदी नाले.. पुरा झाला वारा..
'मोरासारखा छाती फाडून उभा रहा.. जाळासारखा नजरेत नजर बांधून..
सांग तुला, तूझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..
 अंजली भान हरपून कविता शिकवत होती.. एका पुरुषाला प्रेमात आव्हान देणारी कविता ही.. अंजलीच्या तोंडून ते प्रेमरस ऐकता ऐकता ती तेराचवदा वर्षांची मुले उत्तेजित झाली होती.. वातावरण धुंद झाले होते.. एव्हड्यात एका कोपऱ्यातून एक हलकीशी शीळ ऐकू आली..
ती शीळ ऐकताच सर्व वर्गाचे लक्ष तिकडे गेले. अंजली पटकन थांबली.. तिने शीळ आलेल्या दिशेने पाहिले.. एक क्षणभर.. आणि झटक्यात मान फिरवली आणि ती मटकन खुर्चीत बसली..
मुले ओरडली..
'मॅडम.. राघव तो.. राघव. राघव बंगेरा.
अंजलीचे हृदय धडधडू लागले.. आता आपल्याला उलटी होणार असे वाटतं असताना तास संपल्याची बेल वाजली.
मुले घोळक्याने बाहेर पडली.. मग हळूहळू अंजली बाहेर पडली आणि स्टाफरूममध्ये येऊन खुर्चीत बसली. सुदैवाने तिला पुढील दोन तास नव्हते.
   ती डोळे मिटून होती.. मघा नववीच्या वर्गातील प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत राहिला... ती तोंडाने म्हणत होती..' सांग तुला तूझ्या मिठीय स्वर्ग आहे सारा..
ही ओळ म्हणत असताना कोपऱ्यातून हलकीशी शीळ आली.. आणि आपण चमकून त्या दिशेने पाहिले.. क्षणभरच..
  तो मुलगा.. उंच, पिंक केसवाला.. भोरा.. त्याच्या नजरेत दिसलेली वासना.. वासनेने डबडबलेले त्याचे डोळे.. लाल गळते आहे की काय असे वाटणारे, आपल्याकडे बभूक्षित नजरेने पहाणारे...
एक क्षणभरच..
त्याची ती नजर पहाताच आपण लटपटलो.. तेरा चौदा वर्षाचा नववीतील हा मुलगा.. असेल उंच, धडधाकट.. पिंक केसाचा, पण आपले वय जवळपास दुप्पट.. तरी ही कामुक नजर?
दुसरा तास संपला तशी स्वाती स्टाफरूममध्ये आली, अंजली डोके धरून बसलेली पाहून ती म्हणाली...
'अंजली.. बर वाटतं नाही काय?
'नाही, तस नाही. दोन तास ऑफ आहेत ना, त्यामुळे स्वस्थ बसले झाल..
'बर.. मी जाते दुसऱ्या तासाला..
स्वाती गेली.. तिसऱ्या तासाची बेल वाजली तशी अंजली उठली आणि दहावीवर इतिहास शिकवायला गेली. पण तिचा आज लक्ष नव्हता.. सतत त्या नववीतील राघव आणि त्याची नजर तिचा पाठलाग करत होती..
रात्री तिचा नवरा उमेश पटकन झोपला पण तिला झोप येईना... या राघवचे काय करायचे हे तिला कळेना.. आता त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, तो जिथे बसतो... त्या दिशेने पाहायचेच नाही असे तिने ठरवले. 
दुसऱ्या दिवशी ती नववीच्या वर्गावर गेली. हजेरी घेताना तिच्या लक्षात आले, राघव बंगेरा हजर आहे.. कालची अर्धवट राहिलेली कविता तिने शिकवायला सुरवात केली..
'..... सांग तिला, तूझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा..
आज पण राघवच्या दिशेने हळूच शीळ आली..
पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तिने कविता पुरी केली, तास संपला.. नववीचा पुढील तास स्पोर्ट्स होता.. त्यामुळे मुले घोळक्याने बाहेर पडू लागली.. अंजली पण मुलामधूनच बाहेर पडत होती.. एव्हड्यात तिच्या पाठीला कुणाचा तरी स्पर्श झाला.. हा मुद्दाम केलेला स्पर्श हे तिने ओळखले आणि झटक्यात मान फिरवली... राघव तिच्या मागेच होता.. तसेच लालची हसू डोळ्यात घेऊन.. त्यानेच मुद्दाम पाठीला स्पर्श केला हे तिने ओळखले आणि त्याच्या कानाखाली एक ठेवून द्यावी असे तिच्या मनात आले.. पण तिने तसे केले नाही.. उगाचच आपल्या पहिल्या नोकरीच्या आठवड्यात आपली वाईट हेतूने चर्चा झाली असती.. एव्हड्यात त्याच वर्गातील शरयू ने तिला विचारले..
'मॅडम.. कुसुमाग्रज नाशिकला राहायचे ना?
त्या घोलक्यात ती तिच्याकडे पहात म्हणाली..
'होय ग.. बरोबर आहे तुझं.
आणि ती क्लासरूमच्या बाहेर पडली आणि स्टाफरूमकडे गेली.
अंजलीचे डोके भणाणले होते.. ती कशीबशी स्टाफरूममध्ये खुर्चीत येऊन बसली. स्वाती तिच्या बाजूलाच होती..
'काय झाले अंजू? चेहेरा असा का? काही झाले का?
'चल माझ्याबरोबर वॉशरूमपर्यंत?
स्वाती तिच्याबरोबर बाहेर पडली.
'स्वाती, तू पण नववीला शिकवतेस ना?
'हो ना.. मॅथ्स घेते ना मी नववीचे..
'मग त्या वर्गातील राघव बंगेरा तुला माहित असेल..
'राघव? तो पिंक केसवाला?
'तोच.. इतर मुलांच्या मानाने थोराड दिसणारा.... अग तो सतावतोय, मी कविता शिकवत होते कुसुमाग्रज्यांची.. तर तो शीळ घालत होता, मी त्याच्याकडे पाहिले तर त्याची नजर.. लाळघोटी पुरुषासारखी, वासनेने ओथंबलेली..
'काय म्हणतेस?
'अग आज तर क्लास सुटला आणि मूल घोळक्याने बाहेर पडत असताना त्याने हेतपुरस्कर माझ्या पाठीला स्पर्श केला.. मी रागाने पाहिले तर.. त्या दिवसासारखीच विषारी नजर..
'मग तू गप्प बसलीस?
'त्याच्या थोबाडीत मारावेसे वाटले मला... पण तो थोराड दिसत असला तरी कोवळा मुलगा आहे ग तो? तेरा चवदा वर्षाचा.. असा कसा काय वागू शकतो तो माझ्याशी?
'खरं सांगू अंजली.. मी त्याला दोन वर्षे शिकवतेय.. किंवा अजून बऱ्याच लेडी टीचर त्या वर्गावर जातात.. पण कुणालाच असा अनुभव आलेला नाही.मग तू प्रिन्सिपॉल कडे तक्रार दे ना..
'नको.. अजून लहान आहे तो.. त्याची बाजू पण समजायला हवी.
तिने ठरवले, नवऱ्याला उमेशच्या कानावर पण घालावे, कारण यदाकदाचित अशा परिस्थितीमुले नोकरी सोडायची आली तर नवऱ्याला आपली बाजू माहित असावी.
     रात्री तिने उमेशला राघव बंगेरा बंद्दल सांगितले.त्याची चटकन प्रतिक्रिया..
'दोन थोबाडीत द्यायला हव्या होत्यास तू.. अग, तेरा चवदा वर्षांची मुले म्हणजे लहान नव्हेत.. मुली जशा अकरा बाराव्या वर्षी वयात येतात तसेच मुलगे पण.. त्याना स्त्री देहाचे आकर्षण वाटायला लागत.. हल्ली अशा बऱ्याच बेबसिरीज आल्या आहेत.. त्यात विदयार्थी आणि तरुण टीचर यांचे रोमान्स दाखवतात.. ते ही मुले पाहतात आणि त्याना वाटते.. मी पण टीचरसोबत असा रोमान्स करू शकेन.. अशी स्वप्ने ती पहातात.. मी तुला मागेच सांगितले आहे.. तुला त्रास होत असेल तर नोकरी सोडून दे म्हणून..
उमेश झोपी गेला पण अंजलीला झोप येईना. सतत राघवचा चेहेरा डोळयांसमोर येत राहिला.. राघव इतर लेडी टीचरसोबत कधीही असा वागलेला नाही.. त्याचा वर्गातील परफॉर्मन्स उत्तम आहे.. मग माझ्याशीच असा का वागतोय?
काही तरी कारण असणारं.. पहाटे पहाटे तिला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी ती नववीच्या वर्गावर गेली तेंव्हा तिने मुलांना कवितेखालच्या प्रश्नांची उत्तरे लिहून आणायला सांगितली होती.. मुले आपल्या वह्या आणुन देत होती.. तिचे लक्ष होते.. राघवने पण वही तिच्याकडे दिली. तिने हळूच त्याची वही उघडली.. पहिल्याच पानावर वर्गात शिकवणाऱ्या टीचरचे चित्र त्याने काढले होते.. त्या खाली लिहिले होते.आय लव्ह यू.. पुढे परत लिहिले होते.. आय हेट यू... परत आय लव्ह यू.. आय हेट यू..
या मुलाच्या मनात काही तरी वादळ असल्याचे तिच्या लक्षात आले.
लव्ह. पाठोपाठ हेट.. हा मुलगा इतर लेडी टीचरना सोडून आपल्यालाच का त्रास देतोय?
    लंचटाइम मध्ये तिने शाळेचा शिपाई केशव याला बोलावले..
'केशव.. माझे एक काम कर.. नववी मध्ये राघव बंगेरा नावाचा मुलगा आहे.. त्याच्या आईबाबा विषयी आणि त्या कुटुंबा विषयी माहित काढ..
केशव दुसऱ्यादिवशी अंजलीला म्हणाला..
'मॅडम.. या बंगेरा सायबाचे चार पाच पेट्रोलपम्प हाईत.. हा तिकडे लोखंडवाला मध्ये राहतो.. लय श्रीमंत हाईत.. पर त्याची बायको त्याच्याबरोबर न्हाय राहत..
केशवने राघवच्या वडिलांच्या ऑफिसचा पत्ता दिला. अंजलीने ठरवले.. त्याच्या बाबांना भेटायचे.
दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर ती बंगेराना भेटायला म्हणून अंधेरीला गेली. बाहेरच्या माणसाला तिने 'राघवची टीचर ' असा निरोप दिला. दुसऱ्या मिनिटाला तिला आत बोलावलं गेलं..
आत बंगेरा आणि त्त्यांचा एक माणूस बसला होता..
का कोण जाणे पण ती आत जाताच बंगेरा चपापला..
'या मॅडम.. तुम्ही अंजलीमॅडम काय?
'होय.. पण तुम्हाला माझे नाव कुणी सांगितले?
'राघवने..'
'राघवने? अहो, त्याच्या तक्रारी मी तुम्हाला सांगायला आले होते..
'राघवच्या तक्रारी? त्याने काय केले?
तिने पहिल्या दिवसापासूनच्या राघवच्या गोष्टी त्याना सांगितल्या.. तसेच तिने सोबत वही आणली होती.. त्यातील,'आय लव्ह यू.. आय हेट यू.. असे लिहिलेले आणि पहिल्या पानावर तिचे चित्र दाखवले..
बंगेरानी ती वही पाहिली.. मग तो बोलू लागला..
'मॅडम.. हे आय लव्ह यू.. आय हेट यू.. हे त्याने आपल्या आईला लिहिलेय, तुम्हाला नाही..
'म्हणजे?
बंगेराने आपल्या पॉकेटमधून एक फोटो काढला आणि तो अंजलीसमोर ठेवला.. अंजली पहातच राहिली.... त्या फोटोतली बाई बरीचशी अंजलीसारखी दिसत होती किंवा अजून दहा वर्षांनी अंजली कशी दिसेल तशी ती होती.
'कोण आहे ही बाई? बरीचशी माझ्यासारखी दिसते..
', हा फोटो राघवच्या आईचा.. मघा तुम्ही आत येताच मी दचकलो कारण तुम्ही माझ्या पत्नीसारख्या दिसता..
'मग आता कुठे आहे राघवची आई?
'सहा महिन्यापूर्वी राघवच्या आईने आम्हाला म्हणजे मला आणि राघवला सोडल आणि तिने दुसरे लग्न केल..
'ओहो नो..
'अस आहे मॅडम... राघवची या आधी कसलीही तक्रार नाही आलेली.. पण तो मनातून उध्वस्त झालाय.. खूप विचार करत असतो.. त्याच्या आईचा त्याला खूप लळा होता, म्हणून तो, तुम्ही तिच्यासारख्या दिसता म्हणून.. तुम्हाला लव्ह यू म्हणतो आणि हेट यू अस सुद्धा म्हणतो. त्याला आपल्या आईला त्रास द्यायचा असतो..
तो तुम्हाला देतो.. तुम्हाला मागून स्पर्श करतो, खरं तर तो त्याच्या आईला मागून धक्का देत असतो. मी तुमची माफी मागतो मॅडम.. तुमच्या जागी दुसऱ्या मॅडम असत्या तर त्यानी प्रिन्सिपॉलना सांगून राघवला घरी बसवलं असत.. किंवा मुलासमोर थोबाडीत दिली असती.. पण मॅडम.. तो तुमचा आदरही करतो.. त्याने मला काल तुम्ही शिकविलेली मराठी कविता म्हणून दाखवली..
'पुरे झाले चंद्र सूर्य.. पुरे झाले तारे..
अंजलीच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले.
'बंगेरासाहेब... मला क्षमा करा.. मला काहीच कल्पना नव्हती हो... खरं सांगू.. मला सोबतच्या शिक्षिका अशा मुलांना शिक्षा करावी अस सांगत होत्या.. माझा नवरा या मुलाच्या दोन थोबाडीत द्यायला सांगत होता, पण.. माझे मन.. कदाचित एका आईचे मन सांगत होते, हा मुलगा असा नाहीये.. काहीतरी चुकत होते, त्यांच्याबाबतीत.. त्याच्या आईच्या वयाची मी.. तो असा कसा वागेल?
'झाले ते झाले मॅडम.. मी माझ्या मुलाला दुसऱ्या शाळेत घालतो.. परत तुम्हाला त्रास..
'अस करू नंका बंगेरा साहेब.. त्याला आमच्याच शाळेत पाठवा.. त्याच्या आईसारखी दिसते ना मी.. आता त्याची आईच होईन. तुम्ही निश्चिन्त रहा.

    प्रदीप रामदास केळुस्कर... 9422381299/9307531152.

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...