शनिवार, २३ मे, २०२६

2809. घोर उपेक्षा झाली पण

 ‘ट्रिंग… ट्रिंग… ट्रिंग…’
दारावरची बेल तीनदा वाजली तरी सौरभला दार उघडण्याची इच्छा होत नव्हती. हॉलमधल्या आरामखुर्चीत डोळे मिटून पडून राहावं आणि स्वत:च्याच विचारात बुडून जावं, असं त्याला वाटत होतं.
अलीकडच्या काही दिवसात, विशेषत: महिन्याभरापूर्वी बाबा गेल्यापासून त्याच्या मनाची अवस्था उद्विग्न झाली होती. मित्र नको, वाचन नको, फोन नको.. काही काही नको. सौरभला हवा होता फक्त एकांत आणि त्याच्या बाबांच्या आठवणी.
बाबां गेल्याचा तो शेवटचा दिवस... त्यांची अंतयात्रा... यात्रा कसली? कशीबशी आठ ते दहा माणंस जमली होती. त्याला यात्रा थोडंच म्हणायचं? एक सोपस्कार होता झालं!
बाबा नुकतेच निवृत्त झाले होते, ही गोष्ट खरी.. पण पस्तीस वर्षं ज्या माणसानं कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं, त्या कॉलेजमधून, प्रेम राहू दे, शिष्टाचार म्हणून सुद्धा कुणी त्या दिवशी आलं नव्हतं. चार नात्यातली माणसं आणि चार इकडची तिकडची... इतकी वर्षं शिकवून एकही विद्यार्थी बाबा गेल्याचं कळल्यावर भेटायला सुद्धा आला नाही? याला माणुसकी म्हणायचं?
एका प्राध्यापकाच्या जीवनाचा हा शेवट ! खरं म्हणजे बाबा किती चांगले शिकवायचे. शिकवत असताना त्यांचं तल्लीन होणं, त्यांचा धीरगंभीर आवाज. शाळेत असल्यापासून बाबांचं शिकवणं त्याला ठाऊक होतं. सौरभच्या डोळ्यासमोर त्याचं शालेय जीवन दिसू लागलं.
दहावीचं वर्ष. कसून अभ्यास करायचे ते दिवस होते. सोफासेटवर बसलेले बाबा आणि खाली सतरंजीवर सौरभ. तल्लीन होऊन बाबा शिकवत राहायचे आणि सौरभ त्यांचा शब्द न शब्द शोषून घ्यायचा. इंग्लिशसारखा अवघड विषय सुद्धा रंजक पद्धतीनं मुलांना समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.
खरं तर बाबा कॉलेज मध्ये प्राध्यापक होते, तरीसुद्धा त्यांनी अपार्टमेंटमधल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले होते. पण कशी बशी चार मुलं क्लासला यायची. कोण दुर्देवी? बाबा की मुलं?
सौरभला त्याचे बाबा कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, याचा नेहमी अभिमान वाटायचा. बाबांच्याचमुळं त्याला इंग्लिश भाषेची गोडी लागली होती; म्हणून त्यानं ठरवलं होतं दहावी पास झालो की आर्ट्स साईड घ्यायची आणि पुढं मग बघू काय करायचं. निदान बाबा घरी आणि कॉलेजमध्ये असल्यानं आपल्याला इंग्लिश भाषेतली पुस्तकं तरी वाचता येतील!
त्यानं त्याच्या मनातलं जेव्हा बाबांना सांगितलं, तेव्हा बाबा जोरात हसले होते, “बरं, बघू...आधी दहावी चांगल्या मार्कांनी पास हो!”
बाबांनी ते हसण्यावारी नेलं पण त्याचा निर्णय मात्र पक्का होता आणि जेव्हा जेव्हा तो बाबांच्या खोलीत जायचा तेव्हा तो निर्णय अधिक पक्का व्हायचा.
त्यांच्या खोलीत शिस्तीत उभी असलेली ती जाडजुड पुस्तकं आणि समोर लावलेले ते अत्रे, विजय तेंडूलकर आणि जॉर्ज बर्नोड शो चे फोटो. त्या फोटोसमोर बसून बाबा तास न तास काहीतरी लिहित बसायचे. सौरभ त्या फोटोकडे बघून विचारायचा,
“बाबा, हे फोटो तुम्ही तुमच्या खोलीत का लावलेत?”
बाबांनी मंद स्मित केलं आणि म्हणाले, “मोठ्या लोकांच्या फोटोकडे पाहिल्यावर आपल्यालाही त्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यांचाप्रमाणे व्हावसं वाटतं.”
“पण बाबा, हे अत्रे, तेंडुलकर लेखक होते. तुम्ही लेखक आहात का? तुम्ही काय लिहित असता?”
बाबा यावर काहीच बोलले नाहीत. सौरभच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाले, “खूप मोठा हो. भरपूर कष्ट कर. पैसे काय माणूस मिळवतोच रे ! पण या जगात तुझं नाव राहील, अस काहीतरी करून दाखव. माझे आशीर्वाद आहेत तुला.” 
सौरभनं मान हलवली. पण बाबा काय बोलले ते त्याला कळलंच नव्हतं. बाबा फार कमी बोलत. ते वाचत तरी किंवा ते लिहित तरी. एकाच घरात राहत असून सुद्धा सौरभनं त्यांना आईशी सुद्धा बोलताना फारसं कधी पाहिलं नव्हतं.
सौरभ त्याच्या मित्रांच्या घरी जायचा, तेव्हा त्यांचे आईबाबा बोलत असताना त्यानं बऱ्याचदा पाहिलं होतं पण त्याचे आईवडील मात्र बोलताना फारसं कधी पाहिलं नव्हतं. एकदा सौरभनं आईला विचारलंच,
“आई, मी मित्रांच्याकडे जातो तेव्हा त्यांचे आई बाबा नेहमी काही ना काही बोलत असतात. पण तू आणि बाबा कधीच बोलताना पाहिलं नाही.”
आई काहीच बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. बाबांचा पगार तसा बरा होता पण त्यांना एक विधवा बहिण सुद्धा होती. तिलासुद्धा ते आर्थिक मदत करत असायचे. आणि त्यामुळं आईला नेहमी काटकसरीनं संसार करायला लागायचा.
आई कटकट करत बोलायची, तेव्हा सौरभच्या हे लक्षात आलं होतं. पण म्हणून इतका अबोला?
“आई, एक विचारू? बाबा नेहमी काय लिहित असतात?”
आई एकदम चिडून म्हणाली, “डोंबलं लिहितात माझं. तू उलथ. जा बाहेर. माझ्याशी नको कटकट करूस…”
‘दोन-चार कथा आणि एखादा लेख छापून आला, तर लेखक म्हणे !’ आई स्वत:शीच बोलत होती… पण तिचा वैताग मात्र सौरभला कळत होता. तिला काटकसरीनं संसार करायला लागण्यापेक्षा बाबांच्या वेगळ्या विश्वाचा राग होता.
सौरभच्या बालपणात दोन वेगळी विश्वं होती. एक, प्रापंचिक कटकटीनं वैतागलेली आई आणि आपल्याच नादात असलेले बाबा. पण त्या दिवशी सौरभला कळलं की आपले बाबा लेखक सुद्धा आहेत. या दोन विश्वांकडे पहात बघत सौरभ दहावी झाला आणि त्यानं बाबांच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
कॉलेजमधलं ते रंगीबेरंगी जीवन. पण सौरभला त्या जीवनापेक्षा मोह होता तो कॉलेजच्या भव्य इमारतीचा, तिथल्या वाचनालयाचा, विद्वान प्रोफेसरांच्या शिकवण्याचा, ज्ञान समृद्ध करण्याचा आणि अर्थातच बाबांच्या शिकवण्याचा. वर्गात बसलेली ती चाळीस पन्नास मुलं आणि त्यांच्या पुढं शिकवणारे आपले बाबा.
कॉलेजच्या त्या वातावरणात दोन वर्षं कशी गेली ते सौरभला कळलंच नाही. तो बारावी पास झाला आणि फर्स्ट इअरला त्याने प्रवेश घेतला.
इंग्लिश शिकवायला अर्थातच बाबा होते. पहिलाच तास बाबांचा होता. पण वर्गात फारशी मुलं नव्हती. इतर पिरीएडसना वर्ग कसा भरलेला असतो; पण इंग्लिशच्या तासाला फक्त दहा पंधराच मुलं.
बाबा आले. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. शिकवण्याची त्यांची पद्धत तीच होती. तीच तल्लीनता, तोच व्यासंग… घरी मुलाला शिकवतोय म्हणून वेगळी पद्धत आणि वर्गात पाट्या टाकायच्या, असं काहीच नव्हतं. पण असं असताना त्यांच्या पिरीएडला कशीबशी दहा मुलं. सौरभला वाईट वाटलं. आज पहिला दिवस म्हणून त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं. पण तीच स्थिती नंतर सुद्धा कायम होती.
त्या दिवशी सौरभ मित्रांच्या घोळक्यात उभा होता. आपापसात त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. कुणी एकजण म्हणालं,
“इंग्लिशच्या पिरीएडला बसतोस?”
“छ्या…“ अंगावर पाल पडावी तसा तो विषय त्यानं झटकला. “तो काय शिकवतोय ते त्याचं त्याला तरी कळतंय की नाही कुणास ठाऊक? तो प्रोफेसर कसा झाला तेच कळत नाही!”
बाकीच्या मित्रांनी त्याच्या हातावर टाळी दिली आणि एकच हास्यकल्लोळ झाला. सौरभ त्यांचा मुलगा आहे हे मित्रांना ठाऊक नव्हतं. सौरभला मात्र राग आला होता. ‘म्हणे, आपल्या बाबांना प्रोफेसर कुणी केलं? या मुलांची लायकी आहे का, माझ्या वडिलांकडून शिकवून घेण्याची? वाटत होतं…’ पण सौरभ तिथून निघून गेला.
सौरभ आता वडिलांशी बोलण्याइतपत मोठा झाला होता. मित्रांनी केलेला वडिलांचा अपमान त्याच्या डोक्यातून जात नव्हता. त्या दिवशी वडील संध्याकाळी लिहित बसले होते तेव्हा सौरभ त्यांच्या खोलीत गेला आणि म्हणाला,
“बाबा, मला थोडं बोलायचं होतं…”
वडिलांनी मुलाचा मूड ओळखला आणि त्यांनी हातातलं पेन बाजूला ठेवलं.
“बोल…”
“बाबा, मी तुमचं शिकवणं लहानपणापासून पाहत आलोय आणि अजूनही तुम्ही तितक्याच तन्मयतेनं शिकवता. तुमचा ‘बाबा’ म्हणून मला अभिमान आहेच पण तुम्ही चांगले शिक्षक, प्राध्यपक म्हणून जास्ती आहे.”
बाबा डोळे मिटून ऐकत होते. त्यांची स्तुती फारशी कुणी करत नसत. सौरभकडून दोन कौतुकाचे शब्द ऐकल्यावर त्यांना बरं वाटलं. तरी सौरभचा मुद्दा काय, याची उत्स्कुकता त्यांना होतीच.
“पण मी कॉलेजमध्ये आल्यापासून पाहतोय, तुमच्या वर्गात फक्त दहा मुलं! खरं तर वर्गात पन्नासेक मुलं असायला हवीत ना? मग असं का?”
बाबा जोरात हसले. सौरभ इतका गंभीर होऊन बोलत होता पण तरी ते का हसतायत, ते त्याला कळलं नाही.
“सौरभ, वर्गात मुलं का येत नाहीत, हा प्रश्न त्यांना विचारायचा की मला? हा दोष त्यांचा की माझा?”
खरंच की…! मुलं येत नाहीत, हा बाबांचा दोष नाही. पण तरी सुद्धा बाकीच्या पिरीएडसना वर्ग भरलेला असतो, हे काही त्याच्या डोक्यातून जात नव्हतं. त्यानं बाबांना विचारलंच.
“सौरभ, बाकीच्या वर्गात परीक्षार्थी येतात. माझ्या वर्गात विद्यार्थी येतात. मी त्यांना ज्ञान देतो.”
बाबांचं उत्तर सौरभला आवडलं होतं. त्या दिवशी बाबा आणि सौरभ बरेच मोकळेपणी बोलले. आणि त्याच संधीचा फायदा सौरभनं घायचं ठरवलं.
“बाबा, एक विचारू… तुम्ही हे काय लिहित असता?”
“काही नाही रे… सुचतील तशा कथा, कविता लेख लिहित असतो.”
“म्हणजे तुम्ही लेखक आहात ना?”
आईशी बोलत असताना सौरभला हे पुसटसं कळलं होतं; तरीसुद्धा बाबा काय करतात, हे त्याला त्यांच्याकडून ऐकायचं होतं.
सौरभने पुढं विचारलं, “मग तुम्ही हे कुठं पाठवत का नाही? त्याचं पुस्तक का करत नाही?”
बाबांनी त्याच्या पुढ्यात पाच सहा मासिक टाकली आणि म्हणाले, “यात माझे काही लेख, कविता कथा छापून आल्या आहेत…” परंतु हे सांगताना त्यांच्या बोलण्यात विषाद जाणवत होता.
बाबाना तो त्याच्या लहानपणापासून लिहित असताना पहात होता. म्हणजे कमीत कमी वीस वर्षे तरी ते लिहितातच आहेत. मग एकूण पाच ते सहा मासिकातच त्याचं लिखाण छापून आलं? त्यांचा नावानं एकही पुस्तक नाही?
बाबांच्या शिकवणीला चार मुलं… वर्गात दहा मुलं…? त्यांचे कसेबसे छापून आलेले पाच सहा लेख, कथा आणि कविता. एका विद्वान प्रोफेसरांच्या आयुष्याची ही कथा…
दिवस, महिने जात होते. तेच नेहमीचं रुटीन चालू होत. सौरभचं शिक्षण संपलं. बाबा निवृत्त झाले आणि अचानक एक दिवस आई देवाघरी गेली. एकाच घरात दोन विश्वं होती पण त्यातलं एक विश्व संपलं होतं. अबोल बाबा अजुन गप्प झाले. त्यांचं लिखाण, वाचन सगळं संपून गेलं. एकाकीपणानं त्यांना घेरलं होतं.
सौरभनं बाबांना विचारले, “बाबा, तुम्हाला आईची आठवण येते?”
“आठवण यायला मी तिला विसरायला पाहिजे ना? माझ्या सारख्या दुर्देवी माणसाशी तिला का संसार करायला लागला असेल? नियतीचा हा काय खेळ…?”
आईची आठवण काढून बाबा ढसाढसा रडले. त्यांना समजवण्याइतपत सौरभ मोठा नव्हता. कसाबसा तो त्यांना धीर देत होता.
आई गेली आणि काहीच दिवसात बाबा गेले. ते गेल्याचा निरोप सौरभनं कॉलेजमध्ये दिला, अपार्टमेंटमध्ये दिला. 
पण त्यांच्या अंतयात्रेला फक्त आठ ते दहा माणसं. समोर बांधत असलेल बाबांचं प्रेत आणि आपापसात कुजबुजत असणारी ती माणसं… ते चित्र अजुन त्याच्या डोळ्यांसमोरून गेलं नव्हतं. आपल्या बाबांची दुर्दैवी कहाणी त्याला आज अस्वस्थ करत होती.

‘ट्रिंग… ट्रिंग… ट्रिंग…’
दारावरची बेल पुन्हा एकदा वाजली. आणि सौरभ त्याच्या तंद्रीतून जागा झाला. हे सारखं सारखं कोण बेल वाजवतंय? मघाशी सुद्धा असंच कुणीतरी वाजवून गेलं. त्यानं वैतागून दार उघडलं. दारात कुणीतरी अनोळखी माणूस उभा होता.
“मी आदित्य सरपोतदार.”
हे नाव कुठंतरी ऐकलं होतं… पण ते आठवण्याच्या मनस्थितीत सौरभ नव्हता.
“बोला…” सौरभ म्हणाला.
“मी आत आलं तर चालेल का?” त्यान हसून विचारलं.
तो माणूस अनोळखी असताना सुद्धा शिष्टाचार म्हणून सौरभनं त्यांना आत घेतलं.
“बोला…”
“मी माझी ओळख करून देतो… मी आदित्य सरपोतदार. फिल्म डायरेक्टर आहे.”
“ओह्… मला तुमचं नाव ठाऊक आहे. पण एक मोठा डायरेक्टर माझ्या घरात कसा येईल, म्हणून मी थोडासा गोंधळलो होतो.”
“नो नो नो… मी मोठा-बिठा नाही. खरं तर तुमचे वडील मोठे आहेत. आपल्या वडिलांची एका दिवाळी अंकात आलेली ‘उपेक्षित’ नावाची कथा माझ्या वाचनात आली होती. त्या कथेमध्ये काहीसे बदल करून मी त्यावर एक चित्रपट बनवू इच्छितो. मी तुमच्या वडिलांना एक पत्रही पाठवलं होतं. पण…“
त्यानं सौरभपुढं एक पत्र धरलं. बाबांच्या एका कथेवर चित्रपट काढण्यासाठी त्यानं पत्र लिहिलं होतं. बाबांची लेखी परवानगी त्याला हवी होती.
सौरभला आता आश्चर्याचा धक्का बसला. आदित्य सरपोतदार बाबांच्या कथेवर चित्रपट काढणार होता! सौरभनं सुद्धा ती कथा वाचली नव्हती.
तो गोंधळून म्हणाला, “पण बाबा तर नुकतेच…“
“आय नो, सौरभ.” आदित्य अजुन एक वर्तमानपत्र त्याच्या पुढं ठेवत म्हणाला. बाबा गेल्याची एक बातमी त्यानंच वर्तमानपत्रात दिली होती, ते वर्तमानपत्र आदित्य दाखवत होता.
“सौरभ, मी तुमचं दु:ख समजू शकतो. पण.”
“तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?”
“तुमच्या वडिलांच्या नंतर तुम्हीच त्यांचे वारसदार आहात. त्यांच्या कथेवर चित्रपट काढायची मला परवानगी द्या. मी तुम्हाला मानधन द्यायला तयार आहे.”
सौरभच्या मनात विचार आला, ज्या माणसाला संपूर्ण आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली, त्या माणसाच्या निधनानंतर त्याच्याच एका कथेवर आदित्य सरपोतदार सारखा डायरेक्टर चित्रपट काढतोय…!!
पुन्हा भेटायचं आश्वासन देऊन आदित्य सरपोतदार निघून गेला.
आदित्य गेला आणि सौरभ अधिकच भाऊक झाला. क्षणात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अश्रुंमध्ये ना त्याला भिंतीवर लटकलेली वडिलांची प्रतिमा दिसत होती, ना आदित्यनं समोर ठेवलेलं पत्र!

- बा स कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...