आज तिनं मागून वळून पाहिलंच नाही. निरोप घेताना दहा वेळा मान मागं वळवून मला पाहणारी कस्तुरी आज बदलताना पाहिली. कुणीतरी काळजात सुई घुसवावं अशी वेदना मुक्यानं बोलकी होताना मी अनुभवली. डोळ्यांतून आपोआप पाणी आलं.
कस्तुरी खूप दूर निघून गेली होती. नजरेआड होईपर्यंत तिला पाहतच राहिलो. कस्तुरी निघून गेली की मी कायम एक दगड उचलून कोणत्या तरी दगडावर नेम धरून तो फेकायचो. जर नेम बरोबर लागला, तर समजायचं की, कस्तुरीसुद्धा माझ्यावर प्रेम करते. तशी कस्तुरीची आणि माझी तुलना म्हणजे कावळा आणि बगळा अशी होईल. आम्ही रस्त्याचं काम करायचो. जत–डफळापूर रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं. कस्तुरी दगड फोडायचं काम करायची आणि मी डांबर टाकायचो. कस्तुरी जेव्हा दगड फोडायची तेव्हा येणारा जाणारा प्रत्येकजण तिच्याकडे बेरकी नजर टाकायचा. मला ते सहन होत नसायचं.
त्यावेळी कस्तुरीच्या लक्षात ती बेरकी नजर आली, की ती जोरात घण दगडावर आपटायची आणि तोंडानं जोरात कसला तरी विचित्र आवाज काढायची. ते नजर टाकणारं माणूस लाजल्यागत निघून जायचं; तेव्हा हळूच कस्तुरी माझ्याकडे पहायची आणि काहीतरी ओठानं पुटपुटायची.
तिचं ते बोलणं आजवर मला कधी समजलंच नाही. पण एवढं मात्र कळत होतं की, माझ्याकडून काहीतरी अपेक्षा मात्र नक्की असायची.
आज दुपारी असंच काहीसं झालेलं. रोडरोलरवाल्यानं बोलता बोलता तिच्या छातीवर हात ठेवला होता. तिला हे सहन झालं नव्हतं. त्या रागाच्या तंद्रीत तिनं त्याला जोरात ढकलून दिलं होतं. तो जोरात आपटला होता. त्याला चांगलाच मुक्कामार बसला होता.
मी सगळं हे पाहत होतो. पण प्रतिकार करू शकलो नव्हतो. कारण कंत्राटदाराच्या खूप जवळचा कुणीतरी तो होता. त्यामुळं मी मध्ये पडलो नाही. पगार कापला जाईल याच भीतीनं मी काही करू शकलो नाही.
पण कस्तुरी मधलं हे रूप पाहून मी आतून थोडासा आनंदून गेलो होतो. त्यावेळी कस्तुरीनं माझ्याकडे खूप कीव आल्यागत रागानं पाहिलं आणि मी मान खाली घातली.
कामाची सुट्टी झाल्यावर हातपाय तोंड धुताना कस्तुरी खूप बडबड करत होती. मी काहीच बोललो नाही. मनातून खूप खजील झालो होतो. तिच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हतो.
पण आज कुठंतरी जाणीव झाली होती की, कस्तुरी माझ्यावर विश्वास ठेवते. मला जीव लावते. तिलाही मी आवडत असल्याची खात्री झाली होती.
रोजचा निरोप घेताना तिनं मान मागं वळवून टाकलेली नजर माझा कायम पाठलाग करायची. रात्रभर कस्तुरी पापणीच्या आड कायम असायची.
आज कस्तुरीनं मान वळवून पाहिलंच नाही. या दिवशी रात्रभर डोळे झरझर वाहत राहिले. दुसऱ्या दिवशी कामावर हजरी लावली. पायात गमबुट घातले. डांबर रातभर उकळलेलं होतं; ते ढवळत बसलो.
कस्तुरी आली होती. डोक्याला टॉवेल गुंडाळून तिनं हातात घण घेतला आणि ढिगाऱ्यावर उभी राहून दगड फोडायला लागलीसुद्धा. दुपार होईपर्यंत कस्तुरीच्या घणानं आज विश्रांती घेतली नव्हती.
मी वारंवार तिच्यावर नजर टाकत राहिलो. आज एक क्षण सुद्धा तिनं माझ्याकडे पाहिलं नाही. दुपारच्या वेळी तिला आलेला घाम पाहून मी हातात पाण्याची बाटली घेऊन तिच्याजवळ जाऊन मान खाली घालून उभा राहिलो. ती दगड फोडतच होती. तिनं लक्षच दिलं नाही.
मी हळूच म्हणालो, “कस्तुरे पाणी घे.”
ती थांबली. हातातली बाटली हिसकावून घेतली. घण बाजूला उभा केला. एका दगडावर पाय ठेवून ती उभी होती. मान उंचावून तिनं ती बाटली तिरकी केली; तेव्हा दोन ओठातून आत खळखळ करीत जाणारं पाणी, नरड्यातून आत घुसणारा पाण्याचा आवाज आणि ओठावरून सांडलेले पाणी तिच्या हुनवटीवरून छातीवर ओघळत चाललेलं…
मी काही क्षण तसाच एकटक तिला पाहतच राहिलो. पाण्याची बाटली सगळी संपली आणि तिनं ती बाटली माझ्या तोंडावर फेकली. पुन्हा घण उचलला आणि जोरात घाव एका दगडावर बसला. एका दणक्यात दगडाचा चुराच झाला.
मी बाटली उचलून तिथून चालता झालो. मागं वळून पहावं वाटलं पण हिम्मत झाली नाही. घणाचा आवाज मात्र वाढत राहिला. मी तिला पाणी दिलेलं रोडरोलरवाल्यानं पाहिलं. घाणेरड्या शिव्या देत तो खाली उतरला आणि…
“भाडखाऊ पोरी बघून पाणी पाजतोस काय?” म्हणत त्यानं मला खाली आपटला आणि लाथा घालायला सुरवात केली. सगळे जमा झाले पण कुणी मध्ये आलं नाही.
मी त्याच्यापुढे फार कमी होतो. तो बडबड करत अधून मधून लाथा घालतच होता. मी खाली पडलो होतो. कस्तुरी हे सगळं पाहत होती पण तिनं काम थांबवलं नव्हतं. ती दगडावर जोरात घाव घालत होती आणि रोडरोलरवाला मला लाथा घालताना तिच्याकडे एकटक पाहत होता.
कस्तुरी तशीच चिडून मान खाली घालून जोरात दगड फोडत होती पण ती इकडे बघतच नव्हती; हे पाहून तो जास्तच भडकला होता. थांबायला तयारच नव्हता. चिडून जोरात लाथा घालतच राहिला.
माझी नजर कस्तुरीकडं गेली. तिचं डोळं पाण्यानं तुडुंब भरलं होतं. ओठ थरथर कापत होते. इकडं हा जोरात तुडवायला लागला आणि अचानक कस्तुरीच्या हातातून घण खाली पडला.
कस्तुरी जोरात ओरडली. हातात जो आला तो दगड तिनं उचलला आणि जोरात धावत येऊन सरळ दगड जसाच्या तसा त्याच्या डोक्यात घातला!
तो खाली पडला. कस्तुरी त्याच्या छातीवर बसली आणि तोंडावर जोरात बुक्क्या मारू लागली. कस्तुरी त्यावेळी हंबरडा फोडून ओरडत होती. मी कसंतरी स्वतःला सावरत मागून कस्तुरीला जोरात ओढलं. त्या रागाच्या भरात कस्तुरीनं मलाही बुक्की घातली.
त्यानं तिच्यासमोर अक्षरशः दोन्ही हात जोडले तेव्हा ती शांत झाली. ती उठली. बाजूला झाली. झंपर फाटलेलं दिसलं. सगळी गर्दी फक्त कस्तुरीला पाहत होती.
माझ्याजवळ आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवून तिनं केसात अडकलेली माती झाडली. डोक्याला बांधलेला टॉवेल सोडून तिनं माझं तोंड पुसलं. माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. मी तोच टॉवेल तिच्या छातीवर टाकला, तसं ती जोरात ओरडली…
“गप्प बस, रडू नकोस…” असं म्हणत तिनं मला हाताला धरून उठवलं. दोघंही तिथून निघालो कारण पुन्हा आम्हाला कामावर कुणी घेईल याची खात्री नव्हती.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या लिंबाखाली आम्ही बसलो. बराच वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही. माझ्या ओठातून रक्त येत होतं. कस्तुरी ते अधूनमधून पुसत होती.
बराच वेळ गेल्यानंतर कस्तुरीकडे मी मान वर करून पाहिलं. आज सगळं मनातलं माझ्या जखमी ओठावर आलेलं होतं. हुंदका गिळत तिला म्हणालो,
“कस्तुरी, तू मला लै आवडतेस. लग्न करशील माझ्याशी?”
यावर बराच वेळ कस्तुरी मान खाली घालून एक काटकी हातात घेऊन मातीत काहीतरी गिरवत होती. ती काहीच बोलली नाही. मावळतीच्या वेळेला कस्तुरीच्या एका गालावर सूर्याची किरणं पडलेली. त्यामुळं माझी नजर तिच्या गालावरून हटतच नव्हती. उन्हानं तिचा गाल खपली गव्हाच्या रंगावानी दिसू लागला होता.
बराच वेळ झाला तरी कस्तुरी काहीच बोलत नव्हती. मी एक दगड उचलला. समोरच्या एका बारीक दगडावर नेम धरला आणि फेकला. नेम बरोबर लागला; तसं मी कस्तुरीकडे पुन्हा पाहिलं. यावेळी कस्तुरी एकटक माझ्या डोळ्यांत पाहत होती. तिचे ते मोठे टपोरे डोळे पाण्यानं डबडबले होते. ती आतून हुंदकत होती. पण बोलत काहीच नव्हती.
मी तिच्याकडे तसाच पाहत राहिलो आणि दोन्ही हात अलगदपणे तिच्या दोन्ही गालावर ठेवले. तिच्या डोळ्यातलं पाणी बोटानं हळुवार पुसलं. तिचे डोळे, तिचे गाल आणि तिचं डोळ्यातलं पाणी खूप गरम जाणवत होतं.
कस्तुरीनं माझे हात बाजूला केले आणि खूप मोठ्यानं हुंदका देत म्हणाली, “निघ इथनं, घरी जा. परत कधीच भेटू नकोस. विसरून जा!”
मी तसाच पाहत राहिलो. काहीच कळत नव्हतं. कस्तुरी पुन्हा ओरडली, “निघतो की हाकलून देऊ आता तुला?”
मी उभा राहिलो. पाठ फिरवली आणि जायला निघालो. तेवढ्यात कस्तुरीनं माझा हात जोरात घट्ट आवळून धरला. मी थांबलो. तिच्याकडं पाहून फक्त एवढंच म्हणालो,“काय कस्तुरी?”
तेव्हा शेवटचं तिनं मान उंचावून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, “काही नाही… जा तू…आणि याद राख, पुन्हा कधीही भेटू नकोस. कुठं भेट झालीच, तर ओळख देऊ नकोस. निघ ना आता… जा!” असं म्हणत तिनं ओठ आतल्या आत गुंडाळून डोळे गच्च मिटून घेतले; तेव्हा शेवटचे दोन टपोरे थेंब पडताना मी पाहिले आणि…
कस्तुरीच्या ओठावर नकळतपणे माझे ओठ जवळ जाऊन टेकवले तेव्हा छातीवर जोरात बुक्की घालून तिनं मला ढकलून दिलं आणि ढसाढसा रडत दोन्ही हात जोडून माझ्याकडे पाहत गुडघ्यावर बसली. तिनं मान खाली घातली आणि उजवा हात उचलून तिनं मला निघून जाण्याचा इशारा दिला.
मी तिथून चालता झालो. फक्त पाय चालत होते. मन तिथंच कस्तुरीजवळ थांबलं होतं. खूपवेळा मागं वळून पाहिलं पण कस्तुरी मान खाली घालून तशीच बसून राहिली होती.
महिना संपून गेला होता. कस्तुरीच्या आठवणी झोप लागू देत नव्हत्या. आज मंगळवार… तालुक्याचा बाजार. आवरून बाजारात आलो. दुपार झाली होती. भाजीपाल्याचा बाजार मोठा भरतो.
आणि अचानक गर्दीत कस्तुरी दिसली. मन सैरावरा धावू लागलं. थोडसं अंतर राखून तिला चोरून पाहू लागलो…
कस्तुरीच्या हातात हिरव्या बांगड्या होत्या. कपाळावर बारीक टिकली. त्यावर कुंकू. डोक्यावर पदर, नाकात नथ आणि हातात दोन भरलेल्या पिशव्या. बिचारीला ते ओझं सहन होत नव्हतं. एक क्षण वाटलं की जावं आणि तिचं ओझं हलकं करावं…
पण तेवढ्यात कस्तुरीला शिवी देऊन कुणीतरी बोलवलं. तशी कस्तुरी घाबरली. पदर नीट करू लागली आणि आवाज आलेल्या दिशेनं झपझप चालू लागली. मी एकटक कस्तुरीला पाहत राहिलो.
कस्तुरी एका माणसाजवळ थांबली. त्याने आणखी एक पिशवी तिच्या हातात दिली. कस्तुरी ओझ्याने वाकली. मला राग आला.
आज मनात ठरवलंच… कोण आहे हा? त्याला बाजारात तुडवायचा आणि कस्तुरीला यातून मोकळं करायचं. तिच्या उपकाराची परतफेड होणार नाही पण कधीतरी तिला माझं प्रेम दाखवून देण्याची ही संधी होती.
मी पुढं झालो आणि पाहतो तर काय? आमचेच रंगराव मास्तर. वडिलांच्या वयाचे. आम्हाला पहिली ते चौथी लाभलेले आमचे वर्गशिक्षक. म्हणजे कस्तुरीनं मास्तराशी लग्न केलं?
कस्तुरीनं मला पाहिलं, तसं कस्तुरीचे डोळे गच्च भरून आले. माझे पाय तिथंच थांबले. नाईलाज झाला. रंगराव मास्तराला तुडवू तरी कसा? त्या भरलेल्या बाजारात माझ्या काळजाचा बाजार होताना पोटातली आतडी ओरबाडून बाहेर काढून त्या गर्दीवर फेकून द्यावी आणि जोरात, ‘ये कस्तुरेऽऽ…’ म्हणून ठो ठो बोंबलून घ्यावं असं वाटायला लागलं.
कस्तुरीनं हातातल्या पिशव्या नीट केल्या. माझ्याकडे तिरकी मान करून मानेनंच अर्ध्या पापण्या मिटत निघून जायला सांगितलं आणि रंगराव ती मास्तरच्या मागं चालू लागली.
मला आठवलं, हेच ते रंगराव मास्तर… यांची बायको मेल्यावर हंबरडा फोडून रडले होते. रंगराव मास्तरांच्या स्त्रीवादी कविता, लेख पेपरला छापून यायचे. ग्रामसभेत रंगराव मास्तरांनी केलेली स्त्री मुक्तीची भाषणं सुद्धा मला आठवली.
सगळं सगळं आठवत राहिलो… बाजाराच्या गर्दीत कस्तुरी कुठं हरवून गेली कळलंच नाही. पण एवढं मात्र नक्की कळलं… वाघिणीवाणी लढणारी, मनातल्या मनात आपल्या प्रियकराला जपणारी, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी, लाज झाकून जगणारी माझी कस्तुरी होती.
आणि आज स्वतःच्या प्रेमाचा खून करून कुंकवाची संस्कृती जपण्यासाठी, बाईचं बाईपणं सांभाळून ठेवण्यासाठी माझी कस्तुरी पुरुषप्रधान देशातल्या पुरुषी रस्त्यावरून कायमची निघून जाताना दिसली.
आजही कुठंतरी रस्त्याचं काम कुठं सुरू असताना दगडाच्या ढिगाऱ्यावर हातात घण घेऊन उभी असणारी कस्तुरी दिसत असते. आजही आठवडी बाजारात हातातल्या पिशव्या आणि डोक्यावरचा पदर सांभाळणाऱ्या अनेक कस्तुऱ्या पाहायला मिळतात.
आणि उजेडात स्त्रीचं गाणं गाणारे आणि अंधारात तिच्यावर तुटून पडणारे रंगराव मास्तरसुद्धा याच गर्दीत जागोजागी सापडतात.
- नितीन चंदनशिवे
मु.पो. कवठेमहांकाळ
जि. सांगली.
मोबाईल : 7020909521
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा