सोमवार, ३१ जुलै, २०२३

447. नियतीने जे वाढून ठेवलेय ते चांगल्या साठीच....

      एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं..तो तिथे पोचला पण...थोडा संभ्रमात पडला. त्या स्त्रीची तीन लहान जुळी ( खरंतर तिळी म्हणतात त्यांना) बाळं रडत होती..त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आईविना ती अनाथ होणार होती.हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली ती ऐकून यमराज भडकले, तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का?? प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्गनियमांमधे हस्तक्षेप करत नाही मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास?त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे मी दुसर्‍या दूताकरवी ते काम करीनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः तीनवेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच  हसणार नाहीस तो पर्यंत तुझी सुटका होणार नाही...तू इथे परत येऊ शकणार नाहीस.(इथे मला एक महत्वाची गोष्ट  सांगाविशी वाटते की, दुसर्‍याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं..) दूत शिक्षा भोगण्यास तयार होता..यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं.त्याच सुमारास समोरुन एक चर्मकार येत होता.थंडीचे दिवस  (व तीसुद्धा रशियातली थंडी) येऊ घातले होते म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेटस् खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता.त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी  ह्या माणसासाठीच कपडे ,ब्लँकेट वगैरे खरेदी केलं व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देवजाणे तो दूताला म्हणाला, "अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस?" माझ्या घरी चल काही दिवस...! माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला लावून घेऊ नकोस..काही दिवसांनी सगळं ठीक होईल.त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला ( आता मजा बघा हं!  त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं, आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रुपात कोण आलाय !) त्याची ओळख करुन देत चर्मकाराने सांगितलं हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचं टाळकंच सरकलं, त्याच्या समोरच म्हणाली, "इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीय त्यात भरीस भर म्हणून ही ब्याद का मागे लावून घेतलीय?"
....आणि देवदूत पहिल्यांदा हसला.. चांभाराला आश्चर्य वाटलं ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस?? त्यावर देवदूत म्हणाला अशाप्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर ह्याचं उत्तर देईन..! आजच्या घटनेवर दूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामधे दैवी शक्ती आहे..ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्यांचं भाग्य उजळणार आहे...मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना? (हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता हैं नियती के मन में तो कुछ और ही होता हैं ) पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं.. जो खो गया उसे देख रही थी जो मिला हैं उसका क्या??उसका तो अंदाज ही नहीं है-मुफ्त ! घर में एक देवदूत आया है। सात दिवसांतच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला...व देवदूताने बनविलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले,की जो-तो त्यांची स्तुती करु लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला.अवघ्या सहा महिन्यांत तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही.अन्य देशांतील राजांचेही जोड बनविण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामधे अपार संपत्ती येऊ लागली. दिवस-महीने-वर्ष पुढे सरकत होती. एकदा असं झालं.. सम्राटाचा एक अधिकारी आला..चांभाराकडे  कातडं सोपवलं व म्हणाला हे खूप दुर्मीळ व महागडं कातडं आहे..तुझी कारीगरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत.लक्षात ठेव सम्राटाच्या पायाकरीता बूट बनवायचे आहेत  स्लीपर नाही..! अधिकार्‍याने स्पष्टपणे खडसावले..! (रशियामधे मृत व्यक्तीला स्लीपर  घालून स्मशानांत नेण्याची प्रथा होती) चांभारानेसुद्धा  देवदूताला बजावलं हे बघ, सम्राटांच्या पायाकरीता या दुर्मीळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत स्लीपर नव्हे व कातडं सुद्धा बूटाच्या मापापुरतेच आहे..काही गडबड झाली तर नसती आफत ओढवेल. एवढं निक्षून सागूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या.. चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधीत झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले.. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास? देवदूत जोरजोरात हसू लागला...! तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनव. आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे. ( भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो.काल सम्राट असताना बूटासाठी आटापिटा होता.... आज स्लीपर हवी आहे )..चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या ... अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला.. मी तुला उगाच मारले...देवदूताने शांतपणे सांगितलं अरे, ह्यात तुझा काहीही दोष नाहीय मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसर्‍यांदा देवदूत हसला कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमधेसुद्धा चिडचिड, त्रागा करत बसतो.मृत्यूघटीका समीप असताना जीवनाचे गणित बांधत रहातो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं.. देवदूताला जाणवू लागलं त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय? हा  अनाठायी विचार मी करत होतो...! काही दिवसांतच तिसरी घटना घडली....या चांभाराकडे एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर  तीन सुंदर युवती आल्या..तीनही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते.देवदूताने तीन मुलींना पाहताक्षणीच ओळखलं ह्याच त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमधे स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता.त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या.देवदूताला उत्सुकता वाटली त्यांच्या बरोबर जी वृद्धा अली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली.ह्या मुली माझ्या समोरच रहात होत्या.ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली.ती अतिशय दारिद्यात दिवस कंठत होती. तिच्या पश्चात् ह्या मुलींचं कसं होणार? मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं, मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलींप्रमाणे ह्यांचं पालनपोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहेत...हे ऐकल्यावर.....  देवदूत तिसर्‍यांदा व शेवटचं हसला ....त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली..... आज जर त्या तीन मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दारिद्यात खितपत पडल्या असत्या..पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघीजणींनी समृद्धी उपभोगली..तसेच वृद्ध स्त्रीला संतानसुख मिळालं...! देवदूताने सांगितलं मी चुकलो होतो.. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे.तिच्या कार्यामधे मी  हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली...आता मी तुझा निरोप घेतो.......! एवढं बोलून तो देवदूत पाहता-पाहता तिथून अदृश्य झाला...!
        कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे...! एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचे  अपमृत्यू / देहहत्या बघून बर्‍याचजणांच्या मनांत हा प्रश्न येतो, इतक्या तरुण वयांत ही व्यक्ती का गेली?त्याच्या पश्चात् त्याच्या कुटुंबांचं /मुलाबाळांचं काय होणार? काहीजणं तर ह्या घटनांकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात...म्हणे, त्याला जर न्यायचंच होतं तर हाॅस्पीटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या?... ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो तो आपल्याच मुलांशी असा निष्ठूरपणे कशाला वागेल?  मनाला येईल तसं स्वतः वागायचं,वाट्टेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र  प्रेमळ परमेश्वराला अशी दूषणं द्यायची हा करंटेपणा कशासाठी?? वरील सर्वांचं  एकमेव उत्तर म्हणजे  कर्मसिद्धांत...!!! परमेश्वर कर्मामधे कधीही ढवळाढवळ करत नाही पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र  सुचवितो... ......आणि म्हणून तो म्हणतो.... न धरी, शस्त्र करी मी, परि सांगीन गोष्टी युक्तीच्या चार..!

446. ऋण फेडता आले पाहिजे...

       वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले, पण पाणी कोठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की, जेथे कोठे पाणी असेल, तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव. तेव्हा एक मयुर तेथे आला, व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे. चला मी आपणास दाखवतो. पण तिथे मी उडत उडत जाईन, आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे आपणास मार्ग सापडेल, व आपण जलाशया जवळ पोहचाल. आपणास माहिती आहे की, मयूर पंख, हॆ एक विशेष काळी, व एक विशेष ऋतुमध्ये पंख तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख निघत असतील, तर त्याचा मृत्यु होतो. आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते, त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की, मी किती भाग्यशाली आहे की, जो जगाची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की, माझ्या साठी जे मयूरपंख इच्छेविरूद्ध काढून, मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे, व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात, नक्की फेडीन. माझ्या कृष्ण अवतारात तुला, माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात, श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करुन, वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.
     तात्पर्य हे आहे की, जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले, ऋण पुढील जन्मात फेडावे लागले, मग आपण तर मनुष्य आहोत. न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे. आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत. ते ऋण फेडण्यासाठी, कित्येक जन्म कमी पडतील. अर्थात,आपणास जे काही भले करायचे आहे, ते या जन्मात करायचे आहे. कारण पुढचा जन्म कुठला असेल, आपणास माहिती नाही, आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते. एक महत्त्वाचे- पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय, माशी सुध्दा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला, हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण,नातेवाईक, शेजारी, या रुपात आपापले ऋण वसूल करतात, व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना, कोणत्या रुपात येवून, परतफेड करतात. त्यामुळे मी सरळमार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्याबाबतीत असे का होते,
याची कधीच खंत करु नका, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना त्वाची रे पूर्वसंचित केले.! तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.!! देह प्रारब्धावर सोडून, मन सद्गुरुचरणी, व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास, जीवनातील गंमत, व आनंद अनुभवता येतो...!!

शनिवार, २९ जुलै, २०२३

445. असे होतात संस्कार : सोनेरी शिक्षा

     मधली सुट्टी झाली होती. डबे खाणं संपवून काही मुलं खेळायला लागली होती. हॉलच्या पायरीवर बसलेल्या मायाकडून वडापाव घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुलींचे घोळके कट्ट्यावर बसून गप्पा मारू लागले होते. मधली सुट्टी देते तो आनंदविसावा सगळ्या पटांगणात पसरून राहिला होता.
   स्टाफरूममध्ये आम्हा टीचर्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या.चहाच्या कपाबरोबर काही राजकारणाच्या गप्पाही तोंडी लावल्या जात होत्या. मीही चहा संपवून कपाटातल्या माझ्या कप्प्यातून प्रगतीपुस्तके काढून घ्यायला उठले होते एवढ्यात पाचवीतली एक मुलगी रडत रडत आत आली. "बोकील बाई कुठेत?" असं विचारत. तिच्या हातात एक चेपलेला लहानसा अल्युमिनियमचा डबा होता. मी तिला घेऊन बाहेर गेले. बाहेरच्या  पायरीवर बसले, तिला शेजारी बसवलं.तिचे हुंदके थांबत नव्हते. तिला शांत करायचा प्रयत्न करीतच मी तिच्या रडण्याचं कारणही विचारायचा प्रयत्न करत होते. पाचवीतली ही मुलगी माझ्याकडे का आलीय ते मला कळत नव्हतं कारण छोट्या वर्गांना मी कधीच शिकवत नव्हते.
    हळूहळू तिचे हुंदके थांबले आणि तिने हातातला डबा माझ्यापुढे धरला. तो डबा सगळीकडून चेपला होता. कारण विचारल्यावर मला कळले की, ती पटांगणाच्या कडेच्या कट्ट्यावर डबा खायला बसली होती आणि खाऊन झाल्यावर खेळायच्या नादात डबा तिथेच विसरली. नंतर आणायला गेली तेव्हा काही मुले तिच्या डब्याचा फूटबॉल करून खेळत होती. तिच्या डब्याची ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली होती ती माझ्या वर्गातील, दहावीतील मुले होती. म्हणून ती तक्रार घेऊन माझ्याकडे आली होती.
       हे  सांगतानाच तिने तो डबा माझ्या हातात दिला आणि त्याची अवस्था बघून मी खरोखर शहारले. "आता  माझी आई मला मारेल बाई, मी आईला काय सांगू?" असं म्हणून ती परत स्फुंदू लागली. मी तो डबा माझ्याकडे घेतला. तिला म्हटले, "आईला सांग की, डबा बोकील बाईंकडे आहे आणि जमले तर उद्या संध्याकाळी मला भेटायला या. मग मी त्यांना सगळं सांगेन."
     प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली पाहून पोरीचं टेन्शन सरबतातल्या बर्फासारखं विरघळून गेलं आणि ती डोळे पुसून उड्या मारत जिना चढून तिच्या वर्गात गेली.
      माझ्या वर्गावर माझा शेवटचा तास होता. वर्गात जाऊन तो डबा मी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत बसले. नेहमीप्रमाणे सामूहिक कविता म्हणून झाल्या. आज बाई खुर्चीत कशा बसल्यात याचं आश्चर्य सगळ्या चेह-यांवर दिसत होतं. टेबलवर ठेवलेला डबा पाहून काही मुलं चपापून खाली माना घालून बसलेली माझ्या नजरेला दिसत होती.
       कविता संपल्यावर मी डब्याकडे बोट दाखवून  म्हटलं, "हा पराक्रम ज्यांनी केला आहे त्यांनी शाळा सुटल्यावर मला स्टाफ रूमच्या बाहेर भेटायचं आहे. माझा विश्वास आहे की यात सामील असलेले सगळे जण तिथे येतील."
       मुलांच्या हातून घडतात त्या बव्हंशी चुका असतात, गुन्हे नाहीत हा माझा विश्वास होता. योग्य पद्धतीने हाताळले तर चुका सुधारू शकतात हा माझा अनुभव होता आणि अजूनही आहे. कधी कधी चुका अनवधानानेही होतात. मुलांना त्यांची बाजू आधी मांडू द्यायला हवी.मग काय तो न्यायनिवाडा! आवाज चढवून डाफरण्याऎवजी, आपण कुठे चुकलो हे मुलांना आतून स्वत:ला कळायला, पटायला, मान्य व्हायला हवं. ते झालं की मग सुधारणेचा मार्ग आपोआप पायाखाली येतो ही माझी श्रद्धा आहे. मुलांच्या चुकीचा पंचनामा भर वर्गात करण्यासारखी घोडचूक नाही आणि मूठभर मुलांना झापण्यात वर्गाचा वेळ वाया घालवण्यासारखा मूर्खपणा नाही असं माझं दृढ मत आहे. त्यानुसारच सारं काही झालं.
      शाळा सुटली.स्टाफरूम ब-यापॆकी रिकामी झाली, मग मी बाहेर उभ्या असलेल्या पाच जणांना आत बोलावलं, डबा दाखवला आणि हे तुम्हीच केलंत का विचारलं. ते कबूल झाले पण त्यांचं म्हणणं होतं की डबा तिथे खाली पडला होता. मी म्हटलं, "तुम्ही तो उचलून ऑफिस मध्ये का ठेवला नाहीत? या गोष्टीने मला फार दु:ख झालं की माझ्या वर्गातल्या मुलांनी हे वाईट कृत्य करावं. तुम्ही डब्याला नव्हे, एका गरीब माणसाच्या  कष्टांना लाथ मारलीत. हा डबा खरेदी करायला जी रक्कम लागली असेल ती त्याने घाम गाळून मिळवली असेल त्या मेहनतीचा तुम्ही अपमान केलात. अरे, एखाद्या गोष्टीला चुकून पाय लागला तरी नमस्कार करायची आपली पद्धत! आणि इथे अन्नाला लाथा मारल्यात तुम्ही?   
     मला भीती या गोष्टीची वाटते की, आज एका निर्जीव गोष्टीचा असा छळ करणारे तुम्ही उद्या कॉलेजमध्ये एखाद्या सजीव व्यक्तीचाही गंमत म्हणून असा छळ करायला मागेपुढे बघणार नाहीत. तुम्ही रॅगिंग करणारे बनाल याचीच तर ही लक्षणे नाहीत? इतका दुष्टपणा आला कुठून? वर्षभर माझ्या हाताखाली शिकलेली मुलं असं दुष्कृत्य करत असतील तर तुमच्याऎवजी शिक्षा मीच घ्यायला हवी."
     माझं शेवटचं वाक्य ऎकल्यावर मुले हलली. सगळ्यांच्याच तोंडून 'सॉरी बाई, तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा करा पण असं नका म्हणू' असे पश्चात्तापाचे अस्सल उद्गार निघू लागले.
   मी म्हटलं, "तुम्हाला शिक्षा करून त्या बिचारीचा डबा परत मिळणार आहे का?" मुलं क्षणभर गप्प बसली मग एकजण म्हणाला ,
"आम्ही भरून देऊ तिचा डबा."
"कसा? पालकांकडून पॆसे घेऊन? मग तुमच्या चुकीची शिक्षा पालकांना झाली."
" नाही बाई आम्ही काम करू काही तरी."
मी म्हटलं ," ठीक आहे पण तुम्ही या सगळ्याची कल्पना आधी पालकांना दिली पाहिजे. त्यांची परवानगी घेऊनच पुढे काय ते करायचं. मान्य आहे.?" सगळ्यांनी माना डोलावल्या.
"आणि एक,आठवडाभर माझ्याशी बोलायचं नाही." त्यांचे चेहरे पार उतरले. ही शिक्षा कदाचित त्यांना मोठी वाटली असावी.
      तो शुक्रवारचा दिवस होता. मंगळवारी सकाळी त्या मुलीची आई मला भेटायला आली. सोमवारी मुलांनी त्या मुलीला तिच्या डब्यापेक्षा चांगला डबा छान प्रेझेंटेशन पेपरमध्ये गुंडाळून दिला होता. त्यासाठी पॆसे कुठून आणलेत असे ती त्यांना आज विचारायला आली होती. तिला कळले ते असे की त्यांच्यापॆकी एकाच्या काकांचे जवळच लहानसे घर होते. घराभोवती वाढलेले गवत काढून बाग स्वच्छ करायचे काम माळ्याऎवजी मुलांनी रविवारी केले होते. मुले १५-१६ वर्षांची होती त्यामुळे काही अडचण नव्हती. अल्युमिनियमचा डबा काही फारसा महाग नव्हता. तेवढे पॆसे सहज मिळवता आले होते त्यांना तास- दोन तास  काम केल्यावर.
       मी वर्गात गेले तर टेबलवर रंगीत कागदात गुंडाळून एक पेन ठेवले होते. "हे काय आहे" विचारल्यावर एकाने उभे राहून सांगितले की- "डबा घेऊन झाल्यावर पॆसे उरले. मग त्यातून आम्ही तुमच्यासाठी हे पेन आणले."
"माझ्यासाठी? कशाला? माझा काय संबंध? मला नको बाबा हे." मी असं झटकून टाकताच पाचांचे चेहरे गोरेमोरे झाले. 
एकजण उठून हळूच म्हणाला, "मॅम, तुम्ही या पेनने रोज प्रेजेंटी मांडा. तुमच्या हातात हे पेन बघून आम्हाला आमच्या चुकीची रोज आठवण येईल आणि परत अशी चूक आमच्या हातून होणार नाही." मग जरासा धीर चेपला पांडवांचा आणि दुसरा म्हणाला, "बाई, आता तुम्ही आमच्याशी बोलणार ना?"
     ते प्रामाणिक, भाबडे शब्द ऎकून मला भरून आले. मग "बाई, उघडा ना पेन." असा आग्रह सुरू झाला.सोनेरी रंगाच्या त्या पेनने मी रोज हजेरी मांडली. तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी सोनेरी होऊन गेला.
- संजीवनी बोकील

444. निस्वार्थ सेवा...

     वासु भाई आणि वीणा बेन गुजरातमधील एका शहरात राहतात. आज दोघंही प्रवासाला निघण्याची तयारी करीत होते. तीन दिवसांची सुट्टी मिळणार होती. व्यवसायनं ते दोघेही डॉक्टर आहेत.त्यामुळे खूप मोठी सुट्टी ते घेऊच शकत नाहीत. परंतु जेव्हा केव्हा त्यांना दोन तीन दिवसाची सवड मिळते तेव्हा तेव्हा ते त्या काळात दोन तीन दिवस कुठल्यातरी ठिकाणाला भेट देतातच. आज त्यांचा इंदौर- उज्जैनला भेट द्यायचा विचार होता. ते दोघेही जेव्हा एकत्र वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते तेव्हाच ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण होता होता त्यांच्या प्रेमाचा वटवृक्ष तयार झाला होता. वैद्यकिय शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या संमतीनं विवाह केला. आता विवाहाला दोन वर्षे झालेली आहेत, पण अजून तरी ते दोघांचे तीन झालेले नाहीत. म्हणूनच, फुरसत मिळाली की ते कुठेतरी प्रवासाला जाऊन येतात. दोघांनाही प्रवास करायला भारीच आवडतंही.
     विवाहानंतर दोघांनीही बँकेचं कर्ज घेऊन आपापली इस्पितळं थाटली आहेत.  वीणाबेन स्त्री-रोग विशेषज्ञ आहेत तर वासुभाई एम डी आहेत. दोघेही निष्णात डॉक्टर असल्यामुळे त्यांचा व्यवसाय चांगला सुरू आहे. तर त्यादिवशी ते आपल्या कारनं प्रवासाला निघाले. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. मध्यप्रदेशची सीमा अजूनही जवळपास दोनशे किलोमीटर दूर होती तेव्हाच पावसाला सुरुवात झाली होती. म.प्र. सीमेच्या ४० कि.मी. आधीचं एक छोटं शहर पार करण्यासाठी त्यांना बराच उशीर झाला. रस्त्यावरील चिखल आणि वाहनांची गर्दी यातुन कसाबसा रस्ता काढत ते मध्यप्रदेशच्या सीमेकडे जाऊ लागले. संध्याकाळचं जेवण मध्यप्रदेशातील एखाद्या गावामध्ये उरकण्याचा त्यांचा विचार होता परंतु पावसामुळे त्यांना उशीर होत होता. आता दुपारच्या चहाची वेळ झाली होती. मध्य प्रदेशातील ते शेवटचं छोटं शहर ओलांडून त्यांची कार चार ते पाच किलोमीटरवर पोहोचली असेल नसेल इतक्यात त्यांना रस्त्याच्या लगत असलेले एक छोटसं घर दिसलं त्या घराच्या बाहेर वेफर्सची पाकीटे लटकलेली होती. हे बहुधा एखादं छोटेखानी हॉटेल असावं असं त्यांना वाटलं. वासुभाईनं त्या ठिकाणी आपली कार थांबवली. ते दुकानावर गेले परंतु समोर कुणीच नव्हतं. त्यांनी आवाज दिला. घरातून एक महिला बाहेर आली. तिनं विचारलं, "काय हवंय भाऊ आपल्याला ?"
वासुभाईनं वेफर्सची दोन पाकिटं घेतली आणि ते म्हणाले,  "ताई, जरा दोन कप चहा बनवून देता का? जरा लवकर हं, आम्हाला अजून बरंच दूर जायचं आहे." ती हो म्हणाली.
पाकीटं घेऊन वासूभाई कार मध्ये जाऊन बसले. दोघांनीही वेफर्सचाच नाष्टा केला. अजून पर्यंत चहा आला नव्हता. दोघंही कार मधून बाहेर निघून दुकानासमोर ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसले. 
वासुभाईनं फिरून आवाज दिला.
इतक्यात घरातील ती महिला आतून बाहेर आली आणि म्हणाली, "माफ करा हं! परसात तुळशी आणायला गेले होते. तुळशीची पानं आणायला वेळ लागला. आता लगेच चहा बनवून देते."
काही वेळानंतर एका प्लेटमध्ये दोन मळकट कप घेऊन त्यातून गरमागरम चहा घेऊन ती बाहेर आली. ते मळके कप बघून वासूभाई एकदम अपसेट झाले आणि आता त्यावर ते काही बोलणार इतक्यात वीणाबेननं वासूभाईंच्या हातावर अलगद आपला हात ठेवला आणि काहीही न बोलण्याचा त्यांना इशारा केला.
दोघांनी चहाचे कप आपल्या हाती घेतले चहाला मस्त आल्याचा आणि तुळशीच्या पानांचा सुगंध येत होता. दोघांनीही चहाचा एक घोट घेतला. इतका स्वादिष्ट आणि सुगंधित चहा ते दोघेही जीवनात पहिल्यांदाच पित होते. त्यांच्या मनाची अस्वस्थता कुठल्या कुठे पळून गेली.
चहा पिऊन झाल्यावर वासू बाईंनी त्या महिलेला विचारलं, "किती पैसे झाले?" 
महिला म्हणाली, "वीस रुपये"
वासुभाईनं शंभराची नोट पुढे केली.
महिला म्हणाली, "भाऊ सुट्टे पैसे नाहीत. कृपया वीस रुपये सुट्टे द्याना." 
वासुभाईनं वीस रुपयांची नोट देऊ केली. 
महिलेनं शंभराची नोट परत केली. 
वासुभाई म्हणाले, "आम्ही तर वेफर्सची पाकीटंही घेतली आहेत !
महिला म्हणाली, "वीस रुपये त्याचेच झाले. चहाचे पैसे नाही घेतले." 
"अरे! चहाचे पैसे कां नाही घेतलेत ?"
ती म्हणाली, "आम्ही चहा विकत नाही. हे हॉटेल नाही." 
"मग आपण चहा कशाला बनवून दिलांत ?"
"आपण अतिथि आहात. आपण चहा मागितला. आमच्यापाशी दूधही नव्हतं. आमच्या छोट्या मुलाकरता थोडं दूध वेगळं काढून ठेवलं होतं. परंतु आता तुम्हाला नाही कसं म्हणायचं? म्हणून मग मुलासाठी बाजूला काढून ठेवलेल्या दुधाचा चहा तुम्हाला करून दिला."
"मग आता त्या छोट्या मुलाला काय पाजणार ?"
"एक दिवस दूध प्यायला मिळालं नाही म्हणून कांही तो मरून नाही जाणार. याचे वडील आजारी आहेत. ते शहरात जाऊन दूध आणू शकले असते. पण त्यांना कालपासुन ताप आहे. आज जर ते बरे झाले तर उद्या सकाळी गावात जाऊन ते दूध घेऊन येतील." 
वासुभाई त्या महिलेचे हे बोलणं ऐकून एकदम गप्प झाले. त्यांच्या मनात विचार आला, 'या महिलेनं हे तिचं हॉटेल नसून घर असतानासुद्धा आपल्या मुलासाठी काढून ठेवलेल्या दुधाचा चहा बनवून दिला आणि ते सुद्धा केवळ एवढ्यासाठीच की मी मागितला म्हणून, आणि मी अतिथी आहे आणि अतिथीनं कांही मागितलं आहे असं समजून! संस्कार आणि सभ्यता यामध्ये ही महिला माझ्या खूप पुढे आहे.'
ते त्या महिलेला म्हणाले, "आम्ही दोघेही डॉक्टर आहोत. आपले पति कुठे आहेत?"
महिला त्यांना घराच्या आत घेऊन गेली घरातलं दारिद्र्य बघता क्षणीच लक्षात येण्यासारखं होतं.
आंत एका खाटेवर एक गृहस्थ झोपून होता. फार हडकुळा दिसत होता.
वासुभाईनं जाऊन त्याच्या कपाळावर आपला हात ठेवला. त्याचं कपाळ बरंच गरम वाटत होतं. त्या गरम कपाळावर ठेवलेला त्यांचा हातही गरम झाला होता. थंडी आणि तापामुळं त्या गृहस्थाचं सर्वांग थरथरत होतं. 
वासुभाई परत आपल्या कारपाशी गेले. कार मधून त्यांनी आपली औषधाची बॅग उचलली. त्यातून २, ३ औषधी गोळ्या काढून त्यांनी त्या आजारी माणसाला पाण्यासोबत घ्यायला सांगितल्या आणि ते त्याला म्हणाले, "केवळ या गोळ्यांनी हा रोग बरा होण्यासारखा नाही. मी हा असाच मागल्या शहरात जाऊन इंजेक्शन आणि सलाईनची बाटली घेऊन येतो."
वीणाबेनला रोग्यापाशी बसायला सांगून ते गाडी घेऊन शहरात गेले. तिथून अर्ध्या तासामध्ये सलाईनची बाटली आणि इंजेक्शन्स घेऊन ते परत आले. सोबतच त्यांनी दुधाच्या पिशव्याही आणल्या होत्या.
त्यांनी पहिल्यांदा त्या आजारी माणसाला इंजेक्शन दिलं, सलाईनची बाटली वर भिंतीला लटकवून त्याला सलाइन लावलं. सलाईनची बाटली संपेपर्यंत ते दोघेही डॉक्टर पती-पत्नी त्याच्या उशाशी बसून होते. 
त्या महिलेनं पुन्हा एकदा तुळशी आणि आलं घालून केलेला चहा दोघांनाही प्यायला दिला. दोघांनीही चहा घेतला आणि चांगला चहा पाजल्याबद्दल त्या महिलेचे फिरून एकदा आभार मानले. 
जेव्हा आणखी कांही वेळानंतर त्या आजारी माणसाची तब्येत थोडी सुधरली तेव्ह मग डाॅक्टरद्वय आपल्या पुढील प्रवासाला रवाना झाले.  
     तीन दिवस इंदौर-उज्जैनला राहून जेव्हा ते परतले, तेव्हा येतांना त्यांनी त्या महिलेच्या मुलासाठी ढिगभर खेळणी आणि दुधाची पाकिटं आणली. त्यांनी त्याच दुकानासमोर आपली गाडी उभी केली.
बाहेरूनच त्यांनी त्या महिलेला आवाज दिला. आवाज ऐकून ती दोघंही नवराबायको घराबाहेर आले. समोरच्या डॉक्टरद्वयांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. तो आजारी माणूस सांगू लागला, "डाॅक्टर, तुम्ही दिलेल्या औषधांनी मला लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच बरं वाटू लागलं होतं."
वासुभाईंनी त्याच्या लहान मुलाला खेळणी दिली. दुधाची पाकीटं त्या महिलेच्या हवाली केली.
फिरून एकदा, तशाच आलं, तुळशीपानं घातलेल्या चहानं त्या डॉक्टरांचं स्वागत झालं. आता दोन्ही कुटुंबात आपलेपणा निर्माण झाला होता. 
वासुभाईंनी आपलं व्हिजिटिंग कार्ड त्यांच्या हाती ठेवलं आणि म्हणाले, "तुमचं जेव्हा केव्हा आमच्या गावी येणं होईल तेव्हा आमच्याकडे नक्की या." त्यानंतर ते दोघंही आपल्या गांवी रवाना झाले.
शहरात परतल्यावर वासुभाईं त्या महिलेची गोष्ट विसरले नाहीत. त्यांनी आपल्या मनाशीच एक निर्धार केला. 
आपल्या इस्पितळातील रिसेप्शनवर बसलेल्या व्यक्तिला ते म्हणाले की येथून पुढे आपल्या इस्पितळात जे कुणी रोगी येतील त्यांचं नांव तेवढं रजिस्टरवर नोंदवायचं, त्यांच्याकडून फी वसूल करायची नाही. फी मी स्वतःच त्यांच्याकडून घेईन.
आणि मग त्या दिवसापासून जेव्हा पेशंट त्यांच्या दवाखान्यात येत ते गरीब असतील तर त्यांच्याकडून डॉक्टर फी घेत नसत. केवळ ऐपत असलेल्या पेशंट्सकडूनच ते फी घेऊ लागले.
हळू हळू शहरात त्यांची भरपूर प्रसिद्धी झाली. 
दुसर्‍या डॉक्टरांच्या कानावर ही प्रसिद्धी पडली तेव्हा यामुळे आपली प्रॅक्टिस कमी होईल आणि लोक आपली निंदा करू लागतील अशी त्यांना भिती वाटू लागली. त्यांनी असोसिएशनच्या अध्यक्षांना हे सांगितलं :
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वासुभाईंना भेटायला आले आणि ते त्यांना म्हणाले, "आपण हे सारं कशासाठी करीत आहात?"
तेव्हा वासुभाईंनी जे उत्तर दिलं ते ऐकून असोसिएशनचे अध्यक्ष देखिल प्रभावित झाले.
वासुभाई म्हणाले, "मी माझ्या जीवनातील प्रत्येक परीक्षेत मेरिटमध्ये पहिल्या क्रमांकाने पास होत आलेलो आहे; एम.बी.बी.एस. मध्येही, एम.डी. मध्येही गोल्ड मेडलिस्ट होतो परंतु सभ्यता, संस्कार आणि अतिथि सेवा यांत ती खूप गरीब असलेली गांवातली महिला माझ्या समोर निघून गेली आहे. मग मी कसा मागे राहू ? म्हणूनच मी अतिथि-सेवा आणि मानव-सेवा यांतही गोल्ड मेडलिस्ट होणारच. तेवढ्याच साठी मी ही सेवा सुरू केली आहे. आणि मी तर म्हणतो की आपला वैद्यकीय व्यवसाय हा मानव सेवेचाच व्यवसाय आहे. सगळ्या डॉक्टर लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी सेवा भावनेनं आपला व्यवसाय करावा. गरीबांची नि:शुल्क सेवा करावी, उपचार करावा. हा व्यवसाय केवळ कमाईचा व्यवसाय होऊन रहायला नको. भगवंतानं आपल्याला मानव-सेवेची संधी दिलेली आहे."
असोसिएशनच्या अध्यक्षांनी वासुभाईंना प्रणाम केला आणि त्यांना धन्यवाद देत ते म्हणाले की मीही यापुढे याच भावनेनं माझा व्यवसाय चालवणार आहे.

443. तुमच्या जावयाचं काळीज...

जावई : गुड मॉर्निंग पप्पा.  
सासरे : गुड मॉर्निंग जावईबापू.   
जावई : डिस्टर्ब तर नाही ना केलं?
सासरे : अहो बरं झालं, तुम्हीच कॉल केला.  
जावई : म्हणजे?
सासरे : धोंड्याचा महिना सुरु झालाय ना. 
जावई : मग?
सासरे : म्हणून मग मीच आमंत्रण देण्यासाठी, तुम्हाला कॉल करणार होतो.  
जावई : ओके. 
सासरे : मग कधी येताय?  
जावई : कुठे?
सासरे : आमच्याकडे धोंडे खायला. 
जावई : त्यासंदर्भातच बोलायचं आहे. 
सासरे : आमचं काही चुकलं तर नाही?
जावई : नाही ओ पप्पा. 
सासरे : मग?
जावई : काही प्रश्न विचारू?
सासरे : काय झालंय?
जावई : सहजच. 
सासरे : विचारा. 
जावई : तुम्हाला एकूण मुली किती?
सासरे : मस्करी करताय का?
जावई : सांगा तर.. 
सासरे : मला एकूण ३ मुली.  
जावई : १ मोठी आणि २ जुळ्या. 
सासरे : बरोबर.  
जावई : मुली झाल्यानंतर तुम्ही कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली. 
सासरे : हो. 
जावई : तुमच्या सर्वात मोठ्या मुलीचं लग्न किती वर्षांपूर्वी झालं? 
सासरे : ९ वर्षांपुवी. 
जावई : आणि नंतरच्या जुळ्या मुलींचं?
सासरे : तुमच्या लग्नाला ५ वर्षे झाली ना? 
जावई : बरोबर.  
सासरे : त्याचं काय?
जावई : माझ्या बहिणीचं लग्न मागच्या वर्षी झालं. 
सासरे : आम्ही मानपानात कमी पडलो का?
जावई : तसं नाहीये काही.  
सासरे : मग?
जावई : माझी बहीण वर्षभरात ९ वेळा माहेरी आली.  
सासरे : ओके.  
जावई : राखीपौर्णिमा, भाऊबीज, धोंडे, वटपौर्णिमा आणि इतर निमित्ताने..   
सासरे : मुलीचा हक्कच तो.  
जावई : पप्पा तुम्हाला तर ठाऊकच आहे. 
सासरे : काय?
जावई : मी लहान असतानाच माझे वडील.. 
सासरे : हो. म्हणूनच मी तुम्हाला अगदी माझ्या मुलासारखं समजतो.  
जावई : लग्न झाल्यापासून तुम्ही मला मार्गदर्शन करत आलात. 
सासरे : माझी जबाबदारीच ती. 
जावई : आणखी किती जबाबदाऱ्या निभावणार पप्पा?
सासरे : समजलो नाही बेटा. 
जावई : तुम्ही तुमच्या तिन्ही मुलींना ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवलं.  
सासरे : स्वावलंबी व्हावं म्हणून. 
जावई : त्यांच्या शिक्षणावर तुम्ही लाखो रुपये खर्च केले.  
सासरे : हो.  
जावई : तिघींची लग्न अगदी थाटामाटात लावून दिली. 
सासरे : हो. 
जावई : तिघींची बाळंतपणं माहेरी करण्याचा हट्ट धरला.  
सासरे : हो.  
जावई : मी काल बसल्याबसल्या हिशोब केलाय पप्पा. 
सासरे : कसला?
जावई : मागच्या ५ वर्षांमध्ये, माझी बायको जेव्हा केव्हा माहेरी आली.. 
सासरे : त्याचं काय?
जावई : तुम्ही दरवेळी तिला साडी घेतली. 
सासरे : तिचे लाड मीच करणार..
जावई : आतापर्यंत माझ्या बायकोला तुम्ही अंदाजे महागड्या ३४ साड्या घेतल्या आहेत.   
सासरे : त्याचं आज काय?
जावई : लग्न झाल्यापासून तुम्ही आम्हाला १२ तोळ्याचे दागिने केलेत. 
सासरे : जावयाचा मानसन्मान आमचं कर्तव्य..    
जावई : तुम्ही जेवढा खर्च आमच्या दोघांवर केलात, तेवढाच खर्च..      
सासरे : तेवढाच खर्च?
जावई : तुम्ही तुमच्या इतर मुली व जावयांवरही केलात. 
सासरे : कारण माझ्यासाठी तुम्ही सर्वजण सारखे. 
जावई : जावयाच्या घरचा कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम किंवा विवाह सोहळा असेल तर..   
सासरे : तर?
जावई : तुम्ही उभ्या पोषाखाने आमचा सन्मान करता.      
सासरे : हो. 
जावई : तसाच सन्मान तुम्ही तुमच्या इतर मुलींचा व जावयांचाही करता. 
सासरे : हो. 
जावई : त्याहिशोबाने दरवर्षी तुम्ही लाखो रुपये आमच्यावर खर्च करता.   
सासरे : हो. 
जावई : नातवंड्यांच्या गळ्यात सोन्याची चेन, वाढदिवसाला ड्रेस अन् सायकली..      
सासरे : जावईबापू..  
©️अक्षय भिंगारदिवे
जावई : पप्पा माझ्या लग्नाला ५ वर्षे झाली ना?
सासरे : हो. 
जावई : मुलींना लग्नात तुम्ही स्मार्ट एलईडी टीव्ही दिलेत.
सासरे : हो. 
जावई : घरी मात्र अजूनही जुनाच कलर टीव्ही वापरता. 
सासरे : चांगला चाललाय तो. 
जावई : भिंतींचे पोपडे पडायला सुरुवात झालेली असूनही, तुम्ही स्वतःच्या घराला रंग द्यायला तयार नाहीत.  
सासरे : करील करील म्हणतो अन् राहून जातं. 
जावई : पप्पा तुमचा फ्रिज मागच्या वर्षीपासून बंद आहे. 
सासरे : आम्ही दोघेच म्हाताराम्हातारी घरी असल्याने..  
जावई : स्वतःच्या मुली, जावई अन् नातवंडांवर लाखो रुपये खर्च करणारे तुम्ही.. 
सासरे : काय?
जावई : अजूनही जुनीच स्कुटर वापरता? 
सासरे : ती माझी आवडती आहे ना..  
जावई : पप्पा मागच्यावेळी आपण दोघे मार्केटमध्ये गेलो असताना, ती अचानक बंद पडली होती.   
सासरे : कधीतरी.. 
जावई : जावयांना ब्रेसलेट आणि घड्याळं गिफ्ट देणारे तुम्ही.. 
सासरे : काय?
जावई : स्वतः मात्र फुटलेल्या काचेचं घड्याळ वापरता.
सासरे : आता बस्स करा.   
जावई : दरवर्षी मला कपडे खरेदी करायला कोऱ्या करकरीत नोटा देता.   
सासरे : जावयाचा अभिमान वाटतो ना..   
जावई : आणि स्वतः मात्र जीर्ण झालेले कपडे वापरता. 
सासरे : बेटा थांब आता. 
जावई : माझ्या बहिणीला कधीच मी बापाची कमी जाणवू दिली नाही.  
सासरे : पाहिलंय ते मी.. 
जावई : म्हणूनच तर मागच्या वर्षभरात मला जाणवलं. 
सासरे : काय?
जावई : मुलीचा बाप होणं सोपं नसतं. 
सासरे : खरं आहे.   
जावई : लाडाकोडात वाढवलेल्या व जीवापाड जपलेल्या पोरीला तुम्ही माझ्या स्वाधीन केलं.  
सासरे : हो. 
जावई : ती आज प्रत्येक संकटात माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत उभी असते.  
सासरे : संस्कार कमी पडू नाही दिले मी..  
जावई : मग तरीही..   
सासरे : काय?
जावई : मी तुमच्याकडून मानपानाची अपेक्षा ठेवायला हवी?
सासरे : अहो..  
जावई : स्वतःच्या शरीराचा अंश दिला तुम्ही मला. तुमचे ते उपकार तर आयुष्यभर फिटणार नाहीत. 
सासरे : असं नका बोलू.  
जावई : पप्पा म्हणूनच मी ठरवलं आहे. 
सासरे : काय?
जावई : आजपर्यंत तुमची झाली ती पिळवणूक खूप झाली. 
सासरे : म्हणजे?
जावई : आता तुम्ही आमच्याकडे येऊन मानसन्मान स्वीकारायचा. 
सासरे : अहो पण.. 
जावई : पिढ्यानपिढ्या सुरु होती, ती परंपरा आता पुरे झाली. 
सासरे : का?
जावई : कारण आता मुली शिकून सवरून स्वावलंबी झाल्या आहेत. 
सासरे : हो. 
जावई : म्हणूनच संसाराच्या अर्ध्या जबाबदाऱ्या स्वेच्छेने त्या स्वतःच्या खांद्यावर घेतात.  
सासरे : सहमत. 
जावई : मोबाईलवरचा मेसेज चेक करा.  
सासरे : का बरं?
जावई : तुम्हाला मी ऑनलाईन १० हजार रुपये पाठवले आहेत.   
सासरे : कशाला?
जावई : तुम्ही नवे कपडे आणि सासूबाईंसाठी नवी साडी खरेदी करा.   
सासरे : अहो पण.. 
जावई : मला मुलगा समजता ना?  
सासरे : हो.  
जावई : मग यावेळी धोंडे खायला तुम्ही आमच्याकडे यायचं.    
सासरे : पण..  
जावई : यानिमित्ताने कळू द्या सगळ्या समाजाला.  
सासरे : काय?
जावई : धोंड्याचा महिना जरी सुरु असला, तरी..  
सासरे : तरी?
जावई : तुमच्या जावयाचं काळीज धोंडा नाही. 
©️अक्षय भिंगारदिवे, 
२५ जुलै २०२३

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

442. महाभारताच्या युद्धाचा खरा अर्थ...

       महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.
‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ?
मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ?'
याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.
त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'
“ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!
"मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!" 
वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,
 "काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?" 
संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.
" महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."
वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
"महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"
"नक्कीच, ऐक तर," 
वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.
"पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.
संजयाने  मानेने नकार दर्शवला.
"कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा  प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"
संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
"तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"  
वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
"भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."
संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"
वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले, 
" याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. 
तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."
संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"
"वा!" 
वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"
"कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो  सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'
संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.
पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून...!

गुरुवार, २७ जुलै, २०२३

441. देव पाहतो आहे...

         एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?
ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. 
मी म्हटले, "माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही."
तेव्हा ते म्हणाले, "बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे."
मी चिडत म्हटलं, "ही काय मस्करी आहे?"  "ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस.  तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!"
काही बोलणार इतक्यात मागून आई आली. "एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी". आई ला काही तो दिसला नाही.
आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो. 
"अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस?" एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर  आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे... 
बस् मी जिथं असेंन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्या सोबत आले... थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे.....
मी म्हटले " प्रभू , इथे तरी एकट्याला जाऊदे."
आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता. 
ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले "तू ये! तुझे काम होईल आज."
ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्या बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे.  पण त्या दिवशी तसे काहीं न बोलता "काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम," असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.
आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.
संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो,
"भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा." प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते. 
घरी पोचलो. 
रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. "प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या." मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. 
जेवण झाल्यानंतर आई म्हणाली," आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?"
मी म्हटले, "आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला.  माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!"
थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले... झोपी जाण्यासाठी... प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले,"आज तुला झोप येण्यासाठी, संगीत किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही."  
खरोखर, मला गाढ झोप लागली.
ज्या दिवशी आपणास कळेल की,  'तो' पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.

440. निरपेक्षता...

        तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही आयुष्यात होता. प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले. राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही, याची पूर्ण जाणीव त्याला होती तसेच युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती. पण हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !! एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्याभिषेक झाल्यावर अर्जुनाच्याही आयुष्यात तो परत कधीच आला नाही. अत्यंत उत्कटपणे नाती निभावूनही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला... परत कधीच परतून न येण्यासाठी !! त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला. राधेबरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जिवापाड जपले यात त्याला लोकापवादाला तोंड द्यावे लागल्यावरही  राधेवर मनापासून प्रेम केल्याची खंत त्याला कधीच नव्हती, पण तरीही त्याचे बासरीचे सूर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही. ज्या उत्कटतेने त्याने राधे साठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार, अलवार अनुभव दिला तसाच अर्जुनाबरोबर कौरवांच्या केलेल्या युद्धात कुरुक्षेत्रावर आपल्या अफलातून डावपेच आणि कूट नीतीने गाजवून सोडले. ज्या आपुलकीने राधेला तो जीवन का आणि कसे जगायचे, हे कोमल होऊन सांगत असे त्याच आपुलकीने अर्जुनाला शत्रूस कसे आणि का संपवायचे हेही सांगितले, एकापेक्षा एक अभेद्य, अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरच्या ढगात पाठवले जे त्याचे शत्रू कधीच नव्हते पण जोडलेले नाते जपताना त्याने 'हे तुझे, हे माझे' याचा लीलया त्याग केला होता. ज्या हळुवारपणे त्याची बोटे बासरीवर अलगद फिरत असताना जे मधुर स्वर निनादत... त्याच हळूवारपणे त्याची बोटे सुदर्शन चक्रंही बिनदिक्कत चालवत असत. हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधीच सोडली नाही. कारण तो कृष्ण होता...
        "संभवामि युगे युगे" असे त्याचे स्वतःचेच वचन आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता... आहे आणि     राहीलही. गरज आहे ती आपल्याच आयुष्यात असलेल्या "त्या कृष्णाला" ओळखण्याची...ते जर तुम्ही ओळखू शकलात तर तुमचं आयुष्य नक्कीच कृष्णाची बासरी होईल. तो तुम्हाला त्याच्या बासरी इतकच प्रेमानं सांभाळेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे..

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

439. आरतीचे महत्व...

        आपण सगळेच वेगवेगळ्या प्रसंगी देवाचं रूप पाहत, हातात टाळ घेत किंवा टाळ्या वाजवत देवाची मनोभावे आरती केली असेलच. पण तुम्हाला माहित आहे का, आरतीचं नेमकं महत्त्व काय? आणि आरतीमध्ये स्वतः भोवती का फिरतात? नाही ना ! आपल्या पुराणात मात्र याविषयी विस्तृत माहिती दिली गेली आहे. चला तर मग आजच्या लेखात आरतीविषयी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.
          हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती केली जाते. स्कंद पुराणात आरतीचं महत्त्व सांगितलं गेलं आहे की, प्रत्येक व्यक्तीला सगळेच धार्मिक विधी, मंत्र, येतातच असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी, मंत्र, श्लोक इ. माहीत नसेल त्यांनी केवळ देवाची आरती केली तरीही देवाची त्याच्यावर कृपादृष्टी राहते. इतर विधीनंतर ज्या प्रकारे देव प्रसन्न होतो तसाच केवळ आरती केल्यानेही देव पावतो. आरतीला पुराणात आरात्रिक आणि नीराजन अशा दोन नावांनी संबोधलं गेलं आहे. आरती ही साधारण एखाद्या धार्मिक कार्यानंतर केली जाते. त्यामुळे पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात काही त्रुटी झाली असेल, काही विधी राहिल्या असतील तर आरतीमुळे त्या त्रुटी भरून निघतात. देवाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पंच- प्राणांना संपूर्ण एकाग्रतेने आरतीच्या तालात सुरात स्वतःला समरस करावं लागतं. आरती करताना आरतीच्या ताटात असणारा दिवा हा त्या व्यक्तीच्या आत्म्याचं प्रतीक असल्याचंही पुराणात नमूद केलं आहे त्यामुळे आरती करताना तो दिवा अखंड तेवत राहणं आणि तो पंचमुखी असणंही महत्त्वाचं ठरतं. आरती करताना आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ही देवाची स्तुती असते त्यामुळे ते शब्द अत्यंत भावगर्भतेने आपल्या मुखातून यायला हवे तरच आरतीचा लाभ आपल्याला मिळतो.
         आरती दरम्यान आपण सगळेच स्वतः भोवती गोल प्रदक्षिणा का घालतो? याचं स्कंद पुराणात महत्त्व सांगितलं आहे. ते म्हणजे आपल्याला जीवन प्रदान करण्यासाठी, रोज नवा दिवस दिसण्यासाठी पुथ्वीचं खूप मोठं कार्य आहे. तिच्या अस्तित्वामुळे आपल्याला जीवन मिळालं आहे. त्यामुळे तिच्या प्रति कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी स्वतः भोवती गोल फिरणं म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासारखचं आहे. त्यामुळे आरती दरम्यान स्वतःभोवती गोल फिरणं हे पूर्वपार चालत आलं आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आरती कशी असावी या विषयी देखील विस्तृत माहिती पुराणात दिली गेली आहे. आरती करताना आपल्याला हातातलं आरतीचं ताट केवळ गोल फिरवायचं नाही तर ते फिरवताना ॐ अशी आकृती निर्माण होईल असं ताट फिरवायचं आहे. म्हणजेच देवाच्या चरणापाशी चार वेळा, देवाच्या छातीपाशी दोन वेळा आणि मुखाजवळ एक वेळा. अशा पद्धतीने ॐ ही आकृती निर्माण होते हे पुराणात नमूद केलं आहे. आपण आरती करताना साधारण दिवा किंवा धूप इ. ने आरती करतो मात्र आरती ही चार प्रकारे केली जाते. आरतीचा पहिला प्रकार म्हणजे जल आरती, दुसरा दीप आरती, तिसरा पुष्प आरती आणि शेवटी कापूर, अगरबत्ती किंवा धुपाची आरती अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण आरती करु शकतो.
पुराणात आरती करण्यासाठी शुभ अशा ५ वेळा संगीतल्या आहेत.
● पहिली आरती जी सूर्योदया पूर्वी आपण केली पाहिजे तिला मंगल आरती असं म्हंटलं जातं.
● दुसरी आहे शृंगार आरती जी शक्यतो सूर्य डोक्यावर आल्यानंतर केली जाते.
● तिसरी आरती ही दुपारी देवाला नैवेद्य दाखवताना केली जाते.
● चौथी आहे संध्या आरती जी संध्याकाळी केली जाते.
● पाचवी आहे शयन आरती जी रात्री देवाच्या निद्रेसाठी केली जाते.
          रोज देवाची आरती केल्याचे अनेक फायदे ही आहेत.देवाची आरती केल्याने आपल्या भोवतालचं वातावरण शुद्ध होतं. आरतीमुळे देव जागृत होऊन त्याचा आपल्या भोवती वावर असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आरतीच्या गायनाने, वादयांच्या तालाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आरती केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होऊन तो पवित्र होतो. त्याच्या मनातील राग, द्वेष कमी होऊन त्याच्या भावना शुद्ध होतात. आरती करताना वापरलेल्या कापूरमुळे भोवतालचे सूक्ष्म कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध होतं. श्वासाद्वारे ही हवा आपल्या शरीरात गेल्याने आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि आपल्याला शांतता प्रदान होते. तर हे आहे आरतीचं महत्त्व आणि तिचे आपल्याला होणारे फायदे

बुधवार, १९ जुलै, २०२३

438. संकटांची मालिका...

    एका लहानशा गावातील एका झाडावर खुप सारे कावळे बसले होते. पावसाळ्याचे दिवस होते. बाहेरील वातावरण ढगाने भरून आले होते.अगदी दुपारच्या वेळेस अंधार झाला होता. केव्हा पाऊस पडणे सुरू होईल हे सांगता येत नव्हते. त्यामुळे सर्वच पशुपक्षी आपापल्या घरट्यात जाऊन बसले होते. पण जागेच्या अभावी  सर्वच कावळे आपल्याला सुरक्षित जागा मिळावी यासाठी जोर जोराने ओरडत एकमेकांशी भांडत होते. तेवढ्यात एक मैना उडत उडत आली अन् त्याच झाडावरील एका फांदीवर जाऊन बसली. या मैनेला झाडावर बसलेली पाहून सर्वच कावळे आपले भांडणं विसरून एकत्रितपणे मैनेवर धाऊन गेले. बिचारी मैना या कावळ्यांना विनवणी करत म्हणाली," मला आजच्या दिवस राहू द्या.मी माझ्या घरट्याचा रस्ता विसरली आहे. " पण कावळे काही ऐकायला तयार नव्हते. कावळ्यांनी मैनेची विनंती अमान्य केल्याने आता ती पण  हट्टाने पेटून उठली. पण ती जोरात न ओरडता  म्हणाली," झाडे तर ईश्वराचीच देणं आहे. मी तुमच्या  बहिणीसारखी आहे. कृपया आजच्या दिवस मला राहू द्या." तरी पण कावळे ऐकायला तयार नव्हते.त्यांचे म्हणणे होते," आम्हाला तुझ्यासारखी बहीण नको. तु देवाचे नावं घेत आहे. त्यामुळे तु आता देवाकडेच जागा मागायला जा. ईश्वरच तुझी व्यवस्था करेल. तु इथून गेली नाही तर आम्ही सर्व जण तुटून पडू अन् तुझा जीव घेऊ." कावळे नेहमीच एकमेकांशी जोरजोरात भांडत असतात. पण दुसऱ्या कोणत्याही पक्ष्या विरूध्द लढा  द्यायचा असल्यास ते सर्व एकत्रितपणे लढा देतात. हे त्याचे विशेष आहे.
    कावळे काही ऐकायला तयार नाही हे लक्षात येताच मैनाने अगदी जवळच काही अंतरावर असलेल्या एका झाडावर आपले बस्तान बसवले. अन् काही वेळातच जोरात पाऊस सुरू झाला. सोबत गारा पडायला लागल्या. त्या गारा देखील मोठ्या आकाराच्या होत्या. कावळे पण या पावसामुळे आसरा शोधत होते. पण तो काही मिळत नव्हता. इकडे मैना ज्या झाडावर जाऊन बसली होती त्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली. त्यामुळे आपोआपच एक आडोसा तयार झाला अन् मैना या आडोसामध्ये जाऊन बसली. रात्रभर जोरात पाऊस असूनही त्यापासून आणि गारापासून मैना सुरक्षित राहिली.
     सकाळ झाली. पाऊस थांबला होता. काही वेळात ती आपल्या घरी जायला निघाली . काही अंतरावरच अतिशय विचित्र दृश्य दिसले.रात्रीच्या पावसाने तसेच गाऱ्यांच्या माऱ्याने बहूतेक कावळे मरून पडलेले होते. हे दृश्य पाहून मैनेला फार दुःख झाले. या कावळ्यांपैकी एक कावळा  मरण्याच्या दारात उभा असतांना मैनाला विचारले," मैना तु जिवंत कशी राहिली? यावर मैनाने उत्तर दिले," मी ज्या झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली. अन् त्यानेच मला या संकटातून वाचविले. दुःखात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो हा माझा विश्वास सार्थ ठरला."
बोध
 मनुष्याच्या आयुष्यात एकदा का संकटांची मालिका सुरू झाली की ती संपता संपत नाही. परंतू या संकटातून सुटका करून घेण्यासाठी जसे मनुष्याच्या प्रयत्नांची गरज आहे तशीच त्याला ईश्वराचे सुध्दा कळतन कळत सहकार्य मिळत असते. तात्पर्य काय की, ईश्वरच आपल्याला संकटातून सुटका करू शकतो. ती एक फार मोठी शक्ती आहे. अनेक अडचणींवर मात करू शकतो.अप्रत्यक्षपणे मदतच होते. फक्त आपला त्यावर विश्वास असायला हवा.

सोमवार, १७ जुलै, २०२३

437. इतरांचे वाईट करण्याचा नादात...

 "काही लोक इतरांचे वाईट करण्याचा नादात स्वतःचेही भले करू शकत नाहीत. एका महिलेला यमदेव भेटले परंतु ती त्यांना ओळखू शकली नाही. तिने यमदेवाला पिण्यासाठी पाणी दिले. 
त्यानंतर यमदेव महिलेला म्हणाले-
 मी तुझे प्राण घेण्यासाठी आलो आहे परंतु तू मला पिण्यासाठी पाणी दिल्यामुळे तुझ्यावर मी प्रसन्न आहे.  मी तुला तुझे भाग्य बदलण्याची एक संधी देतो. एवढे बोलून यमदेवाने एक पुस्तक महिलेला दिले आणि सांगितले यामध्ये तुझ्या नावाचेही एक पान आहे. त्याठिकाणी तू तुला पाहिजे ते लिहू शकतेस. तू जे काही लिहशील त्याप्रमाणे सर्वकाही घडेल. महिलेने पुस्तक हातामध्ये घेतले आणि पुस्तक उघडताच त्यामध्ये लिहिले होते की, तुझ्या मैत्रिणीला खजिना मिळणार आहे. महिलेने तेथे लिहिले की तिला खजिना मिळू नये. पुढचे पान उलटल्यानंतर त्यावर लिहिले होते की, तुझ्या शेजारणीचा पती राजाचा मंत्री होणार आहे.  महिलेने तेथे लिहिले की, तो मंत्री बनू नये. - काही वेळाने तिला तिच्या नावाचे पान दिसले. ती स्वतःसाठी चांगले-चांगले लिहण्याचा विचार करू लागली परंतु ती लिहिण्याची सुरुवात करणार तेवढ्यात यमदेवाने तिच्याकडून पुस्तक काढून घेतले.
कथेची शिकवण
       अनेक लोक इतरांचे वाईट करण्याचा विचार करतात आणि संधी मिळाल्यानंतर तसे करतातही. या नादामध्ये ते अनेकवेळा स्वतःचे भले करून घेण्याचीही संधी सोडून देतात. आपण इतरांचे भले करू शकलो नाहीत तर कमीत कमी वाईटही करू नये. त्या महिलेने आपल्या मैत्रीण आणि शेजारणीविषयी वाईट विचार केला नसता तर स्वतःचे भाग्य बदलू शकत होती. परंतु पहिले तिने त्यांचे वाईट करण्याचा विचार केला आणि स्वतःचे प्राणही वाचवू शकली नाही."

436. परिपूर्ण अशी कोणतीही गोष्ट नाही

        नोकरी करणाऱ्या स्त्रीची निवड करताना ती घराची काळजी घेऊ शकत नाही हे स्वीकारावे लागेल.
 तुमची काळजी घेणारी आणि तुमचे घर पूर्णपणे सांभाळणारी गृहिणी तुम्ही निवडली असेल, तर ती पैसे कमवत नाही हे तुम्हाला मान्य करावे लागेल.
 जर तुम्ही विनम्र स्त्री निवडली तर ती तुमच्यावर अवलंबून आहे हे तुम्ही स्वीकारले पाहिजे आणि तुम्हाला तिचे जीवन सुनिश्चित करावे लागेल.
 जर तुम्ही एखाद्या सशक्त स्त्रीसोबत राहायचे ठरवले तर तुम्हाला हे मान्य करावे लागेल की तिची स्वतःची मते आहेत.
 जर तुम्ही सुंदर स्त्रीची निवड केली तर तुम्हाला मोठा खर्च सहन करावा लागेल.
 जर तुम्ही एखाद्या यशस्वी स्त्रीसोबत राहायचे ठरवले तर तुम्हाला हे समजले पाहिजे की तिची स्वतःची वेगळी जीवनशैली आणि तिची स्वतःची ध्येये आणि महत्त्वाकांक्षा आहेत.
 परिपूर्ण अशी कोणतीही गोष्ट नाही, प्रत्येकाची स्वतःची शैली असते, जी त्यांना अद्वितीय बनवते!  प्रत्येक स्त्री परिपूर्ण आहे... प्रत्येक मुलगी अद्वितीय आहे...

435. गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक...

      तो माझा मुलगा आहे, काहीही करेल, शेवटी मुलगा कोणाचा आहे. बापाच्या पाउलावर पावूल टाकत आहे. (अश्या वाक्याने तुम्हीच तुमची पीढी नासवत आहात..)  मोबाइलमध्ये सगळी दुनिया सामावली जात असताना त्या वेगावर स्वार होणाऱ्या भल्याभल्यांची तंतरली आहे. अशा वेळी घराघरातल्या लहानग्यांचं नेमकं काय होत असेल? पोनरेग्राफी, व्यसनं, तथाकथित प्रेमप्रकरणं हे लहान वयातच जे येऊ नये ते सगळं येऊन आदळत असताना त्याला सामोऱ्या जाणाऱ्या आजच्या किशोरवयीन पिढीचं आजचं वास्तव काय आहे? या मुलांचं काय चाललंय ते पालकांना समजतंय की तेही गोंधळून गेलेत? त्यांनी आपल्या मुलांना कसं सांभाळायला हवं?
        काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारा एक संदेश..‘‘एका लहान मुलाची निरागस प्रार्थना.. देवा माझ्या बाबाच्या मोबाइलमधील सर्व मुलींना थंडीपासून बचाव करता येतील असे कपडे दे. त्या खूपच गरीब आहेत बिचाऱ्या..’’ मिनिटागणिक भरकटणाऱ्या आणि दोन घटका मौज म्हणून वाचल्या जाणाऱ्या संदेशाप्रमाणे हादेखील आला आणि विरून गेला. त्यामागचा गर्भितार्थ किती जणांच्या लक्षात आला? बाबाचा मोबाइल नंगू पंगू चित्रांनी भरलेलाआहे. हे वास्तव ठसठशीतपणे अधोरेखित करणारा हा संदेश किती जणांनी गांभीर्याने घेतला?  घरातील छोटय़ाशा निरागस घटकाला त्यातील लैंगिकता समजली नाही, पण त्याहून थोडय़ा मोठय़ा, लैंगिकतेची जाणीव झालेल्या मुलाने ही चित्रं बघितली असतील, तर त्याची प्रतिक्रिया काय असेल? व्हॉट्सअ‍ॅप अथवा तत्सम माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचलेला हा संदेश एका अर्थाने डोळे उघडणाराच आहे. गेल्या काही वर्षांत किशोरवयीन मुलं चुकली आहेत, भरकटलेली आहेत, व्यसनांच्या विळख्यात अडकलेली आहेत हा जो सूर वारंवार ऐकू येतो त्यावर चर्चा करताना खरं त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे आणि या चर्चेची मुळे अशा छोटय़ाछोटय़ा घटकांमध्ये दडलेली आहेत.
        आजच्या समाजात लक्षणीयरीत्या प्रभावी असणारं तरुणांचं वास्तव आज समाजाच्या सर्वच स्तरांना धडका देत असताना आजचा पालक हडबडतो आहे.  आपली मुलं हाताबाहेर गेली म्हणून गोंधळून जात आहे, तर दुसरीकडे आम्ही काय गैर केलं म्हणून पौगंडावस्थेतील पिढी गांगरून जात आहे. आणि संपूर्ण समाजालाच कीड लागली म्हणून माध्यमं आगपाखड करू लागली आहेत. आमच्यावेळी असं काही नव्हतं म्हणून जुणेजाणते मध्येच आपल्या मतांची पिंक टाकून जात आहेत आणि गदारोळाचं चित्र उभं राहू लागलं आहे. तर सुजाण पालक विचार करू लागलेत, की सारंच संपलं आहे का? की काही आशेचा किरण बाकी आहे? आशेचे किरण तर अनेक आहेत. किशोरांच्या आयुष्यात प्रभावी असणाऱ्या या घटकांना ठामपणे तोंड देऊन त्यावर मात करणारीदेखील अनेक घरं आहेत. आपल्या पाल्याला चांगलेपणाची जाणीव करून देऊन त्यावर उपाय शोधणारे आणि समर्थपणे पुढे जाणारे पालकदेखील याच जगात आहेत. म्हणजेच आजचा हा समाज हा या दोहोंमध्ये विभागला आहे.
पालकांचा एकमेकांतील तुटलेला संवाद :
विवाहबाह्य़ संबंध हा केवळ मालिकांमध्ये, कथा-कादंबऱ्यांमध्ये दिसणारा घटक आज अनेकांच्या आयुष्यात चोरपावलांनी आला आहे. विवाहबाह्य़ संबंध म्हणजे केवळ शारीरिकसंबंध असं त्याचं स्वरूप नसून त्याला मानसिक भावभावनांचे देखील पदर आहेत. दिवसातील बहुतांश काळ नोकरी-व्यवसायासाठी बाहेर असल्यामुळे जसा पालकांचा मुलांबरोबरचा संवाद तुटत चालला आहे तसाच त्याचा परिणाम पालकांच्या एकमेकांतील संवादावरदेखील झाला आहे. परिणामी मुलं ज्या परिस्थितीतून जात आहेत त्याच परिस्थितीत आपणदेखील असल्याचं अनेक पालकांना वाटू शकतं. अर्थात मुलं जशी भरकटतात तसे आपणदेखील भरकटू शकतो किंवा भरकटलेले आहोत, हेच अनेकांना लक्षात येत नाही. आज अशा विवाहबाह्य़ संबंधांनी अनेक घरांत विसंवादाचं वादळ निर्माण होत असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. स्वत:ची संवादाची गरज म्हणून कदाचित अनेक पालक यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतील, पण हेच आपली मुलं करीत असताना आपण त्याकडे कसं पाहणार आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने एकदा तरी स्वत:ला विचारून पाहण्याची गरज आहे.
अनुकरण हा तर मुलांचा स्थायिभाव असतो,  हे विसरून चालणार नाही.
या परिस्थितीवर मात करणं शक्य आहे, पण त्यासाठी गरज आहे ती परिस्थितीचे साकल्याने आकलन करण्याची, ती अभ्यासण्याची आणि त्यावर उत्तर शोधण्याची. म्हणूनच या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून या विषयाची व्याप्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिलंप्रेम, पहिलंचुंबन, पहिलीसिगारेट, पहिलीदारू, पहिलं व्यसन करण्याचं पूर्वीचं वय कमी होऊन आज १३-१४ वयापर्यंत येऊन ठेपलं आहे.  अगदी नववी-दहावीतील मुला-मुलींनी एकत्र येऊन दारू पिणं (ड्रिंक्स घेणं) हे आज अगदी सर्वच स्तरातील घरांत आणि शहरांत आढळणारं ढळढळीत वास्तव आहे. त्यातच अमली पदार्थाच्या वाढत्या फैलावाची त्याला जोड मिळाली आहे.’’ वयाच्या विशीपर्यंत दोन वेळा ब्रेकअप होणं हेदेखील सर्रास होऊ लागल आहे.‘‘स्मार्टफोनमुळं आज प्रेमाचं पॅकेजच तयार झालं आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड आहे हा आजचा स्टेटस सिम्बॉल झाला आहे. तर जोडीला प्रेम, व्यसन, व्हिडीओ गेम हे तणाव दूर करण्याचे पर्याय ठरू लागले आहेत.’’
शालेय वयात व्यसनांच्या विळख्यात अडकण्याची शक्यता अधिक असल्याचं शिक्षकदेखील नमूद करतात. सुगंधी सुपारीपासून सुरू झालेला प्रवास गुटखा, सिगारेटपर्यंत कधी जाऊन पोहोचतो हेच कळत नाही. पौगंडावस्थेत प्रेमात पडणे, त्याचा मानसिक त्रास होणे, कधी कधी ते शरीरसंबंधापर्यंत पोहोचणे आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण होणे, सिगारेट, गुटखा, अमली पदार्थाचे व्यसन लागणे, नैराश्यामुळे पाल्याने पोनरेग्राफीच्या आहारी जाणे, अ‍ॅडिक्ट होणे, नैराश्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नांपर्यंत मजल जात आहे.
संवाद साधण्याची मोहीम उघडावी लागेल.
शालेय वयात आईबाबांपेक्षा मुलांचा शाळेत अधिक काळ व्यतीत होत असतो. अशा वेळेस शिक्षकांशी असणारे संबंध हा खूप महत्त्वाचा घटक आहे. एके काळी शाळेतला शिक्षक हा मुलांच्या सर्वागीण जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असे. मुलांच्या वागण्या-बोलण्यावर त्याचा प्रभाव असे. मुलांच्या अडचणी त्याला माहिती असत. त्यावरील उपाय शोधण्याचा तो प्रयत्न करीत असे. आज हा शिक्षक विद्यार्थ्यांमधील संवाद काही प्रमाणात तरी तुटला आहे. इतकेच नाही तर आजचा शिक्षक या बाबत काहीसा उदासीनच झाला आहे, किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हा खरं तर मित्रासारखा वाटला पाहिजे. पण आज ही परिस्थिती नाहीये. घरातील विसंवादाला मुलं मित्रांमध्ये उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस आपल्यावर असणारी बंधनं झुगारून देणाऱ्या मुलांकडे झुकण्याची प्रवृत्ती वाढत जाते. हाच प्रभाव मुलींच्या बाबतीत प्रेमात पडण्याला कारणीभूत ठरतो. मग अशा हिरोगिरी करणाऱ्या मुलांच्या जाळ्यात अडकण्याचा संभव वाढतो. त्यातच शाळांमधून दिल्या जाणाऱ्या लैंगिक शिक्षणाचा दर्जा पुरेसा म्हणण्या इतका देखील नाही. किंबहुना मुलांच्या भावना, न्यूनगंड यांचा विचार करता त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आजचं लैंगिक_शिक्षण आणि शिक्षक दोघंही कमी पडतात. इतकंच नाही तर शिक्षकांना हे शिक्षण देताना कसं बोलायचं याबद्दलच न्यूनगंड आजही आहे,तो आधी दूर करावा लागेल.
    हुशार पालक वेळीच सावध व्हा. मुलांना वेळ द्या.

रविवार, १६ जुलै, २०२३

434. भयानक दरोडा...

 हॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.
‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा.
लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’
दरोडेखारांनी ओरडून सांगताच
सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.
*याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’*
( *Mind Changing Concept* ) म्हणजेच माणसांच्या
सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची
किमया.
त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवी
पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून
म्हणाला,
‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा
दरोडा आहे, बलात्कार नाही.’
*याला म्हणतात व्यावसायिक रहाणे*
( *Being professional* ). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी आले.
त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, *जो एम.बी.ए. होता*
तो 6 वी पर्यंत शिकलेल्या
सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला
आता आपण पैसे मोजायला लागूया!’ त्यावर
सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की
काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील.
जरा धीर धर. रात्री टी. व्ही.
वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की
आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’
*याला अनुभव म्हणजेच*
*‘एक्सपिरिअन्स’*
( *Experience* ) असे म्हणतात.
हल्ली कागदी पदव्यांपेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.
दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर
सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब
पोलिसांना फोन कर!’
सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! *आपण आधीच बँकेच्या 70 लाख* *डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’*
*याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’*
( *Swim with the tide* ). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून
स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.
सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा
दरोडा पडला तर काय मजा येईल!’
*याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी बदलणे’*
( *Changing priority*).
कारण ‘पर्सनल
हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.
दुस-या दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली
की *बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला*.
पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले.
कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली.
*मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?*
*खरी मेख काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.*
तो वैतागून म्हणाला, ‘आपण
जीवावर उदार होऊन दरोडा टाकला पण.
आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले.
पण
त्या बँक मॅनेजरने मात्र काहीही न करता 80
लाख डॉलर्स लाटले.
*खरे आहे माणसाने शिकले पाहिजे.नुसतेच दरोडेखोर न* *होता ‘सुशिक्षित दरोडेखोर’ व्हायला पाहिजे,’*
*याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच* *‘नॉलेज’*
( *Knowledge*) ज्याची किंमत
सोन्यापेक्षाही जास्त असते.
तुमचे सोने नाणे
लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच
पळवून नेऊ शकत नाही.
*Point to be Noted*

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

433. उद्धवगीता...

 उद्धवगीता: दुर्योधन-शकुनी बरोबर द्युत खेळत असताना भगवान श्रीकृष्णानी रक्षण का नाही केले ? भगवान श्रीकृष्णांनीच दिलेले यथार्थ स्पष्टीकरण:
ऊद्धव हा कृष्णाचा अगदी बालपणापासुनचा मित्र. त्याचा सारथी होणारा, अनेक प्रकारे सेवा करणारा. त्याने श्रीकृष्णापाशी कधीही कोणती इच्छा व्यक्त केली नाही की कोणता वर मागून घेतला नाही. भगवान श्रीकृष्णांचा अवतार संपुष्टात यायच्यावेळी ऊद्धवाला त्यांनी बोलावून घेतले आणि म्हणाले, "प्रिय उद्धवा, या माझ्या अवतारात अनेकांनी माझ्याकडून वर मागून घेतले, पण तू कधी मला काही मागितले नाहीस! मला हा अवतार संपवताना तुलाही काही दिल्याचे समाधान लाभेल. तेव्हा निश्चिंत मनाने मला माग. मी ते पूर्ण करीन."
लहानपणापासून जवळून पाहिलेल्या श्रीकृष्णाला उद्धवाने यावेळी देखील कोणतीच इच्छा अपेक्षा केली नाही. पण श्रीकृष्णानीच शिकवलेल्या गोष्टी आणि त्याची स्वतःची कृती यातील काही गोष्टी त्याला समजल्या नव्हत्या. त्याबद्दल त्याचे मन साशंक होते आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी त्याला श्रीकृष्णाच्या अशा त्या सर्व कृतींमागची कारणे जाणून घ्यायची इच्छा होती.
उद्धव श्रीकृष्णास म्हणाला, "हे कृष्णा, तु आम्हाला जगण्यासाठी एका मार्गाने शिकवलेस पण तू स्वतः वेगळ्याच मार्गाने जगलास!
महाभारतात तुझ्या भूमिकेतून तू केलेल्या अनेक कृती मला कधीच समजल्या नाहीत! मला त्यामागची कारणे जाणून घ्यायची इच्छा आहे. ही तू माझी इच्छा पूर्ण करशील ?"
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "उद्धवा, कुरूक्षेत्रावर मी अर्जुनाला जो उपदेश केला ती भगवत् गीता होती. आज मी तुला जे सांगेन ती 'उद्धव गीता' म्हणून ओळखली जाईल. म्हणूनच ही संधी मी तूला देत आहे. अगदी निःशंक मनाने तुझे प्रश्न विचार."
उद्धवाने विचारण्यास सुरवात केली, "प्रभो, सर्वप्रथम मला हे सांगा, खरा मित्र कोण?"
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "खरा मित्र तो असतो जो न सांगता देखील संकटसमयी मदतीला धावून येतो."
उद्धव: "कृष्णा, तू पांडवांचा जिवलग सखा आहेस. ते तुला त्यांचा आपदबांधव (संकटांपासून संपूर्ण रक्षणकर्ता) समजतात. ज्याला केवळ वर्तमानाचेच नव्हे तर भविष्यात घडणार्या घटनांचे संपूर्ण ज्ञान आहे. तु खरा ज्ञानी आहेस. आत्ताच तू मला खर्या मित्राची व्याख्या सांगितलीस. मग त्याप्रमाणे तू का नाही वागलास? धर्मराज युधिष्ठीरास द्यूत खेळण्यापासून का नाही थांबवलेस? ठीक आहे नाही थांबवलेस पण खेळाचे परिणाम धर्मराजाच्या बाजूने का नाही फिरवलेस? तो जिंकला असता पण तू ते ही नाही केलेस! निदान संपूर्ण सत्ता संपत्ती हरल्यानंतर तरी धर्मराजाला वाचवता आले असते. द्यूतात हरलेल्या धर्मराजाला होणार्या शिक्षेपासून तुला सोडवता आले असते. किंवा त्याच्या भावांना त्याने जेव्हा द्यूतात पणास लावले तेव्हा तरी द्यूतसभेत तू प्रवेश करू शकत होतास. पण तेही तू केले नाहीस! 
किमान अशाक्षणी जेव्हा "जर तू द्रौपदी (जिच्यामुळे पांडव नेहमीच यशस्वी होत आले अशी) पणाला लावशील तर हरलेले सर्व राज्य संपत्ती मी तुला परत देईन" या दुर्योधनाने धर्मराजास दिलेल्या प्रलोभनावेळी जरी तू तुझ्या दिव्यशक्तीने हस्तक्षेप केला असतास तरी धर्मराजास विजय प्राप्त करून देणार्या अनुकुल सोंगट्या पडल्या असत्या. याऐवजी, जेव्हा राणी द्रौपदीची अब्रू जाण्याची वेळ आली त्याक्षणाला तू हस्तक्षेप केलास आणि मग दावा करतोस की द्रौपदीला तू वस्त्रे पुरवलीस आणि तिची अब्रू वाचवलीस. हे असं कसं करू शकतोस - जेव्हा तिला भर सभेत ओढत, फरफटत आणलं गेलं आणि भरसभेत अनेकांसमोर विवस्त्र करण्यात आलं? काय तिची अब्रू शिल्लक राहीली होती ? काय तू नक्की वाचंवलस ?  संकटसमयी वाचवशील तेव्हाच खरा तू आपदबांधव! संकटसमयी तू धावून नाही आलास तर काय उपयोग ? हा धर्म आहे का?"
एकामागोमाग प्रश्न विचारत असताना उद्धवाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या...
हे सर्व प्रश्न केवळ उद्धवाचेच नव्हते. ज्यांनी महाभारत वाचले आहे त्याआपल्या सर्वांचे आहेत. जणू काही आपल्या वतीनेच उद्धवाने ते भगवान श्रीकृष्णास विचारून ठेवले होते.
भगवान श्रीकृष्ण हसले, "प्रिय उद्धवा, या भूतलावरील मानवी जगाचा नियम आहे : केवळ विवेकबुद्धी जागृत असणार्याचाच विजय होतो. दुर्योधनाकडे ती विवेकबुद्धी त्यावेळी होती पण धर्मराजास ती सोडून गेली होती. आणि म्हणूनच धर्मराज युधिष्ठिर हरला."
भगवान श्रीकृष्णाचे बोल उद्धवास उमगले नाहीत आणि तो संभ्रमात पडला. 
श्रीकृष्ण पुढे म्हणाले, " दुर्योधन अमाप संपत्तीचा मालक होता पण द्यूत खेळण्याचे ज्ञान मात्र त्याच्यापाशी नव्हते. म्हणून त्याने मामा शकुनीस द्यूत खेळण्यास वापरले पण खेळातील पैजा त्यानी लावल्या. हा विवेक आहे. 
धर्मराज युधिष्ठिर देखील हा विचार करून तसे करू शकत होता आणि मला, त्याच्या बंधूला त्याचा प्रतिनिधी म्हणून खेळवू शकत होता. जर मी आणि शकुनी द्यूत खेळलो असतो, तर या खेळात तुझ्यामते कोण जिंकलं असतं? मी विचारलेल्या संख्या शकुनीला पाडता आल्या असता की त्यानी सांगितलेल्या संख्या मला पाडता आल्या नसत्या ? तूर्त ही गोष्ट बाजूला ठेव.
धर्मराजाने एकवेळ मला खेळात आमंत्रित करण्याचं विसरला असता तर ती चूक पण मी दुर्लक्षित केली असती. पण विवेकशून्य आचरणात त्याच्या हातून एक गंभीर चूक घडली. धर्मराज युधिष्ठिराने प्रार्थना केली की मी द्यूतसभेत येऊ नये ! कारण त्याला मला हे कळू द्यायचे नव्हते की केवळ दुर्दैव म्हणून तो या खेळात ओढला गेला होता आणि तो खेळणे त्याला भाग होते. त्यानी मला केलेल्या या प्रार्थनेमुळे माझे हात बांधले गेले. मी सभेच्या बाहेरच उपस्थित होऊन प्रतिक्षा करत होतो की पांडवांपैकी एकजण तरी प्रार्थना करून मला बोलावेल. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे देखील जेव्हा हरले तेव्हा दुर्योधनाला शिव्याशाप आणि स्वतःच्या नशिबाला दोष देण्यात मग्न झाले  होते. मला बोलवायला ते विसरले होते. द्रौपदीदेखील मला विसरली होती जेव्हा मोठ्या भावाची आज्ञा म्हणून दुःशासनाने तिला केसांना धरून भर सभेत फरफटत आणले. ती सुद्धा तिच्या बुद्धीप्रमाणे सभेत सर्वांशी वादविवाद घालत होती. त्या क्षणापर्यंत तिने एकदाही मला बोलावले नाही. 
अखेर तेव्हा सुबुद्धी निर्माण झाली जेव्हा दुःशासनाने तिला एकेक कपड्यानिशी विवस्त्र करायला सुरवात केली. सर्व विरोध थांबवून तिने अखेर हात टेकले आणि आक्रोश करायला सुरवात केली. "हरी! हरी! अभयम् कृष्णा अभयम्" असा टाहो फोडत माझी प्रार्थना केली. 
आणि त्याक्षणी तिची अब्रू वाचवण्याची संधी मला मिळाली. शक्य तितक्या जलद मी पोहोचून तिचे रक्षण केले. या सर्व परिस्थितीत माझी काय चूक आहे सांग बरे?"
"काय छान समजावलेस कृष्णा! मी प्रभावित झालो! पण नक्कीच फसलो नाही. एक अजून प्रश्न विचारू शकतो ?" श्रीकृष्णानी संमती दिली.
"याचा अर्थ असा आहे का की जेव्हा तुला बोलावलं जाईल तेव्हाच तू येणार? संकटसमयी न्याय प्रस्थापित करण्यासाठी तू स्वतः येणार नाहीस. बरोबर ?" उद्धवाने पुढील प्रश्न विचारला.
भगवान श्रीकृष्णांनी स्मित केले, "उद्धवा! या मनुष्यजन्मात प्रत्येकाचे आयुष्य हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार पुढे जाते. मी चालवत नाही ते. मी त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त 'साक्षीदार' म्हणून मी उपस्थित असतो. मी सदैव तुझ्या जवळच असतो आणि जे काही घडत आहे ते पहात असतो. हा परमेश्वराचा धर्म आहे.'
"वाह! खुपच छान कृष्णा! म्हणजे तू आमच्या जवळच रहाणार, आणि जसजसे करत जाऊ तसतशी आमची दुष्कर्म पापं करताना पहात रहाणार. आम्ही अशाच चुका करत रहावं पापं करत रहावं आणि त्यांची शिक्षा भोगत रहावं हे तुला आमच्याकडून हवं आहे ?"
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "उद्धवा ! तु जे काही बोललास, जी विधानं केलीस त्याचा नीट खोलवर विचार कर. जेव्हा तुला हे लक्षात आलं आहे आणि पक्कं समजलं आहे की मी सदैव तुझ्या बाजूलाच साक्षीदार म्हणून उभा असतो तेव्हा तुझ्या हातून चूक किंवा वाईट कृती घडेलच कशी? निश्चितच तू असं काही करणार नाही. पण जेव्हा ही गोष्ट विसरली जाते तेव्हा माझ्यापासून लपवून एखादी गोष्ट करता येईल असा विचार तुझ्या मनात येतो. आणि अशावेळी तू संकटात सापडतोस. जर धर्मराजाच्या हे लक्षात राहिलं असतं की मी सदैव सर्वांसमवेत सर्वठिकाणी साक्षीरूपाने हजर असतो तर तो खेळ वेगळ्या परिणामांनी संपुष्टात नसता का आला?"
उद्धव आता थक्क होऊन स्तब्ध झाला होता आणि त्याचं मन अपार भक्तीनी भरून वहात होतं. तो म्हणाला, "किती खोल आहे हे तत्त्वज्ञान ! किती श्रेष्ठ सत्य ! देवाची पूजा प्रार्थना करणं आणि त्याची मदत मागणं ही केवळ आपली भावना, श्रद्धा असते. ज्याक्षणापासून आपण हा विश्वास ठेवायला लागतो की त्याच्याशिवाय काही चालू शकत नाही तेव्हा त्याचं साक्षीरूप अस्तित्व जाणवल्याशिवाय रहाणार नाही. हे विसरून कोणतीही कृती आपल्या हातून घडणे शक्य आहे का ? संपूर्ण भगवदगीतेतून हेच तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्णांकडून अर्जुनास प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण सारथी होता मार्गदर्शक होता पण तो स्वतः लढला नाही.  जाणावा तो अद्वितीय एकमेव परमोच्च साक्षी आपल्या आतला आणि आपल्याविना! आणि त्या परमेश्वर तत्त्वाशी एकरूप समरूप होऊन जा

432. शाळेसारखं सुख नाही..!

मी खिडकीच्या बाहेर आनंद शोधत बसलो,
तो वर दहावीचा शेवटचा पेपर आला.
मी गेलो हायस्कूल सोडून,
माझा वर्गातला बेंच तिथेच राहिला.
बाहेर जाताना कळत नव्हतं,
आता येथे परत येणे नाही.
आयुष्याच्या पानावर ,
शाळेसारखं सुख नाही.

आता दिवसाला आणतो मी,
खूप सारे पैसे कमवून.
पैसा-पैसा म्हणत-म्हणत,
जातो साऱ्या गर्दीत हरवून
त्या भल्या मोठ्या रक्कमेला,
आईच्या एक रुपयाची सर नाही.
अन् आयुष्याच्या पानावर,
शाळेसारखं सुख नाही.

अफाट रस्त्यावर आता,
गाडी माझी सुसाट असते.
भली मोठी गाडी पण,
सोबत त्यात कोणीच नसते.
चार चाकीच्या गाडीला मात्र,
मित्रासोबत डब्बल शीट फिरणाऱ्या,
सायकलीची सर येणार नाही,
अन्  आयुष्याच्या पानावर 
शाळेसारखं सुख नाही.

कैक हॉटेल आहेत आता,
दुपारचे जेवण करण्यासाठी.
वेगवेगळ्या डिश अन्,
वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी.
त्या सगळ्या जेवणाला मात्र,
मित्रांसोबत शाळेत खालेल्या,
डब्यातील जेवणाची चव नाही.
अन् आयुष्याच्या पानावर 
शाळेसारखं सुख नाही.

आता झालो मोठे आम्हीं,
कळते आम्हा सर्व.
शाळेतून बाहेर पडल्यावर,
मिटला सारा गर्व.
एक हाती लॅपटॉप अन्,
बॉस कामाचे मेल पाठवतो.
दंग झालेल्या या जिवनात मग,
शाळेचा बेंच पुन्हा आठवतो.
पण जेंव्हा कळायला पाहिजे होते,
तेंव्हा माणसाला कळत नाही.
अन् आयुष्याच्या पानावर,
शाळेसारखं सुख नाही.

431. लग्नाचा निर्णय घेताना...

तो : मी तुला एक लिस्ट पाठवली आहे.
मी : हो, पाहिली.
तो : त्यासोबतच एक पावती आहे.
मी : हो.
तो : ती समोरच ठेव.
मी : का बरं?
तो : मला त्यासंबंधी काही शेअर करायचं आहे.
मी : ओके.
तो : तू मागच्या आठवड्यात एक पोस्ट लिहिलेली.
मी : कोणती?
तो : पैसे कुठे खर्च करायचे, हे कळण्यासाठी अक्कल लागते.
मी : हो.
तो : मात्र प्रत्येक मुलगा मुलगी तेवढे समजदार असते, तर..
मी : तर काय?
तो : तर कदाचित कित्येक कुटुंब सुखाने अन् समाधानाने जगले असते.
मी : म्हणजे?
तो : सांगतो, मात्र त्यापूर्वी थोडक्यात माझा परिचय देतो.
मी : चालेल.
तो : मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे.
मी : ओके.
तो : एका नामांकित कार कंपनीत मी जॉब करतो.
मी : ग्रेट.
तो : वर्षांपूर्वी माझं लग्न झालं.
मी : तूझं वय?
तो : मी २९ वर्षांचा आहे.
मी : मिसेसचं वय?
तो : ती २६ वर्षांची.
मी : ओके.
तो : माझे आईवडील गावी असतात.
मी : काय करतात?
तो : आमची बागायती शेती आहे.
मी : ओके.
तो : माझ्या भावाचं लग्न झालंय. तो आईवडिलांसोबत असतो.
मी : ओके.
तो : भाऊ कमी शिकलेला असल्याने, त्याच्या लग्नाच्यावेळी..
मी : काय?
तो : घरचे कमी शिकलेल्या मुलीच्या शोधात होते.
मी : ओके.
तो : मात्र माझी वहिनी कमी शिकलेली असल्याने, तिला स्वतःची काही मतं नाहीत.
मी : मग?
तो : म्हणून मला भावाच्या त्या चुकीची पुनरावृत्ती करायची नव्हती.
मी : मग?
तो : मी घरच्यांना आधीच बजावलं होतं.
मी : काय?
तो : इतर निकष तुम्ही ठरवा, मात्र मुलगी उच्चशिक्षित हवी.
मी : ओके.
तो : मात्र तोपर्यंत मला माहित नव्हतं.
मी : काय?
तो : शिक्षित आणि सुशिक्षित व्यक्तीत बराच फरक असतो.
मी : कसं समजलं?
तो : सध्या तेच अनुभवतोय.
मी : ओके.
ती : माझ्या बायकोचं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन झालं आहे.
मी : व्वा!
तो : घरच्यांनी माझ्यासाठी शिकलेली बायको तर शोधली, मात्र सून शोधण्यासाठी त्यांचेही काही निकष होते.
मी : कोणते?
तो : मुलगी गोरी, सुंदर, उंच, सडपातळ आणि नाकेडोळे छान असावी.
मी : ओके.
तो : विशेष म्हणजे स्थळ तोलामोलाचं असावं.
मी : ओके.
तो : माझे सासरे रिटायर्ड सरकारी अधिकारी आहेत.
मी : शेती?
तो : तेही बागायतदार.
मी : तोलामोलाचं स्थळ.
तो : त्यात माझ्या सासऱ्यांना दोनच मुली.
मी : मग?
तो : त्यामुळे दोघीही त्यांच्या लाडक्या.
मी : साहजिकच.
तो : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आल्याने, माझ्या बायकोला तडजोड कधी ठाऊकच नव्हती.
मी : ओके.
तो : मी मात्र वयाच्या १७ व्या वर्षापासुन स्वावलंबी.
मी : बारावीपासून?
तो : हो. मी बारावीनंतर घरच्यांकडून पैसे घेणं बंद केलं.
मी : मग?
तो : मी माझे गरजेपुरते पैसे स्वतः कमवायचो.
मी : कसे?
तो : माझे चुलते फोटोग्राफर होते. म्हणून मग मी त्यांच्या स्टुडिओत फोटो एडिटिंगचं काम करायचो.
मी : ग्रेट.
तो : इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर मी जॉबला लागलो आणि मग आर्थिक नियोजन सुरु केलं.
मी : कसं?
तो : मी म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचो.
मी : शेअर मार्केटमध्ये कशात?
तो : इक्विटी.
मी : ओके.
तो : तुही?
मी : मी काहीवर्षे 'इंट्रा डे' ट्रेडिंग केली.
तो : तो भयंकर प्रकार आहे.
मी : अनुभवला.
तो : लग्नाच्या आधी माझं सगळं काही सुरळीत सुरु होतं.
मी : ओके.
तो : लग्नही मी माझ्या साठवलेल्या पैशांनी केलं.
मी : घरच्यांनी काही मदत?
तो : दादा आणि पप्पांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, मात्र मी नकार दिला.
मी : गुड.
तो : अक्षय मला असं वाटतं की, आपल्या समाजात लग्नाला फार गांभीर्याने घेतलं जात नाही.
मी : असं का?
तो : कारण लग्न जुळवताना नको त्या विषयांना महत्व दिलं जातं, आणि महत्वाचे विषय..
मी : महत्वाचे विषय?
तो : दुर्लक्षित राहतात.
मी : कसे?
तो : तेव्हा माझ्या लग्नाला जेमतेम महिनाच झाला होता.
मी : मग?
तो : घरखर्च, फ्लॅट आणि कारचा हप्ता जाऊन, दर महिन्याला सरासरी २० हजार रुपये माझ्या खिशात उरायचे.
मी : ओके.
तो : तीच माझी सेव्हिंग.
मी : मग?
तो : लग्नानंतर मी ते पैसे बायकोकडे द्यायला लागलो.
मी : ओके.
तो : मात्र त्यानंतर अजबच प्रकार घडला.
मी : काय?
तो : मी बायकोकडे २० हजार रुपये दिलेले.
मी : हो.
तो : १० हजार रुपयांची गरज असल्याने, मी एकदिवस तिच्याकडे पैसे मागितले.
मी : मग?
तो : तर तिने सांगितलं की, फक्त हजार रुपये शिल्लक आहेत.
मी : च्यामारी.
तो : मीही अवाक झालेलो.
मी : मग?
तो : मग मी उरलेल्या पैशांची तिच्याकडे चौकशी केली.
मी : काय समजलं?
तो : बायकोने एका प्रसिद्ध सलूनचं बिल माझ्या हातावर टेकवलं.
मी : तू मला पाठवलेलं?
तो : हो.
मी : अरे.
तो : वाच बरं एकदा..
मी : हेअर स्ट्रेंथनिंग क्राऊन, इसेन्सिटी ग्लोबल हेअर कलर, फेस थ्रेडींग, परफेक्ट रॅडिअन्स इल्युमिनेट फेशियल, बॉडी मसाज आणि पेडीक्युअर.
तो : फायनल अमाऊंट किती आहे?
मी : १२ हजार रुपये.
तो : त्यानंतर तिने नेलपॉलिश आणि लिपस्टिक ऑनलाईन खरेदी केलेली.
मी : ओके.
तो : त्यामुळेच अखेरीस हजार रुपये उरलेले.
मी : सांगितलं नव्हतं?
तो : सांगितलेलं.
मी : काय?
तो : ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आले.
मी : मग?
तो : माझा असा समज होता की, हजार- हजार रुपये खर्च झाले असतील.
मी : का बरं?
तो : माझ्या चुलत बहिणींना तर तेवढाच खर्च यायचा.
मी : ओके.
तो : अक्षय मला वाटलेलं असा खर्च कधीतरी होईल.
मी : मग?
तो : मात्र माझा अंदाज चुकीचा ठरला.
मी : म्हणजे?
तो : बायको दरमहिन्याला ब्युटी ट्रीटमेंटसाठी १०-१२ हजार रुपये सहज खर्च करायची.
मी : बाप रे..
तो : सुरुवातीचे काही महिने मी तो प्रकार सहन केला.
मी : मग?
तो : त्यानंतर धाडस करून मी बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला.
मी : बरं केलं.
तो : मात्र सगळं व्यर्थ.
मी : म्हणजे?
तो : ती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची.
मी : वाईट.
तो : नाईलाजाने मग मी माझ्या सासऱ्यांच्या कानावर ती गोष्ट घातली.
मी : मग?
तो : त्या महोदयांनी तर बायकोची तुलना थेट कारशी केली.
मी : म्हणजे?
तो : ते म्हणाले की फॉर्च्युनर आणि अल्टो या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या आहेत.
मी : बरोबर.
तो : म्हणूनच दोन्ही गाड्यांच्या मेंटेनन्समध्ये जमीन आस्मानाचं अंतर.
मी : करेक्ट.
तो : फॉर्च्युनर गाडी वापरायची इच्छा तर तिच्या मेंटेनन्ससाठी जसे पैसे खर्च करण्याची लायकी हवी, त्याप्रमाणे..
मी : त्याप्रमाणे?
तो : सुंदर, गोरी बायको करण्याची हौस असेल तर ब्युटी पार्लरचा खर्च सोसायची तयारी हवी.
मी : महान विचार.
तो : अक्षय मी तर डायरेक्ट कपाळाला हात लावला.
मी : काही सुचेना मला.
तो : माझी तीच अवस्था झालेली.
मी : होणारच.
तो : मागच्या वर्षी माझ्या मेहुणीचं लग्न झालं..
मी : मग?
तो : तिच्या लग्नासाठी माझ्या बायकोने ४६ हजार रुपयांची साडी खरेदी केली.
मी : काय?
तो : ती साडी तिने हार्डली आतापर्यंत फक्त दोनदा घातली आहे.
मी : ओके.
तो : हट्ट करून तिने वाढदिवसाला आयफोन घेतला.
मी : मग?
तो : त्याचा डिस्प्ले अवघ्या महिनाभरात फुटला.
मी : दुर्दैव.
तो : अक्षय माझी बायको फक्त आलिशान रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जेवते.
मी : का?
तो : कारण तिला गर्दी असलेल्या ठिकाणी जेवायला आवडत नाही.
मी : नवाबी शौक.
तो : ती गोष्टी बॅलन्स करण्यात एक्स्पर्ट आहे.
मी : चला एकतरी चांगला गुण आहे.
तो : भावा ती ब्युटी पार्लरचा खर्च कमी झाला, तर ते पैसे शॉपिंगवर खर्च करते.
मी : तुझ्या सहनशीलतेला सलाम.
तो : मला असं वारंवार वाटतं.
मी : काय?
तो : मी घरच्यांच्या इच्छेने लग्न करून आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे
मी : का?
तो : कारण मागील वर्षांपासून माझ्या आयुष्याची वाट लागलेली आहे.
मी : आर्थिक नियोजन चुकतंय.
तो : हो. मी तर आता मनाची तयारीच केली आहे.
मी : कसली?
तो : वरचेवर असे धक्के पचवण्याची.
मी : क्या बात!
तो : म्हणूनच तुझ्या माध्यमातून मला सर्व तरुणांना एकच सांगायचं आहे.
मी : काय?
तो : लग्नाचा निर्णय घेताना, मुलीच्या सौंदर्यापेक्षाही तिच्या विचारांना व्यवहार ज्ञानाला अधिक महत्व द्या.
मी : का?
तो : कारण सौंदर्य काही वर्षे टिकतं, मात्र समजूतदारपणा हुशारी आयुष्यभर साथ देते.
मी : ज्जे बात

©️अक्षय भिंगारदिवे, १२ जुलै २०२३
 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...