वैदेही आपल्या आईबरोबर गावाबाहेरच्या एका देवळात दर्शनाला गेली होती. तिथून घरी परतताना रस्त्यात अचानक ती आईला म्हणाली, "मम्मी, कार थांबव ताबडतोब."
आईने कार थांबवली. गाडीतून खाली उतरून ती थोडं मागे जाते, तिची आईसुद्धा तिच्या मागोमाग जाते. दोघी एका कम्पाऊंडमध्ये शिरतात. तिथे घोळक्या घोळक्याने मुली उभ्या असतात. एका घोळक्यातल्या एका मुलीकडे पाहत वैदेही स्वतःतच हरवून जाते.
ती इमारत "शारदा कन्या विद्यालयाची" असते.
आईने दोनदा हाक मारल्यावर ती भानावर आली. मग दहा मिनिटांनी दोघी घरी आल्या. दोन दिवस ती स्वतःतच हरवलीय हे तिच्या मम्मी पप्पांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी विचारल्यावर तिने "तसं काही नाहीये" असं सांगून वेळ मारून नेली. मम्मीने नंतर पप्पांना सांगितलं की "त्या शाळेत ती मला घेऊन गेली. तेव्हापासून ही स्वतःत हरवलीय. त्या पाच दहा मिनिटात तिथे नेमकं काय घडलं ते मला समजलं नाही. मी तिला दोनदा हाक मारल्यावर ती भानावर आली होती."
दोन दिवसांनी रात्री जेवत असताना वैदेही म्हणाली, "मम्मी पप्पा, मला शारदा कन्या विद्यालयात शिकायला जायचंय."
दोघांना आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या बोलण्याचा अर्थ समजल्यावर त्यांनी तिच्या इच्छेचं कारण विचारलं. तिला ते सांगता आलं नाही. तिच्या मम्मीने तिला खूप समजावलं पण ती आपला हेका सोडायला तयार नाही हे पाहून शेवटी तिचे पप्पा म्हणाले, "हिची इच्छा आहे ना, त्या शाळेत शिकायची तर मग उद्या त्या शाळेत हिची अॅडमिशन करून टाक. शाळा सुरू होऊन फक्त दहाच दिवस झालेत त्यामुळे हिला शाळा बदलल्याने काही विशेष अडचण येणार नाही."
दुस-या दिवशी तिची मम्मी तिला घेऊन अॅडमिशनसाठी शाळेच्या मोठ्याबाईला, मुख्याध्यापिकेला भेटायला गेली.
दोघींचं सगळं बोलणं ऐकून मोठ्याबाई म्हणाल्या, "वैदेही, गेली नऊ वर्षे तू हाय फाय काँव्हेंट स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकते आहेस. तू हुशार आहेस हे तुझ्या आधीच्या मार्कलिस्टवरून दिसतंय. गणित विषय थोडा कच्चा आहे पण तुझं इंग्लिश माध्यम सोडून अचानक मराठी माध्यमातून तू शिकायला लागलीस तर तुला सगळा अभ्यास करणं खूप अवघड जाईल."
वैदेही म्हणाली, "हो मोठ्याबाई, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला सुरुवातीला खूप अवघड जाईल. मी खूप मेहनत करेन पण मला याच शाळेत शिकायचंय."
मोठ्या बाईंनी विचारलं, "तू ते हायफाय स्कूल सोडून या शाळेत यायचं का ठरवतेयंस हे सांगशील का मला ? तेही इंग्लिश मिडियममधून मराठी मिडियमला ? हे आश्चर्य आहे. यामागे काही खास कारण आहे का ?"
वैदेही म्हणाली, "मोठ्याबाई, चार दिवसांपूर्वी या रस्त्याने जात असताना मला या कम्पाऊंडमध्ये यायची तीव्र ओढ वाटली. मी कम्पाऊंडमध्ये शिरून ही शाळा बघितली, मुलींच्या घोळक्यात एका मुलीला पाहिल्यावर माझं मन का भारावलं ते मला समजत नाही. माझं मन क्षणात तिच्याकडे ओढावलं. मला तिच्या सहवासात राहायचंय, मला त्या मुलीबरोबर या शाळेत शिकायचंय. दहावी अकरावीला मी इथेच शिकेन."
तिची अॅडमिशन झाली. श्रीमंत घरातली, काँव्हेंटमध्ये इंग्लिश मिडियमला शिकणारी मुलगी या शाळेत परिस्थितीने सामान्य असणा-या मुलीला पाहून भारावते आणि या शाळेत शिकायची इच्छा बाळगते आणि तिचे आईवडीलही तिच्या इच्छेपुढे झुकतात याचं मोठ्याबाईंना खूप आश्चर्य वाटलं होतं, तसंच कोडंही पडलं होतं.
दुस-या दिवशी वैदेही आपल्या नेहमीच्या झकपक ड्रेसमध्ये आईबरोबर शाळेत गेली. कारमधून कोण आलं हे सगळ्या मुली उत्सुकतेने पाहत होत्या. वैदेहीने खाली उतरून सगळीकडे नजर फिरवली आणि ज्या मुलींच्या घोळक्यात पहिल्यांदा भेटलेली ती मुलगी असते त्या घोळक्याजवळ गेली.
त्या मुलीला ती म्हणाली, "माझं नाव वैदेही आहे. तुझं नाव काय ? मला दहावी अ चा वर्ग दाखव."
शिल्पानं ती कारमधून उतरलेली पाहिलेलं होतं. तिचं रुबाबाचं बोलणं ऐकून शिल्पाला आश्चर्य वाटतं. तिच्या कारपासून मध्ये पंधरा वीस मुली उभ्या आहेत तरी ही आपल्याकडेच का आली आणि रुबाबात का बोलतेय हा प्रश्न शिल्पाला पडला होता. ती तडकून म्हणते, "तुझा वर्ग दाखवायला मी काय तुझी नोकर आहे का ? एखाद्या नोकराला का घेऊन आली नाहीस गाडीत बसवून तुझ्याबरोबर ? आता तूच शोध तुला काय हवं ते !"
वैदेही म्हणाली, "तू माझी नोकर नाहीस पण आपण दोघी जिवलग मैत्रिणी होऊ शकतो."
शिल्पा म्हणाली, "मला तुझी गरज नाही. इथं मला खूप मैत्रिणी आहेत. तू दुसरी शोध कुणी तरी !"
वैदेही म्हणाली, "तुला शोधलं म्हणूनच तुझ्याकडे आले ना मी ? आजपासून तू माझी जीवलग मैत्रीण ! चल, दाखव, मला माझा वर्ग. बघ, बेलसुद्धा वाजली."
शिल्पा तिच्याच वर्गात होती. वैदेही तिच्याबरोबर वर्गात शिरली. एका मुलीशेजारी ती बसल्यावर वैदेही तिथे गेली आणि दुस-या मुलीला म्हणाली, "ए, उठ इथून. मला हिच्याशेजारी बसायचंय."
तिचे कपडे आणि तिचं रुबाबाचं बोलणं ऐकून ती मुलगी उठून दुस-या बाकाकडे गेल्यावर वैदेही तिथे बसली. शिल्पा रागाने म्हणाली, "तू खूप श्रीमंत आहेस म्हणून सगळ्यांवर रुबाब दाखवू नकोस."
वैदेही म्हणाली, "माझ्या श्रीमंतीचा मला तोरा नाहीये आणि सगळ्या मुलींवर नाही पण तुझ्यावर रुबाब दाखवण्यासाठीच मी या शाळेत शिकायला आलेय. समजल ?"
शिल्पा म्हणाली, "पहिल्याच दिवशी मला तुझा खूप राग आलाय. मला तुझा तिरस्कार वाटायला लागलाय. मी तुझा कायम तिरस्कार करत राहीन."
वैदेही हसत म्हणाली, "तू खुशाल कर माझा तिरस्कार पण मी तुझ्यावर प्रेम करायला लागलेय."
दुपारी शिल्पा आपल्या चार मैत्रिणीबरोबर डबा खायला बसली. तिथे जाऊन वैदेहीने तिला रुबाबात विचारलं, "मला डबा खायला का बोलावलं नाहीस तू ? यापुढे तू माझ्याबरोबर डबा खायचा."
वैदेहीने आपला डबा उघडला आणि तो शिल्पाला दिला आणि शिल्पाचा डबा जोर करून आपल्याकडे ओढून घेतला. पण भाकरी भाजीचा पहिलाच घास खाल्ल्यावर तिला जोरदार ठसका गेला. घाईघाईने आपल्या बाटलीतलं पाणी पिऊन ठसका थोडा शांत झाल्यावर ती म्हणाली, "इतकं तिखट खातेस तू ? माझा तर जीवच जायचा बाकी होता."
शिल्पा तिचा डबा खात म्हणाली, "आता समजलं ना, माझं जेवण किती तिखट असते ते ! मीपण तितकीच तिखट आहे. माझ्यापासून दूर राहा. नाही तर खरोखर एक दिवस तुझा जीव जायचा !"
वैदेही म्हणाली, "माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही."
शिल्पा म्हणाली, "तू जितकी मला जवळ करायला बघशील तितका मी तुझा रागराग करायला लागेन. मी तिरस्कार करते तुझा !"
डबा खाऊन शिल्पा पाण्याच्या नळाकडे गेली. वैदेहीनं तत्परतेने पुढे होऊन ग्लास पाण्याने भरून तिच्या हातात दिला. शिल्पा खूप वैतागली होती पण तिच्या हातातला ग्लास घेऊन ती पाणी प्याली.
डबा खाऊन झाल्यावर त्या वर्गात शिरल्या. शिक्षिकेने शिल्पाला विचारलं, "शिल्पा, तुझी आई पुस्तकं कधी घेऊन देणार आहे ? अजून सगळ्या वह्यासुद्धा आणत नाहीयेस."
शिल्पा म्हणाली, "बाई, आठ दहा दिवसांनी माझी आई घेऊन देणार आहे."
बाई म्हणाल्या, "ठीक आहे."
दुस-या दिवशी शाळेच्या कम्पाऊंडमध्ये आल्यावर वैदेही म्हणाली, "मम्मी, मला घ्यायला येऊ नकोस. मी शाळा सुटल्यावर शिल्पाबरोबर आधी तिच्या घरी जाईन, मग येईन मी घरी."
शाळा सुटल्यावर वैदेही म्हणाली, "शिल्पा, मला तुझ्या आईला भेटायचंय. चल, मी येते तुझ्याबरोबर सायकलीवर डबल सीट."
शिल्पा म्हणाली, "कशाला ? काही गरज नाही तू माझ्या आईला भेटायची. तुझा लोचटपणा पाहून मला तुझा जास्त जास्त राग येतो. माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा तिरस्कार वाढत चाललाय !"
वैदेही म्हणाली, "कशाला ऐकवतेस सत्रांदा ? माझा तिरस्कार करू नकोस असं मी तुला एकदा तरी बोललोय का ? तू माझा तिरस्कार जपत राहा, मी तुझ्यावर प्रेमच करत राहीन. चल, आता तुझ्या घरी !"
शिल्पा मनाविरुद्ध तिला आपल्या घरी घेऊन गेली. ती शिल्पाच्या आईला भेटली. थोड्या गप्पा मारल्या. तिला "ए आई" अशी हाक मारली. ''शिल्पा माझ्याशी खूप तुसडेपणाने वागते'' अशी तक्रारही तिने आईकडे केली. त्यावर शिल्पा म्हणाली, "मला आवडत नसताना ही गोचिडाप्रमाणे नुसती मला चिकटलीय मग राग नाही का येणार, आई ?
शिल्पाकडे गेल्यावर तिला तिच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आली. तिची आई एका खाजगी शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून काम करायची.
घरी गेल्यावर रात्री जेवताना ती पप्पांना म्हणाली, "पप्पा, शिल्पाची परिस्थिती तशी सो सो च आहे. मी तिच्या शिक्षणासाठी मदत करायचं ठरवलंय."
तिचे पप्पा म्हणाले, "जरूर कर. काय हवं नको ते मला, तुझ्या मम्मीला सांगत जा."
दुस-या दिवशी सकाळी शिल्पा शाळेत गेल्यावर वैदेही तिच्या घरी गेली आणि तिच्या आईला म्हणाली, "आई, शिल्पाला पहिल्या दिवशी पाहिलं त्या क्षणापासून मी तिच्यावर प्रेम करायला लागलेय. मागच्या जन्मी मी तिचं काही तरी देणं लागत असेन म्हणून मी तिचं ते कर्ज फेडण्यासाठी तिच्या आयुष्यात आलेय. आजपासून तिची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे असं मी समजते. मला काय करायचं ते करू दे. तू मला अडवू नकोस. ती तुझी मुलगी, तशी मीसुद्धा तुझी मुलगीच आहे, तुझं प्रेम मलाही हवंय."
असं म्हणून शिल्पासाठी आणलेली शाळेची पुस्तके, वर्कबुक्स, वह्या तिला देऊन वैदेही म्हणाली, "ही वह्या पुस्तके मी आणलीय हे तिला नाही सांगितलंस तरी चालेल."
दुस-या दिवशी आईबरोबर जाऊन स्वतःसाठी सायकल विकत आणली. दोन दिवस प्रॅक्टीस करून ती शाळेत सायकलने जायला यायला लागली. तिची आई तिच्या वागण्याने विचारात पडली होती पण ती चुकीचं काही करत नाही हे तिच्या लक्षात आल्यावर ती निर्धास्त झाली.
वैदेही सायकलवर आधी शिल्पाच्या घरी जायची व तिला घेऊन शाळेत यायची.
वह्या पुस्तके वैदेहीने आणली हे चार दिवसांनी समजल्यावर शिल्पा विचारात पडली. ही आपल्या इतकी जवळ यायला का बघते हा प्रश्न तिला पडला पण तिचा लोचटपणा पाहून शिल्पाच्या मनातला तिच्याबद्दलचा राग अजूनच वाढत होता.
दुस-या दिवशी शिल्पा मोठ्याबाईंकडे गेली आणि तिने वैदेहीच्या वागण्याबद्दल तक्रार करून म्हणाली, "मोठ्याबाई, मला तिचं वागणं सहनच होत नाही. मला खूप त्रास होतो. मी तिचा जास्त जास्त राग राग करायला लागलेय. तुम्ही तिला बोलवा आणि तिला चांगली समज द्या."
मोठ्याबाईं विचारात पडल्या. त्यांच्या लक्षात आलं होतं की शिल्पाला पाहून वैदेही भारावली होती आणि शिल्पाची सोबत मिळावी म्हणून तिने या शाळेत प्रवेश घेतला. ती शिल्पाला देत असलेला त्रास अनोखा होता. अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे कधी आलीच नव्हती. त्यांनी वैदेहीला बोलावलं.
ती आल्यावर मोठ्याबाईंनी विचारलं, "तू हिला का त्रास देतेस ? हिला तुझी मैत्री नकोय तरी तू सतत तिच्याजवळ का जात राहतेस ?"
वैदेही म्हणाली, "मोठ्याबाई, मी हिच्यावर खूप प्रेम करते."
मोठ्याबाई म्हणाल्या, "पण ही तुझ्या अशा वागण्याला लोचटपणा समजते आणि हिला तुझं वागणं आवडत नाही. ही तुझ्याशी तुसड्यासारखी वागते, तुझा रागराग करते, तुझा तिरस्कार करते हे तुझ्या लक्षात का येत नाही ?"
शिल्पाला एका हाताच्या कवेत घेऊन वैदेही म्हणाली, "मोठ्या बाई, मी हिला बोललेय का, माझा रागराग, तिरस्कार करू नकोस म्हणून ? विचारा हिला ! मग ही अशी कोण लागून गेलीय, मला प्रेम करू नको असं सांगणारी ?"
शिल्पाला अजून जवळ ओढत वैदेही म्हणाली, "माझी तक्रार करतेस का मोठ्याबाईंकडे ? चल, बाहेर चल, बघते तुझ्याकडे !"
वैदेही शिल्पाचा हात धरून तिला बाहेर घेऊन गेली. मोठ्याबाई चकित होऊन तिच्याकडे पाहातच राहिल्या !
वैदेहीने आपलं राहाणीमान बदललं होतं. ती साधेपणाने राहायला लागली होती. मधल्या सुट्टीत खाण्यासाठी तिच्या डब्यात साधी पोळी भाजी असायची. ती शिल्पाकडे जाताना साधे ड्रेस वापरायला लागली होती.
वैदेहीकडे एकदा हरिद्वारहून तिच्या वडिलांचे गुरु आले होते त्यामुळे घरात खूपच प्रसन्न व आनंदाचं वातावरण होते. घरातले सगळे त्यांना "बावाजी महाराज" असे संबोधायचे.
वैदेही शाळेतून आली. फ्रेश होऊन शुभ्र पांढरे कपडे परिधान करुन ती बावाजी महाराजांच्या खोलीच्या दरवाजाजवळ गेली. दरवाजा बंद पाहून तिथेच थबकली. दार वाजवू की नको या दुविधेत ती असतानाच आतून आवाज आला, "बेटी, रुक क्यो गई ? अंदर आ जावो."
दार उघडून ती आत गेली आणि त्यांच्या पायावर डोकं टेकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय दाबत ती तिथेच बसली.
बावाजी महाराजांनी विचारलं, "बेटी, तुला माहीत नाही असं काही जाणून घ्यायचंय का तुला ?"
ती म्हणाली, "हो, बावाजी महाराज ! तुम्ही सगळं जाणता. माझ्या जीवनात एक अनहोनी घडतेय. हे का घडतंय, यामागचे संकेत काय आहेत याचं मला आकलन होत नाहीये म्हणून मी थोडी अस्वस्थ असते."
वैदेहीने त्यांना शाळेच्या कम्पाऊंडमध्ये पहिल्यांदा गेली, शिल्पाला बघितलं तेव्हापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणाली, "बावाजी महाराज, मी तिच्यावर इतकं प्रेम का करायला लागले ? तिचे माझे हे कुठले ऋणानुबंध आहेत ? काय दडलंय या घटनांमागे ?"
बावाजी महाराजांनी त्यांच्या बॅगमधून एका छोट्या पिशवीमधले तांदूळ पाच बोटांनी उचलले आणि तिच्यासमोर पद्मासनात बसून ते म्हणाले, "बेटी, या घटनेतले संकेत काय आहेत यासाठी मी हे रमलाचे फासे टाकतो."
त्या तांदळाच्या दाण्याचे त्यांनी बराच वेळ निरीक्षण केलं. ब-याच वेळाने ते म्हणाले, "बेटी, या सगळ्या गोष्टींचा कार्यकारणभाव तुझ्या पूर्वजन्माशी जोडलेला आहे. तुला शिल्पाकडून काही तरी हवं आहे. मागच्या जन्मी ती गोष्ट तू अनेक वेळा मागूनही तिने तुला दिली नव्हती. त्यासाठी तुला पुन्हा जन्म घ्यावा लागला. या जन्मी तुला हवी ती गोष्ट तिच्याकडून नक्की मिळेल. तिला ती तुला द्यावीच लागेल पण बराच काळ तुला प्रतीक्षा करावी लागेल."
तिने विचारलं, "हे सगळं आणि मला काय हवंय हे मला कसं समजेल बावाजी महाराज ?"
ते म्हणाले, "मी इथून जाण्यापूर्वी असं काही तरी घडून येईल की जेणेकरून तू स्वतःच ते सगळं जाणून घेशील."
तिने विचारलं, "बावाजी महाराज, ती माझा इतका तिरस्कार का करते ?"
ते म्हणाले, "मी तुला बोललो ना, तू स्वतःच सगळं जाणून घेशील म्हणून ! जा, आता तुझ्या कामाला जा."
आठ दिवसांनी बावाजी महाराज जायला निघाले तेव्हा त्यांनी वैदेहीला विचारले, "बेटी, तुझा संभ्रम दूर झाला ना ?"
वैदेही म्हणाली, "हो, बावाजी महाराज, तुमचा असाच आशीर्वाद व कृपा माझ्यावर राहू द्या."
आठ एक दिवसांनी वैदेही नेहमीप्रमाणे शाळेत जाताना शिल्पाकडे गेली. तिची आई तापाने फणफणली होती. शिल्पा शाळेत येणार नव्हती.
वैदेही म्हणाली, "शिल्पा, तू शाळेत जायची तयारी कर. मी थांबते आईजवळ."
शिल्पा तडकून म्हणाली "ही माझी आई आहे. तुला का हिचा इतका पुळका आला ? शाळेत जाणं तुला तुझ्यासाठी महत्वाचं वाटत नाही का ?"
वैदेही म्हणाली, "ही माझी पण आई आहे. शाळेत जाणं मला इतकं महत्वाचं वाटत नाही. मी अकरावी झाले की माझ्या मम्मीला सांगणार आहे, की माझं लग्न करून दे म्हणून ! तुझं तसं नाही. तुला सी.ए. व्हायचंय. तुला खूप अभ्यास करायचाय. शाळा बुडवून तुला चालणार नाही. तू नीघ शाळेत जायला. मी आईची काळजी घेईन."
वैदेहीने तिला जबरदस्तीने शाळेत पाठवलं. आपल्या फॅमिली डाॅक्टरला बोलावलं. त्यांनी आईला तपासून इंजक्शन, औषधे दिली. ते म्हणाले, "काळजी करू नकोस. मी एक इंजक्शन दिलंय. हा साधा व्हायरल फिवर आहे. उद्या संध्याकाळपर्यंत या ब-या होतील."
शिल्पा शाळेतून येईपर्यंत वैदेही आईजवळ थांबली. तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या बदलत बसली. तिला दोन वेळेला पेज खाऊ घातली.
दुस-या दिवशीही तिने शिल्पाला जबरदस्तीने शाळेत पाठवलं व आईची काळजी घ्यायला तिथे थांबली. शिल्पा शाळेतून येण्यापूर्वी आईचा ताप पूर्णपणे उतरला होता. तिला खूप बरं वाटत होतं.
दुस-या दिवशी शिल्पा मोठ्याबाईंकडे गेली व काय झालं ते सांगून ती म्हणाली, "मोठ्याबाई, मला तिच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय."
मोठ्याबाई म्हणाल्या, "शिल्पा, मी यावर खूप विचार केलाय. ती असं का वागते हे मलाही कळत नाहीये. पण ती अगदी सहजपणानं वागते आणि तुझ्यावर खूप प्रेम करतेय हेच मला जाणवलंय. ती तुझं काहीही अहित तर करत नाहीये ना ?"
शिल्पा म्हणाली, "पण मोठ्याबाई, तिच्या अशा लोचट वागण्याने मला तिचा जास्तच राग यायला लागलाय. मला तिची मेहेरबानी नकोशी झालीय."
मोठ्याबाई म्हणाल्या, "तुला सी.ए. व्हायचंय ना, मग तुझ्या ध्येयाकडे तू लक्ष दे. माझ्या एक लक्षात आलंय की ती तुझ्यावरच्या प्रेमापोटी असं वागतेय. ती तुझ्यावर मेहेरबानी करतेय असं तिच्या वागण्या बोलण्यातून तुला कधी जाणवलंय का ?"
शिल्पा म्हणाली, "नाही मोठ्याबाई. तसं मला कधीच वाटलं नाही. उलट कधी कधी मला वाटतं की ती माझं दायित्व निभावतेय."
मोठ्याबाई म्हणाल्या, "मग तिला वागायचं तसं वागू दे. तू तिचा राग राग करतेस ना, मग तिचा राग करत राहा पण तिला, तिच्या वागण्या-बोलण्याला स्वीकार. एक गोष्ट विचारात घे. ती श्रीमंत आहे. हाय फाय स्कूलमध्ये इंग्लिश मिडियमला शिकत होती. एकदा तिने शाळेच्या कम्पाऊंडमध्ये तुला पाहिलं आणि तिला तुझी खूप ओढ वाटली. तुझ्यासाठी ती या शाळेत शिकायला आली. यामागे काही तरी तुमचे ऋणानुबंध असतील. ते तिलाही उमगले नसतील."
शिल्पा म्हणाली, "ठीक आहे मोठ्याबाई, तिला वागायचं तसं वागू द्या. मी मनात तिचा राग जपतच तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकते."
नंतर शिल्पाने तिच्या वागण्याबोलण्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. पण तिच्या मनातला राग, तिरस्कार कमी झाला नाही.
आपल्या वाढदिवसाला वैदेही तिला आपल्या घरी घेऊन गेली होती. तिचं वैभव पाहून शिल्पा चकित झाली होती. आपल्यासाठी ती किती साधी राहायला लागलीय हा विचार तिच्या मनात आला. ही आपल्याला इतकं का जपते हा प्रश्नही तिला पडला. तिला वैदेहीचं कौतुक वाटलं पण लगेच ती स्वतःला म्हणाली, "तुला तिचं कौतुक का वाटायला लागलं ? तू सांगितलंस होतंस का तिला असं साधं राहायला ?"
नंतर वैदेही तिला घरी सोडायला निघाली. तिने कार चालू केली तसं शिल्पानं विचारलं, "तू चालवणार आहेस का गाडी ? रस्त्यात कुठे धडक दिलीस तर ?"
वैदेही म्हणाली, "तुला साधं खरचटलं तरी माझा जीव जाईल. बैस गाडीत निमूटपणे !"
दोघी घरात शिरल्यावर वैदेही म्हणाली, "आई, तुझ्या पोरीला सुखरुप तुझ्या हवाली केलं बरं का !"
शिल्पा म्हणाली, "जाताना नीट, सावकाश गाडी चालव. नीट घरी जा."
वैदेही उघडपणानं तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च करत होती. तिने आईला सांगितलं, "शिल्पा सी.ए. होईपर्यंत मी तिचा सगळा खर्च करणार." हळुहळू शिल्पालाही सवय लागली. काही खर्च आला की ती वैदेहीलाच निःसंकाचपणे सांगायची. अगदी कधी कधी मला ड्रेस घ्यायचाय, मला जिन्स घ्यायच्या आहेत, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय असं हक्काने सांगू लागली.
वैदेहीचा गणित हा विषय थोडा कच्चा होता. शिल्पा काॅमर्स काॅलेजला जाणार, आपलंही गणित चांगलं झालं तर आपल्यालाही तिच्याच काॅलेजला शिकता येईल. त्यासाठी आपल्याला आपलं गणित पक्कं करायला हवं असं तिला वाटलं. तिने गणितात आपली आवड निर्माण केली. दहावीला तिची इतर विषयाप्रमाणे गणिताचीही प्रगती पाहून तिच्या वर्गशिक्षिका आणि मोठ्याबाईसुद्धा चकित झाल्या.
अकरावी बोर्डाच्या परीक्षेत वैदेहीने शिल्पाच्या बरोबरीने चांगले मार्क मिळवले आणि दोघींनी एकाच काॅलेजात काॅमर्सला प्रवेश घेतला.
शिल्पा म्हणाली, "मला वाटलं होतं की काॅलेजला तरी तुझी कटकट, साडेसाती माझ्यामागे राहाणार नाही पण मी तेवढी नशीबवान नाहीये !"
वैदेही म्हणाली, "आता फक्त पुढची चारच वर्षेच नाही तर तुझ्यामागची माझी कटकट, साडेसाती आयुष्यभर जाणार नाही. मी तुला कधी सोडणारच नाही."
शिल्पा म्हणाली, "मी सी.ए. झाले की आईला घेऊन अशा शहरात जाईन की तू मला शोधूच शकणार नाहीस. माझा फोन नंबरही तुला कळवणार नाही."
वैदेही म्हणाली "तू फक्त स्वप्न पाहत राहा. तू असं काही करणार नाहीस. तरी तू तसं करायला जाशील तर तुझ्यापायी मी जीव दिला हे तुला कधी तरी समजेलच !"
शिल्पा म्हणाली, "धमकी देऊ नकोस."
वैदेही म्हणाली, "मी धमकी देत नाही तर तू तसं केलंस तर काय परिणाम होतील हे तुला सांगतेय."
चार वर्षांनी दोघी बी.काॅम झाल्या. या चार वर्षात वैदेहीने शिल्पाच्या शिक्षणाचा सगळा खर्च तर केलाच पण तिचं राहणीमानही चांगलंच बदलवलं. वैदेही तिला चांगले, महागडे ड्रेस घेऊन द्यायची. इतक्या वर्षात वैदेही करत असलेला खर्च तिच्या अंगवळणी पडला होता. वैदेही आपल्यावर मेहेरबानी करतेय या भावनेचा मागमूसही शिल्पाच्या मनात नव्हता.
बी.काॅम झाल्यावर वैदेहीचं लग्न जमलं. फार आधीपासून कौटुंबिक संबंधात असलेल्या तिच्या वडिलांच्या जवळच्या मित्राच्या मुलगा रोहीतबरोबर तिचं लग्न झालं. त्याच्या वडिलांचा पुण्याला फार्मसीचा बिझीनेस होता. तो एक गायनाकाॅलोजिस्ट होता. घरात सासू सासरे, छोटा दिर व मोठी लग्न झालेली बहीण होती. तिची नणंद एक नामवंत, तज्ज्ञ न्युरो सर्जन होती व मुंबईला जसलोक, नानावटी, बाॅम्बे, केईएम अशा ब-याच हाॅस्पिटलला ती अॅटॅच्ड होती.
लग्न झाल्यावर वैदेही पुण्याला जायला निघाली तेव्हा शिल्पा म्हणाली, "चला, तू पुण्याला राहाणार म्हणजे माझ्यामागची साडेसाती दूर झाली. आता पुण्याला राहून माझ्या आयुष्यात ढवळाढवळ तरी करणार नाहीस !"
वैदेही म्हणाली, "नको ती स्वप्नं पाहू नकोस. मी मरेपर्यंत तुझ्या आयुष्यातून जाणार नाही. तू माझ्यावर प्रेम करायला लागशील त्या दिवसाची मी वाट पाहत राहीन."
शिल्पा म्हणाली, "तूसुद्धा नको ती स्वप्नं पाहू नकोस. तुझ्याबद्दलचा माझ्या मनातला राग मी मरेपर्यंत तरी जाणार नाही."
वैदेहीची आई म्हणाली, "शिल्पा, इथेही भांडत बसलीस तिच्याशी ? तिला खुशीने, आनंदाने जाऊ दे ना तिच्या नव-याबरोबर !"
वैदेही नव-याबरोबर स्विट्झरलँडला हनिमूनला गेली होती. तिथूनही ती दररोज शिल्पाला फोन करायची. एकदा फोनवर शिल्पा म्हणाली, "हनिमूनला गेलीयंस ना, मग नव-याबरोबर मजा करायची सोडून मला का आठवत बसतेस ?"
वैदेही म्हणाली, "मी रोहीतबरोबर मौजमजा, मस्ती करतेच आहे पण तो माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी नऊ वर्षापासून तू माझ्या आयुष्याचा भाग झाली आहेस मग तुला कसं विसरू मी ?मी आनंदात आहे, तू तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा तिरस्कार, राग विसरून माझ्या आनंदात सहभागी व्हावंस असं मला वाटतं."
शिल्पा म्हणाली, "तू कधीही पूर्ण न होणारी स्वप्नंच का पाहत राहातेस ?"
वैदेही म्हणाली, "माझं तुझ्यावरचं प्रेम निस्सीम आणि निर्हेतुक असेल तर तू एक दिवस माझं स्वप्न पूर्ण करशील !"
भारतात घरी परतल्यावर वैदेही दररोज रात्री आठ वाजता शिल्पाला फोन करायची.
तीन वर्षांनी वैदेहीला मुलगा झाला. तिचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्याच दिवशी शिल्पाने ती सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याची खुशखबर तिला सांगितली. तिच्या मुलाचं आशुतोष हे नाव शिल्पानं ठेवलं.
शिल्पा नाशिकच्याच समीर नावाच्या तरुणाच्या टॅक्स कन्सल्टन्सी फर्मला नोकरीला लागली होती. चार सहा महिन्यात कळत नकळत तिला समीर आवडू लागला. ती त्याच्या प्रेमात पडली. महिन्याभरात तिलाही जाणवायला लागलं की त्यालासुद्धा आपली ओढ वाटतेय. तोसुद्धा आपल्यात गुंतत चाललाय पण त्याबद्दल काही संकेतही द्यायला दोघेही धजावत नव्हते. स्वतः पुढाकार घ्यायला तिचं मन खूपच संकोचत होतं.
एकदा वैदेहीशी फोनवर बोलताना शिल्पा नकळत समीरबद्दल भरभरून बोलली. वैदेहीला जाणवलं की ती त्याच्यात गुंतलीय. ती आपलं अव्यक्त प्रेम व्यक्त करायला काहीशी उतावीळ, आतुर झालीय पण तिला धाडस होत नाहीये हे वैदेहीच्या लक्षात आलं.
दोन दिवसांनी वैदेही नाशिकला संध्याकाळी पाच वाजता शिल्पाच्या ऑफिसला गेली. तिला अचानक आलेलं पाहून शिल्पा चकित झाली.
दोघी बोलत बसल्या होत्या तिथे समीर आला. शिल्पाने समीरची ओळख करून दिली आणि हसतच म्हणाली, "ही माझ्यामागची माझी साडेसाती आहे. बाकी हिची वेगळी ओळख देण्याचं काही प्रयोजन नाहीये."
वैदेही म्हणाली, "समीर, माझं नाव वैदेही आहे. मी पुण्याला राहाते. मी हिला तीन दिवस पुण्याला घेऊन जायला आलेय. हिच्यासाठी मी एक चांगला मुलगा शोधलाय. खूप शिकलेला आहे. त्याचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी आहे. स्वभावानेही तो चांगला आहे. मला पसंत आहे म्हणजे हिला पसंत पडेलच. मी त्या मुलाशी बोलले, त्याला हिचे फोटो दाखवले. त्याला ही पसंत पडलीय. परवा हिचा आणि त्या मुलाचा साखरपुडा करायचं मी ठरवलंय. तुम्ही तीन दिवस हिला रजा द्या."
वैदेहीचं बोलणं ऐकून शिल्पा चकित झाली पण काही बोलली नाही.
वैदेहीचं बोलणं ऐकून समीर अस्वस्थ झाला. आपण शिल्पाला पसंत करतोय, तिच्यावर आपण प्रेम करायला लागलोय. आपलं प्रेम व्यक्त करायला आपण संकोचत होतो. ही वैदेही तिचं लग्न करायचं ठरवतेय. आपल्याला आपलं प्रेम व्यक्त करायला हवं असं त्याला प्रकर्षाने जाणवलं.
दोघी घरी आल्यावर रात्री आठ वाजता समीरचा फोन आला. वैदेहीने तत्परतेने फोनचा स्पिकर चालू केला. तो म्हणाला, "दोन दिवस ऑफिसात थोडं जास्त काम आहे. तुला रजा द्यायला जमेल असं मला वाटत नाही."
शिल्पा म्हणाली, "तू मला हे काही सांगू नकोस. तू तेव्हाच वैदेहीला का बोलला नाहीस ? तिने ठरवलंय तसंच ती वागणारच आहे. तू बोल तिच्याशी. मी तिला फोन देते."
फोन घेऊन वैदेही म्हणाली, "तुम्ही काय बोलला ते ऐकलं मी. पण मी सगळं ठरवून बसलेय. मला मुलगा पसंत आहे. उद्या सकाळी मी शिल्पाला घेऊन जाणार आहे. तुमच्या ऑफिसमध्ये थोडं जास्त काम असेल. तुमचं काम तुम्ही सांभाळून घ्या. नाही तरी तिचं लग्न झाल्यावर ती पुण्याला राहील म्हणजे तुमची नोकरी तिला सोडावी लागणारच आहे ना ?"
थोडा वेळ गप्प बसून तो म्हणाला, "मला तुमचा पत्ता सांगा. मी आता तुम्हाला भेटायला येतो. मला महत्वाचं बोलायचं आहे."
अर्ध्या तासात समीर आला. थोडं अवांतर बोलून तो म्हणाला, "मी तुम्हाला हिला घेऊन पुण्याला जाऊ देणार नाही. ऑफीसचं काम महत्वाचं नाहीये पण हिला मी माझ्या आयुष्यातूनच जाऊ देणार नाही. मी हिच्यात गुंतलोय, हिच्यावर प्रेम करतोय. हीसुद्धा माझ्यात गुंतलीय हे मला सतत जाणवतं. मला हिच्याशी लग्न करायचंय."
वैदेही म्हणाली, "मग तुम्ही हे आधी नाही का सांगायचं होतं ? आधीच तुमचं प्रेम व्यक्त केलं असतंत तर मला कशाला खटाटोप करावा लागला असता ? मला तुम्ही तोंडघशी पाडलंत."
तो म्हणाला, "माझं चुकलं. हिच्यावरचं माझं प्रेम व्यक्त करायला मी धजावलो नाही."
वैदेही म्हणाली, "पण शिल्पा, तू तयार आहे का याच्याबरोबर लग्नाला ?"
शिल्पा अडखळत म्हणाली, "हो, मीसुद्धा याच्यावर प्रेम करायला लागलेय."
वैदेही म्हणाली, "खरं सांगू, तू शिल्पाच्या प्रेमात पडलायंस हे हिला जाणवलं होतं. ही माझ्याशी तुझ्याबद्दल भरभरून बोलली तेव्हाच मला जाणवलं की ही तुझ्या प्रेमात पडलीय. ही आपलं प्रेम व्यक्त करायला धजावणार नाही म्हणून तुमच्या दोघांतली कोंडी फोडण्यासाठीच हे असं नाटक करायचं ठरवून इथे आले याची हिलाही कल्पना मी येऊ दिली नाही."
समीर म्हणाला, "म्हणजे तुम्ही नाटक करत होता ?"
वैदेही म्हणाली, "मला तू म्हण. मला ओपचारिकपणा अजिबात आवडत नाही. हो, तुमची मनं मोकळी होण्यासाठी मी नाटकच केलं. मला समाधान आहे हिचं तुझ्याबरोबर लग्न होतंय याचा !"
दुस-या दिवशी शिल्पा ऑफिसला गेल्यावर समीर म्हणाला, "किती अनपेक्षितपणे आपलं प्रेम व्यक्त झालं ना ! मानलं पाहिजे तुझ्या वैदेहीला ! ती तुझ्यावर खूप प्रेम करतेय हे लक्षात आलं माझ्या !"
शिल्पा म्हणाली, "समीर, आपण लग्न करणार आहोत. केव्हा ना केव्हा तुला तिच्याबद्दल सांगावं लागणार आहेच ते मी आजच सांगते."
ती पुढे म्हणाली, "समीर, ती माझ्यावर खूप प्रेम करते हे तुला जाणवतं पण तिच्या प्रेमात माझ्याबद्दलचं दायित्व पार पाडण्याची भूमिका जास्त आहे. तसं म्हणशील तर तिचं माझं कोणतंही नातं नाहीये. मी दहावीत गेल्यापासून माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च ती उचलत आलीय. सी.ए. होण्यासाठी क्लास, पुस्तके याठी किती मोठा खर्च होतो हे तुला माहीत आहे. आम्ही भेटलो त्या दिवसापासून ती माझ्यावर खूप प्रेम करत आली तरी माझ्या मनात मात्र तिच्याबद्दल तिरस्काराची, रागाचीच भावना उमटली होती. ती माझ्या आयुष्यात दररोज ढवळाढवळ करायला लागली मग माझ्या मनातला तिच्याबद्दल राग वाढतच गेला. पण मी तिला माझ्या आयुष्यातून दूर केलं नाही, तिला तोडलं नाही. तिला दूर करावं अशी भावना माझ्या मनात कधी उमटलीच नाही. तिचा रुबाब झेलतच जगत आले. तिचं लग्न झाल्यावर माझ्या मनातला तिरस्कार बराचसा सौम्य झालाय हे मला जाणवायला लागलंय. तिने माझ्यासाठी जे जे केलं त्याला मी तिची मेहेरबानी समजत नाही. ती तिचं दायित्व निभावतेय असं मी समजत गेले. तीसुद्धा तेच म्हणतेय. तिला विश्वास आहे की एक दिवस मी तिच्यावर प्रेम करायला लागेन पण मला तसं वाटत नाही. समीर, आमच्या नात्यामागे नेमका कार्यकारणभाव काय आहे हे मला तरी अनाकलनीय आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम भावना, आत्मियता का उचंबळून येत नाही हेसुद्धा माझ्यासाठी एक कोडंच आहे. कधी कधी तिच्या वागण्याने बोलण्याने मला शंका यायची की आमच्या ऋणानुबंधामागचा कार्यकारणभाव तिला माहीत आहे म्हणून ती माझ्यावर प्रेम करते, माझं दायित्व निभावत आलीय."
समीर म्हणाला, "खूप विलक्षण आहे तुमचं नातं ! त्यातली गुढता कधी उकलेल असं मला वाटत नाही. तू म्हणतेस तसं तिला माहीत असेल आणि तिने ती उकलली तर गोष्ट वेगळी ! मलाही वाटतं की ती सगळं जाणून असणार, त्याशिवाय इतकं कुणी कुणासाठी का करेल ?"
एक महिन्याने शिल्पा व समीरचं लग्न झालं. वैदेहीने दोघांना स्विट्झरलँड हनिमूनला जाण्याची सगळी व्यवस्था केली.
वैदेही दररोज तिला फोन करायची. एकदा शिल्पा म्हणाली, "कशाला त्रास देत राहातेस ? तूच आम्हाला हनिमूनला पाठवलंस ना, मग एन्जाॅय करू दे ना मला समीरबरोबर !"
वैदेही म्हणाली, "तुला एन्जाॅय करायलाच पाठवलंय. पण तू मला विसरू नये म्हणून तुला फोन करत राहते. चल, लव्ह यू, बाय."
नंतर वैदेही दररोज रात्री आठ वाजता शिल्पाला फोन करायची पण शिल्पा तिला कधीच फोन करत नसे.
एकदा शिल्पाने फोन उचलताच वैदेही म्हणाली, "इतका वेळ लागतो फोन घ्यायला ? तुझे हात काय जड होतात का गं माझा फोन आल्यावर ? आणि काय गं, काल आणि आज सकाळी मी तुला फोन लावला. तू काय फोन बंद करून बसली होतीस का ?"
शिल्पा म्हणाली, "किती प्रश्न विचारतेस गं, एका वेळी ! काल आम्ही बाहेर गेलो होतो. तिथे फोनला रेंज नसेल."
वैदेही म्हणाली, "खोटं बोलू नकोस. बाहेर म्हणजे कुठे गेली होतीस ? डाॅक्टरकडे तर गेली नव्हतीस ना ? तुझी तब्येत बरी आहे ना ? मला खरं सांग, तब्येत बरी नसेल तर मी येते तुला भेटायला."
शिल्पा म्हणाली, "ए बाई, माझी तब्येत चांगली आहे. तू काही येऊ नकोस आणि फुकटची कळकळही दाखवू नकोस. नाटकी ! दुसरं काही बोलायचं नसेल तर ठेव आता फोन."
दोन वर्षांनी शिल्पाला मुलगी झाली. वैदेहीने तिचं नाव "अनन्या" असं ठेवलं. समीर हसत म्हणाला, "तू तर आईला आपल्या बाळाचं तिच्या पसंतीचं नावही ठेवू दिलं नाहीस."
वैदेही म्हणाली, "मी ठेवलेलं नाव तिलाही पसंत पडलंय. विचार हवं तर तिला !"
शिल्पा म्हणाली, "दुसरं नाव माझ्या मनात होतं पण अनन्या हे नावही मला आवडलं. पारबती मातेचं ते नाव आहे."
दिवस जात होते. अनन्या सहा वर्षांची झाली तेव्हा वैदेही आशुतोषला घेऊन राखी पौर्णिमेला शिल्पाकडे गेली आणि तिने अनन्याला त्याला राखी बांधायला सांगितलं.
राखी बांधून झाल्यावर ती म्हणाली, "आजपासून तुम्ही दोघे बहीण भाऊ आहात. एकमेकांची साथ सोडायची नाही, एकमेकांना अंतर द्यायचं नाही."
नंतर भाऊबिजेलाही तिने अनन्याकडून आशुतोषला ओवाळून घेतलं होतं. नंतरच्या वर्षी तिने राखी पौर्णिमेला अनन्याला घेऊन माझ्याकडे ये असं शिल्पाला फोनवर सांगितलं.
आशुतोषला आणि अनन्याला बहीण भावाच्या नात्याने बांधायला वैदेही जाणीवपूर्वक पावलं उचलतेय असं शिल्पाला प्रकर्षाने जाणवलं. तिला आश्चर्य वाटलं.
पुण्याला गेल्यावर संध्याकाळी दोघीच खाली गार्डनमध्ये बसल्या होत्या. थोडं अवांतर बोलणं झाल्यावर शिल्पा म्हणाली, "काय गं, आशुतोषला अनन्याने राखी बांधावी यासाठी तू इतकी का तडफडतेस ? ती दोघं मोठी झाल्यावर त्यांना ठरवू दे ना, त्यांनी कोणत्या नात्याने वागायचं ते ! लहानपणापासून दोघं एकमेकांच्या संपर्कात राहिली तर कदाचित एकमेकांवर प्रेम करायला लागतील. लग्नही करतील, सुखाने राहातील. ती तुला सून म्हणून चालली नसती का ?"
वैदेही म्हणाली, "मला तेच नातं नकोय म्हणून मी आतापासून दोघांना बहीण भावाच्या नात्याची जाणीव करून देतेय."
शिल्पाने विचारलं, "हो, पण का ? मला अनन्या झाली तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की ती तुला सून म्हणून शोभून दिसेल."
वैदेही म्हणाली, "मूर्खासारखं वाटेल ते बरळू नकोस. तुझी मुलगी म्हणजे माझीच मुलगी ना ? मग माझ्याच मुलीला मी सून करून घेऊ का ?"
वैदेहीच्या बोलण्याने शिल्पा विचारात पडली. ती वेगळं काही सूचित करतेय असं तिला वाटलं.
शिल्पा म्हणाली, "वैदेही, गेली वीस वर्षे तू माझ्यावर प्रेम करत आलीयेस. माझं दायित्व उचलत आली आहेस पण माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा राग, तिरस्कार काही गेला नाही. तुला नाही वाटत का की मीसुद्धा तुझ्याच भावनेत तुझ्याशी जगावं असं ?"
वैदेही म्हणाली, "मला काही फरक पडत नाही. मला माझ्याच भावनेत जगायचंय. तू माझ्यावर प्रेम करत नसशील पण माझ्या तालावर नाचत आलीयेस हे काय कमी आहे ? मी समाधानी आहे."
शिल्पा म्हणाली, "मी तुझ्या तालावर नाचते हा तुझा भ्रम आहे."
वैदेही म्हणाली, "तो भ्रम नाही तर तेच सत्य आहे. माझा संबंध तोडून टाकण्याचा विचार तुझ्या मनात एकदाही डोकावलेला नाहीये हे वास्तव आहे ना ?"
शिल्पा म्हणाली, "हो, माझ्या मनाला तसा विचार कधी शिवलाच नाही हे खरं आहे. याचा अर्थ मी तुझ्यावर प्रेम करायला लागलेय असा होत नाही. मी तुझ्यावर प्रेम करावं असं तुला वाटत असेल तर मला सांग, माझी मुलगी अनन्या तुझीच मुलगी आहे असं मानण्यामागे नेमकं काय कारण आहे ? गेली वीस वर्षे तू माझ्यावर प्रेम करत आलीयंस, माझं दायित्व निभावत आली आहेस त्याचं कारणही मला सांगायचंस. आज मला जे खरं आहे ते सगळं सांग."
वैदेही म्हणाली, "शिल्पा, हे सगळं का घडतंय, यात काय रहस्य दडलंय हे मलाही माहीत नाही. यावर मी कधी विचारही केला नाही. जे घडत गेलं, जसं घडत गेलं त्या प्रवाहात मी वाहात गेले इतकंच ! अनन्या माझीच मुलगी आहे हे मात्र खरं आहे."
शिल्पा गप्प बसली पण तिला खात्री होती की वैदेही सगळं जाणून आहे. तिने जाणूनबूजून दोघांना बहीण भावाच्या नात्याच्या बंधनात जोडलंय !
काळ उलटत होता. आशुतोष, अनन्या मोठे होत होते. ते दोघे दररोज एकमेकांना फोन करत. दोघांमध्ये बहीण भाऊ नात्याचं बंधन दृढ झालं होतं. तो एम.डी. डाॅक्टर झाला होता.
इंजिनीअरिंग पूर्ण करून प्रदव्युत्तर शिक्षणासाठी अनन्याला पुण्याला काॅलेजात अॅडमिशन मिळाली होती. वैदेहीने तिला अट्टाहासाने होस्टेलवर राहू न देता आपल्याकडेच राहायला भाग पाडलं होतं. अनन्याचा शिक्षणाचा कोणताही खर्च करायचा नाही, ते समीरला आवडणार नाही या अटीवर शिल्पाने अनन्याला वैदेहीकडे राहायला परवानगी दिली होती. अनन्या तिच्याकडे आनंदाने राहात होती.
अनन्या वैदेहीकडे राहात असूनही शिल्पा वैदेहीला आणि अनन्याला फोन करत नसे. वैदेही तिला दररोज फोन करायची त्यावेळी शिल्पा आईबरोबर बोलायची. शिवाय दिवसातून एक दोन वेळा अनन्या आई बाबांना फोन करत असे.
आशुतोषचं लग्न झालं तेव्हा शिल्पा वैदेहीला म्हणाली, "खूप खुश दिसते आहेस तू !"
वैदेही म्हणाली, "माझ्या मुलीचं लग्न होईल तेव्हा मी यापेक्षा जास्त खुश असेन. त्यावेळी तू असं कुचकंपणाने मला टोचणार नाहीस हे मला माहीत आहे."
दोन वर्षांनी अनन्याने प्रेमविवाह केला आणि ती नव-याबरोबर हैदराबादला राहायला गेली होती. अनन्याच्या लग्नाने वैदेही खरोखर खूप खुश आहे हे शिल्पाला प्रकर्षाने जाणवलं तेव्हा शिल्पा तिला म्हणाली, "पस्तीस वर्षे होऊन गेली. आता तरी मला समजू दे ना आपल्यातल्या ऋणानुबंधामागचा कार्यकारणभाव ?"
वैदेही म्हणाली, "मलाही ते माहीत नाही पण यामागचं रहस्य उलगडलं तर मी लगेच तुला सांगेन. अजूनही माझा राग राग, तिरस्कार करतेस का ?"
शिल्पा म्हणाली, "त्याची तीव्रता तशी कमी झालीय पण तुझ्याबद्दल मला अजूनही प्रेम, आत्मियता वाटत नाही."
वैदेही बोलून गेली, "तुला तसं नाहीच वाटणार ! माझा राग, तिरस्कार करायचा हेच तुझ्या मनात घट्ट रुजवून तू जन्म घेतला आहेस. आपल्या पहिल्या भेटीपासून तू तेच जगत आलीयंस ना ?"
शिल्पा म्हणाली, "काय बोललीस तू ? माझ्या मनात तुझ्याबद्दलचा राग, तिरस्कार घट्ट रुजवूनच मी जन्म घेतलाय असं म्हटलंस तू ?"
वैदेही भानावर येऊन म्हणाली, "अगं, सहज मनात आलं ते बोलून गेले."
शिल्पा म्हणाली, "तुला सगळं माहीत आहे हे मी जाणून आहे. नको सांगूस, पस्तीस वर्षे मी जाणून घ्यायची प्रतीक्षा करत आलेय. मी अजून काही वर्षे वाट पाहीन. कधी तरी तू सांगशीलच !"
एकदा आपल्या व्यापातून काही दिवस निवांत होण्यासाठी समीरचा आतेभाऊ भास्कर आपल्या बायकोला, सवितेला घेऊन समीरकडे आला होता.
रात्री जेवताना शिल्पाचा फोन वाजला. शिल्पानं फोन हातात घेतला. तिची आतुरता बघून भास्कर म्हणाला, "अगं, तू जेवतेयंस ना ? जेवताना तरी फोन बाजूला ठेवत जा."
शिल्पानं वैदेहीचे दोन मोबाईल नंबर मराठीत "साडेसाती" व "कटकट" या नावाने सेव्ह केले होते. आपला फोन भास्करला दाखवून ती म्हणाली, "बघ, कुणाचा फोन आहे ते !"
मोबाईल पाहून भास्कर म्हणाला, "कटकट ? कोण आहे ही कटकट ?"
"सांगते नंतर !" असं म्हणून शिल्पाने फोन घेतला आणि स्पीकर ऑन केला.
वैदेही म्हणाली, "काय गं, इतका वेळ लागतो माझा फोन उचलायला ? तुझा हात जड झालाय की तुझं डोकं ?"
शिल्पा म्हणाली, "ए बाई, समीरचा आत्येभाऊ भास्कर त्याच्या बायकोला घेऊन आलाय. आम्ही चौघं जेवायला बसलोय."
वैदेही म्हणाली, "म्हणून माझ्या फोनकडे दुर्लक्ष करायला निमित्त शोधलंस का ?"
शिल्पा म्हणाली, "ए बाई, अगं आपण केव्हाच पन्नाशी पार केलीय. आता तरी मला जाब विचारत जगणं कमी कर ना !"
वैदेही म्हणाली, "नको त्या अपेक्षा तू बाळगत बसू नकोस. आज एक खास आनंदाची गोष्ट तुला सांगायचीय. आज माझ्या मुलीचा फोन आला होता. ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी तिने मला सांगितली. म्हटलं, तुलाही माझ्या आनंदात सामील करून घ्यावं !"
शिल्पा म्हणाली, "खूप आनंदाची बातमी दिलीस पण तेसुद्धा मला हिणवून आणि डिवचूनच ना !"
वैदेही म्हणाली, "मी काय हिणवलं ?"
शिल्पा म्हणाली, "माझी मुलगी अनन्या गरोदर आहे हे तिने तुला आधी सांगितलं म्हणून तू मला इतकी आनंदाची बातमी असं डिवचतच सांगितलीस ना ?"
वैदेही म्हणाली, "मी कशाला डिवचू तुला ? तुला माहीत आहे, ही इतक्या आनंदाची गोष्ट ती आधी मलाच सांगणार ते ! आता तिला केव्हा जाऊन भेटते असं मला झालंय. आपण उद्या जाऊ या का तिला भेटायला ?"
शिल्पा म्हणाली, "तिला भेटायची ओढ माझ्या मनातही दाटून आलीय पण भास्कर आठ दहा दिवसांसाठी निवांत व्हायला इथे आलाय. त्यामुळे पंधरा दिवस तरी मला माझ्या मनातल्या ओढीला आवरून ठेवावं लागेल."
वैदेही म्हणाली, "तुझं तू बघत बस. मी तर बाई, तिला कडकडून मिठी मारायला खूप आतुर झालेय. मी उद्या सकाळी सातच्या फ्लाईटने हैदराबादला जातेय. परवा संध्याकाळी परत येईन. तू बस तुझ्या भास्करला का फास्करला सांभाळत !"
वैदेहीने फोन ठेवल्यावर भास्कर म्हणाला, "समीर शिल्पा, दोघांचंही मनापासून अभिनंदन ! तुम्ही आजोबा आजी होणार ही किती आनंदाची बातमी आहे ! वा !!"
दोघांनीही त्याला धन्यवाद दिले. भास्कर म्हणाला, "अगं, कोण आहे ही तुझी कटकट ?"
ती म्हणाली, "थांब, आधी अनन्याला फोन लावते."
अनन्याला फोन लावून ती म्हणाली, "तू खूप आनंदाची बातमी दिलीस तुझ्या मावशीला. आताच तिने मला मुद्दाम फोन करून सांगितलं. आनंदाची बातमी समजली हे महत्वाचं ! कुणाकडूनही समजली तर त्याने काय फरक पडतो ? आपली मुलगी पहिल्यांदा गरोदर राहाणं यासारखं आयुष्यात दुसरं सुख कोणतंच नाही. मी आणि तुझे बाबा खूप खुश आहोत. तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन !"
अनन्या म्हणाली, "ए, या आनंदाच्या प्रसंगी मावशीवर चरफडू नकोस. मी तुला फोन करत होते पण तुझा फोन लागला नाही. बाबांनाही फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. मग मी तिला फोन केला."
शिल्पा म्हणाली, "आम्ही खरोखर खूप खुश आहोत. तुझी लाडकी मावशी येतेय, उद्या तुला भेटायला. तुझे भास्करकाका काकूंबरोबर आलेत इथे. म्हणून मला यायला जमणार नाही."
अनन्या म्हणाली, "तू येऊ पण नकोस. मीच पंधरा दिवसांनी येते तुला भेटायला !"
नंतर आपल्या बाबांशी बोलून तिने फोन ठेवला.
समीर म्हणाला, "शिल्पा, मला खूप आनंद झाला. खूप खुश आहे मी ! आपली अनन्यापण खूप खुश होती."
शिल्पा म्हणाली, "हो समीर, मीसुद्धा खूप खुश आहे."
भास्कर म्हणाला, "शिल्पा, या तुझ्या कटकटीबद्दल जाणून घ्यायला मी अजूनच उत्सुक झालोय. तुझ्याशी किती रुबाबात बोलत होती ती ! तिचं सगळं बोलणं ऐकून मला बरेच प्रश्न पडलेत. अनन्याचंही मला नवल वाटतंय. तिने ही आनंदाची गोष्ट आधी तुझ्या कटकटीला सांगितली म्हणून तिच्यावर चरफडू नकोस असं म्हणून तुलाच दटावलं तिने !"
शिल्पा म्हणाली, "आता जेवून घे. रात्री आपण निवांत गप्पा मारत बसू ना तेव्हा सांगते, माझ्या कटकटीबद्दल !"
रात्री सगळं काम आटोपून शिल्पा हाॅलमध्ये आली. तेव्हा तिघे गप्पा मारत बसले होते.
शिल्पा म्हणाली, "काय ऐकायचंय तुला तिच्याबद्दल ? ती खरोखर माझ्या आयुष्यातली एक कटकटच आहे. माझ्या मागची साडेसाती आहे. मी आमच्या पहिल्या भेटीपासून तुला सगळं क्रमवार सांगते."
शिल्पा जवळ जवळ एक तासभर सलग बोलत होती. भास्करसुद्धा मध्ये मध्ये तिला प्रश्न विचारून अजून जास्त खुलासा करून घेत होता आणि प्रत्येक घटनेचं विश्लेषण तो आपल्या परीने स्वतःशीच करत होता.
आपली Life story त्याला सांगून शिल्पा म्हणाली, "बोल, तू सायकॅट्रिस्ट आहेस ना, मग कसं विश्लेषण करशील माझ्या आयुष्यात घडत गेलेल्या या घटनांचे ? काय दडले असेल या अविरत घडत गेलेल्या घटनांमागे ?"
भास्कर म्हणाला, "तुझ्या कथितामध्ये मला काही अहं मुद्दे दिसले हे आधी तुला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ती तुझ्यावर अतोनात प्रेम करते, तुझं दायित्व ती निभावत आलीय, अगदी तू पंधरा वर्षांची होतीस तेव्हापासून तरी तू तिचा राग राग, तिरस्कार करायचीस पण तू तिच्याशी संबंध तोडले नाहीस हे खूप महत्वाचं आहे. तिचं रुबाबाचं वागणं बोलणं तू झेलत आलीस कारण तिच्या वागण्या बोलण्यात तुझ्याबद्दल प्रचंड प्रेम होतं याची जाणीव तुझ्या अंतःर्मनाला झाली होती. दुसरा मुद्दा म्हणजे आशुतोष व अनन्याला बहीण भावाच्या नात्याने बांधायला तिने जाणीवपूर्वक पावलं उचलली. याचा अर्थ त्या दोघांचे शरीर संबंध येऊ नये यासाठी ती धडपडत होती. त्या दोघांमध्ये रक्ताचं कोणतंही नातं नसतानाही त्या दोघांमध्ये शरीर संबंध घडून येणं हे तिच्या दृष्टीने अवैध व निंद्य होतं. याचा अर्थ म्हणजे तिचं तुझ्याशी रक्ताचंच नातं आहे, किंवा तुमचं नातं नवरा बायकोचं आहे हे मानूनच ती जगत आलीय. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिने तुझ्याबरोबरचे ऋणानुबंध हे आई वडिलांच्या घरी आणि नंतर नव-याच्या घरी राहून अव्याहत जपले. याचा अर्थ तिची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की तिच्यासोबतची माणसं आणि परिस्थिती त्या इच्छाशक्तीच्या आहारी सहज जात गेली."
समीर म्हणाला, "हो, हे अगदी खरं आहे. मीसुद्धा पहिल्याच भेटीत तिच्या आहारी गेलो होतो. आधी तिने मला एक जबरदस्त धक्का दिला आणि मला शिल्पावरचं प्रेम व्यक्त करायला भाग पाडलं होतं. शिल्पाच्या आयुष्यात तिचं अस्तित्व मी अगदी नकळत स्वीकारून बसलो होतो."
भास्कर म्हणाला, "अजून एक महत्वाची गोष्ट. शिल्पा, तुला या घटनामागचे कारण माहीत नाही तरी तू तिच्याबरोबर वाहात गेलीस पण ती मात्र सगळं जाणून असणार म्हणून तिला हवं ते आणि हवं तसं घडवत गेली, तसं वागत जगत राहिली."
शिल्पानं विचारलं, "आपल्याला हे कसं कळणार ? काही मार्ग आहे का ? मी तर जाणून घ्यायला खूप आसुसलेली आहे."
भास्कर म्हणाला, "Past Life Regression हा एक पर्याय आहे या सगळ्या घटनांमागचा कार्यकारणभाव शोधण्याचा."
शिल्पानं विचारलं, "म्हणजे ?"
तो म्हणाला, "मी सायकिअॅट्रिस्ट म्हणून प्रॅक्टीस करतो. आपले ऐंसी टक्के आजार हे सोमोसायटिक म्हणजे मनोकायिक असतात. जुनाट, दीर्घ आजार जेव्हा औषधांना दाद देत नाहीत तेव्हा सायकियॅट्रिस्ट त्याच्या मनोव्यापारात शिरून त्या आजाराचं मूळ, त्याच्या स्वभावाच्या त्या प्रवृत्ती शोधून काढतो ज्यामुळे रोगाची सुरुवात झाली. किंवा मानसिक घडामोडीचे मूळ शोधून काढतो जिथे त्या घडामोडीचा कार्यकारणभाव असतो. तुमच्या दोघींच्या बाबतीत बोलायचं तर तुमच्या दोघींत घडत गेलेल्या घटनांचं मूळ, त्याचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न करता येईल. आपल्या भूतकाळात अशा काही घटना घडलेल्या असतात की त्या आपल्या अंतःर्मनात घट्ट रुजून बसतात. त्यापैकी ब-याच घटनांची आपल्याला जाणीवही नसते. ते मूळ शोधून काढलं की सगळ्या गोष्टी स्पष्टपणे उघड होतात व त्या घटनेचा प्रभाव निष्क्रिय होतो."
थोडं थांबून तो पुढे म्हणाला की, "Past Life Regression हा प्रयोग म्हणजे मागच्या काळात परत जाणे. तो मागचा काळ आपल्या जन्मापासूनचा असतो. काही वेळा मागच्या दोन तीन जन्मापर्यंतही असू शकतो. माणूस जन्म घेतो तो आपल्या मेंदूत पूर्व जन्माच्या आठवणी साठवूनच पण त्या आठवणींना उजाळा मिळत नसल्यामुळे तो हळुहळू विसरतो. आपल्याला आपल्या या जन्मापासूनचंसूद्धा सगळंच आठवत नाही पण आपल्या मेंदूत आपल्या आयुष्याचा क्षण न् क्षण साठवलेला असतो. Past Life Regression मध्ये आपल्या मेंदूत साठवलेल्या भूतकाळात घडलेल्या सगळ्या आठवणी जशा काही आजच घडल्यात इतक्या प्रभावीपणे जागृत होत जातात. कारण आपण त्या त्या दिवसात गेलेलो असतो. त्या त्या घटना आठवल्या की आपल्या आयुष्यात घडणा-या गोष्टींचा कार्यकारणभाव उघड व्हायला एखाद्या घटनेची मदत होते. मला तुमच्या दोघींमधल्या ऋणानुबंधाबद्दल प्रचंड कुतुहल वाटतंय. आधी मी तुझ्यावर प्रयोग करतो. उद्या सकाळी मी सांगतो त्या तीन टेस्ट करून घे. मी संध्याकाळी सातनंतर तुला प्रयोगासाठी सिद्ध करतो."
शिल्पा म्हणाली, "मीसुद्धा खूप उत्सुक आहे."
दुस-या दिवशी तिचे टेस्ट रिपोर्ट पाहून भास्कर म्हणाला, "आज संध्याकाळी बरोबर सात वाजता तू जेवून घ्यायचंस. मी तुला एक विरेचनची गोळी देईन. मग एक छोटासा संमोहनाचा प्रयोग करून साडेसात वाजण्यापूर्वी मी तुला गाढ झोपेत घेऊन जाईन. तू गाढ झोपशील. पहाटे चार वाजता गजर झाल्यावर मी तुला गाढ झोपेतून उठवेन. तुझे प्रातःर्विधी आटोपल्यावर चहा आणि थोडा नाश्ता घेतलास की मी साडेपाचला तुझ्यावर Past Life Regression च्या प्रयोगाला सुरुवात करेन. तुझं माझं बोलणं, खोलीतले सूक्ष्म आवाज मी रेकाॅर्ड करेन. प्रयोग संपल्यावर तू फ्रेश झालीस की आपण आपल्या संवादाची टेप ऐकू व त्यावर बोलू. ओके ?"
शिल्पा म्हणाली, "मी तयार आहे. आमच्या ऋणानुबंधामागचा कार्यकारणभाव जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे."
रात्री आठ वाजता वैदेहीचा फोन आला. फोन घेऊन समीर म्हणाला, "साॅरी हं वैदेही. आज शिल्पा एका क्लायंटला सलग पाच तास अटेंड करत होती. घरी आल्यावर तिचं डोकं भणाणून गेलं होतं. पॅरासिटोमलची एक गोळी घेऊन ती सात वाजताच झोपली."
वैदेही म्हणाली, "ठीक आहे. तिची काळजी घे. मी उद्या फोन करेन. चल, बाय. तू पण लवकर झोप."
पहाटे चार वाजता भास्करने शिल्पाला झोपेतून जागं केलं. तिचे प्रातःर्विधी आटोपल्यावर पाच वाजता भास्करने आधी खोलीचे पडदे बंद केले. पंधरा वॅटचा बल्ब लावला. एक मोग-याची सुगंधी अगरबत्ती लावली. खोलीत मंद सुगंध दरवळायला लागला. तो म्हणाला, "आधी तुझ्या या जन्माबद्दल मी जाणून घेईन. या जन्मात कालपासून तुझ्या जन्माच्या वेळेपर्यंत मागे, विशेषतः वैदेही तुला भेटली त्या दिवसाच्या आधीच्या काळापासून मी तुला तुझ्या जन्मापर्यंत घेऊन जाईन. तिथे मला विशेष असं काही आढळून आलं नाही तर मग मी तुला तुझ्या मागच्या जन्मात घेऊन जाईन. आता पापणी न हलवता माझ्या डोळ्यांत बघ. डोळ्यांत पाणी आलं तरी ते ओघळू दे पण पापणी हलवायची नाही. माझ्या डोळ्यांत एकटक पाहात राहायचं."
शिल्पा या प्रयोगासाठी स्वतः तयार झाली होती. ती मृदू स्वभावाची होती, भावुक, संवेदनशील होती. अवघ्या तीनच मिनिटांत भास्करने तिला संमोहित केलं आणि टेपचं बटन चालू केलं.
साडेतीन तासाने भास्करने तिला संमोहनातून जागृतावस्थेत आणलं आणि म्हणाला, "गुड माॅर्निंग ! कसं वाटतंय ?"
घड्याळाकडे पाहत ती म्हणाली, "छान वाटंतय. खूप फ्रेश वाटतंय. असं वाटतं मी साडेतीन तास गाढ झोपेत होते."
भास्करने खोलीचे दोन्ही पडदे उघडले आणि म्हणाला, "सवितेने नाष्टा बनवलाय. तू फ्रेश हो. तुला भूक लागली असेल. आपण आधी नाष्टा घेऊ."
शिल्पा फ्रेश होऊन आल्यावर भास्कर म्हणाला, "माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद तू दिलास त्यामुळे साडेतीन तासातच मी तुला पुन्हा आजच्या दिवसात परत आणलं."
शिल्पा म्हणाली, "आमच्या दोघींमधल्या ऋणानुबंधाचा कार्यकारणभाव जाणून घ्यायला मी स्वतः खूप उत्सुक आहे मग मी प्रतिसाद का देणार नाही ?"
नाष्टा केल्यावर ते चौघं हाॅलमध्ये आले. भास्करने टेप चालू केली. भास्कर अधूनमधून टेप थोडी थोडी फास्ट फाॅरवर्ड करत होता. या जन्मातलं शिल्पाचं बोलणं संपल्यावर भास्कर टेप बंद केली.
भास्कर म्हणाला, "तुझ्या या जन्मात ती तुला भेटण्यापूर्वी तुमच्या दोघींच्या ऋणानुबंधासंबंधीचे संकेत देणारं असं काहीही घडलेलं दिसून आलं नाही."
शिल्पा म्हणाली, "हो, या जन्मात काही विशेष घडलेलं मलाही दिसून आलं नाही."
समीर म्हणाला, "शिल्पा, तुझ्या काही सुप्त भावना तू उघड केल्या आहेस. एक म्हणजे अनन्याचं लग्न आशुतोषबरोबर व्हावं अशी तुझी इच्छा होती. दोघांनी बहीण भावाच्या नात्यानं बांधलं जावं यासाठी वैदेही धडपडत होती तेव्हा तू चिडली होतीस. तुला ते पसंत पडलं नव्हतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तिच्याबद्दलचा तुझा राग, तिरस्कार बराच सौम्य झालाय."
शिल्पा म्हणाली, "थोडा फार सौम्य झाला असेल पण माझ्या मनात अजूनही तिचा राग, तिरस्कार शिल्लक आहेच."
भास्कर म्हणाला, "हो, त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या टेपमध्ये मिळेल. मागच्या जन्मात मी तुझ्या लग्नानंतरच्या आयुष्यासंबंधी बोलायला तुला बोलकं केलंय. तुमच्या दोघींमधल्या ऋणानुबंधाचं बिज मला तिथे आढळून येतंय असं मला जाणवल्यावर मी तुझ्या लग्नाआधीच्या आयुष्यात तुला नेलं नाही. आता आपण ती टेप ऐकू."
सव्वा तासाची ती टेप होती. भास्कर तिच्या चेह-यावरच्या भावाचे बारकाईने निरीक्षण करत होता. आपलंच स्वतःचंच मनोगत ऐकताना शिल्पा त्या त्या प्रसंगात एकरुप झाली होती. जसं काही ते प्रसंग ती आता अनुभवतेय अशी तिची स्थिती झाली होती. तिच्या मनात खूप घालमेल होत होती. तिच्या चेह-यावर कधी खूप राग दिसायचा तर कधी तिरस्काराची भावना उमटायची. कधी तिच्या चेह-यावर प्रचंड वेदना उमटायची. कधी तिच्या डोळ्यांतून आसवे बाहेर पडत होते. ते पाहून समीर व सविताही काहीसे अस्वस्थ झाले होते.
टेप संपली आणि तिथे एक काहीशी जीवघेणी शांतता पसरली. शिल्पानंच बोलायला सुरवात करावी या विचाराने भास्कर शांत बसून होता.
ब-याच वेळाने शिल्पा आपल्या मनोवस्थेतून बाहेर आली. ती उठली आणि चेह-यावर पाणी मारून फ्रेश होऊन परत हाॅलमध्ये येऊन बसली.
पुन्हा स्वतःला संयमित करून ती म्हणाली, "म्हणजे मागच्या जन्मी वैदेही माझा नवरा होती असंच दिसतंय. इतका शारीरिक, मानसिक छळ कुणी आपल्या बायकोचा करू शकतो यावर माझा विश्वासच बसत नाही."
भास्कर म्हणाला, "या जन्माशी काहीच संबंध नसलेला तो तुझा मागच्या जन्माचा भूतकाळ होता. त्यावर विचार करण्याचं किंवा त्यात अडकण्याचं काही प्रयोजन नाहीये. तुझ्या आणि वैदेहीच्या ऋणानुबंधाचा कार्यकारणभाव जाणून घेण्यापुरताच मर्यादित संबंध आहे. आता तूच सगळ्या प्रसंगाची पुन्हा उजळणी कर म्हणजे तुझं मन हलकं होईल. त्या वातावरणातून तू बाहेर येशील. तुला हलकं हलकं वाटेल. पुन्हा सांगतो, तुझ्या मागच्या जन्माच्या घटनांचा तुझ्या या आयुष्याशी काहीही संबंध नाहीये. आता त्या घटनांची पुन्हा एकदा उजळणी कर."
शिल्पा म्हणाली, "हो, तू म्हणतोस ते मला पटतं. मागच्या जन्मी माझं लग्न झालं. माझं वय फक्त एकोणीस वर्षांचं होतं. खूप स्वप्नं होती माझ्या मनात. नवीन आयुष्य, नवी आशा, नवी उमेद, नवरा बायकोच्या पहिल्या रात्रीचं कुतुहल, उत्सुकता, ओढ, आतुरता, अनामिक भीती सगळं काही होतं माझ्या मनात पण माझ्या भावना, माझा पहिला नवखेपणाचा अनुभव याचा काहीही विचार न करता त्याने फक्त पुरुषीपणाच गाजवला. माझं मन व शरीर ओरबाडून काढलं. तो बलात्कारच होता. पहिल्याच रात्री माझ्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला. मला त्याची घृणा वाटायला लागली. दुस-या रात्री माझी अनिच्छा त्याच्या लक्षात आल्यावर त्याने मला वाटेल तसं घाणेरड्या शब्दात अपमानित केलं. तेवढ्यावरच न थांबता त्याने मला मारहाण केली आणि मला ओरबाडून काढलं. दुस-या दिवशी दुपारी भाजी थोडी बिघडली तर त्याने मला बदडून काढलं. नंतर मला मारहाण केल्याशिवाय एकही दिवस उलटायचा नाही. पहिल्या रात्री त्याच्याबद्दल मला वाटलेला राग, तिरस्कार, घृणा माझ्या मनात घट्ट घट्ट रुजत गेली. नशीब माझं, माझे ते भोग साडेतीन वर्षात संपले. त्याला टी.बी. झाला. तो खंगत गेला. त्याची आई त्याला म्हणाली की 'घरच्या लक्ष्मीचा तू दररोज छळ, मारहाण करून अपमान करत होतास, तिच्या आत्म्याचे तळतळाट तुला भोवले. आता तिची माफी माग, तिने माफ केलं तर तू सुखाने मरशील तरी !' आईच्या बोलण्याने त्याला उपरती झाली, पश्चात्ताप झाला. शेवटचे चार महिने तो दररोज माझी माफी मागायचा. त्याच्या माफी मागण्यालाही मी वैतागले होते. एकदा मी त्याला बोलले, 'तुम्ही माझा इतका शारीरिक व मानसिक छळ केलाय की मी तुमचा खूप राग, तिरस्कार करते. या जन्मात तरी मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही मेल्यावरही तुमचा तिरस्कार बाळगतच मी जगेन.' त्यावर तो म्हणाला, 'तुझी माफी मागण्यासाठी, तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन.' त्यानंतरही तो दररोज चारदा तरी माझी माफी मागायचा. शेवटी खंगत खंगत जाऊन तो मेला. मरतानाही त्याने 'मला एकदा माफ कर' असं म्हणतच जीव सोडला पण मी त्याला माफ केले नाही. मला त्याची दया आली नाही. त्यावेळीही माझ्या मनात त्याच्याबद्दल राग आणि तिरस्कारच होता इतका त्याने माझा शारीरिक व मानसिक छळ केला होता. त्याच्या छळामुळे मी मनाने कमकुवत होत गेले होते. माझं हृदयही कमकुवत होत गेलं होतं. त्याच्या छळाचा ताण मी सोसतच होते. नंतर मी फार जगले नाही. पावणेदोन वर्षांनी माझं हृदय बंद पडून माझा मृत्यू झाला. मरतानाही त्याच्या छळामुळे मला लवकर मरावं लागतंय हीच माझी भावना होती. मी पुन्हा जन्म घेताना त्याचा तिरस्कार घेऊनच जन्माला आले असेन."
भास्कर म्हणाला, "मागच्या जन्माचं तुझं आयुष्य, आठवणी हा तुझ्या या जन्माचा भूतकाळ नाहीये. मनातली तिरस्काराची भावना विसरून जा. या जन्मात तो प्रायश्चित्त घेतच जगला. तुला जपत, तुझं दायित्व पेलत तो जगला. आता तुझ्या मागच्या जन्माच्या नव-याला म्हणजे वैदेहीला माफ कर."
शिल्पा म्हणाली, "तिला हे सगळं आठवत असणार म्हणून ती माझ्यावर अतीव प्रेम करत आली जेणेकरून मी तिच्यावर प्रेम करायला लागेन, मला तिच्याबद्दल आत्मियता निर्माण होईल, मग माझ्या मनातली तिरस्काराची भावना लोप पावेल, मग मी तिला माफ केलंय असं ती समजेल असा तिचा व्होरा असावा म्हणून तिने एकदाही माझी मागितली नाही. माफी का मागतेस हा प्रश्न मला पडू नये म्हणून !"
थोडं थांबून ती पुढे म्हणाली, "तिने आशुतोष व अनन्याला बहीण भावाच्या नात्यानं जोडलं त्यामागेही आपला मुलगा आणि आपल्या बायकोची मुलगी हेच नातं तिच्या मनात असावं."
भास्कर म्हणाला, "एक बाजू ऐकून त्या गृहितकावर आधारलेले आपले हे अंदाज आहेत. ते खरे आहेत का हे पाहण्यासाठी आपल्याला Past Life Regression चा प्रयोग तिच्यावरही करायला हवा. तिच्या मागच्या जन्मात आपल्या बायकोचा खूप छळ केला होता हे उघड व्हायला हवं. दोघींनाही हे सगळं माहीत झालंय हे एकमेकींना समजायला हवं. मग तू तिला माफ करून तिला मोकळं करायला हवंस हे मला उचित वाटतं. ती या प्रयोगाला तयार होईल का ?"
शिल्पा म्हणाली, "ती माझ्यावर रुबाब दाखवतच जगत वागत आलीय पण त्यात तिचं प्रेमच दडलेलं असायचं. माझ्यासाठी ती काहीही करायला तयार होईल. आज ती हैदराबादला अनन्याकडे गेलीय. उद्या संध्याकाळी ती परत घरी येणार आहे. मी परवा तिला फोन करते."
रात्री आठ वाजता वैदेहीचा फोन आला. शिल्पा तिच्याशी बोलताना भावूक झाली होती. वैदेहीने तिला तसं बोलूनही दाखवलं. दोघींचं बोलणं झाल्यावर शिल्पा अनन्याशी बोलली व तिने फोन बंद केला.
तिस-या दिवशी शिल्पाने वैदेहीला फोन केला. वैदेहीने विचारलं, "इतक्या वर्षात मला एकदाही फोन केला नाहीस. आता कशी उपरती झाली फोन करायची ?"
शिल्पा म्हणाली, "सकाळी उठल्यापासून मला तुझी खूप आठवण येतेय. तू माझ्यापासून हरवलीयंस असं वाटायला लागलंय मला !"
वैदेही म्हणाली, "चल, वेडी ! इतकं वाटतंय तर मग ये मला भेटायला."
शिल्पा म्हणाली, "आम्हाला ऑफिसात खूप काम आहे. मी एकटीने पाच सहा तास ड्राईव्ह करून येण्याइतपत माझ्यात धाडसही नाहीये."
वैदेही म्हणाली, "मला पण जमणार नाही. काल रात्रीच मी हैदराबादहून घरी आले. माझ्या लाडक्या भाचीला भेटायला गेले होते. दोन दिवस खूप खुश होते मी ! आता लगेच तुझ्याकडे दोन चार दिवसांसाठी यायचं म्हटलं तर माझा नवरा वैतागेल. तो मला परवानगी देणार नाही."
शिल्पा म्हणाली, "तुझ्या लाडक्या भाचीकडे गेली होतीस हे सांगून मला डिवचू नकोस. आधीच मला खूप उदास व एकटं वाटतंय. तुला भेटण्यासाठी तडफडतेय. मला तुझी गरज आहे म्हणून तुझी विनवणी करतेय. पण तुला माझी काही कदर नाही. काही येऊ नकोस तू मला भेटायला ! तू मस्त, मजेत राहा तुझ्या नव-याला दिवसभर मिठीत घेऊन !"
वैदेहीनं विचारलं, "तुझी तब्येत बरी आहे ना ?"
शिल्पा म्हणाली, "अजिबात बरी नाहीये मी !"
वैदेहीनं विचारलं, "काय झालं ? अनन्याला भाऊ आणायचा विचार केलायंस की काय ?"
शिल्पा म्हणाली, "काल रात्री नव-याने तुला बरंच खुश केलेलं दिसतंय म्हणून असे बहकलेले विचार तुझ्या मनात आले ना ? अगं, आपल्या वयाचा तरी विचार करायचा होतास ना ! नातू येणार आहे आता माझा !"
वैदेहीने विचारलं, "मग काय झालंय तुझ्या तब्येतीला ?"
शिल्पा म्हणाली, "मी सांगितलं ना, मला सकाळी उठल्यापासून तुझी खूप आठवण येतेय, खूप उदास वाटतंय, तुला भेटावंसं वाटतंय म्हणून ! पण मला उल्हसित करण्यासाठी तू यायची काही गरज नाहीये."
वैदेही म्हणाली, "ठीक आहे. आजपर्यंत तुझी इच्छा मी कधी डावललीय का ? तुझ्यासाठीच जगत आले ना मी ! मी परवा दुपारी बारापर्यंत जेवायला तुझ्याकडे असेन."
वैदेही शिल्पाकडे आली तेव्हा चौघं हसत खेळत गप्पा मारत बसले आहेत हे पाहून वैतागत वैदेही म्हणाली, "काय धाड भरलीय तुझ्या मनाला ? म्हणे खूप उदास आहे, मला तुझी खूप आठवण येतेय. इथे तर तू चांगली मजेत हसत खिदळत बसली आहेस. उगीचच साडेपाच तास ड्राईव्ह करण्याची दगदग करत आले मी !"
शिल्पा म्हणाली, "अगं, आता आलीयंस ना, मग शांत हो. बैस आरामात. मी याची ओळख करून देते. हा भास्कर. समीरचा मोठा आत्येभाऊ. हा सायकियॅट्रिस्ट आहे."
वैदेही तडकून म्हणाली, "मला वेडी समजून माझी ट्रिटमेट करायला बोलावलंस का यांना ?"
शिल्पा म्हणाली, "हो, त्यासाठीच बोलावलंय मी याला ! तू आधी फ्रेश हो. थोड्या वेळाने आपलं जेवण झालं की तू एक झोप काढ. तू उठल्यावर चहा घेताना मी सांगते सगळं !"
जेवल्यावर पलंगावर आडवं होत वैदेही म्हणाली, "असं पाच सहा तास सलग ड्रायव्हिंग केलं की आता जाणवायला लागलंय की, आता आपलं वय होत चाललंय ! चल, झोपते मी !"
नंतर चहा घेताना वैदेहीनं विचारलं, "खरोखर तू माझी ट्रिटमेट करायला मला इथं बोलावलंस का ?"
शिल्पा म्हणाली, "हा सायकीयॅट्रिस्ट डाॅक्टर आहे. दिल्लीला याचं क्लिनिक आहे. हा सविताला घेऊन इथे आठ दहा दिवस निवांत व्हायला आलाय. रात्री तुझा फोन आला. मी स्पीकर ऑन केला. फोनवरचं 'कटकट' असं नाव पाहून आणि आपलं बोलणं ऐकून याच्या मनात आपल्या नात्याबद्दल कुतुहल निर्माण झालं. मग मी याला आपली पहिल्या भेटीपासूनची सगळी कहाणी सांगितली. यानेही मध्ये मध्ये काही प्रश्न विचारून खोलवर माहिती करून घेतली."
भास्कर म्हणाला, "आता पुढचं मी सांगतो. शिल्पाच्या इतकी जवळची आहेस. तेव्हा मी तुला 'ए वैदेही' असंच संबोधतो. तू पण मला 'ए भास्कर' असंच म्हण."
वैदेही म्हणाली, "मला आवडेल ! एकेरी बोललो की समोरचा माणूस खूप जवळचा वाटायला लागतो."
भास्कर म्हणाला, "मला तुमच्या नात्याचं खूप कुतुहल वाटलं. तू हिच्यावर अतोनात प्रेम करतेस आणि ही तुझा राग राग, तिरस्कार करते यामागे नक्कीच काही तरी दडलेलं आहे असं मला वाटलं. ते जाणून घेण्याची हिलाही खूप उत्सुकता आहे. मी सायकियॅस्ट्रिस्ट आहे. अशा केसेसच्या मुळाशी जाण्यासाठी आणि ताठर किंवा अन्य प्रवृत्तीमुळे मानसिक पातळीवर अस्वस्थ असलेल्या लोकांना ट्रिटमेट देताना, शिवाय औषधोपचाराला दाद देत नाहीत अशा रोगांचं मूळ शोधण्यासाठी मी Past Life Regression चा प्रयोग करतो. म्हणजे आयुष्याच्या मागे मागे भूतकाळात जायचं. आवश्यकता भासेल तर मागच्या जन्मातही जायचं. या थेरपीसाठी मी दिल्लीत ख्यातनाम व तज्ज्ञ डाॅक्टर आहे."
वैदेही म्हणाली, "तू काय बोललास ते मला काही समजलं नाही. मला एवढंच समजलं की मी हिच्यावर जगावेगळं अतोनात प्रेम करते म्हणून मला वेडी ठरवून तू माझ्यावर मानसोपचार करणार आहेस आणि मी हिचं सगळं ऐकते म्हणून हेसुद्धा ऐकेन हे हिने गृहीत धरलंय. माझ्यावर प्रयोग करण्यापेक्षा ही माझा इतका तिरस्कार का करते याच्या मुळाशी जाण्यासाठी हिच्यावरच प्रयोग कर ना !"
तो म्हणाला, "तिच्यावर मी परवाच प्रयोग केला. मी तुला हिच्या बोलण्याची टेप ऐकवतो."
त्याने शिल्पाच्या मागच्या जन्माची टेप चालू केली. तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून टेप संपल्यावर वैदेही म्हणाली, "हिच्या बोलण्यातून समजलं ना हिला, ही माझा तिरस्कार का करते आणि मी हिच्यावर इतकं प्रेम का करते ते ! हिला हेही समजलं ना की मागच्या जन्मी मी हिचा नवरा होते, हिला खूप छळत होते, मारहाण करत होते, नंतर मला पश्चात्ताप झाल्यावर हिने मला माफ करावं यासाठी मी तडफडत होतो आणि तडफडतच मेलो पण हिने मला माफ केलं नव्हतं. हे सगळं हिला समजलंय. मग माझ्यावर प्रयोग करून हिला अजून काय वेगळं समजणार आहे ?"
शिल्पा म्हणाली, "तो माझा नवरा तूच होतीस याची खात्री मला करून घ्यायची आहे. मग मी तुला माफ करेन."
वैदेही म्हणाली, "ए बाई, गेल्या चाळीस वर्षात मी एकदा तरी तुझी माफी मागितली आहे का ? तुझ्या मनातला तिरस्कार सोडून दे, माझ्यावर प्रेम कर असं एकदा तरी बोललेय का ? मी तुझ्यावर प्रेम करते तेवढं मला खूप आहे."
शिल्पा म्हणाली, "पण माझी इच्छा म्हणून, माझ्या समाधानासाठी तरी तू याच्या प्रयोगासाठी प्रतिसाद दे ना !"
वैदेही म्हणाली, "ठीक आहे. मी तयार आहे. फक्त एक भीती माझ्या मनात आहे."
भास्करने विचारलं, "कोणती ?"
वैदेही म्हणाली, "आमच्या अगदी लांबच्या नात्यातल्या बाईवर असाच एक प्रयोग करण्यात आला होता. ती मागच्या जन्मात शिरली पण त्या प्रयोग करणा-या बाबाला काही तिला या जन्मात परत आणता आलंच नव्हतं. मागच्या जन्मात जगतच ती मेली. नशीब तिचं, ती विधवा होती आणि तिला मुलबाळ नव्हतं !"
भास्कर म्हणाला, "मी यातला तज्ज्ञ आहे. आतापर्यंत मी साडेतीनशेपेक्षा जास्त जणांवर प्रयोग केले आहेत. एकही घटना अशी घडलेली नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव."
वैदेही म्हणाली, "ठीक आहे, मी हिच्या समाधानासाठी तयार आहे. पण माझी एक अट आहे, मी परत या जन्मात आले नाही तर हिने आयुष्यभर मला सांभाळायचं कबूल करावं कारण माझ्या ओळखीचं या जगात कुणीच नसेल."
शिल्पा म्हणाली, "वेड्यासारखं बोलू नकोस. भास्करवर माझा पूर्ण विश्वास आहे. तरीही कबूल करते की तू या जन्मात परत आली नाहीस तर मी तुला मरेपर्यंत सांभाळेन."
वैदेही म्हणाली, "मग ठीक आहे. आधी मी सगळ्यांशी फोनवर एकदा बोलते. नंतर बोलायला संधी मिळेल, ना मिळेल !"
भास्कर म्हणाला, "वैदेही, तुझ्या मनात शंका असेल तर राहू दे. आपण प्रयोग नको करायला."
ती हसत म्हणाली, "पण मला हिची इच्छा पूर्ण करायचीय. तू प्रयोगाच्या तयारीला लाग.
दोन दिवसांनी भास्करने वैदेहीवर संमोहनाचा प्रयोग केला पण तो तिला मागच्या जन्मात घेऊन जाऊ शकला नाही.
तिची सगळी टेप ऐकल्यावर भास्कर म्हणाला, "हिच्या या जन्मात या दोघींच्या ऋणानुबंधामागचा कार्यकारणभाव उघड झाला नाही. मी हिला मागच्या जन्मात नेऊ शकलो नाही. आपण उद्या पहाटे पुन्हा प्रयत्न करू."
वैदेही त्याला डिवचत म्हणाली, "अपयश पचवणं अवघड जातंय का तुला ?"
भास्कर म्हणाला, "तुझ्या बोलण्यातला खंवचटपणा जाणवला मला ! पण हिच्या समाधानासाठी तू काहीही करायला तयार आहेस ना, मग अजून एकदा प्रतिसाद दे."
भास्करने दुस-या दिवशी वैदेहीला पुन्हा संमोहित केलं. तिला मागच्या जन्मात घेऊन गेला. नंतर जवळजवळ चार तासांनी तिला पुन्हा वर्तमानात आणलं.
नंतर नाष्टा, चहा घेतल्यावर सगळ्यांनी वैदेहीची टेप ऐकली.
शिल्पा काय प्रतिक्रिया देते हे ऐकायला वैदेही उत्सुक झाली होती.
भास्कर म्हणाला, "वैदेही, परवा तू मला खंवचटपणे विचारलं होतंस की 'अपयश पचवायला अवघड जातंय का ?' मला अपयश पचवायला अवघड गेलं नव्हतं पण मी तुला मागच्या जन्मात घेऊन का जाऊ शकलो नव्हतो हा प्रश्न मला पडला होता. आज मी तुला मागच्या जन्मात सहज घेऊन गेलो."
शिल्पा म्हणाली, "पण काय उपयोग झाला ? ही मागच्या जन्मात एक पुरुषच होती पण हिने लग्नच केलं नव्हतं. तू तिला चार वेगवेगळ्या पद्धतीने विचारलंस पण त्यातून काय निष्पन्न झालं ? हिने मागच्या जन्मी लग्न केलं नव्हतं हेच ना ?"
वैदेही म्हणाली, "आता झालं ना तुझं समाधान ? या जन्मी आणि मागच्या जन्मीही मी तुझी कुणीही नव्हते. तुझ्यावर मी गेली चाळीस वर्षे तुझ्यावर प्रेम करत आले ती माझी आंतरिक उत्स्फूर्त भावना होती. पहिल्या दिवसापासून तू माझा राग राग, तिरस्कार करत आलीस ही तुझी आंतरिक उत्स्फूर्त भावना होती. त्यामागे काहीही कार्यकारणभाव नव्हता."
शिल्पा म्हणाली, "नाही ! पहिल्या भेटीपासून चाळीस वर्षे कुठलंही कारण नसताना अनोळखी व्यक्तीचा राग राग, तिरस्कार करत राहणं हे असंभवनीय आहे. त्यामागे काहीच कारण नाही हे मला पटत नाही."
वैदेही म्हणाली, "तुझा माझा काही तरी संबंध आहे असंच तू मानतेस ना, मग तुझा शारीरिक व मानसिक अतोनात छळ करणारा नवरा मीच होते आणि मला पश्चात्ताप झाल्यावर मी सतत तुझी माफी मागत होते, तू मला मरतानाही माफ केलं नव्हतंस म्हणून तुझ्या माफीसाठी मला दुसरा जन्म घ्यावा लागला हेच खरं आहे असं समज आणि या जन्मी मी तुझ्यावर फक्त प्रेम करत आले म्हणून आता मला माफ करून तूसुद्धा माझ्यावर फक्त प्रेम कर."
शिल्पा म्हणाली, "तुझ्यावर प्रेम करणं मला शक्य नाही. या जन्मीही तू माझा छळच करत आलीयेस. सतत तुझ्या तालावर मला नाचवत आलीस. मी तुला माफ करणार नाही. मला सतत तुझा राग बाळगतच जगावं लागलंय !"
वैदेही म्हणाली, "मग मी काय सांगते ते ऐक. एक दिवस माझ्या गळ्यात पडून तू रडत रडत 'मला माफ केलं' अशी कबुली तू देशील."
अजून अशीच काही वर्षे अशीच निघून गेली. या वर्षात वैदेही तशीच होती आणि शिल्पाही बदलली नव्हती. वैदेही शिल्पाला दररोज फोन करायची, आधीच्याच रुबाबात बोलायची. शिल्पा तिला कधीच फोन करत नसे. शिल्पाच्या मोबाईलमध्ये वैदेहीचे नंबर अजूनही "कटकट" व "साडेसाती" या नावाने सेव्ह होते. तिच्याबद्दल वाटणारा शिल्पाच्या मनातला राग व तिरस्कार बराच कमी झाला होता पण पूर्ण निवळला नव्हता. शिल्पाला सतत प्रश्न पडे की मागच्या जन्मी आपला छळ करणारा नवरा वैदेही नव्हती तरी आपल्या अंतर्मनातला हिचा तिरस्कार पूर्णपणे का जात नाही ? कधी कधी तिला तीव्रपणे जाणवे की आपण वैदेहीवर अन्याय करत आलोय. तिला माफ करून आपण मुक्त व्हावं आणि तिलाही मुक्त करावं !
आशुतोष आणि अनन्याचं दररोज फोनवर बोलणं व्हायचं. तो तिला एक दोन दिवसांनी फोन करत असे. कधी ती त्याला फोन करायची. दर राखी पौर्णिमेला व भाऊबिजेला दोघे एकमेकांना भेटत असत. अनन्या आणि वैदेही एकमेकींना दररोज फोन करत.
गेल्या महिन्यांपासून वैदेही लँडलाईन फोनचा वापर का करायला लागली हा प्रश्न शिल्पाला पडला होता. अनन्याशी बोलताना तिला समजलं होतं की घरात असल्यावर डाॅक्टरांनी तिला मोबाईल वापरायला बंदी केलीय. याचा अर्थ ती आजारी असावी म्हणून तिला मोबाईलच्या रेडिएशनपासून दूर ठेवावं लागतंय. तिला काही गंभीर आजार नसेल ना ? तिने अनन्याला व आशुतोषला फोन करून विचारलं, तेव्हा दोघांनी सांगितलं की मोबाईलवर बोलल्यावर वैदेहीचा कान दुखायला लागतो.
एक दिवस वैदेहीने शिल्पाला फोन केला नाही. तिचा फोन न आल्याने शिल्पाला रात्री आणि दुस-या दिवशी चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं. नंतरही दोन दिवस वैदेहीचा फोन आला नाही म्हणून ती बेचैन झाली. दहा दहा मिनिटांनी ती मोबाईल फोन हातात घेई पण वैदेहीला फोन करायला माघार घेई.
तिने अनन्याला फोन केला. अवांतर बोलून झाल्यावर तिने विचारलं, "काय गं, तुझी मावशी बरी आहे का ?"
अनन्या म्हणाली, "का गं, असं का विचारतेस ?"
शिल्पा म्हणाली, "अगं, तीन दिवस झाले तिचा फोन आला नाही."
अनन्या म्हणाली, "मग तू कर ना तिला फोन ! पण तू तिला फोन करणार नाहीस. तू जाणूनबूजून तिच्याशी असं वागत आली आहेस हे मी जाणून आहे. तुझं माझं पटेना अन् तुझ्या वाचून करमेना अशी तुझी गत आहे."
शिल्पानं विचारलं, "तुमचं कधी बोलणं झालं होतं ?"
अनन्या म्हणाली, "परवा बोललो आम्ही पण तिने मोबाईल वापरणं बंद केलंय हे तुला माहीतेय ना ! परवा तिने दुस-याच लँडलाईनवरून फोन केला होता."
शिल्पा म्हणाली, "तिचा पुन्हा फोन आला तर ती कशी आहे हे विचार आणि कळव मला !"
तिने आशुतोषलाही फोन करून वैदेहीबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, "चांगली आहे ती !"
अजून तीन दिवस गेले. वैदेहीचा फोन येत नाही म्हणून शिल्पा खूप बेचैन झाली होती. आता पुण्याला जायलाच हवं असं तिने समीरला सांगितलं आणि पहाटे निघायचं ठरवलं या विचाराने ती थोडी शांत झाली.
रात्री फोनची बेल वाजली तसं शिल्पा भडभडा बोलून गेली. "कुठे आहेस तू ? सात दिवस झाले तुझा फोन नाही. माझी काय स्थिती झाली हे तुला समजणार नाही. माझा जीव जायची वेळ आलीय. कशाला मला इतकं जवळ केलंस ? आणि अचानक अलिप्त होतेयंस. म्हणे, माझ्यावर अतोनात प्रेम करतेस ! सगळं खोटं !"
वैदेही संथ आवाजात म्हणाली, "अगं, किती प्रश्न विचारणार आहेस ? इतक्या प्रश्नांची एका वेळी कशी उत्तरं देऊ मी ?"
शिल्पा म्हणाली, "तुझा आवाज इतका का थकलाय ? तू बरी आहेस ना ? काय झालंय तुला ?"
वैदेही म्हणाली, "अगं, मी आठ दिवसांपासून हाॅस्पिटलला अॅडमिट आहे. आता माझी तब्येत चांगली आहे. मला तुला भेटायचंय. तू समीरबरोबर पहाटे नीघ. बारापर्यंत तुम्ही पोहोचाल इथे."
शिल्पा म्हणाली, "हो, थोड्या वेळापूर्वीच उद्या तुला भेटायला जायचं असं आम्ही ठरवलं होतं. उद्या पहाटे पाचलाच निघते. अनन्यालाही फोन करून सांगते यायला."
वैदेही म्हणाली, "आशुतोषने तिला फोन केला होता. ती सकाळी सातच्या फ्लाईटने निघणार आहे. समीरला सांग, सावकाश ड्राईव्ह करायला. चल, बाय !"
सकाळी साडेअकरा वाजता शिल्पा पुण्याला हाॅस्पिटलला पोहोचली आणि वैदेहीच्या रुममध्ये गेली. तिथे असलेल्या सगळ्यांच्या चेह-यावर असलेली चिंता पाहून शिल्पाचं मन चरकलं. वैदेहीला पाहून शिल्पा भावनावश होऊन उन्मन झाली आणि तिच्या अंगावर पडून हुंदके देत रडू लागली.
तिच्या पाठीवर हात फिरवत वैदेही म्हणाली, "शांत हो. आता मी खूप बरी आहे."
शिल्पा म्हणाली, "आठ दिवस माझ्याशी बोलल्याशिवाय कशी गं राहू शकलीस तू ?"
वैदेही म्हणाली, "अगं, डाॅक्टरांनी मला मोबाईल वापरायला बंदी केलीय. त्या दिवशी खाली रिसेप्शनला फोन करायला जायची संधी मिळाली. तुला फोन लागला नाही. मग मी अनन्याशी बोलले. आता तू फ्रेश हो, मग बोलू आपण !"
दुपारी चार वाजता डाॅक्टर व्हिजिटला येऊन गेल्यानंतर सगळे वैदेहीच्या खोलीत जमा झाले. थोडया वेळाने वैदेही म्हणाली, "तुम्ही सगळे बाहेर थांबा. मला शिल्पाशी थोडं बोलायचंय."
सगळे बाहेर गेल्यावर शिल्पा म्हणाली, "बोल, काय बोलायचंय तुला ?"
वैदेही म्हणाली, "मला काय झालंय ते सांगते. गेल्या एक महिन्यापासून माझं डोकं दुखायला लागलं. मी माझ्या नणंदेशी बोलले. ती ताबडतोब मला भेटायला आली. तिने माझ्या काही टेस्ट करून घेतल्या. एका टेस्टसाठी मला मुंबईला नेलं. माझ्या मेंदूमध्ये एक बारीक गाठ असल्याचं निष्पन्न झालं. तिने ट्रिटमेट सुरु केली. तुला माहीत आहे, माझी नणंद एक ख्यातनाम निष्णात न्युरो सर्जन आहे. तिने गेल्या चाळीस वर्षांत भारतात व परदेशात सहा हजारपेक्षा जास्त न्युरो सर्जरी केल्या आहेत. ती म्हणाली की 'मी ऑपरेशन करून मेंदूतली गाठ काढून टाकेन, तू काळजी करू नकोस.' शिल्पा, चार दिवसांनी याच हाॅस्पिटलमध्ये ती माझं ऑपरेशन करणार आहे. हे हाॅस्पिटल वेल इक्विप्ड आहे. माझा तिच्यावर विश्वास आहे पण शिल्पा, का कोण जाणे, मला असं वाटतं की मी यातून बरी होणार नाही. कदाचित ऑपरेशन टेबलावरच ..."
शिल्पाचे डोळे भरून आले. तिच्या तोंडावर हात ठेवून गदगदलेल्या स्वरात म्हणाली, "अभद्र काही बोलू नकोस गं आणि मनातही तसं काही आणू नकोस."
वैदेही म्हणाली, "शिल्पा, आज मला बोलू दे. परत बोलण्याची संधी मला मिळेल की नाही हे परमेश्वरालाच माहीत आहे."
शिल्पा म्हणाली, "नको ना गं, असं
बोलूस."
वैदेही म्हणाली, "तू मला बोलायला अडवलंस तर माझ्या मनातलं मनातच राहील ना गं ? मला अडवू नकोस ना !"
शिल्पा रडू आवरत कसंबसं म्हणाली, "ठीक आहे, बोल."
वैदेही म्हणाली, "शिल्पा, तुझ्या अंतःकरणाच्या खोल गर्भगृहातून आज तू मला माफ कर. तू मला माफ करावंस म्हणून मी पुन्हा जन्म घेतलाय. गेली अठ्ठेचाळीस वर्षे तू मला केव्हा माफ करशील याची वाट पाहात मी तडफडत जगलेय. मला माझ्या अपराधाबद्दल माफ कर. आता मनात कणभरही राग, तिरस्कार ठेवू नकोस. तू मला माफ करावंस यासाठी मला पुन्हा जन्म घेऊ देऊ नकोस."
शिल्पाला तिचे शब्द कळत होते पण त्याचा नेमका अर्थ समजला नाही तरी वैदेहीचं बोलण्यातली वेदना तिला जाणवली. तिचं मन गोंधळून गेलं.
ती म्हणाली, "म्हणजे ?"
वैदेही म्हणाली, "मागच्या जन्मी तुझा शारीरिक व मानसिक अतोनात छळ करणारा तुझा नवरा मीच होते. मला मनापासून माफ कर. मला मुक्त कर."
शिल्पा आश्चर्याने म्हणाली, "काय सांगतेयंस हे ? भास्करने ..."
वैदेही म्हणाली, "हो, भास्करने आधी तुझ्यावर प्रयोग केला होता. मी तुझी टेप ऐकल्यावर मला समजलं की तुला आपल्या ऋणानुबंधामागचा कार्यकारणभाव माहीत झालाय. तेव्हाच मी मनाशी निग्रह केला की तुला समजलंय त्याला आपल्याकडून पुष्टी द्यायची नाही. माझ्या मनातल्या तीव्र निग्रहामुळे पहिल्या प्रयोगात भास्कर मला माझ्या मागच्या जन्मात घेऊन जाऊ शकला नव्हता. दुस-यांदा तो मला माझ्या मागच्या जन्मात घेऊन गेला होता, त्याने माझ्या लग्नाबद्दल उलटसुलट विचारून जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण माझ्या अंतःर्मनात मी केलेल्या निग्रहामुळे 'माझं लग्नच झालं नव्हतं, तुझा अतोनात छळ करणारा तुझा नवरा मी नव्हते' हे मी तुमच्यासमोर आणलं."
शिल्पा म्हणाली, "म्हणजे माझ्या टेपवर तू विश्वास ठेवला होतास ?"
वैदेही म्हणाली, "तुझ्या टेपवर मी अविश्वास कसा दाखवणार होते कारण ते खरं होतं. मला आपल्यातल्या ऋणानुबंधामागचा कार्यकारणभाव फार आधीपासून माहीत होता. तुला आठवतं, आपली ओळख झाल्यावर मी सायकल वापरायला लागले. सायकलने मी आधी तुझ्याकडे यायचे. एकदा आई आजारी होती. दोन दिवस मी आईची देखभाल करायला तुझ्या घरी थांबले होते आणि तुला जबरदस्तीने शाळेत जायला भाग पाडलं होतं. आठवतं तुला ?"
शिल्पा म्हणाली, "हो. मी काहीच विसरलेली नाहीये."
वैदेही म्हणाली, "त्या आधी आठ दिवस मला आपल्या मागच्या जन्माबद्दल, मी केलेल्या तुझ्या छळाबद्दल, मी मेलो तरी तू मला माफ केलं नव्हतंस याबद्दल आणि तू मला माफ करावंस यासाठी सतत तुझी याचना करायचो त्याबद्दल आणि मी मरतानाही तू मला माफ केलं नव्हतंस व तू मला माफ करावंस म्हणून मी पुन्हा जन्म घेतलाय याबद्दल मला सगळं काही समजलं होतं."
शिल्पा म्हणाली, "बाप रे, काय सांगतेस हे ! इतक्या आधीपासून तू हे सगळं जाणून होतीस ? कसं समजलं होतं तुला ?"
बावाजी महाराजांबद्दल सांगून वैदेही म्हणाली, "त्या रात्री स्वप्नात माझ्या मागच्या जन्माचा सगळा पट उलगडला होता. तेव्हाच मी पक्कं ठरवलं, या जन्मी तुझ्यावर खूप प्रेम करायचं, तुला जपायचं आणि तुला अपार सुखात ठेवायचं. तुझ्या मनात इतकं प्रेम भरायचं की रागाला तिरस्काराला कणभरही जागा नसेल. तीच माझ्यासाठी माफी असेल."
गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांचं तिचं अपार प्रेम आठवून आणि आपण मात्र हिचा राग, तिरस्कारच करत आलो याची जाणीव होऊन शिल्पाच्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम, आत्मीयता उफाळून आली आणि तिचं मन खूप भावूक झालं.
वैदेहीनं गहिवरून विचारलं, "मग केलंस ना मला माफ? की तुझ्या माफीसाठी मला अजून एक जन्म घ्यायला लावणार आहेस ?"
शिल्पाच्या मनाचा बांध फुटला आणि वैदेहीच्या अंगावर पडून ती हमसून हमसून रडायला लागली.
तिला आपल्या दोन्ही हातांनी आपल्या मिठीत घट्ट आवळत वैदेहीसुद्धा उन्मन होऊन रडायला लागली.
प्रेम आणि तिरस्कार या भावना उत्स्फुंल्लिगीत होऊन आपलं मन मोकळं करत होत्या. काही क्षणातच प्रेमानं तिरस्काराला आपल्यात पूर्ण सामावून घेतलं आणि तिरस्कारानेसुद्धा आपलं अस्तित्व प्रेमात विलीन करून टाकलं होतं !
© रमेश नागपुरे,
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१
मोबाईल # 90822 57262
मोबाईल WA # 98690 75238