बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

1583. देवमाणूस

    पुण्यामध्ये चांगलाच रमलो होतो. पुणे जवळपास तोंडपाठ झालं होतं. शिक्षणाचं माहेर घर असणार्‍या या पुण्यामध्ये मी ही शिक्षण घेतलं याचा अभिमान उराशी बाळगून नोकरीच्या शोधात फिरत होतो. पाच सहा कंपन्यांमध्ये मुलाखती झाल्या. त्यामधील काहींना मी आवडलो नाही तर ज्यांना मी आवडलो, ती कंपनी मला आवडली नाही. त्याला माझा माज म्हणला तरी चालेल. महीना संपत आलेला. खानावळीचे पैसे, खोलीचं भाडं द्यायला पैसा उरला नव्हता. कमवायचं वय झालेल्या मुलानं घरी पैसे माघून कर्तृत्वावर कुर्‍हाड लावून चालायची नव्हती. कंपन्या फिरण्यातच पैसा उधाळलेला. रोज ईमेल चेक करायचो. रुमवर बसुन तेवढंच काम हातात होतं. जमलंच तर एखादं पुस्तक वाचायला घेत होतो. तेवढाच विरंगुळा. पण फक्त वाचनानं पोट भरणार नव्हतं. चाणक्याचं 'भाग मत कर प्रयास' ऐकलं की उर्जा मिळायची. ताडकन ऊभा राहायचो. पण त्याचाही तेवढ्यापुरताच परीणाम होत होता. परत ये रे माझ्या मागल्या. 
       एक दिवस ईमेलवर एका कंपनीची जाहीरात आली. भोसरीची कंपनी होती ती. माझ्यापासुन जरा लांबच. पण जाणं गरजेचं होतं. सकाळी लवकर ऊठून बस पकडली. वेळेच्या अगोदर कंपनीत पोचलो. कागदपत्रे हातात घेऊन बाहेरच्या सोफ्यावर घाबरलेला चेहरा घेऊन बसलो. तेवढ्यात मला बोलवणं आलं. भित भित 'मे आय कम ईन सर?' म्हणलं. त्यांनी आत बोलवलं. माझा बायोडेटा बघीतला आणि प्रश्नांचा भडीमार सुरु केला. प्रत्येक प्रश्नाला मी आत्मविश्वासानं उत्तर देत होतो. जसा उत्तर देईन तसं प्रश्नांच्या संख्येत भर पडायची. अर्धा तासभर मुलाखत चालली. त्यांनी नंतर निकाल सांगतो म्हणून सांगीतलं. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघता माझं सिलेक्शन होणार हे मला समजून गेलेलं. बाहेर येऊन पहील्यांदा घटाघटा पाणी प्यायलो. खिशातला रुमाल काढून चेहर्‍यावरचा घाम पुसला आणि रस्त्याकडं मोर्चा वळवला. पोटात कावळ्यांनी आरडाओरडा सुरु केलेला. जवळंच वडापावचा गाडा होता. दोन वडापाव माघीतलं. दाबून खाल्लं. दोनंच. पाणी थोडं जास्त प्यायलो. भोसरीच्या स्टाॅपवर येऊन बसची वाट बघत होतो. तोंडावरची कळा गेलेली. पँन्टमधून शर्ट बाहेर आलेला. तेवढ्यात एकजण 'नमस्कार' म्हणला. पुण्यात असूनसुद्धा इतक्या नम्रपणे नमस्कार घालणारा तो व्यक्ती पुण्याचा नसणारच याची खात्री झालेली. मी ही नम्रपणे नमस्कार घातला. 
"जाॅब शोधताय का?" 
मला आश्चर्यच वाटलं. याला कसं माहीत मी जाॅब शोधतोय. 
"हो.. पण काय मिळतच नाही राव"
"सातार्‍याचे दिसताय"
पुन्हा आश्चर्य. 
"तुम्हाला कसं समजलं मी सातार्‍याचा आहे ते"
"अहो सातारी भाषा लगेच ओळखून येते."
"तेवढं हाय. भाषाच न्यारी सातार्‍याची"
"मग भेटला का जाॅब"
"दिलीय इंटरव्ह्युव. बघू काय होतय ते."
"पगार किती?"
पगाराचं नाव काढलं की माझं मस्तक ठणकतं. पण काय करणार. इतक्या गर्दित विचारपुस करणारा एकच माणूस भेटला होता. सांगीतलं तर काय बिल येणार!
"म्हणलेत १५०००"
"फक्त?"
आयला इथं नोकरी भेटंना. वणवण करत पंधरा दिवस झालं फिरतोय. चार महिनं दहा हजार मिळालं तरी पोटाचं भागलं. नंतर बघू दुसरी कंपनी. पण हे फक्त? म्हणतय. 
"मग किती भेटणार? तेवढंच मिळालं तरी पुरं झालं"
"मग कशाला करताय नोकरी ही. कमवायचं आणि घालवायचं म्हणजे फक्त दिवस ढकलण्यापुरतं काम करत बसायचं. बंगला बांधायचा, गाडी घ्यायची हि स्वप्नं कधी पुर्ण करणार?"
"वयाच्या मानानं बास की एवढं."
मी तेवढ्यातच आनंदी होतो. पण तो त्याच्या मतावरच ठाम होता. 
"कमी वयातच कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. म्हणजे म्हातारपण सुखात जातं."
तो काही केल्या ऐकतच नव्हता आणि त्यात माझी कुणाकडून ज्ञान घ्यायची ईच्छाही मेलेली. 
"मग काय करु तुम्ही सांगा. दोन नंबरचा धंदा करु का?"
मला राग आलेला.
"दोन नंबर कशाला? तुम्हाला बघूनच तुम्ही कष्टाळू आहात हे दिसून येतय. म्हणून मी तूम्हाला जाॅब आॅफर करतो. आमची कंपनी आहे. तुम्ही जेवढं दुसरीकडे कमवाल त्यापेक्षा पाच पट तुम्हाला इकडे मिळेल. "
आई शप्पथ! पाचपट? मी गुणाकार करायला सुरुवात केली. म्हणजे ७०-७५ हजार पगार? 
मला आता उत्सुकता लागली. 
"काम काय असणार? म्हणजे मला जमेल का?"
मी आता शांत झालेलो. ७०-७५ हजार डोळ्यासमोर दिसत होते. 
"अहो नक्कीच जमणार. खुप मस्त काम आहे. एक पत्ता देतो तिथे ऊद्या सकाळी या. माझा नंबर घ्या. आल्यावर फोन करा. "
"थँक्यु सर.. ऊद्या नक्की येतो." 
त्याने माझा नंबर घेतला आणि निघून गेला. मी मात्र अंतराळी फिरत होतो. मला बंगला दिसत होता, गाडी दिसत होती. घरी पैसे माघण्यापेक्षा आता मीच घरी पैसे पाठवणार या खुशीनं चेहरा फुलला होता. भेटलेला व्यक्ती देवाच्या रुपात आलेला. देवमाणूसच. आपलं पुण्यच म्हणायचं. इतक्या गर्दीत तो मलाच भेटलेला. रोजची देवपुजा कामाला आलेली. तेवढ्यात बस आली. गर्दी फांगत आतमध्ये शिरलो.
रुमवर पोचलो. पण हि बातमी कुणाला सांगीतली नाही. सगळं झाल्यावर सांगायची असं ठरवलेलं. संध्याकाळी पाचच्या सुमारास मोबाईल वाजला. मी मुलाखत दिलेल्या कंपनीचा मेल आलेला. त्यामध्ये 'अभिनंदन तुमचं सिलेक्शन झालंय. ऊद्या सकाळी दहा वाजता कागदपत्र तपासणीसाठी या' असं लिहलेलं. मला आवडलेल्या कंपनीला मी आवडलेलो. मी आता ऊड्या मारायला सुरुवात केली. कदाचित मित्रांना मी वेडा झालोय असं वाटलं असावं. मी तरीही त्यांना याबद्दल सांगीतलं नव्हतं. सगळं झाल्यावरच बघू. 
तेवढ्यात त्या देवमाणसाचा फोन आला. 
"ऊद्या दहा वाजता या. तुमच्याबद्दल सरांना बोललोय."
मी आता संभ्रम अवस्थेत होतो. काय करु समजत नव्हतं. एकाच वेळी दोन्हीकडं कसं पोहचायचं. एकीकडे मला आवडलेल्या कंपनीत सिलेक्शन झालेलं आणि दुसरीकडे त्या देवमाणसाने मला जाॅब बघीतलेला. मी खुप विचार केला. १५००० पेक्षा ७५००० चांगले वाटले. इतक्या कमी वयात बक्कळ कमवायची संधी आलेली. तिला लाथ मारणं म्हणजे आडमुठपणाच. विचाराअंती देवमाणसाकडे जाण्याचा निर्णय घेतला. 
      सकाळी लवकर बस पकडली. बसमध्ये असतानाच त्याचा दोन वेळा फोन आला. देवमाणूस आपल्यासारख्या अनोळखी माणसासाठी किती झटतोय. उपकारही फेडू शकणार नाही. मनावर याचंच ओझं वाढलेलं. बस भोसरीला पोचली. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोचलो. भरपुर गर्दी होती. निम्या लोकांनी कोट घातलेले. मी देवमाणसाला फोन लावला. ते लगेच माझ्याजवळ आले. मला घेऊन वरच्या मजल्यावर घेऊन गेले. लोकांचा आवाज वाढायला लागला. भरपुर लोकांची गर्दी. काहीतरी कार्यक्रम असावा. त्यांनी मला तिथेच बसायला खुर्ची दिली आणि बाहेर गेले. थोड्यावेळाने चार पाच लोकांना घेऊन माझ्याजवळ आले. त्या लोकांबरोबर ते ही तिथे बसले. कार्यक्रम सुरु झाला. कसले तरी अॅवाॅर्ड चालू झाले. एकाने भाषण सुरु केलं. 
"पूर्वी माझ्याकडे काही नव्हते. बर्फाचा गोळा विकत होतो. रोजचे दोन तीनशे मिळायचे. त्यानंतर मला सर भेटले. त्यांनी मला स्किम सांगीतली. स्किमप्रमाणे मी काम करत गेलो. पहिल्याच प्रयत्नात वीस हजार कमवले. नंतर हळूहळू कामासाठी जास्त वेळ देऊ लागलो. वीस हजाराचे एक लाख झाले. नंतर पाच लाख. मी नंतर स्वत:च्या मालकीचं घर घेतलं, गाडी घेतली, घरात ए सी बसवली. आता मी आमच्या नातेवाईकामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. फक्त एका वर्षात इतकं कमवलं. सर नसते तर हे घडलं नसतं."
        मी एक वर्ष पुढे गेलेलो. माझी गाडी दारात ऊभी होती. लाखो रुपये माझ्या केसांना थटून जात होते. डोळ्याची पापणी स्थिर होती. सगळ्यांची भाषणं ऐकली. मनोमनी देवमाणसाचे आभार मानले. तीन तास चाललेला कार्यक्रम थांबला. पण माझे भविष्यातले विचार चालूच होते. कार्यक्रम झाल्यानंतर सरांनी स्किम सांगीतली. दहा हजाराची गुंतवणूक करायची होती. त्यानंतर माणसे जोडायची होती. जशी माणसे जोडली जातील तसे पैसे मिळणार होते. खिशात मात्र पैसे नव्हते. सरांनी निम्मे पैसे भरण्याची हमी दिली. पण पाच हजार कुठून आणायचे? याचा प्रश्न होता. संध्याकाळी मित्राला फोन लावला. 
"आता बघच किती कमवतूय. नुसता धुरच. पगार लय भेटणार मला."
तो हसायला लागला आणि म्हणाला,
"तुला एकजण भेटला का? त्यानं तुला नोकरीपेक्षा जास्त पैसे भेटणार असं सांगीतलं का? तुला कार्यक्रमात बोलवलं का? माणसांनी भाषणं केली का? बर्फाच्या गोळ्यावाला माणूस होता का?"
माझं डोकं चकारलं. मला वाटलं तो पण कार्यक्रमाला होता की काय! नंतर त्यानं सांगीतलं की असे कार्यक्रम दर बुधवारी, दर रविवारी असतात. त्यात बोलणारी माणसं तिच असतात. त्यांचे संवाद सारखेच असतात. एकही शब्द हिकडचा तिकडं होत नाही. पाठंच केलेले असतात. नोकरीची गरज असणारे तरुण ओळखून त्यांना पकडतात आणि नको ते स्वप्न दाखवतात. मित्र सांगत होता, त्याच्या कुठल्यातरी मित्राच्या दहा हजार रुपयाला घोडा लागलेला. माझ्या मेंदूत घंटा वाजलेली. सगळं वातावरण सुन्न झालेलं. माझा पोपट झालेला. ज्याला देवमाणूस म्हणलो त्यानं डोक्यावर टोपी घातलेली. मित्रामुळं मी त्यांचा बकरा होता होता वाचलेलो. मला माझ्या अज्ञानाचा राग आलेला. दोन पावलांवर यश असताना लोभापोठी मी माझी नोकरी सोडून या विळख्याकडे वळलेलो. माझ्यासारख्या अशा कितीतरी तरुणांना असली देवमाणसं भेटली असतील? कुणास ठावूक? माझ्या परिस्थितीवर मलाच रडू आलेलं. दुसर्‍या दिवशी कंपनीत गेलो तर माझ्या जाग्यावर दुसर्‍याची नेमणूक झालेली. त्या प्रसंगाला तीन वर्षे झाली असतील तोच आज पुन्हा देवमाणूस भेटला. नकळत माझं लक्ष माझ्या बुटाकडं गेलं. काढावा आणि द्यावी एक सणसणीत लावून असं वाटलं. पण त्याने काही परिणाम होणार नव्हता. मी त्याला नम्रपणे म्हणलं,
"भावा...तू फसलायस हे तुलाही चांगलंच माहीती आहे. तुझ्याकडे कदाचित या व्यतिरीक्त पर्याय नसतीलही. पण तू तुझ्यासारख्या दुसर्‍याच्या गरीबीचं हसु करु नकोस. दुसरा चांगल्या मार्गावर जात असेल, नोकरी मिळालीही असेल. पण तूम्ही देवमाणसासारखं येऊन, पैशाचं आमिष दाखवून मिळालेली नोकरी सोडायला भाग पाडून त्याच्या आयुष्याशी खेळता. यासारखं मोठं पाप नाही. हे बघ भावा. तूला खुप काही कर्तृत्व गाजवायचं असेल तर वेळेअगोदरच हे सोड. परत पश्चातापाशिवाय दुसरं काही पदरात नसणार. ज्यावेळी समजेल त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल."
त्याच्या डोळ्यात नकळत अश्रु आले. त्याचे तेच अश्रु तो त्या विळख्यात अडकल्याचे चिन्ह दाखवून देत होते. त्याने काम सोडण्याचं पक्क ठरवलं आणि माझे आभार मानून निघून गेला.

(तळटिप: तरुणांनो ! अशा भेटलेल्या देवमाणसांपासुन वेळीच सावधान असा. नेटवर्क मार्केटिंगचा बळी होऊ नका. कष्टाची भाकरच गोड लागते हे लक्षात असु द्या.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...