माळी आल्याची चाहूल लागली तसे नाना मागच्या दरवाजाने बागेत शिरले. पेरुच्या झाडाकडे त्यांचं लक्ष गेलं. शेकडो पेरु तिथं लागले होते. शेजारच्या सिताफळाच्या झाडावर देखील बरीच सिताफळं लटकत होती. एकेका झाडाचं निरीक्षण करत ते आंब्याच्या झाडाजवळ आले. त्या उंच डेरेदार झाडावर त्यांनी मायेने हात फिरवला. उन्हाळ्यात याच झाडाला शेकडो कैऱ्या लागायच्या. लोणच्यासाठी कैरी आणायची कित्येक वर्षात कधी गरजच पडली नव्हती. नातेवाईक, मित्रांना कैऱ्या वाटून झाल्या की काही कैऱ्यांचे आंबे पिकवले जायचे आणि त्यातूनही उरलेल्या कैऱ्या बाजारात विकल्या जायच्या. नानांनी चिकू, डाळिंब, पपई यांच्या झाडावर नजर टाकली. कुठं काही किड लागली नसल्याची खात्री केली. मग ते भाज्यांकडे वळले. कांदे, बटाटे आणि काही भाज्या सोडल्या तर जवळजवळ सर्वच भाज्या या बागेत होत्या. त्याही सेंद्रीय खतावर वाढलेल्या. रासायनिक खतांचा वापर आयुष्यात नानांनी केला नव्हता. मागच्या दोन वर्षापर्यंत बागेची काळजी नाना स्वतः आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई घेत असतं. सावित्रीबाई गेल्या आणि तेव्हापासून नानांनी माळी लावून घेतला होता.
मेन रोडला लागून असलेल्या सात हजार स्क्वेअरफुट प्लाॅटमध्ये तीन हजार स्क्वेअरफुटाचा तीन मजली प्रशस्त बंगला होता. उरलेल्या चार हजार स्क्वेअर फुट जागेत नाना आणि सावित्रीबाईंनी ही बाग फुलवली होती. खुप काळजीने तिला पोटच्या मुलांसारखं जोपासलं होतं. रस्त्याने येणारा जाणारा प्रत्येकजण त्या हिरवाईने नटलेल्या बंगल्याकडे पाहून थबकायचा. पालक, मेथी, भेंडी चांगलीच तरारली होती. त्यांच्याकडे नजर टाकून नानांनी झाडांना पाणी देणाऱ्या माळ्याला हाक मारली. तो आल्यावर ते म्हणाले.
" सदू ते गिलके, कारले, भोपळ्याचे वेल व्यवस्थित बांधून घे आणि घरात मेथी आणि भेंडी घेऊन जा. सुनबाईला भाजी करायला सांग."
" बरं. नाना ते गिलके, भोपळेही खुप लागलेत. काय करायचं त्यांचं?"
"घरच्यासाठी काढून ठेव काही. काही तू घेऊन जा भाजीसाठी. बाकी उरलेले बाजारात विकून टाक."
" बरं"
नानांनी समाधानाची एक नजर बागेवर टाकली. पुजेसाठी चांदणी आणि जास्वंदाची फुलं तोडून ते घरात शिरले. नाना खरे वृक्षप्रेमी होते. आपल्या घराप्रमाणेच त्यांनी शहरातही भरपूर झाडं लावली होती आणि कुणाकडून अपेक्षा न ठेवता स्वतः पाणी देऊन जगवली होती. दर पावसाळ्यात ते पर्यावरणप्रेमींना रोपं आणि ट्रीगार्डसाठी सढळ हाताने आर्थिक मदत करायचे. वृक्षारोपण मोहिमेत हिरीरीने भाग घ्यायचे. त्यांना प्रसिद्धीची हांव नव्हती. कधीही त्यांनी झाड लावतांना, रोपाला पाणी देतांना स्वतःचा फोटो काढू दिला नव्हता. दोनतीन संस्थांकडून त्यांना "वृक्षप्रेमी" पुरस्कारही मिळाला होता. पण त्याचाही नानांनी कधीच गाजावाजा केला नाही.
नाना पुजेला बसले. मुलांना शाळेत पाठवायचं म्हणून दोन्ही मोठ्या सुना उठल्या होत्या. तिसऱ्या सुनेची मुलगी दुपारी शाळेत जायची त्यामुळे तीन नंबरची सुन अजून झोपलेलीच होती. तिन्ही मुलं तर कधीच नऊच्या आत उठायची नाहीत. त्यामुळे सकाळी सातच्या आत देवपुजा झालीच पाहिजे असा नियम लावणाऱ्या नानांना स्वतःच पुजा करावी लागायची. तीनतीन मुलं असतांना पुजा आपल्याला करावी लागते याचा नानांना खुप राग यायचा. सावित्रीबाई असतांना तो ते व्यक्तही करायचे पण त्या गेल्या आणि नानांनी तोंडाला कुलुप लावून घेतलं. मुलंही इतकी बेशरम की बापाला या जबाबदारीतून मुक्त करावं असं त्यांना चुकूनही वाटायचं नाही. उलट नानांनी आता बिझनेसमध्ये लक्ष न देता देवदेव करत रहावं असं त्यांचं म्हणणं असायचं.
नानांची पुजा झाली. चहा घेऊन ते पेपर वाचत बसले. नऊ वाजता मुलं उठल्यावर नाश्ता झाला. साडेदहा वाजता दोन मुलांसोबत गाडीने ते दुकानात पोहचले. धाकटा मुलगा त्याच्या बायकोला बँकेत सोडून मग दुकानात येणार होता. रस्त्याने जाता जाता कपड्यांची आधुनिक दुकानं पाहून आपल्या दुकानाचंही नुतनीकरण करायला हवं याची नानांना जाणीव झाली. पण ते स्वतः काय करु शकणार होते? पाचसहा वर्षांपासून त्यांनी दुकानातलं लक्ष कमी केलं होतं. वेगवेगळ्या यात्रांना जाणं, नातेवाईकांची लग्नं, मित्रमंडळीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी देणं यात त्यांनी स्वतःला व्यस्त करुन टाकलं होतं. त्यांचंही बरोबर होतं. किती दिवस ते जबाबदाऱ्या पेलणार होते? सायकलीवर कपड्यांचे गठ्ठे बांधून घरोघरी विक्री करण्यापासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. मेहनत, सचोटी आणि कल्पकता या जोरावर त्यांनी प्रचंड प्रगती केली होती. दहाबारा वर्षातच कपड्यांच्या एका मोठ्या शो रुममध्ये त्यांचा व्यवसाय शिफ्ट झाला. पुर्ण जिल्ह्यात नानांच्या दुकानाएवढं मोठं आणि आलिशान दुकान नव्हतं. दिवाळी आणि लग्नसराईत तर इतकी झुंबड उडायची की नानांना जेवायचीसुध्दा फुरसत मिळायची नाही. या दुकानाच्या जोरावर नानांनी तो प्रशस्त बंगला बांधला होता. घरात तीन चारचाकी गाड्या आल्या. मुलं मोठी झाली म्हणून त्यांच्या हाती नानांनी आपला व्यवसाय सोपवला आणि इथंच गडबड झाली. तसं सुरवातीला सगळं सुरळीत होतं पण मुलांची लग्नं झाली आणि मुलांची नियत बदलली. मधल्या प्रसादचं सासर श्रीमंत होतं. वेळोवेळी त्याला सासरकडून आर्थिक मदत व्हायची. त्यातून तो होता नंबर एकचा आळशी ! दुपारी तीनचार तास झोपल्याशिवाय त्याला चैन पडायची नाही. घरी झोपू दिलं नाही की तो दुकानात झोपायचा. धाकट्या अंकितची तर बायकोच बँकेत नोकरीला होती त्यामुळे दुकानाच्या उत्पन्नावर तो अवलंबून नव्हता. त्यातून साहेबांना वाईल्डलाईफ फोटोग्राफीचा शौक. त्या शौकासाठी अंकित पंधरापंधरा दिवस दुकानाला दांडी मारुन जंगलात भटकायचा. त्याचं हे बेजबाबदार वागणं दोघा भावांनाच काय नानांनादेखील आवडत नव्हतं. मात्र नाना त्याला काही बोलले की त्याची बायको मध्येच येऊन म्हणायची "नाना तुमच्या पैशांनी नव्हते गेले ते ! मी दिले होते त्यांना पैसे" काही दिवसांनी नानांनी बोलणंच सोडलं. दोघा भावांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्याने थोरला विवेक हैराण झाला होता. आधीच तो रागीट स्वभावाचा होता. थोड्याथोड्या गोष्टींनी हायपर व्हायचा. व्यवसाय करायचा तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असावा लागतो ही गोष्ट तर त्याला माहितच नव्हती. भावांनाही तो फटकळपणे काहितरी बोलून बसायचा "दोघं मजा मारत असतांना मीच का दुकानाची जबाबदारी घ्यायची?" असं तो बायकोजवळ बोलायचा आणि लग्नासारखी संधी मिळाली की दहापंधरा दिवस दुकानाचं तोंड बघायचा नाही. या सर्वाचा परीणाम साहजिकच दुकानातल्या कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि विक्रीवर झाला होता. सर्व्हिस चांगली मिळत नसल्याने दुकानाचे परमनंट ग्राहक दुसरीकडे वळाले होते. दुकानात जुना माल पडून होता.न वीन व्हरायटी येत नसल्याने तरुण वर्ग दुकानात येत नव्हता. आता दुकान चालू होतं ते फक्त नानांच्या पुण्याईवर. घर चालेल एवढंच उत्पन्न येत होतं. या प्रक्रियेत नानांनी घेऊन ठेवलेले तीन प्लाॅटही खर्ची पडले होते.
नाना कॅश काऊंटरवर बसून सगळीकडे नजर फिरवत होते. विवेक फुटकळ ग्राहकांना कपडे दाखवत होता. तर प्रसाद वरच्या मजल्यावरच्या रेडिमेड गारमेंटच्या सेक्शनमध्ये मोबाईलवर गेम खेळतांना सी.सी.टिव्हीवर दिसत होता. अंकीतचा अजून पत्ताच नव्हता. तुफान गर्दिचे दिवस नानांना आठवले आणि त्यांचं मन खंतावलं. ते दिवस परत येतील का असा आजकाल त्यांना प्रश्न पडत होता. आपल्यानंतर या मुलांचं कसं होणार ही काळजी त्यांना सतावू लागली.
" नाना बघा हा अंकीत अजून आला नाही" विवेकच्या बोलण्यानं त्यांची तंद्री भंगली.
" लाव फोन त्याला. विचार का येत नाहिये तो"
" मी लावला त्याला फोन. उचलत नाहिये तो"
नानांनी आपल्या मोबाईलवरुन त्याला फोन लावला. बऱ्याच वेळाने त्यानं तो उचलला.
" हो येतोच आहे नाना. आपला डबेवाला आज येणार नाहिये. म्हणून मी स्वतःच डबा घेऊन येतोय."
" आज ठिक आहे पण तुझं हे नेहमीचंच आहे अंकीत. अरे कधी समजणार आहेस तू तुझी जबाबदारी?" नाना रागावून म्हणाले. क्षणभर शांतता पसरली. मग दुसऱ्या क्षणाला अंकीत म्हणाला
" नाना तिथं आलो की बोलतो मी" असं म्हणून त्यानं फोन ठेवला.
" येतोय. आपला डबा घेऊन येतोय " विवेककडे पहात नाना म्हणाले
" हो. त्याला तर रोज काहीतरी बहाणाच पाहिजे. नाना एक दिवस सोक्षमोक्ष लावून टाका बरं एकदाचा. मला आजकाल हे सहन होत नाहिये"
"घरी गेल्यावर बोलू विवेक. दुकानात तमाशे नको"
विवेक चुप बसला पण त्याच्या मनात राग धुमसत होताच.
अंकीत डबा घेऊन आला तेव्हा विवेक दोन ग्राहकांना सांभाळत होता.
" डबा ठेव आणि गिऱ्हाईकाकडे बघ"नानांनी हुकूम सोडला.
अंकीत तिकडे गेला. दुपारी दोन वाजता प्रसाद खाली आला.
" नाना मी घरी जाऊ जेवायला"त्याने विचारलं
"कमाल करतोस. तुझा डबा आणलाय. तू आणि विवेक बसून घ्या. मी आणि अंकीत बघतो गिऱ्हाईकांकडे"
"नाना सकाळपासून एकही कस्टमर नाहिये वरती आणि संध्याकाळपर्यंत येईल असं वाटत नाही. मला नाही आवडत दुकानात जेवायला."
" तू घरी गेलास की चारपाच तास झोपूनच येशील. काही जायचं नाही" विवेक रागाने म्हणाला. प्रसादनेही त्याच्याकडे रागाने पाहिलं.
"प्रसाद आज आठवडे बाजाराचा दिवस. गिऱ्हाईक केव्हा येईल ते सांगता येत नाही. आज राहू दे" नाना कठोर आवाजात म्हणाले. प्रसाद तणतणत वर गेला. तिघा मुलांमधला तणाव नानांच्या लक्षात आला. आज रात्री भांडणं तर होणार नाहीत ना अशी भिती त्यांना वाटून गेली. रात्री नऊ वाजता दुकान बंद करुन सगळे परतले आणि टीव्हीवरचा कार्यक्रम बघण्याच्या क्षुल्लक कारणावरुन ठिणगी पडली. वादाला तोंड फुटलं. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. नाना आपल्या रुममध्ये बसून सगळं ऐकत होते. मुलांच्या भांडणात पडायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण आवाज वाढू लागले आणि मग प्रसादचा मुलगा त्यांना बोलवायला आला तेव्हा त्यांना जावंच लागलं.
" नाना या विवेकदादाची दादागिरी फार वाढलीये. जेव्हा बघावं तेव्हा आम्हांला बोलत असतो. खुप झालं आम्ही आता सहन करणार नाही. नाना ते दुकान विकून टाका बरं. आम्ही वेगवेगळे बिझनेस करु नाहीतर नोकऱ्या करु पण आता त्या दुकानात जाणार नाही. नकोच ती कटकट" अंकीत तावातावाने म्हणाला. नानांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
" वा फार छान सल्ला देतोहेस तू" नाना भरल्या डोळ्यांनी बोलू लागले "अरे ज्या दुकानाला उभं करण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं. ज्या दुकानाच्या कमाईवर एवढा मोठा बंगला उभा राहिला. घरात एवढ्या सुखसोयी आल्या. चारचाकी गाड्या झाल्या. ज्याच्या बळावर तुम्ही एवढे मोठे झालात. त्या दुकानाला विकून टाकायचं? का तर तुम्हांला धंदा चालवता येत नाही म्हणून ! हे तर सोन्याचं अंडं देणारी कोंबडी विकून टाकण्यासारखं झालं."
" सध्या ती कोंबडी अंडही देत नाहिये नाना " प्रसाद फटकून म्हणाला
" याचं कारण तुम्ही नालायक आहात" नाना गरजले " अरे अख्ख्या जिल्ह्यात एक नंबरवर होतं आपलं दुकान. तुम्ही बेजबाबदारीने रसातळाला नेलं."
क्षणभर कुणीच काही बोललं नाही कारण नाना खरंच बोलत होते.
"मी जिवंत असेपर्यंत तरी ते दुकान मी विकू देणार नाही. तुम्हांला दुसरे धंदे करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही मोकळे आहात पण माझ्याकडून एक रुपयाच्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका."
तिघं भाऊ चुप बसले कारण वेगळा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करण्याची एकातही धमक नव्हती.
नाना जायला वळाले. अचानक काहीतरी आठवून म्हणाले
"आणि हो आता तुमचे वेगळे निघण्याचे बेत शिजू लागतील. बिनधास्त वेगळे व्हा पण लक्षात ठेवा वेगळा होणाऱ्याला माझ्या प्राॅपर्टीतला एक छदामही मी देणार नाही."
नानांनी पाचर मारली आणि तिघं भाऊ आणि त्यांच्या बायकांच्या मनात धडकी भरली. झक मारुन दुकान चालवणं आणि एकत्र रहाणं भाग पडणार होतं.
दोन दिवसांनी नाना वीस दिवसांकरीता चारधाम यात्रेला निघून गेले. नाना असे गेले की तिन्ही भावांच्या बायका खुश होऊन जायच्या. किचन एकच असलं तरी तिघी वेगवेगळा स्वयंपाक करायच्या. तिघांची कुटुंबं वेगवेगळ्या वेळी जेवणं करायची. अंकितची बायको नोकरी करत असल्यामुळे त्याच्या कुटुंबाचं संध्याकाळचं जेवण सहसा बाहेर हाॅटेलमध्येच व्हायचं. नाना गेले की बच्चे कंपनी मात्र नाराज असायची. नाना रोज संध्याकाळी त्यांना घरच्या बागेत घेऊन जात. खेळणं झालं की त्यांना गोष्टी सांगत. कधी झाडांची, पक्ष्यांची, पर्यावरणाची माहिती देत. नानांमुळे मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण झाली होती. नानांच्या अनुपस्थितीत संध्याकाळी झाडांना पाणी द्यायचं काम ही मुलंच करत. विवेकची बारा वर्षाची मुलगी मुग्धा ह्या सगळ्यांची ताई होती. नाना असे बाहेरगांवी गेले की मुलांना टिव्ही पाहू न देता बागेत खेळवण्याचं अवघड काम मुग्धाच करायची. घरातल्या बायकांच्या टिव्ही सिरीयल्स संध्याकाळी सुरु व्हायच्या त्या रात्री साडेनऊपर्यंत चालायच्या. रात्री पुरुष मंडळी घरी आली की सिरीयल्स बंद होऊन न्युज चॅनेल्स सुरु होत. ही लहान मुलं कधीही त्यांना डिस्टर्ब करत नसत. मुळात त्यांना टिव्ही बघणंच आवडत नव्हतं आणि त्यामागे नानांचे संस्कार होते. आजोबा नसले की ही मुलं उदास व्हायची. रात्री झोपण्यापूर्वी फोनवर का होईना शाळेत, घरात घडलेल्या घडामोडी आजोबांना सांगितल्याशिवाय त्यांना रहावत नसे.
नाना यात्रेला गेले आणि तिन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांची आपसांत खलबतं होऊ लागली. सध्याच्या वादावर काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक होतं. एक दिवस त्यांना तशी संधी चालून आली. प्रसादच्या बायकोचा भाऊ आपल्या आर्किटेक्ट मित्रासोबत भेटीला आला. तो प्रशस्त बंगला आणि ती बाग बघून तो खुश झाला.गेल्या सहासात महिन्यापासून त्याच्याकडे काही काम नव्हतं. बंगल्याकडे पाहून त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती प्रसादला सांगितली. प्रसादला ती कल्पना जाम आवडली. त्याने ती आपल्या दोन्ही भावांना सांगितली. अंकीतने ती ऐकून आनंदाने उडीच मारली. विवेक मात्र फारसा समाधानी दिसला नाही.
"कल्पना चांगली आहे. पण नानांचं काय? ते तयार होतील का? शेवटी जागा त्यांच्या नावावर आहे?" तो म्हणाला
"दादा आपल्याला त्यांना तयार करावंच लागेल. एवढी सुवर्णसंधी चालून आलीये आपल्यासाठी"अंकीत म्हणाला.
"हो ना ! सध्या आपलं दुकानही व्यवस्थित सुरु नाहिये. आपल्याला एका झटक्यात करोडपती व्हायचं असेल तर आपल्याला दुसरा पर्यायच काय आहे?" प्रसादने विचारलं. दोघांनाही ते पटलं. काहीही करुन ही योजना नानांच्या गळी उतरवायचीच याची तिघांनीही जणू प्रतिज्ञाच केली. विवेकच्या बायकोला ही योजना आवडली नाही. प्रसाद आणि अंकीतच्या या बायकोला मात्र आपल्या सुखसमृद्धीची स्वप्नं पडू लागली.
नाना आले. वीस दिवसांच्या आपल्या अनुपस्थितीत दुकानाचा व्यवसाय फारच कमी झालेला त्यांना दिसला. ते अस्वस्थ झाले पण मुलांना बोलून तरी किती बोलणार? समजून सांगायला ती लहान थोडीच होती?
तिसऱ्या दिवशी रात्री जेवणं झाल्यावर नाना बैठकीत बसले असतांना तिघांनी अखेर तो विषय काढला.
" नाना जरा बोलायचं होतं" विवेक धीर धरुन म्हणाला. तिघा भावांच्या बायका आपली कामं सोडून हळूच बैठकीत आल्या. मामला काहीतरी विशेष आहे याचा नानांना अंदाज आला.
" बोल ना"
"नाना प्रसादच्या ओळखीचा एक आर्किटेक्ट आपल्या घरी आला होता. त्यानं एक खुप छान प्रपोजल आपल्याला दिलंय"
"कसलं प्रपोजल?"
"या बंगल्याच्या जागेवर एक सहा मजली अपार्टमेंट बांधायचं. प्रत्येक मजल्यावर चार असे २४ फ्लॅट तयार होतील. या फ्लॅटसच्या खाली साधारण २४ दुकान निघतील. दुकानांच्या खाली बेसमेंटमध्ये पार्किंग राहील. या २४ फ्लॅटपैकी ३ फ्लॅट आपल्यासाठी असतील. बाकी २१ फ्लॅट आपण प्रत्येकी ६० लाखाने विकुन टाकू. खालची दुकानं आपण प्रत्येकी २५ लाखाने विकू. म्हणजे एकूण आपल्याला अठरा ते एकोणीस कोटी मिळतील. बांधकामाचा खर्च वजा जाता आपल्याला अंदाजे १२ ते १४ कोटीचा प्राॅफिट होईल. शिवाय तिघा भावांना वेगवेगळी प्रशस्त घरं मिळतील. आजकाल प्रायव्हसी सगळ्यांना हवी असते. तीही सगळ्यांना मिळेल"
" व्वा छान आयडिया आहे" नाना म्हणाले तसे सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले.
" मला एक सांग. मी कुठं रहायचं?"
"कुठं म्हणजे? अहो तीन मुलं आहेत. तुम्हांला आवडेल त्याच्याकडे रहा" प्रसाद म्हणाला "माझ्याकडे रहा. मी तयार आहे "
"आणि तुझ्या बायकोला माझा कंटाळा आला तर तू मला विवेककडे जायला सांगणार. विवेकला कंटाळा आला की तो मला अंकीतकडे जायला सांगणार आणि अंकीतला कंटाळा आला तर मी कुठं जायचं? वृध्दाश्रमात?"
एकदम शांतता पसरली.मग अंकीत एकदम म्हणाला
"त्यापेक्षा असं करुया नाना, तुम्ही सगळ्यांकडे ४-४ महिने रहा म्हणजे कंटाळ्याचा प्रश्नच नाही"
"याचा अर्थ तुम्ही माझा फुटबाॅल बनवणार. चार महिने झाले की लाथाडा दुसरीकडे. यात कसलं आलं रे प्रेम आणि आपलेपणा?"
विवेकने प्रसादकडे पाहिलं आणि त्याच्या कानात कुजबूजला. प्रसादने मान हलवली आणि म्हणाला
"ते राहू द्या नाना आपण तुमच्यासाठी एक वेगळा फ्लॅट ठेवू. म्हणजे तुम्हांला हक्काचं घर होऊन जाईल"
"ते तर अजूनच वाईट. मग मी चहानाश्ता कुणाकडे करायचा? जेवायचं कुठं? त्यावरुनही तुमच्यात भांडणं होणार आणि त्या फ्लॅटमध्ये मी एकटा राहून काय करु? मी तिथं मरुन पडलो तरी तुम्हांला समजायचं नाही.आणि समजलं तरी तुम्हांला त्याचं काही वाटणार नाही"
"नाना तुम्ही माझ्याकडे रहा कायमचं. मी तुम्हाला कुठंही पाठवणार नाही" विवेकची बायको सुलभा अस्वस्थ होऊन मध्येच बोलली. सुलभा नानांची सगळ्यात आवडती सुन होती. खेड्यातली आणि गरीबाघरची होती म्हणून नव्हे तर ती सगळ्या सुनांमध्ये समजदार होती. तिचं माहेर एकत्र कुटुंबातील असल्यामुळे तिला माणसांची आवड होती. सुलभाच्या बोलण्यावर नानांनी विवेककडे पाहिलं. त्याच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्यांनी गर्दी केली होती.
अचानक काहीतरी सुचून नानांनी विचारलं
"हे सगळं ठिक आहे. पण बागेचं काय करणार आहात?"
" काय करणार आहात म्हणजे? अहो नाना बाग तोडल्याशिवाय अपार्टमेंट कसं उभं रहाणार?" अंकीत हसत म्हणाला
" अजिबात नाही. बागेला हातसुध्दा लावायचा नाही "नाना ओरडले " अरे तुमच्या जन्माअगोदरपासुनची झाडं आहेत ती ! मी प्लाॅट घेतला आणि मागच्या बाजुला ती झाडं लावून घेतली. पोटच्या पोरांसारखं किंबहुना त्यापेक्षाही जास्त सांभाळलंय मी त्यांना. झाडांचा बळी देऊन होणारा विकास मला नकोय "
" पण नाना त्या झाडांचा उपयोग तरी काय ?फळं देतात म्हणून? आपल्याजवळच फळांचं दुकान आहे. वाटेल तेवढी फळं पन्नास साठ रुपयात मिळतात. एवढ्याशासाठी आपलं ड्रिम प्रोजेक्ट थांबवायचं का?" प्रसाद थोडा रागानेच बोलला. ते ऐकून विवेकही पुढे सरसावला
"आता तुम्ही म्हणाल, भाज्या ताज्या मिळतात. माझे कितीतरी शेतकरी मित्र आहेत जे तुम्हाला सेंद्रिय भाज्या आणून देतील. ते मला नेहमी विचारतात पण आपल्याचकडे नको तेवढ्या भाज्या पडलेल्या असतात. मला तर कंटाळा आणलाय त्या भाज्यांनी"
" हो ना ! आणि त्या झाडांवरचे पक्षी किती घाण करतात. शीssमला तर त्या बागेत पाऊल टाकावसं वाटत नाही" प्रसादच्या बायको बोलण्याची संधी वाया थोडीच जाऊ देणार होती.
"ते सगळं ठिक आहे. पण एवढा अफाट पैसा आपल्याला मिळतोय तर त्या फालतू झाडांना काय कवटाळून बसायचं?"आता बोलायची पाळी अंकीतच्या बायकोची होती.
"बस करा "नाना संतापून ओरडले " हे घर माझं आहे. ही जागा माझी आहे आणि ती झाडंही माझी आहेत. त्यांचं काय करायचं ते मी बघेन. तुमच्यात धमक असेल तर दुसरीकडे प्लाॅट घ्या आणि बांधा हवं तसं अपार्टमेंट. अरे ज्या दुकानाच्या जोरावर मी हे वैभव उभं केलं ते दुकान तर तुम्हांला व्यवस्थित सांभाळता आलं नाही. चाललेत घर तोडायला ! अगोदर जोडायला शिका."
नाना उठून त्यांच्या बेडरुमकडे जायला निघाले. तसे प्रसाद आणि अंकीत त्यांच्याकडे धावले.
" नाना ऐका ना जरा. थांबा ना. याच्यातूनही काही मार्ग निघेल " नानांनी त्यांना हातानेच थांबवलं आणि ते बेडरुममध्ये निघून गेले.
"मी म्हंटलं ना, म्हातारा ऐकणार नाही आपलं" विवेक संतापून म्हणाला "गेलं आपलं ड्रिम प्रोजेक्ट पाण्यात आणि कशासाठी तर त्या फडतूस झाडांसाठी ! असं वाटतं कुऱ्हाड घ्यावी आणि खपाखप तोडून टाकावी ती झाडं"
आपल्या बापाचं बोलणं ऐकून मुग्धा घाबरून आपल्या आईला बिलगली.
"दादा अशी हिंमत हरुन कसं चालेल. आपण सगळीकडून त्यांच्यावर प्रेशर आणू. आपले नातेवाईक, नानांचे मित्र, नानांना ओळखणारी काही बडी धेंडं, सगळ्यांना सांगू. मी माझ्या सासऱ्यांनाही सांगतो. नाना त्यांचं नक्की ऐकतील" प्रसाद विवेकला धीर देत म्हणाला खरा पण त्यालाही मनातून शंका वाटत होती.
झालंही तसंच. महिनाभर अनेक लोकांनी नानांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण नाना आपल्या निर्णयापासून तसुभरही हलले नाहीत. तिघं भाऊ बिल्डरला भेटले. फक्त बंगल्याच्या जागेवर अपार्टमेंट उभं करता येऊ शकेल का याची विचारणा केली. अडचण ही होती की बंगल्याच्या चारही बाजुला झाडं होती.कितीही वाचवायची म्हंटली तरीही पाचसहा झाडांचा बळी ठरलेला होता आणि नाना तर एकही झाड तोडू देणार नव्हते.
तिघा भावांची तडफड वाढली होती.उपाय सुचत नव्हता.
एक दिवस नाना बाहेरगांवी गेले असतांना अंकीत विवेकला म्हणाला
" दादा किती दिवस हे दुकान दुकान करणार आहोत आपण? आपलं अपार्टमेंट झालं असतं तर एव्हाना मी तिथे वाईल्डलाईफ टुरीझमचं ऑफिस सुरु केलं असतं"
" हो ना ! मीसुध्दा ऑटोमोबाईल स्पेअरपार्टसचं दुकान सुरु करणार होतो."
" मला पण तर होजिअरीची एजन्सी सुरु करायची होती. नानांच्या त्या मुर्खपणामुळे सगळंच बोंबललं"
" नाना जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत काहीच होणार नाही. मरतही नाही लवकर म्हातारा "अंकीत बेशरमपणे म्हणाला
" कसा मरेल ?मरायला काही रोग तर पाहिजे ! ६५ वर्षाचे होऊनही नानांना अजून चष्मा लागलेला नाही. औषधाची एक गोळी घेतलेली नाही त्यांनी. रोज ५किमी.चालणं, प्राणायाम, योगासनं करतात ते. कशाला तब्येत बिघडेल त्यांची?" प्रसाद हताश होत म्हणाला.
" घाबरु नका. एक ना एक दिवस देव ऐकेल आणि म्हाताऱ्याला लवकर वर बोलावून घेईल" विवेक त्याच्या हातावर थोपटत म्हणाला
" अरे पण कधी?आपण म्हातारे झाल्यावर?" विवेकने खांदे उडवले.
" आपण एक काम करुया. आपण दुकानात कामच नाही करायचं. फक्त टाईमपास करत रहायचा. काहीतरी बहाणे सांगून नानांनाच कामाला लावायचं. शेवटी ते कंटाळून आपण म्हणू ते करायला तयार होतील" प्रसादने युक्ती सांगितली. बाकीच्या दोघांनाही ती पटली. अर्थात तो आणि अंकीत असेही काम करत नसतं. विवेकच थोडाफार काम करायचा. आता त्यालाही काम न करण्याचं जणू लायसन्स मिळून गेलं. तिघं मुलं जाणूनबुजून टाईमपास करताहेत हे नानांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी एक जुना सेल्समन सोडून बाकी सगळे सेल्समन काढून टाकले. नाईलाजास्तव तिघं परत कामाला जुंपले. मग ग्राहक आला की त्याला लवकर कसं बाहेर पिटाळायचं यासाठी तिघं प्रयत्न करु लागले. नानांच्या तेही लक्षात आलं. ग्राहक निघायला लागला की नाना त्याला बसवून घ्यायचे आणि मुलांना ग्राहकाला नवीन कपडे दाखवायच्या ऑर्डर सोडायचे. मुलांच्या वागण्याने नाना चांगलेच दुःखी झाले. एका बाहेरच्या माणसाने येऊन विचित्र खुळ मुलांच्या डोक्यात घालून दिलं होतं आणि मुलं घराचे तुकडे करायला निघाली होती. नानांना हे पसंत नव्हतं. आपण असेपर्यंत तरी मुलांनी एकत्र रहावं. आपल्याला नातवंडात रमू द्यावं असं त्यांना वाटत होतं. या घटनेला आता एक वर्ष होऊन गेलं होतं.व्यवसायाची स्थिती अजूनच खालावली. एक दिवस सकाळी सकाळी सात वाजताच घरातला फोन खणखणला. सुलभानं तो घेतला. बोलताबोलताच तिचे डोळे विस्फारले. जोरानं ओरडतच तिनं विवेकला हाका मारायला सुरुवात केली.विवेक धावतच आला.
" काय झालं? का ओरडतेस?"
" अहो नानांना ॲक्सिडंट झालाय. त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलंय"
" ओ माय गाॅड ! पण हे झालं कसं?"
"ते सकाळी नेहमीच्या रस्त्याने फिरायला गेले होते. एका वाळूच्या डंपरने त्यांना धक्का दिला. नाना डोक्यावरच आपटले आणि बेशुद्ध झाले. त्यांच्यासोबतच्या लोकांनी त्यांना ॲडमिट केलंय. पोलिसांनी ड्रायव्हर ला अटक केलीये" सुलभा रडतरडत सांगत होती. विवेकनं दोघा भावांना उठवलं. त्यांच्या बायकांना उठवण्याच्या भानगडीत न पडता विवेक आणि सुलभा बाहेर पडले.
हाॅस्पिटलबाहेर खुप गर्दी जमली होती ती फक्त नानांना बघण्यासाठी हे विवेकला कळल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. नाना इतके लोकप्रिय असतील असं त्याला वाटलं नव्हतं. थोड्या वेळाने त्याचे दोन्ही भाऊ बायका आणि मुलांसह आले. मुलांना आपल्या आजोबांना भेटायचं होतं. त्यांचा आजोबांवर आणि आजोबांचा त्यांच्यावर खुप जीव होता. त्यामुळे हट्ट करुन ती हाॅस्पिटलला आली होती. विवेक डाॅक्टरांना भेटला.तब्ब्येतीबद्दल विचारणा केली.
" आताच काही सांगता येणार नाही.सि.टी.स्कॅनचे रिपोर्ट्स आल्यानंतर परफेक्ट काहीतरी बोलता येईल. त्यांच्या मेंदूला जबरदस्त मार लागलाय. ब्रेन हॅमरेजची शक्यताही असू शकते. आमचे प्रयत्न चालू आहेत. लेट्स वेट ॲंड वाॅच"
विवेक आय.सी.यु.तून बाहेर आल्यावर प्रसाद आणि अंकीत त्याला कोपऱ्यात घेऊन गेले.
" दादा नानांनी म्रुत्युपत्र केलंय का?"अंकीतनं विचारलं"मला कल्पना नाही. त्यांचा वकील कोण आहे हेही माहीत नाही.पण असं का विचारताय?"
"अरे बाबा नानांचं काही बरंवाईट झालं तर वाटेहिस्से कसे होणार? आजकाल सगळं कोर्टातून करावं लागतं.नंतर कोर्टकचेऱ्या कोण करत बसेल. आपल्याला आताच काहीतरी करावं लागणार" प्रसाद घाईघाईने म्हणाला.
" अरे बापरे खरंच की ! पण आता या परीस्थितीत आपण कुणाला मृत्युपत्राबद्दल विचारणार आणि ते बरं तरी दिसेल का?"
" मी असं करतो नानांच्या कपाटात शोधतो. तोपर्यंत तुम्ही नानांच्या मोबाईलमध्ये एखाद्या वकीलाचा नंबर मिळाला तर त्याला फोन करुन विचारा" अंकीतनं उपाय सांगितला आणि दोघं काही बोलायच्या आत तो तिथून सटकला. प्रसादनं नानांच्या मोबाईलमधून एका वकीलाचा फोन शोधून काढून त्याला फोन लावला.
" नाही. नानांनी माझ्याकडून तरी असं मृत्युपत्र केलेलं नाही. पण मला एक सांगा नानांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही तुमच्या वाटेहिश्श्याची काळजी का करताय? नाना काही इतक्यात मरत नाही. अरे मजबूत खोड आहे ते." वकील संतापून म्हणाले तसा प्रसादने फोन बंद केला.
"मी काय म्हणतो दादा. आपण आपल्याला हवं तसं मृत्युपत्र तयार करुन घेऊ आणि नाना शुध्दीवर आले की लगेच त्यांच्या सह्या घेऊ " प्रसाद म्हणाला आणि नेमकी सुलभा तिथं आली.
"कशावर सह्या घेताय भाऊजी नानांच्या? अहो वडील आहेत ते तुमचे ! त्यांच्या तब्येतीची काळजी करायची सोडून तुम्ही काय लावलंय हे?" ती रागावून म्हणाली.
" तू त्यात लक्ष घालू नकोस सुलभा. शेवटी व्यवहारही बघावाच लागणार ना." विवेक म्हणाला. सुलभानं नाराजीचा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि ती निघून गेली.
सि.टी.स्कॅनचे रिपोर्ट्स आले. नानांच्या मेंदुचं ऑपरेशन करावं लागणार होतं पण ते कितपत यशस्वी होईल याबद्दल डाॅक्टरांना शंका होती. नाना कोमात जाण्याचीही भिती होती. निर्णय होत नव्हता. घरी जाऊन अंकीतनं नानांच्या रुममधली सगळी कपाटं शोधली पण कुठेही मृत्युपत्र मिळालं नाही. तिघं भाऊ अस्वस्थ झाले. पण काही इलाज नव्हता.
दोन दिवसांनी अचानक डाॅक्टर आय.सी.यू.तून बाहेर आले. विवेक सुलभासोबत बसला होता. आज रविवार असल्याने मुलंही सगळी दवाखान्यात आली होती.
"लवकर चला, नाना शुध्दीवर आलेत. ते सगळ्यांना बोलावताहेत " डाॅक्टर विवेककडे पाहून बोलले. विवेक आणि सुलभा उठले तसे डाॅक्टर म्हणाले
"मुलांनाही घेऊन चला"
आजोबांची अवस्था पाहून मुग्धाला रडू आवरलं नाही. रडतच तिनं त्यांना मिठी मारली. पलंगाजवळ जमलेल्या नातवंडांच्या डोक्यावरुन,गालावरुन नानांनी प्रेमाने हात फिरवला.
" कसं वाटतंय नाना?" विवेकनं विचारलं
नानांनी काही न बोलता हाताने सुलभाला जवळ बोलावलं. तिच्याही डोक्यावरुन हात फिरवला. ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करताहेत हे पाहून विवेक त्यांच्याजवळ गेला
"काही बोलायचंय नाना?"त्यानं विचारलं
मोठ्या कष्टाने नानांनी तोंड उघडलं. हलक्या पण सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात ते म्हणाले
"ए....क....त्र...र...हा....बा...ग ...सां...भा....ळा"
एवढं बोलतांनाही त्यांना धाप लागली. कष्टानं त्यांनी डोळे मिटले. पुढच्याच क्षणी त्यांनी मान टाकली.
"नाना नाना, डाॅक्टर.."विवेक ओरडला. डाॅक्टर घाईघाईने पुढे आले.त्यांनी नानांना बराच वेळ तपासलं. मग विवेककडे पहात त्यांनी मान हलवली
"साॅरी ही इज नो मोअर"
सुलभा आणि नानांच्या नातवंडांनी त्यांना बिलगून एकच आक्रोश केला. चौदा दिवसांचे सगळे विधी आटोपले.तिन्ही भावांनी सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली. वकिलाला गाठलं. कोर्टातून अधिकृत वारस लावून घेतले. सगळ्या प्राॅपर्टीची वाटणी करण्यापेक्षा पेंडिंग पडलेला ड्रिम प्रोजेक्ट सुरु करण्यावर तिघा भावांचं एकमत झालं. त्यासाठी बाग तोडावी लागणार होती. आता नाना हयात नसल्यामुळे विरोध करणारं कुणी नव्हतं. तिघंही बिल्डरला भेटले. नगरपालिकेत जाऊन प्लॅन मंजूर करुन घेतला. बँकातून कर्जही मंजूर झालं. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या गेल्या. मोक्याची जागा असल्यामुळे दुकानांचं ताबडतोब बुकींग झालं. बारा फ्लॅटही बुक झाले. अपार्टमेंट बांधण्याइतकी रक्कम जमा झाली. तिघं भाऊ खुष झाले. प्रसाद आणि अंकीतच्या बायकांना ही गोष्ट माहित असली तरी विवेकनं मात्र सुलभाला अजुनही अंधारातच ठेवलं होतं. एक दिवस अंकीतच्या बायकोकडून सुलभाला ते कळलंच. तिनं लागलीच विवेकला जाब विचारला
" तुम्ही काय या बंगल्याच्या जागेवर अपार्टमेंट उभं करताय म्हणे"
" हो. सगळी दुकानं बुक झालीत. बारा फ्लॅटसुध्दा बुक झालेत " विवेक आनंदाने म्हणाला
" बागेचं काय करणार आहात?"
" काय करणार म्हणजे? तोडणार"
"नानांचा या अपार्टमेंटला विरोध होता आणि मरतांना नानांनी तुमच्याकडून बाग सांभाळायचं वचन घेतलं होतं"
"हे बघ. नाना नुसतं तसं बोलले होते. मी त्यांना कोणतंही वचन दिलं नव्हतं."
" म्हणून काय झालं ! मरतांना नानांची तीच इच्छा होती की तुम्ही एकत्र रहावं आणि बाग सांभाळावी"
" आम्ही एकत्र तर रहाणारच आहोत ना ! आपले फ्लॅट जरी वेगळे असले तरी अपार्टमेंट एकच आहे ना? आणि बागेचं म्हणशील तर अपार्टमेंट झालं की त्याच्या कंपाऊंडमध्ये लावू ना झाडं"
"म्हणजे ही पुर्ण वाढलेली, बहरलेली, फळांनी लगडलेली झाडं तुम्ही तोडणारच. तुमचं, तुमच्या मुलांचं बालपण त्या बागेत गेलं. आता तुम्हाला तिची अडचण होतेय नाही का? स्वार्थी आहात तुम्ही सगळे भाऊ"
"हे बघ सुलभा माझं डोकं नको खाऊ. या प्रसाद आणि अंकीतमुळे अगोदरच मी वैतागून गेलोय. दोघंही दुकानात अजिबात इंटरेस्ट घेत नाहीत. नानांनी पोसलं त्यांना. मला त्यांना असं रिकामं बसवून पोसायची अजिबात इच्छा नाहिये. कळू दे ना त्यांना जबाबदारी काय असते ते!"
"दुकानाचं काय करणार आहात?"
"विकून टाकणार. जे पैसे येतील ते तिघं वाटून घेवू आणि आपापले वेगळे बिझनेस सुरु करु. मी होजिअरीची एजन्सी घेणार आहे."
"याचा अर्थ तुमच्या वडिलांची एकेक निशाणी, आठवण तुम्ही पुसून टाकणार तर " बोलताबोलता सुलभा गहिवरली
" एवढं सेंटिमेंटल होऊन चालत नाही सुलभा. आपलं भलं होत असेल तर अशा बोलण्याला काही अर्थ उरत नाही. शिवाय मला काही वडिलांबद्दल वाटत असेल पण माझ्या भावांना तर वाटलं पाहिजे"
" ते मला माहीत नाही पण तुम्ही जे करताय चुकीचं करताय. तुम्ही मोठे आहात लहान भावांना समजावू शकता."
"आता काहिही होणार नाही सुलभा. सगळं प्लॅनिंग झालंय आणि आमचा निर्णय पक्का आहे." सुलभाकडे रागारागाने पहात विवेक निघून गेला. बाग तोडण्याची बातमी मुलांनाही कळली. प्रसादचा दहा वर्षाचा मुलगा सौरभने त्याला याबद्दल विचारलं
" हो तोडणार आहे ती बाग.का? तुला काही ऑब्जेक्शन?" प्रसादनं रागानं त्याला विचारलं.
" पप्पा प्लिज नका तोडू ना बाग. इतकी छान झाडं आजोबांनी वाढवली आहेत आणि आम्ही खेळायचं तरी कुठे?आपल्या काॅलनीत साधं ग्राउंडसुद्धा नाहिये."
"गांवात दोन गार्डन्स आहेत. तिथं का नाही जात? आणि तिथं नाही जायचं तर घरात टिव्ही आहे, लॅपटाॅप आहे, मोबाईल आहे,त्यावर हजारो गेम्स आहेत ते खेळा."
"आम्हांला नाही खेळायचे ते गेम्स. डोळे खराब होतात त्यांनी. आम्हांला आपल्या बागेतच आवडतं. तिथं गेलं की आजोबांशी गप्पा मारल्यासारखं वाटतं आणि पप्पा इथं अपार्टमेंट बांधून त्यात दुकानं काढण्यापेक्षा आपलं इतकं चांगलं दुकान का नाही चालवत तुम्ही?"
"तू नको शहाणपणा शिकवू त्यांना !" प्रसादची बायको मुलाला दटावत म्हणाली "मोठ्यांच्या भानगडीत लहानांनी पडू नये. समजलं? जा आता अभ्यासला बैस " सौरभ हिरमुसुन तिथून निघून गेला.
" तुम्हांला माहितेय? ही सगळी पोरं एकत्र येऊन त्या बागेवरच चर्चा करताहेत. विवेक भाऊजींची मुग्धा यांची लिडर आहे. ती या पोरांना सांगतेय की आपण बाग तोडूच द्यायची नाही म्हणून. आमच्या आजोबांची बाग आहे म्हणे"
प्रसाद हसला.
"पोरांना काय घाबरतेस? त्यांना कोण जुमानतंय? दोन फटके मारले की चुपचाप बसतील"
अपार्टमेंट बांधायचं म्हणून तिन्ही भावांनी एक जुनं घर रहाण्यासाठी भाड्यानं घेतलं. बागेतली झाडं तोडण्याची महानगरपालिकेतून परवानगी घेतली गेली. अगोदर बाग तोडून मग बंगला तोडण्याचं काम सुरु करायचं होतं. मुहूर्त ठरला. प्रसादनं दोन झाडं तोडणाऱ्यांना बोलावून घेतलं. नेमकी माणसं अकरा वाजता आली. चिकूचं झाड अगोदर तोडावं असं ठरलं. एक माणूस झाडावर चढला. लागलेले जवळजवळ दिडशे चिकू त्यानं तोडून विवेककडे दिले. दुसराही माणूस कुऱ्हाड घेऊन वर चढला. वरच्या फांद्या दोघांनी तोडायला सुरुवात केली. ते पहातांना खाली उभ्या असलेल्या सुलभाच्या डोळ्यात पाणी आलं. ही झाडं वाढवतांना सासऱ्याच्या बरोबरीनं तिनंही कष्ट घेतले होते. या बागेत घालवलेले क्षण तिला आठवू लागले आणि तिचा जीव कासावीस होऊ लागला.
" अहो ऐका ना. नका ना तोडू ती झाडं " ती गयावया करत विवेकला म्हणाली पण विवेकनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यात घरासमोर बस थांबल्याचा आवाज आला. शाळेत गेलेली मुलं आली होती. पाचच मिनिटात बंगल्याचा बागेत उघडणारा दरवाजा उघडला आणि विवेकची दोन आणि प्रसादची दोन मुलं शाळेच्या युनिफॉर्ममध्येच बागेत आली. चिकूचं अर्ध तुटलेलं झाड आणि त्याच्या बागेत पडलेल्या फांद्या पाहून स्तब्ध झाली. दुसऱ्याच क्षणी मुग्धा ओरडली
" हे काय करताय तुम्ही? उतरा खाली. कोणतंच झाड तोडायचं नाही "
झाडावरची माणसं थांबली. विवेक मुग्धाजवळ आला.
" शांत बस मुग्धा. त्यांचं काम त्यांना करु दे"
"नाही बाबा आम्ही झाडं तोडू देणार नाही.आजोबांनी लावलेली झाडं आहेत ती"
" म्हणून काय झालं? आपल्या प्रगतीच्या आड ती येतायेत. मग ती तोडायला नको?"
" काका मरतांना आजोबा तुम्हांला सांगून गेले की बाग सांभाळा, एकत्र रहा. मी होतो तिथं. मी ऐकलं होतं सगळं" सौरभ म्हणाला. तेवढ्यात प्रसाद बाहेर आला.त्याने ते ऐकलं
" काय गोंधळ लावलाय तुम्ही पोरांनी ! चला सगळे आत जा. मुकाट्याने आमचं काम करु द्या " तो ओरडला
"आम्ही नाही जाणार आत. तुम्ही अगोदर झाडं तोडणं बंद करा." विवेकचा लहान मुलगा म्हणाला.
चिकूचं झाड आता थोडंसंच बाकी होतं. माणसं आता खाली उतरुन खोडावर घाव घालीत होती.
" बंद करा म्हणतेय ना मी." मुग्धा किंचाळली आणि चिकूच्या झाडाजवळ धावत गेली. दोघातला एक माणूस तिच्यासमोर उभा राहिला. दुसरा माणूस घाव घालतच राहिला. मुग्धामध्ये कुठून बळ आलं माहीत नाही तिनं त्या माणसाला ढकललं आणि घाव घालणाऱ्या माणसासमोर उभी राहिली. ते पाहिल्यावर विवेक धावत आला आणि त्याने मुग्धाला ओढलं आणि धरुन ठेवलं. मुग्धा ओरडत होती, किंचाळत होती, रडत होती. खोडावर खपाखप घाव पडू लागले आणि थोड्याच वेळात झाड जमीनदोस्त झालं. जमीनीवर फांद्या आणि पानाचा ढिग जमा झाला.चारही मुलं धक्का बसल्यासारखी त्या सपाट जागेकडे बघत राहिली.
" आता ते आंब्याचं झाड घ्या" विवेक ओरडला. तशी मुग्धा किंचाळली
" नाहीsss" तिनं विवेकच्या हाताला झटका मारुन स्वतःची सुटका करुन घेतली आणि पळत जाऊन तिनं आंब्याच्या झाडाला मिठी मारली. तिच्या मागे सौरभ, त्याची बहिण, विवेकचा मुलगा पळत गेले. त्यांनीही झाडाला मिठी मारली. ते पाहून विवेक आणि प्रसाद धावत गेले. मुलांना बाजुला करु लागले. मोठ्या प्रयासाने विवेकनं मुग्धाला बाजुला केलं आणि तिच्या थोबाडीत मारली. प्रसादनेही सौरभला बाजुला करुन ढकलून दिलं. खाली पडलेला सौरभ उठायला गेला तसा प्रसाद त्याला लाथांनी बडवू लागला. आंब्याच्या झाडाला मिठी मारलेली दोघं मुलं भितीने रडू लागली. रडणाऱ्या मुग्धाला पाहून विवेक संतापानं म्हणाला
"खबरदार जर तू त्या झाडाजवळ गेली तर"
"ते माझ्या आजोंबांचं झाड आहे. मी ते तोडू देणार नाही "मुग्धा रडतरडत म्हणाली आणि परत झाडाजवळ जाऊ लागली तसं विवेकने तिला अडवून इतक्या जोरात तिच्या मुस्काटात मारली की ती हेलपाटून खाली पडली. ते पाहून सुलभा धावतच पुढे आली तिने मुग्धाला उचलून जवळ घेतलं आणि विवेकवर ओरडून म्हणाली
" बस करा. लाज नाही वाटत पोटच्या पोरीला मारतांना? पैशासाठी आंधळे झालाहात तुम्ही. ती लहान पोरं गयावया करताहेत तरी तुम्हांला त्यांची दया येत नाही? आता माझा जीव गेला तरी हरकत नाही.मी झाड तोडू देणार नाही."
तिरीमिरीत ती झाडाजवळ जाऊन उभी राहिली आणि झाडं तोडणाऱ्या माणसांना म्हणाली.
" चालवा ती कुऱ्हाड माझ्यावर.तुकडे करा माझे. मगच ते झाड तोडा" घटनेनं वेगळंच वळण घेतलेलं पाहून प्रसाद पुढे आला.
"वहिनी अहो तुम्ही तरी समजून घ्या. ही बाग तोडल्याशिवाय आपलं ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण कसं होणार?"
त्याचवेळी अंकीत आणि त्याची बायको बाहेर आले.
" बरं झालं भाऊजी तुम्ही आलात. आता तुम्ही तिघं मला सांगा तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे? बापाच्या जीवावर मोठे झालात. त्यानं कमावलेल्या ऐश्वर्यावर ऐश केली. आता तो नाहीये हे पाहून त्याच्या प्राॅपर्टीची विल्हेवाट लावायला निघालात"
"वहिनी अहो आम्ही त्यांची प्राॅपर्टी दुप्पट करणार आहोत." अंकीत म्हणाला
" त्यांना जीवापाड असलेली झाडं तोडून? मरणाऱ्या माणसाची अखेरची इच्छा शत्रूसुध्दा पुर्ण करतात भाऊजी आणि तुम्ही बापाची शेवटची इच्छा डावलून ही बाग, हा बंगला तोडायला निघालात? तुफान चालणारा बापाचा व्यवसाय तुम्ही तुमच्या नाकर्तेपणामुळे डबघाईला आणला. सांगा कोणतं कर्तृत्व दाखवलं तुम्ही?"
तिघा भावांना काय बोलावं सुचेना. झाडं तोडणारी माणसं शांतपणे सगळं ऐकत होती. त्यातला एक प्रसादला म्हणाला
"साहेब नका तोडू झाडं. बघा ना ती बाहेर सायकल आहे ना ती किती जुनी आहे पण मी माझ्या बापाची आठवण म्हणून अजून सांभाळून ठेवलीये. आपल्या मेलेल्या बापाचं आणि या लहानग्या लेकरांचं मन दुखवून तुम्ही ही झाडं तोडताय. चांगलं नाही साहेब "
प्रसादनं विवेककडे पाहिलं. विवेकनं त्याला इशारा केला.
"ठिक आहे. जा तुम्ही. नंतर पाहू काय करायचं ते" प्रसाद पाकिटातून पैसे काढून त्यांना देत म्हणाला. ती माणसं गेली तशी प्रसादची बायको पुढे आली. खाली पडलेल्या सौरभला उठवून ती आत गेली. सुलभाही मुग्धाला घेऊन आत गेली.
"आता काय करायचं? ही पोरं तर हट्टालाच पेटलीहेत."अंकितनं दोघा भावांना विचारलं.
"काही घाबरायचं कारण नाही. उद्या ही मुलं शाळेत गेली की आपण झाडं तोडायला सुरुवात करु. ती येईपर्यंत सगळी झाडं तोडून टाकू " प्रसाद म्हणाला.
"नाही प्रसाद. मुलं शाळेत जातील पण सुलभा तर घरातच असेल. मला नाही वाटत ती झाडं तोडू देईल. एकदोन दिवस थांबा मी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो"
दुसऱ्या दिवशी सकाळी जसा विवेक उठला सुलभा त्याला म्हणाली
"अहो मुग्धाला बघा. रात्रभर तापाने फणफणतेय पोर"
विवेकच्या काळजात चर्र झालं. तो घाईघाईनं तिच्या रुममध्ये गेला. मुग्धा शरीराचं मुटकुळं करुन झोपली होती. त्यानं तिच्या गळ्याला हात लावला. खरंच चांगलीच तापली होती ती. त्याच्या स्पर्शाने तिला थोडी जाग आली असावी. ती कण्हत म्हणाली.
"बा..बा नका ना झाडं तोडू"
"रात्रभर सारखं हेच वाक्य बडबडतेय. चांगलाच धक्का बसलाय तिला कालच्या प्रसंगाचा."
सुलभा म्हणाली तसा विवेक धास्तावला. घाईघाईनं त्यानं मोबाईल काढला.तशी सुलभा त्याला म्हणाली
"डाॅक्टरांना बोलावलंय प्रसाद भाऊजींनी.सौरभलाही खुप ताप आलाय"
" बापरे!"
विवेक प्रसादच्या रुमकडे वळला. सुलभा त्याच्यामागून आली. सौरभ बेडवर झोपलेला होता. प्रसाद आणि त्याची बायको त्याच्या शेजारीच उभे होते. सौरभची लहान बहिण रडत होती.
"हिला काय झालंय?"विवेकनं विचारलं
" सौरभला ताप आल्यामुळें आणि आपण झाड तोडलं त्याचा राग आल्यामुळे रडतेय ती."
"काका नका ना झाडं तोडू.ब घा ना सौरभदादा आणि मुग्धाताई दोघंही आजारी पडलेत" ती काकुळतीनं म्हणाली. तेवढ्यात अंकीत डाॅक्टरला आत घेऊन आला.त्यांनी अगोदर सौरभला आणि नंतर मुग्धाला जाऊन तपासलं.
"या दोघांनाही फार मोठा मानसिक धक्का बसलाय. काय झालंय असं?"
सुलभानं तिघा भावांकडे रागारागाने पहात कोणतीही भीडभाड न ठेवता डाॅक्टरांना सगळी घटना सांगितली. ती ऐकल्यावर डाँक्टर गंभीर होऊन म्हणाले
" हे बघा मला तुमच्या कौटुंबिक प्रकरणात पडण्याची इच्छा नाही. मात्र या घटनेवरून दिसून येतं की या मुलांचं आपल्या आजोबांवर आणि या बागेवर खुप प्रेम आहे. एक झाड तोडलं तर ह्यांची ही अवस्था झाली. पुर्ण बाग आणि हा बंगला तोडल्यावर त्यांची काय अवस्था होईल याचा विचार करा. कदाचित तुम्ही तुमच्या मुलांना गमावून बसाल. खरं सांगू.इतका सुंदर बंगला आणि इतकी सुंदर बाग आपल्या शहरात कुठेही नाही. अपार्टमेंट बांधून तुम्ही पैसे कमवालही पण हे अप्रतिम निसर्गसौंदर्य कधीही मिळवू शकणार नाही. याउपर तुमची मर्जी"
तिघा भावांच्या चेहऱ्यावर डाॅक्टरांचा सल्ला त्यांना पटलेला दिसला नाही. थोड्या वेळाने तिघं भाऊ दुकानात निघून गेले. आज दुकानाचा सौदा होणार होता. सुलभा दिवसभर बैचेन होती. एकतर मुग्धा आणि सौरभ दोघांचा ताप उतरला नव्हता. अशीच परीस्थिती राहिली तर दोघांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागणार होतं. शिवाय तिघं भाऊ काय निर्णय घेतात हे कळत नव्हतं. दुकान विकल्या गेलं तर बंगला आणि बाग दोघांचं तोडल्या जाणं अपरिहार्य होतं. संध्याकाळी तिघं भाऊ घरी परतले.विवेक सरळ मुग्धाच्या रुममध्ये गेला. तिच्या गळ्याला हात लावल्यावर तिचा ताप कायम असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिच्या डोक्यावरुन त्यानं प्रेमानं हात फिरवला.
" मुग्धा बेटा"त्यानं तिला हलकेच मारली.
"बघा ना तिचा ताप अजून उतरत नाहिये " सुलभा आत शिरत म्हणाली. तिच्या पाठोपाठ प्रसाद,अंकित आणि त्यांच्या बायकाही आत आल्या. मुग्धानं डोळे किलकिले करुन विवेककडे पाहिलं.
"ऐक ना बेटा. तुझी बाग आम्ही तोडणार नाही आहोत. हा बंगलाही तसाच ठेवणार आहोत."
"काय सांगताय काय? खरंच?"सुलभा अविश्वासानं विचारलं."
" हो सुलभा. आम्ही तिघांनीही ठरवलंय. मुलांच्या जीवापुढे अपार्टमेंट आणि पैसा महत्वाचा नाहिये. म्हणून आम्ही दुकानाचा सौदा कॅन्सल करुन टाकलाय. नानांनी मोठ्या मेहनतीनं उभारलेला व्यवसायच आम्ही आता नेटाने करणार आहोत. अपार्टमेंटमधल्या फ्लॅट आणि दुकानाच्या बुकींगसाठी घेतलेले पैसे आम्ही हळूहळू परत करणार आहोत. आजपर्यंत खरंच आम्ही चुकीचं वागलो. दुकान विकतोय म्हंटल्यावर आज अनेकजण ते विकत घ्यायला तयार होते. काहिंना इतकं मोक्याच्या जागेवरचं दुकान आम्ही विकतोय याचं आश्चर्य वाटत होतं. त्या दुकानाची खरी किंमत आम्हांला आज कळली म्हणून आम्ही ते विकायचंच नाही असा निर्णय घेतला"
हे तिघं भाऊ सुधरलेत यावर सुलभाचा विश्वास बसेना.
मुग्धा आता उठून बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. विवेकनं तिच्याकडे पाहिल्याबरोबर "बाबा" म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली. विवेकलाही भडभडून आलं. तिला जवळ घेऊन तो रडू लागला.
" साॅरी बेटा मी तुला मारलं. आय ॲम रियली साॅरी"
तेवढ्यात सौरभ आणि बाकीची मुलं तिथे मुग्धाजवळ येऊन बसली. मुग्धानं सगळ्यांना जवळ घेतलं. सगळे भाऊबहिण एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले.
दोन दिवसांनी बरं वाटू लागल्यावर मुग्धा बागेत आली. पक्षांच्या चिवचिवाटाने तिचं मन प्रसन्न झालं. सगळ्या झाडांना पाणी टाकल्यावर तिचं लक्ष चिकूचं झाड असलेल्या जागेकडे गेलं. ती जागा आता ओकीबोकी दिसत होती. तिला एकदम हुंदका फुटला. एकदम झाडाच्या पानांच्या सळसळीने ती भानावर आली. हवा सुटली होती. आंब्याच्या झाडाच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. त्या झाडाकडे पाहून तिला एकदम आजोबांची आठवण आली. आवेगाने तिनं आंब्याच्या झाडाला मिठी मारली. पुन्हा जोरात हवा आली. त्या हवेनं सुकलेली पानं तिच्या डोक्यावर पडू लागली.ज णू आजोबाच तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवताहेत असं तिला वाटून गेलं आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू टपाटप खाली पडू लागले.
© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या " गिफ्ट "या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा