घाबरत घाबरत शब्द जुळवत …
घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाच विचारलं ,
"प्रेम करतो तुझ्यावर ,
तू करशील का माझ्यावर?"
तिने त्याच्याकडे हसून पाहिलं,
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं.
मग हळूच तिने त्याला डोळ्यांतून "हो" म्हटलं.
ढग नाही बरसले तेंव्हा,
वारा नाही सुटला तेंव्हा,
मोरही नाही दिसला नाचताना.
एक कावळा तेवढा ओरडला.
त्याला मात्र सतारीच्या ,
झंकाराचा भास झाला.
अविश्वासाने त्याने थरथरत,
तिचा हात हातात घेतला.
छाती फाटोस्तोवर एक भला मोठा,
मोकळा मोकळा श्वास घेतला.
चंद्र नाही हसला तेंव्हा,
मोगरा नाही फुलाला तेंव्हा.
गाणंही नाही सुचलं गुणगुणाव म्हणायला,
एक स्कूटरवाला तेवढी शिवी हासडून गेला.
त्याला मात्र सनईच्या,
ओल्या सुरांचा भास झाला.
मागे - पुढे लग्न-बिग्न, पोरं -बिरं,
संसार- बिव्न्सार करून झालं.
चिमणा-चिमणीचे एक पाखरू,
दूर देशात उडून गेलं.
एके दिवशी घाबरत-घाबरत शब्द जुळवत,
त्यानं तिला एकदाच विचारलं,
"जमली का गं मला तुझी सगळी सुखं द्यायला?"
तिनं त्याचाकड हसून पाहिलं,
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं.
मग तिने त्याला डोळ्यांतून "हो" म्हटलं.
समाधानानं थरथरता त्याचा हात,
त्यानं तिच्या हातात ठेवला.
छाती फाटोस्तोवर एक भला मोठा,मोकळा मोकळा श्वास घेतला.
पाऊस नाही पडला तेंव्हा,
क्षितीज नाही रंगलं तेंव्हा.
झुलाही नव्हता तिथं झुलाव म्हणताना.
पोस्टमन तेव्हढ पोराचं पत्र टाकून गेला,
त्याला मात्र आयुष्यच सतार झाल्याचा भास झाला.
लेखक : अज्ञात
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील