शुक्रवार, ३० जून, २०२३

418. आयुष्याची स्पर्धा नक्की जिंकेल...

 आई : काय म्हणत होती पिलू?
वडील : ते आमचं सिक्रेट आहे. 
आई : काय सिक्रेट? 
वडील : ती काय म्हणाली हे मी तुला सांगितलं, तर मग ते सिक्रेट राहणार नाही.
आई : कसलं लेटर?
वडील : तू ऐकलंस?
आई : हो.
वडील : मग मला का विचारतेय?
आई : मला सगळं प्रकरण जाणून घ्यायचंय.
वडील : तिला त्यांच्या शाळेतील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने लव्हलेटर दिलंय.
आई : काय?
वडील : एवढी का आश्चर्यचकित झालीस?
आई : अरे पिल्लू आताशी सहावीत आहे.
वडील : हो.
आई : मग तुला हे नॉर्मल वाटतंय?
वडील : हो.
आई : मी उद्या शाळेत जाऊन, चांगला बेत बघते त्याचा.
वडील : कुणाचा?
आई : त्या पोराचा.
वडील : पिल्लू म्हणतेय की, तो तिला त्रास देत नाही.
आई : अरे पण..
वडील : तुला प्रश्न नाही पडला?
आई : कसला?
वडील : तिने तुझ्याशी हे सर्व शेअर करण्यापेक्षा, माझ्याशी.
आई : कारण तुझ्या एक्स्ट्रा लाडानेच, ती बिघडली आहे.
वडील : तुला पहिलं लव्हलेटर कितव्या वर्षी आलेलं?
आई : त्याने काय फरक पडणार?
वडील : सांग तर..आई : मी नववीत असताना दिलेलं माझ्या एका क्लासमेटने.
वडील : तू घरी त्याबद्दल सांगितलं होतं?
आई : कशाबद्दल?
वडील : लव्हलेटर बद्दल?
आई : नाही.
वडील : का?
आई : कारण मग घरचे माझ्यावरच ओरडले असते.
वडील : का?
आई : कारण त्यांचा स्वभाव तसा होता.
वडील : कसा?
आई : मुलांना दोष देण्याचा.
वडील : तुही आता पिल्लूला दोषच देतेय ना?
आई : पण फरक आहे.
वडील : कसला?
आई : तू माझा इंटरव्युव्ह का घेतोय?
वडील : एक काम करते का?
आई : आता काय?
वडील : आजचा न्यूजपेपर घेऊन ये.
आई : बरं.
वडील : काय आहे हेडलाईन?
आई : एमपीएससी टॉपरचा मित्रानेच केला खून.
वडील : खालची बातमी काय आहे?
आई : उद्योजकाची पत्नी आणि मुलासह आत्महत्या.
वडील : अगदी शेवटची बातमी काय?
आई : सासुरवाडीत भरदिवसा शेतात पत्नीनेच चिरला पतीचा गळा.
वडील : वरील सर्व घटना आपल्या समाजात घडत आहेत?
आई : हो.वडील : म्हणजे त्या आपल्या आजूबाजूला घडत आहेत.
आई : हो.
वडील : त्या घडण्याची कारणं काय आहेत
आई : वेगवेगळी कारणं असणार
वडील : या घटना घडण्यास जबाबदार कोण आहे
आई : परिस्थिती
वडील : त्या व्यक्तीचे पालक
 आई : हो
वडील : कसे
आई : परिस्थिती कितीही बिकट असली, तरी कुठलाही टोकाचा निर्णय घेणे हा अविचार आहे
वडील : करेक्ट
आई : त्याचं काय?
वडील : कुठल्याही व्यक्तीची जडणघडण कळत नकळत त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून होते
आई : सहमत
वडील : माहिती घेतली तर कळेल की, सर्वच घटनांमधील गुन्हेगार आणि व्हिक्टिम हे सुशिक्षित आहेत.
आई : हो
वडील : मात्र असं असूनही, त्यांनी थेट खुनाचा किंवा आत्महत्येचा पर्याय स्वीकारला
आई : बरोबर.
वडील : याला त्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासातील त्रुटी जबाबदार आहेत
आई : कसं काय
वडील : आयक्यू म्हणजे
आई : इन्टेलिजन्स क्वोशन्ट
वडील : त्याचा वापर
आई : बैद्धिक क्षमता तपासण्यासाठी होतो
वडील : आणि इक्यू म्हणजे
आई : नाही माहित
वडील : इक्यू म्हणजे इमोशनल क्वोशन्ट
आई : त्याचा वापर  कशासाठी  होतो
वडील : त्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीची भावनिक क्षमता समजते
आई : ओके
वडील : एसक्यू म्हणजे
आई : नाही माहित
वडील : एसक्यू म्हणजे सोशल क्वोशन्ट
आई : सामाजिक बुद्धिमत्ता
वडील : त्यामुळे एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक आणि सामाजिक गोष्टींचं भान येतं
आई : ओके
वडील : सीक्यू ठाऊक आहे
आई : नाही
वडील : सीक्यू म्हणजे क्रिएटिव्ह क्वोशन्ट
आई : त्यामुळे एखाद्या व्यक्तीची क्रिएटिव्ह क्षमता समजते
वडील : एक्यू म्हणजे ॲडव्हर्सिटी क्वोशन्ट
आई : त्याने काय समजतं
वडील : त्यातून एखाद्या व्यक्तीची संकटांना सामोरं जाण्याची आणि पार करण्याची क्षमता समजते
आई : त्याचा इथे काय संबंध
वडील : एका व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात
आई : एकंदर जडणघडण.
वडील : हो. मात्र.. 
आई : मात्र काय
वडील : शोकांतिका म्हणजे आपल्या व्यवस्थेत फक्त बुद्धिमत्तेला अधिक महत्व दिलं जातं
आई : ते कसं
वडील : आपण मुलांना नेहमी त्यांचे मार्क विचारतो
आई : हो
वडील : त्यांच्या भावना, सामाजिक भान, संकटांना तोंड देण्याची क्षमता, क्रिएटिव्हिटी याविषयी कुणाला काही घेणं-देणं नसतं.
आई : हो
वडील : त्यामुळे एका व्यक्तीची पूर्ण जडणघडण होत नाही
आई : त्याने काय फरक पडतो
वडील : त्याचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर आणि वर्तणुकीवर परिणाम होतो
आई : कसा
वडील : मागे आपण ट्रीपला गेलो होतो, तेव्हा रस्त्यात एका अनोळखी दुचाकीचा अपघात झालेला
आई : हो
वडील : तेव्हा इतर लोक मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होते आणि
आई : आणि पिल्लूने धावत जाऊन त्या अपघातग्रस्त महिलेच्या हातात पाण्याची बॉटल दिली
वडील : कारण तिला समाजभान आहे
आई : मग
वडील : सायन्स प्रोजेक्ट बनवायचा होता
आई : हो. मी तिला बनवून देणार होते, तर तिने विरोध केला
वडील : तिने गुगलवरून माहिती मिळवून, स्वतःच्या हाताने प्रोजेक्ट बनवला
आई : म्हणूनच तिचा नंबर नाही आला
वडील : कारण इतर मुलांच्या पालकांनी त्यांना प्रोजेक्टमध्ये मदत केलेली
आई : त्याने काय फरक पडला
वडील : तिला क्रिएटिव्ह काहीतरी करण्याचा आत्मविश्वास मिळाला
आई : मग
वडील : ती स्वतःचा राग, आनंद, दुःख व्यक्त करते आणि चुकाही सहज कबूल करते
आई : तू तिला तसं शिकवलं आहेस
वडील : त्यामुळेच ती भावनिकदृष्ट्या दिवसेंदिवस कणखर होत आहे
आई : जाणवतंय
वडील : तिच्या टॅबचा चार्जर खराब झालेला
आई : हो
वडील : तर तिने डिजिटल कॅमेऱ्याची कॉड वापरून टॅब चार्ज करायला सुरुवात केली
आई : बरोबर
वडील : याचाच अर्थ ती, दैनंदिन आयुष्यातील संकटांना पार करण्याचा प्रयत्न करते
आई : खूपदा
वडील : यातून तिचा ॲडव्हर्सिटी क्वोशन्ट डेव्हलप होतोय
आई : कळतंय. 
वडील : काय
आई : हेच की, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त बुद्धिमत्ता कामाची नाही
वडील : मग
आई : त्याला भावनिक कणखरता, निर्णयक्षमता आणि सृजनशीलतेची जोडही मिळायला हवी
वडील : ती माझ्यासोबत कोणतीही लहानमोठी गोष्ट सहज शेअर करते
आई : कारण तू तिचं सर्वकाही ऐकून घेतो
वडील : आणि तिला तुझी भीती वाटते
आई : भीतीही वाटायला हवी
वडील : त्या भीतीमुळेच मुलं आणि पालक यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होत नाही
आई : कालांतराने होऊ शकेल
वडील : मी तुला सांगितलं होतं
आई : कायवडील : वेळ मिळेल तेव्हा, मासिक पाळीविषयी तिच्याशी बोल
आई : ती अजून लहान आहे
वडील : असं तुला वाटतंय
आई : म्हणजे
वडील : तिने माझ्याजवळ पिरियड्सविषयी चौकशी केलेली
आई : काय
वडील : कारण इंटरनेट, मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचं वयात येण्याचं वय आपोआप घटत आहे
आई : मग
वडील : त्यामुळे तिला अचूक माहिती योग्यवेळी पुरवली गेली पाहिजे
आई : अरे पण शाळेत..
वडील : आपण सर्वकाही शाळेच्या भरवश्यावर सोडू शकतो
आई : म्हणजे
वडील : शाळा जर त्याकामी गंभीर नसेल तर
आई : तर साहजिकच.. 
वडील : काय
आई : पिल्लूचा सर्वांगीण विकास होणार नाही
वडील : म्हणजेच जे आजकाल आपल्याला न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळतंय..
आई : हो. उद्याला तिच्या हातूनही तसंच काहीतरी घडण्याची शक्यता आहे
वडील : म्हणूनच आपल्याला जबाबदार पालक या भूमिकेतून, तिच्यात भावना आणि संवेदना रुजवाव्या लागतील
आई : म्हणजे ती संवेदनशील बनेल
वडील : आणि आयुष्यातील कोणत्याही संकटाला जिद्दीने सामोरी जाईल
आई : मीच चुकले
वडील : मुलं लहानाची मोठी होताना आई वडिलच जर त्यांचे मित्र बनले, तर.. 
आई : तर ते बाहेर कुठला आधार शोधणारच नाहीत
वडील : कारण मुलं मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात.
आई : आईवडील त्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याची मूर्ती घडवतात
वडील : मात्र मुलांना फक्त सामाजिक जबाबदारी म्हणून वाढवलं तर..
आई : तर त्यांच्या संगोपनात उणिवा राहतील आणि.. 
वडील : आणि सुजाण नागरिक निर्माणच होणार नाही
आई : परफेक्ट
वडील : म्हणूनच तर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे
 आई : कोणता
वडील : आपल्या पिल्लूला जोरात धावायला लावायचं की, सातत्याने धावायला शिकवायचं.
आई : म्हणजे
वडील : म्हणजे ती जर इतरांशी स्पर्धा करत राहिली तर कदाचित शाळेच्या स्पर्धेत हरेल
आई : मात्र तिने आपल्या मार्गदर्शनात जर स्वतःशी स्पर्धा केली
 वडील : तर शारीरिक, भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या ती कणखर बनेल
आई : म्हणजे ती आपोआप लंबी रेस का घोडा बनेल
वडील : आणि लंबी रेस का घोडा शाळेची एखादी स्पर्धा हरला.. 
आई : तरी आयुष्याची स्पर्धा हमखास जिंकतो
वडील : अगदी बरोबर

लेखक :  श्री. अक्षय भिंगारदिवे
दिनांक : २७/०६/२०२३

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...