शनिवार, ३ जून, २०२३

388. वर्तुळ...

     टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. तो नेटका सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला होता. प्राचार्यांनी माईक हातात घेतला आणि आपल्या धीरगंभीर आवाजात ते बोलू लागले....! आता टाळ्या थांबून तिथे विलक्षण शांतता पसरली होती. विद्यार्थ्यांची शिस्तच जणू त्यातून दिसून येत होती.
प्राचार्य म्हणाले, "गेले तीन महिने या सुंदर कार्यक्रमासाठी स्वतःला झोकून देऊन संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन करणाऱ्या वल्लरी मॅडमला मी आता स्टेजवर आमंत्रित करत आहे."
पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि या कडकडाटातच वल्लरी मॅडम स्टेजवर आल्या. कृश, उंच, हसतमुख, सावळ्याश्या पण देखण्या, श्रमलेल्या, परंतु चेहऱ्यावर विलक्षण समाधान असलेल्या, कॉटनची फिकट साडी नेसलेल्या, केसात अबोलीचा गजरा माळलेल्या वल्लरी मॅडम स्टेज वर आल्या. संपूर्ण ऑडिटोरियम उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करीत होते. मॅडम विद्यार्थ्यांच्या फार लाडक्या दिसत होत्या. त्या येऊन प्राचार्यांच्या समोर उभ्या राहिल्या. त्यांनी प्राचार्यांना, स्टेजला आणि सर्व सभागृहाला सुहास्य वदनाने अभिवादन केले. प्राचार्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवला, याचा एक यथार्थ अभिमान आणि समाधान त्यांच्या चेहर्यावर पसरलेले होते. माईक अजूनही प्राचार्यांच्याच हातात होता. त्यांनी विद्यार्थ्यांना खूण केली. उभे असलेले विद्यार्थी बसले. आणि प्राचार्य बोलू लागले.
"गेले तीन महिने या तीन दिवसांच्या सांस्कृतिक सोहळ्यासाठी मॅडमने अगदी काळ, वेळ, श्रम, पैसा कशाचाच विचार न करता प्रचंड मेहनत घेतली, आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आणि संयोजन इतके उत्कृष्ट होते, की हा संपूर्ण विद्यापीठात एक आदर्श कार्यक्रम ठरावा. सांस्कृतिक कार्यक्रमातील उच्च अभिरुची दर्शक विषय, सहभागी विद्यार्थ्यांची निवड, स्टेजवरील त्यांचा अनुक्रम... हे सगळे इतके सुंदर आणि विचारपूर्वक ठरवलेले होते, की कुठेही कार्यक्रम कंटाळवाणा झाला नाही आणि कुणालाही हुल्लडबाजीला कसलाही वाव मिळाला नाही. गेले तीन दिवस आपण याचा अनुभव घेतोय. मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, गायनाचार्य चंद्रहास बुवा यांना विनंती करतो की, त्यांनी आमच्या वल्लरी मॅडमचा पुष्पहार, मान वस्त्र आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा."
इतका वेळ मुलांकडे कौतुकाने पहात असलेले चंद्रहास बुवा आता उभे राहिले. स्टेजवर एका मुलीने ट्रे मध्ये मानवस्त्र, पुष्पहार आणि श्रीफळ आणून ठेवले. वल्लरी मॅडम आता त्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी हसत मुखाने दोन्ही हात जोडून, किंचित मान झुकवून चंद्रहास बुवांना अभिवादन केले. प्रती अभिवादनासाठी हसून हात जोडून चंद्रहास बुवांनी त्यांच्याकडे पाहिले आणि ते जागेवर थिजून गेल्या सारखे उभे राहिले.
ती वल्लरी होती !! बुवांची वल्लरी !!
बारा वर्षे बुवांसोबत जिने संसार केला होता, ती वल्लरी !!
वल्लरी अशी इथे भेटेल याची बुवांनी कधी कल्पनाच केली नव्हती. तिला समोर पाहून त्यांची विचार शक्तीच खुंटल्यासारखी झाली. आपल्याला काय करायचे याचे भानही त्यांना राहिले नाही. ते वेड्यासारखे तिच्याकडे बघत होते. तिच्या डोळ्यात मात्र एक विलक्षण थंडपणा बुवांना जाणवला. कसलीही ओळख दिसू नये याचा आटापिटा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. दिग्मूढ होऊन बुवा तिच्याकडे बघतच उभे राहिले. ट्रे कडे डोळ्यांनी इशारा करत, तिने बुवांना भानावर आणले, आणि बुवांनी विलक्षण गोंधळलेल्या मनाने गडबडीने तिच्या हातात पुष्पहार व श्रीफळ दिले. गळ्यात कशीबशी शाल टाकली आणि ते मटकन खुर्चीवर खाली बसले. हसतमुखाने सत्काराचा स्वीकार करून, आपल्याला सांस्कृतिक विभाग प्रमुख करून, कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आणि संयोजन करण्याबाबत संपूर्ण मोकळीक देऊन आपल्यावर विश्वास टाकल्या बद्दल आणि आपला सत्कार केल्याबद्दल आत्मविश्वासाने आभाराचे दोन शब्द बोलून वल्लरी स्टेजवरून चालती झाली.
बुवा अजुनही तिच्याकडे वेड्यासारखे बघतच होते. ही तीच वल्लरी आहे, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. तिचे शब्द, तिचा आत्मविश्वास, वागण्या बोलण्यातील डौल यामुळे बुवा अक्षरशः चकित झाले होते.
बुवांचे तसेही रिझर्वेशन उद्याच्या ट्रेनचे होते. त्यामुळे आजचा मुक्काम हॉटेलवरच होता. नंतरच्या चहापानाच्या कार्यक्रमाला न थांबता बुवा तडक हॉटेलवर निघून आले.
खोलीत आल्याबरोबर विलक्षण श्रांत मनाने त्यांनी स्वतःला पलंगावर लोटून दिले. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा त्यांचा जीव तडफडत होता.
गेल्या वीस वर्षात आपण वल्लरी ची साधी चौकशी सुद्धा केली नाही. ती कुठे, कशी राहते? याचा कधी विचारही केला नाही. 'तिचा भाऊ येऊन तिला घेऊन गेला', एवढेच फक्त आपल्या कानावर आले होते. बुवांना आठवले, गेले दोन दिवस बुवा इथे हॉटेलवर होते, पण त्यांच्या आवडी-निवडी अचूक माहिती असल्यासारखी त्यांची बडदास्त ठेवलेली होती. पण हा निव्वळ योगायोग असू शकेल, असे त्यांना वाटत होते. आता वल्लरीने हे सगळे केले, याची खात्री झाल्यावर, त्यांना आपली स्वतःचीच लाज वाटू लागली. वल्लरीला गमावून आपण आयुष्यात किती मोठी चूक केली, हे आता त्यांच्या लक्षात आले होते. काहीही करून वल्लरी ला भेटायचचं असं त्यांच्या मनात आलं.
तिने दुसरे लग्न केलं असेल का? बुवांच्या मनात विचार आला, पण आपण तिला घटस्फोट सुद्धा दिला नव्हता. मग कसं शक्य आहे हे? नाही....नसेलच....नाहीच !
वल्लरी आपलीच असणार अजूनही...! बुवांचे मन आक्रंदले. कसंही करून तिची भेट घ्यायचीच असे बुवांनी ठरवले. तेवढ्यात बिदागी चे पाकिट देण्यासाठी आणि संध्याकाळच्या जेवणाचे आमंत्रण देण्यासाठी, स्वतः प्राचार्य बुवांच्या खोलीत आले. अर्धा तास मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण बुवांचे त्यात लक्ष नव्हतेच जणू ! शेवटी न राहवून ते प्राचार्यांना म्हणाले, "मला त्या वल्लरी मॅडमला भेटायचेय. मघाशी लक्षात आले नाही. पण इतक्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचे व्यक्तिशः मला कौतुक करायचे आहे".
प्राचार्यांनी ताबडतोब आपल्या ड्रायव्हरला बोलावले. "बुवांना आपल्या गाडीतून वल्लरी मॅडमच्या घरी सोडून ये", असे त्याला सांगितले. वल्लरीच्या त्या छोटेखानी बंगलीच्या बाहेर बुवा उभे होते. त्यांना तिथे सोडून ड्रायव्हर निघून गेला.
बंगली च्या बाहेर छोटीशी पण सुरेख बाग होती. खूप चांगली निगराणी ठेवलेली! बागेत एका गुलमोहराच्या झाडाला पार बांधलेला होता. पोर्चमध्ये झोपाळा टांगलेला होता. बाग स्वच्छ आणि नीटनेटकी होती. 'लग्न झाल्यानंतर आईच्या मागे लागून बळजबरीने आपल्या पुण्याच्या बंगल्याबाहेरच्या छोट्याश्या अंगणात अशीच छोटीशी बाग वल्लरीने तयार केली होती, पायऱ्यांसमोर अशीच छोटीशी रांगोळी रोज रेखाटलेली असायची,' बुवांना आठवले....! बेलचे बटण दाबताना बुवांचा हात विलक्षण थरथरत होता.
'ती आपल्याला हाकलून तर देणार नाही ना,' त्यांना भीती वाटत होती.
कामवाल्या मावशींनी दरवाजा उघडला.
"कोण हवंय?" तिने प्रश्नार्थक मुद्रेने बुवांना विचारले.
"वल्लरी..... म्हणजे…...वल्लरी मॅडम. बुवांनी सांगितले.
"आपण बसा. मी ताईंना पाठवते", असे म्हणून मोलकरिण आत निघून गेली.
बुवा हॉलचे निरीक्षण करत होते. थोडीशीच पण नेटकी सजावट, सुंदर रंगसंगती वल्लरीची उच्च अभिरुची दाखवत होते. घर स्वच्छ, टापटीप आणि नीटनेटके होते.
बुवांना आपले मुंबई चे घर आठवले. 'केवढा मोठा हॉल होता, पण सदैव अस्ताव्यस्त, गबाळा ! कुठलीही गोष्ट कशीही ठेवलेली. ज्योत्स्ना होती तोवर तिनेही कधी विशेष लक्ष दिले नाही, आणि आता गेल्या सात वर्षापासून तर ती आपल्या जवळ नाहीच. घरातील नोकर माणसे त्यांच्या बुद्धीने जे काय आवरायचे तसे आवरतात.' बुवांचे मन आणखीनच खिन्न झाले. तितक्यात वल्लरी हॉलमध्ये आली. सलवार कुर्त्यात ती आणखीनच तरुण वाटत होती. वयाच्या चौदाव्या वर्षी आपल्या घरी लग्न होऊन आलेली वल्लरी, कधीही मान वर करून बोलली नाही, की डोक्यावरचा पदर कधी तिने पडू दिला नाही. लग्ना नंतर सहा वर्षातच एका मागे एक अण्णा, आई गेले. पण त्यांच्या जाण्यानंतरही ती तशीच राहिली. लाजरी, बुजरी, खेडवळ, संकोचलेली, आत्मविश्वास नसणारी'.बुवांना आठवले. तिला पाहताच बुवा उभे राहिले. त्यांना पाहून वल्लरी दोन मिनिट गोंधळल्यासारखी वाटली. पण पुन्हा तिची नजर तशीच शांत आणि थंड झाली.
"बसा". विलक्षण कोरडेपणाने ती बुवांना म्हणाली. "इकडे कोणाकडे आलात? म्हणजे कोण हवंय"?
"तूच वल्लरी... म्हणजे..... तुम्हीच!" गडबडून बुवा बोलले.
"बोला काय काम होतं आपलं माझ्याकडे"? वल्लरी ने विचारले.
"कशी आहेस वल्लरी"? बुवांनी आवाजात विलक्षण मार्दव आणून विचारले.
" हे पहा, मला सगळे वल्लरी मॅडम म्हणतात. मला एकेरी कुणी बोललेलं आवडत नाही. तो अधिकार फक्त माझ्या भावा शिवाय इतरांना नाही. कृपया आपण मला एकेरी संबोधू नका. माझ्या कडून आपला अपमान होईल". रूक्ष व कठोर आवाजात वल्लरी म्हणाली. लग्नानंतर बारा वर्षात बुवांसमोर कधी डोळे उचलून वर न बघणारी, बुवांना सदैव घाबरत असणारी, बुवांसोबत अगदी हळू आवाजात बोलणारी सदैव त्यांना दबून राहणारी वल्लरी त्यांना आठवली.'
"मी इतर कोणी आहे का? मी तुझा.... तुमचा म्हणजे... आपण दोघे....! मला..... एक ग्लास पाणी मिळेल का प्यायला"? बुवांना काय म्हणायचे ते त्यांना शब्दात सांगता येईना आणि ते अवसानही त्यांना सापडेना. तोंडाला कोरड पडली.
वल्लरीने बाईला हाक मारली. पाणी आणायला सांगितले. पाणी पिल्यावर बुवांना थोडी हुशारी वाटली.
"हं , बोला काय म्हणत होता आपण?" वल्लरीने त्याच रूक्षपणाने विचारले.
दोन मिनिटे स्तब्ध राहून अवसान गोळा करत बुवा म्हणाले, "मी चुकलो वल्लरी ! खूप खूप चुकलो ! मला माफ कर"
"कशाबद्दल बोलताय आपण"? वल्लरी ने विचारले.
"मला माहिती आहे, माफी मागण्या जोगा माझा गुन्हा नाही. तरीपण मला माफ कर वल्लरी ! हवं तर मी तुझे पाय धरतो". बुवांच्या डोळ्यात बोलताना किंचित पाणी तरळल्याचा वल्लरीला भास झाला. क्षणभर वल्लरी आतून हलली. पण क्षणभरच!आणि धारदार आवाजात ती बोलू लागली.....
"कोणत्या गुन्ह्याबद्दल माफ करू बुवा मी तुम्हाला? माझ्या बौद्धिक भुकेला तू साथ देऊ शकत नाही. असं वारंवार मला म्हणत, बावळट, खेडवळ, असं म्हणून माझा आत्मविश्वास खच्ची केल्याबद्दल? बारा वर्षाच्या संसारात कधी एक शब्दही मला प्रेमाने न बोलल्याबद्दल? ज्योत्स्ना बरोबर सदैव रममाण होताना, कायम दौऱ्यांवर जाताना, आपल्या घरी मोलकरणी सारखी राबणारी, आपल्या आई वडिलांची काळजी घेणारी, घराण्याची रीतभात, परंपरा सांभाळणारी ही मुलगी, जिला आपण देवा ब्राह्मणा समोर लग्न करून आपल्या घरी आणलेय, तिला ही आपली काहीतरी गरज असेल, हे कधीही न समजून घेतल्याबद्दल? ज्योत्स्नासाठी मुंबईला एक आलिशान फ्लॅट घेऊन, महिनोन महिने तिकडे वास्तव्य करताना, पुण्याच्या बंगल्यात आई अण्णा गेल्यानंतर ही एकटी भुतासारखी कशी जगत असेल? काय खात पीत असेल याची कधीही तमा न बाळगल्याबद्दल? जगायला पैसे लागतात. आई अण्णांच्या जाण्यानंतर, ते आपल्याकडे तोंड वेंगाडून, लाचार होऊन, खूपदा पत्रातून मागितल्यावर, उपकार केल्यासारखे सहा महिन्यातून कधीतरी एकदा माझ्या अंगावर फेकून गेल्याबद्दल?
आई अण्णांच्या माघारी नेहमीच लाचारिची पेज आणि कधीतरी उपकार केल्यासारखी दिलेली शेज ह्या नवरेपणाच्या गाजवलेल्या अधिकाराबद्दल? जिच्या अन्न वस्त्र निवारा याची जबाबदारी संपूर्णपणे आपल्यावर आहे तिला गेले वीस वर्ष ती कशी, कुठे जगतेय? याचा साधा मागोवाही घेतला नाही याबद्दल? की आपल्या मुलीला तिच्या नवऱ्याने सोडली, या धक्क्याने माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दल? सांगा ना बुवा यातल्या कोणत्या गुन्ह्याबद्दल मी तुम्हाला माफ करू?" अत्यंत आवेगाने बोलताना वल्लरी चे ओठ भावनावेगाने थरथरू लागले.
बुवा खाली मान घालून शांत बसले होते. आपण खरंच चुकलो याची जाणीव ज्योत्स्ना सोडून गेल्यापासूनच त्यांना होत होती. आज वल्लरी च्या तोंडून हे सारं ऐकताना ते खरोखर शरमिंदे झाले होते. वयाच्या या वळणावर खरं तर, त्यांना आता सोबतीची गरज जास्त होती. पण वल्लरी आपलीच आहे, थोडंसं मनवलं अन् माफी मागितली तर आपल्याकडे येईल, ही त्यांची आशा धुळीला मिळाली होती. त्यांनी अनुभवलेल्या पूर्वीच्या वल्लरी पेक्षा ही फार वेगळी वल्लरी त्यांना भासली. विषण्ण होऊन बुवा बसले होते. काही क्षण विलक्षण विचित्र शांततेत गेले. हताश होऊन बुवांनी मान वर केली. विद्ध नजरेने ते वल्लरी कडे बघत होते. तितक्यात तिने बाईला हाक मारली आणि कॉफी आणायला सांगितली.
"अतिथी म्हणून आलात, पाहुणचार घ्या आणि इथून निघा बुवा"!
असं स्पष्ट तीनं बुवांना बजावलं. खरंतर ती कॉफी सुद्धा नको असं त्यांना वाटत होतं. झाली तेवढी शोभा पुरे झाली, इथून उठावं आणि चालायला लागावं असं त्यांचं मन म्हणत होतं. पण पायात जणू मणा मणाच्या बेड्या अडकवल्या सारखं त्यांना झालं होतं. बाईने आणून दिलेली कॉफी कशीबशी बुवांनी घशाखाली ढकलली. हताश होऊन ते उठले, अन् वल्लरीकडे न पाहता दरवाज्याकडे निघाले. तोच वल्लरी उठून त्यांना म्हणाली,
"बुवा,एक मिनिट थांबा".
बुवा थबकून उभे राहिले. हिच्या मनात काय आहे? त्यांना समजेना.
तोच वल्लरी घाईघाईने आत गेली आणि पटकन बाहेर आली तिच्या हातात एक डबी होती. तिने समोर धरली. डबी उघडली त्यात नथ होती. बुवा मनोमन शहारले. त्यांच्या आईची नथ त्यांनी ओळखली. प्रश्नार्थक नजरेने त्यांनी वल्लरीकडे पाहिले. भरल्या डोळ्यांनी वल्लरी बोलू लागली,
"बुवा तुम्ही ज्योत्स्ना बरोबर राजरोस राहू लागलात ही गोष्ट आई अण्णांनी फार मनाला लावून घेतली होती. माझा काहीच दोष नसताना मला मिळणारी शिक्षा पाहून आई स्वत:च मनाला फार खात होत्या. त्यांनी मला त्यानंतर पुढे शिकण्यासाठी प्रवृत्त केले. अण्णा गेल्यानंतर जगण्याची त्यांची इच्छाच नाहीशी झाली होती. शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांनी ही नथ माझ्याजवळ दिली आणि मला म्हणाल्या, "मुली माझी आठवण म्हणून ही तुझ्याकडे ठेव. आणि असं काही कर्तृत्व करून दाखव की, तू माझी सून आहेस याचा मला अभिमान वाटला पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला त्याने जे केले त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. ज्या दिवशी तो पश्चात्तापाने तुझ्याकडे येईल त्या दिवशी मी मुक्त होईल."
माझ्या सासूबाई आज खऱ्या अर्थाने मुक्त झाल्या. या नथीला मी माझ्या देवघरात ठेवलेले होते . आता ही तुमच्याजवळ असू द्या. कुणा दिग्दर्शकाचा हात धरून सिनेमातील हीरोइन होण्यासाठी ज्योत्स्ना तुम्हाला सोडून गेली. तिच्या क्षेत्रात यशस्वी सुद्धा झाली. आता वयाच्या या टप्प्यावर तुमच्या कोणत्यातरी गरजेसाठी तुम्ही पुन्हा कुणा तिसरीला जवळ करू लागलात तर हि नथच तुम्हाला योग्य तो पायबंद घालील. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते मला चांगले समजलेले होते बुवा. पण तुमच्याशी लग्न झाल्यापासून तुमचे गाणे तुमच्या मैफीलीत बसून ऐकायची इच्छा होती. तुम्ही कलाकार म्हणून कसे आहात, हे समजून घेण्याची इच्छा होती. त्यासाठी मी तुमचे गाणे इथे ठेवले होते. तुम्ही कलाकर म्हणून नक्कीच थोर आहात यात संशय नाही. तुमच्यातल्या कलाकराला माझा मनोमन नमस्कार. आता यानंतर कोणत्याही नात्याने पुन्हा माझ्याकडे येऊ नका कलाकार किंवा माणूस दोन्हीही !"
खालमानेने बुवा वल्लरी च्या घरातून बाहेर पडले आणि वल्लरीने दरवाजा बंद करून घेतला. मागे वळून पाहण्याचा मोह बुवांना झाला पण मोठ्या कष्टाने तो टाळून बुवा आपली जड पावले उचलत, ओढत पुढे निघाले.......एकटेच !

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...