कोकणात कितीही दिवस फिरा, मन काही भरत नाही. रत्नागिरीपासून थोडं दूर रस्त्यानं गेले की, शेतांमध्ये मोठमोठी घरे असल्याचे पाहायला मिळते. एक घर, एक स्टाईल असे कधीच नसते. मोठे घर छोटे शेत, छोटे घर मोठे शेत. आंबे, नारळ, सुपारीच्या बागाच बागा. कोकण म्हणजे आपल्या राज्याचे सौंदर्य आहे. रस्त्याच्या कडेला आंब्याची बाग आणि त्या आंब्याच्या झाडावर असलेले पाडाचे आंबे, कुणाचेही मन त्यावर जाईल असं सगळं होतं. मी गाडी थांबवायला लावली. चारी बाजूने आंब्याच्या बागेला कुंपण होते. एक गेट आणि त्या गेटच्या आतमध्ये एक छोटेसे घर होते. मी आतमध्ये आवाज दिला. कुणीही येत नव्हते. मी गेट काढून आतमध्ये जाईन तेव्हढ्यात एक छोटे कुत्र्याचे पिलू अंगावर चाल करून आले. मी अर्धं उघडलेलं गेट बंद केलं. त्या कुत्र्याच्या अंगावर मांस नव्हते, तरी गेटवरचा अख्खा किल्ला तो एकहाती लढत होता. मी त्या कुत्र्याच्या मागे पाहिले तर एक आजोबा काठी टेकवत टेकवत येत होते. पांढराशुभ्र पोशाख, चेहऱ्यावर कसली तरी काळजी.
आजोबा जवळ आले आणि म्हणाले, "काय पाहिजे."
मी म्हणालो, ‘‘आजोबा दोन आंबे द्याल का?’’
आजोबा म्हणाले, ‘‘घ्या ना. तसे मी हे कुणीतरी यावे, आंबे खावेत यासाठी ठेवले आहेत. हल्ली तसे कोणी खायलाही येत नाही.’’
मी एक बोललो आणि आजोबा चार बोलत होते. मी चार आंबे काढले आणि मागे पाहतो तर आजोबा नाहीत. मी आंबे घेऊन गेटपर्यंत जाणार तोच आजोबा एक छोटी बॅग घेऊन आले. आजोबांनी आवाज दिला. म्हणाले, ‘‘अहो ही बॅग घ्या. अजून आंबे काढा. घरी न्या.’’ त्यांचा आग्रह खूप झाला. बॅगेत थोडे आंबे घेतले.
मी आजोबांजवळ आलो. "किती पैसे झाले" असे मी विचारले. त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘नाही हो, ही बाग मी लोकांनी खावी यासाठी लावली आहे.’’ पुन्हा आजोबा बोलत होते.
मी एक आंबा खायला लागलो. पाहता पाहता चार आंबे संपले. माझे हात रसाने भरले होते. आजोबा म्हणाले, ‘‘चला मी तुम्हाला पाणी देतो.’’
मी हात धुतले. मला एक फोन आला. मी फोनवर बोलत होतो. आजोबा समोर असलेली समाधी धूत होते. मी विचारले, ‘‘कुणाची समाधी आहे ही?’’
आजोबा म्हणाले, ‘‘माझ्या कारभारणीची.’’
मी पुन्हा विचारले, "कधी गेल्या त्या?", आजोबा म्हणाले, "सहा वर्षे झाली."
आमच्या गप्पा सुरू झाल्या. आजोबा जेव्हढे बोलके होते, त्यापेक्षा जास्त भावनाशील होते. काय एकेकाचे आयुष्य असते, सगळे असून काहीतरी चुकतंय अशी सल मनामध्ये अनेक वेळा राहून जाते. मी ज्या आजोबांशी बोलत होतो, त्यांचे नाव रामचंद्र देवेंद्र देवकर.
रामचंद्र काका पुण्यात एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्या पत्नी सविता यादेखील शिक्षिका होत्या. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी. मुलगी श्वेता आजारामध्ये गेली. तीन मुलांमध्ये एक मुलगा परदेशात आहे. दोन मुले पुण्यात प्राध्यापक आहेत. सुना नोकरी करतात. नातू-नात असा काकांचा मोठा गोतावळा आहे, पण मुलांमध्ये होणाऱ्या भांडणामुळे काका सर्वांमध्ये राहत नाहीत. एकाही सुनेला आणि मुलालाही काका अजिबात आवडत नाहीत, कारण त्यांचा काहीही उपयोग नाही असे आहे. काकाच्या मुलांना त्यांची आठवण येते. ती काकांच्या पेन्शन मिळणाऱ्या दिवशी. 'या महिन्याचे पेन्शन आम्हाला द्या, आम्हाला काम आहे', अशी पेन्शनसाठीची लाईन पंधरा दिवसांपासून लागलेली असते.
काकांचे वय आता ८५ पार झाले आहे. डोळ्याला नीट दिसत नाही. चालता येत नाही. या जगात आई नंतर बहीण, बायको आणि मुलगी ही नाती काळजी घेणारी असतात. पण यांपैकी कुठलेच नाते काकांकडे शिल्लक नव्हते.
जर तुम्हा म्हाताऱ्या माणसांकडे सेव्हिंग नसेल, एखादा जमिनीचा तुकडा नसेल, तुमचे पेन्शन नसेल, तर तुम्हाला रोज बुटाची ठोकर मारण्याचे काम तुमची मुले करतात. एक-दोन नाही तर माझ्यासोबत असणाऱ्या अनेक प्राध्यापक, इतर मित्र या सर्वांची अवस्था अशीच आहे. कुणालाही सेवानिवृत्तीनंतर ‘सुख’ कशाला म्हणतात हे माहिती नाही. याबाबतचे अनेक ‘किस्से’ काका मला सांगत होते. 'सुनांच्या आहारी गेलेली मुले आणि कधी न विचारणाऱ्या सुना या आयुष्याला ‘वाळवी’ लागल्यासारखे असतात' असे काका सांगत होते. मी काकांची समजूत काढत होतो.
काका म्हणाले, ‘‘मी समाजशास्त्राचा प्राध्यापक होतो. आयुष्यभर विद्यार्थांना मी सामाजिक मूल्ये कशी जपायची, आपले घर, कुटुंब किती महत्त्वाचे आहे ते शिकवले, माझे अनेक विद्यार्थी समाजशास्त्रामध्ये मोठे संशोधक आहेत. मी सर्वांच्या मनात समाजशास्त्र रुजवण्यात सक्सेस झालो, पण माझ्या मुलांच्या मनात मी समाजशास्त्र रुजवू शकलो नाही, ही माझ्या मनात खंत आहे. माझी घरी प्रचंड अवहेलना होते, हे सर्व पाहुण्यामंडळींना माहिती आहे. मला ते फार वाईट वाटते. म्हणून मी फारसा सर्वांच्या संपर्कात नसतो. कुणाच्या लग्नकार्यात जात नाही. अलिप्तपणे या शेतात राहतो. माझे ‘समदुःखी’ असणारे अनेक मित्र येथे येतात."
मी म्हणालो, "ही जमीन कधी घेतली?"
काका म्हणाले, ‘‘माझ्या पत्नीला भाऊ, बहीण कोणीच नाही, तिच्या वडिलांनी मरतांना तिच्या नावावर हा जमिनीचा तुकडा केला. सविताची नेहमी इच्छा असायची, दारात आलेला माणूस कधी उपाशी, रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. ती देव, कर्माला खूप मानायची, तिच्या मैत्रिणी मुलांना म्हणायच्या 'तुमच्या आई-बाबांची पुण्याई आहे म्हणून तुमच्याभोवती ऐश्वर्य लोळण घेते.' या शेतात मी खाण्यापुरते ठेवतो. आणि बाकी सर्व येणाऱ्या-जाणाऱ्यांना वाटून टाकतो.
हा जमिनीचा तुकडा आमच्या नावावर करा, तेव्हाच तुम्हाला नातवाशी बोलू देतो, अशी जबरदस्ती माझ्यावर सुरू झाली. माझे मित्र म्हणाले, 'तू मुलांना शिकवले, त्यांची लग्नं केली, त्यांना नवे घर करून दिले. नातवांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. सर्वांचे कर्ज भागवलेस. तुझे घर तू मुलांच्या नावे केले, तुझी सर्व जबाबदारी तू पार पाडली. आता हा जमिनीचा तुकडा कशाला मुलांच्या नावे करायचा.' माझ्या दोन मित्रांनी तर जेव्हा सगळे मुलांच्या नावावर केले, तेव्हा त्या दोघांनीही त्यांना घरातून जाण्यास भाग पाडले. आता एकजण मुलीकडे राहतो आणि एकजण पुण्यातच वृद्धाश्रमात." काका त्यांच्या मित्रांचे, ओळखीच्या लोकांचे किस्से जेव्हा सांगत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. या उच्चशिक्षित मुलांविषयी मनात चीड निर्माण होत होती. हल्ली जेव्हढे उच्चशिक्षित तेव्हढे व्यावहारिक पाहायला मिळतात. त्या व्यवहारात ते अगोदर आई-बाबाला टार्गेट करतात. हे सर्व ठिकाणी पाहायला मिळते.
आम्ही बोलत असताना माझा मोठा मुलगा जयेश गाडीतून बाहेर आला. त्याने ‘चला’ म्हणून मला आवाज दिला. काकांना मुलाला पाहताच क्षणी लक्षात आले हा माझा मुलगा आहे. ते बाहेर गेले. माझी पत्नी सारिका, लहान मुलगा अर्णव, मोठा मुलगा जयेश यांना घेऊन आले. शेतात काम करणाऱ्या गड्याला बोलून त्यांनी आंबे काढायला लावले. आम्ही आंबे खाल्ले, माझी दोन्ही मुले आणि आजोबा खेळण्यात बेभान झाली. मुले खेळतच होती. आजोबा दमून माझ्या आणि माझ्या बायकोच्या जवळ येऊन बसले. डोळ्याला रुमाल लावत ते पुन्हा रडायला लागले. आम्हाला कळेचना नेमके झाले तरी काय?
माझी पत्नी सारिका प्रचंड हळवी. काही विचारले नाही, काही नाही, काकांच्या सोबत तीही रडायला लागली. त्यांचे रडणे बाजूला खेळणाऱ्या मुलांनी पाहिले आणि तेही येऊन लहान तोंड करून बसले. आजोबांनीच सर्वांना शांत केले. त्यांच्या रडण्याचे कारण काय हे सांगत आजोबा मला म्हणाले, ‘‘आज एक वर्ष झाले, सहा नातू आहेत, पण एकाचेही तोंड पाहिले नाही. तुमच्या गोड मुलांना पाहून मला माझ्या नातवांची आठवण आली. बिच्चारे... त्यांनाही फार हुरहुर लागली असेल. माझी तेही वाट पाहत असतील. माझ्या म्हातारपणाच्या काळजीने मी नातवांच्या प्रेमाला मुकलो. काय करावे बाबा? पेन्शनचे थोडे मिळणारे पैसे आणि हा जमिनीचा तुकडा माझ्या आयुष्याची काठी बनली आहे. सुनांचे रोज उठता-बसता मिळणारे टोमणे खाऊन मी पार वैतागलो होतो." आम्ही निघतांनाही आजोबांचा कंठ दाटून आला. माझ्या दोन्ही मुलांना दोन हातात धरून त्यांनी गाडीपर्यंत सोडले. आम्ही निघालो.
माझ्या मनात अनेक विचार येत होते. सर्वच मुले काकांच्या मुलांसारखी नसतात, हे खरे आहे. पण जी मुले असे वागतात आणि त्यांचे प्रमाण खूप आहे, त्यांचे काय करायचे? हल्ली घरोघरी हे चित्र आहे, याचे करायचे काय? वय झालेल्या माणसांकडे काही असेल तरच त्याला किंमत, अन्यथा नाही. असे आहे का? आम्ही भारतीय संस्कार म्हणतो, अशा वेळी कुठे जातात हे संस्कार? आई-बाबांना तुम्ही लाथा मारणार असाल तर हा निसर्ग काय तुम्हाला सोडणार आहे, कदापि नाही?
© ® संदीप काळे,
9890098868
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा