शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

802. काही आगंतुक विषय अगदी टोकाचे होण्यापेक्षा

माझं नुकतंच लग्न झालं होतं, त्यावेळी भोसरी एमआयडीसी मधील मॉरिस नामक एका कंपनीत मी हेल्पर म्हणून कामाला होतो. (आता त्या कंपनीचे नाव बदलले आहे. ) इतर ठिकानांपेक्षा या कंपनीत जरा जास्ती पगार मिळायचा, त्यामुळे सगळ्या होतकरू मुलांची या कंपनीत कामाला लागण्यासाठी एकच धावपळ सुरू असायची, सुदैवाने १९९६ साली मला देखील या कंपनीत एक पिरियड मिळाला होता. त्यावेळी बाजारात.. माणिकचंद, गोवा आणि मूलचंद नामक गुठके फार फेमस होते. त्या कंपनीत रात्रपाळी सुद्धा असायची, त्यामुळे बरेच कामगार तंबाखू किंवा गुठका चघळत कामाची रात्र घालवायचे. त्यावेळी गोवा आणि मुळचंद गुठका फक्त एक रुपयाला होता, आणि माणिकचंद बहुतेक पाच रुपयाला एक पुडी होती. त्यावेळी माणिकचंद ग्रुप मधून बाहेर पडून जोशींनी या गोवा गुठक्याची नवनिर्मिती केली होती असं काहीतरी त्यावेळी ऐकू यायचं. त्यामुळे गोवा गुठका देखील फारच चवदार लागायचा. आणि अर्थातच तो माणिकचंदला बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करत होता. तिथे माझ्यासोबत कामाला असणारा एक मुलगा कंपनीत नुकताच परामनेंट झाला होता, आणि त्याला माणिकचंद खाण्याची सवय होती. माझ्या प्लॅन्टवर सुपरवायझर म्हणून कामाला असणाऱ्या एका व्यक्तीला देखील गुठका खायची सवय होती, पण तो व्यक्ती स्वस्तातील मुळचंद गुठका खात असायचा. एकदा काय झालं आम्हाला रात्रपाळी होती, आणि आमचा सुपरवायझर त्यादिवशी गुठक्याची पुडी आणायला विसरला. आणि त्याने माझ्या मित्राला गुठका मागितला. त्यावेळी मागचा पुढचा कसलाच विचार न करता तो त्या सुपरवायझरला त्याच्याकडे हात करत म्हणाला. नीचे लोग नीची पसंद मुळचंद, आणि स्वतःकडे हात करत म्हणाला. उंचे लोग उंची पसंद माणिकचंद. मुळचंद खाणाऱ्याला मी माणिकचंद देत नसतो. त्या सुपरवायझरला येवढं अपमानास्पद बोलून तो मुलगा त्या ठिकाणाहून निघून गेला. त्यामुळे आमच्या प्लांटवर असणाऱ्या मुलांमध्ये सगळीकडे एकच हशा पसरला होता. त्यावेळी या कंपनीत आम्ही समवयस्क असे सात आठ मित्र होतो, तर एक मित्र त्यावेळी म्हणाला. यावेळी पगार झाल्यावर आपण सगळे जाऊन बियर वगैरे मारुयात. या विषयावर आमच्या सगळ्यांचं एकमत झालं, पण आमच्यातील एक मुलगा म्हणाला. तुम्ही जाऊन या, मी तुमच्या सोबत येऊ शकणार नाही. त्यावेळी कोणीही जास्ती विचारपूस न करता, त्याला वगळून पार्टी करूयात असं ठरलं. पण तो मुलगा पार्टीला नाही का म्हणाला.? हे मला समजलं नसल्याने, तो नाही कशासाठी म्हणतोय हे जाणून घेण्यासाठी मी त्याचा पिच्छाच पुरवला. त्यावेळी त्याने सगळी हकीकत मला सांगितली.
     त्या मुलाचे वडील पोलीस खात्यात इन्स्पेक्टर होते, (त्यावेळी या मॉरिस कंपनीत नवीन मुलांना वशील्याने परमनेंट करायचे. त्यामुळे बऱ्याच मोठमोठ्या घरातील मुलं या कंपनीत कामासाठी यायचे. आणि कालांतराने वशिला लावून ते या कंपनीत परमनेंट देखील झाले.) त्याचा एक मोठा भाऊ देखील होता, तो देखील अगदी वेल सेटल्ड होता, पण तो घरच्यांपासून चोरून लपून मित्रांसोबत कधीतरी दारू प्यायचा. एकदा गणपती विसर्जनात. मजा म्हणून तो मित्रांसोबत दारू प्यायला, आणि गणपती विसर्जन करायला गेल्यावर, पाय घसरून तो नदीत पडला, आणि नदीत कधी बुडाला हे कोणालाच समजलं नाही. शवविच्छेदन केल्यावर तो दारू प्यायला होता असं समजलं. त्यानंतर आपला मोठा मुलगा दारू प्यायल्याने गेला, आता लहान मुलाला तसं काही व्यसन लागू नये, याकडे त्याच्या वडिलांचं खूप बारीक लक्ष होतं. त्यानंतर त्याच्या वडिलांना कोठून तरी कुणकुण लागली, की आपला लहान मुलगा देखील मित्रांच्या संगतीने कधीतरी दारू पिऊ लागला आहे. हे समजताच वडिलांनी त्याला विश्वासात घेतलं आणि सांगितलं. तुझा मोठा भाऊ या दारूमुळेच गेला आहे, चुकून तुझं काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाकडे पाहावं.? त्याचे वडील देखील आठवड्यात एक दोनदा ड्रिंक करायचे, आणि तेंव्हापासून त्यांनी एक नियमच केला. तुला दारू प्यायची असेल तर माझ्यासोबत पीत जा, पण तू घराबाहेर दारू प्यायल्यालं मला बिलकुल खपणार नाही. तेंव्हापासून मी बाहेर कुठेही दारू पीत नाही, फारच वाटलं तर वडिलांसोबत बैठक करतो, पण बाहेर मित्रांसोबत नाही म्हणजे नाहीच. आपण कितीही सावध असलो तरी, वेळ काही सांगून येत नाही, पण आपल्यावर भयंकर वेळ येण्यापेक्षा असं अनुकरण कधीही चांगलंच असं देखील कधी-कधी वाटून जातं. फक्त आईवडिलांच्या भीतीपोटी रात्रभर गुपचूप दारू ढोसून शांतपणे घरी येऊन झोपणारा माझ्या ओळखीतला एकुलता एक मुलगा, आपल्या बापाची करोडो रुपयांची संपत्ती मागे सोडून आकालीच या जगातून निघून गेला. व्यसन करणं चांगलं किंवा वाईट, हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असला तरी, किंवा हे सगळं लिहून मी त्या विषयाला प्रमोट करत आहे असं मुळीच समजू नका, पण आपल्या जीवनातील काही आगंतुक विषय अगदी टोकाचे होण्यापेक्षा, वेळीच त्यांना सामंजस्यपणे हाताळलं गेल्यास, त्यातून सुंदर आणि सहज सोपे मार्ग निघू शकतात, हेच मला यानिमित्ताने सांगावसं वाटलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...