अश्विनी ऑफिस मधून घरी आली, अजून अमित यायला उशीर होता. अश्विनी आणि अमित यांच्या लग्नाला जवळपास तीस वर्षे होवून दोघेही साठीकडे झुकलेले. लग्नाच्या वेळी दोघेही नोकरीला होते. मुलं ही लवकर झाली हम दो हमारा एक या नवीन संकल्पनेनुसार त्यांनी एका मध्येच समाधान मानले सुरवातीला संसारात वेळच मिळत नव्हता नंतर नंतर तर स्वतःचा विचार करायला जमलंच नाही. आधि मुलाचे बालपण. त्याला उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी दिवस रात्र लागणारा भरमसाठ पैसा कमविण्यातच त्यांचे दिवस जात होते. वेळ प्रसंगी स्वतःच्या प्राथमिक गरजा सुध्दा बाजुला ठेवून त्यांनी मुलाला शिक्षण देण्या करता आपले तरुणपण आणि तरूणपणातील मनिषा, त्यांनी मुलाच्या स्वप्ना करता खर्ची घातल्या. अश्विनीला तशी खरेदीची फार आवड पण तिने ही हौसेला मुरड घातली मुलाच्या अॅडमिशन साठी रात्रभर लावलेली रांग अमितला अजूनही आठवते. मुलाच्या डब्यासाठी सकाळी ऑफिसला जाताना केलेली धावपळ अजूनही अश्विनीच्या अंगावर काटा आणते. मुलाच्या आजारपणात तासनतास दोघेही बाजुला बसून राहत होते. आज ऑफिस मधून घरात आल्यावर सगळे दिवस नजरे समोर येत होते. इतक्यात दरवाजाची बेल वाजली दारात अमित उभा होता. अरे किती वेळ? अश्विनीने अमितला न राहून विचारले. अग किती काम ऑफिसची, त्यात येताना लागणारी ट्राफिक. अमितने उशिरा येण्याचे कारण सांगितले. बर चल चहा टाकते तुझा आवडता आल्याचा असे म्हणून अमितचे आवरे पर्यंत अश्विनीने गरम गरम चहाचा कप हातात दिला त्यांचा चहा होई पर्यंत संध्याकाळ उलडून गेली होती. चल अगरबत्ती करून घेते म्हणत अश्विनी उठली. घरच्या देवाला दिवा लावून तिने एक अगरबत्ती आणि एक ग्लास पाणी तुळशी करता घेतले. गॅलरीचे दार घडताच तिला जरा धक्का बसलाच ज्या तुळशीत ती रोज पाणी घालायची आणि अगरबत्ती लावायची आज तिथे कबुतरीण बसलेली.
अश्विनीने खुप हट्टाने मागे लागून ही तुळस आणली होती खरंतर अमितला या सगळ्याची आवड नव्हती पण स्त्री हट्टा पुढे बापुडा करतो काय? त्याने आणि अश्विनीने नर्सरी मध्ये जाऊन ही तुळस आणलेली. रोज संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावून पाणी घालणे व उदबत्ती लावणे हा नित्यनेम होऊन बसलेला. आजपर्यंत कधिच चुकला नव्हता हा नेम.
अश्विनीने आज कबुतरणीला बघून हातवारे करून हकलण्याचा प्रयत्न केला. शेवटी नाईलाजास्तव तिने अमितला आवाज दिला, अमित तिचा आवाज ऐकून गॅलरीत आला. हे बघ रे, असं म्हणत तिने कबुतरीण दाखवली अमितला.
अमितने सुध्दा हात हलवला या वेळेस मात्र कबुतरणीने पंखांची फडफड केली आणि दोघांच्या नजरेस पडली ती पंखांखालील अंडी. दोन मिनीटे दोघांना काही सुचेनाच. कबुतरणीने नेमकी त्यांच्या तुळशीच्या कुंडीत अंडी टाकलेली. काय करावं? कबुतरणीला हाकलावं, तर ती उडून जाईल. पण त्या गडबडीत अंडं फुटलं तर? आणि पाणी घालावं तुळशीला तर उब कुठून मिळणार अंड्याला ? या व्दिधा मनस्थिती शेवटी त्यांनी ठरवलं कि दोन दिवसांत कबुतरीण उडून जाईल पिल्लूला घेवून मग टाकू पाणी. दुसऱ्या दिवशी सकाळी कबुतरीण तिथे नव्हती पण अंडं होते. संध्याकाळी अश्विनी परत आली तेव्हा अंडं अजूनही तिथेच होतं पण आता कबुतरीण बसलेली त्यावर. म्हणजे आजपण पाणी नाही टाकता येणार, अश्विनीने स्वतःला समजावलं. असेच करत दोन दिवस गेले निघून. मधल्या काळात दोघांना ही खुप उत्सुकता होती कि अंड्याच काय होते. हे करताना ते तुळशीला पाणी टाकायचे विसरूनच गेले.
एक दिवस कबुतरणीच्या पंखाखाली छोटस पिल्लू होते. दोघांना ही ते बघून खुप आनंद झाला. रोज सकाळी त्यांना कबुतरणी जाताना दिसायची अन्नासाठी त्यांनी स्वतः तिथे पाणी आणि अन्न ठेवले पण तरीही कबुतरणीन बाहेर जातच होती. आल्यावर पिल्लाला पंखाखाली घेत भरवत होती. आता तर दोघांचा विरंगुळाच झालेला ती कबुतरीण आणि तीच पिल्लू. एक दिवस रात्री त्यांच्या मुलाचा फोन आला परदेशातून. त्याच्याशी बोलताना त्यांनी काय बोलू काय नको असे झालेले. पदवी झाल्यांनतर मुलाला उच्च शिक्षणासाठी त्यांनी परदेशी पाठवलेले. लवकरच तो परतण्याची ते वाट पाहत होते. आई मला इकडे जॉब लागला. मुलाने खुप आनंदाने सांगितले. अश्विनी मटकन खाली बसली. आता त्याच्या परतण्याची आशा पार धुळीस मिळाली. खळकन डोळ्यात पाणी आले. तरीही आवाजात ते जाणवू न देता त्यांनी त्याचे अभिनंदन केले. कदाचित आता आयुष्य भर अशीच फोनवर भेट होत राहणार, असाही विचार मला येऊन गेला. आता फोन ठेवल्यावर त्यांना आधार होता तो त्यांच्या ऐक मेकांच्या मिठीचा. दिवसा मागून दिवस सरत होते. रोज छंद जडल्या प्रमाणे त्यांचे कबुतरीण आणि पिल्लाला बघणे सुरु होते. पिल्लू हळूहळू मोठे होत होते. कबुतरीण चोचीने पिल्लाला भरविताना, अश्विनीला आपल्या मुलाची आठवण यायची.
एक दिवस अश्विनी आणि अमित ऑफिस मधून आले. चहा वैगरे झाल्यावर रोजच्या प्रमाणे त्यांनी गॅलरीचा दरवाजा उघडला. समोर दिसणाऱ्या दृष्यावर त्यांचा विश्वासच बसेना. कबुतरीण आणि तिचे पिल्लु त्या जागी नव्हते. अश्विनी तर रडवेलीच झाली. अमित ही काही क्षण खुप भाऊक झाला. त्यांची नजर अजूनही आस-पास कबुतरीण आणि तीच पिल्लू यांना शोधत होती. तोच त्यांची नजर कुंडीकडे गेली. कुंडीतील तुळस पाण्याशिवाय सुकून गेलेली. पूर्ण सुकून गेलेल्या तुळशीमध्ये त्यांना त्या क्षणी स्वतःची प्रतिमा दिसली. मुलाच्या स्वप्नासाठी घेतलेली मेहनत आणि आलेला आता एकाकी पणा त्यांना सुकलेल्या तुळशी समान वाटत होता. अंडं वाचविण्यासाठी कधि त्यांनी तुळशीला पाणी टाकणे सोडले तसेच मुलाच्या भविष्यासाठी हौस-मौजी नेहमीच टाळली. आता ना तुळस होती ना ती कबुतरे. होती ती फक्त रिकामी कुंडी त्यांच्या सारखीच आयुष्य भर दुसऱ्यांना जपुन स्वतः मध्ये शेवटी रिकामी पडलेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा