शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

764. सुंदरी

     सुंदरी हे मेन रोडवरचं अतिशय प्रसिद्ध दुकान. लखलखणारी शोरूम, चकचकणारी दिव्याची झुंबरं आणि शीण घालवणाऱ्या एअर कंडीशनिंग मुळे बायकांचे पाय आपोआप दुकानाकडे वळत. अगदी साध्या कॉटनच्या साड्यांपासून पैठणी, कांजीवरम पर्यंत सर्व प्रकारच्या साड्या उत्तम दरात मिळत असत. बाहेरच्या काचेतून उभ्या केलेल्या आणि खऱ्या वाटणाऱ्या सडपातळ ललनांच्या सुंदर साड्या बघत लहान मोठे सर्व लोक थांबत असतं. अशाच एका गर्दीच्या रविवार सकाळी ती सुंदरी मधे आली. दारा जवळच्या युनिफॉर्म मधल्या दरवानाने काचेचे दार उघडण्यापूर्वी तिला प्रश्न केला, “काय हवय आजी?”
”साड्यांचं दुकान आहे ना! साड्यांसाठीच आलेय" आजी म्हणाली.
दरवानानं तिच्या मोठाली पिवळी फुलं असलेल्या हिरव्या साडीकडे बघत दार उघडले.  अशा शोरूम मध्ये तू का आलीस हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
आजी आत गेली.  मोठी पिवळी फुले असलेली बेताची हिरवी साडी, पायात जुन्या झिजलेल्या चपला आणि केसातून दिसणाऱ्या रुपेरी छटा असलेली आजी पाठीत वाकली होती. हातात एक कापडी पिशवी होती व त्यात एक पाण्याची बाटली दिसत होती.
दुकानात चार पाच सेल्समन होते आणि जवळ जवळ आठ दहा सेल्स गर्ल्स होत्या. त्यातले काहीजण गिऱ्हाईकाला साड्या दाखवत होते. बेताची गर्दी होती पण आजीकडे कुणाचच लक्ष गेले नाही. ती थोडावेळ संकोचाने तशीच उभी राहिली व नंतर एक सेल्समन खुर्चीवर बसून फोन मध्ये काहीतरी बघून हसत होता त्याच्याकडे गेली.
"सिल्कच्या साड्या दाखवता का हो ?" तिने विचारले.
फोन मधील नजर वर न काढता तो म्हणाला, " दुसरा मजला".
आजी म्हणाली, "जिना चढवणार नाही हो मला.  इथेच दाखवा की."
त्याने त्रस्त चेहऱ्याने तिच्याकडे बघितले आणि तो म्हणाला, " लिफ्ट आहे की तिथं. लिफ्ट घेऊन जा ना बाई.  सिल्क च्या साड्या कुणाला हव्या आहेत? तुम्हाला?" आणि तो हसला.
तेवढ्यात काउंटर वरचा मॅनेजर गायतोंडे त्याला म्हणाला, "आधी यांचे काम कर रे केशव." म्हणून त्याने नवीन आलेल्या गिर्हाईकाकडे बोट दाखवले.  निळी जीन्स व पांढरा कुर्ता घातलेल्या त्या स्टायलिश तरुणीला केशव अदबीने विचारू लागला, "मॅडम, काय दाखवू?"
ती म्हणाली, “ I don't know.  I never wear sarees. दाखवा pure silk वगैरे!
आजी हळूहळू चालत लिफ्ट कडे गेली. लिफ्ट मधून दुसऱ्या मजल्यावर गेली.  वरच्या मजल्यावर काही सेल्समन कामात होते तर काही आराम करत बसले होते. आजीला बघून न बघितल्यासारखं करणारे बरेच होते. आजीला काय करावे समजेना. कुणाचेही तिच्याकडे लक्ष नव्हतं.  आता मात्र आजीला राग यायला लागला.
 ती मोठ्याने म्हणाली, " मला कुणी साड्या दाखवेल का?"
तिथली एक बाई काउंटर वरून म्हणाली," आजी या दुकानात भारीच्या मिळतात साड्या. तुम्हाला कितीपर्यंतच्या साड्या हव्या आहेत?"
तेवढ्यात एक चुणचुणीत, साधारण ३८-४० वर्षांची बाई आजी जवळ आली आणि म्हणाली, "आजी मी संगीता. या ना.  काय दाखवू?"
आजीने सिल्कच्या साड्या मागितल्या. तिने पाच सहा सिल्कच्या साड्यांपासून सुरुवात करत  जवळ जवळ १५-२० साड्या दाखवल्या.  आजीने त्यातल्या दोन साड्या निवडल्या. तिने त्या उलगडून नेसून दाखवल्या.  आजीशी गप्पा मारता मारता संगीताने तिच्या नातीचे लग्न आहे ही माहिती काढली.  आणि एक ऑफ व्हाईट रंगाची साडी तिने आजीसाठी निवडली.  आजीला ती साडी खूप आवडली. आजीने ती साडी पण विकत घेतली.
आजीनी संगीताला विचारलं, “ तू किती वर्षे आहेस इथे?
ती म्हणाली, “पाच वर्षे झाली की.”
“छान केलस ग काम माझं.  दे या साड्या.” आजी म्हणाल्या.
संगीताने बोलता बोलता तिच्या मुलीच्या कॉलेज साठी ती पैसे जमवत आहे व त्यासाठी आणि एक नोकरी पण करत आहे हे आजींना सांगितले. "सगळंच महाग झालय ग!" आजी म्हणाल्या.  
“आजी चला. आपण लिफ्ट मधून खाली जाऊ. मी आणते साड्या. खाली पैसे द्या. आणि काही लागले तर मला टेक्स्ट करा. तुमच्याकडे मोबाईल आहेच.  हा नंबर घ्या म्हणजे तुम्हाला काय हवे ते मी तयार ठेवीन." आजी ने खुशीने मान हलवली.
दोघी खाली आल्या.  मॅनेजर ने आजीकडे बघायला मान वर न करता बिल समोर ठेवले. तो संगीताला ओरडला,"लग्नाची खरेदी करायला आलेल्या त्या पाटील बाई खोळंबल्या आहेत संगीता. जा वर.  गप्पा मारत बसू नको इथे."
आजीला ते वाक्य लागले.  आजी म्हणाली, "अहो ती मला मदत करते आहे ना?  तिला कशाला ओरडता?" मॅनेजर नी ऐकून न ऐकल्यासारखे केले.
आजी म्हणाली, "गायतोंडे साहेब तुमच्याऐवजी संगीता मॅनेजर हवी बघा."
मॅनेजर भडकला व म्हणाला, "आजी तुम्हाला काय माहीत आहे दुकान कसं चालवायचं ते? ही लोकं कामचुकार असतात.”
आजी एकदम ताठ उभी राहिली आणि म्हणाली, " गायतोंडे काय आणि कसे बोलत आहात गिऱ्हाईकाशी विचार करा. It won't be tolerated." 
आजीनी रुपेरी केसांचा टोप काढून टाकला व हिरवी साडी काढून टाकली. आतमध्ये सिल्क चा उंची  सलवार कमीज बघून गायतोंडे सकट सर्वजण चमकले.  त्यांनी सारिका मॅडमला फोटोत, दुकानाच्या जाहिराती मधे अनेकवेळा बघितलं होतं.
"मी सारिका पेठे, सुंदरी शॉप्स ची CEO. मी सुंदरी च्या सर्व दुकानांमध्ये वेषांतर करून जाते आणि आपले दुकानाचं कामकाज कसं चाललय बघते. गिऱ्हाईकाच्या रूपात देव दुकानात येतो ही भावनाच आपल्या यशाचे रहस्य आहे.
पण या दुकानाच्या शाखेत व्यक्तीचे वय, कपडे, इंग्लिश भाषा आणि व्यक्तिमत्व यावरून त्याला कसे वागवायचे हे ठरवले जात आहे हे पाहून मला फार वाईट वाटले. गायतोंडे, आजपासून संगीता या दुकानाची मॅनेजर असेल. २५ लोकांच्या स्टाफ पैकी फक्त या एका मुलीने मला योग्य वागणूक दिली. I am so disappointed.  केशव, तुमची आई दुकानात आली तर असेच बोलाल का तिच्याशी?
संगीता मला उद्या सकाळी माझ्या ऑफिस मध्ये येऊन भेट. तुझ्यासारखी माणसं कशी शोधायची आपण ठरवू. आणि तुझ्या मुलीच्या कॅालेजची जबाबदारी आता सुंदरी शॅाप्स ची. दोन दोन नोकऱ्या करण्यापेक्षा सगळे लक्ष इथेच दे. म्हणजे तुझे काम याहून उत्तम होऊ लागेल.”
संगीताने हात जोडले.  “थॅ्क्यु मॅडम” ती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.
गायतोंडे, केशव, दरवान व बाकी सगळेच शरमून मान खाली घालून उभे होते. हे दुकान उघडलं तेव्हाही सरिता मॅडमनी परत परत सांगितलं होतं, “ गिऱ्हाईकाच्या रूपात देव दारात येतो. तो प्रसन्न झाला की बाहेर जाताना यश मागे ठेऊन  जातो हे कधी विसरू नका."
आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, “सारिका मॅडम दुसरी संधी देतील का?”

©® ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...