मंगळवार, ३ मार्च, २०२६

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला जाणं भाग होतं.
सकाळी नऊच्या सुमारास मी साइटवर पोहोचलो. ओळखीची बरीच मित्रमंडळी आमंत्रण यादीत होती. गप्पागोष्टी आणि चेष्टा-मस्करीत तासभर कसा गेला ते कळलं नाही. हळूहळू मंडळी छोट्या-छोट्या ग्रुप्समध्ये विखुरली गेली. स्नॅक्स आणि कॉकटेलची रेलचेल होती.
थोड्याच वेळात त्या बेगडी वातावरणाला कंटाळून मी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. रस्ता ओलांडून मी पलीकडच्या फुटपाथवर जाऊन उभा राहिलो. 
‘पेशवा रेसिडेन्सी’… जितेंद्र गंगवानीच्या त्या दिमाखदार इमारतीकडे मी बघत राहिलो. सुरेख एलिवेशन असलेल्या त्या बिल्डिंगचे रंगकामही अगदी साजेसं झालं होतं. जितेंद्रनं चांगलीच मेहनत घेतलेली दिसत होती.
इमारतीवरून माझी नजर बाजूला वळली. उन्हाचा तडाखा आता जाणवू लागला होता. माझी पावलं बाजूच्या पानटपरीकडे वळली. सिगरेटचं पाकीट घेऊन मी थोड्याच अंतरावर असणाऱ्या झाडाच्या सावलीखाली पोहोचलो. सिगरेट शिलगावत त्याचा एक दमदार कश घेत मी आजूबाजूला पाहिलं…
झाडाखालच्या दगडावर एक काळसर आणि कृश इसम बसलेला होता. एकटक नजरेनं तो रस्त्यापलीकडल्या दिमाखदार ‘पेशवा रेसिडेन्सी’कडे पहात होता. एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्धपणे तो बसला होता. त्याच्या डोळ्यांची पापणी सुद्धा लवत नव्हती.
‘एवढं काय बघत असेल एवढं हा…?’ मी विचार करू लागलो. अशा बिल्डिंगमध्ये घर असण्याचं स्वप्नही तो बघू शकेल, असं त्याच्या अवतारावरून वाटत नव्हतं. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच्या जवळ जात मी किंचित खाकरलो. पण त्याची समाधी भंग पावली नाही. पुन्हा एकदा जोरात खाकरून मी त्याची तंद्री मोडली. दचकून माझ्याकडे पाहात तो उभा राहिला. त्याच्याकडे पाहून मी त्याचा अंदाज घेऊ लागलो. एका डोळ्यानं तो आंधळा असावा; मात्र त्याच्या नजरेत काहीतरी अनामिक भाव होते. 
त्याला सिगरेट देत मी त्याच्याकडे बघून हसलो. मोठ्या आश्चर्यानं माझ्याकडे कटाक्ष टाकत त्यानं नम्रपणे सिग्रेट घ्यायला नकार दिला.
“मला तुम्ही एवढी महागडी सिगरेट का देताय साहेब? मी तर साध्या बिडीला सुद्धा मोताद आहे.” उदास स्वरात माझ्याकडे न बघताच तो पुटपुटला. पुन्हा एकटक नजरेनं तो ‘पेशवा रेसिडेन्सी’कडे पाहू लागला.
“खूप छान बांधलीय ना ही इमारत?” त्याला बोलतं करण्यासाठी मी उदगारलो. उदासपणे हसत स्वतःशीच बोलल्यासारखा तो बोलू लागला…
“ही इमारत म्हणजे एक कबर आहे साहेब… माझ्या बायकोची कबर… मी बाजीराव आणि म्हणून तिचं नाव लग्नानंतर हौसेनं मस्तानी ठेवलं होतं साहेब!
“माझ्यासारख्या माणसाला अशी बायको मिळणे म्हणजे संजय भाटीच्या भाषेत ‘लंगूर के हाथ मे अंगूर!’…”
“कोण संजय भाटी?” त्याला आणखी बोलतं करण्यासाठी मी विचारलं.
“संजय भाटी या बिल्डिंगचा ठेकेदार होता साहेब! खूप मोठा ठेकेदार आहे तो. या मुंबईत त्याची डझनानं कामं चालू आहेत. मी त्याच्याकडे गेली वीस वर्षे काम करतोय… या बिल्डिंगवर मी बिगारी काम करत होतो. लातूरमधून मस्तानीला घेऊन मी इथं कामाला आलो. साईटवरच छोट्या-छोट्या झोपड्यांमध्ये आम्ही कामगार रहात होतो. सुतार, गवंडी, बिगारी सगळे इथंच राहायचे…” 
बोलता-बोलता बाजी थांबला. शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतल्या पाण्याचा घोट घेऊन त्यानं पुढं बोलायला सुरुवात केली…
“हा संजय भाटी अतिशय हलकट स्वभावाचा! कामगारांच्या सुंदर आणि तरुण बायकांवर कायम त्याची नजर असे. संधी साधून प्रत्येक तरुण बाईवर त्यानं जबरदस्ती केली होती. अपवाद होता फक्त मस्तानीचा…
“मस्तानी खूप करारी स्वभावाची होती. संजय भाटी तिला टरकून होता. तशा एका प्रयत्नात त्यानं तिच्याकडून थोबाड फोडून घेतलं होतं… तेव्हापासून एखाद्या सापासारखा तो तिच्यावर डूख धरून होता.
“मस्तानी प्रत्येक वेळी मला दुसरीकडे काम बघायला सांगायची; पण दुसरीकडे जायची माझी हिंमत नव्हती. संजय भाटीची पन्नास हजारांची उचल माझ्या अंगावर होती. तशातच मस्तानीला दिवस गेले. लग्नानंतर इतक्या दिवसांनी बाळ होणार म्हणून ती मोहरुन गेली होती. डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती. तिला सातवा महिना लागला आणि तो प्रसंग घडला…”
बाजी बोलता-बोलता भूतकाळात हरवला होता. त्याची तंद्री भंग न करता मी उत्सुकतेनं ऐकत होतो…

“क्यू बे 'अंधा कानून' आज पार्टी करेंगे क्या?’ एके दिवशी संजय भाटीनं मला विचारलं. एका डोळ्यानं आंधळा असल्यानं त्यानं माझं नाव ‘अंधा कानून' ठेवलं होतं. एका पायानं किंचित लंगडणाऱ्या रमेश सुताराला '‘लंगडा कुत्ता’, कायम अंग राखून काम करणार्‍या बाळू गवंड्याला ‘पोटभऱ्या बाळ्या’ अशी वेगवेगळी नावं त्यानं कामगारांना ठेवली होती.
“संजय भाटीची पार्टी म्हणजे भरपूर देशी दारू, तिखटजाळ मटण रस्सा आणि जोडीला ब्ल्यू फिल्म… महिनोंमहिने उन्हातान्हात कष्ट केल्यावर कधीतरी मिळणारी ही पार्टी कोण सोडणार? आम्ही सर्व कामगार आनंदानं नाचू लागलो.
“जास्त दारू पिऊ नका, जेवून लगेच घरी या… तो घाणेरडा सिनेमा बघत बसू नका!’ मस्तानीनं मला बजावलं होतं. मी मान डोलावून पटकन घराबाहेर पडलो. अर्धवट बांधकाम झालेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्टी होती.
“थोडा वेळ थांबून संजय भाटी निघून गेला. आमची विमानं उंच हवेत पोहोचली होती. मटणाची पातेली चाटून पुसून साफ झाली आणि आम्ही ब्ल्यू फिल्म बघू लागलो. माणसांची वासनांध जनावरं बनली आणि पार्टी संपली.
“झोपडीत शिरून मी मस्तानीला शोधू लागलो. एका कोपऱ्यात ती शांतपणे झोपली होती. अंगावरचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. तिचे मादक सौंदर्य मंद प्रकाशात खुलून दिसत होतं. माझ्यातलं जनावर जागं झालं… मी अधाशीपणे तिच्यावर तुटून पडलो.
“मस्तानीच्या जोरदार किंचाळीने मी भानावर आलो… वेदनेनं व्याकुळ होऊन ती ओरडत होती. काहीतरी अघटित घडलं होतं. पटकन बाहेर येऊन मी शेजारील झोपड्यांमधल्या बायकांना उठवलं. त्या धावतच मस्तानीच्या मदतीला गेल्या.
“मी केलेल्या जबरदस्तीमुळे पोटात मूल वर सरकलं असावं! मस्तानीची स्थिती नाजूक बनली होती. मला काहीच सुचेनासं झालं. आपल्या हातून केवढी मोठी चूक झालीय, हे उमगून मला अक्षरशः रडू फुटलं.
“मस्तानीला दवाखान्यात न्यायला हवं होतं. माझ्याकडे तर फुटकी कवडीही नव्हती. आठवड्याचा पगार शनिवारी होणार होता… अखेर सर्व धीर एकवटून मी संजय भाटीला फोन केला.
“हॅलो, कौन है बे…?” झोपाळलेल्या स्वरात संजय भाटी बोलला._
“मै बाजीराव बोल रहा हूं साब… मेरे औरत की तबीयत बिगड गई है। डॉक्टर के पास जाना पडेगा। मुझे पैसा चाहिए। मै आपके घर अभी आता हूं।”
“मै सुबह साईट पे आता हू फिर देखेंगे। अभी अपना सोने का टाइम है। सुबह तक तेरी औरत मर तो नही जायेगी ना? साला हरामी… रात को फोन करता है।’ शिव्या देत संजय भाटीने फोन ठेवला.
“सारी रात्र मस्तानी मरणयातना भोगत होती. हताशपणे बघत बसण्याशिवाय माझ्या हातात काहीच नव्हतं. पहाटे-पहाटे तिची शुद्ध हरपली.
“सकाळी नऊ वाजता संजय भाटी ऐटीत आला. मी गयावया करत त्याच्याकडे पैसे मागू लागलो. थंडपणे माझ्याकडे पाहात तो म्हणाला, ‘पहिले ही तेरे पे पचास हजार है। मेरा धंदा है, धरमशाला नही। और वैसेभी तेरी औरत तो देवता है। उसको क्या होगा? अपने आप ठीक हो जायेगी।’
“माझ्या पायाखालची जमीन सरकली. खूप विनवण्या करूनही संजय भाटीला दया येत नव्हती. अचानक तो म्हणाला, ‘अगर तेरी औरत मेरे पाव पकड के पैसे की भीक मांगेगी, तो मै पैसा दे दूंगा। जा बोल उसको।”
“मस्तानी शुद्धीवर नाही. तिच्याऐवजी मी तुमचे पाय धरतो’, हे डोळ्यात प्राण आणून सांगितल्यावर संजय भाटीनं कसेबसे पैसे दिले.
“मस्तानीला दवाखान्यात नेलं खरं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मूल पोटातच दगावलं होतं. मस्तानी कशीबशी मरणाच्या दाढेतून बाहेर आली. पण त्यानंतर तिचा या जगाशी जणू संबंधच संपला. दगावलेल्या बाळाच्या आठवणी हेच तिचं आयुष्य बनलं. माझ्याकडेही ती अनोळखी नजरेने पाहात असे ! “तिला असं रोज थोडं थोडं मरताना पाहून माझ्या हृदयाला घरं पडत असतं… शेवटी तिला वेड लागलं. बाळाचं नाव घेऊन त्याला ती जोजवत असे ! बेभान झाली की तिला सांभाळणं मोठं मुश्कील होई. अशाच भ्रमात एकदा दहाव्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि सगळं काही संपलं.
“संजय भाटीनं पोलिसात प्रकरण दाबून टाकलं आणि थोडीफार भरपाई देऊन मलाही कामावरून काढून टाकलं.”
खोल सुस्कारा सोडून बाजी काही वेळ गप्प बसला. काय बोलावं हे मला सुचेना. तेवढ्यात एखाद्या खोल विहिरीतून यावा तसा बाजीचा आवाज आला,
“देवाचा कानून सुद्धा अंधाच आहे साहेब ! माझ्या लाडक्या मस्तानीचा बळी माझ्या वासनेनं आणि तिच्या एकनिष्ठपणामुळं गेला. तिनं निडरपणे संजय भाटीसारख्या सापाला डिवचलं आणि त्याची किंमत तिला मोजावी लागली. आज या बिल्डिंगचं उद्घाटन आहे. आज कदाचित माझी मस्तानी मला दिसेल. तिची वाट पाहणं एवढंच माझ्या हातात आहे.”
अजूनही पापणी सुद्धा न लावता तो त्याच्या मस्तानीच्या राजवाड्याकडे एकटक बघत होता. सुन्न मनानं मी तिथनं निघालो. बाजीला धीराचे चार शब्द सांगण्याचं भानही मला उरलं नव्हतं ! 
दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर उघडला आणि बातमी वाचली.
‘बांद्र्याला काल रात्री पेशवा रेसिडेन्सी या नव्या इमारती समोरील रस्त्यावर भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडी खाली सापडून बाजीराव घोरपडे नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी पोलिस करीत आहेत.’
शेवटी बाजीरावला त्याची मस्तानी भेटली होती.
‘पेशवा रेसिडेन्सी’च्या साक्षीनं ! 

— मिलिंद अष्टपुत्रे

2699. असे मित्र दुर्मिळ असतात

 सुदामाशी बोलत असताना, कृष्ण त्याच्या पायांना मालिश करू लागला. सुदामाला ते कळले नाही. सुदामा झोपी गेला होता, पण स्वतःच्या विचारात गढून गेलेला कृष्ण त्याच्या पायांना मालिश करत राहिला आणि त्याच्या बालपणीबद्दल बोलत राहिला, तेव्हा रुक्मिणीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कृष्णाने आश्चर्याने प्रथम तिच्याकडे आणि नंतर सुदामाकडे पाहिले. तिचा हेतू समजून तो उठला आणि त्याच्या खोलीत गेला. कृष्णाची तल्लीन अवस्था पाहून रुक्मिणीने विचारले, 
"स्वामी, आजचे तुमचे वर्तन खूप विचित्र वाटते. तुम्ही, जे या जगातील सर्वात महान सम्राटांच्या द्वारकेत आगमनाने किंचितही प्रभावित झालेले नाही, तुमच्या मित्राच्या आगमनाच्या बातमीने इतके भारावून गेलात की तुम्ही तुमचे जेवण सोडून त्याचे स्वागत करण्यासाठी अनवाणी धावलात. तुम्ही, जे कधीही कोणत्याही दुःखाने, कष्टाने किंवा आव्हानाने भारावून गेला नाही आणि गोकुळ सोडताना आई यशोदेचे अश्रू पाहून रडला नाही. तुम्ही तुमच्या मित्राचे जीर्ण, जखमांनी भरलेले पाय पाहून इतके प्रभावित झालात की तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या अश्रूंनी धुतले. तुम्ही राजनैतिकता, राजकारण आणि ज्ञानाचे शिखर, तुमच्या मित्राला पाहण्यात इतके तल्लीन झाला होता की दुसरा विचार न करता, तुम्ही त्याला संपूर्ण विश्वाची संपत्ती आणि समृद्धी देणार होता."
कृष्ण, त्याच उत्साहित अवस्थेत, म्हणाला, "तो माझा बालपणीचा मित्र, आहे."
"पण लहानपणी त्याने गुरुमातांनी सांगितलेले हरभरा गुपचूप खाल्ले होते? आता अशा मित्राबद्दल इतकी भावनिकता का?" सत्यभामानेही तिची उत्सुकता व्यक्त केली.
कृष्ण हसला, "सत्यभामा, सुदामाने असे काही केले आहे की संपूर्ण विश्व त्याचे आभार मानावे. त्याने ते हरभरा खाल्ले कारण तो भुकेला होता म्हणून नाही तर तो त्याच्या मित्राला कृष्णाला गरिबी पाहू देऊ इच्छित नव्हता म्हणून. त्याला माहित होते की चोरांनी ते हरभरा आश्रमात सोडले होते आणि त्याला हे देखील माहित होते की त्या चोरांनी ते हरभरा एका ब्राह्मण महिलेच्या घरातून चोरले होते. त्याला हे देखील माहित होते की ब्राह्मण महिलेने शाप दिला होता की जो कोणी ते हरभरा खाईल तो आयुष्यभर गरीब राहील. सुदामाने ते हरभरा दाणे माझ्याकडून गुप्तपणे खाल्ले जेणेकरून मी आनंदी राहू शकेन. तो मला देवाचा एक भाग मानत होता, म्हणून त्याने ते हरभरा दाणे खाल्ले कारण त्याला वाटले की जर देव स्वतः गरीब झाला तर संपूर्ण विश्व गरीब होईल. सुदामाने संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी स्वतः गरिबी स्वीकारली."
"एवढा मोठा त्याग!" रुक्मिणी उत्स्फूर्तपणे म्हणाली.
"माझा मित्र ब्राह्मण आहे, रुक्मिणी आणि ब्राह्मण ज्ञानी आणि निस्वार्थी आहेत. त्यांच्यात लोककल्याणाची खोलवर भावना असते. काही अपवाद वगळता ब्राह्मण असेच असतात. आता मला सांग, जर माझे अशा मित्रावर प्रेम नसेल तर काय होईल? गोकुळ सोडताना मी रडलो नाही कारण जर माझ्या मनात प्रेम असते तर माझी आई मरण पावली असती. पण माझ्या मित्राचे असे पाय पाहून, त्यांच्यावर असे जखमा पाहून, रुक्मिणी, माझे हृदय दुःखाने भरून आले. त्याच्या पायावर असे जखमा आणि आयुष्यात त्याची स्थिती केवळ त्याच्या मित्राचे भले व्हावे म्हणून होती. तुम्हाला माहिती आहे, रुक्मिणी, त्याच्या कुटुंबाशिवाय कोणीही या कृष्णाला इतके चांगले नाही.  लोक मी त्यांच्यासाठी चांगले करावे अशी अपेक्षा करतात. सुदामासारखे मित्रच त्यांच्या मित्राच्या आनंदासाठी स्वेच्छेने गरिबी आणि कष्ट स्वीकारतात.
असे मित्र दुर्मिळ असतात आणि कोण जाणे कोणत्या गुणांचे परिणाम आहेत. आता, जरी तुम्ही अशा मित्राला तिन्ही लोकांची सर्व संपत्ती दिली तरी ती कमीच असेल," कृष्ण भावनेने दबलेल्या स्वरात म्हणाला.
खोलीत, सर्व राण्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते, तर बाहेर उभे असताना, सुदामाच्या डोळ्यातून गंगा आणि यमुना वाहत होती.

🙏जय श्री कृष्ण जी🙏

2698. हडळ... !!!

 मी नववीत असेन बहुधा.  साताऱ्यातून मी त्यावेळी आजीकडे आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीला. मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, ढग दाटून यायचे पण पाऊस पडायचा नाही. खूप रडावसं वाटतं, मन भरून येतं, पण रडू येत नाही तसंच काहीसं.  त्या दिवशी आजीबरोबर माझी काहीतरी वादावादी झाली होती. रागानं दिवसभर जेवलो नव्हतो, तिनेही बोलावलं नाही. रागाच्या तिरीमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. संध्याकाळचे ७ वाजते असावेत.  अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत 'पहले आप पहले आप' म्हणून निरोप देत असावेत. 
निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरू झाला, काळोख पडला आणि काय होतंय कळायच्या आत धो-धो पाऊस सुरू झाला. मी चिंब...! 
पावसापासून बचाव करायचा म्हणून जवळच्याच एका घरात शिरलो. घर कसलं ? पत्रे, गोणपाट लावून केलेला तो एक निवारा होता. 
आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे ! 
आम्ही जिथे रहायचो. तिथे एक पन्नाशीची बाई रहायची. शेजारच्या आयाबाया तिला 'हडळ' म्हणायच्या. 
ती दिसायलाही होती तशीच. डावा डोळा एकदम बारीक, या डोळ्यात काळे बुब्बुळ नव्हतंच, अख्खा डोळा पांढराफेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत, आतलं बुब्बुळ तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं, या वयातही चेहरा सुरकुतलेला, पांढरे केस पिंजारलेले, तोंडात मोजके दात, त्यातून समोरचा एक पडलेला. दुसरा ओठातूनही बाहेर आलेला, अंगावर लुगडं घातलंय की चुकून अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं, रंगही इतका काळा, की काळ्या रंगानं लाजावं...! 
एकूण अवतार भेसूर ! 
त्यात बोलण असं की भांडल्यासारखं, प्रत्येक वाक्यात शिवी. 
कुणीही हिच्या नादी लागत नसे, समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना, अपशकून व्हायचा त्यांना. कोणत्याही सण समारंभात हिला जाणीवपूर्वक बाजुला ठेवायचे. लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल, अशी भिती घालायचे. तिला जादुटोणा येतो, तिच्या घरात कवट्या आहेत वगैरे असंही बोललं जायचं. हे घर तिचंच ..! 
मी नेमका याच घरात शिरलो होतो. पत्र्याच्या त्या घरात मंद चूल पेटली होती. शेजारचा टेंभा (जुन्या डब्यात रॉकेल भरून, जुनी नाडी टाकून, उजेडासाठी वात पेटवलेली असे. गावाकडचा जुगाड) मिणमिणता प्रकाश देत होता. 
ती चुलीशेजारीच बसली होती. त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात.. केस तसेच पिंजारलेले. चूल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तिच्या भेसूर चेहऱ्यावर पडला होता. मूळचाच भीषण चेहरा अजून भीतीदायक वाटत होता. विरुद्ध बाजूला तिचीच सावली जमिनीवर पडली होती. एकूण वातावरण भितीदायक ! 
मी घाबरलो. पण बाहेर पडायची सोय नव्हती. 
'काय रं?' घोगऱ्या आवाजात ती गरजली. 
'काय नाय, ते आपलं भायेर पाऊस म्हणून..' मी पायाने जमीन टोकरत चाचरत बोललो. 
ती बसली होती. समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. पूर्वी डालड्याचा पिवळा डबा मिळत असे. त्यावर कसल्याशा झाडाचं चित्र असे. डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक उपयोग असत. कुणी डाळी तांदुळ त्यात साठवत असत, कुणी बाहेर शौच्यासाठी जाताना टमरेल म्हणूनही वापरे. तिनं याच डब्यात पाणी भरून ठेवलं होतं. 
डबा काटवटी शेजारी. डब्यातलं पाणी पिठावर शिंपडून ती पीठ तिंबत होती. 
मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती. इकडून तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारत होती, मध्येच पिठाचा गालगुच्चा घेत होती. मी हा खेळ पाहण्यात रंगून गेलो. शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तिनं तोडला. दोन हाताच्या तळव्यात धरून या लचक्याला तिनं गोल आकार दिला आणि हातातून पडू न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारू लागली. दोन्ही बाजूंनी ढोलकी बडवतात तसं... 
एका क्षणी तर जादू झाली. या गोल गोळ्यापासून एक सुंदर गोलाकार अशी ताटाएवढ्या आकाराची पोळी तयार झाली. माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते, हिनं हवेतच ती केली. हिच्या अंगात नक्की जादुटोणा असावा अशी आता माझी खात्री पटली. 
यानंतर तिने बनवलेली ती कलाकृती धाप्पदिशी, चुलीवरल्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली. डब्यात पाणी घेऊन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरन फिरवला. शेणाने सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं, तिनं आधी ते पदराला पुसलं. उलथन्यानं तव्याला थोडं ढोसून चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढून चुलीच्या तोंडावर तिला धग लागेल अशी ठेवली. 
आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला. ती टम्म फुगली. दिवसभर मी फुगलो होतो, तस्साच ! 
तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतंच. बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. पत्र्याबाहेर अंधार, नुकताच पडून गेलेला पाऊस, हवेत झोंबरा गारवा, पत्र्याच्या आत चुलीमुळे निर्माण झालेली उबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग ! 
मी आशाळभूतपणे भाकरीकडे पहात होतो. 
तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. म्हणाली, 'खातु का भाकर ?' छ्या... छ्या... नको मला.' एकदम हो कसं म्हणणार ?
एखादी गोष्ट मनापासून हवी असताना... ती मिळत असताना , नको म्हणणं काय असतं, हे त्या नको म्हणणारालाच कळेल.
तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेहऱ्यावर ओघळतातच, मनात असलं नसलं तरी ! डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे.
तिला या अंधारातही ते दिसलं असावं. म्हणाली, 'हिकड ये...' 
'जावू का नको?' मी घुटमळलो.
'ये रं ल्येकरा, माज्याजवळ बस... ये हिकडं... जमिनीवर हात आपटत ती बोलली.....तीच्या बोलावण्यात आर्तता होती. 
मी प्रथमच तिचा हा नाजूक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो. मायेनं भिजलेला तो आवाज होता. 
तरीही जवळ बोलावून भाकरीबरोबर ही मलाच खावून टाकणार नाही ना? या विचारानं मी घाबरलो. 
तिनं पुन्हा हाक मारली.
मी पाय ओढत तिच्या दिशेनं घाबरत निघालो . मी जवळ येताना पाहताच ती गालातल्या गालातल्या मंद हसली. मी असं हसताना याआधी कधीच पाहिलं नव्हतं. का हसली असेल ती अशी मला बघून ? मी आणखी घाबरलो. 
आता पळायची सोय नव्हती. तिनं माझे हात धरले होते. माझे थरथरते हात तिने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं. 
चुलीजवळ असूनही मला कापरं भरलं. ती पुन्हा हसली. ओठाबाहेर आलेला दात मला अजून भ्या दावत होता. 'कवापस्नं जेवला न्हाईस?' डोक्यावर हात फिरवत मायेनं तिनं विचारलं. 'सकाळपस्नं...' मी चाचरत बोललो. 
शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती. तिन ती पदरानं पुसली. त्यावर ती गरमगरम भाकरी ठेवली. मी अजूनही साशंक होतो. ती पुढे काय करणार मला माहीत नव्हतं. 
तिच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते सारं आठवलं. अंगावर शहारे आले. 'तू भाकर खायाला सुरवात कर, मी तवर भाजी करते.' या वाक्यान माझी तंद्री भंगली.
तेवढ्यात तिनं, बाजूला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली, दुसऱ्या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. किटलीतलं तेल कढईत टाकलं. किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तिनं बोटानं पुसून घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली, 'रोजच्या रोज आंगुळ झाल्यावर, डोस्क्याला त्याल लावावं.. कसं भुतावानी झाल्यात क्यास...!' असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं. 
मी तिच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं, वाटलं, मला सांगते तर मग ही का लावत नसेल डोक्याला तेल?
"भुतावानी" हा तिच्या तोंडून आलेला शब्द ऐकून मी अजून घाबरलो. 
तिला याचं काही सोयरसुतक नव्हतं. शांतपणे जरा लांब हात करून तिने मग लसणाची गड्डी काढली. जमिनीत उकरून केलेल्या उखळात टाकली, वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली. उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसून घेतलं. त्यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली.
बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळून तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करुन कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं...! 
मेथी गरम तेलात पडली, अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाट बघत होता. मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर 'छिस्स' असा आवाज आला. हा आवाज मी अजून विसरलो नाही. विसरूच शकत नाही. 
यानंतर तिने पुन्हा उलथन घेतलं, त्याच पदराला पुसलं. भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं. कढईतूनच चिमटीत धरून तिनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. मी तिच्याकडे नुसता पहात होतो.
माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत म्हणाली, 'खा ल्येकरा खा. सकाळधरनं उपासी हायस बाबा...'
यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटून पडलो. मला आठवतं, मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती. 'अन्न हे पूर्णब्रह्म' याची प्रथमच जाणीव झाली. पोट तुडूंब भरलं होतं, मनही ! 
मी सहज पाहिलं. काठवठीत तिच्यापुरत्या असणाऱ्या पिठाच्या सर्व भाकऱ्या मी खाल्ल्या होत्या. फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती, डब्यात अजून पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. मला माझीच लाज वाटायला लागली. 
गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते, उपाशीपोटी नाही. 
चुलीजवळ बसून मला घाम आता होता. मी तिच्याजवळ जात म्हणालो, 'मावशी, आता तू काय खाशील ?'
आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मावशी म्हटलं असावं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. गरागरा फिरणारे डोळे कुठेच ठरत नव्हते, हुंदका येत होता. त्यालाही ती दाबत होती. तिने ओठ मुडपले होते. त्यातूनही एक दात डोकावत होताच. मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरचा तिनं घाम पुसला. या पदरातून मला वास आला, शेणानं सारवलेल्या जमिनीचा, उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा, माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा ! 
या पदरानं मी सुगंधी झालो. आता मला तिची भीती वाटत नव्हती.
जगात आपलं म्हणून कुणीही नसलेली एक समाजात टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली.
पदरालाही किती पदर असतात ना? वरवर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो ? 
प्रत्येक आई-मुलाचं नातं, पदरापासून सुरु होतं... पदराशी संपतं ..!  या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य ! 
आयुष्यात मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही. 
इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेकानेक फाईव्ह स्टार हॉटेलात राहिलो. जेवलो. मेनूकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधून शोधून मी मलई मेथी, बादशाही मेथी, लबाबदार मेथी, शाही मेथी, कोफ्ता, कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. छे! 
स्टारवाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात, पण मायेचा चंद्र नसतो.. चांदणं नसतं. दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो. चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथे काय कामाचे? कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी! 
चव उत्पन्न होते ती करणाऱ्याच्या मनातून....करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाता दुषित करत नाही. संपूर्ण स्वच्छता पाळून शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच, पण कसलीही स्वच्छता न पाळता मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया, तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होऊन जाते. 
लोक याच मायाळू मावशीला हडळ म्हणायचे, का तर तिचा चेहरा भेसूर होता. 
आपण चेहरा आणि कपड्यांवरून माणसाबाबत आडाखे तयार करतो. बऱ्याच वेळा ते चुकतात. चेहऱ्यावर रंग लावून कलाकार मंडळी नाटक करतात. 
पण कोणताही रंग न लावता 'नाटकं' करतात काही मंडळी, त्यांना काय म्हणावं? 
एखाद्याचं कौतुक करायला पटकन शब्द सापडत नाहीत, भांडताना मात्र झटपट त्यांना ते आठवतात. याला काय म्हणायचं ? 
ज्यांना आपण आयुष्यभर 'चुकीची माणसं' समजत असतो, तेच आपल्याला कधीतरी 'बरोबर अर्थ' समजावून सांगतात. मग ते चुकीचे कसे काय? 
दुसऱ्याच्या चुका या चुका, पण आपल्या चुका म्हणजे 'अनुभव' असं कौतुकान सांगणाऱ्यांना काय म्हणावं?
असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर 'हडळ' म्हणून शिक्का मारतात. एखाद्याला बहिष्कृत करतात. 
या मावशीला मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो. 
वय झालं होतं. खंगून खाटेवर पडली होती. आताशा तिला दिसत पण नव्हतं. वयानुरूप चेहरा आणखी भेसूर झाला होता....जवळ कुणी जायचंच नाही. 
मी भेटायला गेलो. स्मरणशक्ती ढासळलेली. 
तिनं ओळखलं नाही. काही आठवणी करून दिल्या. मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती पूर्वी... गूढ.. गालातल्या गालात !
'काय आणून देऊ म्हातारे तुला ?' मी हातात हात घेऊन प्रेमानं विचारलं. ठिगळ लावलेल्या अंगावर चुकून पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडे तिनं क्षीणपणानं बोट दाखवलं. 
'लुगडं?' मी बरोबर ओळखलं.
मी झट्दिशी उठलो. घरी जाऊन माझ्या आजीची दोन-चार लुगडी घेऊन येण्यासाठी.. 
तिने हातानंच खूण करत कुठे चाललास असं विचारलं. मी ही खुणेनंच सागितलं, 'लुगडं घेऊन येतो...!' 
तिनं मला परत खुणेनच जवळ बोतावलं. मी खाली वाकलो. ती. कानाजवळ येऊन एकेक शब्द तोडत बोलली, 'जुनं तुज्या आजीचं लुगडं मला नगो, नव्वंकोरं आन तुज्या पैशाचं.. घडी मीच मोडनार... मरनाऱ्या मान्साला जुनं दिऊ न्हाई काई... माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं, ह्येजातच माझा आनंद...' हे बोलून ती पुन्हा गूढ हसली. 
तिचं बोलणं ऐकून मी शहारलो. स्वतःच्या मरणाविषयी इतकी अतिप्तता..! 
बरं तिनं कसं ओळखलं ती मरणार आहे ते....?
मी विद्यार्थीदशेत ... नवं लुगडं आणायला माझ्याकडे कुठले पैसे त्यावेळी ? पण पुढच्यावेळी आलो की घेऊन येईन असे सांगून मी उठलो होतो. 
पुढे काही वर्षांनी  डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो. गाव चांगलंच सुधारलं होतं. 
म्हातारीचं घर मात्र पडून गेलं होतं. पत्रे गंजले होते, ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटून पडली होती, एका कोपऱ्यात लोळागोळा होऊन... गाव खरंच सुधारलं होतं.
शेजारी उभ्या असणाऱ्या एकाला खुणेनं विचारलं, 'म्हातारी कुठंय?' तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला होता, 'कोन ? ती हाडळ व्हय ? आरं ती मेली की कवाच... कोन नव्हतं तिला...' 
पुढचं मला ऐकूच आलं नाही. 
कोण नव्हतं तिला? कसं सांगू...? 
ती मेली नाही... माझ्या मनात ती कायम जिवंत आहे...!
कोण कसं नव्हतं ? मी होतो की तीचा, मनातून तिनं मुलगा मानलं होत मला ? 
आई होऊन ती गेली. मलाच मुलगा होता आलं नाही..!!!
प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं, म्हणून ती तशी गूढ हसली असेल का ? 
यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो. पण गल्लीत फिरताना हे पडकं घर मी टाळतो. 
मला भीती वाटते आणि लाजही ! 
पटकन् समोर येऊन ती दे माजं नवकोरं लुगडं अशी पटकन पुढ्यात येऊन मागेल ही भीती... आणि मी तिला ते कधी देऊ शकलो नाही याची लाज. 
डॉक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे. पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की! 
माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही....! या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो, वेदना कमी होतात, तेव्हा त्या पैशाची 'लक्ष्मी' होते. नाहीतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी. खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत.. बाकीचे नुसतेच धनिक ! 
नोटा आणि नाण्यांचे धनी !! 
तिच्या पडक्या घराला तोक हाडळीचं घर म्हणतात, मी त्याला आईचं स्मारक समजतो. 
ती गेली. माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगड्याचं ओझं ठेवून गेली. 
तिच्या घराजवळनं जाताना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा....
पण का कोण जाणे...? त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच... आणि उगीचच भास होतो. तुटलेली ती जीर्ण खाट... माझ्याकडे बघत मंद मंद हसते आहे. गालातल्या गालात.. तसंच गूढ..!!! 
आणि मी पाय ओढत एकटाच मी तिथून चालायला लागतो, कुढत ... आई नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा...!!!

डॉ अभिजीत सोनवणे 
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट पुणे 
9822267357
sohamtrust2014@gmail.com
*(An ISO 9001: 2015 certified organisation)

2697. एन्जॉयग्राफी

 ‘पोरींनो, सवडीला दीनानाथला ऍडमिट केलंय काल दुपारी. छातीत दुखत होतं म्हणे तिला.’
शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अप्पीचा मेसेज. अप्पी सवडीच्या शेजारच्या अपार्टमेंटमधे रहात असल्यानं तिला ही बातमी कळलेली. आम्ही सगळ्या नर्व्हस झालो. सगळ्याजणींनी पन्नाशी पार केलेली. साठी दृष्टीपथात आलेली. कुणाच्या रक्तात साखरेचा शिरकाव झालेला, कुणाचं रक्त विनाकारण उसळू लागलेलं, कुणाच्या डोळ्यांनी मोत्यालंकार धारण केलेले, कुणाच्या वेड्यावाकड्या दंतोजीपंतांच्या जागी आता ‘कवळी’ नामक कुंदकळ्यांची माळ विराजत असलेली, कुणी जुन्या गुडघ्याला टाटा बायबाय करून नवीन गुडघोजींची स्थापना केलेली. पण अजूनपर्यंत सगळ्यांची हृदयं तरूण आहेत, असा गोड गैरसमज होता. त्यामुळं ग्रुपचं नाव ‘यंग हार्ट्स’ ठेवलेलं. अन् म्हणूनच आजच्या या सवडीच्या बातमीनं सगळ्यांची काळीजं धडधडू लागलेली.
‘सवडीला हृदयाचा त्रास होऊच कसा शकतो?’
‘…हृदयविकार हा ताणतणावामुळं होतो…’ असा आपला आमचा समज.
आणि सवडीचा ताणतणावातल्या ‘त’ शी दूरान्वयानंही संबंध नसलेला.
सवडी… म्हणजे ‘कु. सविता’.
आमच्या बरोबरच तिनं इयत्ता पाचवीत कन्याशाळेत प्रवेश केलेला. सावळा रंग, कुरळे केस, जाडसर बांधा, चंद्रासारखा गोल गरगरीत चेहरा, तंद्री लागली की अचानक जोडीदाराशी फारकत घेऊन वेगळ्याच मार्गानं जाणारा उजवा डोळा आणि २४ × ७ चेहर्‍याला धरून राहणारं दिलखुलास हास्य. मुद्दामहून तिच्याशी मैत्री करावी असं तिच्यात काहीच नव्हतं. पण ती मात्र सगळ्यांशी जवळीक करायची. नाव सविता असलं तरी आम्ही सगळ्या तिला ‘सवडी’च म्हणायचो.
‘हसणं’ हा तिचा ट्रेडमार्क. कुणी तिच्याशी भांडलं, तिचा अपमान केला, शिक्षक तिला रागावले. तरी ती हसायचीच. परीक्षेनंतर पेपर वाटपाच्या वेळी, ‘सविताऽऽ… शंभरपैकी  सात मार्क…’  असं म्हणत जोशी सर तिच्या हातात पेपर द्यायचे. तेव्हाही ती तो घेऊन हसत हसत बाकावर जाऊन बसायची. फक्त यावेळी दातांनी ओठ चावलेला असायचा.
परीक्षेच्या वेळी आम्ही सगळ्या पोरी पोतंभर टेन्शनमध्ये पुस्तकं वाचत असायचो. ही मात्रं  निवांत बसलेली… मैदानातल्या कबुतरांकडं पहात.
“सवडे, अगं तुला परीक्षेचं टेन्शन येत नाही का गं?” मी  तिला विचारायचे.
“टेन्शन घ्यायचं नाही बघ कशाचच, एन्जॉय करायचं !” ती खळखळून हसायची.
शाळेचा पहिला दिवस. पाचवीचा आमचा वर्ग. मुख्याध्यापक सर तासावर आलेले. त्यांच्या शिस्तीच्या, कडकपणाच्या कथा थोरल्या बहिणींकडून ऐकलेल्या. आम्ही सगळ्या पोरी टरकलेल्या…
ओळखीचा कार्यक्रम सुरू झाला…
“वर्षा विष्णु काळे…”
“वैशाली अरूण फाटक…”
“संगीता सखाराम कुलकर्णी…”
“मंजुषा सुरेश महाजन…”
“सुनिता विश्वंभर पाटील…”
सुनितानं स्वत:चं नाव सांगितलं. सरांच्या मनात काय आलं माहीत नाही…
“विश्वंभर हे नाव कुणाचं आहे, कोण सांगेल?”
सगळा वर्ग चिडिचूप.
“सर, मी सांगते…” सवडीचा हात वर.
“सांगा…” सरांचा करडा स्वर.
“सर… विश्वंभर नाव आमच्या मावशीच्या चुलतदिराच्या  पोराचं आहे !”
“अहो… कुणाचंं म्हणजे कुठल्या देवाचं…? विष्णुचं नाव आहे हे!” सर डोक्याला हात लावत म्हणाले, तशी सवडी  खदाखदा हसली नि तिच्या पाठोपाठ सारा वर्ग.
एके दिवशी वर्गात सरस्वतीपूजन करायचं अचानक ठरलं. तयारी काहीच नव्हती. बाजार शाळेच्याच बाहेर.
“सविता, हे पाच रुपये घे. फुलं आणि नारळ चांगला सोलून, शेंड्या काढून आण.” बाईंनी सांगितलं.
पैसे घेऊन सवडी हसत हसत पळत गेली. दहा मिनिटात हजर… हातात पिशवी.
पूजा झाली, फुलं वाहिली… बाई पिशवीतून नारळ काढू लागल्या. हातात नारळाच्या फक्त शेंड्याच आल्या. नारळ नव्हताच.
“सविता, नारळ कुठाय?”
“बाई, तुम्ही ‘नारळ सोलून शेंड्या काढून आण’ म्हणून सांगितलंत. मी शेंड्या काढून आणल्या. सोललेला नारळ तिथंच ठेवला.”  सवडी तोंडावर हात धरून हसू लागली. बाईंनी कपाळावर हात मारून घेतला.
सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा…
सवडी काय म्हणून या परीक्षेला बसली, हे तिला नि देवालाच ठाऊक. परीक्षा केंद्रात नखशिखांत नटलेली सवडी तासभर आधी हजर होती.
“अगं, एवढी नटून का आलीहेस परीक्षेला?” बाईंचा प्रश्न..
“काही नाही… मज्जा, एन्जॉय करायची परीक्षा पण !” सवडीचं तत्त्वज्ञान ऐकून आमचे पालकही अवाक् !
गणिताचा पेपर... सवडी वीस मिनिटांत परीक्षा खोलीबाहेर.
शिक्षक, पालक झाडाखाली बसलेले.
“एवढ्या लवकर आलीस?”
“पेपर एकदम सोप्पा होता. सगळा सोडवून झाला. मग बसून काय करायचं?”
पेपर संपला. आम्ही सगळे रडत बाहेर. पेपर भयंकर अवघड. पाच-सात प्रश्न राहिलेले. 
“ए, टेन्शन घ्यायचं नाही… एन्जॉय करायचं !”  सवडीचा हसत हसत सल्ला.
दोन महिन्यांची रिझल्ट आला. 
सवडीला तिन्ही विषयात प्रत्येकी पाच मार्क; शंभरपैकी. तरी स्वारी जाम खूश !
“मला बघा, कसे एकसारखे मार्क मिळाले तिन्ही विषयात. अवघड असतंय असं !” म्हणत सातमजली हास्य.
अन् आम्हाला स्कॉलरशिप मिळूनही नंबर जरा मागं गेला म्हणून आम्ही नाराज. तोंडं पाडून…!!
‘चंद्रावर वातावरण कसं असतं?’ हे नववीच्या भुगोलाच्या परीक्षेतल्या प्रश्नाचं उत्तर सवडीनं–
‘चंद्रावर पाणी कमी असल्यानं काटेरी झुडपं असतात. ससे मोठ्या संख्येनं असतात.’ वगैरे लिहून
आणि शास्त्राच्या पेपरात.
‘अन्न एनसमधून आत घेऊन इसोफॅगसमधून न पचलेलं अन्न बाहेर टाकलं जातं.’ अशी एनस व इसोफॅगसच्या कामांची अदलाबदल केलेली भन्नाट उत्तरं लिहून सार्‍या वर्गाला तासभर हसवलं होतं नि बरोबरीनं स्वत: हसली होती.
दहावीची परीक्षा झाली. सुट्टीतच सवडीचं लग्न झाल्याचं कळलं. शिक्षण, लग्न, मुलंबाळं, करीअर यात तीस वर्षं कशी गेली ते कळलंच नाही. ना कुणाची भेट ना कुणाची खबरबात. एके दिवशी ‘व्हॉट्सॲप’ नामक जादुगारानं आम्हाला पुन्हा एकत्र आणलं. त्यात सवडीही होती. झूमवर एके दिवशी सगळ्या भेटलो. सवडीचा संसार बराच पुढे गेला होता. तिचा नवरा मोठा सरकारी अधिकारी होता. खूप पैसा मिळवला होता त्यानं. पुण्यात मोठ्ठं नि अलिशान घर होतं. तिनं नवर्‍याचा फोटो दाखवला. स्मार्ट नि हुशार दिसत होता.
“तुझ्यात काय पाहिलं गं त्यानं?” स्पष्टवक्त्या गीतानं विचारलं.
“अगं माझ्या हसण्यावर भाळला तो.” तिचं हसत हसत उत्तर.
आता विषय मुलांवर आला.
“माझा थोरला मुलगा आय.टी.आय. झालाय. अमेरिकेत असतो. नि मुलगी सी.ए. झाली. मुंबईत नोकरी करतेय. वीस लाखाचं पॅकेज आहे.” इति सवडी.
‘आय.टी.आय करून अमेरिकेत…?’ या विचारात असतानाच तिच्या शेजारी राहणारी अप्पी म्हणाली,
“ए बावळट ,तुझ्या तेजसनं ‘आय.टी.आय.’ नाही, ‘आय.आय.टी.’ केलंय… पवईहून…!”
“अगं ‘आय.आय.टी.’ काय अन् ‘आय.टी.आय.’ काय... चांगलं शिकला, चांगला पगार आहे, मस्त एन्जॉय करतोय. झालं तर मग !” सात मजली हास्य.
“तुझी  दोन्ही पोरं एवढी शिकली, एवढी हुशार निघाली. खूप कष्ट घेतले असशील नं तू त्यांच्यासाठी? काय काय केलंस?” आमचा प्रामाणिक प्रश्न.
“मी काही केलं नाही; हेच मोठं काम केलं. कधी त्यांच्या मागं लागले नाही अभ्यासासाठी. त्यांना पाहिजे ते करू दिलं. त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली होती. ‘टेन्शन घ्यायचं नाही. निवांत रहायचं नि एन्जॉय करायचं.’ नवर्‍यावर गेलीत गं पोरं माझी... हुशार, अभ्यासू आहेत त्याच्यासारखी !”
दाखवलं नाही तरी आम्हाला तिचा हेवा वाटलाच. आम्हा सार्‍या तथाकथित हुशार मुलींपेक्षा तिचा संसार जास्त यशस्वी होता…!!
      एके दिवशी तिचे यजमान वारल्याची दु:खद बातमी आली. जेमतेम अठ्ठावन्न वय !
“हुशार, कर्तृत्त्ववान माणूस… पण स्वभाव फार गंभीर. नुसता काम करत राहिला आमच्यासाठी… आयुष्य एन्जॉय केलं नाही अजिबात. म्हणून इतक्या लवकर गेला !” आता मात्रं तिचे डोळे वहायचे थांबता थांबत नव्हते. सहा महिन्यात बिचारी सावरली. ट्रिप्सना जायचा सपाटा लावला. नाटक, सिनेमा, गेट टुगेदर्स. काही म्हणून सोडेना. बरोबरच होतं. एकटी कसे दिवस रेटणार होती?
“आता उरलेलं आयुष्य एकटीनं का होईना; पण एन्जॉय करणार!”  तिचं स्पष्टीकरण.
अन् आज ही बातमी आली. तिला हॉस्पिटलमधे हार्टच्या त्रासासाठी ॲडमिट केलेलं. वाईट वाटत होतं. दुसरे दिवशी तिला हॉस्पिटलमधे भेटायला जायचं ठरलं. सगळ्यांनी मिळून. रात्री बाराला व्हॉट्सएप मेसेजच्या नोटिफिकेशनची बेल वाजली.
एवढ्या रात्री ग्रुपवर मेसेज…?
घाबरत ग्रुप उघडला…
सवडीचा मेसेज होता…
‘एन्जॉयग्राफी (enjoygraffy) झाली.
काही निघालं नाही. सगळं नॉर्मल.
उद्या घरी सोडतील.
घरीच या सगळ्याजणी…
मस्त एन्यॉय करू…’
जिनं सगळं आयुष्य ‘एन्जॉय’ या अजेंड्यावर निभावलं, तिनं ‘ॲंजिओग्राफी’चं ‘एन्जॉयग्राफी’ केलं, तर काय नवल? 
तिच्या त्या ‘एन्जॉयग्राफी’ला हसत नि एन्जॉय करत केव्हा झोप लागली, ते कळलच नाही…!!

- नीला महाबळ गोडबोले, सोलापूर.

2696. पायगुण

 दुपारच्या उन्हाचा तडाखा जोरात हुता. रानातली पाखरं सुदीक झाडाच्या सावलीला चोची उघडून बसली होती. पण गावातल्या मोठ्या वाड्यापुढं मात्र आज वेगळीच धामधूम होती. नामदेवच्या घरी पोरगी झाली होती. वाड्यात पाळणा हलणार होता, पण घरात आनंदाचा लवलेश नव्हता
नामदेवची आई, जिजाक्का, कपाळावर आठ्या घालून ओट्यावर बसली होती. 
"काय नशीब घेऊन आलीय काय माहिती ! हिच्या पाऊल पडायच्या आधीच वाड्यातली दुभती गाय मेली आणि नामदेवच्या पायाला बी फॅक्चर झालं. कसलं हे पायगुण?" जिजाक्काचं हे बोलणं पलंगावर निस्तेज पडलेल्या सखूच्या कानावर गेलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.
सखूने आपल्या लेकीला, त्या चिमुरड्या जीवाला पोटाशी धरलं. 
लेकीचं नाव ठेवलं 'लक्ष्मी', पण अख्ख्या गावाने तिला 'पांढऱ्या पायाची' म्हणून शिक्का मारला.
दिवस जात होते. लक्ष्मी जशी जशी मोठी होत होती, तसं तसं नामदेवच्या घरावर संकटाचं आभाळ फाटत होतं. कधी अतिवृष्टीने पीक गेलं, तर कधी घरातलं कुणी ना कुणी आजारी पडू लागलं. जिजाक्का तर आता उघडपणे म्हणू लागली,
 "ह्या पोरीचा पायगुणच असा हाय, की घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाय!"
बिचारी लक्ष्मी. पाच-सहा वर्षांची झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावर बालपण कधीच दिसलं नाही. तिला समजायचं की घरात जे काही वाईट होतंय, त्याला आपणच जबाबदार आहोत. ती गुपचूप कोपऱ्यात बसायची. कुणाशी खेळायला जायची नाही, कारण तिला भीती वाटायची की आपला स्पर्श कुणाला झाला तर त्याचं काही वाईट होईल.
एकदा तर हद्दच झाली. नामदेवचा बैल अचानक वारला. नामदेव रागात घरात आला आणि त्याने चिमुरड्या लक्ष्मीला हाताला धरून घराबाहेर काढलं.
 "चालती हो इथून! तुझा पाय पडला आणि माझी सगळी बरकत गेली!" सखूने खूप रडून विनवण्या केल्या, पण कुणीच ऐकलं नाही.
त्या रात्री गावात मुसळधार पाऊस पडत होता. लक्ष्मी गोठ्याच्या एका कोपऱ्यात भिजत बसली होती. अचानक तिला कुबट वास आला आणि काहीतरी जळाल्याचा आवाज आला. तिने पाहिलं तर काय? पावसाच्या कडकडाटात शॉर्ट सर्किट होऊन गोठ्याला आग लागली होती!
तिथंच जवळच नामदेव आणि जिजाक्का गाढ झोपले होते. लक्ष्मी ओरडली, पण आवाजात जोर नव्हता. तिने विचार केला नाही, तिचे इवलेसे पाय आगीच्या ज्वाळांकडे धावले. तिने जीवाची पर्वा न करता घरातल्या सर्वांना उठवलं.
पण आगीचा एक मोठा लोळ जिजाक्काच्या अंगावर पडणार इतक्यात लक्ष्मीने आजीला जोरात ढकललं आणि ती स्वतः आगीच्या विळख्यात सापडली. नामदेवने कसाबसा तिला बाहेर काढलं.
लक्ष्मी शुद्धीवर आली तेव्हा ती दवाखान्यात होती. तिचे पाय भाजले होते. जिजाक्का तिच्या उशाशी बसून धाय मोकलून रडत होती.
"माफ कर बाळा... आम्ही तुला पांढऱ्या पायाची म्हणलं, पण तू तर साक्षात लक्ष्मी होऊन आमचे प्राण वाचवले ग!" जिजाक्काने तिचे पाय हातात धरून पापण्या ओल्या केल्या.
नामदेवने रडत रडत डॉक्टरांना विचारलं, 
"साहेब, माझी पोरगी चालेल ना पुन्हा?"
डॉक्टर हसले आणि म्हणाले,
"नामदेवराव, हिच्या पायगुणामुळेच आज तुम्ही जिवंत आहात. नशिबाचे खेळ माणसाच्या कर्मात असतात, पोरीच्या पायात नसतात."
त्या दिवशी पावसाचा जोर ओसरला होता आणि त्या वाड्यात खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा गृहप्रवेश झाला होता. सखूच्या डोळ्यात आज पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, तर अभिमानाचं होतं.
दवाखान्यातून लक्ष्मी घरी आली, पण ती आधीची चुलबुली लक्ष्मी राहिली नव्हती. आगीत तिचे पाय चांगलेच भाजले होते, त्यामुळे ती आता काठी टेकवत चालू लागली होती. जिजाक्का आता तिचे पाय चेपून द्यायची, नामदेव तिच्यासाठी शहरातून खाऊ आणायचा, पण लक्ष्मीच्या डोळ्यातली ती जुनी भीती अजून गेली नव्हती.
एके दिवशी दुपारी वाड्याच्या ओट्यावर जिजाक्का आणि शेजारच्या काकू गप्पा मारत बसल्या होत्या. लक्ष्मी आतल्या खोलीत भिंतीला कान लावून ऐकत होती. शेजारची काकू म्हणाली, 
"जिजाक्का, पोरगी वाचली ते ठीक झालं, पण आता हिचं लगीन कसं होणार? पाय तर निकामी झाले अन नशिबाचा तो डाग पुसणार कसा? लोकांच्या तोंडाला कुलूप नसतं बघा!"
हे ऐकून लक्ष्मीच्या काळजात लख्खकन चमकलं. तिला वाटलं, 
'माझ्या पायगुणामुळे आधी घराचं नुकसान झालं आणि आता माझ्या पाय अधू झाल्यामुळे मी जन्मभर आई-बापावर ओझं बनून राहणार का?'
त्या रात्री पावसाची रिपरिप चालू होती. नामदेव आणि सखू गाढ झोपले होते. लक्ष्मी हळूच उठली. काठी टेकवत ती गोठ्यापाशी आली. तिने त्या अंधारात आपल्या भाजलेल्या पायांकडे बघितलं. तिला वाटलं, जर मीच नसेन, तर बापाच्या डोक्यावरचं हे ओझं कायमचं मिटून जाईल.
ती वाड्यामागच्या विहिरीपाशी गेली. पाय थरथरत होते. तिने विहिरीच्या काठावर हात ठेवला आणि डोळे मिटले. तोंडातून शब्द फुटला, 
"देवा, पुढच्या जन्मी मला असा पायगुण देऊ नको, ज्यानं माझ्या बापाला रडावं लागेल..."
इतक्यात पाठीमागून एक थरथरणारा हात तिच्या खांद्यावर पडला. 
लक्ष्मी दचकून मागे फिरली. मागं नामदेव उभा होता. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.
"काय करत होतीस पोरी?" नामदेवचा आवाज फाटला होता.
लक्ष्मी रडत म्हणाली, "बाबा, मी 'पांढऱ्या पायाची' हाय ना? 
माझ्यामुळं तुमचं लय नुकसान झालं. आता तर मी लंगडी बी झाली. मी जगून तुम्हाला अजून किती त्रास देऊ?"
नामदेवने तिला गच्च पोटाशी धरलं. तो ढसाढसा रडू लागला, जसा एखादा डोंगर कोसळावा. तो म्हणाला, 
"अगं वेडे, तू पांढऱ्या पायाची नाय, तू तर माझ्या काळजाचा तुकडा हायस! तो बैल गेला, शेती गेली, घर जळालं तरी चालेल गं... पण तू गेल्यावर हा बाप कोणासाठी जगणार? तुझा पायगुण न्हाई, तू माझं पुनर्जन्म हायस!"
तिथंच कोपऱ्यात उभी असलेली जिजाक्का पुढे आली. तिने लक्ष्मीचे ते भाजलेले पाय आपल्या हातात घेतले आणि त्यावर आपली आसवं ढाळली. जिजाक्का म्हणाली, 
"बाळा, ज्या पायांनी आम्हाला मरणाच्या दारातून खेचून आणलं, ते पाय कधी 'अभागी' असूच शकत नाहीत. आजपासून तू या घरची लेक नाय, तू या घरची खरी 'मालकीण' हायस!"
त्या रात्री काळोख खूप होता, पण त्या बापाच्या डोळ्यात आपल्या लेकीसाठी जे प्रेम होतं, त्यानं अख्खा वाडा उजळून निघाला होता. लक्ष्मीला उमजलं होतं की, जगातला सर्वात मोठा 'पायगुण' हा नशिबात नसून, एकमेकांवर असलेल्या जीवापाड प्रेमात असतो.
पण नियतीचा खेळ अजून संपला नव्हता. लक्ष्मीच्या मनातलं ते शल्य, की आपण आपल्या बापावर ओझं आहोत, ते पूर्णपणे गेलं नव्हतं.
काही महिने उलटले. लक्ष्मी आता काठीच्या आधाराने अंगणात चालू लागली होती. एक दिवस गावात जत्रा होती. नामदेवने लेकीसाठी नवीन परकर-पोलकं आणलं होतं.
 "लक्ष्मी, चल गं जत्रेला! तुला पाळण्यात बसवतो," नामदेव आनंदाने म्हणाला. पण लक्ष्मीने नकार दिला. तिला भीती वाटत होती की लोक आजही तिला बघून कुजबुजतील, तिच्या पायांकडे बघून नाकं मुरडतील.
नामदेव तिला समजावत असतानाच अचानक गावात गलका झाला. कुणीतरी ओरडत धावत आलं, 
"नामदेव! पळ... पळ लवकर! खालच्या वस्तीला आग लागलीय अन वारं सुटल्यानं ती आग आता तुझ्या शेताकडं वळलया!"
नामदेवच्या काळजात धस्स झालं. त्याचं उभं पीक, ज्यावर त्याने लक्ष्मीच्या लग्नासाठी आणि उपचारासाठी स्वप्नं रचली होती, ते आगीच्या विळख्यात जाणार होतं. नामदेव, सखू आणि जिजाक्का सैरावैरा धावले. लक्ष्मी अंगणात एकटीच उभी होती. तिने पाहिलं, काळपट धूर आकाशात पसरला होता.
लक्ष्मीला राहवलं नाही. तिने आपली काठी उचलली आणि लंगडत लंगडत शेताच्या दिशेनं धावू लागली. तिला माहित होतं, त्या शेतात बापाचं रक्त आणि घाम सांडलाय. वाटेत तिला गावकरी भेटले, कुणीतरी ओरडलं,
 "बघा, ही पांढऱ्या पायाची पोरगी बाहेर आली अन पुन्हा अघटित घडलं!"
ते शब्द लक्ष्मीच्या काळजात सुरीसारखे खुपसले. ती रडत होती, पण थांबली नाही. शेतापाशी पोहचली तर आग रौद्र रूप धारण करत होती. नामदेव हताश होऊन जमिनीवर बसला होता. त्याचं सगळं आयुष्य जळून खाक होणार होतं.
तेवढ्यात आकाशात अचानक ढग दाटून आले. कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला! काही मिनिटांतच ती आग विझली. नामदेवचं पीक वाचलं होतं.
सगळं गाव थक्क होऊन बघत होतं. जो पाऊस महिनाभर पडला नव्हता, तो आज अचानक कसा पडला? जिजाक्का धावत आली आणि तिने लक्ष्मीला घट्ट मिठी मारली. तिचे पाय चिखलाने माखले होते, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
जिजाक्का गावकऱ्यांसमोर ओरडून म्हणाली,
"बघा रे डोळे उघडून! जिला तुम्ही पांढऱ्या पायाची म्हणताय, तिने आज पुन्हा आमचं घर आणि शेत वाचवलंय. तिच्या पायात 'अपशकुन' न्हाई रे, तिच्या पायात साक्षात विठ्ठलाची माया हाय! ती धावत आली म्हणून आभाळ फाटलं अन पाऊस पडला!"
नामदेव धावत आला आणि त्याने लक्ष्मीला उचलून घेतलं. तिचे ते भाजलेले आणि चिखलात माखलेले पाय त्याने आपल्या हातात घेतले. नामदेव रडत म्हणाला, 
"माफ कर बाळा... आजवर लोक म्हणायचे तुझा पायगुण वाईट हाय, पण आज मला समजलं, तुझा पायगुण असा हाय की प्रत्यक्ष देवाला सुद्धा तुझ्या डोळ्यातलं पाणी बघवलं नाय!"
लक्ष्मीने बापाच्या गळ्याला मिठी मारली. तिच्या गालावरून वाहणारं आसू आज पहिल्यांदाच 'दुःखाचं' नव्हतं. अख्ख्या गावाचं मान खाली गेली होती. ज्या पोरीला त्यांनी आयुष्यभर हिणवलं, तिच्याच अस्तित्वामुळे आज गाव सुखी होतं.
त्या दिवशीपासून लक्ष्मी 'पांढऱ्या पायाची' राहिली नव्हती, ती साऱ्या गावाची 'देवमाणूस' झाली होती.
लक्ष्मी आता मोठी झाली होती, पण तिच्या पायातले ते आगीचे वळ आणि मनावरचे ते 'पांढऱ्या पायाचे' शिक्के अजूनही पूर्ण पुसले गेले नव्हते. नामदेवने तिच्या लग्नासाठी पुंजी जमवली होती, पण जो कुणी पाहायला येई, तो तिच्या अधू पायांकडे बघून नाक मुरडायचा. कुणी म्हणायचं,
"पोरगी देखणी हाय, पण नशिबानं मारलंय तिला!"
एक दिवस गावातलं एक स्थळ आलं. मुलगा सुशिक्षित होता, नाव विठ्ठल. विठ्ठलचे वडील जुन्या विचाराचे होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, 
"नामदेवराव, तुमची पोरगी पसंत हाय, पण लोकांच्या तोंडून तिच्या पायगुणाबद्दल ऐकलंय. उद्या आमच्या घरात काही बरं-वाईट झालं तर जबाबदार कोण?"
नामदेव हात जोडून रडू लागला, 
"मालक, माझी पोरगी साक्षात लक्ष्मी हाय, नका असं बोलू!" पण लक्ष्मी हे सगळं आडोश्याला उभी राहून ऐकत होती. तिचे डोळे पुन्हा डबडबले. तिने ठरवलं, आपल्यामुळे बापाला आता अजून अपमान सोसायला लावायचा नाही.
ती शांतपणे बाहेर आली आणि विठ्ठलच्या वडिलांसमोर उभी राहिली. ती म्हणाली, 
"बाबा, माझ्या पायगुणामुळे माझं घर जळालं, माझा बाप भिकेला लागला असं लोक म्हणतात ना? मग आज एक शेवटचा प्रयोग करून बघा." तिने अंगणातली तुळस दाखवली जी उन्हाने पार सुकली होती. 
"जर माझ्या स्पर्शाने ही तुळस हिरवी झाली, तरच मी तुमच्या घरात पाऊल ठेवीन, नाहीतर मी माझं आयुष्य संपवून घेईन."
सगळे स्तब्ध झाले. लक्ष्मी लंगडत त्या सुकलेल्या तुळशीपाशी गेली. तिने आपले दोन्ही हात त्या करपलेल्या फांद्यांवर ठेवले आणि डोळे मिटून मनापासून प्रार्थना केली, 
"देवा, आज माझ्या बापाची इज्जत तुझ्या हातात हाय. मला जगवायचं का मारायचं हे तूच ठरव!" तिचे डोळे एवढे वाहत होते की, तिची आसवं त्या तुळशीच्या मुळाशी झिरपू लागली.
आणि काय आश्चर्य! काही क्षणातच त्या सुकलेल्या तुळशीला जणू पालवी फुटल्याचा भास झाला. आकाश पुन्हा एकदा भरून आलं आणि हलकीशी सर आली. विठ्ठल पुढे आला आणि त्याने लक्ष्मीचा हात धरला. तो आपल्या वडिलांना म्हणाला,
"बाबा, पायगुण माणसाच्या नशिबात नसतो, तो त्याच्या काळजात असतो. जिला देव सुद्धा रडताना बघू शकत नाही, ती पोरगी ज्या घरात जाईल तिथे स्वर्गच होईल!"
विठ्ठलच्या वडिलांनी शरमिंदं होऊन मान खाली घातली. त्यांनी लक्ष्मीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
"लेकी, आम्हाला माफ कर. आम्ही दगडात देव शोधला, पण माणसातला देव ओळखलाच नाही."
नामदेवने लक्ष्मीला जवळ घेतलं. आज पहिल्यांदाच लक्ष्मीला स्वतःच्या पायांचा अभिमान वाटला. तिचे ते भाजलेले पाय आज जगासाठी 'पांढरे' राहिले नव्हते, तर त्याची आज'सोन्याची पावलं' झाली होती.
सख्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि साऱ्या गावात एकच चर्चा होती— 
"लक्ष्मी आली, आणि साऱ्यांचं नशीब फळफळलं!"

©️ कैलास मोरे ✍️✍️✍️

2695. मन सुन्न करणारी सत्य घटना

   पुणे-नाशिक हायवेवरच्या 'नारायणगाव' बायपासला एक जुनी, पत्रे निघालेली 'मारुती व्हॅन' उभी असायची. त्यावर लाल रंगाने 'मोफत रुग्णवाहिका' (Free Ambulance) असं लिहिलं होतं. तिचा मालक होता 'दामू अण्णा'. वय ६० च्या आसपास. अंगावर मळका खाकी शर्ट, वाढलेली दाढी आणि हातात एक स्टीलचा डबा. दामू अण्णा हायवेवर थांबणाऱ्या गाड्यांच्या खिडकीवर टक-टक करायचे.
"साहेब, १०-२० रुपये द्या हो. डिझेलला पैसे नाहीत. एखादा पेशंट आला तर गाडीत तेल नसतं. द्या हो धर्माच्या नावाने."
लोक त्यांना शिव्या द्यायचे. "ए हट ! दारू प्यायला पैसे मागतोयस का? मोफत सेवा लिहीलीये आणि पैसे मागतोयस? नक्कीच धंदा मांडलाय याने."
काही तरुण मुलं तर त्यांची चेष्टा करायची. "काय अण्णा, आज किती जमा झाले? चालते का ही भंगार गाडी? का ढकलत न्यावी लागते?"
दामू अण्णा काहीच बोलायचे नाहीत. ते मान खाली घालून, लोकांच्या शिव्या गिळून, मिळालेले १०-२० रुपये गोळा करायचे आणि पंपावर जाऊन डिझेल टाकायचे. स्वतः चहा सुद्धा प्यायचे नाहीत.
    एक दिवस रात्री २ वाजता, त्याच हायवेवर 'रोहित' नावाचा एक श्रीमंत तरुण आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून सुसाट चालला होता. त्याला पार्टीला उशीर झाला होता. अचानक एका वळणावर रस्ता निसरडा असल्याने त्याची बाईक घसरली. रोहित २० फूट लांब फरफटत गेला. त्याचं हेल्मेट फुटलं, डोक्यातून रक्ताच्या धारा लागल्या. पायाचं हाड मोडलं होतं. तो रस्त्याच्या कडेला विव्हळत पडला होता. रात्रीचे २ वाजले होते. हायवेवर गाड्या तुरळक होत्या. ज्या गाड्या जात होत्या, त्या थांबत नव्हत्या. कोणाला पोलीस केसची भीती होती, तर कोणाला लुटालुटीची. रोहितचा जीव जात होता. त्याला डोळ्यासमोर अंधारी येत होती. त्याने विचार केला, "संपलं सगळं. आज आपण मरणार."
तेवढ्यात... दूरवरून एक कर्कश सायरन वाजला.
तीच जुनी, पत्रे निघालेली 'दामू अण्णांची ॲम्ब्युलन्स' तिथे येऊन थांबली. दामू अण्णा धावत खाली उतरले. त्यांनी रोहितला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. त्यांच्या शरीरात हत्तीचं बळ आलं. त्यांनी त्या ६ फुटाच्या धिप्पाड रोहितला एकट्याने उचललं आणि स्ट्रेचरवर टाकलं.
"घाबरू नकोस बाळा... मी आहे. तुला काही होऊ देणार नाही."
दामू अण्णांनी गाडी स्टार्ट केली. पण गाडी 'खुरखुर' करून बंद पडली.
रोहित शुद्धीवर होता, तो म्हणाला, "काय झालं?"
दामू अण्णांचे हात थरथरले. "डिझेल संपलंय राजा. मगाशी कोणी पैसे दिले नाहीत. फक्त ५० रुपयांचं टाकलं होतं."
रोहितला रडू आलं. "आता मी मरणार."
पण दामू अण्णा थांबले नाहीत. त्यांनी गाडी न्यूट्रलला टाकली. समोर उताराचा रस्ता होता. त्या ६० वर्षांच्या म्हाताऱ्याने ती ॲम्ब्युलन्स मागून 'ढकलायला' सुरुवात केली. पावसाची रिमझिम सुरू झाली होती. दामू अण्णा श्वास रोखून गाडी ढकलत होते. १ किलोमीटर पुढे पेट्रोल पंप होता. त्यांच्या पायातली चप्पल तुटली, पायाला दगड लागून रक्त आलं, पण ते थांबले नाहीत. ते रडत ओरडत होते, 
"देवा... या पोराचा जीव नको घेऊ ! माझ्या वाटचं आयुष्य त्याला दे, पण गाडी चालू दे!"
कसेबसे ते पंपावर पोहोचले. त्यांनी खिशातले सगळे चिल्लर - अगदी १-२ रुपयांचे नाणे काढून पंपावाल्याला दिले.
"भाऊ, हे घ्या ७० रुपये. लवकर डिझेल टाका. पोरगं मरतयं आत."
पंपावाल्याने डिझेल टाकलं. दामू अण्णांनी गाडी सुसाट पळवली आणि रोहितला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. डॉक्टरांनी रोहितला तातडीने आयसीयूमध्ये नेलं. वेळेवर पोहोचल्यामुळे त्याचे प्राण वाचले. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहितचे श्रीमंत वडील हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
डॉक्टर म्हणाले, "आभार माझे नका मानू. त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचे माना. १० मिनिटं उशीर झाला असता तर तुमचा मुलगा वाचला नसता."
रोहितचे बाबा बाहेर आले. त्यांनी पाहिलं की दामू अण्णा हॉस्पिटलच्या बाकावर (Bench) बसले आहेत. ते दामू अण्णांजवळ गेले. त्यांनी १० हजार रुपयांची गड्डी काढली.
"हे घ्या पैसे. तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवलाय."
पण दामू अण्णा हालले नाहीत. त्यांची मान एका बाजूला कलली होती.
रोहितच्या बाबांनी त्यांना हलवलं. "अहो? पैसे घ्या..."
दामू अण्णांचा देह थंड पडला होता. ते गतप्राण झाले होते.
तिथे उभ्या असलेल्या एका नर्सने डोळे पुसले आणि म्हणाली:
"साहेब, ते उठणार नाहीत. त्यांचा मृत्यू 'हार्ट अटॅक' ने नाही, तर 'भुकेने' झालाय. गेल्या ३ दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. ते हायवेवर लोकांकडे भीक मागायचे ना? लोक त्यांना शिव्या द्यायचे. पण जे १०-२० रुपये जमा व्हायचे, त्याची ते कधीच 'भाकरी' खात नसत. ते त्या पैशाचं फक्त 'डिझेल' टाकायचे. ते नेहमी म्हणायचे, 'माझं पोट रिकामं राहिलं तरी चालेल, पण माझी ॲम्ब्युलन्स रिकामी नाही राहिली पाहिजे. माझा एकुलता एक मुलगा ॲम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्यामुळे मेला होता. दुसऱ्याचं पोरं नाही मरू देणार मी.' काल रात्री तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी जी ताकद लावली. त्यात त्यांची उरलीसुरली ऊर्जा संपली. त्यांनी स्वतःला जाळून तुमच्या वंशाचा दिवा वाचवलाय."
हे ऐकून रोहितच्या बाबांच्या हातातली पैशाची गड्डी जमिनीवर विखुरली. ते त्या 'भिकारी' समजल्या जाणाऱ्या मृतदेहाच्या पायाशी कोसळले आणि लहान मुलासारखे रडले. ज्याला समाज 'दारुडा' आणि 'भिकारी' म्हणून हिनवत होता, तो माणूस प्रत्यक्षात एक 'संत' होता, ज्याने स्वतःचा घास त्यागून माणुसकीचं इंजिन चालू ठेवलं होतं. रस्त्यावर मदत मागणाऱ्या प्रत्येक माणसाला 'भिकारी' समजू नका. काही लोक स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी झोळी पसरत असतात. बाह्य रूपावरून माणसाची लायकी ठरवू नका. फाटक्या कपड्यातही देव असू शकतो.
हरे कृष्ण 🙏😢😭



2694. मातृभाषा आणि संस्कार

 "आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे की चिंटूच्या समोर तुझी ती गावंढळ भाषा बोलू नकोस. उद्या त्याचा ‘इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा हाईस ’, ‘बारा हाय न्हवं ’ किंवा ‘राम-राम’ म्हटलं ना, तर माझं नाक कापलं  जाईल ! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही, स्टेटस आणि क्लास बघतात !" 😠
समीरने आपल्या आई कावेरीवर चिडत म्हटलं. गावाहून आलेल्या कावेरीदेवी शुद्ध देशी बोली बोलत होत्या. मुलाच्या शब्दांनी त्या शांत झाल्या. त्यांनी पोटलीतून काढलेले लाडू परत आत ठेवले. 🍬 पोऱ्याला आपल्या हातचे लाडू खाऊ घालावेत, भरभरून आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण मुलाच्या ‘स्टेटस’पुढे त्यांची माया दडपली गेली… 😔
समीर आणि त्याची पत्नी रिया मागच्या महिनाभरापासून आरव (चिंटू) कडून पोपटासारखं पाठ करून घेत होते.
“Say Hello”, “Say Good Morning”, “My name is Aarav.” 📚
घराचं वातावरण एखाद्या मिलिट्री ट्रेनिंगसारखं झालं होतं. कावेरीदेवींना कडक सूचना होती – इंटरव्ह्यू होईपर्यंत आरवपासून दूर राहायचं ! 😶
🎓 इंटरव्ह्यूचा दिवस :
शहरातील सर्वात प्रतिष्ठित शाळा. सगळीकडे इंग्रजीत संवाद. समीर-रिया तणावात. प्रिन्सिपल Mr. D'Souza यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यू सुरू झाला. आरवने रटलेली उत्तरे व्यवस्थित दिली. समीरच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. 😊 अचानक प्रिन्सिपलने विचारलं,
“बेटा, घरी एखादा मोठा पाहुणा आला किंवा आजी-आजोबांना भेटलास तर काय करतो?”
समीरचं हृदय धडधडलं. हे तर शिकवलंच नव्हतं ! 😰
आरव शांतपणे खुर्चीवरून उतरला. प्रिन्सिपलकडे गेला. वाकून त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणाला.
“परनाम गुरुजी ! राम-राम !” 🙏🌸
क्षणभर संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली. प्रिन्सिपल जोरात हसले आणि आरवला मांडीवर बसवलं. 
“मिस्टर समीर,” ते म्हणाले,
“आज सकाळपासून पन्नास मुलं आली. सगळे रोबोटसारखे ‘हाय-हॅलो’ म्हणत होते. पण तुमच्या मुलाने जे केलं, ते आपली संस्कृती आहे. हे संस्कार पुस्तकात मिळत नाहीत.” 📖✨
आरव आनंदाने म्हणाला,
“माझी आजी शिकवते ! ती म्हणते – विद्या विनय देते, आणि सर्वात मोठं शिक्षण म्हणजे नम्रता.” 💖
प्रिन्सिपल म्हणाले,
“भाषा संवादाचं साधन आहे, लाजेचं कारण नाही. तुमच्या आईंना माझा नमस्कार सांगा. तुमचा मुलगा त्याच्या वेगळ्या ओळखीमुळे निवडला गेला आहे.” 👏
🏡 घरी पोहोचताच समीर आईजवळ गेला. कावेरीदेवी तुळशीपाशी बसल्या होत्या. 🌿 समीर त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. 🙏
“आई, मला माफ कर. झाड कितीही उंच झालं तरी मुळांपासून तुटलं तर सुकतंच.” 😢
त्या दिवशी समीरला उमगलं. सूट-बूट आणि इंग्रजीने आपण ‘मॉडर्न’ होऊ शकतो, पण ‘माणूस’ संस्कारांनीच बनतो. ❤️
त्या संध्याकाळी समीर घरात येताना म्हणाला. “राम-राम, आई.” 🙏
कावेरीदेवींच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मित कोणत्याही डिग्रीपेक्षा मौल्यवान होतं. 😊✨

🌺 कथासार
आधुनिक होणं चुकीचं नाही पण आपल्या मुलांना, भाषेला आणि वडीलधाऱ्यांना विसरणं ही सर्वात मोठी चूक आहे.
इंग्रजी एक भाषा आहे, कौशल्य आहे. पण मातृभाषा आणि संस्कार ही आपली खरी ओळख आहेत. 🇮🇳💛
❓ तुमच्यासाठी प्रश्न
आजची पिढी इंग्रजीच्या मागे लागून आपल्या संस्कारांपासून दूर जात आहे असं तुम्हाला वाटतं का?
घरात मातृभाषा बोलण्यावर भर द्यायला हवा का?
तुमची मतं नक्की कमेंटमध्ये लिहा. 💬
ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक 👍 करा, शेअर 🔄 करा. धन्यवाद! 

ज्योति निंबाळकर



2693. शाळेची मधली सुट्टी झाली होती

 "ट्रिंग... ट्रिंग..." बेल वाजली आणि मुलांचा आरडाओरडा सुरू झाला. चौथी 'ब' च्या वर्गात मुलांनी आपले दप्तर उघडले आणि डबे बाहेर काढले. वर्गात पोहे, उपमा, शिरा आणि बटाट्याच्या भाजीचा खमंग वास सुटला होता. सगळी मुलं गटागटाने बसून जेवत होती, हसता-खेळता एकमेकांचे डबे चाखत होती. फक्त एक मुलगा, 'गणेश' (वय ९ वर्षे), वर्गाच्या सर्वात शेवटच्या बाकड्यावर, कोपऱ्यात एकटाच बसला होता. त्याचा युनिफॉर्म थोडा मळका होता, शर्टाचे एक बटण तुटलेले होते. गणेशने आपल्या दप्तरातून एक जुना, चेपलेला 'ॲल्युमिनियमचा डबा' बाहेर काढला. त्याने डबा उघडला. आणि तो डब्यातून काहीतरी उचलून तोंडात टाकल्यासारखी 'अभिनय' (Act) करू लागला. तो मान हलवत होता, चावल्यासारखे करत होता, आणि अधूनमधून पाण्याची बाटली तोंडाला लावत होता.
त्याच्या शेजारी बसणारा 'रोहन', जो एका श्रीमंत घरचा मुलगा होता, त्याने हे पाहिलं.
रोहनला वाटलं, "हा गणेश लपून लपून काहीतरी स्पेशल खातोय. मला देत नाही."
रोहनने मोठ्याने ओरडून सांगितलं, "एय गणेश! काय आणलंय डब्यात? एकटाच खातोय? आम्हाला पण दाखव ना!"
गणेश दचकला. त्याने डबा पटकन झाकला आणि दप्तरात लपवण्याचा प्रयत्न केला.
"काही नाही रे... साधी भाजी-भाकरी आहे. तुला नाही आवडणार." गणेश घाबरत म्हणाला.
पण मुलांचा गोंधळ ऐकून वर्गाचे शिक्षक, 'पाटील सर', तिथे आले.
पाटील सर थोडे कडक होते. त्यांना वाटलं गणेश वर्गात काहीतरी लपवतोय, कदाचित मोबाईल किंवा खेळणी.
पाटील सर म्हणाले, "गणेश, तो डबा बाहेर काढ. काय लपवतोयस?"
गणेशचे डोळे भरून आले. तो थरथरत होता. "सर, प्लीज... काही नाहीये त्यात."
पाटील सरांनी रागाने त्याच्या हातातून तो डबा हिसकावून घेतला.
वर्गातल्या ५० मुलांच्या नजरा त्या डब्यावर होत्या. रोहनला वाटलं आता काहीतरी भारी खायला मिळणार.
सरांनी डब्याचं झाकण उघडलं.
आणि...
वर्गात एकदम 'स्मशानशांतता' पसरली.
त्या डब्यात ना पोहे होते, ना शिरा, ना भाकरी. तो डबा पूर्णपणे 'रिकामा' होता. त्यात अन्नाचा एक दाणाही नव्हता. फक्त डब्याच्या तळाशी पाण्याचे काही थेंब होते.
सरांनी गणेशकडे पाहिलं. "गणेश? हा डबा रिकामा आहे? मग तू मगाशी खाण्याचं नाटक का करत होतास? तोंडात काय टाकत होतास?"
गणेश आता ओक्साबोक्शी रडू लागला. त्या ९ वर्षांच्या मुलाच्या तोंडून जे शब्द बाहेर आले, ते ऐकून दगडही पाझरला असता.
तो म्हणाला:
"सर... माझी आई आजारी आहे. बाबांना दारूचं व्यसन आहे, ते घरी पैसे देत नाहीत. घरात गेल्या दोन दिवसांपासून अन्न शिजलंच नाही. सर, मला खूप भूक लागली होती. सगळ्या मुलांचे डबे बघून, त्या वासाने मला चक्कर येत होती.
मला माझ्या मित्रांमध्ये कमीपणा वाटू नये, त्यांना वाटू नये की मी 'भिकारी' आहे. म्हणून मी रोज हा रिकामा डबा आणतो. सर, मी डब्यातून काहीच उचलत नव्हतो. मी फक्त 'हवा' उचलून तोंडात टाकत होतो आणि पाणी पीत होतो. जेणेकरून माझ्या पोटाला वाटावं की मी काहीतरी खातोय. आणि माझ्या मित्रांना वाटावं की गणेशची आई सुद्धा त्याच्यासाठी डबा बनवते. सर, प्लीज कोणाला सांगू नका. रोहन मला चिडवेल."*
हे ऐकून पाटील सर, जे ४० वर्षांपासून कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून ओळखले जायचे, तिथेच बाकड्यावर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.
ज्या वयात मुलांना 'पिझ्झा' आणि 'बर्गर' मध्ये चॉईस करायची असते, त्या वयात हा मुलगा 'हवा' खाऊन आपली भूक मारत होता? आणि तेही कशासाठी? फक्त आपल्या 'स्वाभिमानासाठी'?
त्या दिवशी वर्गातल्या कुठल्याच मुलाने जेवण केलं नाही. रोहन रडत रडत गणेशजवळ गेला. त्याने आपला 'पनीर पराठ्याचा' डबा गणेशच्या समोर उघडला आणि म्हणाला,
"गणेश, तू माझा मित्र आहेस ना? मग आजपासून आपण एकाच ताटात जेवायचं."
त्या दिवशी गणेशने पोटभर जेवण केलं. पण खरी गोष्ट पुढे घडली.
     शाळा सुटल्यावर पाटील सर गुपचूप गणेशचा पाठलाग करत त्याच्या घरी गेले. त्यांनी पाहिलं, गणेश एका झोपडपट्टीतल्या घरात शिरला. पाटील सर खिडकीतून बघत होते. शाळेत मुलांना मिळणारा 'मिड-डे मील' (खिचडी) आज गणेशने खाल्ला नव्हता. त्याने ती खिचडी एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून घरी आणली होती. घरात शिरताच त्याने ती खिचडी ताटात काढली आणि आपल्या आजारी आईला भरवू लागला.
"आई, खाऊन घे. आज शाळेत खूप खिचडी मिळाली होती. माझं पोट भरलंय, ही तुझ्यासाठी आणली."
त्या ९ वर्षांच्या मुलाने स्वतः दिवसभर उपाशी राहून, 'हवा' खाऊन वेळ मारून नेली होती... कशासाठी?
तर शाळेत मिळणारी फुकटची खिचडी वाचवून आपल्या आईला खाऊ घालता यावी म्हणून. पाटील सरांना तिथे उभं राहणं सहन झालं नाही. ते तिथेच गल्लीतल्या एका कोपऱ्यात तोंड लपवून लहान मुलासारखे रडले. ज्याला ते शाळेत 'अ, ब, क, ड' शिकवत होते. त्याने आज त्यांना 'आयुष्य' कसं जगायचं हे शिकवलं होतं. आजही त्या शाळेत मधल्या सुट्टीत एक नियम आहे. सर्व मुले आपले डबे एकत्र उघडून, एकाच वर्तुळात बसून जेवतात. तिथे आता कोणाचाच डबा 'रिकामा' नसतो. पण त्या दिवशी त्या रिकाम्या डब्याने जी 'चव' शिकवली, ती जगातील कुठल्याही पंचपक्वान्नात नाही.
      तुम्ही जेवताना ताटात अन्न सोडता, तेव्हा एकदा त्या मुलाचा विचार करा ज्याच्याकडे ताट आहे, पण अन्न नाही. गरिबी माणसाला लवकर मोठं करते. आपल्या मुलांच्या डब्यात काय आहे यापेक्षा, त्यांच्या वर्गातल्या कोणाचा डबा रिकामा तर नाही ना, हे पालकांनी आणि शिक्षकांनी बघणं गरजेचं आहे.

2692. घड्याळ आणि वेळ

 दररोज सकाळी ७:३० वाजता, म्हातारा मार्टिन शहराच्या मध्यभागी असलेले त्याचे छोटेसे घड्याळाचे दुकान उघडत असे. वय ७८ वर्षांचे असतानाही त्याचे हात अजूनही सर्वात स्थिर होते. लोक म्हणायचे की तो जखमांवर उपचार करणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच घड्याळे दुरुस्त करतो - असीम संयमाने.
एके पावसाळी दुपारी, ३२ वर्षीय डॅनियल - ज्याचा चेहऱ्यावर कसलातरी ताण स्पष्टपणे दिसत होता - दुकानात आला. त्याने त्याचे महागडे घड्याळ काउंटरवर ठेवले, “मला हे तातडीने दुरुस्त करायचे आहे. हे आठवड्यातून दोन मिनिटे मागे जाते आणि माझ्या महत्त्वाच्या बैठका असतात. उद्यापर्यंत ते तयार करू शकाल का?”
मार्टिनने प्रथम डॅनियलकडे पाहिले, नंतर घड्याळाकडे.
“घड्याळे माणसांसारखी असतात,” तो शांतपणे म्हणाला. “जेव्हा तुम्ही त्यांना खूप घाई करता तेव्हा आत काहीतरी बिघडू लागते.”
डॅनियलने उतावीळपणे त्याच्या फोनकडे पाहिले. "ते एकदम व्यवस्थित चालायला हवं आहे."
“तीन दिवस लागतील,” मार्टिनने उत्तर दिले.
“अशक्य! उद्यापर्यंत तुम्ही ते तयार केले तर मी दुप्पट पैसे देईन.”
मार्टिनने डोके हलवले आणि घड्याळ ड्रॉवरमध्ये ठेवले. "तीन दिवसांनी परत ये. दरम्यान, हे घे."
त्याने डॅनियलला एक जुने ब्रॉंझचे पॉकेट घड्याळ दिले. डॅनियलने ते अनिच्छेने घेतले - त्याच्याकडे पर्याय नव्हता.
पुढील काही दिवसांत, डॅनियलला काहीतरी विचित्र जाणवले. ते जुने घड्याळ वेळ वेगळ्या पद्धतीने दाखवत असे: काही तास कायमचे टिकणारे वाटत होते, तर काही क्षणातच निघून जात असत. कंटाळवाण्या बैठकींमध्ये, काटे हलतच नव्हते. पण जेव्हा त्याने त्याच्या लहान मुलीसोबत जेवण केले तेव्हा वेळ अगदी भुर्रकन उडून गेला.
तिसऱ्या दिवशी, डॅनियल परत आला - उत्सुक आणि थोडा अस्वस्थ.
"हे घड्याळ तुटलेले आहे. अनियमित वेळ दाखवते."
मार्टिन हसला, "ते तुटलेले नाही. ते तुमच्या आत्म्याशी जुळलेले आहे, उपग्रहांशी नाही. ते तुम्ही कसे जगता यावरून वेळ मोजते, फक्त संख्येने नाही."
त्याने डॅनियलचे दुरुस्त केलेले घड्याळ परत दिले.
"जर तुम्ही तुमचं आयुष्य असंच फुकट घालवत राहिलात, तर हे पुन्हा बंद पडेल."
डॅनियलने गोंधळून दोन्ही घड्याळांकडे पाहिले...
“लोक दिवसातून शंभर वेळा वेळ तपासतात, पण त्यांच्याकडे वेळ असल्याचं कधीच दिसत नाही,” मार्टिन पुढे म्हणाला. “रिकाम्या मनगटांवर परिपूर्ण घड्याळे.”
“तर तुम्ही काय सुचवाल?” डॅनियलने विचारले, आता त्याला खरोखर रस वाटू लागला होता.
“समजून घ्या की दोन प्रकारचे वेळ असतात: निघून जाणारा वेळ आणि तुम्ही जगत असलेला वेळ. माझ्या वडिलांनी मला सांगितले: घड्याळ सेकंद मोजू शकते, परंतु क्षण फक्त तुमचे हृदय मोजू शकते.”
“दुरुस्तीसाठी मी तुमचे किती देणे लागतो?”
“घड्याळासाठी, पन्नास युरो. वेळेबद्दलच्या धड्यासाठी... तुम्ही वेगळ्या पद्धतीने जगून पैसे द्या.”
आठवड्यांनंतर डॅनियल परत आला आणि त्याने खिशातील घड्याळ काउंटरवर ठेवले.
“काही चूक आहे का? ते तुटले का?” मार्टिनने विचारले.
"नाही," डॅनियल हसला. "मला ते घड्याळ विकत घ्यायचे आहे. मी शहरातली माझी नोकरी सोडली. मी इथे माझा स्वतःचा व्यवसाय उघडत आहे. आता माझ्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी माझ्याकडे काही तासांचा वेळ आहे."
मार्टिनने उत्तर दिले, "सर्वात मौल्यवान घड्याळे विकली जात नाहीत. ती फक्त दिली जातात. ती जपून ठेवा. एके दिवशी तुम्हाला कळेल की जीवनाला तुमची गरज असताना तुम्ही तिथे असणे म्हणजे खरी नियमितता."
त्या हिवाळ्यात, मार्टिनचे निधन झाले. आपल्या मृत्युपत्रात, त्याने दुकान डॅनियलच्या नावावर केले आणि एक चिठ्ठी लिहिली.
"घड्याळे दुरुस्त करणे हे आयुष्य दुरुस्त करण्यापेक्षा कमी महत्त्वाचे आहे हे ज्याला कळले, त्याच्यासाठी…"
आता, जर तुम्ही त्या छोट्या दुकानाला भेट दिली तर तुम्हाला दारावर एक पाटी दिसेल, "आम्ही वेळ विकत नाही. आम्ही तुम्हाला तो कसा जगायचा, याची आठवण करून देतो."
कधीकधी आपल्याला आपले घड्याळ थांबण्याची आवश्यकता असते - जेणेकरून आपले हृदय पुन्हा धडधडू शकेल.
नमोस्तुते !.
एका इंग्रजी लघुकथेचे स्वैर भाषांतर.

2691. मोसादच्या घातक सूडाची कहाणी

 मोसादच्या घातक सूडाची कहाणी. देशावरील हल्ल्याचा सूड कसा घ्यायचा याचं ज्वलंत उदाहरण !!
➖➖➖➖➖
"आता समोरासमोर युद्ध झालेच पाहिजे,"
* "पाकिस्तानला त्याच्या घरात घुसून मारलंच पाहिजे."*
" पाकला जरब बसवायलाच हवी"
" अतिरेक्यांना ठेचून काढा"
या घोषणांनी सध्या वातावरण भरून गेले आहे. पण मंडळी, समोरासमोर युद्ध करणे इतकं सोपं असतं का हो ?
आज भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देश आहेत. युद्धामुळे किती जीवित व वित्तहानी होईल याची कल्पना करणेच कठीण आहे. पण म्हणून आपण गप्प बसायचं? फक्त निषेध करायचा?? नाही! सूड घेण्याचे आणखीही काही मार्ग असतात. पण बदला ही अशी मिठाई आहे जी शांतपणे वर्षानुवर्ष खातखात एन्जॉय करायची असते.अशा एका सुडाची कहाणी म्हणजे “ऑपरेशन रेथ ऑफ गॉड”.
आपल्या हिंदी सिनेमामध्ये एक डायलॉग असतो बघा, “चुन चुन के मारुंगा” हाच डायलॉग इस्राएलने खरा करून दाखवला होता. चला तर मग बघूयात काय होती ती घटना…
इसवी सन १९७२! स्थळ म्युनिक, जर्मनी. जगभरातील खेळाडू म्युनिक शहरात ऑलिम्पिक खेळांसाठी जमले होते. खेळांचे उदघाटन होऊन एक आठवडा लोटला होता आणि सर्व काही व्यवस्थित पार पडत होते. पण कुणालाच कल्पना नव्हती की एका घटनेमुळे ५ सप्टेंबर १९७२ ही तारीख खेळांच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाईल.
या दिवशी आठ आगंतुकांनी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये प्रवेश केला. त्यांनी ट्रॅक सूट घातला होता त्यामुळे सर्वांना वाटले की ते खेळाडूच आहेत. पण ते खेळाडू नसून ते होते खतरनाक दहशतवादी संघटना ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ चे सदस्य! ते सगळेजण  ‘ब्लॅक सप्टेंबर’ नावाच्या एका भयानक मिशनवर  होते.  हे अतिरेकी सरळ इस्राएलचे खेळाडू थांबलेल्या इमारतीत शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. दोन खेळाडू तिथेच मृत्युमुखी पडले व अकरा इस्रायली खेळाडू बंधक बनवले गेले. बाहेर ही बातमी फुटताच खळबळ माजली!
या अतिरेक्यांनी अशी मागणी केली की अकरा ओलीस खेळाडूंच्या बदल्यात इस्राएल तुरुंगात बंद असलेले २३४ पॅलेस्टिनी नागरिक सोडले जावेत. त्या वेळी पंतप्रधानपदी विराजमान होत्या कणखर आणि बुलंद व्यक्तिमत्वाच्या गोल्डा मायर. त्यांनी सरळसरळ ही मागणी “शक्य नाही” एवढ्या दोनच शब्दात धुडकावून लावली.  तोपर्यंत या घटनेची बातमी संपूर्ण जगात पसरली होती आणि सर्व जगाचे लक्ष गोल्डा मायर हे प्रकरण कसे हाताळतात याकडे लागले होते. एकीकडे मायर यांनी अतिरेक्यांना नकार कळवला, (आजही इस्राईलचं तेच धोरण आहे, “अतिरेक्यांशी वाटाघाटी कधीच नाही.”) मात्र दुसरीकडे जर्मनीशी संपर्क साधून म्युनिकमध्ये स्पेशल फोर्सेस पाठवण्यासाठी विनंती केली. परंतु ही विनंती जर्मनीने मान्य केली नाही.
अतिरेक्यांनी एक नवीन अट ठेवली की, आम्हाला विमान उपलब्ध करून द्या. ते खेळाडूंना घेऊन जाणार होते. ही मागणी मात्र जर्मनीने मान्य केली. या मागे असा हेतू होता की, इमारतीचा आसरा सोडून अतिरेकी विमानतळावर मोकळ्या जागी येतील आणि त्यांना तिथे मारणे सोपे जाईल. हा उद्देश ठेऊन विमानतळावर व्यूहरचना केली गेली. अनेक स्नायपर्स म्हणजे बंदुकीने लांबूनच अचूक वेध घेणारे शरपशूटर्स  तैनात केले गेले. स्नायपर्सनी एक एक अतिरेकी टिपायला सुरुवात करताच अतिरेकी भडकले आणि त्यांनी सगळ्या ओलीस खेळाडूंना गोळ्या घालून ठार केले. विमानतळावर सर्व खेळाडू आणि काही अतिरेकी संपले!
इथून सुरू झाला एका सूडनाट्याचा थरारक प्रवास. अतिरेकी संपले असले तरी हा प्लॅन बनवणारे, त्यांना माहिती आणि पैसे पुरवणारे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे या ऑपरेशनमध्ये हातभार लागलेले लोक जिवंत होते ना भाऊ.  इस्राएल हा देश हाताची घडी बांधून शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता, आणि आताही नाही. गोल्डा मायर यांनी तातडीने आपली सिक्रेट एजन्सी ‘मोसाद’ सोबत मिटिंग घेतली आणि तिथेच निर्णय झाला ब्लॅक सप्टेंबरचा बदला घेण्याचा! या ऑपरेशनचे नाव ठेवले गेले रेथ ऑफ गॉड अर्थात, देवाचा प्रकोप!
या घटनेनंतर अवघ्या दोनच दिवसात इस्रायली सैन्याने अक्षरशः आकाशातून आग ओकली.  सीरिया आणि लेबनॉन येथील पॅलेस्टाईन लिबरेशनच्या दहा ठिकाणांवर बॉम्बहल्ल्याचा वर्षाव केला.  तब्बल २०० अतिरेकी आणि नागरिकांना यमसदनी पाठवले.
पण एवढ्यावर थांबतो तो इस्राएल कसला? सूड आणखी बाकी होता.
परत एकदा गोल्डा मायर, मोसाद आणि इस्राएलचे सैन्याधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत असे ठरले की ब्लॅक सप्टेंबर संबंधित जे जे लोक आहेत त्यांना जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून शोधून काढायचं आणि खलास करायचं! या कामासाठी काही खास सिक्रेट एजंट निवडले गेले. या एजंट्सना ऑपरेशनची पूर्ण कल्पना दिली गेली. त्यांना घर सोडून कित्येक वर्षे दुसऱ्या देशात वेगळ्या नावाने राहून हे काम करायचे होते. पकडले गेले तर? तर जीव जाणार हे नक्कीच!
मंडळी, या लोकांचे देशप्रेम बघा.  आपल्या देशासाठी प्राण अर्पण करण्यास सैनिक सदैव तत्पर असतात याचेच हे उदाहरण आहे. भारत असो वा इस्राएल, ज्या देशात असे वीर सैनिक आहेत त्या देशातील सामान्य नागरिक म्हणूनच सुखाने जगू शकतात. इथून थोडीथोडकी नाहीतर पुढची २० वर्षं अनेक देशांत ‘रेथ ऑफ गॉड’ सुरूच होते. पहिला नंबर लागला तो वेल जवेटर आणि महमूद हमशारी यांचा.
सिक्रेट एजंटसनी त्यांना अस्मान दाखवले. यामुळे पॅलेस्टाईन लिबरेशनमध्ये खळबळ माजली. दुसरा नंबर लागला सायप्रस देशामध्ये हुसेन अल बशीर याचा. हा हुसेन हॉटेलमधल्या खोलीत थांबला असताना सिक्रेट एजंटनी याच्या बेडखाली बॉम्ब लावला होता. हुसेन बेडवर झोपल्याक्षणी बॉम्बचा धमाका झाला. नंतर बैरुतच्या प्रोफेसर बासिल अल कुबेसीला गोळ्या घालण्यात आल्या. हा बासिल अतिरेक्यांना शस्त्र पुरवीत असे. मोसादच्या दोन एजंट्सनी बारा गोळ्या याच्या शरीरात घुसवल्या.
आता पुढचे टारगेट होते लेबनॉनमध्ये कडक सुरक्षेत राहत असलेल्या तीन व्यक्ती. त्यांच्यापर्यंत पोहोचणे फारच अवघड काम होते म्हणून यांच्यासाठी स्पेशल रणनीती आखली गेली. या ऑपरेशनचे नाव ठेवले ‘स्प्रिंग ऑफ युथ’. या कामासाठी काही खास कमांडो लेबनॉनमध्ये समुद्रमार्गे दाखल झाले. मोसादच्या सिक्रेट एजंट्सनी त्यांना टार्गेटच्या जवळ नेले. हे कमांडो स्त्रियांच्या वेशात असल्याने कुणाला जास्त संशय आला नाही. पूर्ण तयारीने आलेल्या कमांडोजनी इमारतीवर हल्ला चढवला आणि ऑपरेशन फत्ते करून ते आलेल्या मार्गे परत गेले सुद्धा
या हल्ल्यानंतर लगेच आणखी तीन धमाके केले गेले. सायप्रसमध्ये जाइद मुसाचीला बॉम्बने उडवला, तसेच ब्लॅक सप्टेंबरमध्ये सामील असलेले दोन अल्पवयीन युवक कारहल्ल्यात कायमचे जखमी केले गेले.
जगभरात वेचून वेचून अतिरेकी मारले जात होते. पण हा सुडाचा प्रवास थांबणार होता काय? नाही! हा खुनी खेळ तोपर्यंत थांबणार नव्हता जोपर्यंत मोसादने बनवलेल्या लिस्टमधले प्रत्येक नाव या जगातून कायमचे नाहीसे होणार नव्हते.
२८ जून १९७३ला मोहम्मद बाऊदियाला कारसकट उडवले,
१५ डिसेंबर ७३ ला दोन पॅलेस्टिनी अली सालेम आणि अब्दुल इब्राहिम यांना सायप्रस मध्ये गोळ्या घातल्या,
१७ जून १९८२ ला पॅलेस्टाईन लिबरेशनचे आणखी दोन जेष्ठ सदस्य इटलीमध्ये मारले गेले,
२३ जुलै ८२ मध्ये अधिकारी फादल दानी ची पॅरिस येथे हत्या केली गेली,
२१ ऑगस्ट ८३ ला अथेन्स येथे ममून मराएल खलास झाला,
१० जून ८६ ग्रीसमध्ये लिबरेशनचा महासचिव खालिद अहमद,
ऑक्टोबर ८६मध्ये मुंजार अबू गजाला,
१४ फेब्रुवारी ८८ला आणखी दोन पॅलेस्टिनी.
हळू हळू लिस्टमधील एक एक नाव कमी होत होते.
आता नंबर होता ब्लॅक सप्टेंबरचा मास्टरमाइंड अली हसन सालामेह याचा ! या अली हसनला मोसादने एक कोडनेम दिले होते… द रेड प्रिन्स ! आपला शोध मोसाद घेत आहे याची पूर्ण कल्पना अली हसनला होती म्हणून त्याने स्वतःच्या सुरक्षेचा कडक बंदोबस्त करून ठेवला होता. याला शोधण्यात मोसादला तीन वेळा यश आले. एकदा स्वित्झर्लंड तर दुसऱ्यांदा स्पेनमध्ये अली वर हल्ला केला गेला मात्र तो त्यातून वाचला होता. तिसऱ्यांदा मात्र वाचू शकला नाही. बैरुतमध्ये कार धमक्यात शेवटी याला आकाशात पाठवण्यात मोसादला यश आलेच !
मंडळी, ऑपरेशन रेथ ऑफ गॉड जवळपास वीस वर्ष चालले. कित्येक सिक्रेट एजंट्सनी आपल्या ध्येयासाठी आणि देशप्रेमापोटी आपले घर दार सोडून फक्त मिशनकडे लक्ष दिले. ब्लॅक सप्टेंबर संबंधित प्रत्येक व्यक्तीला जगाच्या पाठीवर जिथे असेल तिथे शोधून ठार मारले गेले. पन्नासच्या वर पॅलेस्टिनी अतिरेकी गतप्राण झाले.
दहशतवादाचा सूड असाही घेतला जातो. भारतालाही अतिरेकी आणि त्यांच्या छावण्यांना जमीनदोस्त करण्याच्या अशाच मिशन्सची आवश्यकता आहे. पण सूड का घ्यायचा या बद्दल गोल्डा मायरचे विचार बहुमोल आहेत. “केवळ सूडासाठी सूड नव्हे, तर आम्ही देखील सशक्त आहोत हा संदेश पोहोचवण्यासाठी सूड घ्यावा लागतो.”
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
जिंकू किंवा मरू....
 
मंडळी कसा वाटला लेख? आवडला असेल तर शेअर करा.
साभार, भारत माता की जय.
✨पुणेकरांनो, महत्त्वाची माहिती नक्कीच आपल्या सर्व whatsapp ग्रुप वर सुद्धा फॉरवर्ड करा.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...