एका सेशनमधे ट्रेनरनं शिकवलेला धडा शेअर करतेय.
एका दुकानात कॅश काऊंटर वर एक मुलगी काम करत होती,एक महिला दुकानातला काचेचा एक मग घेऊन बील करण्यासाठी आली. त्या मगवर सूट मिळेल का?असं तिनं विचारलं,
त्या मुलीनं डिटेल्स चेक केले आणि कोणतेही डिस्काउंट नाही असं सांगितलं,यावर ती महिला म्हणाली की,
"या मगला क्रॅक आहे म्हणजे तडा आहे. फक्त ती समोरच्या दिशेनं दिसत नाहीये म्हणून मला हा मग हवाय पण याची मूळ किंमत कमी करून द्या."
त्या मुलींनं तो मग चेक केला, छोटीशी तडा होती पण ती दिसतच नव्हती आणि वर्णन केल्याप्रमाणे तर त्या मग मधे कोणतेच दोष नव्हते. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तो मग सहज खरेदी केला असता इतक्या वर्षांच्या अनुभवावरून त्या मुलीला हे चांगलंच माहिती होतं पण कस्टमरशी नम्रतेनं बोलायला हवं हा विचार करुन ती मुलगी म्हणाली की,
"मी असाच दुसरा मग तुम्हाला देते, तो घ्या"
यासाठी ती महिला तयार नव्हती. कारण तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तिला तोच मग हवा होता. हळूहळू तिनं त्यामध्ये आणखी दोष शोधून दाखवायला सुरुवात केली,
"याच्यावरचा रंग सुद्धा उडालेला आहे कोण घेणार? हा मग मी घेतेय तर किंमत कमी करून द्या ना !"
पुढे त्या मुलीनं मॅनेजरच्या सांगण्यावरून तो मग परत जागच्या जागी ठेवून दिला. त्या महिलेला नम्रतेनं नकार दिला,ती महिला चरफडत निघून गेली.
या उदाहरणावरून मानवी मनाचं विश्लेषण करताना ट्रेनर म्हणाल्या की, या जगामध्ये अनेकांना तुम्ही त्यांच्या फायद्यासाठी हवे असता पण त्यांना आतून माहीत असतं की, त्यांच्यापेक्षा तुम्ही निश्चितच चांगल्या दर्जाचे आहात थोडक्यात ऊर्जेच्या दृष्टीनं ते तुम्हाला afford करु शकत नाहीत. अशावेळी तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणून स्वस्त करून ते तुमचा उपयोग करू शकतील असं त्यांना वाटतं.
जसं दुकानातल्या महिलेला महाग वाटणारा मग खरेदी करायचा होता पण किंमत कमी केली तरच ती खरेदी करू शकत होती. यासाठी तिने मग मधे दोष शोधून त्याची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला. एखादी व्यक्ती तुमच्यामध्ये अशा असंख्य उणिवा आणि दोष पाहत असेल तर लगेच तेच खरं समजून, स्वतःला धिक्कारण्याची, वाईट वाटून दुःखी होण्याची गरज नाही. वरील उदाहरण लक्षात ठेवा आणि समोरच्याला आपल्याकडून काय हवं आहे? याचा विचार करा.
जगात इतर अनेक दुकानं आणि मग उपलब्ध असताना, दुकान सोडून न जाता हाच दोष असलेला मग त्या महिलेला का हवा होता? याचा विचार करा.
दोष जास्त अधोरेखित होत असतील, चुका आणि उणिवा जास्त मोजल्या जात असतील तर ब-याचदा तुमचं मनोधैर्य कमी करुन तुमची किंमत कमी करुन हेतू साध्य करता येईल, असा गैरसमज बाळगणारेही या जगात असतातच !
स्वतःला ओळखा आणि त्यावर ठाम रहा.
© कांचन दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा