शनिवार, २३ मे, २०२६

2899. योग

     त्याचं काही केल्या लग्न जमेना, लग्न तर करावसं वाटतं होतं पण जमत नव्हतं. प्रत्येक वेळी नकारच येत होता, असं नाही...पण जमेचना.
   दिसायला छान उंचापुरा, शिकला-सवरलेला, व्यवसाय उत्तम स्थितीत चाललेला, उच्चभ्रू वस्तीत स्वत:चं घर, घराशी दोन चार चाकी उभ्या. आणखी संसाराला काय लागतं?
पण तरी योग येत नव्हता. वय उलटून चाललेलं. तसा तो समंजस होता. पण, ‘बाकी सगळं माझ्याकडे आहे, मग लग्न का नाही?’ या हट्टी प्रश्नापुढं त्याचा समंजसपणा कमी पडत होता.
म्हणून तो एकदा ज्योतिषाकडे गेला. पत्रिका बघून ते म्हणाले, “गेल्या जन्मात तुम्ही जिला फसवलंत, तिनं तुमच्या लग्नाच्या दिवशी आत्महत्या केली होती. आता तिनं पुन्हा जन्म स्विकारल्याशिवाय तुमची सुटका नाही.”
हे ऐकून त्याला गम्मत वाटली. मग त्याला छंदच लागला. दिसला ज्योतिषी की दाखव पत्रिका असं होऊन गेलं. एकदा ज्ञानी पुरुषासमोर तो अपघातानं पोहोचला. त्यानं अधिकारवाणीनं त्याची कानउघाडणी केली आणि तेच कारण सांगितलं, जे आधी एकानं सांगितलं होतं.
     त्यानं खूप विचार केला आणि आपल्या गतजन्मीच्या प्रेयसीला कळवळून म्हणाला, “गेल्या जन्माचं तर मला काही आठवत नाही. तरी मी तुझी मनापासून क्षमा मागतो. पण मी काय म्हणतो, काळ हा सर्व दुःखावर औषध आहे आणि आपण दोन्ही अर्थानं काळ पार केलाय. मी तर दुसरा जन्मही घेतलाय आणि तू तिथंच अडकून आहेस? मग ही कोंडी सुटायची कशी?
“माझं ऐक, तू आता माझ्याच पोटी जन्म घे. मागच्या जन्मीचं सोड. प्रियकर म्हणून मी नालायक ठरलो असेन. पण मुलगी म्हणून पोटी आलीस तर बघ. बाप म्हणून मी तुला किती सुखात ठेवेन ! देवदयेनं सोन्याचा चमचा तुझ्या तोंडी देऊ शकेन, अशी आपली परिस्थिती आहे.”
त्यानं नक्की कुणाला प्रार्थना केली आणि ती कुणी ऐकली देव जाणे. पण ती फळली. जे गेल्या पंधरा वर्षात जमलं नाही ते पंधरा दिवसात जमलं !
जी मुलगी सगळ्यात आधी पाहिली होती, तीच पुन्हा संपर्कात आली. अजून तशीच साधी, सोज्वळ, सुंदर. तेव्हा तिच्या पत्रिकेत दोष होता, म्हणून ती नाकारली गेली होती. 
त्यानं विचार केला, आता या वयात आणखी कसली अपेक्षा ठेवायची? आहे ते आयुष्य मजेत जगायचं.
तो परत त्या ज्योतिषाकडे गेला, ते म्हणाले, “तुला लग्न करायची दुर्दम्य इच्छा आहे ना? मग उरकून घे. आता पत्रिका बघत बसू नकोस.”
मग त्यानं लग्न केलं. दोघेही खूप सुखात होते. पंधरा वर्ष वाया घालवल्याची हूरहूर दोघाना जाणवत होती, इतके ते एकरूप झाले.
पण तरी ती म्हणायची, “बाळा शिवाय काय आहे आयुष्यात? जन्मभर शेजार-पाजार्‍यांची मुलं खेळवली. पण माझ्याच पोटी मूल नाही? हा कस्ला नतद्रष्ट योग!”
थोडी प्रतिक्षा करावी लागली. पण एकदा तिला चाहूल लागली. तिला दिवस गेले, डॉक्टर म्हणाले, 
“वयाचं मनावर घेऊ नका. सगळं उत्तम आहे.”
डॉक्टर सहज म्हणाले, “बाळानंच तुमच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलंय. ते येईल.”
त्याला एकदम त्याच्या प्रेयसीला केलेली प्रामाणिक प्रार्थना, विनवणी जे काही होतं ते आठवलं. नक्की कुणाला प्रार्थना केली? कोणाला ये म्हटलं? कोण यायला तयार झालं? सगळंच अगम्य अकालनीय !
मी तिला फसवलं, म्हणून तिनं आत्महत्या केली; तरी तिचा माझ्यावर अजून इतका विश्वास की माझ्या सांगण्यावरून ती पुन्हा जन्म घेण्याची रिस्क उचलायला तयार झाली?
म्हटलं तर मनाचे खेळ. पण जी अस्तित्वातच नाही, तिच्याबद्दल त्याला विलक्षण अनुकंपा वाटली, आदर वाटला. तिनं जन्म घ्यायच्या आधीच जणू त्यांच्या नात्याचा आलेख तयार होता.
यथावकाश त्यांना मुलगीच झाली. मुलीची पत्रिका बनवायला ते ज्योतिषाकडे गेले. मुलीसोबत तिच्या आईची पत्रिका बघताना ते चकीत झाले.
त्या आईच्या पोटी अपत्य सुखाचा योगच नव्हता…!!!

- चंद्रशेखर गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...