शनिवार, २३ मे, २०२६

2893. अन्यायाचा प्रतिकार

 त्या दिवशी मी स्टाफरूममध्ये वह्या तपासत बसले होते. तेवढ्यात कालिंदी मला शोधत आली. 
 मला पाहून ती म्हणाली “ इथे आहेस होय? मी तुला वर्गांमध्ये शोधत होते.” मी म्हटलं “ हा तास मोकळा असतो माझ्यासाठी. इथे नसणार तर दुसरीकडे कुठे असणार?”
 ती म्हणाली “ तुझं तपासण्याचं काम बाजूला ठेव आणि वाचनालयात जाऊन इरावतीला भेटून ये. तू सकाळपासून भेटली का तिला?”
 मी उत्तरले “ नाही गं. सकाळपासून वाचनालयात जायला वेळच मिळाला नाही. 
  मी विचारले “तिला का भेटायला सांगत आहेस? काही समस्या?”
 ती म्हणाली “ तसंच काहीतरी. ती कमालीची अस्वस्थ वाटत आहे. हा, हूं शिवाय काही बोलतच नाही. डोळे तर असे भरून आल्यासारखे वाटत आहेत की जास्त काही बोललं तर झरझर  अश्रू वाहतील. तूच हाताळू शकशील तिची मन:स्थिती.”
मला खूपच नवल वाटलं. असं काय बिनसले असणार? घरी की शाळेत? मुळात इरावती सहनशील, हंसतमुख व खेळकर स्वभावाची होती.  मी झपझप वाचनालयाकडे निघाले. वाचनालयात पाऊल टाकताच वृंदाने नि:श्वास टाकला. जणू तिला म्हणायचे होते की बरं झालं आलीस. वृंदाने  इरावती कुठे बसली होती ते हातानेच निर्देश करून सांगितले. ती एका कपाटाच्या पाठीमागे एका छोट्या टेबलापाशी बसून रजिस्टरमध्ये नोंदी करत होती. मी तिच्याजवळ गेले व तिला हाक मारली तसं दचकून तिने मान वर केली. तिची अवस्था बघून मला धक्काच बसला.  तिचे डोळे अपमान, निराशा आणि दु: खाने तारवटले होते. तिने तिचे ओठ घट्ट मिटले होते. भावनांचा आवेग तिने मोठ्या मुष्किलीने नियंत्रणात ठेवला होता.  तिची अवस्था बघून मला खूप वाईट वाटले. पण त्या वेळी काय झालं हे विचारणे चूक ठरले असते. मी तिला म्हटले “ इरावती, शाळा सुटली की आज तू माझ्याबरोबर घरी येणार आहेस.” 
तिने नाही म्हणायचा निष्फळ प्रयत्न केला पण  मी थोडी ना तिचं ऐकणार होते. मी तिला म्हटलं “ मी दोन क्रमांकाच्या फाटकातून बाहेर पडते. तू फाटकापाशी माझी वाट बघ. नाहीतर असं कर  माझा सायकलरिक्शावाला चंदर तिथे थांबलेलाच असेल. तू आपली रिक्शात बसून घे. मी येतेच शक्य तितक्या लवकर.”
शाळा सुटल्याचा घंटानाद होताच मी फाटकाच्या रोखाने निघाले. मनांत म्हटलं आजतरी काही कामासाठी कुणी थांबवू नये. मी फाटकाजवळ येताच माझी नजर  इरावतीला शोधू लागली. ती कुठेच दिसेना म्हणून मी निराश झाले पण तेवढ्यात चंदर माझ्यासमोर येऊन म्हणाला की मॅडम अगोदरच रिक्शात बसल्यात. मी जाऊन रिक्शात बसले. इरावती खाली मान घालून विचारात गढून गेली होती. मी चुपचाप बसले. नेहमी घरी पोहोचेपर्यंत चंदरची टकळी चालत असे. आजूबाजूला झालेल्या सर्व घटनांची बित्तंबात तो माझ्यापर्यंत पोहोचवत असे. पण तो काही न बोलता रिक्शा चालवत होता. मामला गंभीर आहे त्याने ओळखले होते. घरी पोहोचताच इरावतीने स्व:ला सोफ्यावर झोकून दिले व हमसाहमशी रडू लागली. येवढा वेळ दाबून ठेवलेले अश्रूंचे लोट वाहू लागले. मी तिच्याजवळ बसले व तिच्या पाठीवर हात फिरवू लागले. त्या क्षणी तिला काही विचारणं चुकीचं होतं हे मी ओळखून होते. भावनांचा आवेग शांत होणे आवश्यक होते. मी तिला त्याच अवस्थेत सोडून जेवणाचं टेबल लावायला गेले. मी परत तिच्याजवळ आले तेव्हा ती थोडीफार शांत झाली होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाले
”इरा, चल. हात पाय धुवून घे. भूक लागली असेल नं?”
          ती आज्ञाधारकपणे उठली व न्हाणीघराकडे गेली. टेबलापाशी आली तेव्हा ती बरीच सावरलेली वाटली.  आम्ही जेवायला बसलो. मी वाढत होते आणि ती भराभर जेवत होती. तिने काल रात्रीपासून काही खाल्ले नसणार हे माझ्या लक्षात आले. जेवणं झाली तसं मी तिला म्हटलं 
“ तू शयनगृहात जाऊन आराम कर. मी आटपून येतेच.”
         खोलीत येऊन पहाते तर इरावतीला गाढ झोप लागली होती. मानसिक थकवा आणि पोटात अन्न नाही. मी आरामखुर्चीत बसले. माझ्या मनांत विचारांचं काहूर माजलं होतं. मी मनात म्हटलं 
“ शाळेत नाही तर घरी काही तरी गोंधळ झाला असणार. ती व तिचा नवरा एकमेकाशी प्रेमाने व समंजसपणे वागत हे मी जाणून होते. शिवाय इरावती साध्यासुध्या कारणावरून डोक्यात राख घालणारी नव्हती. मग नक्की काय झालं की ही सुशिक्षित, स्वत:च्या पायावर उभी असलेली, दोन मुलांची आई कोलमडून गेली.”
         ती शाळेत येऊन अवघे सहा महिने झाले होते. शिक्षिकेची कुठलीच जागा रिकामी नसल्यामुळे तिने शाळेच्या वाचनालयात मदतनीस म्हणून नोकरी स्वीकारली होती. कार्यकारिणी मंडळाने शिक्षिकेची जागा निर्माण होताच तिचा विचार केल्या जाईल असे आश्वासन दिले होते. काही दिवसातच इरावतीने तिच्या कामाची छाप उमटवली. ती मेहनती व कामात तत्पर होती. सर्वांशी मिळतं घेण्याची कला तिच्याजवळ होती. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तिने अनेक योजना आखल्या होत्या. तिचं सांसारिक आयुष्य देखील व्यवस्थित असलं पाहिजे. विशालबद्दल म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल ती नेहमी सकारात्मक बोलत असे. एकदा ती ओझरतं बोलून गेली होती की तिने आई वडिलांची नाराजी पत्करून लग्न केलं होतं व तिचा निर्णय बरोबर होता हे त्यांना पटत नव्हतं. तिने स्पष्टपणे काही सांगितल्याशिवाय तिला काही मदत करता नसती आली हे मला उमजले. साडेचारच्या सुमारास मी तिला उठवलं व म्हणाले 
“ इरावती, चल उठ. चहा टाकते.
चहाचा ट्रे टेबलावर ठेवत मी तिच्याकडे नजर टाकली. ती बरीच तरतरीत दिसत होती. मी विषयाला हात घालायचा ठरवलं. मी तिला म्हणाले 
“ इरावती, घरी काही समस्या उत्पन्न झाली आहे हे मी ओळखून आहे. स्वत:शीच कुढत राहिलीस तर ते कुणाच्याच फायद्याचं नाही. मोकळेपणी मला सांगितलंस तर काही मार्ग निघेल. तुझ्या पदरात दोन मुलं आहेत हे कदापिही विसरू नकोस.”
तिने मान डोलावली व म्हणाली “ हो गं. मला नाही सहन होत हा रोजचा मन:स्ताप. कीती वाटतं की सर्व काही पूर्वीसारखं व्हावं. मला हा गुंता सोडवायला तुझी मदत हवी आहे.”
मी तिला म्हटलं “ तू तुझं गाऱ्हाणं सांगणार असशील तर मार्ग सापडणं कठीण जाईल पण तू जर एका त्रयस्थाच्या नजरेतून जे घडले ते सांगितले तर कदाचित पुढची वाट दिसेल. टाळी कधीच एका बाजूने वाजत नाही.”
ती म्हणाली “ आलं लक्षात माझ्या तुला काय म्हणायचे आहे. माझा अंदाज आहे की विशालचं डोकं फिरायला मी नाही पण माझ्या घरचं कोणीतरी कारणीभूत आहे. नंतर सर्वच बिनसत गेलं.”
 ती म्हणाली “ दोन महिने झाले, माझी सासू आमच्याकडे येऊन. या पूर्वीही त्या आमच्याकडे आलेल्या आहेत. त्या वेळेस आल्या तेव्हा माझ्याशी खूप प्रेमाने वागायच्या. घरकामात मदत करायच्या. विशालजवळ माझं खूप कौतुक करायच्या.”
ती पुढे म्हणाली “या वेळेस आल्या तर त्यांचं माझ्याशी वागणं संपूर्णत: बदलेलं. आल्या दिवसापासून मला घालून पाडून बोलतात. माझी कुठलीच गोष्ट त्यांना पसंत पडत नाही. सतत घरात धुसफुस. मुलांना पंण हिडिस फिडिस करतात. मागे आल्या तर मुलांचं कोण कौतुक! 
आता माझ्या लक्षात येत आहे की पहिले आठ दिवस विशालला पण आईचं वागणं खटकायचं. तो मला त्यांचं बोलणं मनावर घेऊ नको असं समजवायचा. मध्यंतरी दोन दिवस तो बाहेरगावी गेला होता. तेथून आल्यापासून त्याने पण मला वेठीला धरायला सुरवात केली. गेले कित्येक दिवस  सासू आणि नवरा दोघंही मला सळो की पळो करून सोडताहेत. माझी चूक काय हेच समजत नाही.”
ती पुढे म्हणाली “ येवढंच नाही. विशालच्या बहिणीच्या नवऱ्याची इथल्या कारखान्यात दोन वर्षांसाठी बदली झालीय.ते दिल्लीला एकत्र कुटुंबात राहतात म्हणून मुलांना तिथेच ठेवलंय. हायस्कूल मध्ये शिकणारी मुलं. त्यांची शाळा  न बदललेली बरी. मुलांना बघायला आजी आजोबा, काका काकी आहेत. नवरा बायको आलेत. कारखान्याच्या अतिथिगृहात रहात आहेत. दर शनिवारी दोघांचा मुक्काम आमच्याकडे. त्याला पण माझी ना नाही. पण सासूबाई वेगळाच खेळ खेळताहेत.
         दर शनिवार रविवार मुलीचं माहेरपण मी करायचं. नणंदबाई नुसत्या बसून राहतात आणि तऱ्हेतऱ्हेची फर्माईश करतात. त्यांच्या नवऱ्याला ऊठसुठ दूधाचा चहा लागतो. इकडे स्वयंपाक, तिकडे चहा. माझी येवढी तिरपीट उडते. रविवारी संध्याकाळी ते दोघं परततात. त्यांच्याबरोबर तीन चार पदार्थ पाठवायला लागतात कारण ते दोघं अतिथिगृहात राहतात. माझा प्रत्येक शनिवार, रविवार स्वयंपाकघरात जातो. मुलांकडे बघायला वेळ मिळत नाही. बाहेर जाणं तर बंदच. नणंदबाई फार चालाख आहेत. दर वेळेस परत जातांना माझी एखादी वस्तू आवडली म्हणून उचलून घेऊन जातात. मागच्या रविवारी माझी सिल्कची साडी आवडली म्हणून घेऊन गेल्या. त्याच्या अगोदरच्या रविवारी  माझं ब्रेसलेट त्यांच्या पसंतीस उतरलं. सर्व मला त्रास देण्यासाठी करताहेत. त्या घरच्या खूप श्रीमंत आहेत. माझ्या वस्तूंची त्यांना काय किंमत?
        सासूबाई त्यांना प्रोत्साहन देतात. त्यांचे म्हणणे की माहेरवाशीणीचं मन कसं मोडायचं. त्यांच्या लग्नाला सतरा अठरा वर्ष झाली असतील. आतापर्यंत माहेरवाशीण? तेही धाकट्या भावाकडे येऊन? दर शनिवार, रविवार धिंगाणा घालायचा भावाच्या संसारात? जे पटत नाही ते सहन करायचा खूप त्रास होतो. कुटुंबातील सर्वांनी एकत्र यावं, एकमेकाच्या सहवासाचा आनंद लुटावा हे खरं पण एक दुसऱ्याची सोय सुद्धा बघायला हवी. त्यात विशाल माझ्यावर का रागावून बसला आहे हे समजत नाही. मला समजून घेणारा, माझ्या भावना जपणारा ,कोमल मनाचा  माझा मित्र, सखा, जोडीदार ज्याच्या विश्वासावर मी माझ्या आईवडिलांची नाराजी पत्करली तो असा कसा दुरावला?
            काल तर कळस झाला. रविवारी सायंकाळी नणंद आणि तिचा नवरा परत जातात. मी त्यांच्याबरोबर द्यायचा डबा तयार केला. तेवढ्यात नणंदेच्या नवऱ्याला कुणाचा फोन आला.  फोनवर बोलून झालं तसं ते विशालला म्हणाले की चल जरा बाहेर जाऊन येऊ. ते गेले तर त्यांचा परत येण्याचा पत्ता नाही. मुलांची जेवणं झाली व त्यांना झोपवले. नऊ वाजले तरी परत आले नाही. शेवटी मी सासूला आणि नणंदेला जेवण वाढलं. मी त्या दोघांची वाट पहात बसले. अकरा वाजले. त्या दोघी झोपी गेल्या. मी न जेवता ताटकळत बसले.
        रात्री दोन वाजता ते दोघे उगवले. त्यांना पाहून मला धक्काच बसला. दोघही दारू पिऊन तर्र. एकमेकाला कसेबसे सांभाळत काहीतरी अर्थहीन बरळत घरात शिरले व पुढच्या खोलीतल्या गालिच्यावर पसरले.  सारी रात्र मी रडून काढली. विशाल असं काही करेल याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. मदिरा, धूम्रपान या बद्दल त्याला आकर्षण नव्हतं असं तो नेहमीच म्हणत असे. मग आज तो या अधोगतिला कसा गेला? त्यांच्या संसाराचं कीती सुंदर चित्र रंगवलं होतं त्या दोघांनी ! या पुढे आयुष्याची हीच तऱ्हा असणार आहे की काय अशी भीती वाटते.”
इरा स्वत:मधे दंग होऊन बोलत राहिली. मी तिच्या समोर बसले आहे हे बहुदा ती विसरून गेली होती. माझ्यासमोर तिच्या विफलतेचं चित्र उभं राहिले. तिला नक्की काय सल्ला द्यायचा हे थोडंफार लक्षात आलं.
मी तिला म्हटले “ इरावती, नको त्रास करून घेऊ. झालंय काय की सर्वांनी त्यांच्या मनात काही कारणास्तव असलेला राग तुझ्यावर काढायचा ठरवलं आहे. तूच का कारण तू प्रत्युत्तर न देतां सहन करत होतीस. तू जर सुरवातीलाच अरेला का रे केलं असतंस तर कदाचित त्यांच्या रागाला खीळ बसली असती. पण अजुनही उशीर झालेला नाही.
        उघड उघड तुझ्या सासूला एकटेपणाचा त्रास होत असणार. बरोबरची प्रेमाची माणसं देवाघरी जातात. मुलं त्यांच्या संसारात रममाण होतात. शरीर साथ देत नाही. स्वत:ला सांभाळता आलं नाही तर कोणावर तरी राग काढतात. विशालच्या बाबतीत मी म्हणेन की त्याच्या कामात काही अडचणी येत असल्यामुळे तो निराश झाला असला पाहिजे. कोणीतरी त्याला त्रास देत असला पाहिजे. तुझ्याजवळ मन मोकळं करण्याऐवजी, तुझ्यावर रागावण्याचा चुकीचा मार्ग त्याने निवडला. जीवनात असे प्रसंग येतात. सर्व नेहेमीच सुरळीत चालत नाही.
तुझ्या नणंदेबद्दल मी म्हणेन की तिच्या मनात असूया निर्माण झाली असणार. “
इरावती म्हणाली “ माझ्याबद्दल असूया कारणच काय? अगं, खूप धनाढ्य सासर आहे तिचं.”
मी तिला म्हणाले “ पैशाने सर्व काही विकत घेता नाही हे मी तुला सांगायला पाहिजे का? तुझ्याजवळ खूप काही असलं पाहिजे जे तिला मिळालं नाही.
इरावतीने विचारले “ ते काय?”
 मी म्हणाले “ तू सुस्वरूप, सुशिक्षित आहेस. स्वत:च्या पायावर उभी आहेस. विशाल तुला जपतो. तुमच्या दोघांमध्ये जे सामंजस्य आहे ते तिच्यात व तिच्या नवऱ्यात नसेल.”
 मी पुढे म्हणाले “ कुणाचे विचारांचे घोडे कुठे धावतील हे आपण सांगू शकत नाही पण आपल्या विचाऱांच्या घोड्यांवर नियंत्रण ठेवतां आलं पाहिजे. अशी हतबल होऊ नकोस. अन्यायाचा प्रतिकार करायला शीक. किंबहुना तो एकच मार्ग आहे. तुझ्याभोवती तुला सुखासमाधानंचं वातावरण हवं असेल तर ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला लागतील. तीर मारायचा पण वाया जाऊ द्यायचा नाही. तो असा पण मारायचा नाही की जखम फार खोल होईल. तो असा मारायचा की शत्रुपक्षाला योग्य तो संदेश मिळेल.”
 इरावती हसून म्हणाली “ अन्यायाचा प्रतिकार करावाच लागणार आणि तो मी करेन. आता निघायला हवं. तुझ्याकडे आले खूप बरं वाटलं. नाहीतर मला आज घरी जावसंच वाटत नव्हतं”
तिला बसमध्ये बसवून मी घरी परतले तर वाटेत शाळेचा राखणदार समोर आला.
तो म्हणाला “ बाई. इरावतीबाईंना  बसमध्ये बसवून परत जाताहात का?”
मी म्हटले “ तुला कसं माहित?”
तो म्हणाला “ मी बघितलं होतं तुम्हा दोघींना जातांना. नंतर त्या बाईंचे साहेब आले होते त्यांना शोधायला. दोघंजण होते.”
मी विचारलं “ मग ते ॲाफिसमध्ये गेले की काय?” तो म्हणाला “ मी त्यांना ॲाफिसमध्ये जाऊ दिले नाही. सांगितलं आत महत्वाची मिटींग चालू आहे. कोणाला आत सोडायचे नाही. ते तुमच्या घराचा पत्ता मागत होते. पण मी म्हटलं तुम्ही कुठे राहता ते मला माहित नाही. नंतर ते परत गेले”
           दर दोन दिवसांनी माझ्याकडे येणारा राखणदार चांगलाच चालाख होता. दोन दिवसांनी मी इरावतीला भेटायला गेले. ती पूर्वीसारखी हसतमुख वाटली.
 मला पाहताच ती म्हणाली “ तुझ्याचकडे येणार होते. आज मी शाळा सुटली की तुझ्याबरोबर घरी येणार आहे. खूप काही सांगायचे आहे” आम्ही दोघी रिक्शात बसलो. चंदरने एकदा मागे वळून पाहिले आणि त्याने नेहमीची टकळी सुरु केली.  जेवता जेवता इरावती म्हणाली “ त्या दिवशी मी घरी गेले. बघते तर  टी व्हीवरच्या मालिकेप्रमाणे विशाल पुढे व घरातले बाकी लोक त्याच्या पाठीमागे उभे राहून माझ्याकडे रागाने बघत होते.
 विशाल रागाने म्हणाला “ कुठे होतीस येवढा वेळ? ही काय परतायची वेळ झाली?”
 मी शांतपणे म्हटले “ काल रात्री दोन वाजता दारू पिऊन तर्र होऊन परत येणं तुझ्यासाठी बरोबर होतं? ते जर बरोबर असेल मी काही तास मैत्रीणीकडे घालवले ते बरोबरच आहे.”
          मी सर्वांनाच तीर मारायचे ठरवलं होतं. मी सासूबाईंना म्हटले “ आई, काय झालं की तुम्हाला आजकाल माझी कुठलीच गोष्ट पटत नाही. गेल्या वर्षी तुम्ही आलात आपण दोघी कीती प्रेमाने राहिलो होतो. काही कष्ट असतील तर मनमोकळेपणी सांगा. मी आणि विशाल अवश्य मदत करू. पण सतत धुसफुस करू नका”
      नणंदबाईंना मी म्हटलं “ दीदी, मी काही सांगायची आवश्यकता आहे का? तुम्हाला कळतंय की तुम्ही इथे येऊन कशाप्रकारे वागता ते? तुमच्या वागण्यात काही बदल होणार असेल तर तुमचं या घरात स्वागत होईल नाहीतर ……”
       कुठल्या हक्काने तुम्ही माझ्या वस्तू उचलून घेऊन जाता? वस्तूंचं महत्व नसतं. त्या परत विकत घेतल्या जाऊ शकतात. पण प्रत्येक वस्तूशी काही आठवणी निगडीत असतात. माझ्या आठवणींवर तुम्ही घाला का घालता”
मी विशालला सर्वांच्या समोर म्हटलं की तुला जर वाटत असेल की तू आपल्या संसाराच्या चिंध्यां करशील व मी त्या चिंध्या गोळा करून रडत भेकत जोडून संसार करीन तर तसं होणार नाही. आपल्या संसारात दोघांचे साहचर्य असणे आवश्यक आहे. तुला स्वत:वर नियंत्रण ठेवायला लागेल.  आपण दोन मुलांचे पालक आहोत हे विसरतां कामा नये.”
       मला आश्चर्याचा धक्का बसला. मी विचारले “ तू येवढं सगळं तू एकाच वेळेस ऐकवलंस आणि त्यांनी ऐकून घेतलं?”
 ती म्हणाली “ होय कारण मी बोलले ते सत्य होतं. रात्री जेव्हा आम्ही एकांतात भेटलो तेव्हा विशाल ढसढसा रडला आणि त्याने माझी क्षमा मागितली. तो माझ्यावर रागावला होता कारण तो जेव्हा दोन दिवसांसाठी गावी गेला होता तेव्हा तेथे माझा भाऊ आला होता. भाऊ महागड्या हॅाटेलमध्ये उतरला होता. नव्या, कोऱ्या गाडीतून हिंडत होता आणि विशालला वाटत होतं की तो त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होता. व्यवसायानिमित्त ते एकमेकाच्या सहवासात येतात. मी त्याला म्हटलं की तू वड्याचं तेल वांग्यावर काढू शकत नाहीस. माझ्या कुटुंबामध्ये व तुझ्यात आर्थिक तफावत आहेच. त्यावरून तू डोकं फिरवायला लागला तर ते चूक आहे.”
 त्याने  मला परत परत सांगितले की झालेला घोटाळा परत कधीही होणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे.झालं गेलं विसरून आम्ही पुढे जायचं ठरवलं आहे.”
 जेवणं आटोपून आम्ही दोघी पुढच्या खोलीत आलो तेवढ्यात मोटरसायकलचा हॅार्न ऐकू आला. चट्कन इरावती खिडकीजवळ गेली व म्हणाली “ विशाल मला ध्यायला आला आहे. निघते मी आता.”
 मी म्हटले “ अगं, वर बोलव की त्याला.” त्यावर ती म्हणाली “ तो नाही येणार वर. त्याने मला अगोदरच सांगितले आहे.”
 मी विचारले “ पण का?”
 इरावती म्हणाली “ त्याला तुझ्यासमोर यायची लाज वाटते.”
मी म्हटले “ तू मारलेला तीर जरा जास्तच लागलेला दिसतोय.”
                     
नीला प्रधान
 ( पार्लेकर कायस्थ मासिकात प्रकाशित कथा)
कथाविश्व आपलं आवडतं पान. लाईक केलंय ना✨

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...