अलिकडचीच गोष्ट आहे. माझी मैत्रीण निर्मला हिच्या मुलीच्या लग्नाला मी गेले होते. सर्व श्रीमंतांची लग्नं जशी असतात, तसंच होतं ते. नेहमीचंच ते भलंमोठं प्रशस्त मंगल कार्यालय.. गर्भरेशमी साड्यांचं आणि दागदागिने, जडजवाहीर यांचं ते भरलेलं प्रदर्शन. आपण ज्यांचे नेहमी फोटो पाहतो त्या थोरामोठ्यांच्या बायका.. सुटाबुटातले पुरुष आपल्या व्यावसायिक गप्पा व चर्चामध्ये मग्न होते. वधूवरांना भेटण्यासाठी हातात फुलांचे मोठमोठे गुच्छ आणि भेटवस्तू घेऊन तिष्ठत असलेल्या लोकांची भलीमोठी रांग होती. महागड्या लग्नपत्रिकेवर तळाशी अगदी बारीक अक्षरात मजकूर छापलेला होता. 'तुमचे आशीर्वादच फक्त पुरेत.' या अशा त-हेचं वाक्य छापलेलं पाहिलं की मला सिगारेटच्या जाहिरातीची आठवण होते. एका भल्यामोठ्या पाटीवर एक तरुण मुलगा व तरुण मुलगी जोषात, तारुण्याच्या मस्तीत बेपर्वाईने उभे असतात. हातात सिगारेट असते. आपण त्या चित्राकडे पाहिलं तर वाटतं जणू धूम्रपान हे जोषाचं, उल्हासाचं, आनंदाचं प्रतीक आहे. त्या बोर्डच्या तळाशी अगदी बारीक अक्षरात सावधगिरीची सूचना छापलेली असते : 'धूम्रपान करणे प्रकृतीस हानिकारक आहे.'
मी पण त्या रांगेत तिष्ठत उभी होते... आपल्याला वधूवरांपर्यंत पोचायला अजून किमान तासभर तरी थांबावं लागणार... मी मनात विचार करत होते, इतकं बड्या घरचं लग्न. लग्नाला उपस्थित असलेले सर्वच पाहुणे बडे. त्यांनी लग्नाला हजेरी लावल्याचा काही पुरावा नको का ? मग वधूवरांना भेटायला आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा एक फोटो घेणं आणि व्हीडिओ चित्रीकरण... हे तर हवंच. कार्यालयात उजव्या हाताला बुफे पद्धतीने जेवणाची सोय केलेली होती. उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची नुसती लयलूट होती. त्या वासाने पोटातली भूक अधिकच बळावत चालली होती. त्या रांगेत उभं असताना मला माझी जुनी मैत्रीण विमला भेटली. ती पण अशीच बड्या घरची होती. विमलेचा चेहरा जरा दुःखी दिसत होता. आम्ही उभ्या उभ्याच गप्पा मारू लागलो.
"तू अशी उदास का दिसतेय ?"
"ते तुला नाही कळायचं. एक फार मोठी संधी हातातून गेली माझ्या. असं झाल्यावर कसं वाटतं, ते केवळ माझं मलाच ठाऊक !"
"कसली संधी ?"
"उटीच्या जवळ एक चहाचा मळा होता. तो मी विकत घेणार होते. पण आमचा व्यवहार होता होता फिसकटला. चांगली हातात आलेली संधी गेली. माणसंसुद्धा इतकी हावरट, स्वार्थी असतात ना. माझा त्या चहाच्या मळ्याच्या मालकाशी व्यवहार जवळजवळ पुरा होत आला होता.. आणि ऐन वेळेला दुसऱ्या कोणीतरी त्याला दहा लाख रुपये जास्त देऊ केले. झालं. लगेच त्यानं मला दिलेला शब्द फिरवला आणि त्या दुसऱ्याला तो मळा विकला. आजकाल शब्दाला काही किंमतच राहिलेली नाही."
"पण तुझ्या मालकीचे दोन मळे कूर्गमध्ये आहेतच ना ? मग अजून आणखी एक मळा कशासाठी हवा आहे तुला ?"
"मला दोन मुलं आहेत आणि एक नातू आहे. मी विचार केला हा नवीन मळा आपल्या नातवासाठी विकत घेऊन ठेवावा."
"अगं, पण तुझा नातू तर अजून फक्त एकच वर्षाचा आहे ना ?"
"म्हणून काय झालं? तो मोठा झाला की त्याला मिळेल नां..."
माझं स्वतःचं अर्थकारणाचं ज्ञान तसं तुटपुंजंच असल्यामुळे हे असले व्यवहार मला कधी समजत नाहीत. विमलाला त्या व्यवहारात हार पत्करावी लागली, म्हणून मला तिच्याविषयी वाईट वाटलं.
काही वर्षांपूर्वी मी तामीळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातून काही कामानिमित्त प्रवास करत होते. संध्याकाळची वेळ झाली होती. अंधारून आलं होतं. बंगालच्या उपसागराला वादळाचा तडाखा बसल्यामुळे भरपूर पाऊसही सुरू होता. रस्ता बंद झाला होता. आमच्या गाडीला पुढं जाणं शक्य नव्हतं. माझा ड्रायव्हर म्हणाला, "मॅडम, पुढचे किमान तीन तास तरी आपल्याला हलता येणार नाही. तेव्हा इथे एकटं गाडीत बसून राहण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी आडोशाला जाऊन थांबत का नाही ?"
मी मनातून जरा अस्वस्थ झाले होते. अपरिचित मुलूख, अनोळखी माणसं... आणि मी अशी एकटी पावसात अडकले होते. मी छत्री घेतली आणि चालत गावाकडे निघाले. आता त्या गावाचं नाव मला आठवत नाही; पण एक आठवतं, की ते अगदी छोटं, चिमुकलं गाव होतं. पावसात नेहमी जे होतं, तेच झालं. वीज गेली. अंधार तर इतका होता की पाऊल टाकणंही कठीण होतं. गावच्या वेशीपाशीच एक लहानसं देऊळ होतं. देवळात दिवा तेवत होता. त्याचा मिणमिणता प्रकाश लांबून दिसत होता. त्या देवळात जाऊन थांबलेलं बरं-असा विचार करून मी तिथे गेले. त्या मुसळधार पावसात, वा-यानं माझी छत्री उलटली होती आणि मी पुरती भिजले होते. मी देवळात शिरले आणि एक वृद्ध माणूस उठून आला. तो तामीळमध्ये माझ्याशी बोलू लागला. मला तामीळ भाषा कळत नसली तरी त्याचं ते आर्जवी बोलणं, त्याच्या आवाजातील आपुलकी मला जाणवली. माझ्या या कामाच्या स्वरूपामुळे मला एव्हाना एक गोष्ट कळून चुकली आहे. माणसं जी एकमेकांशी बोलतात ती भाषेच्या माध्यमातून नव्हे, तर दोन हृदये एकमेकांशी थेट बोलतात. सुख असो नाहीतर दुःख... ते या अशाच प्रकारे एकमेकांपर्यंत पोचवतात. त्या वृद्धाच्या शेजारी एक वृद्ध स्त्री उभी होती. तिने सुती नऊवार साडी नेसली होती. ती त्याच्या कानात काहीतरी कुजबुजली व तिने मला एक जुना, पण स्वच्छ धुतलेला टॉवेल डोकं पुसण्यासाठी दिला. मी चेहरा व डोकं पुसता पुसता त्या म्हाताऱ्या माणसाकडे पाहिलं. तो ऐंशीच्या घरात असावा. तो अंध होता. ते जोडपं अत्यंत गरीब परिस्थितीतलं होतं, हे तर उघडपणे जाणवत होतं. मला तामीळ भाषा येत नसल्यामुळे मी त्या दोघांशी कानडीत बोलले. त्यांनी मंगलारती करावी असं मी त्यांना सुचवलं. त्या वृद्ध माणसाने पूजा करण्यास सुरूवात केली. ते शिवमंदिर होतं. त्या देवळाच्या अंतर्भागी किंवा बाहेरच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा भपका, थाटमाट नव्हता. शिवलिंगावरतीसुद्धा केवळ एक बिल्वपत्र तेवढं वाहिलेलं होतं. बाकी कोणत्याही माळा वगैरे नव्हत्या. सभोवताली असलेला अंधार व त्या अंधारात तेवणारी मंदिरातील ती एकुलती एक ज्योत. त्या प्रकाशात माझ्या डोळ्यांना दिसलेलं ते परमेश्वराचं रूप मला पराकोटीचा आनंद देऊन गेलं. इतर देवालयांमध्ये तिकीट काढून, पूजा करण्यासाठी तिष्ठत जसं रांगेत उभं राहावं लागतं, तसं इथे नव्हतं. परमेश्वराचा वास मला या जागी निश्चितपणे जाणवला.
त्या वृद्धानं मंगलारतीचं तबक माझ्यापुढे धरलं, अचानकपणे मला त्या दोघांच्या दारिद्र्याची जाणीव झाली. मी पर्स उघडून शंभर रुपयांची नोट काढून त्या तबकात घातली.
त्या वृद्ध माणसानं ती नोट बोटांनी चाचपली व तो उघडउघड अस्वस्थ झालेला दिसला. मला तर वाटलं होतं, त्याला नक्कीच आनंद होईल. तो मृदूपणे म्हणाला,
"अम्मा, या नोटेला स्पर्श केल्यावर मला असं वाटतंय की दहा रुपयांपेक्षा बरेच जास्त पैसे तुम्ही घातले आहेत. पण मला खरंच एवढ्या पैशांची गरज नाही. तुम्ही जेव्हा देवळात येता, तेव्हा तुमच्या मनातील भक्तीभाव हा सर्वांत महत्त्वाचा. तुमच्या आर्थिक स्थितीला, समाजातील स्थानाला इथे काहीच महत्त्व नसतं. आपल्या पूर्वजांनीपण आपल्याला हेच सांगितलंय, की आपण जी दक्षिणा द्यायची ती 'अंजी पावली' म्हणजे अल्पस्वल्प असावी. ही तुम्ही दिलीत तेवढी जास्त कधी नसावी. तुम्ही हे पैसे परत घ्या आणि मला नेहमीसारखी इतरांएवढीच दक्षिणा द्या."
ते ऐकून मी स्तंभित झाले. त्यावर काय बोलावं, तेच मला सुचेना. खरं तर मला बोलण्याची अडचण कधीच येत नाही. पण आत्ता मात्र खरोखर माझ्यापाशी बोलायला शब्द नव्हते. मी त्या वृद्धाच्या पत्नीकडे पाहिलं, तर तिचाही चेहरा निर्विकार होता. मला वाटलं, ती आपल्या पतीला विरोध करील, एवढे पैसे मिळत असताना त्याने त्याचा अव्हेर करू नये, म्हणून त्याला समजावेल. कितीतरी घरांमध्ये असं दृश्य दिसतं. बायका नवऱ्यांना हावरटपणा करण्यास भाग पाडतात व अखेर दोघंही त्या मोहाच्या जाळ्यात गुंतत जातात. परंतु इथे मात्र इतक्या अठरा विश्वे दारिद्र्यात राहत असतानासुद्धा पत्नीने पतीचा शब्द शिरोधार्य मानलेला होता.
मी म्हणाले, "तुम्हा दोघांचंही वय झालं आहे. या वयात अन्नधान्यापेक्षाही औषधपाण्यावर जास्त खर्च होतो. खरं तर हे ठिकाण तसं बरंच दूर आहे, पण तुम्हाला मान्य होणार असेल, तर मी एक सुचवू ?"
एव्हाना त्यांची परिस्थिती, त्यांचं राहणीमान कसं होतं, ते मला पुरतं कळून चुकलं होतं. त्यांच्या अंगावरचे कपडे स्वच्छ होते खरे; पण ते खूप जीर्णशीर्ण झालेले होते. अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता. त्यांचे चेहरे मात्र हसरे, समाधानी होते. माझ्या कामाच्या निमित्ताने माझ्या मनात एक गोष्ट पक्की ठसलेली आहे. कोणी काही अर्ज करो, शिफारसपत्रे आणो; पण प्रत्यक्ष डोळ्यांनी जी परिस्थिती आपण पाहतो, तेच सत्य असतं. त्या वेळी आमच्या संस्थेची अशा गरीब लोकांसाठी एक योजना चालू होती. आम्ही वृद्ध व्यक्तींना त्याअंतर्गत निवृत्तीवेतन देत असू. त्या योजनेचा लाभ या दोघा व्यक्तींना नक्कीच व्हायला हवा, ते त्यास नक्कीच पात्र आहेत, असा मला विश्वास वाटला.
आता ती वृद्ध स्त्री प्रथमच बोलली,
"पोरी, तुझं काय म्हणणं आहे ?"
"हे पाहा, मी तुम्हाला काही पैसे पाठवीन. ती रक्कम तुम्ही एखाद्या राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्टात जमा करा. त्यावरचं जे व्याज मिळेल, त्याचा तुम्हाला तुमच्या उदरनिर्वाहासाठी उपयोग होईल. जर काही कारणांनी तातडीचे वैद्यकीय उपचार घेण्याची तुमच्यापैकी कोणाला गरज पडली, तर मूळ रकमेतूनसुद्धा तुम्हाला खर्चाला पैसे काढता येतील.'
त्यावर तो म्हातारा मंदसा हसला. देवापुढे तेवणाऱ्या ज्योतीमध्ये त्याचा उजळून निघालेला चेहरा मला दिसला.
"पोरी, तू आम्हा दोघांपेक्षा वयानं बरीच लहान असावीस, असं वाटतं. तू जग अजून पाहिलेलं नाहीस. किती वेडी आहेस गं तू. या म्हाताऱ्या वयात आता मला पैशाची गरज पडेल तरी कशाला ? तुला ठाऊक आहे शिवमहादेवाचं दुसरं नाव काय आहे ते? त्याचं नाव आहे वैद्यनाथ. वैद्यनाथ म्हणजे फार मोठा वैद्य, किंवा डॉक्टर ! या गावातील लोक कनवाळू आहेत. मी पूजा करतो आणि ते मला तांदूळ देतात. मी जर कधी आजारी पडलो, तर गावातला डॉक्टर माझ्यावर मोफत उपचार करतो. आमच्या गरजा फारच कमी आहेत. मी तुझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीकडून पैसा काय म्हणून घ्यायचा ? समजा, मी हे पैसे घेतले आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे बँकेत ठेवले, तर ते कुणाला तरी समजणारच. मग तो माणूस आमच्या मागे लागेल. कदाचित कुणी त्या पैशाच्या हव्यासापायी आमच्या मरणाची- सुद्धा इच्छा करेल. ही सगळी भानगड हवी कुणाला? तू आमच्यासारख्या म्हाताऱ्या जोडप्याला मदत देऊ केलीस हा तुझा चांगुलपणा. देव तुझं भलं करो; पण आम्ही जसे आहोत, तसंच राहू दे आम्हाला. आम्ही आयुष्यात खूप समाधानी आहोत, तृप्त आहोत. मला आयुष्यात याहून अधिक काही नको."
अचानक वीज परत आली. देवळात झगमगीत प्रकाश पडला. मी त्या वृद्ध पण समाधानी जोडप्याकडे नीट निरखून पाहिलं. माझ्या कामाच्या निमित्ताने प्रथमच मी अशा प्रकारच्या माणसांना भेटले होते ही माणसं पैशानं गरीब असतीलही, पण मनाची अपार श्रीमंती त्यांच्याजवळ होती. म्हणूनच मी देऊ केलेली आर्थिक मदत त्यांनी नाकारली. त्यांनी जे काही मुद्दे मांडले होते, त्या सर्वच मुद्यांशी मी सहमत होते, असं नाही; परंतु त्याचा एक मुद्दा मात्र मला सर्वस्वी मान्य झाला तो म्हणजे समाधान, तृप्ती. मला आयुष्यात कधीतरी हा टप्पा गाठायचा आहे, एवढं समाधान मिळवायचं आहे. आयुष्यात आपली मर्यादा आपणच आखून घ्यायची आणि तृप्त राहायचं. कदाचित या तृप्तीमुळे आपली प्रगती थोडीशी खुंटेलही.. पण आयुष्यात काही काळानंतर ही समाधानी वृत्ती असणं फार गरजेचं असतं... म्हणजे मगच मनःशांती प्राप्त होऊ शकते.
माझ्या नजरपुढे विमलेचा उदास चेहरा तरळला. हातातील चांगला खरेदीचा व्यवहार निसटला म्हणून दुःखी झालेल्या माझ्या मैत्रिणीचा चेहरा.

समाप्त
लेखिका - सुधा मुर्ती
अनु. - लीना सोहनी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा