बस म्हैसुर वरुन उटीकडे निघाल्या पासून आशीषला जाणवलं की नेहा चा मूड-आॕफ झाला होता. पुण्याहून म्हैसूरचा ट्रेनचा प्रवास खूप मस्त झाला होता त्यांचा. नवविवाहीत जोडी हनीमूनला जाताना जी हूरहूर, उत्सुकता, आकर्षण या मिश्र भावना असतात त्या त्याच्या आणि तिच्याही देहबोलीतून दिसत होत्या. आज सकाळी देखील म्हैसूरला पॕलेस पाहून, थोडंसं शाॕपींग करुन आणि हलका लंच करुन ते त्या उटीच्या एसी व्होल्वो बसमधे बसले होते. पण तेंव्हापासून नेहाचे काय बिनसले होते कोण जाणे? ती फारसे बोलत नव्हती. खिडकीशी असूनही बाहेर न पाहता ती डोळे मिटून बसली होती. कदाचित तिला बस लागत असावी म्हणून नेहा शांत झाली आहे असा त्याने विचार केला. खरंतर वाटेमधे लागणारे मधुमलाई नॕशनल पार्क, अधेमधे दिसणारे प्राणी याबद्दल तो तिच्याशी बोलायला उत्सुक होता.पण तिचा एकंदर नूर पाहून आशीष गप्पच राहिला.
उटीत संध्याकाळी पाच वाजता बस पोहोचली.
बाहेर चांगलच थंड वातावरण होतं.
नुकताच पावसाचा शिडकावाही होउन गेला असावा.
प्रसन्न वातावरण होतं.
आशीषने आठवड्याचे उटीचे वेदर फोरकास्ट गुगलवर पाहिले होते.
उन्हाळा असूनही अठरापेक्षा जास्त तापमान असणार नव्हते.
असेच वातावरण त्यालाही अपेक्षित होते... मधुचंद्राला पोषक...!!
म्हणून दोघांनीही स्वेटर, विंड चिटर बरोबर घेतले होतेच.
त्यांचे हाॕटेलही आशीषने नेटवर खूप शोध घेउन मग फायनल केले होते. हाॕटेलचे लोकेशन हिल टाॕप वर, व्हॕली फेसींग पाॕश रुम्स, छान शाकाहारी जेवण, उत्कृष्ट सर्वीस या सर्व गोष्टींचे रिव्यू ब-याच ट्रॕव्हेल साइट्सवर पाहून त्याने हे थोडेसे प्रिमियम हाॕटेल निवडले होते. शेवटी हनीमून ही घटना आयुष्यात एकदाच घडते. त्यात तडजोड का करा, असा विचार त्याने केला होता.
बाहेर पडताच सरळ टॕक्सी करुन त्यांनी हाॕटेलकडे कूच केले.
उटीला पोहोचल्यावर नेहाला बरे वाटेल ही आशा फोल ठरली.
आशीषने हळूच तिच्याकडे पाहिले... तिचा चेहरा अजून ओढलेलाच होता. त्याने चिअर अप करण्यासाठी तिचा हात हातात घेतला. तिने त्याच्याकडे पाहिले व कशीनुशी हसली.
'नेहा... बरं वाटतय ना तुला?' त्याने तिला विचारलं..
'हो...' ती गडबडून म्हणाली... 'मी ठीक आहे..'
'नाही बसमधे बसल्यापासून तू काहीच बोलत नाहीयेस म्हणून...' तो काळजीने म्हणाला.
'आईची आठवण येतेय...' ती त्याला तोडत बोलली.
हाॕटेल येइपर्यंत मग दोघाही काही बोलले नाहीत.
हाॕटेलमधे आल्यावर त्यांचे रितसर छान स्वागत झाले.
रुम मधे जातानाच रिसेप्शनने सांगीतले की इव्हिनींग स्नॕक्स आणि चहा-काॕफी टेरेस रेस्टाॕरंटमधे तयार आहे त्यांनी जरुर लाभ घ्यावा.
आशीषला चांगलीच भूक लागली होती. नेहा आणि तो पटकन फ्रेश होउन त्या रेस्टाॕरंट मधे आले. तिथे आल्याबरोबर सारा थकवा पळून गेला.
टेरेस रेस्टाॕरंट मधून दिसणारे दृष्य अतिशय मोहवणारे होते.
लांब लांब हिरव्या पर्वत रांगा... धुक्याच्या दुलई पांघरुन पहूडलेली समोरची ती खोल दरी... आकाशात काळ्या ढगांआडून अस्ताकडे निघालेल्या सुर्याची लालसर छटा... सारेच नयनरम्य आणि अद्भुत...!!
सँडवीच आणि काॕफी घेतल्यावर छान तरतरी आली होती.
नेहाचा चेहराही आता जरासा खुलला होता.
बरीच इतर हनीमून कपल्सही आजूबाजूला दिसत होती. हिल स्टेशन्सवर त्यांना ओळखणे तसेही फार अवघड नसते. एकमेकांना जवळ घेउन फोटो, सेल्फी घेण्यात सारे कपल्स मग्न होते.
आशीषने सूचकपणे नेहाकडे पाहिले... पण तिने त्याची नजर टाळली.
काहीतरी नक्कीच बिनसलय हे आशीषला एव्हाना लक्षात आलं होतं. पण नेहा स्वतःहून सांगेपर्यंत विषय काढायचा नाही असे त्याने ठरवले.
रुमवर परतल्यावर आशिषने बॕग अनपॕकींग केले व तो आंघोळीला गेला. शाॕवरखाली गरम पाण्याने आंघोळ करुन तो मूडमधे बाहेर आला. बेडवर बसलेल्या नेहाजवळ येउन त्याने आपले केस झटकले. तीच्या अंगावर पाणी उडाले तशी ती लाजली. चटकन बेडवरुन उठत ती म्हणाली... 'मीही शाॕवर घेउन येते..'
तिचा मूड थोडा लाइट करण्यासाठी आशीष मिष्कीलपणे म्हणाला
'म्हणत असशील तर कंपनी द्यायला मी पुन्हा येउ शकतो...'
तीने आपले हसू दाबत उत्तर दिले
'नको काही... तू टिव्ही बघ... तुझे आवडते न्यूज चॕनेल्स...'
नेहा तिची प्लॕस्टीक बॕग घेउन आंघोळीला गेली.
'हंss...!! दिज लेडीज...!!' असे स्वतःशीच म्हणत त्याने टी शर्ट व जीन्स चढवत रिमोटने टिव्ही आॕन केला.
थोड्या वेळाने बाथरुमचा दरवाजा उघडला. आशीषची नजर नेहाकडे गेली. ती तोंडावर हात ठेउन रडू दाबत होती... पण तिला भरुन येत होतं.
तिने आशिषकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहिले.
आशीषने चटकन टिव्ही बंद केला व उठून तिच्याकडे आला.
'अरे नेहा... तू रडतीहेस...काय झालं...? ए वेडाबाई...बोल ना...!'
नेहा नकळत त्याच्या मिठीत शिरली...व रडत रडत म्हणाली
'आशीष..आय अॕम साॕरी...!'
आशीषला काही कळेना...
'ए... अगं नेहा... साॕरी काय म्हणते...? आय कॕन अंडरस्टँड... तुला घरची आठवण येत असेल...'
'आशीष... साॕरी... माझा प्राॕब्लेम झालाय रे...' नेहा अजून रडत होती.
आशीषला काही कळाले नाही... तिचा हात धरत तो म्हणाला
'नेहा... अगं तुझा प्राॕब्लेम माझा प्राॕब्लेम... काय झालय ते सांग बरं...'
'आशीष आय अॕम रिअली साॕरी... माझ्याकडून मिसकॕलक्यूलेशन झाले... माझे पिरीयड्स आलेत...' असे म्हणत ती बेडच्या टोकावर बसून परत रडू लागली.
आशीषला आता सगळी टोटल लागली. त्याला काय 'झालय' आणि नेहा एवढी अपसेट का झालीय हे उलगडायला लागले. त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तो सुन्नपणे तिथेच बेडवर तिच्या शेजारी बसून राहिला.
नेहा काहीतरी बोलत होती... कसं तिचं मंथली कॕल्क्यूलेशन साखरपुड्यापासून बिघडत गेले... कसे घरातले देवकार्यामुळे लग्नापर्यंत तिने पिरीयड्स गोळ्या घेउन घेउन पुढे ढकलले होते.
हे पिरीयड्स तिला खरे तर पुढच्या आठवड्यात अपेक्षित होते. पण शेवटी अघटीत झाले होते. हनीमुनला येउन तिची पाळी सुरु झाली होती.
'इट्स ओके नेहा... इट्स ओके...' एवढच म्हणत आशीष जडपणे उठला आणी रुमचा दरवाजा उघडून बाहेर पडला.
नेहाला लक्षात आलं... आशीषचा प्रचंड मूड-आॕफ झाला होता.
या हनीमूनसाठी त्याने खूप आधीपासून प्लॕनींग केल होतं... दोनच महिन्यापूर्वी झालेल्या त्यांच्या साखरपुड्यापासूनच तयारी सुरु करत त्याने ट्रेन बुकींग्ज, हाॕटेल रिझर्वेशन, बस टिकीट्स वगैरे सर्व काही स्वतः केले होते.
हनीमून हा प्रत्येक नवविवाहीत युगुलासाठी खूप खास असतो. तिच्या मूर्ख पणामुळे आज या सर्व आनंदावर विरजण पडले होते... तिच्या स्वतःच्या आणि आशीषच्याही... तेही उटीपर्यंत आल्यानंतर.
ती तशीच डोके टेकून बेडवर बराच वेळ रडत बसली.
नंतर तिचा डोळा कधी लागला हेच तिला कळाले नाही.
आशीष दरवाजा उघडून आत आला... तशी ती जागी झाली.
त्याने तिच्याकडे पहात स्माईल केलं.
'रडूबाईचे रडून झालं का...?'
तो तिच्याजवळ आला व आपल्या हातातली कॕरीबॕग तिला दिली.
'काय आणल आहेस...?' असे म्हणत तिने कॕरीबॕग उघडली.
त्यातून डोकावणारा तो हिरव्या कलरचा सॕनीटरी पॕडचा मोठा पॕक तिने पाहिला आणि तिला ओशाळायला झाले. एक स्त्री असून आपण जे आणायला विसरलो ते आशीष इतक्या तत्परतेने आपल्यासाठी घेउन आला हे पाहून तिला भरुन आले.
'तुझा ब्रँड आणि साइज मला ठाउक नव्हता नेहा... पण साधारण अंदाज लावून आणलाय... बघ तुला होईल की बदलून आणू...'
'नको...' नेहा डोळे पुसत म्हणाली... 'बरोबरच आणलाहेस... हुशार आहेस..'
' अगं हुशार... तिथे दुकानात माझी किती फाटली होती माहित आहे...? त्या मेडीकल वाल्याला तरुण मुले चाचपडत काँडोम पॕकेट मागतात... मी पहिलाच असेन जो सॕनीटरी नॕपकीन्स मागायला आलो होतो...'
असे म्हणत आशीष जोरात हसायला लागला.
नेहा हसत त्याच्या मिठीत शिरली व म्हणाली 'थँक्यू आशीष... हे सारं समजून घेतल्याबद्दल...'
आशीषने ज्या पाॕजीटीव्हली तिची परिस्थिती स्विकारली होती ते पाहून तिला परत भरुन आले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले हे पाहुन आशीषने तिला बेडवर बसवले व तिच्या पायाशी गुडघ्यावर बसत तो म्हणाला..
'ए वेडाबाई... दोन महिन्यापूर्वी तुला आंगठी घातली तेंव्हापासूनच तुझी सारी सुखदुःख माझी झाली... तुझे प्राॕब्लेम्स माझे झाले. तुला बसमधे बसल्यापासूनच त्रास होत होता बहुधा... म्हणून तू गप्प गप्प होतीस... पण मला लक्षात आले नाही... साॕरी! पण यापुढे तसे होणार नाही. तुझ्या प्रत्येक प्राॕब्लेमचा मला भाग बनव... माझ्यापरीने होईल ते मी नक्की करेन नेहा...'
नेहा ने त्याचे डोके हलकेच तिच्या मांडीवर घेतले व त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली... 'इतकं समजून घेतल पुरुषांनी तर आम्हा बायकांना आणखी काय हवं रे आशीष...? पण मी मात्र चुकले रे... साॕरी...'
तिचे दोन्ही हात हातात घेत तिला उठवत खिडकीशी नेत आशीषने पडदा दूर केला व म्हणाला...
'नेहा... हे बघ... जे झालय तो निसर्ग नियम आहे. निसर्गाने आपले काम केलय... त्याबद्दल आपण काही करु शकत नाही... तु त्याबद्दल अजीबात गिल्टी फिलींग ठेउ नको...'
मग समोरच्या डोंगर द-यांकडे हात दाखवत तो म्हणाला
'हो... पण पुढचे पाच दिवस हा समोरचा निसर्ग तर आपण एन्जाॕय करु शकतो ना? एवढं भरभरुन दिलय त्याने की पाच दिवस नाही पाच महिनेही कमी पडतील आपल्याला हे सर्व पहायला... काय मॕडम... बरोबर ना...?'
'बरोबर...' म्हणत हसत नेहा आशीषच्या कुशीत शिरली.
तिला प्रकर्षाने जाणीव झाली की देवाने एक परफेक्ट सांगाती तिच्या आयुष्यात दिला होता.
त्या जाणीवेने नेहा मोहोरली...
बाहेरचा 'हिरवा' निसर्गही लाजून मोर पंखी झाला होता...!!
-सुनील गोबुरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा