शनिवार, २३ मे, २०२६

2892. काॅर्पोरेट फॅमिली म्हणजे काय?

 काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक पोस्ट वाचली होती. केनियातील एका काउन्सलरने सांगितलेली ती कथा होती. घरात काम करणाऱ्या मोलकरणीची. त्याच्या बायकोनं घरकामात मदत करायला एक मोलकरीण ठेवली होती. पहिल्या दिवशी ही मोलकरीण घरी आली तेव्हा तिनं आपल्या मुलांना तिला “आंटी” म्हणायला सांगितलं. मुलांनी कारण विचारलं. आईनं उत्तर दिलं. आंटी म्हटलं की नातं जिव्हाळ्याचं वाटतं. घरचं वाटतं. मुलाला समजावलं. “ती आपल्या कुटुंबाचा भाग आहे.”
पंधरा वर्ष ती बाई त्या घरात काम करत राहिली. मुलांना लहानाचे मोठं होताना त्यांची आजारपण, हट्ट, शाळेचे दिवस, परीक्षा, सगळं त्या मोलकरीणीने सांभाळलं. पण तिच्या पगारात कधी वाढ झाली नाही. ती कुटुंबाचा भाग होती पण तिचं जेवण मात्र नेहमी वेगळ्या टेबलावर होत असे किंवा घरातील सर्व जण जेवल्यानंतर. तिला झोपायला वेगळी खोलीही होती. 
एक दिवस तिने पगार वाढवण्याची मागणी केली. मुलगा पंधरा वर्षांचा झाला होता. आई म्हणाली, “आता तिला आंटी म्हणायची गरज नाही. ती फक्त मोलकरीण आहे.” 
काही महिन्यांतच ती बाई कामावरून काढून टाकली गेली. कारण मुलगा मोठा झाला होता. तिची गरज संपली होती. लगेच दुसरी बाई कामावर ठेवली गेली आणि तिलाही “आंटी” म्हणायला सुरुवात झाली.
ही गोष्ट वाचताना स्वतःच्या कॉर्पोरेट जगाची खरी गोष्ट समोर आली. दहा वर्ष होऊन गेली. मी आयटीमध्ये आहे. आजवर अनेक टाऊनहाॅल ऐकलेत, कंपनीच्या मालकांची भाषणं ऐकली आहेत. जवळपास प्रत्येक कंपनीच्या टाऊनहाॅल मध्ये, सीईओ च्या भाषणात एक वाक्य खूप वापरते – “We are a family.”
पहिल्यांदा जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा मला हे वाक्य खूप आवडलं होतं. ऑफिस म्हणजे दुसरं घर. सहकारी म्हणजे कुटुंब. एकमेकांना मदत करणारी माणसं. सगळे एकत्र पुढे जाणारे. ऐकायला खूप छान वाटतं.
पण आयुष्य जसजसं पुढे सरकत गेलं तसं लक्षात आलं की हे वाक्य खरं नसतं. तो फक्त एक दिखावा असतो.
नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही काही मित्र एका प्रोजेक्टवर काम करत होतो. रात्रीचे अकरा-बारा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसायचो. कधी कधी रात्री दोन वाजेपर्यंतही काम चालायचं. टीम लीडर नेहमी म्हणायचा, “Guys, we are not just colleagues, we are family.”
आम्हालाही तेव्हा वाटायचं, खरंच आपण सगळे एकत्र आहोत. कंपनीसाठी मेहनत करतोय. कंपनी मोठी झाली की आपणही मोठे होऊ. पण एका वर्षानंतर प्रोजेक्ट संपला. क्लायंटने बजेट कमी केलं. आणि अचानक कंपनीने काही लोकांना काढून टाकायचा निर्णय घेतला. त्या लिस्टमध्ये आमच्या टीममधला एक मुलगा होता. जेव्हा त्याला रिलीव्ह केलं. तेव्हा समजलं इथं कुणी सख्खं नसतं. कालपर्यंत जो माणूस त्या “फॅमिली” चा भाग होता, तो एका दिवसात बाहेरचा झाला.
तकंपनी आणि कुटुंब यात फार मोठा फरक असतो. कुटुंबात एखाद्या व्यक्तीची परिस्थिती खराब झाली तर घरचे त्याला सोडून देत नाहीत. उलट जास्त साथ देतात. पण कंपनीत परिस्थिती खराब झाली की सर्वात आधी माणसंच बदलली जातात. कोविड मध्ये अनेकांनी याचा अनुभव घेतलाय आणि आता एआयच्या जमान्यातही घेत आहेत. इथं प्रत्येक जण रिप्लेस होतो. कितीही डिपेडन्सी असो.
काही वर्षांपूर्वी माझ्या बंगळूर पुणे वाऱ्या वाढत चालल्या होत्या. दर आठवड्यात पुण्याहून बंगळूर ला ऑफिसला जाणं म्हणजे एक वेगळंच युद्ध होतं. नुसती पळापळ. रविवारी दुपारी फ्लाईटनं जायचं म्हणून २~२.३० ला घर सोडायचं. साडे पाचच्या फ्लाईटने रात्री आठपर्यंत बंगळूर एअरपोर्ट ला उतरायचं तिथून परत तासभर कॅबनं हाॅटेलवर. 
सोमवार ते गुरुवार काम करून मध्यरात्री परत पुण्यात यायचं. शुक्रवारी वर्क फ्रॉम होम. परत पुढच्या आठवड्यात सायकल रिपीट. खाणं वेळेत नाही की झोपणं वेळेत नाही. एकंच लक्ष्य..ऑफीसचं काम. आयुष्यात एवढा वैतागून सोडणारा कुठलाही काळ नव्हता. कारण काय तर कंपनीचा एकच आदेश “You still need to come to Bangalore office.”
परिणाम स्वरूप नंतर सर्जरी आणि मानसिक ताणतणाव वाढला. सर्जरीनंतर ही ऑफीसच्या काम वाढतंच राहिलं. पण ऐनवेळेस अप्रायझल ला मॅनेजर विसरला. विसरला असं ऑफिशियल कारण दिलं. त्या दिवसांत मला पुन्हा त्या “फॅमिली” शब्दाचा अर्थ समजला.
काॅर्पोरेट फॅमिली म्हणजे काय?
काम करा जसं कुटुंबासाठी करतात.
त्याग करा जसं कुटुंबासाठी करतात.
निष्ठा ठेवा जशी कुटुंबासाठी ठेवतात.
पण पगार, प्रमोशन किंवा लेऑफच्या वेळी अचानक आपण फक्त एक एम्प्लॉयी नंबर होता.
माझ्या एका मित्राचा एआय आल्यानंतरचा अनुभव तर अजून जास्त वाईट होता. तोही एका आयटी कंपनीत होता. दहा वर्ष त्या कंपनीत काम केलं. अनेक प्रोजेक्ट्स डेलिव्हर केले. क्लायंटशी चांगले संबंध ठेवले. एआय आलं आणि एक दिवस कंपनीने स्ट्रक्चर बदलायचा निर्णय घेतला. काही महिन्यांतच त्याला सांगितलं – “Your role is no longer required.” दहा वर्षांचं नातं एका ईमेलमध्ये संपलं. महिन्यात रिलीज.
कंपनीवर विश्वास ठेवणंही चुकीचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कंपनी आणि तुमचं नातं हे भावनिक नसतं. ते व्यावसायिक असतं. तुम्ही कंपनीला value देता. कंपनी त्यासाठी तुम्हाला पैसे देते. इतकंच.
कधी कधी आपल्याला चांगले मॅनेजर भेटतात. खरोखर साथ देणारे. काळजी घेणारे. कौतुक करणारेही. अशा लोकांमुळे काम करणं आनंदाचं होतं. पण ते सुद्धा एका सिस्टमचा भाग असतात. त्यांच्याही हातात सगळं नसतं.
माझ्या करिअरमध्ये मला दोन प्रकारचे मॅनेजर भेटले. एक असे की ज्यांच्यासाठी टीम म्हणजे खरोखर टीम होती. ते मार्गदर्शक होते. एखादा प्रॉब्लेम आला तर ते स्वतः पुढे येऊन उभे राहायचे. ही मंडळी आजही सोबत आहे आणि दुसरे असे की ज्यांच्यासाठी टीम म्हणजे फक्त नंबर. डेडलाईन पूर्ण झाली की ठीक. नाही झाली तर प्रेशराईज करून काम करा. नाहीतर डच्चू.
दोन्ही प्रकारच्या लोकांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली की आपली ओळख आपल्याच कामावर उभी राहते. कंपनीवर नाही. आजकाल अनेक लोक नोकरीला खूप भावनिक पद्धतीने पाहतात. “ही माझी ड्रीम कंपनी आहे.” “ही कंपनी माझं दुसरं घर आहे.” 
काही अंशी ते खरं असू शकतं. पण आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली की घर आणि ऑफिस यात एक स्पष्ट रेषा असते. घरात तुम्ही माणूस असता. ऑफिसमध्ये तुम्ही प्रोफेशनल असता. घरात तुमची किंमत तुमच्या नात्यांमुळे असते. ऑफिसमध्ये तुमची किंमत तुमच्या कौशल्यामुळे असते.
म्हणूनच या सगळ्या अनुभवांनंतर माझा नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. आता मी कंपनीबद्दल वाईट विचार करत नाही. पण अपेक्षाही ठेवत नाही.
मला चांगला मॅनेजर भेटला तर मी त्याचा आभारच आहेत. टीम चांगली असेल तर त्यांच्यासोबत मनापासून काम करता येतं. पण त्याचवेळी माझी स्किल्स वाढवत राहतो. नवीन गोष्टी शिकत राहतो. कारण मला माहित आहे..आजची परिस्थिती कायम रहाणार नाही. आज प्रोजेक्ट आहे. उद्या नसेल. आज मॅनेजर चांगला आहे. उद्या बदलेल. आज कंपनी वाढतेय. उद्या आपलाही बाजार उठेल.
गेल्या दोन वर्षापासून एक छोटासा नियम मी स्वतःसाठी ठेवला आहे कंपनीशी नातं प्रामाणिक ठेवा, पण स्वतःची ओळख कंपनीवर अवलंबून ठेवायची नाही. आपल्याला जेवढं होतं तेवढंच काम करायचा. स्वतःला बर्न करून ठेवायचं नाही. आपण रिप्लेस होऊ शकतो. कितीही डिपेन्डसी असली तरीही.
ट्विटर पोस्टमधल्या मोलकरणीची गोष्ट हेच सांगते. पंधरा वर्ष तिला “आंटी” म्हटलं. पण तिची खरी ओळख बदलली नव्हती. ती कामगारच होती. फक्त शब्द बदलले होते.
कॉर्पोरेट जगातही तसंच असतं. “फॅमिली”, “कल्चर”, “टीम स्पिरिट” हे सगळे शब्द अनेकदा ते फक्त शब्दच असतात. 
आपण स्किल value देतो कंपनी त्या value साठी पैसे देते. बाकी सगळं बोनस आहे. एकदा का ही गोष्ट समजली की नोकरीतला ताण थोडा कमी होतो. अपेक्षा वास्तववादी होतात. आणि माणूस स्वतःवर जास्त लक्ष देऊ लागतो. 
कधी कधी मला वाटतं आपल्या गावाकडच्या लोकांना ही गोष्ट आधीपासून माहित होती. ते काम करायचे, पण स्वतःची जमीन, स्वतःचं घर, स्वतःची ओळख सोडत नसत. शहरात आल्यावर आपण ती साधी शहाणपणाची गोष्ट विसरलो.
आजवरचा आयुष्याचा अनुभव एकच सांगतो काम करायचं, मनापासून करायचं, पण स्वतःची किंमत विसरू द्यायची नाही. कारण कोणतीही कंपनी कायमस्वरूपी आपली नसते. आपण तिथं फक्त एक नोकरदार असतो. पण आपली मेहनत, आपलं कौशल्य आणि आपला स्वाभिमान हेच कायम आपल्यासोबत राहतो. त्यासाठीच कायम प्रयत्नशील रहायचं.
गणेश सुवर्णा तुकाराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...