गेले काही दिवस एकामागोमाग एक अश्या वाईटच बातम्या कानावर आदळत आहेत. अकाली आणि आकस्मिक मृत्यूच्या, परवा लेखक राधाकृष्णन पिल्लई अचानक हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच गेले. काल गोव्याचे एक राजकीय नेते आणि डॉक्टर, डॉ. केतन भाटीकर हे दांडेलीहून गोव्याला परतत असताना, लघवीसाठी अनमोड घाटात थांबले असता सर्पदंशाने गेले, आणि आज डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांच्या कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूची बातमी आली.
ह्यातल्या राधाकृष्णन पिल्लई ह्यांना मी व्यक्तिगत ओळखत होते. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच आमच्या कोचीला अर्धा तास छान गप्पा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी ही धक्का देणारीच होती. ते फक्त पन्नासच वर्षांचे होते. गोव्याचे काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर ह्यांचा मृत्यू तर वेळ आली की मृत्यू कुठेही गाठतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. डॉ. नाडकर्णी आजारी असले तरी त्यांचा मृत्यू हा बऱ्याच लोकांना अनपेक्षित असावा असे दिसतेय.
तीन व्यक्ती. तीन मृत्यू. एक अचानक, एक अपघाती, एक अनपेक्षित. पण तिन्हींत एक समान सूत्र, मृत्यू कोणाची उधारी ठेवत नाही. आपल्या शास्त्रांमध्ये एक संकल्पना आहे, स्मशानवैराग्य. कोणाच्या तरी मृत्यूनंतर त्याची चिता जळत असताना पाहत स्मशानात उभे असताना जे क्षणिक भान येते ते म्हणजे स्मशानवैराग्य. आयुष्यातले छोटे छोटे हेवेदावे निरर्थक वाटायला लागतात, भांडणांचे फोलपण जाणवते, जवळच्या नात्यांचे मोल कळते, आत साठवून ठेवलेल्या कडवटपणाची निरर्थकपणा जाणवायला लागते. पण ते तेव्हढ्यापुरतेच. स्मशान मागे सोडले की ते भान विरते. परत त्याच चिंता, त्याच नकारात्मक भावनांचे ओझे, तेच जुने राग लोभ विक्रमाच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखे परत मनावर चढून बसतात, आणि आपण परत आपल्या नेहमीच्या आयुष्यात प्रवेश करतो. असे का होते?
कारण आपण मृत्यूला परका मानतो. ही दुसऱ्या कोणासोबत घडलेली घटना आहे, आपल्या, आपल्या अगदी जवळच्या माणसांजवळ मात्र खूप वेळ आहे अशी स्वतःचीच खोटी समजूत घालून घेतो. हे आजचे नाही, हा सनातन मानवी स्वभाव आहे. महाभारताचे वनपर्व आठवा. बारा वर्षांचा वनवास संपत आला आहे. पांडव जंगलात तहानेने व्याकूळ झाले आहेत. नकुल, सहदेव, अर्जुन, भीम एकामागोमाग एक पाणी आणायला सरोवराकडे जातात, परत येत नाहीत. शेवटी मोठा भाऊ युधिष्ठिर स्वतः सरोवराकडे जातो. तिथे पाहतो तर चारही भाऊ निर्जीव पडलेले. एक यक्ष त्याला सांगतो, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरे दे, मग पाणी पी. पण चुकीचे उत्तर दिले तर मरशील. युधिष्ठिर थांबतो. यक्ष पहिला प्रश्न विचारतो, ‘किमाश्चर्यम्? या जगातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती?
युधिष्ठिर उत्तरतो -
अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यमालयम्।
शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम्॥
प्रत्येक दिवशी असंख्य प्राणी मृत्यू पावतात, तरीही हे पहात असणारे उरलेले लोक मात्र त्यांना मृत्यू कधीच येणार नाही अशी खात्री असल्यासारखे वागतात. यापेक्षा मोठे आश्चर्य काय असेल? हे व्यासांनी लिहिले. त्यालाही आता हजारो वर्षे उलटली असतील, पण तो श्लोक माझ्या या आठवड्याच्या अनुभवातून जन्मला आहे असेच वाटते. आता हे लिहिताना मी अस्वस्थ आहे, थोडी उदास आहे, पण थोड्याच वेळात मी जिमला जाईन, घाम गाळेन, घरी येऊन आंघोळ करेन, पुस्तक वाचेन, उद्याच्या कामांची यादी करेन. पुढच्या आठवड्यातल्या प्रवासाबद्दल उत्साहाने विचार करेन, जीवन पुढे वाहत राहील. यक्षाचे उत्तर आठवत, शेषाः स्थावरमिच्छन्ति. जे मागे उरतात ते कळत नकळत अमरत्वाची इच्छा करतात.
माझा उद्या उजाडेल हे किती सहज गृहीत धरून चालतो आपण ! मृत्यू सगळ्यांनाच कधीतरी गाठणार आहे हे माहित असूनसुद्धा. माझ्या बाबतीत तरी नाही, आज नाही, नंतर कधीतरी असा एक अदृश्य करार आपण स्वतःशीच दररोज करत असतो. राधाकृष्णन पिल्लईंनीही तसाच केला असेल. केतन भाटीकरांनीही. दांडेलीहून निघताना त्यांना तरी कुठे माहीत होते की घाटातला एक नेहमीचा थांबा हा अखेरचा थांबा असेल? वेळ आली की मृत्यू कुठेही, कसाही गाठतोच. जो जातो तो जातोच, त्याचे राग-लोभ-हेवे-दावे सर्वच कळ दाबली की बल्ब विझावा तसे एकदम विझतात. पण मागे राहिलेली माणसे? त्यांच्या मनात मात्र ती व्यक्ती कमी-अधिक काळ जिवंत राहते, म्हणून आपल्याकडे गेलेल्या व्यक्तींना ‘स्मृतीशेष’ असे संबोधायची पद्धत आहे.
व्यासांनी म्हटले की मृत्यूची अपरिहार्यता कळूनसुद्धा माणसे स्वतः अमर असल्यासारखी वागतात हे जगातले सर्वात मोठे आश्चर्य आहे. पण माझ्या मते हे आश्चर्यही आहे आणि अपरिहार्यता. जर माणसाला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला मृत्यूचे पूर्ण भान असते तर तो जगू शकला नसता. त्याने पिक पेरले नसते, मुले जन्माला घातली नसती, पुस्तके लिहिली नसती. कसलेही सृजनात्मक काम केले नसते. मृत्यूपासून एक हात लांब राहण्याचा हा भ्रमच आपल्याला काम करू देतो, सर्जनशील ठेवतो. प्रेम करायला प्रवृत्त करतो, आशावादी राहायला, आनंद शोधायला मदत करतो. पण हाच भ्रम आपल्याला आंधळंही करतो. सॉरी नंतर म्हणू, फोन उद्या करू. छातीत दुखत असले तरी चेकप पुढच्या आठवड्यात करू, माफ पुढे कधीतरी करू. आयुष्य मोठे आहे, वेळ आहे बक्कळ आपल्या हातात हा विचार करत आपण ज्या माणसांना भेटायचे होते त्यांच्यापासून दूर राहतो. ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या अर्ध्यावर सोडतो. जे सांगायचे होते ते पोटात ठेवतो. आणि मग एक दिवस चोरपावलांनी मृत्यू गाठतो. नव्हे तो असतोच बरोबर जन्मापासून, फक्त मध्यान्हीच्या सावलीसारखा अदृश्य असतो. जेव्हा वेळ येते तेव्हा ती सावली लांबचलांब होते आणि आपले अस्तित्व ग्रासून टाकते. व्यक्ती जाते आणि आपल्या हाती राहतात ते अर्धे तुटलेले संवाद, अचानक संपलेल्या शक्यता.
हे मी का लिहितेय माहित नाही. लेखन हे माझ्यासाठी प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखे असते. मनात साचलेले दृश्य, अदृश्य ताण, साठून राहिलेली नकारात्मकता, उदासी ह्या सगळ्यांचा निचरा करण्याचं एक साधन. आनंद चित्रपटात एक वाक्य आहे, राजेश खन्नाच्या तोंडचे, “बाबुमोशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं।” हे अश्या वेळी फार प्रकर्षाने आठवतं. राधाकृष्णन पिल्लईंचे आयुष्य लांबलचक नव्हते. पण मोठे होते. चोवीस पुस्तके, हजारो वाचक, चाणक्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. डॉ. नाडकर्णींनी आपल्या सदुसष्ट वर्षांच्या आयुष्यात जे करून दाखवले ते अनेकांना शतके लाभली तरी करता येणार नाही.
आपण मात्र नेमके उलटे जगतो. आजचा निर्णय उद्यासाठी राखून ठेवतो. आत्ता घेऊ शकणारा आनंद ‘पाहू कधीतरी’ वर ढकलतो. त्या माणसाला फोन करायचा होता, राहिला. त्या मैत्रिणीला भेटायचे होते जमले नाही. आईशी नीट बोलायचे होते, पण घाई होती. आपल्याकडे सगळे असते पण वेळ नसतो आणि वेळ येते तेव्हा माणूस नसतो. राधाकृष्णन पिल्लई मला निघताना म्हणाले होते, ‘भेटलो नाही निवांत बऱ्याच दिवसात, मी येईन पुण्याला, आपण एकत्र जेवायला जाऊ, गप्पा मारू’. ते संभाषण आता एका अर्ध्या लिहून झालेल्या वाक्यासारखे उरले आहे मनात. ते खोडता येत नाही, पण ते पूर्णही होणार नाही.
स्मशान वैराग्य क्षणिक असते. पण त्याचा गाभा खरा असतो. तर आज, या तीन मृत्यूंनंतर, मला एवढेच सांगायचे आहे. स्वतःलाही आणि हे जे कोण वाचणार आहे त्यांनाही. तो फोन करा. आजच. कोणाला जे सांगायचे आहे ते सांगा. उद्यावर ढकलू नका आणि स्वतःची काळजी घ्या. राधाकृष्णन पिल्लई फक्त पन्नास वर्षांचे होते. पन्नास. आपण स्वतःच्या शरीराला खूप गृहीत धरतो पण तेही एक आश्वासन आहे जे शरीर कधीही मोडू शकते. जगणे लांब असेल की नाही, सांगता येत नाही. पण मोठे असले पाहिजे. आनंद म्हणाला होता ते अगदी खरे आहे.
शेफाली वैद्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा