ज्या ज्या माणसांना TCS, अमरावती स्कॅन्डल या प्रकारांबद्दल पोटतिडकीने हळहळ वाटते. 'आपल्या' मुली नासवल्या गेल्या असं वाटतं. त्या सगळ्यांसाठी प्रश्न. आपण आपल्या मुलींना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी, लग्न संस्थेसाठी तयार करतोय का?
तेवीस चोवीस वर्षांची झाल्यावरसुद्धा तिच्या लग्नाचा विषय काढणं आज बहुतांश पालकांना मागासलेपणाचं वाटतं. मग तिच्या शारीरिक गरजा तिने पूर्णपणे मारून टाकाव्यात किंवा त्या वाट्टेल तिथून पूर्ण कराव्यात अशी त्यांची भूमिका आहे का?
या महत्त्वाच्या विषयावरती घरात प्रथम आई वडिलांची आणि नंतर मुलींबरोबर साधक बाधक चर्चा घडायला हवी.
ज्यांच्या मुली शिक्षण-नोकरीसाठी बाहेरगावी आहेत, करिअरसाठी लग्नाला नकार देत आहेत त्यांनी आपल्या मुलींशी याविषयी वेळ काढून मोकळा संवाद साधायला हवा.
लवकर लग्न नसेल करायचं तर वयाच्या तिशीपर्यंत फक्त पैसे कमवून किंवा जोडीला शारीरिक गरजा बाहेरून भागवून तिला आयुष्याचे संपूर्ण समाधान मिळेल का? हा विचार तिचे खरे हितचिंतक असणाऱ्या पालकांनी नाही करायचा तर कुणी करायचा?
बाईचे प्रत्येक मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतर स्वतः अनुभवलेली आई आपल्या मुलीच्या या महत्त्वाच्या बाबतीत कानाडोळा करत असेल तर याला स्त्री सक्षमीकरण म्हणता येईल का?
मग हल्लीच्या आयांपेक्षा पूर्वीच्या आया अधिक खमक्या म्हणाव्या लागतील. 'मुलीचं लग्नाचं वय उलटून जातंय' या काळजीमागे किती तार्किक विचार होता याचं आज अप्रूप वाटतंय.
लग्न झालेल्या संसारी स्त्रियांनादेखील आपल्या कर्तव्यांची जाणीव आहे का? स्त्री हक्क, स्त्री मुक्ती याबरोबरीने स्त्री कर्तव्याची जाणीव आज स्त्रीला नाही.
आपली मुलगी डॉक्टर बनावी, इंजिनियर बनावी किंवा पैसे कमावून स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी पदवीधर बनावी, म्हणून आपण तिला त्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देतो, लहानपणापासून तिच्या अभ्यासावरती लक्ष देतो. त्याचप्रमाणे आपली मुलगी आदर्श व्यक्ती बनावी, माता बनावी, पत्नी बनावी, गृहिणी बनावी यासाठी आपण तिच्यावर मेहनत घेतो का? त्यासाठी काही अभ्यासक्रम आपल्या घरात आहे का?
लग्न करू इच्छिणार्या मुलींना पुरुष आणि त्याचे पैसे ही फक्त उपभोगाची वस्तू नसून आपण आपल्या दोघांच्या संसाराला हातभार लावणं, वेळप्रसंगी काही त्याग करून आपल्या पिल्लांना पोषक असं वातावरण घरात ठेवणं ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव आज आपल्या मुलींना करून दिली जाते का?
तोच प्रकार बाळ होऊ न देण्याचा.
बाईने मूल जन्माला घालणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. लग्न झाल्यावर किंवा शरीर संबंध झाल्यावर बाळ होणं यात वेगळं असं काही नाही. त्याउलट फक्त आपल्या शारीरिक गरजा भागवून लग्नच 'न' करण्याचा किंवा मुलं जन्माला 'न' घालण्याचा निर्णय घेणं यात भूषण किंवा समाजावर उपकार नाहीत. उलट वैयक्तिक आणि समाजाचं नुकसानच आहे. आपली सगळी कर्तव्य नाकारून फक्त लाइफ एन्जॉय करणं हे मुलींना किती महागात पडतं आहे याची हजारो उदाहरणं आज आपल्या समोर आहेत.
ज्या स्त्रिया परिस्थितीमुळे कणखरपणे आयुष्यभर एकट्या राहिल्या अशा कर्तबगार स्त्रियांबद्दल मला नितांत आदर आहे. परंतु फक्त आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन (कधीकधी तेही नाही) मानसिक दृष्ट्या हतबल होणार्या आणि नैतिकता सोडणाऱ्या मुलींना आयुष्यात सुख, समाधान, शांती लाभेल का?
खरंतर लग्नव्यवस्था ही फक्त दोन जीवांसाठी नाही तर ती समाज टिकवण्याची एक महत्वाची गरज आहे.
पण इतके मोठे विचार सगळ्यांना पटत नाहीत.
वैयक्तिक स्वार्थ केंद्रस्थानी असलेल्या हल्लीच्या जगात लोकांनी फक्त स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबातील मुलींच्या रक्षणासाठी हे टिकवलं तरी पुष्कळ आहे.
आपले विचार जरूर सांगा.
- श्रेया कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा