मंगळवार, २९ जुलै, २०२५

2121. अमेरिकेत वास्तव्य असलेल्या एका भारतीय महिलेचा अनुभव

       त्यांनी त्यांच्या लहान मुलाला शाळेत घातलं होतं. परिक्षेचे दिवस जवळ आले तरी परिक्षेचं टाईम टेबल नाही, काय अभ्यास करून घ्यायचाय मुलाकडून ते कळवलं नाही. त्या घायकुतीला येऊन शाळेतल्या टिचरला भेटल्या. टिचरने शांतपणे सांगीतलं की मुलाची परीक्षा आहे त्यात पालकांनी लक्ष घालायची गरज नाही. मुलाचा अभ्यास ही आता आमची जबाबदारी आहे. त्याला काय येतं काय नाही हे आम्ही बघू. घरी त्याचा कसलाही अभ्यास घ्यायचा नाही. बाईंना हे ऐकून धक्काच बसला. आपल्याकडे मुलांची परीक्षा म्हणजे आई वडीलांचीच परीक्षा असते. त्यांचा क्राफ्टचा घरी करून आणण्यासाठी दिलेला प्रोजेक्ट, काढून आणायला सांगीतलेलं चित्रं हे आई वडीलच पूर्ण करून देतात. शाळांनाही ते चालतं.
     पण अजून धक्का बसणं पूर्ण झालेलं नव्हतंच. परीक्षा कधी विचारल्यावर उत्तर मिळालं की त्यांच्याकडे अशी कुठलीही तारीख किंवा वेळ ठरलेली नसते. वर्ग चालू असतांना एकेका मुलाला दुस-या खोलीत घेऊन जाऊन प्रश्न विचारले जातात. त्यांचा त्यावेळी उत्तर देण्याचा मूड नसला तर परत कधीतरी त्याची परीक्षा घेतली जाते. त्याला कुठल्या विषयात उत्तरं देता येत नाहीत ते बघून त्या विषयाची आवड कशी लागेल, त्याला तो विषय कसा समजेल त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. हे ऐकून तर त्या बाईंची शुद्ध हरपायचीच बाकी राहीली. त्यांची तर त्यांची पण वाचतांना माझी पण.
     या पुढची घटना तर आणखीनच थक्क करणारी. काही दिवसांनी त्या बाईंनी सांगीतलं की एकदा मुलगा शाळेतून रडवेला होऊन आला. त्याला मित्रांनी चिडवलं होतं, ‘ब्राऊन’ म्हणून. आईवडीलांना पण हा धक्काच होता. ते शाळेत गेले. टीचरला भेटले. तिने ऐकून घेतलं आणि त्यांना सांगीतलं की ही तर सुरूवात आहे त्याची जगाशी ओळख होण्याची. त्याची काहीतरी खोटी समजूत घालू नका, कणव वगैरे पण दाखवू नका. त्याला आणि तुम्हालाही ही गोष्ट फेस करायला हवीय. वर्गात काय करायचं ते मी बघते.
      नंतर तिने वर्गातल्या मुलांना किंवा या मुलालाही त्या घटनेची ओळखही दाखवली नाही. त्यांना रागवली नाही किंवा याला जवळ वगैरे घेऊन समजूत पण घातली नाही. परत कधी असं झालं तरी. नंतर उन्हाळ्यातल्या एके दिवशी तिने वर्गातल्या सगळ्या मुलांना साधे कपडे घालून यायला सांगीतलं. खेळाच्या वेळात सगळ्या मुलांना उन्हात कपडे काढून मैदानावर खेळायला लावलं. थोड्याच वेळात मुलांची त्वचा लाल लाल व्हायला लागली. कोणाकोणाला पुरळ आलं. कोणाच्या अंगावर चट्टे उठले. या ब्राऊन मुलाला मात्र कसलाच त्रास झाला नाही. मग त्या मुलांना वर्गात बसवून तिने जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमधलं हवामान कसं वेगवेगळं असतं आणि त्या हवामानाला साजेशी त्वचा, तिचा रंग निसर्गाने कसा तिथल्या लोकांना दिला आहे ते समजावून सांगीतलं आणि या ब्राऊन मुलाला निसर्गानेच संरक्षण दिल्याने त्याला उन्हाचा कसा त्रास झाला नाही तेही सांगीतलं.
    सगळेजण कौतुकाने आणि आदराने त्याच्याकडे बघायला लागले. त्याला सुद्धा स्वतःच्या कातडीच्या रंगाचं कौतुक वाटलं. सगळ्यांच्या नजरांनी त्याला स्वतःबद्दल खूप भारी भारी वाटलं. पुन्हा कोणी त्याला रंगावरून चिडवलं नाही.
    हे ऐकल्यावर मला खरंच त्या टिचरचे पाय धरावेसे वाटले. मुलांना ती नुसतं पुस्तकी माहीती, पुस्तकी विद्या शिकवत नव्हती खरोखरच ज्ञानी करत होती. त्यांच्याही नकळत त्यांना माणूस बनवत होती. यालाच म्हणतात रचनावादी शिक्षण. ह्यातून आपण काहीतरी शिकणार आहोत का? विचार करायला काय हरकत आहे?

2120. रिकामा उपदेश

     ही अशावेळची सत्ययुगातील कथा आहे ज्याठिकाणी सर्व प्राणी आणि मनुष्य एकमेकांबरोबर बोलत होते. बकरीने कसायाच्या मागे स्वतःला ओढताना पाहिले आणि त्याच क्षणी साधूला पाहिल्यानंतर त्याच्या आशा वाढल्या. डोळ्यात मृत्यू होताच तो विनवू लागला- 
'महाराज ! माझ्याकडे लहान कोकरे आहेत. कृपया या कसायापासून माझे प्राण वाचवा. मी जिवंत असेपर्यंत मी तुम्हाला माझ्या मुलांसाठी असलेले दूध देत राहीन."
बकरीच्या दुःखद रडण्याचा साधूवर काहीही परिणाम झाला नाही. तो उदासीनपणे म्हणाला- 
'मूर्ख शेळी, तुला माहित नाही का की मी एक साधू आहे? जीवन-मृत्यू, सुख-दु:ख, आसक्ती-भ्रम या पलीकडे प्रत्येक प्राण्याला एक ना एक दिवस मरावेच लागते. समजून घे की तुझा मृत्यू या कसायाच्या हातून लिहिला आहे. जर त्याने पाप केले तर देव त्यालाही शिक्षा करेल.
"माझ्याशिवाय, माझी कोकरे जिवंतपणी मरतील,' असे म्हणत बकरी रडू लागली.
"तू मूर्ख आहेस, रडण्यापेक्षा देवाचे नाव घेणे चांगले. लक्षात ठेव, मृत्यू हा नवीन जीवनाचा दरवाजा आहे. सांसारिक संबंध हे आसक्तीचे परिणाम आहेत." संन्यासीने उपदेश केला. बकरी निराश झाली.
जवळ उभा असलेला एक कुत्रा जो संपूर्ण दृश्य पाहत होता त्याने विचारले- 
"संन्यासी महाराज, तुम्ही आसक्ती आणि भ्रमापासून पूर्णपणे मुक्त आहात का?
संन्यासीने पटकन उत्तर दिले- ''अगदी, माझे संपूर्ण कुटुंब होते. सुंदर पत्नी, चांगले वागणारे भाऊ आणि बहिणी, पालक, काका, मुलगा आणि मुलगी. प्रचंड संपत्ती. मी एकाच वेळी सर्व काही सोडून देवाच्या आश्रयाला आलो. सांसारिक मोहांपासून खूप दूर, मी सर्व काही सोडले आहे. मी आसक्ती आणि भ्रमाचे हे अर्थहीन जग सोडले आहे." चिखलात कमळ असल्याप्रमाणे, संन्यासी बढाई मारू लागला.
कुत्र्याने स्पष्ट केले- "जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बकरीचे प्राण वाचवू शकता. कसाई तुमच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणार नाही. जर एका जीवाचे तारण झाले तर ते किती छान होईल."
संन्यासीने कुत्र्याला जीवनाचे सार समजावून सांगण्यास सुरुवात केली- ''मृत्यू निश्चित आहे, आज नाही तर उद्या, प्रत्येक जीवाला मरावेच लागेल. याची काळजी करत संन्यासी बढाई मारू लागला. जीव स्वतःला त्रास देतो व्यर्थ. संन्याशाला वाटले की तो त्याला जगाच्या भ्रमातून मुक्त करत आहे. संन्यासी अजूनही आपले ज्ञान दाखवत असताना अचानक एक काळा नाग त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याचा कणा उंचावला. तो काही अज्ञात कारणाने संन्याशावर रागावला. जणू काही त्याने ठरवले होते की तो आज त्याला चावेल. सापाला पाहून संन्याशाला घाम फुटला. भ्रमातून मुक्ततेचा उपदेश करणाऱ्या संन्याशाने कुत्र्याकडे मदतीसाठी पाहिले.
कुत्रा हसून म्हणाला. ''संन्यासी महाराज, मृत्यू हा नवीन जीवनाचा दरवाजा आहे. तो एक ना एक दिवस येणारच आहे, मग काळजी का करायची?'' कुत्र्याने संन्याशाचे शब्द पुन्हा सांगितले.
''मला या सापापासून वाचवा.'' स्वतःचा सल्ला विसरून संन्याशाने विनवणी करायला सुरुवात केली. पण कुत्र्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
कुत्रा म्हणाला- ''तुम्ही आता यमराजाशी बोला. बकरीलाही जगायचे आहे. कसाई ते घेऊन जाण्यापूर्वी मला माझे कर्तव्य पार पाडावे लागेल.''
असे म्हणत कुत्र्याने उडी मारली. सापावर हल्ला केल्यानंतर तो सापाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला. मग तो कसायाकडे धावला आणि त्याच्यावर हल्ला केला. कसायाला अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरू शकला नाही आणि तो घाबरून इकडे तिकडे पळू लागला. जेव्हा बकरीची पकड सैल झाली तेव्हा तो जंगलात गायब झाला. कसायाशी व्यवहार केल्यानंतर, कुत्र्याने संन्यासीकडे पाहिले. संन्यासी अजूनही 'मृत्यू'समोर थरथर कापत होता. कुत्र्याला संन्यासीला त्याच्या स्थितीत सोडून पुढे जावे असे वाटत होते पण विवेकाचा आवाज ऐकला नाही. तो विषारी सापाच्या मागे धावला आणि त्याची शेपटी पकडली आणि झुडुपांकडे फेकली. संन्यासीला दिलासा मिळाला. तो कृतज्ञतेने भरलेल्या डोळ्यांनी कुत्र्याकडे पाहू लागला.
कुत्रा म्हणाला- ''महाराज, माझ्या समजुतीनुसार फक्त तेच मृत्यूला घाबरतात जे फक्त स्वतःसाठी जगतात. माणूस आणि प्राण्यात काय फरक आहे? मानव फक्त स्वतःची काळजी घेतात पण प्राणी इतरांची काळजी घेतात. परमेश्वराचे नाव जपून कोणीही देवाचे आवडते होत नाही. देवही प्रसन्न होतो. ज्यांच्या हृदयात दया आणि करुणा नाही त्यांच्याशी ते तसे नाहीत. धार्मिक प्रवचने आपल्याला काही क्षणांसाठी पापाच्या भावनेपासून वाचवतात, परंतु जगण्यासाठी संघर्ष अपरिहार्य आहे आणि हेच वास्तव आहे. जर हृदयात करुणा आणि प्रेम नसेल तर धार्मिक विधी देखील केवळ दिखावा बनतात."

2119. म्हणून घराच्या दारात तुळस असावी

     घरी विठ्ठल तुळस आणून तीन चार वर्षं झाली असतील. यंदाच्या फेब्रुवारी- मार्च पर्यंत सदैव छान बहरलेली होती. दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला तिचा विवाह सोहळा व्हायचा. बाबांना दिवसातून तीन चार वेळा तुळशीची पानं खायला लागायची. आई वाटीत काढून ठेवायची. दररोज देवघरातल्या कृष्णाला तुळशीचा छोटासा हार आई करायचीच. कर कटीवर असणाऱ्या पांडुरंगाचाही एक तुलसीहार असायचाच. दररोज सकाळी देवघरातल्या देवांची पूजा झाल्यावर आई तुळशीला पाणी घालून, हळद कुंकू वाहून, दूध साखरेचा नैवेद्य दाखवून, उदबत्ती लावून मनोभावे नमस्कार करायची. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा, हळदकुंकू आणि उदबत्ती व्हायलाच हवी. दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी.
"घरात,  अंगणात तुळस असली की घरावर संकटं येत नाहीत. तुळस आपल्या अंगावर झेलते आणि घराला जपते." असं आई नेहमी सांगते. 
फेब्रुवारी - मार्च मधे विठ्ठल तुळस छान बहरलेली. नेमकं त्याच वेळी आईचं मोठ्ठं दुखणं रिपोर्ट झालं. बाबा जाऊन सहा महिने होतायत तोवर हे आईचं दुखणं. जे तिनं बाबांच्या दवाखान्याच्या धकाधकीत मुलांवर आपल्या आजारपणाचं ओझं नको म्हणून तसंच अंगावर काढलं होतं. आमच्या आख्ख्या घराचं धाबं दणाणलं होतं. आईचं मेजर ऑपरेशन करायचं ठरलं. आम्ही सगळे टेन्शनमधे आणि ही बाई बिनधास्त. ॲडमिट झाली अगदी हसत-खेळत. 
"घाबरू नका रे. सगळं नीट होणारेय. माझा रामराया आहे, तुझे समर्थ आहेत, आईचे माऊली आहेत आणि सगळ्यात भारी तुझा मित्र मारुतीराया आहेच की माझ्याबरोबर. मग मला काय धाड होणारेय. मी ठणठणीत बरी होणारेय. अजून प्रयागराज-काशी करायचंय मला. एक काम कर, आपल्या अंगणातल्या तुळशीला पाणी घालून, तिथं दिवा लावून, नैवेद्य दाखवून तिला निरोप द्या, तिला सांगा. की मी परत येणारेय तोवर माझ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. घर सांभाळायला मी सांगितलेय म्हणावं ! आणि येताना माझ्यासाठी चार पाच पाने घेऊन या !"
ऑपरेशनच्या दिवशी सकाळी उठून आईनं आपलं आपलं व्यवस्थित आवरलं, रोजचा हरिपाठ म्हटला, रामरक्षा, भीमरुपी म्हटली आणि "मारुतीराया, चल रे माझ्याबरोबर, धर माझा हात !" असं म्हणत तुळशीची पानं चघळत ती ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. 
ऑपरेशन झालं. नंतरचे रिपोर्ट नॉर्मल आले. आई घरी आली. दारातच माझ्या बायकोने तिची मीठमोहरीनं दृष्ट काढली. पण घरात यायच्या आधी आई अंगणात तुळशीकडे गेली. बायकोकडून पाणी घेतलं आणि तुळशीला घातलं. हळदकुंकू वाहून नमस्कार केला. "तू होतीस म्हणून मी निर्धास्त होते बघं. थोरली बहिणीचा मान घेतेस तर त्याबरोबर मी नसताना घराला सांभाळायची जबाबदारी पण मग तुझीच आहे ना. सगळं कसं छान सांभाळलंस गं बाई तू... आता आराम कर... मी आलेय आता !"
आईचं रुटीन पूर्ववत् व्हायला नंतरचे दोन महिने तरी लागले. हळूहळू ती पूर्ववत् झेपेल तशी घरातली कामं करू लागली आणि मुख्य तिच्या आवडीचं काम. रोजची देवपूजा अगदी षोडशोपचारे करु लागली. एप्रिलमध्ये तिला प्रयागराज-काशीला पाठवलं. घरातून निघताना तुळशीजवळ गेली, नमस्कार केला पण चेहेऱ्यावर काळजी दिसत होती.
"का गं? चेहेरा का असा काळजीत पडलाय?" मी विचारलं.
"माझं तसं काही नाही रे. पण ही बघ की. थोडी काळवंडलीय रे. सुटत चाललीय असं वाटतंय. नविन आलेली पानंही आकाराने छोटीच आहेत आणि वाढही मंदावल्यासारखी वाटतेय."
मलाही ते जाणवलं. 
"अगं आई, उन्हाळा सुरु होतेय ना म्हणून थोडं तसं झालं असेल. आपल्यासारख्या माणसांना ते वातावरण बदलाचे त्रास होतात. ही तर वनस्पती आहे. तिलाही थोडा त्रास होणारच की. पण होईल ती नीट. या बदलत्या वातावरणाला घेईल ती जुळवून. बहरेल ती. तू नको काळजी करू. तू निर्धास्त जाऊन ये."
घरातून तिचा पाय निघत नव्हता पण ती प्रवासाला गेली आणि प्रयाग राज आणि काशीला जाऊनही आली.  रामेश्वरहून आणलेल्या वाळूचे शिवलिंग काशीला गंगेच्या तीरावर करुन काशी विश्वनाथाची रूद्राध्याय आवर्तन करुन प्रार्थना केली. आई परत आल्यावर तिला चांगलंच जाणवलं. तुळस मंदावली होती. थोडी थकली होती. रंग बदलत होता. पण पालवी फुटत होती. आशा पालवत होती. तोवर मे महिना आला. कडक उन्हाळा लागला. सकाळी पाणी घातलं तरी संध्याकाळी पानं मलूल होऊन जायची.  दररोज संध्याकाळी दिवा लावताना आई तिला सांगायची, "सांभाळ गं तब्ब्येतीला. ऊन जरा जास्त आहे पण तुला सावलीही आहे. तरी पण तू अशी अशक्त का होतेयस? काही होतंय का? माझी नको काळजी करुस. मी आता ठणठणीत आहे. आता हे पुढचे रिपोर्ट नॉर्मल आले की तू आणि मी झिम्मा खेळायला मोकळ्या !" हळदकुंकू वाहून आई रामरक्षा म्हणत तिथंच बसायची.  ऑपरेशन नंतर चार महिन्यांनी आईच्या काही टेस्ट करुन रिपोर्ट घ्यायचे होते. २७ जूनला टेस्ट झाल्या. २९ जून. आषाढी एकादशी..आई पूजा करतेय. पांडुरंगाला तुळशीचा हार घालतेय. पण मनात तिच्या खंत आहे की तो हार घरच्या तुळशीचा हार नाहीये. पूजा झाल्यावर नेहमीप्रमाणे आईनं तुळशीचीही पूजा केली. घोगऱ्या आवाजात तिला म्हणाली, "बाई गं...हे असं काय करुन घेतलंयस स्वतःचं? कसली काळजी करतेस? नीट राहा गं. किती हडकली आहेस बघ एकदा. तुझी काळजी वाटतेय गं आणि मला कसली तरी भितीही वाटतेय. सांभाळून घे गं बयो !"
संध्याकाळी मी आईचे रिपोर्ट घेऊन आलो. सगळे नॉर्मल होते. तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो.
"काकू, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. सगळं छान झालंय. तुमची कमाल आहे. आता सगळी औषधं बंद. फक्त एक गोळी दिवसभरात. ती पण तुमच्या बी.पी.साठीची. आता निर्धास्त राहा. भरपूर फिरा, मजा करा ! आणि आता माझ्याकडे यायचं असेल तर या मुलाकडं म्हणून हक्कानं यायचं.  पेशंट म्हणून अजिबात यायचं नाही. कळलं !" 
घरी येईपर्यंत रात्र झाली होती. घरी आल्या आल्या आई अंगणात गेली तुळशीसमोर ! तुळस मलूल झालेली होती. निरांजनाच्या उजेडात ती खूप थकलेली वाटत होती. तिनं खूप काही सोसलंय असं जाणवत होतं. खरं खोटं करण्याच्या पलिकडंच होतं ते सगळं. आणि मी ते करायच्या फंदातही पडणार नाही कारण आई तिथं गुंतली होती. आईला धक्का लावून काय मिळवायचंय? जेवताना आई अस्वस्थ होती.
जेवण झाल्यावर सुपारी चघळत आई म्हणाली. "उद्या तुळशीचं नविन रोप घेऊन ये. या तुळशीला निरोप द्यायची वेळ आलीय. आज तिच्याकडे बघताना माझे रिपोर्ट नॉर्मल का आलेत हे कळ्ळलंय मला. थोरली बहीण रे. धाकट्या बहिणीला जपलं तिनं. सांभाळलं तिनं. उद्या तिचा निरोपाचा दिवस. पाठवणीचा दिवस ! खूप झेललं तिनं, खूप सोसलं रे. आता नको तिला अडकवायला."
आई डोळे पुसत झोपायला गेली. मी सुन्न होऊन बसलो. 
हे असं सगळं कुठून येतं असेल हिच्या मनात ? कसं सुचत असेल ? का ही माणसं हा असा एवढा जीव लावतात ? 
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया...
आभाळमाया !
सकाळी तुळशीचं नविन रोप आणलं. आईनं त्याची पूजा केली. दोन्ही तुळशीची भेट घडवली. "बाई गं... तू आलीस आणि ही निघालीय. तू हिचे आशिर्वाद घे आणि हिला संतुष्ट मनानं निरोप दे. गळाभेट होऊ दे. या हृदयीचे त्या हृदयी संवाद होऊ दे. गुजगोष्टी-कानगोष्टी होऊ देत आणि मग प्रसन्न वदने एकमेकींचा निरोप घ्या."
हळदकुंकूमार्चन झालं, आरती झाली आणि आईनं स्वतःच्या हातानं वृध्द झालेली तुळस बादलीतल्या काशीहून आणलेलं गंगेचं पाणी घातलेल्या पाण्यात  ठेवली आणि नमस्कार करत म्हणाली...
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्.
आई हळवी झाली होती. घरात आली आणि म्हणाली. "तुळस वनस्पती असली म्हणून काय झालं. आपल्या घरातलीच होती ना ती. नातं जुळलं होतं रे तिच्याशी. तुझे बाबा शेवटपर्यंत विचारायचे, "तिला पाणी घातलं का? तिला दिवा लावला का?" ते गेल्याचं कळ्ळं होतं बघ तिला. तेव्हापासूनच ती एकटी होत गेली. आणि माझं हे सगळं दुखणं तर तिनं स्वत:वर घेतलं. बहिणाबाई म्हणवून घ्यायची भारी हौस होती तिला. सगळं नीट करुन गेलीय. सुखानं गेलीय. समाधानाने गेलीय. आणि जाताना ही तिची लेक आपल्याकडे सोपवून गेलीय. सांभाळायचं बघ तिला आता. तिला मोठी करायची.  कृष्णानं सांगितलेय ते आठवायचं आणि आपली समजूत घालून घ्यायची.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि 
नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो 
न शोषयति मारुतः .
आत्मा अविनाशी आहे. त्याला अंत नाही. तो फक्त शरीर बदलतो. गेली तरी ती इथंच आहे."
भर दुपारी मी गारठलो होतो. 
मी आईकडे बघत होतो.
आई तुळशीकडे बघत होती.
आईच्या समोर ती नविन तुळस वाऱ्यासवे लहरत होती. आईच्या डोळ्यात नक्षत्र उतरले होते.

2118. झेंडा

      आई अगं अमेरिकेला जायची संधी मला परत देखील मिळेल. पण बाबांना ह्या अवस्थेत सोडून माझा पाय निघणार नाही इथून. मी ऑफिसमध्ये उद्या कळवून टाकीन माझा निर्णय."
माझं बोलणं ऐकून घरात पूर्ण सन्नाटा पसरला. आई, दादा, वहिनी आणि दादाची बच्चेकंपनी अवाक् होऊन माझ्याकडे बघत होते. दादा काही बोलणार इतक्यात मीच पुढे होऊन दादाचे दोन्ही हात पकडून म्हटले,
" दादा, तु नको आग्रह करूस. मला माहीत आहे की तु आणि वहिनी खंबीरपणे सगळं छानपैकी सांभाळून घ्याल आईच्या सोबतीने.पण तरीही माझा पाय नाही निघणार घरातून. आजवर माझ्या शिक्षणासाठी कमी का कष्ट घेतले आहेत तुम्ही दोघांनी. आपल्या बेताच्या परिस्थितीत तु तुझी बुध्दीमत्ता गुंडाळून ठेवून फक्त पदवीधर होऊन नोकरी पकडलीस. बाबांनी आपल्या राहत्या घरावर कर्ज काढून माझं महागडं शिक्षण पूर्ण केले. माझ्या पहिल्याच नोकरीत वर्षभरातच आमच्या परदेशी कंपनीच्या मुख्यालयात प्रशिक्षणासाठी माझी निवड होणे सगळं अभिमानास्पद आणि गौरवास्पद जरूर आहे आपल्या सर्वांसाठी. बाबांसाठी तर आणखी जास्त. दोन आठवड्यांपूर्वी ही बातमी ऐकून सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच झाला होता. गणपतीच्या देवळात पेढे ठेवून आले होते ते.पण आठवड्यानंतर त्यांना अचानक झालेला जीवघेणा अपघात. आख्खं घर हादरलं जेव्हा ही बातमी पोलीस घेऊन दारात उभे राहिले तेव्हा. दादा अरे बाबा म्हणजे माझ्या आयुष्यावर अभिमानाने फडकणारा झेंडा आहे. नेहमीची नोकरी करत त्यांनी कित्येक वर्षे अर्धवेळ नोकरी देखील केली. तुझ्यावर शिक्षणाच्या बाबतीत जो अन्याय त्यांना नाईलाजाने करायला भाग पाडला परिस्थितीने तीच पुनरावृत्ती त्यांना माझ्या बाबतीत होऊ द्यायची नव्हती. म्हणूनच पहाटे सात वाजता घर सोडताना उभारलेला कष्टांचा झेंडा पार रात्री दहा वाजता घरी आल्यावर ते उतरवायचे. हा उपक्रम अव्याहतपणे कित्येक वर्षे सुरू होता. ह्याच झेंड्याला खणखणीत सलाम ठोकत मी माझा खर्चिक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नवीन नोकरीत उच्च पदावर रूजू झालो.
दादा ,अरे परदेशी कंपनीच्या मुख्यालयातील माझं प्रशिक्षण कमीत कमी सहा महिन्यांचे आहे.  बाबांना ह्या अवस्थेत तुम्हा सगळ्यांवर सोडून मला तिथे जाणं शक्य नाही. मी माझ्या मनाला पूर्णपणे समजावलं आहे. तुम्ही देखील सगळ्यांनी समजून घ्या 🙏 नशिबात असेल तर अशी संधी भविष्यात देखील मिळेल मला. मी ह्या बाबतीत सकारात्मक आहे.
बाबांचा आजवरच्या कष्टांचा झेंडा सध्यातरी फडकणार नाही. म्हणूनच इथेच राहून त्यांची सर्वोतोपरी काळजी घेऊन, शुश्रुषा  करून मी त्या झेंड्याला परत स्वाभिमानाच्या आकाशात लवकरात लवकर फडकवण्याचा काटेकोर प्रयत्न करणार आहे. आजपासून बाबांच्या आजारपणाची सगळी जबाबदारी मी माझ्याकडे घेत आहे. नोकरी सांभाळून मी जे अंगावर पडेल ते सगळं करीन. म्हणूनच मला परदेशी जायचं नाही सध्यातरी.
दादाने मला माझं बोलणं ऐकून घट्ट मिठी मारली आणि आईला म्हणाला, "बघ आई, तुझा हा लाडोबा खरंच खुप मोठा झाला आता. नशीबवान आहात तुम्ही  दोघंही आम्हा दोघांच्या बाबतीत. तुमची शिकवण आणि आमच्यावर केलेले संस्कार आज ह्या तुझ्या लाडोबाच्या तोंडून घडाघडा वदले गेले. आता बघच तु बाबांच्या तब्येतीत लौकरात लौकर सुधारणा होऊन ते घरी सुखरूप परततील."
"असेच रहा दोघंही. मी दृष्ट काढते दोघांची" असं म्हणून आई स्वयंपाकघरात गेली आणि दादाने मारलेली मिठी आणखी घट्ट करत मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आतापर्यंत डोळ्यांत रोखून धरलेले अश्रू सोडून मोकळा झालो.

2117. फोन

      मीटिंग सुरू असतानाच टेबलवर ठेवलेला फोन वायब्रेट झाला आणि संपूर्ण हॉलमध्ये लक्ष वेधलं गेलं की कुणाचा तरी फोन आला आहे. मोठ्या पदावर असलेले अधिकारी अत्यंत सौम्यतेने म्हणाले,
"फोन सायलेंट करून बसा प्लीज."
दीपक अचानक गोंधळून गेला. त्याने पटकन फोन उचलला, कॉल कट केला - न पाहताच की कॉल कोणाचा होता.
"सॉरी सर.." असं म्हणत त्याने लाजून फोन बंद केला आणि पुन्हा त्या पांढऱ्या बोर्डाकडे लक्ष दिलं, जिथे पुढच्या वर्षाचे टार्गेट्स दाखवले जात होते. पण त्या एका वायब्रेशनने त्याच्या मनाची एकाग्रता नकळत तोडून टाकली होती. दीपक मध्यमवर्गीय कुटुंबातून होता. ७ वर्षांपासून नोकरीत होता आणि मेहनत, प्रामाणिकपणा आणि नम्र स्वभावामुळे सगळ्यांचा लाडका होता. एका खासगी कंपनीत सीनियर ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून तो काम करत होता. त्या दिवशी ऑफिसमध्ये रीजनल मीटिंग होती, ज्यात हेड ऑफिसमधून मोठे अधिकारी आले होते. संपूर्ण टीमचं लक्ष दीपककडे होतं कारण त्यालाच प्रेझेंटेशन द्यायचं होतं. प्रेझेंटेशन संपलं, आणि टाळ्यांच्या गजरात त्याच्या मेहनतीचं कौतुक ऐकू आलं. मीटिंग यशस्वी झाली. अधिकाऱ्यांनी त्याची स्तुती केली. मीटिंगनंतर सगळे रिफ्रेशमेंटकडे वळाले, पण मात्र दीपक तसाच खुर्चीत बसून राहिला. डोकं खाली, डोळे टेबलकडे. जिथे त्याचा फोन अजूनही बंद पडला होता. अचानक त्याच्या मनात ती आठवण जागी झाली. फोनचं वायब्रेशन. तो एक कॉल. आईचाच तर नव्हता ना? दीपकने घाईने फोन ऑन केला.
फोन ऑन होताच पहिला मेसेज झळकला,
"दीपक, पटकन कॉल कर. आईची तब्येत अचानक बिघडली आहे. हॉस्पिटलला नेत आहोत."
भाऊ राकेशचा मेसेज. १२:१७ PM.
घड्याळ पाहिलं . २:०५ PM.
म्हणजे जवळजवळ १ तास ४८ मिनिटं. अनवधानाने त्याने आईचा कॉल दुर्लक्षित केला होता. थरथरत्या हातांनी त्याने राकेशला कॉल केला. रिंग वाजली. राकेशने उचलला, पण त्याचा आवाज भरून आलेला होता.
"दीपक... आई गेली रे यार..."
त्याच्या कानात जणू काही स्फोट झाला.
"क...काय म्हणालास?"
"मी... मी फक्त फोन कट केला होता... मी पाहिलंच नाही..."
"तू ये रे... आता काही बोलण्यासारखं नाही उरलं..."
फोन हातातून पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिथेच मीटिंग रूममध्ये. लोक रिफ्रेशमेंटमध्ये व्यस्त होते. कुणाचं लक्ष नव्हतं. पण दीपकला आता काहीच दिसत नव्हतं. फक्त एक चेहरा दिसत होता. आईचा, तिचा तो हसरा चेहरा, जेव्हा तो घरी यायचा तेव्हा. आणि त्याला आठवलं. सकाळी तो लवकर निघाला होता, आईला कॉल करायचा वेळ नव्हता, म्हणून म्हणाला होता,
"अगं आई, आज मीटिंग आहे. संध्याकाळी निवांत बोलतो."
आई म्हणाली होती,
"ठीक आहे बेटा, पण नीट कर प्रेझेंटेशन आज. देव तुझ्या प्रयत्नांना यश देवो...! "
तेच शेवटचे शब्द होते आईचे. कदाचित आईने शेवटचा प्रयत्न केला होता. मुलाचा एकदा तरी फक्त आवाज ऐकायला. पण मुलगा. त्या दिवशी ‘प्रेझेंटेशन’मध्ये जिंकला… पण ' आई' ला हरवून बसला.
दीपक त्या संध्याकाळच्या ट्रेनने गावी रवाना झाला. जेव्हा घरी पोहचला, तेव्हा पांढऱ्या चादरीखाली झाकलेला आईचा शांत देह पाहून त्याचे हृदय तडफडले. राकेश म्हणाला,
"आईला सकाळी थोडी चक्कर आली मग अचानक श्वास जड झाला. हॉस्पिटल मध्ये नेत असताना, त्यांनी तुझं नाव घेतलं."
दीपकने आईचा फोन पाहिला. त्यात एकच आउटगोइंग कॉल होता. दीपकला. त्याच्या नंतर आईने फोन हातात घेतलाच नव्हता. पुढचे कित्येक दिवस दीपक फक्त एकच विचार करत राहिला. 
"जर मी त्या क्षणी कॉल पाहिला असता. जर मीटिंगमधून बाहेर जाऊन कॉल घेतला असता... तर..."
असं खूप "जर-तर्" आता त्याच्या जीवनाचा भाग झाले होते. बाहेरच्या जगात लोक त्याच्या कामाचं कौतुक करत होते. पण आतला दीपक रोज रात्री आईची माफी मागत होता. 
      आज आईला जाऊन दोन वर्षे झाली आहेत. दीपक अजूनही त्याच कंपनीत काम करतो, पण त्याने आता एक सवय बदलली आहे. कधीही फोन वाजला, वायब्रेट झाला. तो आधी पाहतो की कोणाचा आहे. कधी कधी कॉल्स महत्वाचे नसतात, पण "माणसं" महत्वाची असतात. एकदा ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा होता - सौरभ.
मीटिंग सुरू होती. त्याचा फोन वाजला. तो उठून बाहेर जायला लागला. दीपकने अधिकाऱ्यांकडे पाहून सौम्यपणे सांगितलं,
"सॉरी, तो एक महत्वाचा कॉल असू शकतो. थोडा वेळ द्या त्याला."
मीटिंग थोडी थांबली. सौरभ बाहेर गेला, मग परतला. डोळ्यांत अश्रू होते.
"सर. बहिणीचा अपघात झाला आहे. हॉस्पिटलला जातोय."
दीपकने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हटलं,
"जा सौरभ. तुझी सगळ्यात महत्वाची मीटिंग तिथेच आहे आत्ता."
एक मीटिंग, एक प्रेझेंटेशन, एक नोकरी हे सगळं आयुष्याचा भाग आहे. पण जे लोक आपल्याला निस्वार्थ प्रेम करतात.  आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र. त्यांचा एक फोन कधीही दुर्लक्षित करू नका. कारण.
"कधी कधी एक मिस्ड कॉल एक  आयुष्यभर बोचणारी अपूर्ण गोष्ट बनून जाते...!"

2116. श्री रूद्राभिषेक महत्त्व

 श्री महादेव रूद्राभिषेकाची महत्वपूर्ण माहिती
कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे व रूद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदवी अथवा श्री महादेवाला आपल्या घरीत वर्षातून एक तरी करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पुर्ण वास्तु मध्ये शिपडावे. 
●रुद्राभिषेकाचे महत्व :
     रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदा पासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे. ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद्पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे.
रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.
     रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात. 
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात
रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:
१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी "नमः" असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.
२] अकरा चमके म्हणजे ज्यात "च मे" हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो.
चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.
याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला "ओम शान्तिः शान्तिः शान्तिः" हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात. 
एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.
यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]
तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४]
सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९]
त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.
आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ. इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.
तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.
रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.
हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.
या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.
अभिषेक :
अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.
श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक 
रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) - ११ आवर्तने
लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने
महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) - १३३१ आवर्तने
अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) - १४६४१ आवर्तने
(नोट:- हे विधान आपल्या वास्तु मध्ये करावे)
श्री गुरूचरित्रा मध्ये रूद्र अभिषेकाचे महत्त्व सांगितले आहे
आ. ३४ नुसार पुढील प्रमाणे,
श्री गुरुनृसिंहसरस्वती त्या ब्राम्हण पतिपत्नीला म्हणाले, "पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षमहिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधानपुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशारांच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, "मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्मवृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे कुक्कुट-मर्कट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले, थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, "राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल, याची कल्पना आहे; परंतु सत्य काय आहे ते सांगितले पाहिजे. नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना ?" राजा म्हणाला, "भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारीत आहे. जे असेल ते सांगा." पराशर म्हणाले, "मग ऐक तर ! तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला बारा वर्षे झाली आहेत. आजपासून सातव्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल." पराशारांचे हे शब्द भद्र्सेनाला वज्रघातासारखे वाटले. तो एका-एकी बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशारांचे पाय पाय धरून विनवण्या करू लागला, "मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काहीही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा."
राजाचा तो शोक पाहून पराशारांना त्याची दया आली. ते भद्र्सेनाला समजावीत म्हणाले, "राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल, तर त्या शूलपाणि शिवशंकराला शरण जा.त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रम्हदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रम्हदेवाला चारी वेदांचा उपदेश केला. या चारी वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय, हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे.असे स्वतःच शंकरांनीच सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्रध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्रध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने, परमश्रद्धेने श्रवण-पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रम्हदेवांना सांगितला. ब्रम्हदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रियापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्वप्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्याससुद्धा यमदूत घाबरतात.
मात्र हा रुद्राचा जप, गर्वाने, उभे राहून, निजून, अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाहीत.रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो, तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल. गंडांतर टळेल. यासाठी भगवान शंकरांवर दहा हजार रुद्रावर्तनांनी अभिषेक कर, शंभर घटांची स्थापना कर. त्यात दिव्यवृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलावर सिंचन कर. नित्य दहा हजार रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थ प्राशन करू दे म्हणजे तुझा मुलगा दहा हजार वर्षे जगेल."
पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राम्हणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरु केले. शंकरावर अभिषेक सुरु केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्रानुष्ठान अखंड सात दिवस चालू होते. सातव्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुध्द पडला. ते पाहताच पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राम्हणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्मरूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनच्या डोळ्यांतून आनादाश्रू वाहू लागले. पराशारांना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, "राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. " मग त्यांनी सुधार्माला विचारले, "बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का ? " सुधर्म म्हणाला, "एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याचवेळी चार दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली." हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकरांचा जयजयकार करू लागला.
नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरु झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राम्हणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशारांना महासनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारदमुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले. "मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करता, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का ?"
नारदमुनी म्हणाले, "मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. "माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले ?" असे यमाने विचारले असता वीरभद्र त्याला म्हणाला, "तू भद्रसेनच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास ? त्याला दहा हजार वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. हे तुला माहित नाही का ? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास ? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. " मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला , तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, 'येथे या राजपुत्राला बारा वर्षे आयुष्य आहे असे लिहिले आहे हे खरे. मोठेच गंडांतर आहे, पण नंतर तेथेच 'मोठ्या पुण्याईने व रुद्रानुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा दहा हजार वर्षे राज्य करील असे लिहिले आहे." हे ऐकताच यम वीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही किंकले आहे." असे सांगून नारदमुनी 'नारायण नारायण' म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला.
त्या ब्राम्हण पतिपत्नीला हि कथा सांगून श्रीगुरू नृसिंहसरस्वती म्हणाले, "रुद्रानुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे माहात्म्य असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्रीगुरुंचे रुद्रावर फार प्रेम आहे. श्रीगुरू रुद्रस्वरूप आहेत म्हणून रुद्रध्यायाने त्यांची पूजा करावी."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'रुद्राध्याय माहात्म्य' नावाचा अध्याय चौतिसावा समाप्त असे महत्त्व रूद्राभिषेका चे आहेत.
लघुरुद्र आणि अतिरुद्र
अनेक ठिकाणी शंकराच्या देवळांतून लघुरुद्र केलें जातात व अभिषेक केलें जातात. अभिषेक हे प्रतिक आहे. अभिषेक पात्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते, तसे आपले मन सतत परमेश्वरचरणी असले पाहिजे.
रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे. ते अकरा वेळा म्हटले की एक एकदष्णी होते. अकरा एकदष्णीचा एक लघुरुद्र. अकरा लघुरुद्रांचा एक महारुद्र आणि अकरा महारुद्र केलें की एक अतिरुद्र होतो.
अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची, उपासनेची एक पद्धत आहे.
ॐ नमः शिवायेति बीजम् ।
ॐ शिवतरायेति शक्तिः ।
ॐ महादेवायेति कीलकम् ।
श्री सांबसदाशिव प्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ॥
रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली.
रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद-पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे, ते फार नंतरचे. रुद्राचे मूळ स्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे.
रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.
रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र-सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात. 
रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत:
१)अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी “नमः”असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.
 २) अकरा चमके म्हणजे ज्यात “च मे” हे शब्द आहेत ज्याचा अर्थ “हे मला हवे अथवा मला हे दे”. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.
याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला “ओम शान्तिः शान्तिः शान्तिः” हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे. सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात (अर्थात हे आवश्यक नाही पण तसा रिवाज आहे) एक ब्राह्मण एक नमक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात, अर्थात हि तजवीजाच, खरे तर सर्वांनी मोठ्याने म्हंटले तर त्याचा प्रभाव जास्त. अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात. ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केला जातो.
आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात. जे  चुकीचे आहे.
यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण / त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. (नमक ३)
तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. (नमक ४)
सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे (नमक ९)
त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणाऱ्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.
आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ.इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन, वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.
तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.
रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती, इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.
हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू,चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मागणी करत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे. जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल, तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम, सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो.
या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र,अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.
.
ॐ त्र्यं॑बकं यजामहे सुग॒न्धिं पु॑ष्टि॒वर्ध॑नम् ।
उ॒र्वा॒रु॒कमि॑व॒ बन्ध॑नान्मृ॒त्यो-र्मु॑क्षीय॒ माऽमृता॓त् ||१||
|| ॐ शान्तिः॒ शान्तिः॒ शान्तिः॑ ||
भगवान शंकर व त्यांचे स्वरूप- भग म्हणजे ऐश्वर्य; भगवान म्हणजे ऐश्वर्यवान ! शं करोति इति शंकरः। शं  म्हणजे कल्याण. कल्याण करणारे शंकर भगवान असा खरा शंकर शब्दाचा अर्थ आहे. देवदेवतांमध्ये भगवान शंकर ही मुख्य देवता आहे. प्रत्यक्ष शिवाचे रूप हे निर्गुण स्वरूपाचे आहे. परंतु उपासनेसाठी त्याचे रूप लिंगस्वरूपाचे आहे. भगवान शिव हे आपल्याला लिंगरूपाने दर्शन देत असतात. शिवोपासना करण्य्याचे विविध मार्ग आहेत. रुद्राभिषेक करणे, शिवलीलामृताचे पठण करणे. “नमःशिवाय” हा जप करणे, श्रावणी सोमवारचा, महाशिवरात्रीचा उपवास करणे इत्यादी. 
ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रुपात शिवलिंगात प्रगट झाले आहेत. ज्योतिर्लिंग याचा अर्थ आत्मज्योत असा आहे. ही उपासनेसाठी आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजे लिंगावर रुद्राभिषेक करणे.
भगवान शंकराला अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेकाने तो लवकर प्रसन्न होतो. म्हणून जेथे जेथे शंकराची पिंडी असेल तेथे पाण्याची संतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते. शिवलिंगाच्या अभिषेकाचे पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे असते. कारण ते उत्तरेकडे असणाऱ्या गंगानदीकडे जाते, ही भावना असते.
रुद्र हा वेदमंत्र आहे. रुद्र म्हणजे द्रवणे. स्तुती मनुष्याप्रमाणे ईश्वरालाही प्रिय आहे. आपल्या स्तुतीने भगवंताला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्याचे मन द्रवले की आपण संकटातून वाचतो. त्याचा आपल्याला आधार मिळतो. पुष्कळ लोकांच्या जीवनात अडथळे येतात व प्रगती होत नाही. अशा वेळेला रुद्राभिषेक केला की अडचणीतून मार्ग निघतो.
रुद्र आवर्तनातील सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहेत. रुद्र म्हणण्याची विशिष्ट लय व पद्धती आहे. त्याचप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात. म्हणून रुद्राभिषेक हा जाणकार ब्राह्मणांकडून करून घ्यावा लागतो. ते वेदमंत्र असल्याने त्यात शक्ती आहे. योग्य पद्धतीने उच्चार झाल्यावर ती शक्ती कार्यरत होते व अनुभवाला येते.
रुद्राभिषेक घरात, बाहेर कोठेही, क्षेत्राचे ठिकाणी केव्हाही केला तरी चालतो. हा अगोदर ठरवून करावा. विशेषतः प्रदोष, सोमवार, एकादशी अशा दिवशी केलेला उत्तम. तुमच्या सवडीने महिन्यातून वरीलपैकी कोणताही एक दिवस ठरवा व रुद्राभिषेक करा. त्याचा तुम्हाला हमखास फायदा मिळेल.
रुद्र हा एकदा ऐकून भागत नाही. तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. म्हणजे अडथळे दूर होऊन प्रगती साधली जाते. रुद्र हे वेदमंत्र असल्याने त्याचे जसजसे उच्चारण होते तसतशा देवता तिथे उत्पन्न होतात व लोककल्याण करतात.
रुद्राभिषेकाचे फायदे -
अ)घराण्याचे दोष कमी होणे- कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही. त्यातूनच पितृदोष निर्माण होतात. पितृदोषांमुळे घराणीच्या घराणी नाहीशी झाल्याची उदाहरणे आहेत. कुंडलीत पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले जातात. राहूचे दोष इतके वाईट असतात की, जगणे मुश्किल करतात. काही घरात सर्व सुखसोई असूनही अस्वस्थता असते. काही घरात काही कारण नसताना सतत भांडणे होतात. काही घरात जेवण तयार असून शांत रितीने खायला मिळत नाही. यासर्वांवर उपाय म्हणजे "शिवोपासना" करणे.
ब)मनोविकार कमी होणे- रुद्र आवर्तने ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात. काही कारण नसताना हातवारे करणे, मनाशी पुटपुटणे, आॅफिसमध्ये बसल्याबसल्या दातावर पेन्सिल आपटणे, चटईवर बसल्याबसल्या काड्या काढणे, पुडीचा फेकून दिलेला वर्तमानपत्राचा कागद वाचत बसणे, एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे किंवा पुन्हा पुन्हा उच्चार करणे हे सर्व सूक्ष्म मनोविकारांचे प्रकार आहेत. ह्या सूक्ष्म मनोविकारांची योग्य दखल घेतली नाही तर ते विकार पुढे पुढे वाढत जातात. तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र/ महारुद्र करता, तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी ते ऐकावे, श्रवण करावे. यामुळे हे सूक्ष्म मनोविकार वाढत नाहीत व असतील तर पुढे नाहीसे होतात.
क)पाऊस पडणे- पाऊस पडत नसेल तर सामूदायिक प्रार्थनेचा जरुर उपयोग होतो व ईश्वरी शक्ती आपले कार्य करते. पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करीत असत. शिवलिंगावर अभिषेक करत असत. तसा अभिषेक म्हणजे पाण्याची संततधार आपण ठेवली तरी पाऊस पडण्यास मदत होते. परंतु अशी पाण्याची संततधार पाऊस पडेपर्यंत ठेवायला लागते.
ड)भूकंपापासून रक्षण होणे- सध्या लहान मोठे भूकंप सतत खुप ठिकाणी होत आहेत. जेथे जमीन पोकळ असते तेथे असे भूकंप होत असतात. पोकळ जमिनीतून स्वयंभू शिवलिंगे बाहेर येत असतात. म्हणून ती पोकळ जमीन टणक होण्यासाठी आपल्याकडे रुद्राभिषेक करुन शिवाला शांत करण्याची पद्धत आहे. तेव्हा, तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी अथवा देवदेवळातून रुद्राभिषेक जरुर करावेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचे भूकंपापासून रक्षण होईल. भूकंपासारख्या संकटातून वाचण्यासाठी रुद्राभिषेक हा एक उपाय आहे. स्वयंभू शिवाचा विचार केला तर त्याच्या लिंगाचे एक टोक जरी वर दिसत असले तरी दुसरे टोक थेट भूगर्भात शेवटपर्यंत असते. त्यामुळे सतत शिवावर धार करुन लघुरुद्र केल्यास व शिवोपासना केल्यास जमिनीला टणकपणा येतो व भूकंपाचा त्रास कमी होतो. ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंगे आहेत त्या ठिकाणी ही उपासना केल्यास ह्याचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. स्वयंभू याचा अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेले . आपल्या स्तुतीने त्याला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्याचे मन द्रवले की, आपण संकटातून वाचतो, याबाबत श्रद्धाही बाळगली पाहिजे. व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत येणा-या अघटित संकटावर रुद्राभिषेक हा खात्रीचा उपाय आहे.

2115. कथा नैवेद्याची

 "काय गं दीप्ती कुठे हरवलीस? मगाचपासुन आवाज देतेय. ठेवलास ना नैवेद्य मंदिरात?" वंदनाताईंनी गॅसजवळुनच आपल्या नव्या सुनेला विचारलं. 
"अं नाही काही नाही आई. ठेवला मी नैवेद्य." दीप्ती चाचरत म्हणाली . 
"बरं मग पानं वाढायला घे. जेवायला बसुन घेवू आपण." वंदना ताई गॅस बंद करून कढईतल्या पुऱ्या काढत म्हणाल्या.
"हो आई घेते."  म्हणत दीप्ती ने त्या दोघींची पानं वाढुन घेतली.
पानातलं  ते गोडाधोडाचं जेवण अन् श्रावणी सोमवारामुळे जेवायला उशीर झालेला असुनही तिच्या गळ्याखाली घास उतरत नव्हता. मगाशी महादेवाच्या  मंदिरात  त्या चार पाच मुलांना तिने  नैवेद्याचं ताट ठेवताच  त्यावर अक्षरशः तुटुन पडलेलं पाहुन ती मुलं किती भुकेली असावीत याचा अंदाज येवुन तिचं मन अजुनही ढवळून निघत होतं. बाजुलाच अनेकांंनी नैवेद्य ठेवले होते. पण त्याला लगेच पावसाळा असल्याने माशा, मुंग्या लागत होत्या. पण तो नैवेद्य सुद्धा काही जण नाईलाजाने जवळच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरत होती.  नुकतेच ठेवलेले ताजे नैवेद्य खाण्यासाठी तर त्यांच्यात जणु स्पर्धा लागली होती. ते दृश्य पाहून दीप्ती सारख्या संवेदनशील व्यक्तीचं मन हळहळलं नसतं तर नवल.
"काय गं दीप्ती. स्वयंपाक चांगला नाही झाला का आज. तुझं जेवणात लक्ष का नाहीये?" वंदना ताईंनी तिच्याकडे पाहत विचारलं. 
"अं..नाही आई छान झालंय सगळं.. ते जरा असंच ..उपवास झाला की जेवण जात नाही ना जास्त. म्हणून.बाकी काही नाही." दिप्तीने कसंबसं उत्तर दिलं. पण तिची अस्वस्थता काही कमी झाली नाही. थोडंसं जेवुन तिने वंदनाताईंना सगळं आवरायला मदत केली. पाहता पाहता आठवडा असाच निघुन गेला. दुसरा श्रावण सोमवार उजाडला. आज स्वयंपाकात मदत करतांना मात्र दीप्तीने धीर करुन त्या दिवशीचा प्रसंग  अन् त्यावर मनात असलेला उपाय सासूबाईंना बोलुन दाखवायचं  ठरवलंच. 
"आई तुम्हीच सांगा देव भावाचा भुकेला असतो आणि आपल्या सर्वांचा पालक असतो  ना  हो. मग आतमध्ये देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवायचा आणि बाहेर ती चिमुकली मुलं अन्नासाठी तडफडतायत असं चित्र असेल तर देव खरंच संतुष्ट होईल का हो? त्यापेक्षा आपण त्यांनाच पोटभर खायला दिलं तर त्यांचा भुकेला आत्मा शांत तरी होईल ना? आणि आपली मुलं खुश तर त्यांचा पिता खुश. महादेव जगतपिता आहेत मग त्यांच्या वर दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा, पंचपक्वान्नाची रांग लावुन मंदिरात अस्वच्छता करण्यापेक्षा अश्या गरजूंना अन्नदान केलं तर महादेव खरंच संतुष्ट होतील ना? खुलभर दुधाची गोष्ट आपण नुसती ऐकुन आणि वाचुन सोडून द्यावी म्हणुन नाही दिलीये ना पुराणात. मी मागच्या वेळी त्या मुलांचे ते भुकेले चेहरे पाहिल्यापासून माझ्या मनातनं हा विचार जातच नाहीये. आपण आज त्या मुलांसाठी जेवण घेवून जावुया का आई?" दिप्तीने घडलेला प्रसंग सांगुन वंदना समोर आपले विचार मांडले.
    वंदनातल्या धार्मिक व्यक्तीला हे वरवर जरी ठीक  वाटत असलं तरी मनापासून काही तितकंसं रुचलं नव्हतंच. पण मंदिरात  गेल्यावर जेव्हा दिप्तीने कोपऱ्यात उभ्या लहान मुलांना बोलवुन व्यवस्थीत पॅक केलेले जेवणाचे पार्सल त्या मुलांच्या हाती दिले तेव्हा " हे आमच्यासाठी आहे " असं आश्चर्याने विचारतांना त्यांच्या डोळ्यांत आलेली ती चमक पाहुन मात्र इतका वेळ चुकल्याचुकल्या सारखं वाटणाऱ्या वंदनाताईंच्या मनाला एक वेगळंच समाधान जाणवलं. तिथेच बसण्यासाठी असलेल्या जागेवर बसुन आनंदाने जेवणाऱ्या त्यांचे ते तृप्त चेहरे पाहण्यात हरवलेल्या या सासुसुनांची तंद्री भंगली ती वंदनाताईंच्या मैत्रिणीच्या म्हणजेच शर्मिष्ठाताईंच्या बोलण्याने. 
"वंदना तुझी सून नावाप्रमाणेच नव्या विचारांचे दीप प्रज्वलित करणार असं दिसतंय. भक्ती अशीच असावी गं. जित्याजागत्या माणसांतला देवच दिसत नसेल तर मुर्तीतल्या देवासमोर यज्ञयाग केले तरी व्यर्थच. मी सुद्धा इथे या मुलांना देण्यासाठी फळ वगैरे घेऊन आलीये. तुझ्या सुनेच्याच हातुन होवुदे हे सत्कार्य. दिप्ती ये गं बाळा. ही फळं सुद्धा दे यांना. इथे खायचं असेल तर खातील किंवा हवं तर घरी नेतील." शर्मिष्ठाताईं  दिप्तीकडे कौतुकाने  बघत म्हणाल्या.
"काकु अहो पण मी कसं?  तुम्हीच द्या ना." दिप्ती संकोचुन म्हणाली. 
"अगं बाळा संकोच कसला करतेस. उलट तुझ्या हातुन हे काम झालं तर मला जास्त आनंद होईल. मी एक  एनजिओ चालवते आणि त्या माध्यमातून असेच आपल्याला शक्य होतील ते छोटे- छोटे उपक्रम घेऊन नवीन विचार पेलण्याचा प्रयत्न करते. हल्ली माणूसकी, संवेदनशीलता तशी अभावानेच पहायला मिळते गं. नवी पिढी तर आपल्यातच मश्गुल दिसते आणि जूनी पिढी देवभोळी ती अशी मुर्तीपुजेतच धन्यता मानणारी. कुणाच्या श्रद्धेवर बोट ठेवायचं नसतं आपल्याला पण मग असं सगळं चित्र राहिलं तर या भुकेल्यांकडे,गरजुंकडे कुणी बघायचं? असा प्रश्न पडतो. अश्यात तुझ्यासारखं कुणी दिसणं म्हणजे आशेची पणती गवसण्यासारखंच आहे बघ. तुझं मनापासून कौतुक करावंस वाटतंय म्हणून तुझ्या हाताने फळांच वाटप व्हावं आणि तुला आवडणार असेल तर तु आमच्या एनजिओ मध्ये सुद्धा सामील व्हावंस  कसं मला वाटतं." काकूंनी मनातले विचार बोलुन दाखवले.
"काकु तुम्ही इतकं मनापासून बोलताय नाही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. द्या इकडे ती फळांची पिशवी. मी देते सगळ्यांना आणि हो आपल्या  एनजिओ मध्ये सुद्धा मी मला जमेल तशी मदत करेन पण एका अटीवर. आत्ता  तुम्ही आमच्या सोबत आमच्या घरी जेवायला यायचं !! बोला कबुल ना?"  दिप्तीने मोकऴं हसुन विचारलं. 
अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ दिप्ती. वंदनाताई हसुन उद्गारल्या. 
"हो गं बाई कबुल !! " काकुंनीसुद्धा दिलखुलास  हसुन उत्तर दिलं. 
सगळ्यांना फळं देवुन घरी आल्यावर काकुंसोबत सोमवारचा उपवास सोडतांना आज मात्र दिप्तीच्या चेहऱ्यावर मुलांचे आनंदी चेहरे आठवुन खऱ्या अर्थाने तृप्तीचे भाव पसरले होते. आजचा नैवेद्य खऱ्या अर्थाने महादेवा़ंपर्यंत पोहचला असावा. 
   ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. दिप्तीच्या माध्यमातून जशी महादेवाने वंदनाला सुबुद्धी दिली तशी या कथेतून तुम्हा आम्हाला मिळो हीच महादेवचरणी प्रार्थना.

2114. कालाय तस्मै नमः

 सदानंदांनी त्यांचा मुलगा राजच्या दरवाज्यावरची बेल वाजवली त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. सदानंद आणि सावित्रीबाई सांगली जवळील एका छोट्याशा गावात राहत होते. सहा-सात तासांचा एस टी चा प्रवास करून पुण्याला आल्यामुळे ते दोघेही खूप थकले होते. 
कोण पाहिजे तुम्हाला? स्लीवलेस टी-शर्ट आणि शॅार्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीने दरवाजा किंचितसा उघडून विचारले. सूनबाई, तू ओळखलं नाहीस का आम्हाला? मी आणि सूनबाई? अहो, अविवाहित आहे मी. 
कोण तुम्ही? कोणाकडे जायचं तुम्हाला? त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारले.
माफ करा, हे बंडूचेच घर आहे ना? खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारले. नाही, नाही येथे बंडू वगैरे कोणी राहत नाही असे म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला. ती सदानंद आणि सावित्रीबाईंची सून नव्हती. आम्हाला आमचा मुलगा बंडूकडे जायचंय, अंधारामुळे आम्ही घर चुकलो, क्षमा असावी असे म्हणत सदानंद आणि सावित्रीबाई जायला निघाले; तेवढ्यात मावशी, अगं हे माझे आजी-आजोबा आहेत असे म्हणत रीना आजोबांना बिलगली. 
रीनु बेटा कशी आहेस तू? तुझे बाबा कुठे आहेत?  तुझी मम्मी कुठे आहे विचारत सदानंद आणि सावित्रीबाई घरात शिरलेत. माझे बाबा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि आई आईस्क्रीम आणायला गेली, येईलच आता.
तेवढ्यात नेहा म्हणजे रीनाची आई आली. काहीही न कळवता आणि असे अचानक तुम्ही आलात, सर्व ठीक तर आहे ना? नेहाने विचारले. ही माझी मावस बहीण, डॉक्टरेट करण्यासाठी पुण्याला आली आहे. नेहाने ओळख करून दिली.
तुमचं जेवण झालं असेलच ना? नसेल झालं तर मी करते तुमच्यासाठी स्वयंपाक, नेहा म्हणाली. घरात चिकन बिर्याणी आहे पण ती चालणार नाही ना तुम्हाला. आधी चहा करू का? की आईस्क्रीम घेता?
सूनबाई आम्हाला चहा नको, जेवण नको, अगदी आईस्क्रीम सुद्धा नको. पोट अगदी गच्च भरलंय आमचं, सदानंद म्हणालेत. तुम्ही तुमचं सामान या रूम मध्ये ठेवा आणि इथेच झोपा, नेहाने सांगितले. सदानंद आणि सावित्रीबाईंनी त्यांचे सामान नेहाने सांगितलेल्या रूममध्ये नेले. सावित्रीबाईंनी स्वतः खारीक खोबऱ्याच्या, साजूक तुपात बनवलेल्या लाडवांमधील एक लाडू रीनाला दिला. सुनबाई आणि मावशी तुम्ही पण लाडू घेतात का? सावित्रीबाईंनी प्रेमाने विचारले. 
नको नको, आम्ही गोड कमी खातो असे म्हणत नेहाने रीनाच्या हातातील लाडू ओढून घेतला. आई मला लाडू आवडतो, खाऊ देना मला म्हणणाऱ्या रीनावर नेहा ओरडली. रीना हे लाडू काळपट दिसतात. बहुतेक खूप पूर्वी केलेले असतील तू खाऊ नकोस, त्रास होईल तुला. मी उद्या तुला समोरच्या दुकानातून ताजे लाडू आणून देईन. मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने केले होते सावित्रीबाईंनी लाडू. मेथी आणि काळ्या मनुका घातल्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसत होते हे खरं पण ते शिळे नव्हते, त्यांनी लाडू कालच केले होते. 
लाडू खायला न मिळाल्यामुळे रीना हिरमुसलाी आणि नेहाच्या कडवट बोलण्यामुळे सावित्रीबाई दुखावल्या गेल्या. एकेक लाडू खाऊन नी पाणी पिऊन सदानंद आणि सावित्रीबाईंनी भूक भागवली नी स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केले.
सकाळी सावित्रीबाईंनी चहा ठेवला. सूनबाई, मावशी पण चहा घेतील ना? त्यांनी विचारले. हो, पण आम्हा दोघींसाठी बिनसाखरेचा चहा करा. चहा करता करता सावित्रीबाईंनी पोहे देखील बनविले. पोहे खूप तिखट आणि तेलकट आहेत असे म्हणत नेहा आणि तिच्या बहिणीने पोहे खाल्ले नाहीत आणि रीनालाही खाऊ दिले नाहीत.
राज ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे, तो ४ दिवसांनी परत येईल, नेहाने सांगितले. सूनबाई, पांडुरंगावरची सिरीयल आहे, आम्हाला टीव्ही लावून दे ना, सावित्रीबाईंनी विनंती केली. टी व्ही खराब झाला आहे, मी मेकॅनिकला बोलावले आहे, नेहा म्हणाली. 
आजोबा मला ती परीची गोष्ट सांगा ना, रीनाने हट्ट धरला. सदानंद गोष्ट सांगू लागले. बाबा, ती इंग्रजी शाळेत शिकते, तीला मराठी गोष्ट सांगू नका. तीचे इंग्रजी बिघडेल ना. सदानंदांच्या उत्साहावर विरजण पडले, रीनाही हिरमुसली.
दुपारी  दोघी बहिणी पार्लरला गेल्या. आजी मला सरबत करून दे ना, तू आणि आजोबा पण घ्या. सावित्रीबाईंनी सरबत बनविले. मला हा पिटुकला ग्लास दे, हे दोन मोठे ग्लास तुमच्यासाठी आहेत. आई म्हणाली, आजी-आजोबांना खोकला आहे, त्यांनी वापरलेले ग्लास आपण वापरायचे नाही. 
सकाळी टी व्ही मेकॅनिक आला होता. आईने त्याला ४-५ दिवसांनी यायला सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात माझे दुसरे आजी-आजोबा येणार आहेत, रीना सांगत होती. रीना, ते तुला गोष्टी सांगतात का? तुझ्या बरोबर खेळतात का? अजिबात नाही, सारखे टी व्ही बघतात, फोनवर बोलतात आणि मला उगाचच रागावतात.
रात्री काही शर्ट्स नेहाने सदानंदांना दाखवलेत. शर्ट्स खूपच छान होते. बोलता बोलता नेहा म्हणाली, माझ्या बाबांनी थोडेच दिवस वापरलेले हे शर्ट्स अजूनही नव्या सारखेच आहेत. बाबा म्हणालेत तुमच्या वॉचमनला दे. इतके चांगले शर्ट्स का वॉचमनला द्यायचे? तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घ्या. नको, नको, माझ्याकडे खूप कपडे आहेत असे म्हणताना सदानंदाचे डोळे पाणावलेत.
सावित्रीबाई आल्यापासून नेहाने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली. ती स्वतः मात्र तिच्या बहिणीशी गप्पागोष्टी करण्यात मग्न असायची. सदानंद आणि सावित्रीबाईंना हे खटकत होतं परंतु त्यांनी ठरविले की मुलाची येण्याची वाट पहायची कारण त्यांना त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते.
संध्याकाळी राजचा शाळेतील मित्र आला. काका, काकू, कसे आहात तुम्ही? किती दिवसांनी भेटता आहात? काकू, तुमच्या हातच्या खारीक खोबऱ्याच्या लाडवांची चव अजूनही आठवते मला. अगदी कमाल असायचे. निघताना सावित्रीबाईंनी दिलेली लाडवांची पिशवी त्याने आनंदाने घेतली. नेहा वहिनी, काका-काकूंना माझ्या घरी नक्की घेऊन या असे आग्रहाचे निमंत्रण त्याने दिले. 
रात्री नेहाने सदानंदांना एक मोबाईल दाखविला. हा मोबाईल माझ्या भावाने दुबईहून आणला आहे. या मोबाईलची किंमत भारतात २५०००/- रुपये आहे. माझा भाऊ हा मोबाईल १५०००/- रूपयांना विकतो परंतु तुम्हाला म्हणून १००००/- रुपयांत मिळेल. घ्यायचा का तुम्हाला? सूनबाई, मोबाईल खूप छान आहे परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत गं.
सदानंद आणि सावित्रीबाई रूममध्ये गेलेत नी मागोमाग रीनाही आली. आजोबा, तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर माझ्या मनीबॅंकेतील पैसे घ्या. सदानंदांनी डोळ्यांतील पाणी लपवत रीनाला जवळ घेतले. 
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राज आला. आपल्या मुलाला बंडू म्हणू नका हं, सूनबाईला आवडत नाही, सावित्रीबाईंनी सदानंदांना सूचना केली. सदानंद आणि सावित्रीबाईंची आदराने चौकशी करत राजने त्यांच्याशी छान गप्पा मारल्याने दोघांनाही आनंद झाला. पुण्याला आल्यानंतर त्यांना आज प्रथमच छान झोप लागली. 
बेटा, तुझ्या आईची ही औषधे १-२ दिवसात आण, सदानंदांनी मोठ्या अधिकाराने राजला सांगितले. आपल्या बिल्डिंग समोरच तर मेडिकल स्टोअर्स आहे. तुम्हीच आणा ना, राजच्या बोलण्यात उध्दटपणा होता. अरे, खरंच की, आणेन मी, दुखावलेला बाप म्हणाला. काल संध्याकाळी खूप प्रेमाने वागणारा राज एका रात्रीत बदलला होता.
दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काही तरी महत्वाचे बोलायचे म्हणून सदानंद हॅालमध्ये बसले होते. आज त्यांचा वाढदिवस होता, हे मुलाच्या नक्की लक्षात असेल, त्यांना खात्री होती. तुम्ही स्वतःहून सांगू नका असे सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावले होते. 
रीना राजच्या फोनशी खेळत होती. आजोबा हा फोन तुमच्याकडे ठेवा, मी आलेच असे म्हणत ती बाल्कनीत गेली. तेवढ्यात राज बाहेर आला आणि त्याने सदानंदांकडून फोन घेतला. फोनवर दोन मिस कॉल होते, राजच्या बॅासचे. फोन का वाजला नाही? राजने नीट बघितले आणि त्याच्या लक्षात आले की फोन म्यूटवर होता. काय केले बाबा तुम्ही? माझी नोकरी घालवायची का तुम्हाला? अहो, तुमच्यामुळे माझे दोन महत्त्वाचे कॉल मिस झाले. आपण काय चूक केली ते सदानंदांना समजले नाही. 
जेवणानंतर गप्पा मारताना राज म्हणाला, चार  दिवसांनी नेहाचे आई-वडील येणार आहेत आणि आम्ही सर्व महाबळेश्वरला जाणार आहोत, नेहाच्या बाबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हे मी कोणालाही सांगितलेले नाही, मला नेहाच्या बाबांना सरप्राइज द्यायचे आहे. तुम्ही पण येणार का? सदानंद आणि सावित्रीबाईंनी महाबळेश्वर बद्दल खूप ऐकले होते, तेथे जाण्याची त्यांना तीव्र इच्छा होती परंतु राजने विचारलेल्या प्रश्नाला, नको बेटा, तुम्ही जाऊन या एवढेच सदानंद म्हणालेत. 
रात्रभर सदानंद आणि सावित्रीबाईंना झोप लागली नाही. आपण सकाळीच निघून जायचे असे दोघांनी ठरविले. दोघेही सकाळी रूममधून बाहेर आले ते निघण्याची पूर्ण तयारी करूनच. तुम्ही जाण्याची इतकी घाई का करता आहात? राज आणि नेहाने विचारले. इकडे आमचे मन लागत नाही गावाकडची आठवण येते. चला निघतो आम्ही, तुम्ही सुखी रहा. आजी-आजोबा, तुम्ही जाऊ नका ना, रीना म्हणत होती. 
नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गाडी घेऊन जाणार आहे नाहीतर मीच तुम्हाला बस स्टँडवर सोडले असते, राज म्हणाला. बाबा, मला  नमस्कार तर करू द्या, राज म्हणाला. बेटा, एक काळ असा होता जेव्हा तू लहान होतास आणि आम्ही आशीर्वाद देण्याइतके मोठे होतो परंतु काळानुरूप तू खूप मोठा झालास आणि आम्ही होतो त्याच ठिकाणी राहिलो. आमची लायकी नाही रे तुला आशीर्वाद द्यायची. चल सावित्री, आपल्याला निघाले पाहिजे, उशीर होतोय म्हणत दोघेही सामान घेऊन चालू लागले. 
साधारणतः पंधरा मिनिटांनी नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गेली. रीना तुही ये ना मला सोडायला, मावशी आग्रह करत होती. नको, मला माझ्या बाबांशी खूप बोलायचे आहे रीना म्हणाली. 
राजच्या मित्राचा फोन आला, राज आज संध्याकाळी काका-काकूंना माझ्या घरी घेऊन ये ना. काकूंनी केलेले लाडू माझ्या बायकोला आणि मुलीला खूप आवडले. ते कसे करायचे ते माझ्या बायकोला काकूंकडून समजून घ्यायचे आहे, राजचा मित्र सांगत होता. मित्रा, महत्त्वाचे काम निघाल्यामुळे ते दोघेही आत्ताच गावाकडे गेलेत, राजने सांगितले.
रीना बेटी आजी-आजोबांनी लाडू आणले होते? 
राजने विचारले. हो बाबा आणि आजीने मला पण लाडू दिला होता परंतु आईने मला खाऊ दिला नाही. आई म्हणाली हे लाडू काळे आहेत म्हणजे कधीचे केलेले असणार, खाऊ नकोस तुला त्रास होईल. बोलता बोलता रीनाने मोबाईल घेण्यासाठी आजोबांकडे पुरेसे पैसे नव्हते, मी माझ्या मनी बँकेतील पैसे आजोबांना दिले परंतु त्यांनी ते घेतले नाही असेही राजला सांगितले. बाबा, हे बटन दाबल्याने काय होते? काल मी ते गंमत म्हणून दाबले होते. बेटा, याने फोन म्यूटवर जातो. काल कॅाल्स मिस झाले ते बाबांमुळे नाही तर रीनामुळे झाले होते. नेहाने आणि त्याने आई-बाबांना अपमानित केले होते. 
बाबा, आजोबा त्यांचे पैशांचे पाकीट घराीच विसरले म्हणत रीनाने कॅाटवर पडलेले आजोबांचे पाकीट राजला दिले. राजने पाकीट उघडून बघितले. त्यात
फक्त परतीच्या तिकिटांचे पैसे होते. म्हणजे पैसे नव्हते म्हणून आईची औषधे आणायला बाबांनी मला सांगितले असेल का? या विचाराने राज व्यथित झाला. पाकीटात एक फोटो होता, राज इंजिनिअरिंगची फायनल परीक्षा पास झाला त्यावेळी आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतानाचा. 
त्याला आई-बाबांनी काढलेल्या हलाखीच्या दिवसांची आठवण झाली आणि पश्चाताप झाला आईवडिलांशी इतके निष्ठुर वागल्याचा. 
पैशांचे पाकीट घरी राहिले मग आई बाबा बस स्टँडवर कसे गेले असतील? रिक्षाचे पैसे त्यांनी कसे दिले असतील? रीना बेटा, चल आपण बस स्टँडवर जाऊया. राज आणि रीना बिल्डींगच्या गेटपाशी आलेत त्यावेळी बिल्डिंगमध्येच राहणाऱ्या त्याच्या मित्राची गाडी आत शिरली आणि त्याने सांगितले, राज मी माझ्या आई-बाबांना सोडायला बस स्टँडवर गेलो होतो त्यावेळी मी तुझ्या आई-बाबांनाही बस स्टॅंडवर सोडले. थॅंक्स मित्रा, राज म्हणाला.
म्हणजे बाबांना पाकीट घरी राहिल्याचे तेव्हाच समजेल जेव्हा ते कंडक्टरकडे बसचे तिकीट मागतील. आता काय करायचे? राजला कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता. एक दीड तास झाला तरीही आई-बाबा घरी परत आले नव्हते म्हणजे कदाचित आईकडे पैसे असतील आणि त्यातून त्यांनी बसचे तिकीट काढले असेल असा विचार करत राज निश्चिंत झाला.
संध्याकाळी राजला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. राज मित्रा, मी एस टी त कंडक्टर आहे. तुझे आई-बाबा माझ्याच बसमध्ये होते. त्यांच्याकडून मी तुझा नंबर घेतला. पाकीट घरी राहिल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते परंतु मी त्यांना तिकिट दिले आणि सांगलीला पोहोचल्यावर त्यांना घरापर्यंत पोहोचविले, तू अजिबात काळजी करू नकोस. राजसाठी हा सुखद धक्का होता. मित्रा, मी किती पैसे पाठवू? राजने विचारले. छे छे, पैसे नको पाठवूस. राज, अरे काका-काकूंनी किती प्रेम दिले आहे मला, थोडंसं त्यांच्यासाठी करायला मिळाले हे माझे केवढे मोठे भाग्य. माझ्या आई-बाबांशी केवढ्या आपुलकीने वागले माझे मित्र आणि मी किती चुकीचा वागलो, राजला स्वतःचीच लाज वाटली.
ठरल्याप्रमाणे नेहाचे आई-वडील आलेत. राज त्यांच्या बरोबर महाबळेश्वरला गेला परंतु त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. महाबळेश्वरहून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज त्याच्या गावाकडे आला. घरी पोहोचल्यावर अनेकदा बेल वाजूनही दार उघडले नाही तेव्हा त्याच्या लक्षात आले की घराला बाहेरून कुलूप लावले आहे. आई बाबा कुठेतरी बाहेर गेले असतील, आपण इथेच थांबावे असा राजने विचार केला आणि तेवढ्यात त्याचे लक्ष दरवाजावर लावलेल्या एका कागदावर गेले. त्या कागदावर लिहिले होते,  हे घर बॅंकेने जप्त केले आहे, बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे. 
गेल्या ३ महीन्यात दोनदा बॅंकेची नोटीस आली होती सदानंदांना, परंतु ते पैसे उभे करू शकले नाहीत. अंतिम नोटीस आली, पैसे भरले नाही तर जप्ती येईल
असे स्पष्ट शब्दांत सांगणारी. म्हणूनच सदानंद आणि सावित्रीबाई राजकडे पैसे मागायला म्हणून आले होते. सुनेनेच नाही पण मुलाने देखील अपमान केला म्हणून त्यांनी जप्ती टाळण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विषयच काढला नाही आणि रिकाम्या हाताने ते घरी परतले. आलीया भोगासी असावे सादर हे मनोमनी ठरवून.
खरंतर राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा, अतिशय हुशार. शिक्षण होताच चांगली नोकरी मिळाली आणि साहेबांच्या मुलीच्या प्रेमात पडला. साहेब खूप श्रीमंत, गाड्या नी बंगलेवाले पण पारसी. राजचे आई-बाबा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. मुलाने पारसी मुलीशी लग्न करायचे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी कडाडून विरोध केला पण राज मागे हटला नाही. सदानंद आणि सावित्रीबाई दुखावले गेलेत, त्यांनी मुलाशी संबंध तोडले. नातीच्या जन्माने पुनर्मिलन झाले, त्यांचे राजकडे येणे-जाणे सुरू झाले परंतु राज आणि नेहाच्या मनात अजूनही त्यांच्या बद्दल राग होता. 
राज त्वरित बँकेत गेला. त्याने विचारणा केली, किती कर्ज बाकी आहे? हे कर्ज कधी घेतले होते? सदानंदांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते आणि त्यातील ७५,०००/- रुपये अजून बाकी होते. पंधरा वर्षांपूर्वी, म्हणजे राजने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला अॅडमिशन घेतली त्यावेळी त्याच्या बाबांनी ते कर्ज काढले असावे. बाबा कधी बोललेही नव्हते याबद्दल. राजने त्वरित ७५,०००/- रुपये बँकेला ट्रान्सफर केले आणि म्हणाला मला आमच्या घराची किल्ली द्या. 
मी तुम्हाला किल्ली देऊ शकत नाही. साहेब मी पैसे ट्रान्सफर केलेत ना, बघा, चेक करा, तुम्हाला ते मिळालेत ना? पैसे मिळालेत. तुमच्या वडिलांवर आता कर्ज बाकी नाही असे लेटर मी तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या, मी त्यांना घराची किल्ली देईन.
साहेब, पण ते कोठे आहेत हे मला माहित नाही. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वडीलांना आणा नाहीतर त्यांचे डेथ सर्टिफिकेट आणा. साहेब, काय बोलतात? अहो ते जिवंत आहेत फक्त ते कुठे आहेत ते माहीत नाही. 
मग शोधा त्यांना, म्हणत मॅनेजर साहेब दुसऱ्या कामात गर्क झालेत.
राजला विश्वास आहे आई-बाबा मिळतील, त्याच्या चूका विसरून ते त्याला मोठ्या मनाने माफ करतील. तो आई-बाबांचा शोध घेतो आहे परंतु अजूनही त्यांचा पत्ता त्याला लागला नाही आणि यापुढेही पत्ता लागेल, याची खात्री नाही. 
काय आश्चर्य आहे ना! ते समोर होते तेव्हा नकोसे वाटत होते आणि आता नजरेसमोरून गेलेत तर हवेसे वाटतात.

कालाय तस्मै नमः।

सोमवार, २८ जुलै, २०२५

2113. पालक

 रात्रीची वेळ होती. आकाशात ढग गडगडत होते आणि रस्ते सुनसान होते. शहरातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाबाहेर ओल्या जमिनीवर एक वृद्ध माणूस बसला होता. त्याचे डोळे रुग्णालयाच्या गेटवर होते, जणू काही तो त्याच्या जवळच्या व्यक्तीची एक झलक पाहण्याची वाट पाहत होता. हातात फाटलेली चप्पल, अंगावर जुना कुर्ता आणि कपाळावर काळजीच्या खोल रेषा. थंड वाऱ्यातही तो घामाघूम करत होता.
      त्याचा मुलगा आशिष एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने ऑपरेशनची आवश्यकता होती, पण डॉक्टरांनी सांगितले की खर्च जास्त असेल, रक्ताची आवश्यकता असेल, लवकर व्यवस्था करावी लागेल. स्वतःच्या औषधासाठीही इतरांकडे पाहणारा रामनाथ आता आपल्या मुलाच्या जीवासाठी स्वतःला विकण्यास तयार होता.
काळ काही वर्षे मागे गेला. तोच आशिष, जो लहानपणी वडिलांना मिठी मारून झोपायचा, तोच आशिष ज्याला मोठा होताच वडिलांच्या गरिबीची लाज वाटायची. एके दिवशी तो रागात म्हणाला, "तू आयुष्यात काय केलंस? तू पैसा कमावला नाहीस ना प्रसिद्धी. मी मोठा झाल्यावर मी कोणासमोर झुकणार नाही." आणि मग तो शहरात गेला. त्याला नोकरी मिळाली, पैसा आला, नातेवाईकांमध्ये त्याला प्रतिष्ठा मिळाली. पण त्या दर्जाचीही एक किंमत होती - त्याच्या वडिलांना विसरणे.
रामनाथ प्रत्येक सणाला आशिषची वाट पाहत असे, प्रत्येक वेळी असा विचार करत असे की तो यावेळी नक्कीच येईल. तो परिसरातील लोकांना दाखवण्यासाठी मिठाईचा डबा घेऊन यायचा, पण प्रत्येक वेळी तो डबा रिकामाच राहायचा. गावाच्या एका कोपऱ्यात, तो म्हातारा वडील त्याच्या मुलाच्या यशाचे नाव ऐकत राहिला, पण त्याचा चेहरा पाहू शकत नव्हता.
आणि आज, जेव्हा मृत्यू आशिषच्या दाराशी उभा होता, तेव्हा रामनाथ पुन्हा तेच करत होता - काहीही न मागता, तक्रार न करता, फक्त त्याच्यासाठी धावत होता. तो डॉक्टरांना म्हणाला, "बेटा, मला वाचवा... तुला हवे असेल तर माझा जीव घे, फक्त माझ्या मुलाला वाचवू दे." आणि डॉक्टरांनी रक्त घेतले आणि ऑपरेशन सुरू केले.
काही तासांनी जेव्हा आशिष शुद्धीवर आला, तेव्हा त्याने पहिली गोष्ट विचारली, "माझ्यासाठी कोण आले आहे?" डॉक्टर हसले आणि म्हणाले, "ज्याला तू वर्षानुवर्षे पाहिले नाहीस, पण जो तुला न पाहताही दररोज तुला आठवतो, तो आला आहे. ज्याचा फोटो तू फ्रेममधून काढून टाकला होतास. ज्याला तू गरीब समजून सोडून दिला होतास... पण आज त्याच्या रक्ताने तुझा जीव वाचवला आहे. तुझा बाप."
आशिषच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो उठला, पण रामनाथ अजूनही बाहेर बसला होता. आशिष त्याच्याकडे पोहोचला तेव्हा रामनाथ हळूवारपणे म्हणाला, "आता तू मला ओळखलेस ना बेटा? चल, आता घरी जाऊया." आशिष काहीही बोलू शकला नाही, तो फक्त त्याच्या पाया पडला.
त्या दिवशी आशिषला जाणवले, *जग कितीही मोठे झाले तरी, कितीही मोठे यश मिळाले तरी - जर कोणी निःस्वार्थपणे, लोभाशिवाय, फक्त तुझ्यासाठी जगले तर ते तुझे पालक आहेत. आणि त्यांना विसरणे ही सर्वात मोठी गरिबी आहे..!
       आई बाबा या दोन शब्दांचं इतके महत्व आहे आपल्या आयुष्यात कि सांगता येणार नाही, कारण हे फक्त शब्द नाहीयेत तर आपले आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने फक्त जन्मचं नाही तर हे आयुष्य दिलं हे विश्व दाखवले, आणि बाबा ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली असे आई बाबा. अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते आपल्यासाठी झटत आहे; नको ते कष्ट, हव्या त्या नको त्या सर्व गरजा पुरवत आहे. पण खरं म्हंटलं तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आई बाबांचं महत्व विसरत चालले आहे. कारण आई बाबा हे शब्द आता फारसे ऐकूही येत नाही, त्यांची जागा आता मम्मी, मॉम, पपा, ड्याड या शब्दांनी घेतली आहे आणि या शब्दांमुळेच आईबाबांचं महत्व कमी झालंय असं वाटायला लागलं आहे. काळ बदलतोय तसं आईबाबा सोबतचे जे संबंध आहे आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहे. तो आदर ती नम्रता या गोष्टींची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतं. जसे जसे मुलंमुली मोठे होत चालले आहे तसं आईबाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जातं. जे निर्णय घ्यायचे असतात मुलामुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटतं, पण आईबाबांना नाही का? तर ते बोलतील रागावतील त्यांना त्यातलं काही कळत नाही अशी आजच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे, आणि यातच आईबाबांचे महत्व आपण विसरत चाललोय असं वाटतं. आपल्या पेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पाहिले काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलं माहित असते तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही, बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो सहन होत नाही, कारण बदलत्या वेळेनुसार आपणही बद्दलो आणि त्यांचा त्रास होतो म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो का तर ते नसले कि आपलं आयुष्य असं मोकळं आपणंच आपल्या मनाचे राजे. खरं तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेलं नसतो, पण आपण त्यांचा मनाचा विचार कुठं करतो, त्यांचा भावना आपण कुठे समजून घेतो. आईबाबा हे दोनच असे व्यक्ती आहे जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात, तेच आपल्या जवळ असतात, पण आपण त्यांना आपल्या जवळचं समजत नाही. 
       ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायचे शिकवले त्यांना आज आपण महत्व देत नाही. खरं तर आईबाबा हे दोनच असे आहेत या विश्वावर ज्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत आणि हेच आजचे मुलं-मुली विसरत चालले आहे.

2112. बारावा हनिमून

     स्नेहा, अगं माझी फाईल कुठे आहे? मंदारने आवाज दिला तसा स्नेहाने गॅस कमी केला आणि पळतच खोलीत गेली. तिथे मंदारने खोली पार अस्तव्यस्त करून ठेवली होती.
अहो, हा काय पसारा करून ठेवला. काल तुम्ही मामांजींशी बोलता बोलता समोरच्या काॅर्नर टेबलवर नाही का ठेवली होती फाईल. म्हणत तीने मंदारला फाईल दिली.  तुमचा पसारा आवरता आवरता आजही उशीर होईल मला, म्हणत फणका-यात ती किचन मध्ये गेली आणि पट पट पोळ्या करू लागली. पोळ्या झाल्या झाल्या तीने मंदार आणि आपला डबा भरला. 
 आज चहा मिळेल का? सास-यांचा त्रासिक स्वर कानावर पडताच तिने बाजूच्या गॅसवर उकळत असलेला चहा दोन कपात ओतला आणि समोरच्या खोलीत बसलेल्या सासू सास-यांना नेऊन दिला. किचन मध्ये जाऊन ओटा साफ करून लगेच आपल्या खोलीत आली. मंदार अंघोळ करून तयारी करत होता. ती पटपट खोली आवरायला लागली.
आज नाश्तात काय आहे? मंदारने साॅक्स घालता घालता विचारले. 
उपमा. 
काल पण उपमाच केला होता तु.
 किराणा आणायचा आहे. जे होतं ते बनवलं. तीने त्याच्या कडे असं काही बघत म्हटले की मंदार मनातून चमकला. बरं, म्हणत तो सरळ डायनिंग टेबल कडे गेला. नाश्ता आटोपून ऑफिसला गेला. स्नेहा नेही स्वतःची तयारी केली आणि ती पण ऑफिसला निघून गेली. मंदार ऑफिसमध्ये पोहचला आणि गाडी पार्क करून निघालाच होता की त्याला समोरून सूर्यकांत जातांना दिसला. तो मस्त आनंदात शीळ घालत जात होता. 
सुर्या...त्याने वळून बघितले.
हाय मंदार..
अरे कुठे गायब होतास आठवडाभर? फोन केला तर फोन ही लागत नव्हता. त्याच्या पाठीवर थाप देत मंदार बोलला.
खरं सांगू की खोटं...तो डोळे मिचकावत म्हणाला.
यात खरं खोटं काय आहे यार..
 म्हणजे बघ खरं सांगितले तर लोकं मजाक करतात आणि खोटं सांगितले तर विश्वास करतात.
म्हणजे...मंदारने प्रश्नार्थक नजरेने त्याला विचारले.
तू माझा चांगला मित्र आहे म्हणून  तुला खरे सांगतो .मी माझा बारावा हनिमून साजरा करण्यासाठी गोव्याला गेलो होतो. लिफ्टसाठी रांगेत लागत तो बोलला.
काय पण यार? मंदार बोलला. लिफ्टमध्ये थोडा वेळ गप्प बसले. लिफ्ट मधून निघाल्या वर काॅरीडोर मध्ये थांबत सूर्यकांत बोलला.
      मंदार तुला तर माहितच आहे माझी बायको नोकरी करते. लग्नानंतर काही वर्षे खुप मजेत गेली नंतर मुलं झाली. जबाबदा-या वाढल्या. माझे आई वडीलही माझ्या सोबत राहतात. घर, नोकरी सांभाळतांना अनघाची खुप ओढाताण होते. मी जमेल तितकी मदत करतो. पण हळूहळू संसारात एकसुरीपणा यायला लागला. नोकरी वरून थकून घरी आलो की मग सैपाक, मुलांचा अभ्यास, आईबाबांचा दवाखाना यातच वेळ जातो. अरे माझ्या बायकोला प्रेमाने जवळ घेऊन मनमोकळे पणाने जशा पुर्वी गप्पा करायचो तशा गप्पा करायलाही सवडच मिळत नाही. आम्हा दोघांमधला प्रेमळ संवादच हरवू लागला.
     मग ठरवलं की आपल्या नात्यामध्ये आलेली ही बोरीयत आपणच दूर केली पाहिजे. म्हणून वर्षातून एकदा मी अनघाला घेऊन बाहेर जातो. खुप मस्ती करतो, म्हणत त्याने डोळा मारला. काय आहे ना यार नातं टवटवीत ठेवायचे असेल तर अशा युक्त्या कराव्याच लागतात. एरवी असं फिरायला जातो म्हटले की आमच्या आई वडिलांचे न संपणारे दुखणे आडवे येतात. मग काय ऑफिसचे महत्वाचे काम सांगून सटकाव लागतं. म्हणून मी पहिलेच म्हटले होते की आजकाल खरं बोललेलं लोकांना चालत नाही. म्हणत सूर्यकांत हसला. पण एक सांगतो ती आनंदी असली ना तर अख्खं घर आनंदाने बहरून टाकते. स्नेहा वहिनीचच बघ जेव्हाही भेटतात  किती प्रसन्न दिसतात कारण तु त्यांची तशी काळजी घेत असणार. लकी यु. चल भेटू या लंच मध्ये म्हणत तो आपल्या केबिनकडे  गेला. मंदार आपल्या सीट वर बसला पण आज त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. स्नेहा वहिनी किती प्रसन्न राहतात कारण तु तशी काळजी घेत असणार .सूर्यकांत चे शब्द त्याच्या कानात घोळू लागले.
      त्याला आठवली लग्नानंतरची बोलकार आणि प्रसन्न चेह-याची स्नेहा. लग्न झाल्या बरोबर आईने प्रत्येक कामातून अंग काढले तरी तीने चकार शब्द काढला नाही. घर, नोकरी, येणारे, जाणारे, सगळ्यांच किती प्रेमाने करायची. मग मुलगा झाला. आईने पहिलेच सांगितले की मला सांभाळणे जमणार नाही. तेव्हा नोकरीचा राजीनामा देऊन तीने मुलाकडे लक्ष दिले. रात्र रात्र मुलगा रडायचा तेव्हा ती पुर्ण रात्र जागून काढायची. कधी आपल्यालाही म्हणायची की थोडं याला बघता का मला खुप झोप येतेय. आपण लगेच ऑफिसमधून खुप थकून आल्याचा बहाणा करून झोपून जायचो. मुलाच्या आजारपणात तर ती तो बरा होत नाही तोवर कासाविस रहायची. आपण फक्त दवाखान्यात नेण्याचा सोपस्कार पार पाडायचो. आपणही आजारी पडलो तरी दिवसरात्र आपल्या अवतीभवती रहाते. काळजीने कधी डोकं चेपून देते तर कधी ताप वाढला तर डोक्यावर पट्या ठेवत बसते. पण मागच्या महिन्यात तिने दाढ दुखत आहे डाॅक्टरकडे चला बोलली तर आपण काय एवढ्यासाठी मला त्रास देते असं किती सहजपणे बोलून मित्राच्याकडे निघून गेलो. ती दाढ काढून आली तेव्हा खुप दुखत नाही ना असे बोललो तर तीने डोळ्यातले पाणी लपवत नाही म्हटले. आपण बघूनही न बघितल्यासारखं केलं.मु लगा जेव्हा आठ वर्षाचा झाला तेव्हा तीने नोकरी करायची ठरवली. आपण तिला लगेच बोललो तु नोकरी केलीच पाहिजे अशी काही आपल्याकडे परिस्थिती नाही पण तुला जर करायचीच असेल तर तु कर. गेल्या दोन वर्षांपासून ती नोकरी करते आहे. सकाळी पाचला उठून रात्रीच्या दहा अकरा पर्यंत कामच करत असते त्यानंतरही आपल्या मागणीला विरोध करत नाही. मंदारच्या डोळ्यासमोरून एक एक घटना क्रम येत गेला..
   आपण स्नेहाला किती गृहीत धरतो याचा विचार करूनच त्याला गुदमरायला झाले. पुर्वीची बोलकार स्नेहा आपल्यामुळेच  अबोल झाली. नेहमी फुलांप्रमाणे टवटवीत राहणारी आज पार कोमेजून गेली. सकाळची तीची ती नजर त्याच्या काळजाला चिरायला लागली. आपण तिला कळत नकळत किती दुखावले याचा विचार करून त्याचं मन पश्चात्ताप करू लागले. आपण ज्या चुका केल्या त्याचं परिमार्जनही आपणच करायला हवं.  त्याने स्नेहाला फोन लावला
हॅलो, काय झालं तीने काळजीच्या सुरात विचारले. 
सुटी घेतेस का?
काय झालं?
सांगतो. मी अर्ध्या तासात पोहोचतो तुझ्याकडे. 
पण.... झालं ...
Wait... म्हणत त्याने फोन ठेवला आणि ऑफिसमधून बाहेर पडला आपल्या स्नेहाला परत तशीच बोलकार आणि हसरी करण्याचे मनाशी ठरवून.

2111. पुरुषाची पन्नाशी विनोदी विश्लेषण

  तारुण्य व प्रौढावस्था यांच्या मधील काळ म्हणजे पन्नाशी. पन्नाशी गाठली म्हणजे प्रौढावस्थेत पदार्पण केल्याचं समजावं म्हणून बहुतेक हा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा असावी .
     स्त्रियांना स्वतःचा नसला तरी नवऱ्याचा हा वाढदिवस साजरा करण्याची भारी हौस असते कारण सगळ्यांना नवऱ्याचं वय जाहीर होतं  आणि आपोआपच त्यांच्यासाठी  "सुरक्षित झोन" निर्माण होतो. त्यांच्या वाढदिवशी मात्र कितवा हे कोणाला सांगू नका बरं का असा दम भरला जातो .
      वाढदिवशी नवऱ्याचं जाम कौतुक करणाऱ्या स्त्रिया दुसऱ्याच दिवसापासून कोणत्याही वेळी आणि प्रसंगी "आता पन्नाशी उलटून गेली आहे, जरा जबाबदारीने वागायला शिका "असा उद्धार करून त्याचा तेजोभंग करू पाहतात पण एवढ्याने खचेल होईल तर तो पुरुष कसला.
        पोट आणि डोईवरचे छप्पर यांची केस हाताबाहेर गेली नसेल तर रंगेबिरंगी टी शर्ट, गॉगल, सौंदर्य प्रसाधने वापरून जास्तीत जास्त तरुण दिसण्याचा प्रयत्नही बरेच जण करतात .
       "सर वाटत नाही हो वय, जास्तीत जास्त पस्तिशीचे वाटता" असा शेरा जर कार्यालयातल्या कोण्या सुबक ठेंगणीने मारला तर 'आज कल पाव जमी पर नही पडते मेरे ' अशी अवस्था होऊन जाते .
      अर्थातच ही अवस्था घरी येईपर्यंतच टिकते कारण नवऱ्याचा आनंद आणि त्या मागचं कारण ओळखण्याएवढ्या बायका चतुर असतात आणि मग "जरा तेवढी बॅग काढून घ्या हो कपाटावरची" असं म्हणतांना "सांभाळून, आता पन्नाशी उलटून गेली आहे; पडाल आणि हाड वगैरे मोडलं तर लवकर जुळणार नाही या वयात" असं म्हणून आभाळातून दाणकन त्याला जमिनीवर आपटून त्याचा पार कपाळमोक्ष करून टाकतात .
       त्यात भर म्हणून "आता नियमित तपासणी करून घेत जा नाहीतर थेट भरती करावं लागेल एखादया दिवशी." असं बोलून त्याचे पंख पूर्णपणे छाटता नाही आले तरी तो फारसा उडू शकणार नाही याची दक्षताही काही चतुर ललना घेतात .
         सासुरवाडीचं कोणी घरी भेटायला आले की ते स्वतः डॉक्टर असो वा नसो ते पण पन्नाशी नंतर होणारे आजार आणि त्या साठी घ्यायची खबरदारी यावरची माहिती इतक्या आस्थेने देतात की आपल्याला त्यातले बरेच रोग झाले असावेत असं त्यांची लक्षणं ऐकून वाटायला लागतं.
        ते भेटून गेले की "बघा माझ्या माहेरच्यांना किती काळजी आहे तुमची, मुद्दाम भेटायला आले. आता जरा ऐका त्यांचं" असं म्हणून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आहारात होणाऱ्या बदलावर एक प्रदीर्घ व्याख्यान देऊन समारोप केला जातो.
       डाएट वरची निरनिराळी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत तसेच इंटरनेट वरही या विषयावर खूप माहिती उपलब्ध आहे आणि ती कमी वाटली तर आपल्याकडे न मागता सल्ले देणारे रिकामटेकडे काही कमी नाहीत . तसले पदार्थ रोज खाण्यापेक्षा एकदाच काय व्हायचं ते होउदे असं नाही वाटलं तरंच नवल.
        सर्वतोपरी काळजी घेऊनही मधुमेह, थायरॉईड वगैरेची लागण झालीच तर भेटायला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या ओळखीत असलेलं कोणी ना कोणी तरी कसं या आजारात अचानक गेलं याचं भीषण वर्णन करून प्राण कंठाशी कसे येतील याची पुरेपूर काळजी घेते आणि तसं झालं की" पण आता बरीच औषधं उपलब्ध आहेत" असं त्रोटक बोलून जरा दिलासा द्यायचा प्रयत्न करते .
        पुरुष नेमका म्हातारा कधी होतो हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या हितचितकांना विचारणा केली त्यातल्या एकाने दिलेलं उत्तर मला अगदी मनोमन पटलं तो म्हणाला की  "बायकोने संशय घ्यायचं बंद केलं की समजावं आपण म्हातारे झालो." पण ते जाणून घेण्यासाठी काय करायला हवं याचं उत्तर मात्र त्याने टाळलं ; बघा कोणाकडे असेल
😄😄

2110. मन:शांती : येथे व आत्ता

           एक अट्टल चोर होता. तो फक्त रेल्वेच्या लांबच्या प्रवासात अत्यंत नियोजनपूर्वक मोठा हात मारायचा. एकदा एका श्रीमंत माणसावर पाळत ठेवून नेमके त्याच्या कूपेमध्ये तिकीट त्याने मिळवले. कूपेमध्ये फक्त हे दोघेच होते.  शैटजींकडे भरपूर मौल्यवान दागिने होते. तीन  रात्रीचा प्रवास होता. रोज रात्री शेटजी पोटली काढायचे, दागिने मोजून परत ठेवायचे.बाथरूमला जाऊन यायचे व निवांत घोरत झोपायचे. शेडजी जाऊन आल्यावर चोरही बाथरूमला जाऊन यायचा. शेटजी झोपी जाण्याची वाट पाहायचा  व लगेच पोटली शोधण्यासाठी शेटजींची बॅग तपासायचा. हे काम त्याला वाटले तितके सोपे नव्हते. पहिल्या रात्री पूर्ण वेळ शोधूनही काही हाती लागले नाही. दुसऱ्या दिवशीही तेच घडले. तिन्ही दिवस शेटजीने पोटली त्याच्या समोरच काढली व त्याच्या समोरच खाली ठेवून दिली होती. पण चोराला आश्चर्य वाटायचे की, त्याला ती तिथे का  सापडत नाही.
    शेवटी मुक्कामी पोहोचण्याचे स्टेशन आले. शेटजींनी पोटली हातात घेतली व म्हणाले, "मित्रा, तीन रात्री तू झोपला नाहीस. आता घरी जाऊन निवांत विश्रांती घे." चोराने त्यांच्या पायावर लोटांगण घातले व म्हणाला,"इतकी नामुष्की मला कधीच आली नाही. तुम्हाला सर्व काही ठाऊक होते तरी, तुम्ही रात्रभर निवांत झोपायचा. पण येथेच असलेला मुद्देमाला मला सापडला नाही. गेल्या पंधरा वर्षात असे कधीच घडले नाही. प्लीज, मी तुमच्या पाया पडतो. तुम्हाला गुरु मानतो. मला सांगा, तुम्ही ती पिशवी कोठे लपवायचा?" शेटजी म्हणाले," तू रात्री बाथरूमला गेलास की लगेच, मी ती पिशवी तुझ्या उशीजवळ ठेवलेल्या तुझ्या हॅन्डबॅगेत ठेवायचो. आणि पहाटे उठून पुन्हा काढून घ्यायचो. तू माझा सर्व सामानात रात्रभर शोधत बसायचास. पण ती पिशवी माझ्याकडे नसायचीच.
     आपण चोर नाही पण एक गोष्ट आपण सर्वांनी या गोष्टीपासून लक्षात घेतले पाहिजे की, सुखशांतीचा जो खजिना आपण बाहेर शोधत आहोत, तो आपल्यापाशीच आहे. 
          समजा तुम्हाला कोणी विचारले की, तुमच्यासाठी जगातील सगळ्यात जास्त मौल्यवान वस्तू काय आहे? सगळ्यात जास्त मौल्यवान व्यक्ती कोण आहे?  वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल  देव! कोणी म्हणेल मुलगा! कोणी म्हणेल इस्टेट! पण खरं सांगा! तुमच्याशिवाय या सर्व वस्तूंना काही महत्त्व आहे का? तुमच्या स्वतः शिवाय दुसरे कोण तुम्हाला प्रिय असेल? 
      प्रत्येकाला तो स्वतः सर्वात जास्त प्रिय असतो. पण मजा अशी आहे की, आपण जगातील सर्व वस्तूंबद्दल जाणण्याचा प्रयत्न करतो, पण आपण स्वतःबद्दल जाणण्याचा विचार करत नाही. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणून जगातील काही लोकांनी खूप यशस्वी जीवन जगल्यानंतर आणि जगाचा बराचसा अनुभव घेतल्यानंतर विचार करायला सुरुवात केली की,
'मी कोण आहे?'
'मी येथे कशासाठी आहे ?' 'माझ्या जीवनाचे ध्येय काय ? उद्देश काय ?'
      सगळ्या चिंतनांमधून एक निष्कर्ष निश्चित निघतो की, आपण जीवनात जे काही करतो, त्या सर्वांमधून फक्त आनंदच प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आनंदाची इतकी तजवीज करूनसुद्धा आपण दुःखी का राहतो ? ही महत्त्वाची समस्या आहे. लोक निवृत्तीनंतर काय काय करावे ह्याची स्वप्नं मनाशी बाळगतात. पण निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी लगेच नवीन जॉब घेऊन बसतात. काही न काही करत राहायचे, जास्तीत  जास्त कमवायचे, अधिकाधिक वस्तू गोळा करायच्या आणि अधिकाधिक दुःख व्हायचे. असे का ?
         एक गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे की, ज्या आनंदाचा शोध आपण घेत आहोत, तो बाहेरच्या कोणत्याही वस्तूत, व्यक्तीत किंवा परिस्थितीत नाही. आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी हे ओळखले होते की, नित्य-परिवर्तनशील वस्तूंमध्ये शाश्वत सुख देण्याची क्षमताच नसते. आणि हे सर्वसाधारण तर्कानेही लक्षात येईल की,जी वस्तू स्वतः टिकाऊ नाही, ती टिकाऊ सुख देऊ शकणार नाही. 
      पूर्वसंस्कारानुसार मनामध्ये राग-द्वेष असतात. राग म्हणजे अनुराग, प्रेम किंवा आवड. सुखप्राप्तीसाठी मन नेहमी आवडीच्या गोष्टींच्या शोधात असते व नावडत्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करते. अशाप्रकारे वस्तू व व्यक्तींमध्ये सुखासाठी झटणारे बहिर्मुखी मन नेहमी रजोगुणात  किंवा तमोगुणातच असते. 
      पण काही चिंतन व्हायचे असेल तर, मन सात्विक असले पाहिजे. विचार करूनच आपण समजू शकतो की, आपण जे काही करीत आहोत ते का व कशासाठी करीत आहोत ? ते तसे करायला आपल्याला नको बाध्य करीत आहे?  सुखप्राप्ती हेच एकमेव ध्येय असेल तर, विचार करणे आवश्यक आहे की, विषय वस्तूंमध्ये आनंद आहे का ? आनंद देणे हा विषय वस्तूंचा धर्म आहे का? गोड असणे हा साखरेचा धर्म आहे, साखर गोड नाही असे असूच शकत नाही. चॉकलेट खाऊन नेहमी आनंद मिळतो का ? लहानपणी एखाद्याला चॉकलेट खूप आवडत असेल पण तेव्हाही एक मर्यादेनंतर ते पण कंटाळवाणे होत होते. वय झाल्यावर मधुमेहाने शरीरं ग्रासलेले असतील तर, चॉकलेट अगदी त्याज्य होऊन बसते. म्हणजे आनंद देणे हा
चॉकलेटचा किंवा कोणत्याही वस्तू-व्यक्ती-परिस्थितीचा धर्म होऊ शकत नाही. हा आपला भ्रमच आहे की, एखाद्या
वस्तूमुळे आपल्याला आनंद मिळतो, हा भ्रम आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. खरं तर एखाद्या वस्तूबद्दल इच्छा झाल्याबरोबर मनात विक्षेप निर्माण होतात. मन अशांत होते. ही अशांतता आपल्या दुःखाला जन्म देते.
   सुख आणि दुःख ह्या मनाच्या दोन प्रमुख अवस्था आहेत. पण आपण मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर वस्तू प्राप्त करण्यासाठी आपण धडपड करण्याचे सोडले तर शांती उपलब्ध आहे. आनंदही उपलब्ध आहेच.
  Please can be gained, right here and now.

2109. पती पत्नी

     पत्नी माहेरी जाऊन पाच दिवस झाले होते, भांडण होऊन ती निघून गेली होती. सतीशला झोपच येत नव्हती. तो सारखा या कुशीवरून त्या कुशीवर करत होता. रात्रीचा एक खडूस होता.. अचानक पत्नीचा फोन आला. त्याने लगेच उचलला. फोन उचलताच राधिका म्हणाली, “अजून झोपला नाहीस?”
सतीश पटकन म्हणाला, “तू पण तर जागी आहेस ना?”
थोडा वेळ शांतता पसरली. मग सतीशला जाणवलं की ती रडतेय. तो म्हणाला, “काय झालं? तूच तर म्हणाली होतीस की आता कधीच परत येणार नाहीस. ना फोन करणार. माझ्यासारख्या खडूस माणसासोबत तुला राहायचंच नाही ना? मग आता रडतेयस का?”
राधिकेने बराच वेळ उत्तर दिलं नाही. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, “तू पुरुष आहेस ना... एका स्त्रीच्या भावना तुला कधीच समजणार नाहीत. जेव्हा एखादी स्त्री म्हणते की मी माहेरी जाते, तेव्हा ती खरंच जायला निघत नाही. ती फक्त एवढीच अपेक्षा ठेवते की तु तिला थांबवावं... म्हणावं की ‘तुझ्याशिवाय मन लागत नाही, जाऊ नकोस.’
जेव्हा ती एखाद्या आजाराचं कारण सांगते तेव्हा ती फक्त एवढंच बघते की तू विचारतोस का? काळजी घेतोस का? पण तुला तर पत्नीचे थोडे नखरेही सहन होत नाहीत.”
सतीश शांत होता.
राधिका पुढे म्हणाली, “पाच दिवस झाले माहेरी आलेय. एक क्षणही असा गेला नाही की मी तुझ्या फोनची वाट पाहिली नाही. एक रात्र सुद्धा नीट झोप नाही लागली. तुझ्या हाताला उशी करून झोपायची सवय जी लागलीय.”
हे ऐकून सतीश म्हणाला, “मीसुद्धा कुठे झोपू शकलोय... थोडासा जरी खट  आवाज झाला की धावत दरवाज्याकडे जातो... वाटतं कदाचित तू परत आलीस. तुझ्याशिवाय सगळं घर रिकामं वाटतंय.”
हे ऐकून राधिकाच्या मनाला एक दिलासा मिळाला. ती म्हणाली, “चल मग, आता ये मला घेऊन जायला.”
सतीश म्हणाला, “सकाळी येतो. इतक्या रात्री तीस किलोमीटरचा प्रवास करणं सोपं नाही.”
राधिका हट्ट करत म्हणाली, “मला माहिती नाही कसा येशील, पण आत्ता ये. इथे येऊन झोप. सकाळी जाऊ. पहिल्यांदाच मी एकटी माहेरी आलीये. बायका वेगळ्याच चर्चा करत आहेत. तू आत्ताच आलास, तरच माझ्या मनाला शांतता मिळेल.”
सतीश म्हणाला, “येतो मी.”
पत्नीच्या मनाला दिलासा मिळावा म्हणून तो अर्ध्या रात्री सासरी पोहोचला. राधिकाने त्याला पाहताच मिठी मारली. पाच दिवसांचं  बेचैन मन, नवऱ्याचा स्पर्श होताच शांत झाला.
जेव्हा एकमेकांची सवय लागते, तेव्हाच खऱ्या अर्थाने नवरा-बायकोचं नातं सुरू होतं.

2108. मी कोण आहे?

 निवृत्तीनंतर,
नोकरी नाही,
न ठरलेली दिनचर्या,
आणि एक शांत घर
जिथे आता केवळ शांततेचा आवाज घुमतो.
शेवटी मी माझ्या खऱ्या अस्तित्वाला ओळखू लागलो आहे।

मी कोण आहे?
मी बंगले बांधले,
फार्महाऊस उभे केले,
मोठ्या-छोट्या व्यवसायांत गुंतवणूक केली,
तरीही आज
स्वतःला चार भिंतींच्या आत बंदिस्त वाटतं।

सायकलपासून मोपेड,
मोपेडपासून बाईक, बाईकपासून कार —
गती आणि शान यांचा पाठलाग करत राहिलो —
आज मात्र हळूहळू चालतो,
तेही एकटाच, खोलीच्या आत।

निसर्ग हसून म्हणाला,
"कोण आहेस तू, प्रिय मित्र?"
मी उत्तर दिलं,
"मी… फक्त मी आहे।"

मी राज्यं पाहिली, देश पाहिले, खंड पायाखालून घातले,
पण आज माझ्या प्रवासाचं अंतर
फक्त ड्रॉइंगरूम ते स्वयंपाकघर इतकंच उरलं आहे।
संस्कृती आणि परंपरा शिकलो,
पण आता फक्त एवढंच वाटतं
की आपल्या कुटुंबालाच नीट समजावं।
निसर्ग पुन्हा हसला,
"कोण आहेस तू, प्रिय मित्र?"
मी म्हणालो,
"मी… फक्त मी आहे।"

कधी वाढदिवस, साखरपुडे, लग्न
धूमधडाक्यात साजरे केले.
आज भाजीसाठीही नाणे मोजावे लागतात।
कधी गायींना, कुत्र्यांना अन्न घातलं,
आज स्वतःचं जेवणही कठीण वाटतं।
निसर्गाने पुन्हा विचारलं,
"कोण आहेस तू, प्रिय मित्र?"
मी उत्तर दिलं,
"मी… फक्त मी आहे।"

सोनं, चांदी, हिरे, मोती  लॉकरमध्ये शांत झोपलेत.
सूट-ब्लेझर  अलमारीत टांगलेत, 
जणू न स्पर्शलेली स्वप्नं आता
मी मऊ कापसाच्या कपड्यांत जगतो,
सोपं आणि मोकळं. 

कधी इंग्रजी, फ्रेंच, हिंदी भाषांवर प्रभुत्व होतं .
आता आईच्या भाषेत वाचताना
सर्वांत मोठा सुकून मिळतो.
कधी कामासाठी अनंत प्रवास केले,
आज त्या नफा-तोट्यांचा
फक्त आठवणींतच हिशोब करतो.
व्यवसाय केला, कुटुंब वाढवलं, संबंध जपले,
पण आज सर्वांत प्रिय सखा
तो शेजारी आहे
जो हसून विचारतो, "कसे आहात?"

कधी नियम पाळले,
शिकण्यात सर्वोत्तम ठरलो.
पण आता जाऊन समजलं
की खरंच महत्त्वाचं काय आहे.
जीवनाच्या चढ-उतारांनंतर
एका शांत क्षणात माझ्या आत्म्याने मला सांगितलं:
आता पुरे झालं…

तयार हो, 
अरे प्रवासकर…
शेवटच्या प्रवासाची वेळ झाली आहे…
निसर्ग मृदू हसत पुन्हा विचारतो,
"कोण आहेस तू, प्रिय मित्र?"
आणि मी उत्तर देतो:
"हे निसर्गा, तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तू।

कधी आकाशात उडालो,
आज जमिनीला प्रेमाने स्पर्श करतो
माफ कर,  मला अजून एक संधी दे जगण्याची…
पैसा कमावणारी यंत्र बनून नव्हे,
तर एक खरा माणूस बनून 
मूल्यांसह, कुटुंबासह, प्रेमासह।"

🌷🌸 सर्व ‘ज्येष्ठ नागरिकांना’ प्रेम, शक्ती आणि शांततेच्या शुभेच्छा!🌷🌸



2107. विठ्ठल ! विठ्ठल !

 विठोबा. मला मनापासून आवडतो
अगदी लहान असल्यापासनं.
कमरेवर हात ठेवून उभा ठाकलेला.
गालातल्या गालात खुदकन् हसणारा.
काळासावळा.
साधासुधा.
‘आपला’ देव वाटतो.

पंढरपूरला गेलो की सहज भेटायचा.
आपुलकीनं बोलणार.
“काय, कसा काय झाला प्रवास?
यावेळी अधिकात येणं झालं.
जरा गर्दी आहे. चालायचंच.
सगळी आपलीच तर माणसं !
असं करा, उद्या सक्काळी सक्काळी या. काकडआरतीला.
मग निवांत बोलू.”

मला पटायचं. 
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे
पाचच्या सुमारास मी एकटाच मंदिरात जायचो.
फारशी गर्दी नसायचीच.
विठोबा निवांत भेटायचा.
वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं.
काकडआरती चाललेली.
धूप उदबत्तीचा सुगंध.
सगळं अदभुत!

एवढ्या गर्दीत सुद्धा विठोबा
माझ्याकडेच बघायचा…
डोळ्यातल्या डोळ्यात हसायचा.
“अरे वा ! आज सकाळी सकाळी दर्शन.
वा! वा! आनंद वाटला.
काय, कसा काय चाललाय अभ्यास?
तेवढं गणिताकडे लक्ष द्या…
पुढच्या वेळी याल,
तेव्हा पाढे पाठ पाहिजेत हं, तीसपर्यंत.
जरा लिहायची सवय ठेवा.
आम्ही पाठीशी आहोतच.
तरीही तुम्ही मेहनतीत
कमी पडता कामा नये.
बाकी अक्षर छान आहे हो तुमचं...!”

मला भारी वाटायचं.
“तीसपर्यंत पाढे नक्की पाठ करतो.
गाॅडप्राॅमीस!”

मी गाॅडप्राॅमीस म्हणलं की विठोबा
गालातल्या गालात गोड हसायचा.
“बरं बरं…”

देवाशपथ सांगतो.
लहान असताना विठोबाशी
असं सहज चॅटींग व्हायचं.

माझे आजी-आजोबा…
पालघरला रहायचे.
दर वर्षी दोघंही वारीला जायचे.
चातुर्मासात चार महिने
पंढरपूरला जाऊन रहायचे.

दर वर्षी आम्हीही जायचो पंढरपूरला.
साधारण ८० ते ८५चा सुमार असेल.
चार पाच वर्ष सलग जाणं झालं पंढरपूरला.
तेव्हा महापूजा असायच्या.
आजोबांच्या पंढरपूरात ओळखी फार.
माझे दोन्ही मामा मामी, आई बाबा
सगळ्यांना महापूजेचा मान मिळाला.
गाभार्‍यातला विठोबा
आणखीनच जवळचा झाला.

हिरव्या-काळ्या तुळशीची माळ
काय छान शोभून दिसायची विठोबाला!
त्याच्या कपाळावरचं ते गंध…
दूध दह्यानं घातलेली आंघोळ…
विठोबाच्या चेहर्‍यावरचं अलौकिक तेज…
त्याचे ते अलंकार…
लगोलग हात जोडले जायचे.
असं वाटायचं पूजा संपूच नये कधी…

पंढरपूरला आजी-आजोबा
बांगड धर्मशाळेत रहायचे.
धर्मशाळा नावालाच.
अतिशय उत्तम सोय.
सेल्फ कंटेन्ड रूम्स.
भल्यामोठ्या दोन खोल्यांत 
आजी-आजोबांचा संसार मांडलेला असायचा.
गॅसपासून सगळी सोय.
आम्ही गेलो की
दोन खोल्या अजून मिळायच्या.
प्रत्येक खोलीसमोर रूमएवढीच
भलीमोठी गॅलरी.
तीन-चार मजली मोठी इमारत.
नवीनच बांधलेली.
अतिशय लख्ख, स्वच्छ.
धुडगूस घालायला पुरेपूर स्कोप.
समोरचा वाहता रस्ता.
गॅलरीत रेलींगला टेकून
रस्त्यावरची गंमत बघायला
मला जाम आवडायचं.

ही जागा मंदिरापासून
पाच मिनटाच्या अंतरावर.
पंढरपूरला गेलो की
दोन दिवस रहाणं व्हायचंच व्हायचं.
सक्काळी महापूजा आवरली
की दिवस मोकळा.

मी चौथी पाचवीत असेन तेव्हा…
सक्काळी सक्काळी जाग यायची.
लाऊडस्पीकरवर भीमसेन अण्णांचा
आवाज कानी पडायचा.
‘माझे माहेर पंढरी…’
आपण युगानेयुगे पंढरपूरला रहातोय
इतकं प्रसन्न वाटायचं.
सगळं आवरून मी शून्य मिनटात
तयार व्हायचो.
मग आजोबांसोबत चंद्रभागेतीरी.
बोटीत बसायला मिळावं ही प्रामाणिक इच्छा.

मी पडलो नगरवाला.
पाऊस, पाणी, नदी, बोटींग…
या गोष्टी परग्रहावरल्या वाटायच्या.
नदी पाण्यानं टम्म फुगलेली.
माझी बोटींगची इच्छा विठोबा, थ्रू आजोबा
सहज पूर्ण करायचा.
चूळूक चूळूक आवाज,
ओल्या पाण्याचा हवाहवासा वास,
घाटांवर विसावलेली
असंख्य कळसांच्या भाऊगर्दीत
हरवलेली पंढरी.
अलंकापुरी.
हे स्वर्गसुख बघायला
दोन डोळे पुरायचे नाहीत.

चंद्रभागेला भेटून पुन्हा
बांगड धर्मशाळेत परतायचं.
तोवर आजीचा स्वयपाक झालेला असायचा.
जेवण झालं की मी पुन्हा गुल.

तेव्हाही पंढरपूरात गर्दी असायचीच.
तरीही आजच्याइतकी नाही.
भलीमोठी दर्शनरांग, दर्शनमंडप वगैरे नसायचं.
दिवसातून इन्फाइनाईट टाइम्स
मी मंदिरात जायचो.
दहा पंधरा मिनटात सहज दर्शन व्हायचं.
विठोबाशी मैत्र जुळायचं.

कंटाळा आला की
नामदेवाच्या पायरीपाशी जाऊन बसायचो.
मला आठवतंय…
एके दिवशी सकाळी नामदेवपायरीपाशी गेलेलो.
एक वारकरी नाचत होता…
हातात चिपळ्या.
गळ्यात वीणा आणि तुळशीच्या माळा.
कपाळी गंध.
कुठलातरी अभंग म्हणत होता.
दिवसभरात चार पाच वेळा
चकरा झाल्या माझ्या तिथं.
प्रत्येक वेळी तो भेटला.
भान हरपून नाचणारा.
मला रहावलं नाही.
सुसाट धर्मशाळेत गेलो.
आजीला सगळं सांगितलं.

“सकाळपासून नाचतोय बिचारा.
जेवला सुद्धा नाही ग.”

आजी खुदकन् हसली.
“तोच खरा विठोबा.
जा नमस्कार करून ये त्याला.”

मी रिवर्स गिअरमधे पुन्हा मंदिरात. व
त्याला वाकून नमस्कार केला.
तो मनापासून हसला.
मला कवेत घेतलं.
गळ्यातली तुळशीची माळ
माझ्या गळ्यात घातली.
धन्य… धन्य…
काय सांगू राव?
त्याच्या डोळ्यात विठोबा हसत होता.

धर्मशाळेत मॅनेजरची खोली होती.
विठोबा, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि
इतर अनेक संतांच्या तसबिरी होत्या.
वीस पंचवीस असतील.
मॅनेजरकडे मोठ्ठी सहाण होती.
गंध उगाळायला अर्धा तास सहज लागायचा.
मग प्रत्येक तसबिरीला गंध लावणं,
जुना हार काढून ताजा हार घालणं,
उदबत्ती लावणं…
मला हे सगळं बघायला खूप आवडायचं.

मॅनेजर माझी परीक्षा घ्यायचे.
संतांची मांदियाळी मीबरोबर ओळखायचो.
मॅनेजर खूष.
बक्षीस म्हणून विठोबाला हार मी घालायचो.
बत्तासा मिळायचा.
मला भारी वाटायचं.

धर्मशाळेत खालच्या मजल्यावर
कुठलेतरी किर्तनकारबुवा आलेले असायचे.
सकाळी त्यांची पूजा आटोपली
की रियाज असायचा.
मी जाऊन बसायचो.
रात्री त्यांचं मंदिरात किर्तन असायचं.
साथीदार तयारीचे.
मृदुंगाला शाई लावली जायची.
टाळ चिपळ्यांचा आवाज घुमायचा.
बुवांची रसाळ वाणी.
प्रेमळ चेहरा.
लाईव्ह परफाॅर्मन्स.
श्रोता मी एकटाच.
कीर्तन मस्त रंगायचं.
माझा चेहरा बघून बुवा खूष व्हायचे.
सहज शेजारी लक्ष जायचं.
वाटायचं विठोबाच शेजारी बसून
प्रसन्नचित्तानं किर्तन ऐकतोय.
भारीच !

दुसर्‍या मजल्यावर एक चित्रकार असायचे.
संस्थानाच्या कामासाठी आलेले.
महाभारत, रामायण, विठोबाची
अप्रतिम चित्रं काढायचे.
एकदम जिवंत.
भल्यामोठ्या कॅन्व्हासवर.
मी गुपचूप तिथं जाऊन बसायचो.
तासन्तास.
हरवून जायचो.
मोठा कसबी कलाकार.
तासाभरानं त्यांचं माझ्याकडे लक्ष जायचं.
मी पटकन् विचारायचो.
“इतकी छान चित्रं कशी काय काढता?"

ते नुसतेच हसायचे.
“मी नाही काढत…
विठोबाच रंगवून घेतो माझ्याकडनं."
झालं.
मला कमरेवरचे हात काढून,
ब्रश घेवून चित्र रंगवणारा
विठोबा दिसू लागायचा.
नंतर कळायचं.
त्यांनीच काढलेली अप्रतिम चित्रं
मंदिरात लावली आहेत.
त्यांचं म्हणणं पटायचं.

पंढरपुरातले दोन दिवस
शून्य मिनटात संपून जायचे.
दोन दिवसात इन्फाइनाईट टाइम्स,
इन्फाइनाईट रूपात विठोबा भेटायचा.
जड पावलांनी टांग्यात बसायचं.
स्टॅन्डवर पोहोचलो की
नगरची गाडी तयारच असायची.
टिंग टिंग…
डबलबेल.
खिडकीतून बाहेर लक्ष जायचं.
“या पुन्हा पुढच्यावर्षी…”
विठोबा हात हलवून निरोप द्यायचा.
डोळ्यात चंद्रभागा दाटून यायची.

नंतर पुन्हा फारसं
पंढरपूरला जाणं झालं नाही.
आज ठरवून पासोड्या विठोबाला भेटलो.
विठोबा ओळखीचा हसला.
“काय चाललंय?
झाले का पाढे पाठ?"
मी जीभ चावली.
“बरं… बरं… असू देत.
एकदा हेडऑफीसला जाऊन या."

“नक्की…!”.
मी पंढरपूरचं प्लॅनिंग करायला लागतो.

॥ विठ्ठल…! विठ्ठल…! ॥

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...