शनिवार, २६ जुलै, २०२५

2101. सता

     मी मुंबईत असते. म्हणजे लग्न करून मुंबईत आले. माझे लहानपण कोकणात गेले. आईवडिलांची लाडकी लेक.. वृंदा. बाबांची लष्करात नोकरी. त्यामुळे वर्षातील बरेच महिने ते बाहेरच असत.. कधी काश्मीरबॉर्डर.. कधी बांगलादेश बॉर्डर.. कधी वाघा बॉर्डर. त्त्यांची येणारी पत्रे आम्हाला धीर देत. बाबांनी आपल्या देशासाठी दोन युद्धे लढली.. त्या काळात आम्ही दोघी कमालीच्या तणावाखाली असू. माझे आजोळ त्याच गावात.. त्यामुळे मामा मामी सकाळ संध्याकाळी येत.. धीर देत.. रेडिओच्या बातम्यानी युद्धाची स्थिती कळे.मग बाबा बरे झाले.
युद्ध संपले.. बाबांना सुट्टी मिळाली.. पुन्हा आम्हा तिघांचे घर झाले.. बाबांनी बुलेट मोटारबाईक घेतली होती.. सुट्टीत ते मला रोज शाळेत सोडायचे.. संध्याकाळी शाळेच्या बाहेर बुलेट घेऊन उभे असायचे. बाबांचा सुट्टीचा काळ मला खूपच आनंदाचा व्हायचा.
त्या एका महिन्याच्या काळात प्रत्येकवेळी बाबा किमान दहा माड.. वीस पोफळी आणि दहा आंबाकलमे लावायचे.. ते बॉर्डरवर गेले की आई डोळ्यात तेल घालून त्या झाडांची देखभाल करायची.आई मला म्हणायची 'वृंदे.. बाबा देशाचे रक्षण करतात... आपण त्यानीं लावलेली झाडें वाढवायची..बाबा दुसऱ्या सुट्टीत आले की आम्हा दोघीना भेटायचे आणि त्यानी लावलेल्या झाडांकडे धाव घ्यायचे.
बाबा आणि आई यांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होते, हे मला पदोपदी जाणवायचे.. नाहीतर आजूबाजूला अनेक संसार लोकलज्जेकरिता मोडायचे नाहीत.. पण कुढत कुढत.. एकमेकांना शिव्या देत.. सुरु असायचे.
बाबा लष्करातून निवृत्त झाले आणि बागायतीत रमले.. खरं तर त्याना नोकरीच्या संधी आल्या होत्या.. पण सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवर ते खूष होते.. शिवाय छोटे कुटुंब. पण त्यानी आणि आईने मिळून झाडें खुप लावली.. शंभरच्यावर माड लावले..पोफळी लावल्या..पाचशे कलमाची आंबा बाग तयार केली. बाबांच्या बरोबरीने आई धडपडत होती. मी शाळेत गेले की आई डबा घेऊन बागेत जायची आणि मी यायच्या वेळी घरी पोचायची.
     मी मात्र दोघांची लाडकी होते.. बाबांची जास्त.. आई शिस्तीसाठी ओरडायची..अभ्यासात कमी पडले की मार पण द्यायची... बाबा मला जवळ घ्यायचे.. माझा गृहपाठ पुरा करून दयायचे. बागेत काम नसेल तेंव्हा शाळेत सोडायचे.. आणायचे.
    बारावी पास करून मी कॉलेजात जायला लागले.. मी दिसायला सुंदर.. कॉलेजात काही मवाली पोर मला सतावू लागले.. बाबांना मी सांगितले फक्त.. बाबा बुलेट घेऊन आले आणि त्या मवाली पोरांना मोडून ठेवले.. मग सर्वाना कळले.. वृंदा निवृत्त मिलिटरी माणसाची कन्या आहे.. हिला त्रास दिला तर आपली हाडे जाग्यावर राहायची नाहीत.
मी ग्रॅज्युएट झाले.. बँकांच्या परीक्षा देऊ लागले.. आणि मला एका राष्ट्रीय बँकेत नोकरी लागली. आईबाबा खूष.
माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्या. मामा स्थळें आणत होते... पण मला आईबाबांना सोडून जायचे नव्हते.पण माझ्या आतेनेच तिच्या मुलासाठी.. समीर साठी मला मागणी घातली... समीर बाबांचा भाचा आणि खूप लाडका.शिवाय उच्चशिक्षित.. एकूलता एक... मुंबईत मोठे घर.. मी पण त्याला लहानपणापासून पाहिलेला. नाही म्हणायला जागा नव्हती.. शिवाय माझा विचार असा.. शेवटी आईबाबांना माझ्याकडे यावं लागणार.. कारण मी ऐकूलती एक.. त्यावेळी माझ्या सासरच्या मंडळींचा विरोध असता नये.. समीरला आपल्या मामा मामीची काहीच अडचण होणार नव्हती.
  माझे आणि समीरचे लग्न झाले. मला मुंबईत बदली मिळाली. मी मुंबईत गेले आणि आईबाबा एकटे झाले. तसे मामा यायचे एकदिवस आड.. शिवाय गावात सगळीच ओळखीची मंडळी. त्यामुळे त्त्यांचा वेळ जायचा.. बागायती होतीच.. त्यात दोघे काम करायची. नारळ काढून घेणे.. विकायला पाठवणे.. आंबा कलमाची मशागत.. फवारणी.. आंबे काढून पार्सले भरणे.. रोज रात्री मला फोन..
यशचा जन्म झाला आणि आईबाबा सुखावले.. त्याच्या बारशाला चार दिवस येऊन राहिले. जोडीने आले आणि जोडीने गावी गेले. मी आईला म्हंटले' ', अग राहा महिनाभर.. बाळाला आंघोळ घालशील.. मला मदत होईल..
'नाही ग.. तूझ्या बाबांची आबाळ होईल.. तारुण्य लष्करात गेलं.. काय मिळेल ते खाऊन राहिले... आता म्हातारपणी तरी घरचे दोन घास खाउदे.. शिवाय माडाना पाणी लावायचे.. मिरी काढून घयायची.. सुकवायची.. किती कामे बाकी..
   यश मोठा होत गेला.. त्याला बघायला बाबा यायचे.. येताना त्याला आणि समीर साठी आंबे.. काजू.. काहीतरी घेऊन यायचे.. एखादा दिवस राहायचे आणि जायची तयारी करायचे. मी त्याना म्हणायचे.. "बाबा.. तुम्ही आलात की यश खूष असतो.. आजोबांना गावी पाठवू नको म्हणतो.. राहा ना थोडे दिवस.. नाहीतर दोघेही या.. रहा माझ्या घरी. पण बाबा राहायचे नाहीत. त्याना आईची आणि बागायतीची काळजी असायची. झाडें त्यान्च्या स्वप्नात यायची. त्याना मुंबईत करमायचे नाही.
मी आणि समीर यशला घेऊन गणपतीला जायचो.. आठ दिवस राहायचो.. भजने आरत्या करायचो.. मी पुन्हा रजा घेऊन मे महिन्यात दहा दिवसासाठी जायचे.. यश सोबत असायचा.बाबा त्याला आंब्याची पेटी कशी भरायची हे दाखवायचे.. आणि हळूहळू तो व्यवस्थित भरायचा. यश बागेत जायचा.. गडीमाणसे उंच झाडावर चढून आंबे उतरवत असत.. ते पहायचा.. बाबा त्याला नदीवर पोहायला न्यायचे.. आई देवळात नेऊन कीर्तन ऐकवायची.. कधीमधी दशावतार नाटक असेल तर दाखवायची.
माझी रजा संपत आली की मला आणि यशला मुंबईत येणे जीवावर यायचे.. आई डोळे पुसत राहायची आणि बाबा गप्प व्हायचे.
यश मोठा होत होता त्याचवेळी आईबाबा म्हातारे होत होते.. बाबा तसे मिलिटरीमॅन.. त्यामुळे त्त्यांची तब्येत तशी व्यवस्थित पण आई थकत चालली.. त्यात तिच्या माहेरहुन तिला मिळालेला डायबिटीस तिची पाठ सोडतं नव्हता.. सावंतवाडी.. कुडाळ भागातील मोठया डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु होती.. मी एकदा मुंबईला नेऊन मोठया हॉस्पिटलमधे दाखवलं.. त्त्यांची पण औषधे सुरु होती.
  आई आजारी झाली तरी झोपून राहायची नाही.. जमेल तेव्हढे करत राहायची.. बाबा तिला घरकामात मदत करायचे.. हळूहळू सर्व बाबाच करायला लागले.. मी पंधरा दिवसांनी गावी जायचे.. बाबांना मदत करायचे.. आईला डॉक्टरकडे नेऊन आणायचे.. मी किती वेळा त्याना सांगितले... आता मुंबईत चला.
पण ती दोघे घर सोडायचे नाव घेत नव्हती..
माझी धावपळ होत होती.. नोकरी, संसार.. शुक्रवारी रात्रीची ट्रेन.. परत रविवारी रात्री परत मुंबई. त्यात यशची बारावी.. नवरा शांत माणूस, म्हणून मी धावपळ करू शकत होते..
   यशचे कॉलेज सुरु झाले आणि हळूहळू आई थकत आली.. तिला चालायला झेपेना.. माझी मामी सतत तिच्यासोबत राहू लागली.. मामा येऊनजाऊन असत. मी तिला ऍम्ब्युलन्स करुंन मुंबईला न्यायची तयारी करू लागले.. तिच्या नेहेमीच्या  फिजिशियनना भेटायला गेले..
', डॉक्टर.. आई अगदीच थकली.. जेवण पण जात नाही तिला.. दोन पावले चालू शकत नाही.. मी तिला मुंबईला नेते..
"मॅडम.. काही उपयोग व्हायचा नाही.. मी गेली पंचवीस वर्षे त्यान्च्यावर उपचार करतोय.. त्त्यांचे एक एक अवयव बाद होत चाललेत.. डायबेटीसचा जास्त परिणाम किडनीवर होतोय.. त्त्यांची किडनी बाद झाली आहे. त्यामुळे इतर अवयव बाद होत आहेत.. आता कसलाच उपचार त्या सहन करू शकणार नाहीत.. त्याना कुठे नेऊ नका.. त्त्यांचे थोडे दिवस राहिलेत.. या घरातच त्त्यांचा शेवट होऊ दे..
"होय डॉक्टर.. मी नाही नेत तिला.. ती पण मनापासून येणार नाहीच.. तिचे याच गावावर आणि घरावर प्रेम आहे.. मी माझ्या मनाची तयारी केली आहे.. काय व्हयंचे ते या घरातच होउदे.
मी एक महिना रजा घेऊन गावी आले.. लक्षात आले आईचे थोडे दिवस राहिलेत.. बाबांना सांभाळायला हवे.. त्त्यांचा जीव यशवर.. कॉलेज सुरु व्हायच्या आधी यश दोन दिवस राहून गेला. आईला बरे वाटले.. ती एकसारखी त्याच्या केसावरून हात फिरवीत राही.. बाबांना बरे वाटले.. त्यानी समुद्रावर जाऊन त्याच्या आवडीचे मासे शोधून आणले. बाबा यशला बाजूला घेऊन बसत.
यश मुंबईत गेला.. पुन्हा आम्ही तिघे राहिलो. मामी सकाळी येत होती. रात्री घरी जात होती.. गावातील शेजारी चौकशी करून जात होते.
    आईला घरघर लागली.. सर्वांच्या लक्षात आले.. शेवट जवळ आलाय.. बाबा स्तब्ध झाले.. आईच्या शेजारच्या खुर्चीवर बसुन राहत.. तिचे तोंड पुसत.. कणेरी चमच्याने तोंडात घालायचा प्रयत्न करीत.
आईची शुद्ध गेली.. रात्री मी शेजारी होते.. बाबांना किती सांगितले, थोडे तरी झोपा.. ते न ऐकता बाजूलाच बसुन होते.. रात्रीचे बारा वाजले.. बाबा माझ्याशी बोलू लागले..
'वृंदे.. तू 'सत 'बद्दल ऐकले आहेस काय?
', नाही हो बाबा.. सत काय असत?
'मी राजस्थान बॉर्डरला होतो ना.. तेंव्हा तिथल्या लोकांकडून सत बद्दल ऐकलं होत.. पूर्वी पुरुष मरण पावला की स्त्री सती जायची म्हणजे त्याची पत्नी. तसेच पत्नी मरण पावली की नवरा तिच्यासोबत सरणावर जायचा... त्याला 'सत 'म्हणत..
'पण तुम्हाला हे आत्ताच का आठवतंय?
'तुझी आई गेली तर मी मागे राहून काय करू? मी तिच्यासोबत..
"बाबा.. बाबा.... मी किंचाळले.. काय बोलताय तुम्ही? तुम्ही आम्हाला हवे आहात बाबा... मी रडू लागले..
'मला तिच्यामागे नाही जगायचंय वृंदा..
'बाबा गप्प रहाता का.. तुम्हाला यशची शप्पथ..
यशची शप्पत म्हणताक्षणी बाबा गप्प झाले.. त्यांचे यशवर प्रेम होतेच तसे..
 बाबा परत गप्प खुर्चीत बसुन राहिले.. मी मात्र रडत होते..
पहाटे आई गेली.
बाबा स्तब्ध बसुन होते..मामा मामी. मामांची मुले.. शेजारी.. गावातील माणसे जमा झाली. सकाळी दहा वाजता मी आईच्या देहाला अग्नी दिला.
मग माणसे.. नातेवाईक.. ओळखीचे.. भेटायला येत होते.. माझे सांत्वन करून ते बाबांना भेटायला जात.. बाबा अनोळखी नजरेने त्याच्याकडे पहात होते. कुणाला ओळखत नव्हते.. रात्री पर्यत समीर आणि यश आले. बाबांना भेटायला गेले.. यशला पाहताच त्यानी यशला जवळ घेतले आणि जोरात ओरडले...'तुझी आजी गेली रे यश... यश आजोबांना बिलगून त्त्यांचे अश्रू पुसत होता..
मी आणि समिरने ठरवले.. आईचे दिवस झाले की बाबांना मुंबईला घेऊन जायचे.. मी मामांना तसे सांगितले.
रात्री यशने आजोबांना जबरदस्तीने पेज घ्यायला लावली.
मी बाबांना कॉटवर झोपवले आणि खाली चटई टाकून पडले.. यश.. समीर.. मामा दुसऱ्या खोलीत झोपले. माझे बाबांकडे लक्ष होते.. सुरवातीला हुंदके देत होते... मग बहुतेक झोपले.
    दिवसभराच्या दगदगीने मला उशिरा थोडी झोप आली.
  सकाळी उठून सर्वाना चहा केला आणि बाबांच्या खोलीत चहा घेऊन गेले. हाका मारल्या.. बाबा.. बाबा.. उत्तर नाही म्हणून कुशीवरून वळवले... सताड डोळ्यांनी बाबा माझ्याकडे पहात होते..
हातातला चहाचा कप खाली पडला आणि मी ओरडले.
"बाबा.. बाबा... बाजूच्या खोलीतून मामा, समीर, यश धावत आले.. पण रात्री केंव्हातरी बाबा आईला भेटायला गेले होते.
मी सुन्न झाले. आई पाठोपाठ बाबा गेले आणि माझ्या लक्षात आले, माझे माहेर संपले.
पुन्हा माणसे जमली... नातेवाईक.. शेजारी.. गाव वाले.. 
या पतीपत्नीच्या एकमेकांवरील प्रेमाने सारेच चकित झाले होते. काल नंतर आज पुन्हा स्मशान.. छोटया गावात स्मशान म्हणजे एका झाडाखाली सरण तयार करायचे.. आज पुन्हा त्याच झाडाखाली.. कालच्या अर्धवट जळलेल्या सरणावर हे दुसरे सरण..
मी बाबांना अग्नी दिला.. घरी येताना माझ्या लक्षात आले.. बाबांनी आपला शब्द खरा केला.. राजस्थानमध्ये पत्नी बरोबर पुरुष ", सत' जायचा म्हणे... बाबा माझ्या आई बरोबर सत गेले...
एका विलक्षण प्रेमाची मी साक्षी झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...