स्नेहा, अगं माझी फाईल कुठे आहे? मंदारने आवाज दिला तसा स्नेहाने गॅस कमी केला आणि पळतच खोलीत गेली. तिथे मंदारने खोली पार अस्तव्यस्त करून ठेवली होती.
अहो, हा काय पसारा करून ठेवला. काल तुम्ही मामांजींशी बोलता बोलता समोरच्या काॅर्नर टेबलवर नाही का ठेवली होती फाईल. म्हणत तीने मंदारला फाईल दिली. तुमचा पसारा आवरता आवरता आजही उशीर होईल मला, म्हणत फणका-यात ती किचन मध्ये गेली आणि पट पट पोळ्या करू लागली. पोळ्या झाल्या झाल्या तीने मंदार आणि आपला डबा भरला.
आज चहा मिळेल का? सास-यांचा त्रासिक स्वर कानावर पडताच तिने बाजूच्या गॅसवर उकळत असलेला चहा दोन कपात ओतला आणि समोरच्या खोलीत बसलेल्या सासू सास-यांना नेऊन दिला. किचन मध्ये जाऊन ओटा साफ करून लगेच आपल्या खोलीत आली. मंदार अंघोळ करून तयारी करत होता. ती पटपट खोली आवरायला लागली.
आज नाश्तात काय आहे? मंदारने साॅक्स घालता घालता विचारले.
उपमा.
काल पण उपमाच केला होता तु.
किराणा आणायचा आहे. जे होतं ते बनवलं. तीने त्याच्या कडे असं काही बघत म्हटले की मंदार मनातून चमकला. बरं, म्हणत तो सरळ डायनिंग टेबल कडे गेला. नाश्ता आटोपून ऑफिसला गेला. स्नेहा नेही स्वतःची तयारी केली आणि ती पण ऑफिसला निघून गेली. मंदार ऑफिसमध्ये पोहचला आणि गाडी पार्क करून निघालाच होता की त्याला समोरून सूर्यकांत जातांना दिसला. तो मस्त आनंदात शीळ घालत जात होता.
सुर्या...त्याने वळून बघितले.
हाय मंदार..
अरे कुठे गायब होतास आठवडाभर? फोन केला तर फोन ही लागत नव्हता. त्याच्या पाठीवर थाप देत मंदार बोलला.
खरं सांगू की खोटं...तो डोळे मिचकावत म्हणाला.
यात खरं खोटं काय आहे यार..
म्हणजे बघ खरं सांगितले तर लोकं मजाक करतात आणि खोटं सांगितले तर विश्वास करतात.
म्हणजे...मंदारने प्रश्नार्थक नजरेने त्याला विचारले.
तू माझा चांगला मित्र आहे म्हणून तुला खरे सांगतो .मी माझा बारावा हनिमून साजरा करण्यासाठी गोव्याला गेलो होतो. लिफ्टसाठी रांगेत लागत तो बोलला.
काय पण यार? मंदार बोलला. लिफ्टमध्ये थोडा वेळ गप्प बसले. लिफ्ट मधून निघाल्या वर काॅरीडोर मध्ये थांबत सूर्यकांत बोलला.
मंदार तुला तर माहितच आहे माझी बायको नोकरी करते. लग्नानंतर काही वर्षे खुप मजेत गेली नंतर मुलं झाली. जबाबदा-या वाढल्या. माझे आई वडीलही माझ्या सोबत राहतात. घर, नोकरी सांभाळतांना अनघाची खुप ओढाताण होते. मी जमेल तितकी मदत करतो. पण हळूहळू संसारात एकसुरीपणा यायला लागला. नोकरी वरून थकून घरी आलो की मग सैपाक, मुलांचा अभ्यास, आईबाबांचा दवाखाना यातच वेळ जातो. अरे माझ्या बायकोला प्रेमाने जवळ घेऊन मनमोकळे पणाने जशा पुर्वी गप्पा करायचो तशा गप्पा करायलाही सवडच मिळत नाही. आम्हा दोघांमधला प्रेमळ संवादच हरवू लागला.
मग ठरवलं की आपल्या नात्यामध्ये आलेली ही बोरीयत आपणच दूर केली पाहिजे. म्हणून वर्षातून एकदा मी अनघाला घेऊन बाहेर जातो. खुप मस्ती करतो, म्हणत त्याने डोळा मारला. काय आहे ना यार नातं टवटवीत ठेवायचे असेल तर अशा युक्त्या कराव्याच लागतात. एरवी असं फिरायला जातो म्हटले की आमच्या आई वडिलांचे न संपणारे दुखणे आडवे येतात. मग काय ऑफिसचे महत्वाचे काम सांगून सटकाव लागतं. म्हणून मी पहिलेच म्हटले होते की आजकाल खरं बोललेलं लोकांना चालत नाही. म्हणत सूर्यकांत हसला. पण एक सांगतो ती आनंदी असली ना तर अख्खं घर आनंदाने बहरून टाकते. स्नेहा वहिनीचच बघ जेव्हाही भेटतात किती प्रसन्न दिसतात कारण तु त्यांची तशी काळजी घेत असणार. लकी यु. चल भेटू या लंच मध्ये म्हणत तो आपल्या केबिनकडे गेला. मंदार आपल्या सीट वर बसला पण आज त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. स्नेहा वहिनी किती प्रसन्न राहतात कारण तु तशी काळजी घेत असणार .सूर्यकांत चे शब्द त्याच्या कानात घोळू लागले.
त्याला आठवली लग्नानंतरची बोलकार आणि प्रसन्न चेह-याची स्नेहा. लग्न झाल्या बरोबर आईने प्रत्येक कामातून अंग काढले तरी तीने चकार शब्द काढला नाही. घर, नोकरी, येणारे, जाणारे, सगळ्यांच किती प्रेमाने करायची. मग मुलगा झाला. आईने पहिलेच सांगितले की मला सांभाळणे जमणार नाही. तेव्हा नोकरीचा राजीनामा देऊन तीने मुलाकडे लक्ष दिले. रात्र रात्र मुलगा रडायचा तेव्हा ती पुर्ण रात्र जागून काढायची. कधी आपल्यालाही म्हणायची की थोडं याला बघता का मला खुप झोप येतेय. आपण लगेच ऑफिसमधून खुप थकून आल्याचा बहाणा करून झोपून जायचो. मुलाच्या आजारपणात तर ती तो बरा होत नाही तोवर कासाविस रहायची. आपण फक्त दवाखान्यात नेण्याचा सोपस्कार पार पाडायचो. आपणही आजारी पडलो तरी दिवसरात्र आपल्या अवतीभवती रहाते. काळजीने कधी डोकं चेपून देते तर कधी ताप वाढला तर डोक्यावर पट्या ठेवत बसते. पण मागच्या महिन्यात तिने दाढ दुखत आहे डाॅक्टरकडे चला बोलली तर आपण काय एवढ्यासाठी मला त्रास देते असं किती सहजपणे बोलून मित्राच्याकडे निघून गेलो. ती दाढ काढून आली तेव्हा खुप दुखत नाही ना असे बोललो तर तीने डोळ्यातले पाणी लपवत नाही म्हटले. आपण बघूनही न बघितल्यासारखं केलं.मु लगा जेव्हा आठ वर्षाचा झाला तेव्हा तीने नोकरी करायची ठरवली. आपण तिला लगेच बोललो तु नोकरी केलीच पाहिजे अशी काही आपल्याकडे परिस्थिती नाही पण तुला जर करायचीच असेल तर तु कर. गेल्या दोन वर्षांपासून ती नोकरी करते आहे. सकाळी पाचला उठून रात्रीच्या दहा अकरा पर्यंत कामच करत असते त्यानंतरही आपल्या मागणीला विरोध करत नाही. मंदारच्या डोळ्यासमोरून एक एक घटना क्रम येत गेला..
आपण स्नेहाला किती गृहीत धरतो याचा विचार करूनच त्याला गुदमरायला झाले. पुर्वीची बोलकार स्नेहा आपल्यामुळेच अबोल झाली. नेहमी फुलांप्रमाणे टवटवीत राहणारी आज पार कोमेजून गेली. सकाळची तीची ती नजर त्याच्या काळजाला चिरायला लागली. आपण तिला कळत नकळत किती दुखावले याचा विचार करून त्याचं मन पश्चात्ताप करू लागले. आपण ज्या चुका केल्या त्याचं परिमार्जनही आपणच करायला हवं. त्याने स्नेहाला फोन लावला
हॅलो, काय झालं तीने काळजीच्या सुरात विचारले.
सुटी घेतेस का?
काय झालं?
सांगतो. मी अर्ध्या तासात पोहोचतो तुझ्याकडे.
पण.... झालं ...
Wait... म्हणत त्याने फोन ठेवला आणि ऑफिसमधून बाहेर पडला आपल्या स्नेहाला परत तशीच बोलकार आणि हसरी करण्याचे मनाशी ठरवून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा