खूप दिवस झाले दीपिका खूप स्ट्रेस मध्ये होती. त्याच टेन्शनमुळे तिला रात्री ना धड झोप लागत होती ना धड जेवण जात होतं. एकाच ठिकाणी शून्यात नजर लावून बसायची.अचानक मोबाईल वाजला की खूप अपेक्षितपणे मोबाईल बघायची पण पुन्हा तोच हिरमोड आणि पुन्हा तेच रडणं आणि परत शून्यात नजर लावून बसणं. आई नव्हती तिला,पण वडिलांचा फोन आला की कामात आहे असं सांगून तुटक बोलायची आणि पुन्हा फोन ठेवून द्यायची. हेच तिचं पंधरा दिवसापासून सुरू होतं. वडिलांचा,आईचा फोटो बघून खूप खूप रडायची आणि सलील चा फोटो बघून पुन्हा सुन्न होऊन जायची.
हो सलीलच,दीपिकाचा बॉयफ्रेंड ज्याच्याबद्दल तिच्या घरच्यांना तिने अजिबात काही सांगितलं नव्हतं.कारण तिला तसं सांगायची गरजच वाटली नव्हती. गरज नाही म्हणण्यापेक्षा तिने घरच्यांना गृहीतच धरलं होतं,कारण आई गेल्यानंतर वडिलांनी तिला खूप लाडात वाढवलं,कशाचीच कमी पडू दिली नाही. गावात फारशी शिक्षणाची सोय नसल्यामुळे,त्यांनी तिला शहरात चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिली. त्यांच्या घरी छोटसं दुकान होतं आणि त्यात तिच्या लहान भावाचं पण शिक्षण सुरू होतं,म्हणून पोटाला चिमटा काढून वडील दीपिकाला पैसे पाठवत होते. दीपिका पण या सगळ्यांची जाण असल्यामुळे कॉलेजमध्ये अभ्यासात टॉपर होती. आणि म्हणूनच कॉलेजच्या शेवटच्या वर्षालाच तिला एका नामांकित कंपनीमधून जॉब ची ऑफर आली.दीपिका खूप खुश झाली.वडिलांना तर त्यांच्या लाडक्या दिपूला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. नोकरीमध्ये पण दीपिका मन लावून काम करत होती. पण म्हणतात ना "नियतीने पुढे आपल्यासमोर कोणता खेळ मांडला आहे हे कोणी सांगू शकत नाही". अशातच दीपिकाच्या आयुष्यात सलील आला. तो तिच्याच कंपनीमध्ये कंपनीच्या गाडीवर ड्रायव्हर होता. एकदा दोनदा रात्री काम करता करता उशीर झाल्यामुळे त्याने दीपिकाला कंपनीच्या गाडीतून तिच्या रूमवर सोडलं होतं. त्यामुळे दीपिकाची आणि त्याची चांगली ओळख झाली होती. ओघाओघाने बाहेर फिरणे, एकमेकांच्या घरी जाणे सुरू झाले. दीपिकाला पण त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली होती. कारण तो पण तिच्याप्रमाणे सामान्य कुटुंबातला होता. आईची आणि बहिणीच्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे तो कंपनीमध्ये पडेल ते काम करीत असे.त्यामुळे त्याला तेवढेच चार पैसे जास्त मिळत, दीपिकाच्या मनात त्याचा हाच स्वभाव घर करून गेला. आणि ती त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले हळूहळू ते दिवस-रात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.आणि एक दिवस अचानक दीपिका ऑफिसमध्ये एकटी बसलेली असताना, सलीलने बरोब्बर डाव साधला. तो त्याच्या मित्राला घेऊन आला आणि म्हणाला,"दिपू हा माझा मित्र हा एका मोठ्या कंपनीत एजंट म्हणून काम करतो. याच्या कंपनीत पैसे गुंतवले तर आपले पैसे एका वर्षात दुप्पट होतात.मी सुद्धा मागच्याच वर्षी गुंतवले आणि बघ यावर्षी ते पैसे मिळाले पण. आणि म्हणून तर मी माझ्या आईचे ऑपरेशन करू शकलो".असे बोलून त्यांनी मित्राकडे हळूच बघितले आणि डोळ्यांनी इशारा केला. मित्र पण लगेच त्याला साथ देत तिला स्कीम समजावून सांगू लागला.अर्धा तास तो स्कीम सांगत होता आणि सलील ही स्किम घेणं कसं फायद्याचा आहे हे तिला पटवून देत होता आणि फायनली दीपिका ने स्कीम मध्ये सेविंग मधले सगळे पैसे गुंतवले. आणि पैसे डबल होणाच्या आनंदातच ती घरी आली. तिने त्यातील वडिलांना काही सांगितले नाही,कारण तिला माहिती होते वडील विरोधच करणार, यामुळे पैसे मिळाल्यावरच ती त्यांना ही आनंदाची बातमी सांगणार होती.
आज घरी आल्यावर तिला जरा शरीर जड वाटत होतं,आणि जरा चक्कर पण येत होती.पण ऑफिसमध्ये वर्क लोड जास्त असल्याने होत असेल असा तिचा समज झाला,आणि पुढच्या कामाला ती लागली.पण तिला नंतर त्रास जरा जास्तच झाला आणि सोबत उलट्या पण होऊ लागल्या.म्हणून ती डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांचे बोलणे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हो, पण तिचा सलीलवर खूप विश्वास होता.सलील तिला कधीही अशा परिस्थितीत एकट टाकून जाणार नाही असा तिला ठाम विश्वास होता.तशी मनातून ती खुश झाली होती कारण तिला तिच्या सलील सोबत बांधून ठेवणारा एक जीव तिच्या पोटात होता. त्यामुळे तिने घरी येऊन लगेच सलीलला फोन लावला. कारण ती आज त्याला लग्नाबद्दल विचारणार होती. याशिवाय तिच्या काही पर्याय नव्हता. पण सलील चा फोन चार वेळा लावून सुद्धा स्विच ऑफ येत होता. आता ती खूप घाबरली कारण पैसे आणि शील या दोन्ही गोष्टी ती गमावून बसली होती.पंधरा दिवस तिने घरातच स्वतःला कोंडून घेतलं.जॉब वरून तर तिने केव्हाच सुट्टी घेतली होती.गेले पंधरा दिवस फक्त शून्यात नजर लावून बसायची आणि खूप खूप रडायची.
पण आज तिने मनाशी एक निर्धार केला आणि एक ओढणी घेतली ती पंख्याला बांधली. ओढणी बांधताना हजारो विचार तिच्या मनात येत होते. पण तिच्याकडे त्या विचारांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता,किंबहुना तिच्याकडे पर्यायच नव्हता कारण ती वडिलांना तोंड सुद्धा दाखवू शकत नव्हती. आज जे घडलं ते वडिलांना जर कळलं तर वडील काय करतील,गावात लोक काय म्हणतील,नातेवाईक वडिलांना किती दोष देतील, या सगळ्या विचारांनी ती पूर्ण खचून गेली होती. आणि म्हणूनच तिने पंख्याला ओढणी बांधली आणि स्टूलवर चढणार तेवढ्यात, डोअर बेल वाजली घाबरून ती खाली उतरली आणि की होल मधून पाहिलं,तर एक डिलिव्हरी बॉय तिला दिसला. आता जर दार उघडलं नाही तर तो पुन्हा जोरा जोरात दार वाजवेल आणि सगळे शेजारचे गोळा होतील. म्हणून तिने लगेच दार उघडलं. दीपिकानेच मागे ऑर्डर केलेलं कसलं तरी एक पार्सल तो घेऊन आला होता. त्याच्या हातून पार्सल घेताना त्याच्या टी-शर्ट वर असलेल्या नेम प्लेट वरच नाव वाचलं, " विश्वास "
आणि पुन्हा तिचे डोळे पाणवले.
विश्वास तसा खूप स्मार्ट होता. तिच्या डोळ्यातलं पाणी लगेच त्यांनी ओळखलं आणि मग घरात कानोसा घेण्याच्या उद्देशाने त्यांनी थोडी नजर फिरवली. तर अचानक खिडकीतून त्याला बेडरूम मध्ये बांधलेला ओढणीचा फास दिसला. तो खूप घाबरला पण आता घाबरून चालणार नव्हते त्याला विचार करायला थोडा वेळ हवा होता आणि म्हणूनच त्याने दीपिकाला पिण्यासाठी थोडे पाणी मागितले. कारण त्याला माहिती होतं जर आज ही बोलली तर आणि तरच तिचा जीव वाचेल,त्यामुळे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं आणि एकदम विषयालाच हात घातला, " मॅडम एवढ्या टोकाचा पाऊल का उचलत आहात "?अचानक आलेल्या या प्रश्नाने दीपिका घाबरली पण, तुला काय करायचंय? तू तुझा बघ?अशी उडवा उडवी ची उत्तर ती देऊ लागली,पण विश्वास नावाप्रमाणेच विश्वास होता तो तिला म्हणाला," एवढ टोकाचं पाऊल उचलताना स्वतःच्या आई-वडिलांना आठवा मॅडम" त्यावर ती कणखरपणे म्हणाली, " आई तर बिचारी केव्हाच सुटली. तिला माझं असं वागणं सहन झालं नसतं म्हणून देवानेच तिला नेलं माझ्यापासून दूर. आणि आता फक्त वडील आहेत पण त्यांना त्रास नको म्हणूनच तर हे पाऊल उचलते आहे". आता ती बोलायला लागल्यामुळे विश्वासला थोडा धीर आला. तो थोडा पुढे येऊन तिला म्हणाला, "मॅडम मी तुम्हाला ओळखत नाही पण ज्या अर्थी वडिलांना त्रास नको म्हणून तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलत आहात,याचा अर्थ तुमच तुमच्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि साहजिकच त्यांचं पण तुमच्यावर आहे. पण खरं सांगू का मॅडम,"हा जो बाप नावाचा माणूस असतो ना त्याला देवाने काही वेगळच बनवलेलं असतं,म्हणजे दिसताना तो खूप कठोर दिसतो पण त्याचं मन मात्र लेकरांसाठी लोण्याहून मऊ असतं. मी तुम्हाला आग्रह करणार नाही की तुम्ही हे पाऊल का उचलत आहात हे मला सांगा. पण एवढं मात्र नक्की सांगेन की तुमचा प्रॉब्लेम तुमच्या वडिलांपेक्षा आणि तुमच्या आयुष्यापेक्षा मोठा नाही. त्याचं बोलणं ऐकून दीपिकाला आपण काहीतरी चुकीचं करतो आहे हे मनात कुठेतरी वाटून गेलं.तिचे चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले आणि ती वडिलांचा फोटो घेऊन रडायला लागली आणि म्हणाली," आयुष्यभर हा माणूस मानाने जगला,पण आज माझ्यामुळे पैशाने आणि इज्जतीने दोन्ही गोष्टींनी हरला,मी त्याची खूप मोठी गुन्हेगार आहे. त्यामुळे मलाही शिक्षा व्हायलाच पाहिजे ".आणि परत एकदा तिचा चेहरा कठोर झाला.आता विश्वास ला भीती वाटू लागली. तो म्हणाला," हे बघा मॅडम आज मी पण एक सात वर्षाच्या मुलीचा बाप आहे.त्यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो कि तुमचा प्रॉब्लेम किती मोठा असो,जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असला तरीही त्याचे सोल्युशन तुम्हाला वडिलांच्या शब्दात आणि त्यांच्या प्रेमात मिळेल. त्यामुळे फक्त एकदा मी ही विनंती करतो तुम्ही तुमच्या वडिलांना एक फोन लावा आणि बघा तुमचा बाप कसा तुमच्या पाठीशी उभा राहतो ते " असं म्हणून तो तिचा फोन तिला आणून देतो. ती पण निर्विकार पणे बाबांना फोन लावते. दोन रिंग होताच पलीकडून आवाज येतो, " बोल दिपू बाळा कशी आहेस?काय म्हणते? बाबांचा आवाज ऐकून एवढ्याच शब्दांनी दीपिकाला रडायला येत तेवढ्यात तिचे बाबा म्हणतात, "दिपू काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं तू का रडतेस? तुला काही टेन्शन आहे का? मी असताना तू कशाचही टेन्शन घेऊ नको." हे आश्वस्थ करणारे शब्द ऐकून दीपिका धाय मोकलून त्यांच्या कुशीत शिरल्यासारखी रडायला लागते. आणि त्यांना पहिल्या दिवसापासून आजपर्यंत घडलेलं सगळं सांगते.तितक्यात बाबांचा आवाज परत येतो, " तू काही टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी दुपारीच निघतो आणि येतो तुझ्याजवळ मी बघून घेईन सगळं. बाळा मला फक्त तू हवी आहेस. त्यामुळे तू निश्चिंत रहा आणि हो दिपू बाळा माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेव, " जगात कुठलाही प्रॉब्लेम असू दे मग तो छोटा असो किंवा मोठा असो हे असं टोकाचे पाऊल उचलण्याआधी, दिपू बाळा तू फक्त मला एक फोन कर". आणि वडील सुद्धा रडायला लागतात. बाबांच्या या शब्दांनी दीपिका स्वतः चा निर्णय बदलते.ती मनात विचार करते,आज आपण हे काय करायला जात होतो हा विश्वास देवासारखा आला नसता तर... या विचारानेच तिला घाबरायला होतं.
तेवढ्यात विश्वास धावत बेडरूम मध्ये जातो, लगेच ओढणीचा बांधलेला फास सोडतो आणि तिच्या जवळ येतो.तिच्या डोक्यावर हात ठेवतो, आणि म्हणतो, " मॅडम जगावर नाही तर तुमच्या वडिलांवर विश्वास ठेवा.काही मदत लागली तर नक्की या भावाला हाक मारा." एवढे बोलून तो निघून जातो.दीपिका विश्वास च्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनोमन विश्वास चे आणि देवाचे आभार मानते.
" मैत्रिणींनो प्रत्येकीला वाचवायला हा असा विश्वास प्रत्येक वेळी धावून येईलच असे नाही, पण तुमच्या मनातील, तुमच्या आई-वडिलांवर असलेला विश्वास कधीही ढळू देऊ नका. आयुष्यात कितीही वादळं आली तरी,आई-वडील हे असे एक रसायन आहे ना, की ज्याच्या पुढे प्रत्येक वादळाला शांत व्हावंच लागतं,त्यांच्यामध्ये त्या वादळाला शांत करण्याची शक्ती असते. त्यामुळे आयुष्यात कोणताही निर्णय घेताना फक्त एकदा आई-वडिलांशी बोला. त्यांना डोळ्यासमोर आणा. तुम्ही चुकला असाल तर ते तुमच्याशी सुरवातीला कठोर वागतीलही, पण शेवटी तेच खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील ,पण खरं सांगू त्यांच्या एवढं प्रेम तुमच्यावर कोणीही करू शकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा