त्या दिवशी राधा सैरभैर झाली होती. ‘कुठं भटकतोय कोणास ठाऊक? असाच भटकत असतो डोंगरदऱ्यात! काय तर म्हणे ट्रेकिंग ! पण इतके दिवस नाही रहात माझ्या पासून दूर ! आता आला, की त्याला कधीच सोडणार नाही ! नो रानटीपणा ! नो डोंगरदऱ्या, तो भिरभिरता वारा आणि संध्याकाळच भटकणं !’
विचारात तिला समोरची गाडी दिसलीच नाही... गाडी तिला उडवून निघून गेली.
तरुण लेकीचे हाल बापाला पहावले नाहीत. हसती खेळती अल्हड राधा अंथरुणाला खिळली होती. आईच्या माघारी बापानं तळहाताच्या फोडाप्रमाणं तिला जपली होती. बापानं हाय खाल्ली. तो ‘तळहाताचा फोड’ माझ्या हाती देऊन त्यांनी डोळे मिटले. तेव्हापासून राधा माझ्या सोबतच आहे.
मी राधेला खूप लहानपणापासून ओळखतो. अगदी ती पाचवीत असल्या पासून. तेव्हा मी तिसरीत होतो.
“सुरश्या, तुला तो ‘शिक्या’ आठवतो का रे?” अचानक तिनं विचारलं
“कोण श्रीकांत का? हो...न आठवायला काय झालं? माझ्याच तर वर्गात होता ! पण आज इतक्या वर्षांनी अचानक त्याची आठवण तुला का झाली?”
“तुला न त्याची एक गम्मत सांगायची राहून गेलीये !”
आता आमच्या ‘सहजीवना’ला आठ-नऊ वर्षा होऊन गेलीत. मी अडतीसच्या आत बाहेर अन् ती चाळीशीच्या जवळपास आहे. अन् हिला शाळा-कॉलेजच्या ‘गमती’ आठवत्यात ! हिला कधी काय आठवेल, सांगता येत नाही.
“काय ‘गम्मत’ आहे?”
“तो तुला न ‘वेडा पीर’ म्हणायचा ! तुझं ट्रेकिंगच वेड… दुसरं काय? ! तू म्हणे उंच डोंगर माथ्यावर जाऊन ‘राधेऽऽऽ… राधेऽऽऽ…’ म्हणून, त्या सिनेमातल्या टारझनसारखा ओरडतोस आणि… आणि प्रतिध्वनीची वाट पहातोस ! असं तो सांगायचा. अन् तू न असे पक्षाच्या पंखासारखे लांब हात करून, डोंगर उतारावरून धावत खाली येतोस म्हणे ! खरं का रे?”
“तो ‘शिक्या’ नं… तो बावळटच होता !” माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
“हो, हो… तीच तर ‘गम्मत’ सांगायचीये तुला ! तुम्ही दोघं ना बारावीचा शेवटचा पेपर देऊन घरी परतत होतात. मला पाहून तो मागंच थांबला होता !”
“असेल थांबला…! मला नाही आता आठवत इतके मायनर डीटेल्स. बरं मग?”
“तेव्हा नं त्यानं मला ‘प्रपोज’ केलं होतं !”
“काय म्हणतेस? अन् हे तू मला इतक्या दिवसांनी सांगतेस?” निखळ गाढवपणा होता तो. मला ठाऊक होतं ! तरी मी चेहऱ्यावर आश्चर्य दाखवत विचारलं.
“तस नाही रे... पण तोही माझ्यावर प्रेम करायचा ना ! पण आता जाऊ दे ना ! मी तुझ्या-माझ्यासाठी कॉफी करते.”
माझ्या होकारा-नकाराची वाट न पहाता ती किचनमध्ये गेली. ती नं कधी कधी खूप पझेसिव्ह होते. अन् खरं सांगू… मला ते खूप आवडतं !
मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो. किती सुकलीय ! तिच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं आताशा थोडी हलकी झालीत. पण अजून आहेतच. खूप अशक्त होत चाललीयय ! तिचे घनदाट, निळसर झाक असलेले केस आता विरळ, निस्तेज आणि पांढरे पण होताहेत ! पण चालीतला डौल आणि शालीनता अजून तशीच टवटवीत आहे ! याच शालीन सौंदर्यावर मीच काय, अख्खं कॉलेज ‘फिदा’ होतं. पण आता... ती विरत चालल्यासारखी झालीये !
“हं, घे…!” आम्ही कॉफीचे मग घेऊन फ्रेंच विंडोत बसलो. तिला असं खिडकीत बसून, बाहेर पहात चहा/कॉफी प्यायला आवडतं, म्हणून मी खिडक्यांच्या मागं घराच्या आतून बसण्यासाठी ओटे करून घेतलेत. खिडकीबाहेर तुरळक पावसाचे थेंब तुटत होते. पाऊस, तो धुंद करणारा मातीचा सुगंध... अन् ते धसमुसळन वारं ! हे सगळं म्हणजे राधेचा जीव कि प्राण !
“सुरश्या, चल उठ ! गच्चीत जाऊ या ! पाऊस पडायला आलाय !”
“राधे... अगं, हे काय तुझ वय आहे का पावसात भिजायचं? पुढल्या वर्षी चाळीशीची होशील!”
“चल हट्! तू ये माझ्या मागून! मी जाते पुढं!” ती गेली सुद्धा जिन्याकडे… मी तिच्या मागं पळालो. म्हणजे, तसा प्रयत्न केला! कॉलेजात रनर होतो, हल्ली जरा जडावलोय!
गच्चीवर जाऊन पाहतोय तर……
दोन्ही हात पसरून राधा पावसात हळुवारपणे गिरक्या घेत होती! किती आनंदात होती! वय विसरून लहान मुलासारखं बागडत होती! पावसाचे थेंब वरच्यावर तोंडात झेलण्याचा प्रयत्न करत होती! वेडी कुठली! हिची अशी अनंत रूप मला डोळ्यात साठवून ठेवायची आहेत!
जुनी गोष्ट आहे… ती आठवी-नववीत असावी. असाच अचानक पाऊस आला. चालू वर्ग सोडून ही वर्गाबाहेरच्या ग्राउंडवर आली होती. झग्याची टोकं दोन्ही हातात धरून गाऱ्या-गाऱ्या भिंगोऱ्या करून गोल गोल फिरत होती!
पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती… मी हळूच तिच्या जवळ गेलो. त्या चार गिरक्यांनी तिला थकवलं होतं! तिला आधार देत घरात आणलं. नाही म्हटलं तरी भिजलीच होती. डोकं कोरड्या टॉवेलनं पुसून कोरडे कपडे दिले. संध्याकाळी सपाटून ताप भरला.
'“सुरश्या, मला खूप थकल्यासारखं वाटतंय रे!”
“तू पावसात भिजलीस ना! मग थकवा, ताप येणारच! तू माझं ऐकत नाहीस, मग तुलाच त्रास होतो… अन् मला सुद्धा! पॅरासिटोमोल घे… बरं वाटेल!”
ती मलूल होऊन पांघरुणात गुरफटून बेडवर पडली होती.
“का रे… तुला आठवतो का ‘तो’ पाऊस?”
“कोणता ग?” मी तिचं डोकं चेपत विचारलं.
“आपण गणिताचा क्लास करून घरी येताना लागला होता… तो!”
“तो ना… आठवतोय की!”
“अशीच संध्याकाळच्या साडेसात-आठची वेळ होती. अचानक आभाळ भरून आलं होतं. आत्ता घरी पोहचू, म्हणून तू निघालास… तू निघालास म्हणून मी पण तुझ्या मागं निघाले! कसचं काय? रप रप पाऊस पडू लागला… दोघेही भिजलो होतो! त्यात स्ट्रीट लाईट बंद झाले! समोरचं दिसेना!”
“हो, हो… मला सगळं आठवतंय!” खरं तर मला यातलं काहीही आठवत नव्हतं… पण मी दिलं दडपून.
“मग आपण घरी कसे पोहोंचलो माहितीये?”
“कसे?”
“कसे…?”
“मला माहिती होतं, तुला अंधाराची खूप भीती वाटते! मी तुला गच्च डोळे मिटायला लावून, माझ्या खांद्यावर हात ठेवायला लावलं होतं! अन मी अंधुक प्रकाशात चालत होते. तू सारखा ‘घर आलं का…? घर आलं का…?’ विचारत होतास! तो लहान मुलांचा खेळ असतो ना, तसा! आता सांगते, तेव्हा मला खूप मस्त वाटत होतं! मी बरी झाले आणि पुन्हा पाऊस आला की आपण पुन्हा तो ‘घर आलं का?’ खेळ खेळायची माझी इच्छा आहे!”
“राधे… तू न दिवसेन् दिवस बालिश होत चाललीयेस!”
“असू देत! मला माहितीये, तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार! कारण……”
“कारण काय?”
“कारण… मी… मी… फार दिवसाची सोबती नाही ! मृत्यू माझ्या डोक्यात कॅन्सरच्या रुपात दडलाय!”
“स्टॉप इट! पुन्हा पुन्हा तेच तेच नको सांगूस ! मला ते सत्य असलं, तरी नाही ऐकवत ! आणि… आणि… मी तुला नाही जाऊ देणार!”
—🌼—
राधेच्या ‘त्या’ अपघातापासून तिची स्मरणशक्ती काही प्रमाणात हरवलीय. काही गोष्टी तिनं सत्य म्हणून स्विकारल्या आहेत, तर काही सत्य तिनं झिडकारली आहेत.
‘त्या’ अपघातानंतर तिला सावरायला खूप वेळ लागला होता. अजूनही ती त्यातून ‘पूर्ण’ बरी झालीय, असं म्हणता येत नाही. ती सावरतेय असं वाटत असतानाच ‘ब्रेन ट्यूमर’ डिटेक्ट झालाय!
माझ्या ‘तळहातावरचा फोड’ काही दिवसांचाच सोबती आहे, हे तिलाही आणि मलाही ठाऊक आहे. फक्त एकच गोष्ट तिला ठाऊक नाही… जी फक्त मलाच ठाऊक आहे!
ती माझी राधाच आहे, जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं आणि करतोय…! पण…पण… ती ज्या ‘सुरश्या’वर जीव ओवाळून टाकते, तो मी नाही! तिच्या स्मरणशक्तीनं इथंच दगा दिलाय…! असं आजारपण देवानं कुणालाच देऊ नये ज्यात रोग्यालाच आजार माहित नसावा!
त्या दिवशी सुरेश ट्रेकिंगहून परतलाच नाही… दोन दिवस वाट पाहून आम्ही तपास केला. त्याची बाईक एका कड्याच्या पायथ्याशी पार्क केली होती. वर कड्याच्या टोकाला बॅकसॅक पडली होती. चार दिवसांनी त्याचा मृत देह एका कपारीत सापडला!
पण… राधेचं मन हे स्वीकारायला तयार नाही! तेव्हापासून ती मलाच तिचा ‘सुरश्या’ समजतीय!
आता तिचे थोडेच दिवस राहिलेत… मी देवाच्या चरणी रोज हीच प्रार्थना करतोय की,
‘देवा, तिचा हा भ्रम असाच राहू दे! तिला शेवटपर्यंत तिच्या ‘सुरश्या’सोबत जगू दे… आणि मला माझ्या ‘राधे’सोबत!’
तुम्ही म्हणाल, मग ‘मी' कोण?
तर, मी…… ‘श्रीकांत!’
- सुरेश कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा