बुधवार, १६ जुलै, २०२५

2049. शिक्षा

      कुलकर्णी सर धीम्या चालीने आठवीच्या वर्गात आले. पांढरं शुभ्र धोतर, पांढरा अंगरखा व काळी टोपी घालणारे कुलकर्णी सर चित्रकला शिकवत असतं. साठे उद्योगपतींचा मुलगा अनिल साठे समोरच बसला होता. तो बाकावरील लाकडात कंपासमधील कर्कटक घुसवून काहीतरी लिहित होता हे बघून सर त्याच्याजवळ आले.
“साठे, स्वत:चं नाव कर्कटकाने बेंचवर लिहून काय मिळवलंस रे? शाळेच्या सामानाचं नुकसान झालं की नाही?”
पटावर पंचावन्न मुलं असलेल्या वर्गाकडे सर बघत होते..
“आणि काय रे, ‘राजेश खन्ना’ काय आणि ‘निशा आय लव यु” काय.. असलं लिहून शाळेचे बेंच खराब करू नका. त्यापेक्षा राजेश खन्नाची मेहनत शिका, निशाला समोर जाऊन सांगा की आय लव यु.. म्हणजे बसेल चप्पल..पण धारीष्ट्य दाखवा..बेंच खराब करून काय मिळतं रे तुम्हाला?”
मुलांचा उध्दार करून सर फळ्याकडे परतले..
“असं काही करा की आपलं नाव लोकांच्या मनात आपल्या कर्तृत्वानं कायमचं कोरलं जावं..सर पुटपुटत होते.
“ओ सर, असले छपन्न बाक आणून टाकीन इथं” वडिलांच्या श्रीमंतीने आलेला माज अनिलच्या तोंडून बाहेर पडला व सरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. त्यांनी अनिलच्या मानगुटीला धरून त्याला वर्गाच्या बाहेर काढले.
“रहा उभा बाहेर! मस्तीने बोलणं बंद झालं तरच आत घेईन.” सरांनी चित्रकला शिकवण्यास सुरुवात केली.
अनिल साठे बाहेर उभा राहिलेला मुख्याध्यापक लेले यांनी बघितला व त्यांनी वर्गाजवळ येऊन कुलकर्णी सरांना हाताच्या खुणेने वर्गाबाहेर बोलावले.
“सर, साठे साहेब बोर्ड ॲाफ ट्रस्टिज वर आहेत. देणग्या देतात शाळेला..तर आता झाली एवढी शिक्षा पुरे. आत घ्या त्याला” लेले हळूच कुजबुजले.. काही अंतरावर अनिल उभा होता त्याला साधारण काय चाललंय याची कल्पना आली.. तो आत जाऊ लागला..
“अनिल, मी तुला आत जा म्हटलेले नाही. एवढ्या मग्रूरीने बोलणाऱ्या मुलाला माझ्या वर्गात जागा नाही. लेले सर, माझा नाईलाज आहे.” कुलकर्णी सर आपल्या निर्णयावर ठाम होते.
लेले सर वैतागून परत गेले. दोन महिन्यांनी कुलकर्णी सरांना दुसरीकडे नोकरी मिळाल्याची बातमी आली व सगळी शाळा हळहळली.
“उत्तम चित्र कधी निर्माण होईल? ह्रुदयात ज्या भावभावना असतात त्या उदात्त असल्या तरच कुंचला कागदावर जे निर्माण करेल ते चित्र अप्रतिम असेल.. मी काय हो चार उभ्या अन चार आडव्या रेघा मारायला शिकवेन पण तुमच्या आतील सौंदर्य, कृतज्ञता व कल्पनेची भरारीच उत्तम चित्र निर्माण करेल..आयुष्याचं तत्वज्ञान शिकवणारे कुलकर्णी सर आता कुठल्यातरी शहरातील शाळेत गेले असं साऱ्यांच्या कानावर आले.
…अनिल पदवीधर झाला व साठे फॅब्रिक्स या घरच्या बिझनेस मधेच काम करू लागला व पुण्यातील त्यांच्या शाखेचे सर्व काम बघू लागला..परंतु बिझनेसला मंदी आली होती. काहीतरी नवीन करणं फार जरूरीचं होतं..नवं डिझाईन तो स्वत: बनवत होता पण त्याचा विशेष खप झाला नव्हता..
गेल्या काही दिवसात कामावर लागलेल्या एका युवकाने तयार केलेले एक सुंदर डिझाईन अनिलच्या डोळ्यात भरले होते. तलम फिक्या निळ्या फॅब्रिकच्या काठावर अनेक गोपी श्रीकृष्णाबरोबर नृत्य करत आहेत व प्रत्येक गोपीची लहान सुबक आकृती बुट्ट्यांसारखी फॅब्रिकच्या अंगावर नाजूकपणे चितारलेली बघून अनिल अवाक् झाला. तो फॅब्रिक हातात घेताच आज गोकुळात.. चे सूर मनात वाजू लागले होते..
त्या युवकाचे नाव अमर आहे हे समजताच अनिलने त्याला भेटायला बोलावले.
“अमर, सुरेख डिझाईन बनवलं आहेस! उत्कृष्ट!” अनिल कौतुकाने अमरकडे बघत होता..
अमरनं बनवलेल्या साऱ्याच डिझाईनना प्रचंड मागणी होती. या व्यवसायात प्रचंड स्पर्धा होती पण दोनच वर्षात साठे फॅब्रिक्सचं वेगळेपण लोकांना दिसू लागलं. अमरला प्रमोशन देण्यासाठी स्वत: साठेसाहेब आले होते..
अमर एका वयोवृध्द गृहस्थांना आधार देत साठे साहेबांना भेटायला आला आणि साठे साहेबांचा चेहरा गोरामोरा झाला..
“हे आमचे कुलकर्णी सर! यांनी माझ्यातील खोडकर मुलाला कलाकार बनवलं!” अमर ओळख करून देत होता.
एकदा सर वर्गात शिकवत होते. ते पाठमोरे चालत फळ्याकडे जात असताना मी त्यांच्या शर्टावर ब्रशने काही रंग उडवले..
सगळा वर्ग हसायला लागला.. त्यांना कसं कळलं माहित नाही.. त्यांनी मला वर्गाबाहेर काढलं.. मी माफी मागितली तेव्हा वर्गात घेतलं..व एकच वाक्य बोलले..
“रंगाची उधळण करायची तर अशी कर अमर, की साऱ्यांनी पहात रहावं.”
कुलकर्णी सर खूप वाकले होते.. त्यांनी साठ्यांकडे बघून हात जोडले. त्या डोळ्यातलं तेज कुठे कमी झालं नव्हतं.
“साठे साहेब, अनिल, वा वा! या निमित्ताने आपली भेट झाली हे बरं झालं.. अहो अमरमधे टॅलेंट भरलय.. मी फक्त त्याचा फोकस वाढवला! मी मुलांना शिक्षा करतो..केवळ त्यांना जागं करायला.. बाकी काही नाही.  मुलं असायचीच की हो खोडकर! पण मुलाला वेळेवर शिक्षा केल्याविना ते एक उत्तम व्यक्ती बनेल का?“
अनिल साठेनं वाकून सरांना नमस्कार केला..
“सर मी साठे फॅब्रिक्स चालवतो पण माझ्याकडे अमरची कला नाही..कदाचित तुमच्याकडे शिकून ती निर्माण झालीही असती.. पण..
“अरे अजून शिक! अजून कुठं उशीर झालाय? आता निदान कर्कटकानं बाकावर कोरत तरी बसणार नाहीस!”सर जोरात हसले. 
अनिलने सरांना आतल्या खोलीत नेलं.. तिथे अनिलने काढलेली अनेक डिझाईन्स होती.
“सर, ही डिझाईन्स बघा.. ठीक आहेत पण अमरच्या कामाची याला सर नाही..सर, मी आज शाळेतल्या प्रसंगाबद्दल माफी मागतोय..पंचवीस वर्ष उशीर झालाय माफी मागायला..
“अनिल, काहींना तासात आपली चूक कळते तर काहींना अनेक वर्षांनी..पण आपण चुकलो कळलं की त्याच क्षणी खरी प्रगती सुरू होते.. ही तुझी डिझाईनं सुरेख आहेत पण याचा आत्मा हरवला आहे..तो सापडला की तुझ्यासारखा कलाकार होणार नाही..आत्मा सापडण्यासाठी मात्र स्वत:च्या आत डोकावायला हवं.. ती राधा काढली आहेस ना ती एका बाजूनं राधा व एका बाजूनं श्रीकृष्ण दिसेल असं काही करता येईल का याचा विचार कर.. जेव्हा तुलाच तुझ्या कलाकृतीचं तुलाच आश्चर्य वाटेल तेव्हा ती पुर्णत्वाला गेलेली असेल..
सरांनी चष्मा लावला व परत एकदा अनिल साठेतल्या खऱ्या खुऱ्या विद्यार्थ्याला शिकवायला सुरवात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...