गुरुवार, २४ जुलै, २०२५

2098. या चहा घ्यायला

     सिग्नल लागला आणि कचाकच ब्रेक लागले. सगळ्या गाड्या थांबल्या. ट्रॅफिक हवालदाराने हातवारे करून उजव्या बाजूच्या ट्राफिकला पुढे जाण्याचा इशारा दिला तसा हॉर्न वाजवून गाड्या हरखून पळायला लागल्या. फुटपाथवरून चालणाऱ्या लोकांची धावपळ वाढली.आणि रंगरावचा चहा उकळला. जसा चहा उकळला तसं रंगराव एका चमच्याने चहा खालीवर करू लागला. याच चौकात एका कोपऱ्यात रंगरावची चहाची टपरी आहे. खूप जुनी. जवळपास ऐंशी वर्षाची परंपरा असणारी ही चहाची टपरी. जशी सुरवात झाली त्यावेळी जशी होती तशीच आजही आहे. रंगरावच्या वडिलांनी सुरू केलेली. त्याचे वडील आता नाहीत पण रंगरावने त्यांच्या नंतर हा व्यवसाय प्रेमाने सांभाळलाच हा तयार झाला. कॉलेजची चार पाच पोरं सिगरेट फुंकत चहाला उभी राहिली आणि तेवढ्यात माधवराव नेहमीप्रमाणे वेळेत चहा प्यायला हजर झाले.
       माधवराव जाधव. एक रिटायर पोस्टमास्टर. मुलगा अमेरिकेच्या एका बँकेत मोठ्या पदावर. त्याचं कुटुंब घेऊन तो तिकडेच स्थायिक. इकडे माधवराव एकटेच असतात. माधवरावांनी आपली नेहमीची खुर्ची जवळ ओढून घेतली आणि त्यावर बसले. डोळ्याचा चष्मा काढून हाताने पुसत त्यांनी रंगरावला विचारलं “राऊत साहेब आले नाहीत का अजून?”  रंगराव हसत म्हणाला “नेहमीप्रमाणे उशिरा येतील.” आणि नेहमीप्रमाणे ते आल्यावरच दोघांना चहा देईन. माधवराव मंद हसले आणि बाजूला असणाऱ्या मोकळ्या खुर्चीवर हात फिरवायला लागले. पंधरा वीस मिनिटं झाली. त्यांचा तो मायेचा आणि जिव्हाळ्याचा हात मात्र त्या खुर्चीवर फिरतच होता आणि तेवढ्यात त्यांच्या हातावर त्याच प्रेमाची ऊब असणारा स्पर्श जाणवला. राऊत साहेबांनी त्यांच्या हातावर हात ठेवला होता. नेहमीप्रमाणे उशीर झाल्यामुळे नेहमीसारखा अपराधी चेहरा करून राऊत खुर्चीवर बसले आणि माधवरावांनी त्यांच्या पाटीवर एक हलकी बुक्की मारली आणि आवाज वाढवून बोलले.”रंगराव घ्या आता दोन कप.” आणि दोघांनी चहा घ्यायला सुरुवात केली.
     राऊत साहेबांचं गॅरेज होतं. पण आता त्यांनी ते दुसऱ्याला भाड्याने दिलेलं होतं. त्यांना मुलबाळ झालं नाही. वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांची पत्नी वारली. आता वीस वर्षापासून ते एकटेच राहतात. आणि गेल्या वीस वर्षापासून हे दोघेजण या टपरीवर दररोज संध्याकाळी पाच वाजता चहा प्यायला एकत्र येतात. तासभर गप्पा मारतात. मोकळे होतात आणि परत आपल्या पिंजऱ्यात जाऊन बसतात. होय पिंजऱ्यातच.कारण एकटेच आहेत दोघेजण. ही यांची मैत्री. अनेकदा वाद होतात. कधी गाणी होतात. तर कधी कधी जुन्या आठवणीची उजळणी होते. तर कधी कधी दोघेजण एकमेकांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडतात. चहाचा घोट निमित्त असतो. पण या दोघांना खरी तलफ ही एकमेकांची असते.
          आज रविवार होता. चौकात गर्दी कमी होती.रंगरावचा चहाही तयार होता.सव्वा पाच वाजत आले होते.अजून माधवराव पोहचले नव्हते.रंगराव सतत त्यांच्या नेहमीच्या येणाऱ्या रस्त्याकडे नजर वळवत होता आणि मधुनच रिकाम्या खुर्चीकडे पाहत होता. वीस मिनिट उशिराने राऊत साहेब आले. पण नेहमीप्राणे त्यांची खुर्ची कुरवाळत असणारा हात आज त्यांना दिसला नाही. गेल्या पंधरा वर्षात अगदी मैत्रीच्या पहिल्या दिवसापासून आजवर कधीही ही गोष्ट घडली नव्हती. का कुणास ठाऊक पण राऊतांचे डोळे भरून आले आणि माधवरावांच्या खुर्चीवर हात फिरवत त्यांनी रंगरावला विचारलं. “माधवराव अजून कसे आले नाहीत?” रंगरावने मान हलवत सांगितलं, ”मीच तुम्हाला विचारणार होतो. तुम्ही दोघांनी चहाची जागा बदलली की काय म्हणून?” राऊत साहेब झटकन तिथून निघाले आणि माधवरावांच्या ते जिथं राहत होते त्या सोसायटीच्या गेटवर पोहचले.
         गेटवर असणाऱ्या वॉचमनने सांगितलं. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखायला लागल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पीटल नेले आहे. हॉस्पिटलचा पत्ता राऊतानी एका कागदावर लिहून घेतला. ते पुन्हा चालत टपरीवर आले.येता येता त्यांनी दुकानातून दोन कप चहा बसेल एवढा स्टीलचा थर्मास विकत घेतला होता. राऊत साहेबांचे डोळे गच्च भरलेले होते. हुंदके देत देत त्यांनी रंगरावला सगळी माहिती दिली आणि दोन कप चहा थर्मास मध्ये भरून घेतला आणि माधवरावांच्या आवडीचा आणि नेहमीचा कप आणि स्वतःचा एक कप असे दोन कप घेऊन राऊत साहेब हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन उभे राहिले. रिक्षाला हात केला. रिक्षा थांबली. स्वतःला सांभाळत ते रिक्षामध्ये बसले आणि रिक्षा हॉस्पिटलकडे धावू लागली. या छोट्याशा प्रवासात राऊत साहेब गेल्या पंधरा वर्षाच्या या मैत्रीचा जगलेला एक एक क्षण आठवून आतल्या आत हुंदके देत होते. सतत डोळे पुसत होते आणि मनातून खूप घाबरले होते. ब्रेक लागला आणि रिक्षा थांबली. राऊत साहेब उतरले. रिक्षाचे भाडे देऊन धावतच हॉस्पिटल मध्ये घुसले.
     माधवरावांचे नाव विचारत ते तिसऱ्या माळ्यावर असणाऱ्या माधवरावांच्या रूम मध्ये आले. माधवराव शांत झोपले होते.सलाईन सुरू होती. दोन्ही हात छातीवर ठेवून एखाद्या लहान बाळाचा चेहरा असावा तसे ते शांत डोळे झाकून पडलेले होते. दोन्ही डोळ्यातून वाहून गेलेल्या पाण्याच्या खुणा अजूनही तशाच होत्या. मानेखालची भिजलेली उशी राऊतांना दिसली तसे राऊतही हुंदके देऊन आतल्या आत रडत बसले. माधवरावांच्या उशिजवळ हळूच जाऊन राऊत बसले आणि आपल्या मायेची आणि प्रेमाचा स्पर्श असणारा हात माधवरावांच्या हातावर ठेवला. जसा त्यांचा स्पर्ष माधवरावांना जाणवला तसे एका क्षणात माधवराव जागे झाले. पण डोळे उघडले नाहीत.बंद डोळ्यांनीच कातरलेल्या आवाजात ही हुंदका गिळत म्हणाले, “दोस्त आज जरा जास्तच वेळ केलात. एवढा उशीर करत जाऊ नका. किती वाट पाहिली.” राऊतांचा आत दाटलेला हुंदका आता मोकळा झाला आणि हुंदके देत त्यांनी माधवरावांच्या गालावर हलकासा पण हक्काचा एक बारीक चपटा मारला आणि म्हणाले, “ न सांगता पत्ता बदलला आज तुम्ही. नेहमीच्या पत्त्यावर पोहचला नाहीत. मग हा नवीन पत्ता शोधत आलो. उशीर होणारच ना.” पण,”चहा आणला आहे मी. नेहमीचा आहे. रंगरावचा.”
      चहा म्हणल्याबरोबर माधवरावांनी डोळे उघडले आणि राऊतांच मनगट घट्ट पकडलं. राऊतांनी त्यांना आधार देत उठवलं. माधवराव उठून बसले. राऊतांनी दोन कप चहा भरला. माधवरावांच्या बाजूला बसून एका खांद्यावर माधवरावांच डोकं टेकवलं. हातात सलाईनची सुई असल्यामुळे उजव्या हाताने कप धरता येत नव्हता. नकळतपणे डावा हात राऊतांच्या खांद्यावर विसावला होता. तो तिथून काढावासा वाटत नव्हता. कप कसा धरावा हा विचार मनात यायच्या आधीच राऊतानी दोन्ही हातात दोन कप घेऊन एक कप माधवरावांच्या ओठाला आणि दुसरा कप स्वतःच्या ओठाला लावला. दोघांच्या डोळ्यातून पाणी आज जरा जास्त गतीने वाहतं झालं. चार दिवस झाले मुलाने फोन उचलला नाही म्हणून माधवराव हुंदके देऊन सांगत होते आणि आपल्याला मुल झालं नाही बरं झालं की वाईट झालं हेच कळत नाही म्हणून राऊत रडत होते.
       गेल्या आठ दिवसापासून रोजचा चहा हा दवाखान्यातच होत होता. माधवराव खूप खालावले होते. एकदा दोनदा रंगराव येऊन भेटून गेला होता. या दोघांची दुनिया लहान होती. निष्पाप होती.
        माधवराव आज अंघोळ करून बसलेले होते. गेल्या आठ दिवसात एक मिनिटासुद्धा राऊतानी उशीर केला नव्हता. त्याप्रमाणे राऊत आज अगदी वेळेत चहा घेऊन हजर झाले होते. माधवराव राऊताना म्हणाले, “दोस्त, वेळ बहुतेक संपलेली आहे माझी. मुलगा उद्या येणार आहे असे कळले आहे.पुन्हा नेहमीच्या जागेवर येणे होईल याची खात्री नाही. माझं एक काम करा. तुम्ही मात्र आपल्या जागेवर रोज जात जा. माझी वाट पाहू नका. पण जवळ एक खुर्ची मोकळी ठेवत जा. एखादा वाट हरवलेला म्हातारा कधीतरी येईलच. त्याला बसायला जागा द्या तिथं.” माधवराव थांबले आणि ढसाढसा रडायला लागले. राऊतानी त्यांना गच्च मिठी मारली. तेव्हा माधवराव म्हणाले, “मुलगा मला अमेरिकेला घेऊन जाणार आहे. त्याला नाही म्हणू शकत नाही. मला माफ करा. “राऊतांच्या काळजात चर्र झालं. चहा उकळावा तसा काळीज ढवळून निघू लागलं आणि दोघांची मिठी गच्च झाली.
   आज माधवराव अमेरिकेत गेलेले असल्यामुळे राऊत आज एकटेच चहा पित बसले आहेत.दोस्ताने सांगितल्याप्रमाणे एक खुर्ची रिकामी आहे. राऊत शांत आहेत. एवढ्यात एक जवळपास पंचाहत्तर वय असलेला माणूस बाजूला येऊन उभा राहिला आणि एक कप चहा त्यानेही घेतला. चहा घेताना त्याचा बारीक धक्का राऊताना लागला.त्या धक्क्यामुळे राऊतांचा कप हलला आणि चहाचा एक घोट राऊतांच्या छातीवर सांडला. तो पुसायला तो माणूस वाकला आणि माफ करा हा माझ्याकडून चुकून धक्का लागला म्हणून राऊतांच्या छातीवरचा चहाचा डाग पुसू लागला. राऊताना तो स्पर्श ओळखीचा वाटला.प्रेमाचा वाटला.आपुलकीचा वाटला आणि राऊत एकदम एका क्षणात म्हणाले, “एकटेच राहता का.?” ती व्यक्ती एक क्षण स्तब्धच झाली. आश्चर्याने राऊतांकडे पाहायला लागली. त्या व्यक्तीने विचारलं..” तुम्हाला कसं माहित?” राऊत खळखळून हसले आणि कितीतरी दिवस रिकामी पडलेली खुर्ची त्यांनी पुढे केली आणि म्हणाले,
या बसा तुमचीच वाट पाहत होतो. किती दिवस झाले. त्या व्यक्तीला राऊतांच बोलणं कळलं नाही. आणि तो माणूस अलगदपणे त्या खुर्चीवर विसावला.
        माधवराव आज जगात नाहीत. पण तो चौक आहे. राऊत आज या जगात नाहीत. पण ते रस्ते आहेत. रंगराव या जगात नाही पण त्याची टपरी आहे. पण त्याच्या मुलाने आता ती सुशोभित हॉटेलमध्ये रुपांतरित केली आहे. रिकामी खुर्ची शिल्लक नाहीय आता. पण माणसं उभी आहेत. चहा आहे. सिग्नल आहे. शहर आहे. सगळं आहे.
       तेव्हा जे होतं त्यातलं मात्र काही शिल्लक आहे. काही बदलेलेलं आहे तर काही संपलेलं आहे. फक्त एकच गोष्ट तेव्हाही होती आजही आहे आणि उद्याही असणार आहे. ते म्हणजे एकटेपण आणि एकटेपणातला आठवणींचा चहा.
       असो या चहा घ्यायला.

लेखक नितीन चंदनशिवे
कवठे महांकाळ 
जिल्हा सांगली
7020909521

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...