तन्वीने आज तिचा खास आवडता मोरपीशी रंगाचा कुर्ता कपाटातून काढला. त्याखाली हिरवीकंच चुडिदार नी खांद्यावर त्याच रंगाची ओढणी. बर्याच महिन्यांनी बाहेरचा प्रकाश दिसत होता, तिच्या ह्या अत्यंत आवडत्या ड्रेसला. हो... गेल्या आठेक महिन्यांपासून कपाटाच्या एका कप्प्यात, खोल जाऊन कुठेतरी पडला होता हा. तेजस गेल्यापासूनच, आयुष्यातून रंगच ऊडाले होते जणू काही तन्वीच्या. चार - पाच फिकट, विटक्या रंगांच्या ड्रेसेसमध्येच गुंडाळून ठेवलं होतं तन्वीने स्वतःला. आणि आज ईतक्या महिन्यांनंतर पहिल्यांदाच, तन्वी ईतका रंगीत ड्रेस घालून बाहेर पडणार होती. केस मोकळे सोडून तन्वी न्याहाळत होती स्वतःलाच आरशात. "कोण म्हणेल की तू पन्नाशीला आलियेस?"... स्वतःलाच हा प्रश्न विचारत, छानशी हसलीही ती.
नाट्यगृह खच्चून भरलं होतं... मस्त वातावरण होतं चहुबाजूला. अत्तर, पर्फ्युम, मोगरा, चाफा ही समस्त सुवासीक मंडळी आपापल्या मालकाच्या, मालकिणीच्या अंगावरुन, केसांतून आपापल्या वकुबाबरहुकूम घमघमत होती. आत सोडल्या सोडल्या आपली जागा शोधून, त्यावर आपला झेंडा रोवत... विजयी मुद्रेने आजुबाजूची लगबग बघणं तन्वीला फार आवडे. तिसर्या घंटेनंतर तो मंद होत नाहिसा होणारा ऊजेड ऊपभोगायचा असतो पुरेपुर, हे तिचं तत्व तिने आजही पाळलं होतं. आतापावेतो अख्ख थिएटर भरलेलं, फक्त तिच्या बाजूची सीट सोडून. तिसरी घंटा झाली... भोवताली अंधाराचा पडदा पडता पडताच, समोरचा पडदा ऊघडू लागला. हे नेपथ्याचं पहिलं दर्शनही फार सुखावत असे तन्वीला. ती त्यात गुंततच होती की, कोणीतरी येऊन धप्पकन बसलं तिच्या बाजूला.
तन्वी एकदम बावचळलीच. त्या अजुनही डोळे न सरावलेल्या अंधारातही... शेजारी येऊन बसलेलं सामान किमान शंभर किलोंचं असावं, हे अचूक ओळखलं तिने. आल्या आल्या त्या बाजूच्याने, तिच्या ऊजव्या बाजूच्या हात टेकण्याच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं. त्याच्या देहाच्या एकंदर पसार्याचा अंदाज बांधत... मग तन्वीनेच आकुंचन पावत, आपला ऊजवा हात स्वतःच्या मांडीवर ठेवला. "स्त्रीदाक्षिण्य राहिलेलंच नाही आताशा"... असा बोजड विचारही मनातून डोकावून गेला होता तिच्या. एव्हाना रंगमंचावरुन येणार्या प्रकाशाने, प्रेक्षागृहातील अंधाराचा बर्यापैकी ताबा घेतलेला. आजुबाजूची लोकंच नाही, तर त्यांचे हसतांनाचे दातही आता स्पष्ट दिसू लागलेले. पण तरिही तन्वीचं आपल्या ऊजवीकडे बघण्याचं, मन काही होईना. त्याचा तो हसण्याचा गडगडाटी आवाज, मधे मधे रुमालातलं त्याचं ते जोराचं नाक शिंकरणं, अधुनमधून निदान शेजारच्या पाचेक जणांना ऐकू जातील, अशा ढेकरा देणं, आणि येऊन जागेवर टेकल्यापासुनचा तो येणारा घामाचा दर्प... एकंदरीतच तन्वीला कळून चुकलेलं की, प्रकरण सौजन्याच्या बाबतीत अगदीच हाताबाहेरचं होतं.
पहिला अंक संपला... तन्वीने अजुनही नेटाने ऊजवीकडे न बघण्याचा निश्चय पाळला होता. "हा आता बाहेर जाऊन किमान चार वडे ऊडवणार... म्हणजे आता ह्याच्या त्या बटाट्याच्या सारणाच्या, तिखट ढेकराही ऐकाव्या लागणार तर". तिच्या मनात हा विचार आला, नी मागोमाग हसूही फुटलं तिचंच तिला. तिला जाणवलं गेल्या आठ महिन्यांत ती, चांगलीच सहनशील झालीये. दुसरा अंक सुरु झाला... आणि तिला ऊगिचंच असं वाटलं की, शेजारचं ते गोदाम हसतांना तिच्याकडे बघतंय... तिचा रिस्पाॅन्स मागतंय. असते काहींना सवय... एकट्याने हसता येत नाही त्यांना. तन्वी मात्र तिचं अंग बर्यापैकी डावीकडे वळवून, तसं म्हंटलं तर तिरक्या डोळ्यांनीच नाटक बघत होती. "डावीकडे आज्जी आल्यायत हे नशिबच म्हणायचं"... हा विचारही चमकत, सुखावून गेला होता तिला तेवढ्यातल्या तेवढ्यात.
आणि तिला अचानकच जाणवली एक शांतता ऊजवीकडे. जाणवलं तिला गेल्या काही मिनिटांपासून... त्या बाजूने ऐकू न आलेलं ते भेसुर हसणं, घसा खाकरणं किंवा नाक शिंकरणं... अगदी काहिच नाही. तिच्या डोळ्यांच्या कोपर्यातून तो जागेवरच बसलेला होता, हे तिला नक्की दिसत होतं. तन्वी बेचैन झाली... अस्वस्थ झाली... कारण आतापर्यंत तिला, त्याच्या ईरिटेटींग असण्याचीही चांगलीच सवय झाली होती. नाटकाचा क्लायमॅक्स चालू होता... फार्स अगदी टिपेला पोहोचला होता. सबंध थिएटर वारेमाप हसत होतं... पण तो हसत नव्हता, आणि त्यामुळे ती ही. अचानक काहितरी ठरवून, तन्वी झप्पकन ऊजवीकडे वळली. हातातल्या मोबाईलचा प्रकाश तिने त्याच्यावर मारला... आणि चर्र झालं तिच्या छातीत. तो तिच्या विरुद्ध बाजूला मान करुन, निपचित पडला होता. तन्वीने क्षणभरच गांगरत... पण नंतर आत्मविश्वासाने त्याचा खांदा पकडत, गदागदा हलवलं त्याला... पण काहिच प्रतिसाद मिळाला नाही त्याच्याकडून. आता मात्र वेळ दवडून चालणारं नाही हे ओळखत, तन्वी जागेवरच ऊभी राहिली जोरात ओरडत... "कोणी डाॅक्टर आहे का ईथे?... ईमर्जन्सी आलीये... प्लिज समबडी हेल्प". तिचा आवाज वाढत जाऊन... एका पाॅईन्टला किंचाळू लागली ती, मदतीचा धावा करत.
आता मात्र आजुबाजूच्यांचं लक्ष गेलं... धावपळ झाली लोकांची तिथल्यातीथे. नाटक बंद करण्यात आलं... दिवे लावण्यात आले. प्रेक्षकांतून ऊपस्थित असलेले दोन - तिन डाॅक्टर्स धावले त्यांच्या सीट्सकडे. त्याला काळजीपुर्वक ऊचलत, एका सपाट पृष्ठावर निजवण्यात आलं... CPR देणं सुरु करण्यात आलं. तन्वी श्वास रोखून हे सगळं बघत होती... देवाच्या नामाचा जप करत होती. आणि दहा मिनिटांनी अखेरीस, डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं. त्याचा थांबलेला श्वास पुन्हा सुरु झाला होता. तन्वी तिच्या 'आ' वासलेल्या तोंडावर हात ठेऊन, मट्टकन खाली बसली एका खुर्चीत... ओक्साबोक्शी रडतच. बोलावण्यात आलेल्या अॅम्ब्युलन्सकडे त्याला काही लोक धरुन नेत असतांना, त्याने तन्वीकडे पाहिलं... आणि हात जोडले तिला. तन्वीचा ऊर आणिकच भरुन आला होता मग. बर्याचजणांनी तिच्याजवळ येत तिची पाठ थोपटली... काहिंनी व्यक्त होत तिचं कौतुक केलं... तर काहिंनी चक्क टाळ्याही वाजवल्या. दाटल्या गळ्याने नी वाहत्या डोळ्यांनी, तन्वी बघत होती सगळ्यांकडे... आणि अचानकच त्या गर्दीत, तिला तो दिसला.
हो... तन्वीला तेजस दिसला त्या गर्दीत... टाळ्या वाजवतांना तिच्यासाठी... तेजस... तिचा तेजस. जो आठ महिन्यांपुर्वी गेला होता अचानकच 'कार्डिअॅक अरेस्ट' ने... कुठलीही मदत वेळेवर न मिळाल्याने... कोणीही तन्वी तेव्हा त्याच्याजवळ नसल्याने... भर गर्दीतही अगदी एकटा पडून. चेहरा अभिमानाने फुलला होता त्याचा, जणू सांगत तिला की... "माझा त्यावेळी कोंडलेला 'श्वास', तू आत्ता मोकळा केलायस". तन्वीने तेजसकडे बघत हात जोडले, ते तिच्या रडणार्या ओठांवर टेकवतच. अन् धुसर होत गेला तेजस... तन्वीच्या वाहणार्या डोळ्यांतून, हसणार्या जिवणीने.
---सचिन देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा