नमस्कार...
असे म्हणतात की आपल्याकडे दुसऱ्यांच्या समस्यांना नेहमीच उत्तर असते, त्यामुळे सल्ले देणं सोपे असते पण स्वतःच्या समस्यांना लवकर उत्तर मिळत नाही. मग आपल्याच समस्या, प्रश्न इतरांच्या नजरेतून पाहिले तर सुटतील का असा विचार मनात आला. आणि त्याच विचारातून ही कथा तयार झाली. ही कथा जनस्वास्थ्य दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
घरातलं आवरून रागिणी ऑफिसला वेळेवर बाहेर पडली खरी पण लोकल पकडण्याची धडपड कुठेच नव्हती. स्टेशनवर पोचल्यावर पळत पळत लोकल पकडणारी रागिणी आज फलाट वरच्या बाकावर स्वतःत हरवून विचार करत होती. पती राघव बरोबर हल्ली सारखी होणारी वादावादी तिला कशातच लक्ष लागून देत नव्हती. क्षुल्लक कारणावरून होणारी भांडणं रोजची सवय झालेली. ऑफिसमध्ये ही चुका वाढत चालल्या होत्या. कदाचित सहकाऱ्यांच्याही लक्षात आलं होतं म्हणून हिला काही दिवस सुट्टी घेऊन आराम करायची ही सूचना आलेली. आजही सकाळी वाद झाला म्हणून मूड नसताना ऑफिस मध्ये जाऊन काही चुक व्हायला नको म्हणून रेल्वे फलाटवर प्रवासी बघत बसुन राहिली. मध्येच तिला रेल्वेखाली उडी घेऊन सगळं संपवावं असं वाटल्याचं जाणवताच ती भानावर आली. तिनं आजूबाजूला पाहिलं.
पर्स मधून मोबाईल काढून ऑफिसला फोन केला. मला हाफ डे लंच पर्यंत सुट्टी हवी म्हणून सांगितलं. आणि फोन पर्स मध्ये ठेऊन दिला.
राघव आणि रागिणी ची ओळख अशीच लोकल मध्ये झालेली. मग याच फलाटावर त्याच्याशी ऑफिस सुटल्यावर घरी जाण्याआधी भेटण्याची सवय. मग न संपणारी आणि संपू नये वाटणारी बकबक. दोघांना एकमेकांची सवय होत आहे हे दोघांनीही ओळखलं. मग अशीच एक वेळ साधून राघवनं विचारणा केली आणि रागिणीही हो म्हणून मोकळी झाली.
हे आठवून तिला त्रास व्हायला लागला तसा तिने मोबाईल परत काढून मेसेजेस बघायला चालू केलं. राघवचा एकही मेसेज नाही हे पाहून तिला वाईट वाटलं. हल्ली मेसेजेस पण कमी होत आहेत. ज्या दिवशी भांडण होईल त्यादिवशी तर शून्य मेसेज. Hi पण नाही. सॉरी तर खूप लांबच.
राघवचा आधीचा जॉब गेल्यानंतर 5-6 महिने घरीच होता तो. त्यावेळी किती नेटानं घर चालवलं. त्याच्या जॉब साठी पण प्रयत्न केले. किंवा त्याला स्वतःचं काही करायचं असेल तरीही त्याला साथ दिली असती. पण नंतर जॉब म्हणून नक्की काय करतो अजून कळलं नाही. सांगतही नाही. घरखर्च रागिणी कडे. राघव महिन्याला घरभाडे, आणि इतर खर्च करतो म्हणून ठीक. पण सगळं लपवून ठेवतो म्हणून आणखी त्रास होतोय. शिवाय हल्ली तो सरळ ऐकूनही घेत नाही. काही बोलूही देत नाही. आपल्याला त्याची काळजी वाटते हे त्याच्या मनातही का येत नाही?
विचार करून त्रास व्हायला लागला म्हणून तिनं व्हाट्सअप्प बंद केलं आणि नेट सर्फिंग, मेल चेक करू लागली. स्पॅमबॉक्स भरून गेलेला. एकेक मेल डिलीट करू लागली. त्यात एका मेलचं टायटल वाचून तिला आश्चर्य वाटलं. लोन, क्रेडिट कार्डच्या ऑफर भरपूर असायच्या. त्यात ही असली ऑफर. ? तिनं मेल ओपन केला.
" बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल".
मेल पाहून तिला हसू आलं. मोबाईल बंद केला पण उत्सुकता वाढलेली. असा एखादा जॉब असेल अशी कल्पनाही नव्हती तिची. त्या उत्सुकतेपोटी तिने परत मेल पाहिला. खाली संपर्क नंबर होता. ऑफिस पत्ता तर जवळच आहे असे वाटत होतं. तिची पाऊलं नकळत ऑफिसकडे वळू लागली.
10 मिनिटात ऑफिसला पोचली ती. फार गर्दी नव्हती. तिथल्या रिसेप्शनिस्टने समोर बसवलं. " तुम्हाला बॉयफ्रेंड भाड्याने हवा आहे काय म्हणून विचारलं "?
" नाही. नको आहे ?"
" मग नोकरीसाठी आलाय का ?".
" नाही, मला नोकरी आहे . पण हा जॉब मला नवीन वाटला म्हणून एक उत्सुकता म्हणून या जॉबचे काय स्वरूप आहे हे विचारावं वाटलं म्हणून इथे आली आहे".
" ओके. Thats good." म्हणून तिनं खुलासा करायला चालू केलं ," हे बघा आमच्याकडे बॉयफ्रेंड ( मित्र / मैत्रीण ) भाड्याने देणे हा प्रकार खूप वेगळा आहे. नॉनसेन्स काही नसतं. ज्या मुलींना, स्त्रियांना गप्पा मारायला, मन मोकळं करायला कोण नसतं , त्यांच्याशी गप्पा मारायला आम्ही मित्र किंवा मैत्रिणी पुरवतो. गप्पा या फक्त सार्वजनिक जागी म्हणजे ठराविक आईस्क्रीम शॉप ठिकाणी असतात. हातात हात घेणं सुद्धा निषिद्ध आहे. तिथेच समोर बसून 2 तास गप्पा किंवा मन मोकळं करायचं. मित्र मैत्रिणी तुमचं सगळं ऐकून घेतात. एकत्र आईस्क्रीम खाऊ शकता. मुख्य म्हणजे तुमचं सगळं बोलणं हे गुप्त राहतं. आणि तिथेच विसरून दिलं जातं. हल्ली लोकांना आपल्या किंवा दुसऱ्याचे ऐकायला वेळ नाही म्हणून ही सेवा आहे. "
" लोकांचा प्रतिसाद कसा आहे हो ?". रागिणी.
" अपेक्षेपेक्षा उत्तम. वास्तविक प्रेमभंग झालेल्या मुली, कुटुंबात कुचम्बना झालेल्या स्त्रिया आणि अडगळीत पडलेले वृद्ध सगळे ग्राहक आहेत. शिवाय मित्राचे मैत्रिणीचे , ऑफिस मध्ये वाईट अनुभव आलेले पण आहेत ?".
" फारच विशेष आहे हे ?". रागिणी..
" विशेष नाही हो, भयानक आहे ".
" कसं काय ?".
" अहो बघा ना, लोकांना 24 तास ऑनलाईन असूनही मन मोकळं करायला कोणी नाही हे जरा विचित्रच ना ? त्यातही काही गुपितं ,मानसिक अपराधिपणा, किंवा घरच्या खाजगी गोष्टींना सल्ला हवा आहे पण ऐकून घ्यायला कुणाला नाही असं झालंय. पूर्वी वृद्ध लोकांशी बोलायला कुणी नसायचं आता तरुणांची सेम अवस्था झाली आहे. आता तर घरी मोठे लोकही नाहीत ".
" हो, खरं आहे हे. पण जे मित्र असतात ते भरवशाचे असतात का ?. रागिणीची शंका.
"हो , शक्यतो या खूप मानसिक संतुलित व्यक्ती असतात. ज्या तुमच्या बोलण्याला रिऍक्ट करत नाहीत, योग्य रिस्पॉन्स देऊन तुम्हाला बोलतं करून तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर शोधायला मदत करतात. हे म्हणजे आपण एखाद्या समुपदेशकला शेअर करून सल्ला घेण्यासारखं वाटतं लोकांना.
" ओके. मग छान आहे हे सगळं ".
" धन्यवाद मॅडम. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आजही एका मित्राला किंवा मैत्रिणीला भेटू शकता. फी फक्त 500 रुपये आहे .
रागिणी परत विचारात गेली. नक्की काय करू कळेना. तिचा प्रॉब्लेम कुणी ऐकून घेणारं नव्हतं पण आता अनोळखीशी बोलायचे म्हणजे जरा अवघडच झालं होतं. पण खरेच उत्तर मिळाले तर या अपेक्षेनं तिला एकदा ट्राय करावा वाटलं. नाहीतर ऑफिसला अजून वेळ होताच. शेवटी मनाची तयारी करून तिने 500 रुपये फी भरली.
रिसेप्शन ने तिला एका आईस्कीम पार्लर चा पत्ता दिला. अर्ध्या तासाने भेटीची वेळ दिली. रागिणीने बॉयफ्रेंडचा नांव नंबर मागितला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, आम्ही नाव नंबर शेअर नाही करत. तुमचे नांव नंबर बॉयफ्रेंडला पण माहित नसेल. त्याला फक्त आईस्क्रीम पार्लरचा पत्ता व टेबल नंबर दिला जाईल. रागिणी आणि जरा निर्धास्त झाली. एका उत्सुकतेपोटी तिथे वेळेआधी पोहोचली. तिथं थांबून वाट पाहत असताना तिला तिचा आवडता चित्रपट आठवला. "एक उनाड दिवस". रोजचा दिवस आपण नेहमीपेक्षा वेगळा जगलो तर आयुष्य 5 वर्षांनी वाढते असा संदेश देणारी मुव्ही. तिला आजचा दिवसही नेहमीपेक्षा वेगळा वाटू लागला. तीला सहज वाटून गेलं कि दोन तास सार्थकी लागले तर राघव सोबतचं नातं अजून 5 वर्षे तरी घट्ट राहावं.
तिला रिसेप्शनचा कॉल आला. पार्लर मधील 9 नंबरचा टेबल बुक केला आहे म्हणून कळवलं. रागिणी आत जाऊन खुर्चीवर बसून वाट पाहू लागली. उत्सुकता आणि अनामिक भीती दोन्ही भाव दाटलेले. त्या तंद्रीत ती काय बोलू काय नको याचा विचार करत असतानाच
आणखी पाच मिनिटातच तिच्यासमोर कोणीतरी येऊन बसलंय याची जाणीव होताच तिनं वर पाहिलं आणि बोलली, " राघव ? तू इथे ?.
राघवही आश्चर्यचकित. " तू इथं? . आईस्क्रीम खायला ?."
" नाही. पण तू इथे कसा काय ?".
राघवला सगळा अंदाज आला आणि म्हणाला , ओके, कळलं मला. तू ज्या बॉयफ्रेंडला भेटायला आली आहेस तो मीच आहे".
" म्हणजे गेली काही महिने तू हेच काम करतोस "? रागिणीनं विचारलं.
राघवने एक पॉज घेऊन हळूच " हो" म्हणाला.
मग यात लपवण्या सारखं काय होतं ?. रागिणी.
राघव शांत होता. तीला थांबू कि नको कळत नव्हतं. शांततेतील काही सेकंद पण खूप मोठी वाटू लागली. कुणाला काय बोलू कळत नव्हतं. रागिणी म्हणाली, " मी निघू ?".
राघव म्हणाला, " प्लिज थांब, दोन तास बोलत बस.".
रागिणी, "नको, बोअर होशील तू, नेहमीसारखा. त्यापेक्षा जाते मी ".
राघवला टोमणा ऐकून कसेतरी झालं तरीही तो अवसान आणून म्हणाला, " हे बघ रागी, 2 तास झाल्यानंतर मला क्लाएंट चा फीडबॅक फॉर्म भरून सही घ्यावी लागते. तो ऑफीसमध्ये दिल्यानंतर त्यानुसार माझं रेटिंग वाढतं किंवा कमी होतं आणि पैसेही. तू अशीच गेलीस तर निगेटिव्ह मार्किंग होईल. सो प्लिज थांब ना ".
"आज खूप दिवसांनी मला रागी म्हणालास, थँक्स अ लॉट. पण मध्ये बंद का केलंस रागी म्हणून हाक मारायची, ?. रागिणीनं विचारलं.
राघवही ओशाळला. नाईलाजानं परत त्यानं सावरून विचारलं, " थांबशील ना दोन तास ?.
"पण तुझ्या स्वार्थासाठी मला किती वेळा तडजोड करावी लागेल अजून ?". तिचा दुसरा प्रश्न.
राघव निरुत्तर होता. शेवटी त्याने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि म्हणाला, " हे बघ, मोबाईल बंद ठेऊन बोलतो. नो गेम, नो चाट.".
या निमित्तानं का असेना खूप दिवसांनी राघव मोबाईल बंद ठेऊन बोलतोय हे तिच्यासाठी खूपच झालं. ती म्हणाली, " तुझ्या मोबाईलविना दोन तासासाठी फक्त 500 द्यावे लागतील माहित असतं तर मी तुला रोज 500 दिले असते की. सरळ मलाच मागायचे ना ?."
राघव सलग तिसऱ्या प्रश्नावर आऊट झाला होता. तिची चीड दिसत होती पण त्याला चीडता येत नव्हतं. फक्त " सॉरी " एवढंच त्याच्या तोंडातून आलं.
राघवनं आज प्लिज, सॉरी म्हणणं तिला अनपेक्षित आणि सुखद होतं. याआधी तो प्लिज, सॉरी कधी म्हणाला होता हे आठवत असताना राघव म्हणाला, " हे बघ रागी, मी इथं माझा बॉयफ्रेंडचा रोल सोडून बाहेर येणार नाही. पती म्हणून काही रिऍक्ट करणार नाही. तू काहीही बोलू शकतेस, सांगू शकतेस. आम्ही हे इथेच ठेवतो.".
रागिणीलाही तेच हवं होतं. नाहीतरी नातं इतकं टोकाला गेलं आहे की आज आपण संधी असूनही बोललो नाही ही खंत मनात राहू नये म्हणून तिनं आज दोन तास पुरेपूर वापरून घेऊ हा निर्धार केला. आता जे आहे त्यापेक्षा काय वाईट होणार नाही हाही विश्वास होता.
" ठीक आहे, बोलू आपण ?"..रागिणी म्हणाली.
" थँक्स. अर्धा तास झाला आहे. इथून पुढे 1.30 तास मी तुझा पती नाही. आपण अरेतुरे ऐवजी अहोजाहो बोलू शकतो. म्हणजे तसा आमचा नियम आहे.".. राघव.
" ओके ". रागिणी म्हणाली.
" ठीक आहे मॅडम, बोला ".
कुठून सुरु करू म्हणत थोडा वेळ रागिणी शांत होती. अचानक ती म्हणाली, " मला एक तासापूर्वी रेल्वेखाली जीव द्यावा वाटलं होता. ".
राघव उडालाच. इतकं गंभीर असेल अशी कल्पना नव्हती त्याला. सीरीयसली ?".
" हो. सिरियसली".
" प्लिज असं परत कधी करू नका. चांगलं घडेल पुढे. विश्वास ठेवा." राघव धीर देत बोलला. आतून दुखावलोय हे त्याला दाखवताही येत नव्हतं. पण रागिणीच्या ते लक्षात आले.
" पण का ?. एनी प्रॉब्लेम मॅडम?".
" हो, मला ना हल्ली एकटं, एकाकी पडल्यासारखं झालंय. दुर्लक्षित असल्यासारखं वाटतं. माझं कुणीच नाही असेही होतं "..
" कशामुळे वाटतं असं तुम्हाला".
" पती राघव आणि माझा प्रेमविवाह. 3 वर्षे झाली लग्नाला. त्या आधी 2 वर्षे अफेअर. म्हणजे 5 वर्ष ओळखतो आम्ही एकमेकांना. पळून लग्न केल्यामुळे माहेर बंद आहे. त्याच्यासाठी मी मित्र मैत्रिणी पण टाळत आले. त्यामुळे कुणाशी बोलावं असं कुणी नाही. आणि ज्याच्यासाठी हे केलं, त्याला माझ्याशी बोलायला पण इच्छा नाही असं वाटतं. कारणे काढून टाळतो असं वाटतं. माझ्याशिवाय एक क्षण न राहणारा, एकही दिवस न भेटता राहणारा, रात्री 2 तास फोनवर बोलणारा माझा राघव हरवलाय". बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.
राघवला आधीची 2 आणि नंतरची 3 वर्ष आठवू लागली. त्याच्यातला बदलही जाणवला. आपल्याला दुसऱ्यातले बदल कळतात , स्वतःतले नाही असं झालं त्याला. राघवला काही करता येत नव्हतं. परत बाऊन्सर पडला होता. थोडा वेळ शांततेत गेला. रागिणीने रुमालाने डोळे पुसले. राघवनं शांतता भेदून संवाद सुरु केला, " हे असं कधीपासून बदलत गेलं असं वाटतं ".
" माहित नाही. पण आजच्यासारखंच पूर्वीही त्याचं ऑफिस माझ्या नंतर असायचं आणि तो माझ्या आधी घरी परत यायचा. आजही असेच आहे. पण पूर्वी मी ऑफिसला जात असेल तर तो मला सोडायला यायचा. नको म्हणाले तर तेवढीच वेळ तुझी सोबत मिळेल, का सोडू ?म्हणायचा. तू गेलीस कि तासभर घरी नाही करमत म्हणायचा. ऐकायला बरं वाटायचं. त्याला असं बोलताना पाहून मी नशीबवान आहे असं व्हायचं. संध्याकाळी ऑफिसवरून तो आधी परत यायचा. मी तासभर नंतर. तर स्टेशनला न्यायला येतो म्हणून मागे लागायचा. मीच म्हणायचे, नको, दमला असशील. बस घरी. येते तासाभरात. तासाभराने घरी पोचली तर दार उघडताच त्याचं "वेलकम माय जान" म्हणून स्माईल विथ मिठी ठरलेलं. दिवसभरचा कंटाळा, थकवा कुठल्या कुठे निघून जायचा. वर सरप्राईज म्हणून त्याच्या हातचा गरम चहा आणि बिस्कीट. अर्धं अर्धं एकमेकाना भरवत खायचं. मलातर स्वर्गात आहे असं व्हायचं. मी म्हणायचे त्याला, इतकं लाड नको करू, तर म्हणायचा कि माझ्या लाडीचे लाड करतोय. उद्या एखादं मूल झालं की तू बसशील त्याला भरवत, खेळवत. मला वेळ कमी देशील. म्हणून आता मिळेल तितका वेळ घेतोय. माझ्या आठवणी तयार करतोय. फ्रेश होऊन किचन मध्ये गेले तर हा तिथेच आजूबाजूला घुटमळत असायचा किंवा बाजूला चिकटून उभा राहायचा नाहीतर किचन कट्ट्यावर बसून माझ्याकडे बघत बसायचा. मला ते आवडायचं. भारी वाटायचं. मला ना कुणीतरी स्पेशल असल्यासारखं वाटायचं. मी लाजून चुर व्हायचे आणि त्याला ते फार आवडायचं."
हळूहळू सगळं कमी झालं आणि आता मात्र यातलं काही नाही. मूल होण्याआधीच सगळं बदलत गेलंय."
तिची मान खालीच होती. आवाज बदलला होता. भरून आल्यासारखा. राघवला काय बोलू कळत नव्हतं. स्वतःला सावरू कि रागिणीला हे त्याला कळेना. सगळ्यात वेगळी आणि अवघड केस होती आजची.
आपण स्वतःला रोज पाहतो त्यामुळे बदल जाणवत नाही पण 2 वर्षांपूर्वीचे फोटो पाहिले की कळतं , बरंच बदलतंय. वजन असेल, रूप असेल. मग स्वभाव बदल स्वतःला जाणवत का नाही ?. का त्याला आपण अपडेटेड प्रोफेशनल राहण्याचं गोंडस नाव देतो ?.
आताही त्याला कारण कळेना, म्हणून त्याने तिला विचारलं, " तुम्हाला असं वाटत नाही का कि लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळं त्याच्या स्वभावात बदल झाला असेल ?. भविष्याची काळजी जास्त असेल ना ".
" हो असेलही. माझी आणि भविष्याची काळजी असणार त्याला. पण जॉबसाठी स्वतःचा घरातला स्वभाव कशाला बदलायचा ?. आणि जगासाठी पती पत्नी असलो तरी घरी आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखं राहू शकतो की. ".
" इतकं सोपं होतं हे ?. त्याला मनोमनी वाटलं." हो, तेही बरोबर आहे तुमचं". राघव नाईलाजाने बोलून गेला. पण बदलाची सुरुवात कधी झाली असेल असं वाटतं तुम्हाला ?.
" नक्की माहित नाही पण 6 महिन्यांपूर्वी त्याचा जॉब गेला. सगळा भार आनंदाने माझ्यावर घेतला. घरखर्च , भाडं सगळं पेललं. बराचसा खर्च कमी केला. मुलाचं प्लॅनिंग पुढं गेलं. मुलाखतीसाठी तो वणवण फिरत राहिला. नसेल तर दिवसभर घरी असायचा. मग टीव्ही आणि मोबाईल गेम्सचं व्यसन लागलं. त्याला त्यातच आनंद वाटू लागला. जॉबही नको वाटू लागला. मी सगळं करते म्हणून त्याला असं बरं वाटलं असेल. मुलाखत नसेल त्या दिवशी तो सकाळी जाताना किंवा यायच्या वेळी पण मोबाईल गेम्स मध्येच बुडालेला असायचा. मी गेली आली याकडे लक्ष नसायचं. त्यामुळे हाय बाय नाही , वेलकम तर दुर्मिळ. मला वाटलं जॉब नसल्याचं टेन्शन असेल म्हणून मन रमवत असेल पण आता जॉब मिळाल्यावर पण ती सवय कायम आहे. मी त्याला नकोशी झाली आहे असं वाटतं, चुकीचे असेल माझे पण लक्षणं तीच वाटतात. काय करू ?. जॉब मिळण्यापूर्वी झालेल्या छोट्या छोट्या वादामुळं त्याचा जॉब काय, वेळ काय आहे , पगार किती आहे हे अजून मला कळू दिल नाही. पूर्वी त्याला मला कोणतीही गोष्ट कधी सांगू असं व्हायचं, आता किती, काय लपवू असं होतंय. असं नव्हतं आधी आमच्यात ". रागिणीने मन मोकळं केलं.
इतक्यात तिथल्या वेटरने दोन मिल्क शेक दोघांच्या पुढ्यात आणून ठेवले. रागिणीनं पाहिलं तर तिचं बटरस्कॉच आईस्क्रीम विथ मिल्क शेक. हे का ?. तिनं विचारलं.
"सगळ्यांना देतो हे. नो एक्स्ट्रा कोस्ट.". राघवचा खुलासा .
" ओके, पण फ्लेवर कुणी निवडला. तुम्ही कि तुमच्या ऑफिसने ".
" मी माझ्या क्लाएंटला हेच देतो." राघव म्हणाला.
" थँक्स. यू नो, हे माझं सर्वात आवडतं आईस्क्रीम आहे. राघव सोबत खूप खाल्लंय. पण याच्या आधी कधी ते आठवत नाही".. रागिणी सहज बोलली. " निदान नवीन जॉब लागल्यावर मला पार्टी म्हणून इतकं पुरेसं होतं ".
राघवला थोडं खजील अपराधी झाल्यासारखं वाटलं. यात बरीचशी चूक आपली आहे हे त्याला वाटायला लागलं. पण स्वतःची बाजू सावरायला म्हणून काहीतरी बचाव म्हणून बोलणं गरजेचं होतं. ," कदाचित , कदाचित त्याचा नवीन जॉब , पगार तुम्हाला आवडणार नाही म्हणून सांगितलं नसेल ?".
" असेलही तसं. पण त्याने अंतर वाढत गेलं हे का कळू नये त्याला. नात्यातला पारदर्शीपणा निघून नेल्यावर उरणार काय ? शिवाय आता नवीन जॉब आहे , मग घरी आल्यावर मोबाईल गेम्स, टीव्ही यात कशाला वेळ वाया जाऊ द्यावा. बाकीची करण्यासारखं असेल की काही ?.
हो पण तो काहीतरी घरखर्च करत असेल की मदत म्हणून..?
" त्याला शक्य तेवढं करतो आणि तो सगळं करेल. तेवढा विश्वास आहे मला. पण सांगितलं असतं तर बरं झालं असतं फ्युचर प्लॅनिंगला. ".
"ते कसं काय ?." राघव.
" त्याच्या नव्या जॉबचे स्वरूप, टेंशन कळलं असतं तर मी ऍडजस्ट करायला माझ्यात बदल केला असता कि. काही मदत करता आली असती तर आनंदाने केली असती ना? त्याच्या इन्कमला मर्यादा असेल तर मी अजून ओव्हरटाईम करून चार पैसे जास्त कमवायचा विचार करेन. त्याला जॉब आवडत नसेल तर दुसरा जॉब , बिझनेससाठी मदत केली असती. त्याला जे आवडतं तेही करायला सपोर्ट केला असता. त्यानं खंबीर , आनंदी असावं याशिवाय वेगळं काय हवं होतं मला "?. रागिणीचा प्रश्न.
" पगार कळला कि बायका खर्चाचं काढतात म्हणून त्याने लपवला असेल तर ?.
" त्याला वाटणं चुकीचं नाही. पण मी असं नसतं मानलं, कदाचित पगार कमी असेल पण हे थोडंच कायम राहणार आहे? नंतर वाढेल कि पगार. मी तर दोन पगार एकत्र करून त्याला आपणाला पगार म्हटलं असतं, तुझामाझा नाही. नाहीतर खर्च, बचत सगळं ठरवून केलं असतं. पण मला वाटतं की अजून मूल नाही, स्वतःचं घर नाही म्हणून जास्त प्लॅनिंग हवं. पगार कळला तर मला अजून किती बचत करायची, काय खर्च कमी करायचा ते तरी कळलं असतं इतकंच. त्याच्यासाठी आनंदानं करेन सगळं. बाकी काही नाही. मला त्याची, आमच्या भविष्याची काळजी वाटते म्हणून मनात शंका, गैरसमज येतात त्याला मी काय करू ?.
" मग शंका, गैरसमज जायला त्यानं काय करावं असं वाटतं तुम्हाला ?.
" मी एकदा वाचलं होतं, वाघाला मारायचं असेल तर तो छोटा बछडा असताना मारणे सोपं असतं. मला वाटतं शंका, गैरसमज मारून टाकायला पण तेच करायला हवं. मोठया होण्याआधी संपवून टाकाव्यात. आणि ज्याला वाटतं आपण शंका, गैरसमज निर्माण व्हायला जागा देतोय त्यानं त्या दूर कराव्यात.".
आता दोघांचाही सवांद आधी चर्चा, प्रश्नोत्तर, संवादकडून सुसंवादाकडे चालली होती. दोघांच्याही बोलण्यात मोकळेपणा यायला लागला. रागिणीचं बोलून मन मोकळं होत होतं, त्यानं इतकं ऐकून घेतलं म्हणून तिला हलकं वाटत होत. राघवला चूक कळत होती. त्यालाही तिच्या अपेक्षा कळत गेल्या. सगळं सोपं होतं आपण अवघड करून घेतलं असं वाटून गेलं त्याला. आपल्याला स्वतःच्या समस्या सुटत नाहीत पण तीच समस्या दुसऱ्याची असेल तर सल्ले सुचतात ना ?. मग स्वतःच्या समस्येकडे दुसऱ्याची समस्या म्हणून पाहिलं तर ?.
" आता तुम्हाला त्याचा जॉब , पगार कळला तर काय कराल ?.
" जॉब त्याला आवडत असेल तर त्यानं जरूर करावा. त्यात चुकीचं काय नाही. कुठलंच काम छोटंमोठं नसत आणि पगार म्हणाल तर आधी मी त्याला, स्वभावाला पाहून प्रेम केलंय. पगार पाहून नाही. जॉबलेस असतानाही मी त्याच्यावर प्रेम केलं आहेच की". रागिनींने खुलासा केला.
" हो ते तर आहेच. पण त्याचा बॉयफ्रेंडचा जॉब चालेल का तुम्हाला ?.
" माझं त्याच्यावर प्रेम आहे. सर्वात आधी तो माझा बॉयफ्रेंड होता. त्यामुळे जॉब काहीही असुदे ,घरी तो माझा, बॉयफ्रेंड हवा एवढीच अपेक्षा. "
रागिणीला मन मोकळं केल्याचा आनंद झालेला. दोन तास वेळ संपत आलेली. राघवने फीडबॅक फॉर्म काढला. रागिनींने फक्त बिग बिग थँक्स विथ बिग स्माईल लिहिलं. राघवही खुश झाला.
त्यानं सहज विचारलं, " आता कुठं जाणार ?".
ती म्हणाली, हाफ डे ऑफिस. मग घरी ".
" ओके ", तुमच्या मिस्टरांना काही निरोप ?.
" अप्रत्यक्ष प्रश्न छान वाटला तिला. ती म्हणाली, ऑफिस जॉब घरी केला तर आवडेल म्हणून सांगा. "
" म्हणजे ?". राघव गोंधळला.
" म्हणजे घरीही बॉयफ्रेंड म्हणून काम कर, पती म्हणून नको". रागिणी खळखळून हसली. आणि राघवही . खूप दिवसांनी दोघे मनमुराद हसले.
रागिणी ऑफिसला निघून गेली. जाताना विचार करत होती की हेच असं आधी का बोललो नाही ?. असुदे, आज बोलले तरी. फक्त राघव आता काय मानून घेतो याचं तिला टेन्शन आलं होतं. ती ऑफिसला गेली पण कामात लक्ष लागेना. घरी गेल्यावर काय होईल याचा विचार तिला त्रास देऊ लागला. राघव त्याच्या नेक्स्ट इकडे क्लाएंटसाठी वाट पाहू लागला. त्याच्याही मनात विचाराचं काहूर दाटलेले. रागीने आधी हे सांगायचा प्रयत्न केला होता की नाही कळत नव्हतं.
सहा वाजलेले. सगळे ऑफिसमधून बाहेर निघत होते. तेवढ्यात तिचा मेसेज टोन वाजला. राघवचा मेसेज होता. " मी घरी आलोय. वेटींग फॉर यू".
मन हलकं झालं पण तरीही सगळं आलबेल असावं या अपेक्षेनं रागिणी घरी पोहोचली तर राघवनं दरवाजा उघडून "माय जान" म्हणून वेलकम केलं तशी रागिणी आनंदानं रडू लागली. टेबलवर गरम चहा, बिस्कीट होतं. राघवनं तिचे डोळे पुसत तिला पहिला घास भरवला आणि लपवून ठेवलेला गुलाब आणि गजरा तिला देत म्हणाला, विल यु बी माय गर्लफ्रेंड?.
तिला आनंदानं भरून आलं. आणि म्हणाली, " येस्स्स, फॉरेव्हर माय बॉयफ्रेंड ".
लेखक ©विकास चव्हाण कोल्हापूर
9422748271.