दिल्लीच्या एका शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षक बोलले म्हणून स्वतःचे आयुष्य संपवले. कारण काय तर शिक्षक त्याचा जाच करत होते असे त्यानेच मृत्यूपूर्वी लिहून ठेवले आहे. जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे . असं घडायला नको होतं . मुळात त्याने शिक्षकांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी जो मार्ग निवडला तोच मुळी चुकीचा आहे याबद्दल कुणाचंच दुमत असू शकत नाही. शिक्षकांनी जाच केला म्हणजे नक्की काय केलं? तर ते त्याला सर्व विद्यार्थ्यांसमोर काही अपमानास्पद बोलले. यामुळे त्या विद्यार्थ्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्याची परिणती म्हणजे त्याचे आयुष्य कायमचे संपले .
शिक्षकांच्या काही बेजबाबदार वक्तव्याने कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनावर अनेकदा खोल परिणाम होऊ शकतो. सगळेच विद्यार्थी काही बिनधास्त अथवा कोडेगे नसतात. काही अतीसंवेदनशील असतात त्यामुळे शिक्षकाने सहज उच्चारलेल्या एखाद्या वाक्याचा किंवा शब्दाचा या मुलांवर मोठा आघात होतो . त्यामुळे शिक्षकांच्या या कृत्याचे समर्थन नाही कोणीच करू शकत नाही .
पण या प्रकारच्या घटनेच्या दुसऱ्या बाजूचाही आपल्याला आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे . गेल्या पंचवीस तीस वर्षांपूर्वी आणि त्या आधी कितीतरी वर्षांपूर्वी घरातल्या वडिलधाऱ्यांच्या तापट स्वभावाची चव न चाखलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही . जाणते अजाणतेपणी आपल्या हातून छोटीशी जरी चूक झाली तरी आई बाबांची खूप बोलणी खावी लागत . वर काका देखील ओरडत . अशावेळी आपली चूक नसतानाही आपण गप्प बसत असू. कारण आपल्याला माहित असे की हा राग काही कायमचा असणार नाही . शिवाय अशावेळी आजी आजोबांचा अधिक आधार वाटत असे. यामुळे शाळेतील शिक्षकांचा बेदम मार आणि अभ्यास न केल्याने ऐकून घ्यावी लागणारी त्यांची बोलणी याचे त्याकाळी काहीच वाटत नसे.
मुळात कोणत्याच घरात मुलांचे मग तो मुलगा असो की मुलगी , कधीच फाजील लाड होत नसत. याचाच परिणाम म्हणजे मुलांमध्ये एक प्रकारे सहनशक्ती वाढीस लागे . बरं असंही नाही की आपल्याच घरातील वडीलधारी मंडळी रागवत . मित्राच्या घरीही तीच परिस्थिती असे . त्यामुळे अशा रागवण्याचा कोणत्याच मुलांवर काहीच परिणाम होत नसे. काहीवेळेस तर शिव्यांचा तीर्थप्रसाद देखील तीर्थरूपांकडून मिळत असे पण त्याचेही काही वाटत नसे . कधी कधी तर शेजारचे काका किंवा गावातील एखादी ओळखीची ज्येष्ठ व्यक्ती देखील आपल्या चुकीच्या वागण्याबद्दल आपल्याला तिथल्या तिथे बोलत. तेव्हा त्यांच्याकडे मान वर करून पहाण्याची हिंमत देखील होत नसे. उलट आपल्या घराच्या मंडळींना ही गोष्ट कळू नये याची दक्षता घेतली जायची. चुकून जर घरच्यांना कळलेच तर आणखी बोलणी खावी लागायची .
त्यावेळी घरची आर्थिक स्थिती देखील जेमतेमच असे. त्यामुळे ' पॉकेट मनी ' हा प्रकारही अस्तित्वात नव्हता . मग चंगळवादाचा प्रश्नच उद्भवत नसे . आज चित्र पूर्णपणे बदलले आहे . एक तर एकच मूल आणि तेही अति लाडाकोडात वाढवलेले. मग काय त्याला नाही ऐकायची सवयच नसते . त्याला मारणे तर दूरच साधे डोळे सुध्दा वटारले जात नाहीत . शिवाय भरपूर पॉकेट मनी त्याच्या खिशात बळे बळेच अक्षरशः कोंबला जातो . आता तर काय त्याच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन खातेच उघडून दिले जाते. अशाने ही मुलं इतकी शेफारतात की आई वडिलांचे एटीएम कार्डही तेच वापरतात. आणि अशा गोष्टींना आई वडिलच प्रोत्साहन देत असतात. ही मुलं पुढे जाऊन अधिक हट्टी बनतात. यांना बाहेरचं सोडाच घरच्या मोठ्या माणसांनी देखील बोललेलं चालत नाही. चुकून जर कुणी बोललेच तर हे त्यांच्याकडे मारक्या बैलासारखे शिंगे उगारून बघत असतात . यांना कुणीच यांच्या विरुद्ध बोललेलं चालत नाही .
अशावेळी जर एखादा शिक्षक यांच्या भल्यासाठी यांच्यावर ओरडत असेल तर तो शिक्षक यांच्या भाषेत डोक्यात जातो . कोणताही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात काही खानदानी वैर नसते. उलट आपल्या विद्यार्थ्याला सगळं कळावं , तो अभ्यासात पुढे यावा , त्याने स्वतःचं आणि त्याच्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असेच प्रत्येक शिक्षकाला वाटत असते. कधी कधी काही शिक्षक सुद्धा बोलताना भान विसरून जातात आणि रागाच्या भरात बरंच काहीसं उलट सुलट बोलून जातात. मात्र थोड्यावेळाने ते हे विसरूनही जातात. पुन्हा त्या विद्यार्थ्याला ते जवळ घेतात आणि प्रेमाने त्याला समजावून सांगतात. अशावेळी विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांची ही बाजू समजून घ्यायला हवी . मात्र समजून घेणं म्हणजे नेमकं काय हेच मुळी या लाडात वाढलेल्या मुलांना समजत नाही . त्या विद्यार्थ्यांच्या मनात अशा शिक्षकाबद्दल कोणताही आदर राहत नाही. आपल्या सरांनी आपला सगळ्यांसमोर अपमान केला एवढेच त्याच्या डोक्यात राहते . आता आपण कुणाला तोंड दाखवू शकत नाही . मित्रांशी बोलू शकत नाही . ही भावनाच त्याला मग गैरकृत्य करण्यास प्रवृत्त करीत असते. अखेर त्याच्या बालसुलभ भावनांचा कडेलोट होऊन तो स्वतःचे मोलाचे आयुष्य कायमचे संपवून टाकतो.
मात्र असे करत असताना त्याच्या हे लक्षात येत नाही की या शाळा कॉलेजच्या अपमानापेक्षाही प्रत्यक्ष बाह्य जगात अर्थात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी या पेक्षाही मोठ्या अपमानाचे कढ सोसावे लागतात. या व्यतिरिक्त समाजात वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात जेव्हा आपण येतो तेव्हा अनेकांच्या भिन्न आणि विचित्र स्वभावांमुळे कित्येकदा आपल्याला अपमानित व्हावे लागते. त्यावेळी तो अपमान सहन करता यायला हवा . काहीवेळेस आपल्याला डावलून पात्रता नसलेल्या कुणाला वरच्या पदावर बढती दिली जाते तेव्हा झालेला अपमान गपगुमान गिळावा लागतो. आयुष्यात असे अपमानाचे कित्येक प्रसंग येत असतात त्याला सामोरे जाण्याची तयारी बालवयातच करायला हवी. अन्यथा या स्पर्धेच्या युगात वावरणे आणि टिकून राहणे फार कठीण होऊन जाईल. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशिकता. ती सोशिकता अंगी येण्यासाठी पालकांनी आपल्या मुलाला कणखर बनवले पाहिजे.
आज मुलं जराशा बोलण्याने बिथरतात आणि मागचा पुढचा विचार न करता एकदम टोकाचे पाऊल उचलतात . त्यामुळे पालक आणि शिक्षक दोघांनीही या कोवळ्या वयातल्या मुलांची मानसिकता प्रथम समजून घेऊन त्यांना बाहेरच्या जगाची ओळख करून द्यायला हवी. मोबाईलच्या आभासी दुनियेतून त्यांना बाहेर काढून वास्तवाची जाणीव करू द्यायला हवी .
शिवाय शिक्षकांनी देखील आता परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वतःमध्ये बदल करून घ्यायला हवा . सध्या अनुभव संपन्न शिक्षकांची एक पिढी आता निवृत्त झाली आहे आणि तरुण अतिउत्साही शिक्षकांची एक नवी फळी तयार होऊ लागली आहे . यापैकी बऱ्याच शिक्षकांचे त्यांच्या विषया खेरीज अन्य कसलेच वाचन नसते . त्यामुळे आपल्या विषया व्यतिरिक्त इतर कोणत्या विषयावर हे शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकत नाहीत की त्यांना वेगळं काही सांगू शकत किंबहुना विद्यार्थ्यांशी निखळ मैत्रीपूर्ण गप्पा देखील यांना मारता येत नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतात . मुळात त्यांच्यात विद्यार्थ्यांना समजून घेण्याची ती प्रगल्भताच विकसित झालेली नसते. कदाचित म्हणूनच शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये काही अंतर असावं लागतं याचंही भान यांना नसतं .
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत जगात सध्याच्या विद्यार्थ्याला बरीच माहिती असते . ती कशी मिळवावी हे देखील त्यांना चांगलंच उमगलेलं असतं. परंतु माहिती आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी आहेत हे आधी शिक्षकाला समजले असेल तरच तो खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानसंपन्न करू शकतो.
आधीच शिक्षणक्षेत्रात अनागोंदी कारभार चालू आहे . त्यात शिक्षकांच्या विपरीत वागण्याची भर जर अशा प्रकारच्या घटनांनी पडत राहिली तर शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेवर जो काही उरलासुरला विश्वास आहे तोही धुळीस मिळेल. शिक्षण आणि समाजव्यवस्था या एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे त्यांचा परिणाम आपल्यावर होणार हे ओघाने आलेच . मात्र यातील जे काही गुणदोष आहेत ते वेळीच दूर केले तरच आपण एक नवीन समाज निर्माण करू शकतो . आणि या नवनिर्मितीसाठी तरुणाईची सर्वात निर्णायक भूमिका ठरणार आहे. पण ही निर्णायक भूमिका निभावण्यासाठी मुळात ही तरुणाई सक्षम असली पाहिजे - कणखर असली पाहिजे. एवढ्या तेवढ्या कारणावरून जर ही पिढी स्वतःला संपवू लागली तर पुढचं भविष्य काय , याचाही यादृष्टीने विचार व्हावयास हवा. छोट्या मोठ्या अपमानाने जर आपण खचून जाणार असू तर भविष्यातील आव्हानांना तोंड देणार कसे ?
संन्याशाची पोरं म्हणून अपमान ज्यांच्या पाचवीला पुजलेल्या अशा चार भावंडांनी जर समाजापासून दूर पळ काढत कुठे तरी जाऊन जीवन संपवले असते तर निवृती , ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे वारकरी संप्रदायाच्या चौरंगाला लाभलेले चार आधारस्तंभ कसे आकाराला आले असते आणि त्यावर ज्ञानेश्वरी नावाच्या माऊलींच्या ग्रंथाचे पूजन आणि पारायण कसे केले असते? बादशहाच्या दरबारात झालेल्या अपमानाने शिवराय खचले असते तर त्यांची ओळख आज छत्रपती म्हणून कधीच झाली नसती. खालची जात म्हणून सतत अपमान सहन करावा लागत असल्याने जर भीमराव ने शिक्षण सोडून दिले असते तर आज आपल्याला संविधान लिहिणारे डॉ. आंबेडकर कधीच कळले नसते . मुलींची शाळा सुरू केल्याने अंगावर होणाऱ्या शेण आणि चिखल फेकीच्या अपमानाने जर फुले दांपत्याने शाळाच बंद केली असती तर आजही कित्येक स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या . काळया पाण्याची शिक्षा करून इंग्रजांनी माझा फार मोठा अपमान केला आहे असे म्हणून विनायकने कारावासात आत्महत्या केली असती तर स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला कधीच कळले नसते. रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून इंग्रजांनी ' काळा ' म्हणून सामानासकट स्टेशनवर फेकल्याने फार मोठा अपमान झाला झाला असे समजून जर मोहनदासने त्याच रेल्वे खाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली असती तर आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी कधीच कळले नसते.
अर्थात अपमानाचे विष प्राशन करून जो पुन्हा पेटून उठतो त्यालाच यशाचे अमृत चाखावयास मिळते. ते अमृत वाट्याला येण्यासाठी आयुष्यात एकदा तरी अपमान व्हायलाच पाहिजे आणि त्या अपमानाचे बाळकडू आता घराघरांतून दिले पाहिजे...!!
© मार्तंड औघडे
( भाईंदर )
२३ नोव्हेंबर २०२५
🪧 विचार करायला प्रवृत्त करणारी पोस्ट आहे.. कृपया सर्वांना नक्कीच फॉरवर्ड करा आणि आपल्या ग्रुप वर शेअर करा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा