नुकताच व्हाट्सप वर एका वृद्ध आईचा व तिच्या मध्यमवयीन मुलाचा व्हिडिओ बघितला, ज्यात ती आई सामोसा खाण्यासाठी कश्या क्लृप्त्या करते हे होते. हा व्हिडिओ पाहून मला माझ्या क्लिनिकमधे पूर्वी(२० वर्षे) काम करणाऱ्या मधू नानांची आठवण झाली. क्लिनिकमधे येणाऱ्या पेशंट्सचे नंबर लावण्याचे काम ते करायचे. ह्या कामाकरता त्यांची नेमणूक कशी झाली हा महत्त्वाचा किस्सा तुमच्या बरोबर शेअर करतोय.
नाना वय वर्षे ६५, तसे तब्येतीने काटक होते,पायी चालण्याची प्रचंड क्षमता, टूव्हीलर त्यांना चालवता येत नसे आणि बस, रिक्षाचा वापर ते अपवादात्मक परिस्थितीत करत बॅंकेतून रिटायर झाले होते. मधू नानांना वडापाव, सामोसे फार आवडत आणि ह्या बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना सतत पोटाच्या तक्रारी उद्भवत असत.त्यांचे त्याबद्दल चेक-अप देखिल झाले होते व आतड्यांची पचन क्षमता कमकुवत झाली असल्याचे कळले होते. त्यांचा माझा परिचय ह्याच तक्रारींमुळे झाला होता. सुरूवातीला दर पंधरा दिवसांनी, नंतर आठवड्याने नानांची स्वारी दवाखान्यात हजर व्हायला लागली. मी दर वेळी औषध देताना त्यांना बाहेर काही खाल्ले का विचारायचो, आधी ते खरे सांगत पण नंतर नंतर मी रागावेन म्हणून , "काही नाही हो" अस खोटे बोलत. पण एव्हाना मला त्यांच्या सवयीबद्दल घरच्यांकडून कळले होते. घरचे देखिल त्यांच्या ह्या गोष्टीला कंटाळले होते व वैतागले होते. एकदा तर माझ्या समोरच त्यांच्या मुलाने त्यांचा पाणउतारा केला होता व "डॉ, ह्यांना तुम्ही अजिबात औषध देत जाऊ नका, मी पैसे देणार नाही. ऐकायचेच नाही त्यांना तर मरू देत तसेच" असे म्हटल्याचे आठवते. मला मुलाची बाजू पटत होती व नानांबद्दल वाईट वाटत असले तरी थोडा रागही आला होता. त्यांना मी रागाऊन म्हणालो होतो की, "नाना तुम्हाला ऐकायचे नसेल तर मी ओषधं देणार नाही".
नंतर मी ही गोष्ट विसरून गेलो पण पुन्हा ३-४ दिवसांनी नाना माझ्या पुढे हजर! तोच अपराधी, थोडा केविलवाणा चेहरा व पोटावर हात ठेवून तक्रार सांगणे. तेच माझे प्रश्न, तेच त्यांचे उत्तर. मग रागाऊन मी त्यांना खरं सांगा म्हटल्यावर, "हो खाल्ला एक वडापाव काल" हे उत्तर व काकुळतीला येऊन त्यांचे म्हणणे की परत नाही खाणार बाहेरचे. एवढ्या वेळी द्या औषध व पैसे कमी आहेत, उद्या देतो. असे संवाद आठवड्यातून १ -२ वेळा होऊ लागले.
पण एक दिवस मी त्यांना उशिरा रात्री १० वाजता या दवाखाना बंद करण्याच्या वेळेला म्हणून परत पाठवले आणि ते देखिल आले. मी त्यांना म्हणालो, "नाना का नाही ऐकत तुम्ही, का पथ्य पाळत नाही? अहो मी काय किंवा घरचे काय तुमच्या भल्यासाठीच सांगतोना? ऐका जरा माझे, का शरीराला त्रास देता? "
त्यावेळी नाना जे बोलले ते ऐकून मी विचारात पडलो व जरा वाईट ही वाटले. ते म्हणाले,
" डाॅक्टर मला सगळं कळतं हो, पण एक सांगू का माझे लहानपण गरीबीत गेले. कधीही कुठली गोष्ट मनाप्रमाणे करता आली नाही. खाण्याच्या खूपशा पदार्थांसाठी तरसलोय मी. नंतर प्रापंचिक जबाबदारी अंगावर पडली, पैसा येत होता पण गरजांपुढे पुरत नव्हता म्हणून इच्छा पुन्हा दाबून टाकत असे.म्हणत असे की, "बघू जरा स्थिरस्थावर झाल्यावर वागू मनासारखे. पण बघू पुढे म्हणेस्तोवर रिटायरमेंट आली. ऑफिसमधे असताना मला वडापाव, भजी, मिसळ कधी कधी खायला मिळे. मला ह्या गोष्टी खूप आवडतात,म्हणून मी खातो पण आता तब्येत साथ देत नाही. जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते, आणि आता चणे आहेत तर दात नाहीत ."एवढं बोलून नाना कसनुसं हसले, त्यांच्या डोळ्यात तरळलेले पाणी माझ्या नजरेतून सुटले नाही.
नाना पुढे म्हणाले "डॉक्टर, आता कितीसे दिवस राहीलेत हो आमचे? कधी मना सारखे जगायचेच नाही का आम्ही? मला कुठलेही व्यसन नाही किंवा ते करणे मला परवडण्यासारखेही नव्हते. कारण ते करून मला कुटुंबाची परवड करायची नव्हती, मग निदान हा स्वस्तातील षौक तरी आयुष्याच्या सूर्यास्ताला पूर्ण करू देत. आणि मरण कुणाला चुकलंय का? मग का उरलेले दिवस मन मारत जगू,? आणि डॉक्टर, हे म्हातारपण अगदी लहानपणा सारखे असते हो! हट्टी, जिद्दी, तेवढेच हळवे. फरक एवढाच की तो उगवणारा सूर्य असतो तर आमचा मावळणारा! मला मुलाचा, सुनेचा, तुमचा अजिबात राग येत नाही कारण मला माहितीये, तुम्ही माझ्या काळजी पोटी हे बोलता आहात. पण... असो हे त्यांना आज नाही कळणार माझ्या वयाचे झाले की आपोआप उलगडा होईल, तेव्हा मी नसेन त्यांना ह्याची जाणीव करून द्यायला! तुमचा खूप वेळ घेतला, निघतो मी! मलाही हे कुठे तरी बोलायचे होते, आता खूप हलकं वाटतंय. पण हो, असं समजू नका बरं की मी माझी सवय सोडेन.नाही, मी तुमच्याकडे येत रहाणारच...!
जाता जाता एक वडीलकीचा सल्ला तुम्हाला, तुम्ही नाही म्हणाल तरी देतो. डाॅक्टर, तुम्ही लहान आहात. आयुष्यात त्या त्या वेळी ते ते वाटेल ना ते करा, पण मर्यादेत राहून,... बघू पुढे, असं म्हणून टाळू नका. कारण हा पुढे नेहमी पुढे पुढेच जात रहाणार, त्यामुळे आयुष्याचा तो तो क्षण त्या त्या वेळीच जगा, Life is like an ice cream, taste it before it melts "
असं म्हणून नाना निघून गेले...
मी सुन्न होऊन विचार करू लागलो, केवढा मोलाचा सल्ला नाना देऊन गेले! खरेच ते पूर्णपणे चुकीचे वागत होते का? आपण डाॅक्टर लोकं सल्ला देऊन मोकळे होतो (अर्थात आपले ते कर्तव्यच आहे ) व तो नाही पाळला की पेशंटवर खापर फोडून मोकळे होतो ,त्याच्यावर चिडतो.(त्याच्या भल्या करताच) पण त्याने तसे वागण्यामागे काय कारणं आहेत हा विचार आपण किती वेळा करतो? अर्थात काही आडमुठे पेशंटही असतात, "डॉक्टर काय सांगतच असतात"असे म्हणणारे,असो.
तिसऱ्या दिवशी नाना परत आले तीच तक्रार,... ह्या वेळी मी त्यांना नेहमीप्रमाणे काही विचारले नाही, विचारून उपयोगही नव्हता आणि मला विचारावे असे वाटलेही नाही. त्यांना काही औषधे मी दिली. मी ठरवले होते इथून पुढे शक्यतोवर कमी साईड इफेक्ट होणाऱ्या व त्यातही आयुर्वेदिक, व कधी होमिओपथिक औषधे नानांना द्यायची व कघी कधी केवळ त्यांच्या समाधानासाठी प्लासीबो (कुठलेही औषध नसलेल्या गोळ्या) द्यायच्या जेव्हा त्यांना औषधाची गरज नाही असे वाटेल तेव्हा.
त्यांनी काही पैसे देऊ केले व तुमचे मागचे पैसे पेंशन आली की देतो म्हणाले. मी मनात ठरवले होते त्याप्रमाणे नानांपुढे एक पर्याय मांडला.म्हणालो, "नाना तुम्ही रिटायर झाला आहात, तर तुम्ही माझ्याकडे सकाळी व संध्याकाळी १-१ तास पेशंट्सची नावे लिहिण्याचे काम कराल का? (खरे तर मला तशी गरज नव्हती पण मला इथून पुढे नानांकडून पैसे घ्यायचे नव्हते व मी तुम्हाला फुकट ट्रीटमेंट देईन, हे सांगणे त्यांना आवडले नसते). त्या बदल्यात मी काही रक्कम तुम्हाला देईन." थोडा विचार करून ते म्हणाले, "डाॅक्टर असे करता येईल का? की तुम्ही मला काही पैसे देऊ नका, मी येईन कामाला त्या बदल्यात तुम्ही मला ट्रीटमेंट देत जा! नाही मला माहीत आहे, तुमच्या ट्रीटमेंटचे पैसे जास्तच होतील पण घ्या सांभाळून!"
मी त्वरित त्यांची मागणी मान्य केली. त्या वेळेचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आजही आठवतो.
अशा रितीने नाना माझ्याकडे कामाला लागले व पुढे आश्चर्य म्हणजे त्यांच्या तक्रारींची वारंवारिता पहिल्या पेक्षा खूप कमी झाली. कधी कधी तर नुसत्या प्लासीबोने त्यांना बरे वाटे, ते जास्त हेल्दी वाटू लागले. ह्याचे कारण माझ्या लक्षात आले की त्यांची मानसिक इनसिक्युरीटी कमी झाली होती व आपणही काम करतो आणि तेही दवाखान्यात, त्यामुळे तब्येतीची आता काही काळजी नाही हे समाधान हा बदल घडवण्यास कारणीभूत होता. ते तर आता पूर्ण वेळ दवाखान्यात थांबू लागले होते आणि हो त्यांचे बाहेरचे अपथ्थाचे खाणे मात्र व्यवस्थित सुरू होते बरं का! कधी कधी मीच त्यांना पैसे देई व "जा नाना वडापाव खा" असे त्यांना सांगितले की ते तोंडाच्या दात नसलेल्या बोळक्यात छान हसायचे. नानांमधील बदल आश्चर्यकारकच होता.
नाना पाच वर्षे माझ्याकडे होते, नंतर त्यांच्या मुलाने दुसरीकडे जरा लांब फ्लॅट घेतला त्यामुळे अनिच्छेने नानांना तिकडे जावे लागले.पुढे नाना अधूनमधून माझ्या कडे येत असत, पण नंतर येणे खूप कमी झाले.
पुढे साधारण एक बर्षानंतर नाना मला येऊन भेटून गेले. वडापाव खायचा का?असं विचारले तर म्हणाले की "मी खाऊन आलो येताना"
आणि काय म्हणावे ह्याला कळत नाही पण दोनच दिवसांनी त्यांच्या नातेवाईकांकडून कळले की नाना काल रात्री झोपेतच गेले, हार्ट अॅटॅकने.
खूप वाईट वाटले पण पुन्हा विचार आला की किती शांत पणे, कुणालाही त्रास न देता नाना गेले! त्यांना दोनच दिवसांपूर्वी मला भेटावे का वाटले? त्या वेळी माझी त्यांच्या आवडीची गोष्ट खा म्हणण्याची ऑफर नाकारताना त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थता मला दिसली होती. का.? का?
मित्रांनो आपल्या आजूबाजूला, परिचयात, घरात असे बरेच नाना /नानी आपण बघतो, त्यांचे म्हातारपणातील- बालपण, हट्ट, इच्छा, त्यांची घुसमट, इ. इ. आपण बघत असतो, मला येथे अजिबात म्हणायचे नाहीये की त्यांना वर्ज्य असलेल्या, अपथ्थ्याच्या सर्वच मागण्या तुम्ही पूर्ण करा, ते ज्याचे त्याने ठरवावे असे मी म्हणेन.
नानांची बाजू ऐकल्यावर मी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखिल केला नाही कारण ते लोकं त्यांच्या जागी बरोबर होते .
फक्त मला असे वाटते अशा नाना /नानींना समजून घ्या. त्यांना व्यक्त होऊ द्या, लहान मुलांची समजूत काढताना जसा पेशन्स ठेवून मध्यम मार्ग आपण काढतो तसाच मार्ग, तसाच पेशन्स ह्यांच्या बाबतीतही ठेवण्याचा प्रयत्न करा. हे लिहीत असताना मला 'पिकू' सिनेमातील अमिताभजींनी साकारलेली बॅनर्जी ची भूमिका आठवली.
काही शारीरिक अवरोध हे मानसिक अवरोधांमुळे देखिल असतात, ते दूर करण्याचा प्रयत्न करता आला तर करावा. कारण नानांच्या भाषेत, "पिकलं पान कधीही गळून पडेल पण त्याचे गळणे देखिल समाधानाने असावे"
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा