निनाद आजगांवकर कोहिनूर हॉस्पिटलच्या पायर्या चढत होता. कोहिनूर हॉस्पिटलमधील डॉ. अंजली या दुपारी १२ वाजता फक्त चार मेडिकल रिप्रेझेटेंटीव्हना भेटत होत्या. निनादने पंधरा दिवसापूर्वी बाहेरच्या रिसेपशनिस्टकडे आपले नाव दिले होते. कोहिनूर हॉस्पिटल हे या शहरातील प्रसिध्द हॉस्पिटल आहे. डॉ. विजय पाटील आणि डॉ.सौ. स्नेहलता पाटील यांचे हॉस्पिटल गेली ३० वर्षे या शहरात सेवा देत आहे. ३० वर्षापूर्वी डॉ. विजय पाटील हे स्त्रीरोग तज्ञ आणि डॉ.सौ. स्नेहलता पाटील या बालविकार तज्ज्ञ म्हणून या शहरात आले. सुरुवातीला फक्त कन्सलटिंग करणार्या पाटील दाम्पत्याने नंतर शहारात जागा घेऊन हॉस्पिटल बांधले. गेल्या ३० वर्षात या हॉस्पिटलची खूप प्रगती झाली. हॉस्पिटलवर अजून मजले चढवले गेले. तसेच आजूबाजूची जमीन खरेदी करुन हॉस्पिटलची शाखा काढण्यात आली. सर्व अत्याधुनिक मशिनरी, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, लॅबोरटरी, मेडिकल शॉप, अॅम्ब्युलन्स यांनी हॉस्पिटल परिपूर्ण झाले. डॉ. अंजली या पाटील दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या. अंजली ही लहानपणापासून अत्यंत हुशार. तिने पुण्यात बी.जे. मेडिकलमधून एम.बी.बी.एस. केले. आणि नंतर एम.डी. (स्त्रीरोग) ह्या पदव्या घेतल्या. त्यानंतर गेली ५ वर्षे या आपल्या घरच्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात. डॉ. अंजली या ३२ वर्षाच्या असून अविवाहित आहेत. डॉ. अंजली या पुण्यासारख्या शहरात बरीच वर्षे राहिल्याने त्यांचे विचार आईवडिलांपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्याकडे गरिबांसाठी कळवळा आहे. ज्यांची ऐपत नाही त्यांना कमीत कमी खर्चात उपचार मिळायला हवेत यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.
निनाद आजगांवकर हा मूळ मुंबईचा मुलगा एका प्रतिथयश औषध कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काम करत आहे. याआधी तो संघाचा कार्यकर्ता म्हणून नागालँडमध्ये काम करत होता. त्या कामात तो रमला होता. कदाचित आयुष्यभर त्याने ते काम आवडीने केले असते. पण तीन वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याच्यावर आईची जबाबदारी आली. मग तो मुंबईत आला आणि बी.फार्म. शिकला असल्यामुळे या औषध कंपनीत त्याला नोकरी मिळाली आणि महाराष्ट्रातील या शहरात तो आईसह आला. एका भाड्याच्या घरात तो राहतो आहे. मूळचाच हुशार असल्याने त्याचे त्या कंपनीत चांगले काम आहे.
निनादने वेटिंग हॉलमध्ये पाहिले. त्याच्या बरोबरीने अजून ३ वेगवेगळ्या कंपन्यांचे एम.आर. आले होते. सर्वजण त्याच्या ओळखीचे असल्याने त्याने हाय, हॅलो केले. बाहेरच्या मुलीने चौघांची कार्डे घेतली आणि आत डॉ. अंजलीच्या टेबलवर ठेवली. एक एक एम.आर. आत जाऊ लागला. आज निनाद थोडा चिडलेला होता. त्याला डॉ. अंजलीबरोबर सविस्तर बोलायचे होते म्हणून तो सर्वात शेवटी आत गेला. त्याने डॉ. अंजलीला गुडमॉर्निंग केले आणि तो मॅडमना म्हणाला,
‘‘मॅडम, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. विचारु का?’’
डॉ. अंजली - विचारा
निनाद - ‘‘मॅडम, मी तुम्हाला गेली ३ वर्षे नियमित भेटतो आहे. माझ्या कंपनीच्या प्रॉडक्टस बद्दल तुम्ही उत्सुकता दाखवता, आमच्या आर्यन कॅप्सुल्सचे दर सर्वात कमी आहेत हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. आमची कंपनी ही भारतातील नामवंत कंपनी आहे. असे असताना तुम्ही आमचे प्रॉडक्टस का लिहित नाहीत.’’
डॉ. अंजली - तुम्ही असे मला डायरेक्ट विचारण्याआधी केमिस्टकडे चौकशी करायला हवी होती.
निनाद - कसली चौकशी ?
डॉ. अंजली - तुमची औषधे उपलब्ध असतात का नाही याची.
निनाद - मॅडम, आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टस शहरातील सर्व केमिस्टकडे उपलब्ध आहेत. फक्त....
डॉ. अंजली - फक्त काय?
निनाद - फक्त या हॉस्पिटलच्या केमिस्टकडे ते उपलब्ध नाहीत.
डॉ. अंजली - तुम्हाला माहिती आहेच की या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स जे प्रिस्क्रीप्शन लिहितात ते आमच्या हॉस्पिटलमधील केमिस्टकडेच जाते. आमच्या हॉस्पिटलचा तसा नियम आहे. आम्ही पेशंटना सक्त ताकीद दिलेली असते, औषधांची खरेदी आमच्या केमिस्टकडेच करायची. कारण बाहेरुन औषधे आणली तर बाहेरचे केमिस्ट दुसरीच औषधे देऊ शकतात.
निनाद - सॉरी डॉक्टर, पण तुमचा गैरसमज झालाय. एकवेळ बाहेरचे केमिस्ट तुम्ही लिहिलेली औषधे बरोबर देतील, पण तसे तुमच्या हॉस्पिटलमधील केमिस्टबद्दल सांगता येणार नाही.
डॉ. अंजली - सांभाळून बोला मिस्टर.
निनाद - मॅडम, तुमची परवानगी घेऊनच हा विषय तुमच्याशी बोलतोय. राग नसावा.
डॉ. अंजली - ओके. मी तुमचे दोन प्रॉडक्टस लिहिले होते. परंतु आमच्या केमिस्टनी फोन करुन सांगितले, हे उपलब्ध नाहीत. दुसरी औषधे लिहा.
निनाद - का उपलब्ध नाहीत हे तुम्ही विचारले नसेल.
डॉ. अंजली - एवढा वेळ मला नसतो. पेशंट तपासायचे असतात, ऑपरेशन्स असतात आणि त्या टाईपचे दुसरे औषध मिळत असेल तर मी गप्प राहते.
निनाद - या बाबतीत मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुमच्या वडिलांना किंवा आईला हे बोलून उपयोगाचे नाही. कारण त्यांना सर्व माहिती आहे. किंवा या दोन सिनिअर डॉक्टरांच्या परवानगीने हे सर्व सुरु आहे. पण तुमच्याबद्दल आशा आहे. तुमच्या या केबिनमध्ये तुम्ही साने गुरुजींचा फोटो लावलाय.
डॉ. अंजली - होय. माझे आदरस्थान आहेत साने गुरुजी. पुण्यात असताना डॉ. अनिल अवचट यांच्या शिबिरात मी जॉईन झाले होते. त्यांचे समाजासाठीचे काम बघून मी नतमस्तक झाले. आम्ही कॉलेजमधील मित्रमंडळी आनंदवन मध्ये डॉ. बाबा आमटेंकडच्या शिबिरात सामिल झालो होतो. डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांचे काम पाहिले. त्यामुळे ज्यांची ऐपत नाही अशा पेशंटचे पैसे मी घेत नाही. ऑपरेशनमध्येपण त्यांना मी सवलत देते.
निनाद - मॅडम, मला आपले कौतुक आहे. परंतु तुमच्या हॉस्पिटलमधील फार्मसीमध्ये ठरवीक कंपन्यांची औषधे का मिळतात? माझ्या कंपनीसारख्या अनेक कंपन्यांची औषधे का मिळत नाहीत? याची आपण चौकशी केली नसेल.
डॉ. अंजली - खरचं सांगते. मी फार्मसीच्या व्यवहारात लक्ष घालत नाही. किंवा खरतर मी आमच्या हॉस्पिटलच्या व्यवहारातपण लक्ष घालत नाही. आईबाबा सर्व पाहत असतात. बाबा म्हणतात, यात लक्ष घाल. तू एकच मुलगी आमची म्हणून तुलाच हे पहायचे आहे. पण का कोण जाणे पैशाच्या व्यवहारापासून मी अलिप्त असते. त्यापेक्षा माझे पेशंट, त्यांना कमीत कमी खर्चात कसे बरे करता येईल हे मी पाहते. पण तुमची औषधे आमच्या फार्मसीमध्ये का मिळत नाहीत?
निनाद - ते तुमच्या फार्मसीमधील केमिस्टना विचारा.
डॉ. अंजलीने केमिस्टला फोन करुन केबिनमध्ये बोलावून घेतले. दोन मिनिटात केमिस्ट हजर झाला.
डॉ. अंजली - सातपुते, मला सांगा हे आजगांवकर म्हणत आहेत की, आपल्या फार्मसीमध्ये ठरावीक कंपन्यांचीच औषधे उपलब्ध असतात. या आजगांवकराच्या कंपनीची औषधे मी लिहिते, पण तुम्ही दुसर्याच कंपनीची औषधे देता असे का?
सातपुते - मॅडम, सरांची तशी ऑर्डर आहे. ते सांगतील त्याच कंपनीची औषधे आम्ही ठेवतो.
डॉ. अंजली - अहो, पण अनेक कंपन्यांची औषधे मी लिहिते ती मिळत नाहीत. काय चाल्लय हे?
सातपुते - ते आपण सरांना विचारा मॅडम. मी नोकर माणूस.
डॉ. अंजली - ठीक आहे सातपुते. तुम्ही या. आजगांवकर, आज शुक्रवार आहे. मला पप्पांशी या बाबत सविस्तर बोलावे लागेल. आज उद्या जमणार नाही कारण आज पप्पांची ऑपरेशन्स आहेत. उद्या सकाळपासून माझी आहेत. आम्ही तिघे एका घरात राहत असलो तरी आमची व्यवस्थित भेट रविवारी होत असते. रविवारी सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी आम्ही तिघे व्यवस्थित भेटतो. त्यावेळी आम्ही रोजच्या कटकटीपासून रिलॅक्स असतो. अनेक विषयांवर गप्पा होतात. मग कुठे जायचे असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर ते सर्व रविवारी. तेव्हा आजगांवकर तुम्ही रविवारी सकाळी ८ वाजता आमच्या घरी या.
निनाद - मॅडम, मी तुमच्या घरी ? मला असे मोठ्या माणसांकडे नाश्त्याला, जेवणाला जायची सवय नाही.
डॉ. अंजली - तुम्ही कसलीच काळजी करु नका. रविवारी आम्ही आमच्या डिग्री, व्यवसाय, मोठेपणा विसरलेलो असतो. त्यादिवशी सर्वसाधारण पाटील कुटुंबीय असतो. तुमचा मोबाईल नंबर या कार्डावर आहे ना?
अस म्हणून डॉ. अंजलीने निनादचा फोन त्याच्या कार्डावरुन सेव्ह केला.
डॉ. अंजली - तुम्ही रविवारी आमच्या सदाशिव नगरमधील घरी या. सकाळी ८ वाजता. मी वाट पाहते.
निनाद ओके म्हणून उठला.
रविवारी सकाळी ८ वाजता निनाद डॉ. पाटील यांच्या सदाशिव नगर मधील घरी पोहोचला. काल रात्रौ डॉ. अंजलीने स्वतः फोन करुन रविवारी सकाळी ८ वाजता येण्याची आठवण केली. तसेच व्हॉटस्अॅपवर लोकेशन मॅप पाठविला. निनादला डॉ. अंजलीचे कौतुक वाटले. श्रीमंत आणि खूप शिकलेल्या मुलींमध्ये जो अहंगंड असतो तो या मुलीमध्ये अजिबात नाही. पुण्याच्या शिक्षण काळात तिच्यावर झालेले संस्कार हे कारण असेल कदाचित. डॉ. पाटील यांच्या घरी मोठं दगडी कंपाऊंड त्यावर आकर्षक वेल सोडलेले, मोठ्ठे लोखंडी गेट उघडून व्यवस्थित कापलेल्या फुलांच्या ताटव्यामधून असलेल्या वाटेने निनाद आत गेला. मोठ्ठा बंगला समोर दिसत होता. समोरील सुंदर बाग आणि हिरवेगार लॉन. निनाद त्या लॉनवरुन चालत बंगल्याच्या दिशेने जाऊ लागला. एवढ्यात त्याचे लक्ष गेले. कोपर्यात एक टेबल लावले होते आणि सभोवती पाच खुर्च्या. एका बाजूला कॉफी मशिन आणि छोट्या गॅसवर एक जीन्स आणि टॉप घातलेली तरुणी पॅनवर काहीतरी पदार्थ करत होती. आपण नेमके कुठे जावे बंगल्यात की बागेतील खुर्चीत बसावे असा विचार करत असताना त्या तरुणीने मोकळे सोडलेले केस झटकले आणि तिने मागे पाहिले. निनादला पाहताच गुडमॉर्निंग आजगांवकर असे म्हणताच, निनाद आश्चर्यचकित झाला. ती तरुणी डॉ. अंजली होती. हॉस्पिटलमध्ये अंजली नेहमी सुती साड्या आणि लांब कोपरापर्यंत ब्लाऊज अशा वेशात असायची. आजच्या या वेशात ती खूपच तरुण आणि आकर्षक दिसत होती. तो पटकन म्हणाला, गुडमॉर्निंग डॉक्टर. ‘‘नाही नाही, रविवारी आम्ही कुटुंबीय डॉक्टर नसतो. रोजच्या व्यापातून वेगळे होण्यासाठी हा रविवार असतो. आज मी फक्त अंजली. या दिवशी आम्ही तिघे भरपूर गप्पा मारतो. रोज आम्ही तिघेजण एवढे घाईत असतो की, एकत्र जेवण किंवा गप्पा शक्यच नसतात. बसा ना. पप्पा एवढ्यात येतील. तो पर्यंत आपण कॉफी घेऊ.’’ तिने कॉफी मशीन मधून कॉफी कपात घेतली आणि एक कप निनादच्या हातात दिला. अंजली पण एका कपातून कॉफी घेऊ लागली.
‘‘कोण कोण असतं घरी तुझ्या?’’
‘‘मी आणि आई’’
‘‘अच्छा! म्हणजे लग्न झालं नाही का?’’
‘‘नाही अजून.’’
का?
नाही कारण असं काही नाही, मी सहा वर्षे संघाचा प्रचारक होतो नागालँडमध्ये. तीन वर्षापूर्वी या लाईनमध्ये आलो.
अरे व्वा ! मी समाजवादी विचारसरणीची असले तरी संघाच्या प्रचारकांबद्दल आदर आहे माझ्या मनात. आणि कौतुकही आहे. मोठे मोठे शिक्षण घेतलेली तरुण-तरुणी आपलं कुटुंब, करिअर सोडून संघ कार्यासाठी झोकून देतात. सोप नाही ते. मग तू या प्रोफेशनमध्ये कसा आलास.
वडील वारले आणि आईची जबाबदारी माझ्यावर आली. तिच्यासाठी पैसे मिळवणं आवश्यक होतं.
बरोबर आहे. ते आवश्यकच आहे. असे अंजली म्हणेपर्यंत डॉक्टर पाटील पती-पत्नी बाहेर आली. त्यांना आदर दाखविण्यासाठी निनाद खुर्चीतून उठला. डॉ. पाटील यांनी त्याला पाहिले. ते म्हणाले -
‘‘अरे बस बस, रविवार आम्ही कोण डॉक्टरवगैरे नसतो. आमच्याकडे जो येतो तो आमचा पाहुणा. पण मी तुला ओळखलं नाही.’’
‘‘पप्पा, हा निनाद आजगांवकर. एम.आर. आहे. मला हॉस्पिटलमध्ये नेहमी भेटतो.’’
‘‘अरे व्वा ! आजगांवकर. मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह हा मेडिकल प्रोफेशनमधील महत्त्वाचा घटक आहे. तो औषध कंपन्या आणि डॉक्टर्स यामधील दुवा असतो. त्याच्याकडून औषध कंपनीमध्ये नवीन काय तसेच औषधांमधील नवीन नवीन शोध समजतात. नाहीतर मेडिकल जर्नल्स वाचतय कोण?’’
‘‘पण पप्पा, आज मी निनादला मुद्दाम बोलावलयं. त्याच्यापण काही तक्रारी आहेत.’’
एवढ्यात गॅसजवळ जाऊन पॅनवर डोसे करणार्या मिसेस पाटील पटकन म्हणाल्या, डॉक्टरांबद्दल खूपच तक्रारी असतात समाजात. आम्हाला पण आवडेल अशा तक्रारी समजल्यावर.
तसं नाही आई. याची तक्रार आहे की, याच्या सारख्या अनेक औषध कंपन्यांचे प्रॉडक्टस् आपल्या हॉस्पिटलमधील केमिस्टकडे उपलब्ध नसतात याबाबत.
अग मग ते सातपुतेंच्या कानावर घालायला हवं. मी लिहिलेली कित्येक औषधे ते बदलून देतात. मी आपलाच केमिस्ट म्हणून गप्प बसते.
अग आई, मी सातपुतेंना विचारलं त्याबद्दल. त्यांचे म्हणणे, डॉक्टर साहेबांनी सांगितले त्याच कंपन्यांची औषधे ठेवतो आपण. तुम्ही काहीही प्रॉडक्ट लिहिला तरी आमच्याकडील कंपन्यांची औषधे देतो त्याबद्दल. पप्पा ! हे काय चालले आहे? परवा हा निनाद माझ्याशी वाद घालू लागला. तो मला दर महिन्याला नियमित भेटतो. त्याचे प्रॉडक्टस् खरोखरच चांगले आहेत, काही प्रॉडक्टस् रिसर्च आहेत, दर सर्वांपेक्षा कमी आहेत. असे असून मी का लिहीत नाही म्हणून. त्याचे बरोबर आहे. मी त्याला म्हटले, मी त्याच्या कंपनीचे प्रॉडक्टस् लिहिते पण ते उपलब्ध नसतात. म्हणून सातपुतेंना बोलावले तेव्हा ते म्हणाले, डॉक्टर साहेब सांगतात त्याच कंपनीची औषधे आम्ही ठेवतो. असं का होतं?
डॉ. पाटील - अंजली आम्हा डॉक्टर्स लोकांचा एक ग्रुप आहे. ग्रुपमधील काही डॉक्टर्स भारतातील एका राज्यात ही औषधे बनवून घेतात. त्या राज्यात टॅक्स कमी आहे. त्याचे १०-१५ टक्के वाचतात. शिवाय मार्वेâटिंग वगैरे काही नसल्यामुळे त्याचे जवळ जवळ २० टक्के वाचतात.
निनाद - आणि ते २० टक्के तुम्हा डॉक्टर्समध्ये वाटतात हे खरे ना?
डॉ. पाटील - खरे आहे. आपण जी औषधे वापरतो त्यातील ७० टक्के औषधे वारंवार आणि सतत लागणारी असतात. अशी औषधे या कंपन्या बनवतात.
निनाद - डॉक्टर साहेब, आता मी बोलतो. या कंपन्या रॉ मटेरियल बी ग्रेड मॅन्युफॅक्चरर्स कडून खरेदी करतात. कदाचित त्यात भेसळ असू शकेल अशा मॅन्युफॅक्चरर्स कडून.
अंजली - पप्पा, हे भयानक आहे. पेशंट बिचारे पैसे देऊन औषधे खरेदी करतात. कारण डॉक्टर्स ते लिहितात म्हणून. सामान्य जनता डॉक्टर्सना देव मानते आणि तो देव पैशासाठी पेशंटच्या जीवावर खेळतो?
डॉ. पाटील - पण आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला औषधामुळे त्रास झालेला नाही.
डॉ. मिसेस पाटील - नाही कसा ? हल्ली जो लहान मुलांचा डायरिया आलाय तो आपल्या हॉस्पिटलमधील औषधांनी बराच होत नाही. मग त्या मुलांना अॅडमिट कराव लागतं. सलाईनमधून औषधं सोडून मुलं कसबसं बर होतं. मला फार टेंशन येतं.
निनाद - म्हणजे, स्टँडर्ड कंपनीच्या एका बाटलीत म्हणजे साधारण ८० रुपयाच्या औषधाने जे बाळ बर होणार असतं त्याला सात आठ हजार रुपये विनाकारण खर्च होतात.
अंजली - माझ्या पण लक्षात येत. माझ्या स्त्री पेशंटना मी अॅनिमियासाठी जे आर्यन गोळ्या लिहून देते त्याने त्यांच हिमोग्लोबीन समाधानकारक वाढत नाही. मला वाटत की ह्या बायका औषधाचा कोर्स व्यवस्थित करत नाहीत म्हणून त्यांना मी बोलते. पप्पा, हे बंद करता येत नाही का?
डॉ. पाटील - अंजली, कस असतं, आपण डॉक्टर्स लोक एकमेकांवर अवलंबून असतो. या शहरातील आणि लहान गावातील अनेक डॉक्टर्स आपल्याकडे पेशंट पाठवत असतात. त्यामुळे या डॉक्टर्सना आपण दुखवू शकत नाही. त्यांच्या बरोबरच रहावं लागतं.
अंजली - पप्पा, आपल्या हॉस्पिटलला ३० वर्षे झाली, या जिल्ह्यात स्त्रियांच्या आजाराबाबत नंबर १ च हॉस्पिटल आहे. शिवाय लहान मुलांसाठी आईचे हॉस्पिटल आहे. मी गेली ५ वर्षे इथे पेशंट तपासते. आता आपल्याला झेपत नाहीत एवढी ऑपरेशन्स करतो आपण. सायंकाळी तुम्ही थकून जाता. जेवणाच्या वेळा पाळता येत नाहीत. कशाला हवेत अजून पेशंट. स्व-इच्छेने येतील तेवढे बस. इतर नवीन डॉक्टर्स आलेत त्यांच्याकडे जातील पेशंट.
डॉ. पाटील - अग हॉस्पिटलचा खर्चही प्रचंड असतो. एवढ्या स्टाफचे पगार, मेन्टेनन्स.
अंजली - मला कल्पना आहे त्याची. मी आजच फार्मसीकडे पाहते. आजपासून स्टॅण्डर्ड कंपन्यांची औषधे आपण वापरणार.
डॉ. अंजलीने दुसर्याच दिवशी हॉस्पिटलमधील फार्मसी मध्ये जाऊन औषधे चेक केली. सातपुतेंना सांगून चांगल्या कंपन्याची औषधे, सलाईन्स ठेवायला लावली. कित्येक कंपन्यांची औषधे या फार्मसीमध्ये मिळायची नाहीत त्या सर्व कंपन्यांनी डॉ. अंजलीचे आणि त्याकरिता धडपडणार्या निनादचे आभार मानले.
अंजली निनादला म्हणाली, आपल्या हॉस्पिटलमधून सुरुवात झाली हे खरे पण हे पुरेसे नाही. आपण या शहरात आणि जिल्ह्यात अजून प्रयत्न करु. निनादने अंजलीच्या निदर्शनास आणले की, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने २००२ साली व्यवसाय निष्ठा, शिष्ठाचार व नैतिक बंधने या अंतर्गत व्यक्तिगत डॉक्टरांवर कोणत्याही औषध कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचा लाभ व लाच घेण्यास प्रतिबंध केला आहे. असे केल्याचे लक्षात आल्यास त्या डॉक्टरांचा परवाना रद्द होऊ शकतो. असा प्रतिबंध असूनही अनेक फार्मा कंपन्या डॉक्टरना प्रलोभने दाखवतात आणि काही डॉक्टर्स प्रलोभने स्वीकारतात.
अंजली निनादला म्हणाली, मी डॉक्टर्स असोसिएशनची मेंबर असून या असोसिएशन तर्पेâ पहिल्यांदा या शहरातील डॉक्टर्सना आमंत्रित करते. मात्र तू माझ्या मदतीला हवास किंबहुना तू या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घे. निनाद ने आनंदाने जबाबदारी स्वीकारली. डॉक्टर्स असोसिएशन तर्पेâ एका सायंकाळी एका हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला. डॉक्टर अजंलीने प्रत्येक डॉक्टरने इथिकल प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे हे पटवून दिले. एकेकाळी डॉक्टरला देव मानले जाते होते. परंतु आता समाजात जागृती झाली आहे की, डॉक्टर पैशांच्या मागे लागून गरज नसलेल्या तपासण्या आणि गरज नसलेली औषधे पेशंटच्या माथी मारत आहेत. काही कंपन्या आपली दर्जाहिन औषधे डॉक्टर्सनी लिहावीत म्हणून डॉक्टर्सना कमिशन देत आहेत. आणि डॉक्टर्स ती कमिशने आणि भेटवस्तू यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, कार, फॉरेन ट्रीप, गोल्डन कॉईन्स आणि पैसे इत्यादी स्वीकारुन दर्जाहिन औषधे लिहीत आहेत. या संबंधी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ने डॉक्टर्सवर कडक बंधने घालूनही आपल्यातील काही डॉक्टर्स त्याचे उल्लंघन करीत आहेत. तेव्हा पेशंटच्या मनातून डॉक्टरने उतरण्यापूर्वी आणि कायदेशीर कारवाई होऊन परवाना रद्द होण्याआधी आपण पेशंटच्या हितासाठी सर्व काही करण्याची गरज आहे. डॉ. अंजलीच्या बोलण्याचा बराच परिणाम झाला. काही डॉक्टर्स जे औषध कंपन्यांकडून कमिशने किंवा भेटवस्तू स्वीकारत होते ते बंद झालं.
डॉ. अंजलीने मग मेडिकल जर्नल्स मधून हा विषय पोटतिडकीने मांडायला सुरुवात केली. ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन जर्नल्सच्या संपादिका डॉ. शीला मेहता यांनी तिचे कौतुक केले. हा विषय भारतभर गाजला. अनेक वृत्तपत्रात, टि.व्ही. चॅनेल्सवर याबाबत चर्चा घडल्या. कलकत्त्याच्या खासदार डॉ. बॅनर्जी यांनी राज्यसभेत हा प्रश्न विचारला. अनेक खासदारांनी या चर्चेत भाग घेतला. आरोग्य मंत्र्यांनी याची नोंद घेतली आणि सरकार याबाबत कडक कायदे करील असे आश्वासन दिले. डॉ. अंजलीची अनेक चॅनेल्सनी मुलाखती घेतल्या. त्यामुळे घराघरात या विषयी जागृती झाली.
अंजलीला माहीत होत की आपण एवढा लढा लढू शकलो कारण निनाद सोबत होता. निनाद भेटला नसता तर तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि एकंदर डॉक्टर व्यवसायात काय चाललय याची कल्पनापण नसती. हल्ली वेळ मिळेल तेव्हा अंजली निनादच्या घरी जाऊ लागली होती. जन्मापासून अंजलीने श्रीमंतीच पाहिली. घरी, मामाकडे, मावशीकडे मोठे मोठे बंगले, गाड्या, नोकरचाकर. निनादच्या घरी तिने मध्यमवर्गीय राहणीमान पाहिले. निनादची आई करायची ते मालवणी जेवण तिला आवडू लागले. कुळीथाची पिठी, काळ्या वाटाण्याची उसळ, तांदळाच्या शेवया, मालवणी मसाला घालून केलेले माशाचे कालवण तिला फार आवडायचे.
खूप वर्षांनी अंजलीला लग्नाची ओढ लागू लागली. कॉलेजकाळात उमेश बरोबर प्रेम केलं. लग्नाच्या आणाभाका घेतल्या पण एमबीबीएस झाल्यानंतर वरच्या जातीच्या उमेशला आईवडीलांनी आपल्यासोबत लग्नाला कडकडून विरोध केला. आणि केवळ परजातीतील म्हणून अंजलीला स्वीकारले नाही. उमेशचे त्याच्याच जातीतील मुलीशी लग्न लावून टाकले. ती भळभळती जखम सांभाळत अंजली एवढी वर्षे राहिली. आईबाबांनी अनेक डॉक्टर्सची स्थळे सुचविली. पण अंजलीने इंटरेस्ट दाखविला नाही. कोणी मनासारखे मिळेपर्यंत ती लग्न करणार नव्हती. गेली सहा महिने निनादचा सहवास मिळाला. निनाद तिच्या मानाने कमी शिकलेला, मध्यमवर्गीय असला तरी त्याचा ती फारसा विचार करत नव्हती. त्याच्यातील धडाडी, स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकता आणि राष्ट्रप्रेम तिला आकर्षित करत होतं. हे असलं तरी निनादच्या मनाचा ठाव तिला लागत नव्हता. परंतु आत निनाद समोर आपलं मन मोकळ करायचं तिने ठरवलं.
दसर्याच्या दिवशी सायंकाळी सोनं देण्याच्या निमित्ताने अंजली निनादच्या घरी गेली. निनादला आणि निनादच्या आईला तिनं सोनं दिलं. निनादच्या आईने तिच्या घरची सर्व चौकशी केली. आईबाबांची चौकशी केली. त्यावर अंजली उद्गारली, ‘‘आईबाबा बरे आहेत. त्यांचं नेहमीप्रमाणे चाल्लयं... रोजचे पेशंट, ऑपरेशन्स चालू आहेत. पण हल्ली आई माझ्यामागे लग्नासाठी लागलीय. कुठली कुठली स्थळं मला आणून दाखवत असते.
अगं बरोबर, मुलीच्या लग्नाची काळजी आईवडिलांना असणारचं. आता वेळ काढू नकोस बाई. कुठ काही ठरलयं का? - आई म्हणाली.
खरं सांगायला हरकत नाही, पण कॉलेजच्या काळात म्हणजे सात वर्षापूर्वी मी वर्गातील एका मुलाच्या प्रेमात होते. आम्ही खूप स्वप्ने बघितली होती. कॉलेज काळात आम्ही सतत सोबत असायचो. तो फिजीशिएन होणार होता आणि मी गायनॉकॉलॉजिस्ट होणार होते. परंतु त्याचे आईवडील फार कर्मठ होते. वर्गातील कुणीतरी मुलाने आमच्या मैत्री विषयी त्याच्या आईवडिलांकडे चुगली केली. आणि त्याच्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर तो गेला नाही. आणि नात्यातल्या आणि जातीतल्या मुलीशी लग्न करुन मोकळा झाला. खरंतर मी उद्ध्वस्त झाले. काही काळ झोपेच्या गोळ्यापण घेत होते. पण नंतर आईबाबांचा विचार आला आणि मी सावरले. व्यवस्थित अभ्यास केला. एम.डी. झाले. अनेक डॉक्टर्सनी माझ्याशी लग्न करायची तयारी दाखविली. पण खर सांगू मला कुणातच इंटरेस्ट वाटला नाही. एकदा मन पोळलं होतं त्यामुळे लग्न करायचच नाही असं ठरवलं होत पण....
पण काय गं? आई म्हणाली.
‘‘गेल्या सहा महिन्यापासून पुन्हा माझ्या जीवनात हिरवळ आल्यासारखी वाटू लागलय. मी चक्क प्रेमात पडलेय. फक्त माझ्या प्रियकराच्या मनातले निश्चित काही कळत नाहीय. त्याला मला आता विचारायचे आहे.
अंग मग त्याला विचार, वेळ कशाला काढतेस? कुठे असतो तो? - आई म्हणाली.
हा काय माझ्या समोरच बसलाय. निनादकडे बोट दाखवून अंजली म्हणाली.
कोण मी? छे ! छे ! निनाद उडालाच.
निनाद, मला कल्पना आहे, तू तुझ शिक्षण, माझं शिक्षण किंवा श्रीमंती गरिबी असा विचार करत असशील तर तुला माहिती आहे इतर मुलींसारखी मी नाही. गेल्या सहा महिन्यापासून तू मला जवळून पाहतो आहेस. दोघांची मन जुळावी लागतात रे.’’
अंजली, आपल्यात शिक्षण, श्रीमंती यात मोठा फरक आहे हे खरेच पण याबद्दल मला काही फरक पडला नसता. तुझ्यासारखी उच्चशिक्षित, श्रीमंत मुलीचे पाय किती जमिनीवर आहेत हे मी पाहतोय. तू किती साधी सरळ मुलगी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या आईला पण तू फार आवडतेस हे मला माहिती आहे. पण अंजली मॅडम मी संघाचा कार्यकर्ता आहे. ५ वर्षे नागालँडमध्ये आदिवासी भागातील काम अर्धवट ठेवून मी आलो आहे माझ्या आईसाठी. ज्या दिवशी माझ्या आईचा हात माझ्या हातातून सुटेल त्या दिवशी मी माझे अर्धवट काम पुरे करण्यासाठी जाईन. मॅडम, तुम्ही पुढे केलेला हात न स्वीकारणारा मी करंटा असेन कदाचित. पण सॉरी मॅडम... आम्ही कार्यकर्ते वेडे असतो. आमची आयुष्य आम्ही संघटनेसाठी दिलेले असते. आमची संघटना सांगेल तेथे आम्ही काम करतो. अशा वेळी कुठलेही पाश आमच्याभोवती नको असतात. सॉरी मॅडम...
खोलीत शांतता पसरली. फक्त तिघांचे निःश्वास ऐकू येत होते. आईचे, अंजलीचे डोळे भरुन आले होते. दोन मिनिटं त्या खोलीत स्तब्धता पसरली. मग ‘‘येते’’ म्हणत अंजली बाहेर पडली. अंजली गेलेल्या दिशेकडे आई शून्य नजरेने पाहत राहिली.
प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९