मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

1100. बावनकशी

      कुणाल आणि दिव्या कॅफेमधे बसून एकमेकाच्या मनात डोकावून बघण्याच्या प्रयत्नात होते. भेटून वर्ष झालं होतं. दोघे एकमेकाला अनुरूप होते. आता पुढं जायचं का नाही हा निर्णय घेण्याची वेळ आली होती. कुणाल निष्णात वकील होता. दिव्यानं संस्कृत मध्ये डॉक्टरेट मिळवली होती. खरतर पूर्वीचा काळ असता तर लग्न देखील उरकून गेलं असतं. पण सर्व काही मनासारखं हवं या आजच्या जमान्यात कुठेतरी काहीतरी कमी पडत होतं. पांढऱ्या शुभ्र कपात आलेल्या कॅपचिनोमधील क्रिम फोमच्या हार्टकडे बघत दिव्यानं थेट मुद्द्याला हात घातला,
”कुणाल, तू ड्रिंक्स घेतोस?” 
कुणाल म्हणाला, "हो.कधीतरी. काही स्पेशल कारण असल्यास घेतो."  
दिव्याचा चेहरा बदलला. तिला कधीही मद्यपान न करणारा मुलगा नवरा म्हणून हवा होता. ऑकेजनली घेतो म्हणणाऱ्यांचे काही कळत नाही. आनंद झाला की ड्रिंक! दु:ख झालं की तर देवदास बनायला वेळ लागत नाही. कधी पीअर प्रेशर म्हणून ड्रिंक तर कधी नवीन वर्षात कोरडे कसं जायचं म्हणून ड्रिंक! ही कधीपासून झाली आपली संस्कृती? कुणालला दिव्या खूप आवडली होती पण ड्रिंक्सच्या बाबतीत ती पराचा कावळा करत आहे अस त्याला वाटत होत. ड्रिंक्स घेण्याची अनेक कारणं त्याच्याकडे होती पण आता ही टोकाची भूमिका घेणारी सोळाव्या शतकातील मुलगी ते ऐकून घेण्यास तयार नव्हती! 
“No drinks means no drinks, Kunal! माझी काही प्रिन्सिपल्स आहेत. Occasionally पण चालणार नाही. तुला हे पटत असेल तरच आपण पुढे जाऊ.” ती म्हणाली. 
“अग मग कॅपचिनो का पितेस? चहा का पितेस? चहा कॉफी घेणं उचित हे कुणी ठरवलं?” कुणाल मधला वकील जागा झाला होता. 
“चहा-कॅाफीनं झिंग येत नाही, कुणाल! तोल जात नाही.” ती म्हणाली. 
कुणालला अनेक युक्तिवाद सुचले होते पण इथे पालथ्या घड्यावर पाणी म्हणून तो काही बोलला नाही. कॅफेमधून निराश होऊन तो बाहेर पडला. एवढी हट्टी मुलगी बायको म्हणून नकोच आहे अशी त्यानं स्वत:ची समजूत काढली खरी.. पण तिचे काळेभोर बोलके डोळे, वेगळे विचार, आणि ते तेजस्वी व्यक्तीमत्व त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हतं. 
दुसरे दिवशी कुणाल गोखले सरांना भेटायला गेला. कॅालेजमधे केमिस्ट्री शिकवणाऱ्या गोखले सरांचा गाढा व्यासंग होता. सर केवळ केमिकल रिॲक्शन्स  शिकवून कधीच थांबले नाहीत.  विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील रिॲक्शन्सचा कसा कुठे समतोल साधायचा हे पण शिकवत असत. सर दिसताच त्याला आधार वाटला. त्याने सरांना दिव्याबद्दल सांगितलं. तिला सरच पटवून देऊ शकतील की कोणतीही गोष्ट in moderation केली तर काही बिघडत नाही. सर हसून म्हणाले, “कुणाल, मी आधी तुझ्याशी बोलेन. मद्य म्हणजे झिंग आणणारं पेय. एथिल अल्कोहोल ज्या पेयात असत त्या पेयांना मद्य म्हणतात. तू आता सायंटिफिकली विचार कर. शर्करायुक्त किंवा पिष्टमय पदार्थ आंबवून मद्य बनवले जाते. यात प्रथिने नाहीत, फॅटस् नाहीत, व तांत्रिक दृष्टया कर्बोदके पण नाहीत. म्हणजे याचे पौष्टिक मूल्य शून्य आहे. वजन वाढीसाठी भरमसाठ कॅलरीज मात्र आहेत. सरांनी फळ्यावर चित्र काढून Fermentation नंतर इतर कोणती केमिकल्स कोणत्या मद्यप्रकारात कशी घातली जातात, अतिरिक्त कार्बन डाय ॲाक्साईड मुळे वाईन कशी उफाळते वगैरे दाखवलं. सर  म्हणाले,” आता सांग, ही केमिकल्स शरीरात ढकलून काय फायदा आहे? “उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म” शिकलेल्या आम्हाला हल्ली बिअर बेली का असते? बायकाही यात मागे नाहीत. अल्कोहोल मुळे डोपामिन या हार्मोनचा जो हाय जाणवतो तो हाय मोकळ्या हवेत व्यायाम केला तरी जाणवेल with no side effects!
“सर, पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. मिटींग्ज, कॅानफरन्सेस मधे मॅनर्स म्हणून ड्रिंक्स घ्यावी लागतात.” कुणाल म्हणाला. 
“कुणाल मनुस्मृतीने सुरापान करू नये म्हटले आहे. वाल्मिकींनी लिहलय, मद्य सेवनाने धर्म, अर्थ, काम नष्ट पावतात. तुमच्या जगप्रसिद्ध “द लॅन्सेट” या मेडिकल जर्नल मधे म्हटलंय की दारूचा माणसाला काहीही फायदा नाही. नवे संशोधन सांगते की अल्कोहोलमुळे हार्टला अपाय होतो. शिवाय अल्कोहोल २१ प्रकारचे कॅन्सर निर्माण करणारा कार्सिनोजेन आहे. राहता राहिली मॅनर्स ची गोष्ट ! बाहेरच्या चार लोकांना हे मॅनर्स दाखवून खूष करायचं का आपल्या गृहलक्ष्मीच्या विनंतीचा मान राखणं याला मॅनर्स म्हणायचं ते तुझं तू ठरव.” सरांचा चेहरा गंभीर दिसत होता. 
कुणाल थक्क झाला होता. सर थोडाही सपोर्ट करणार नाहीत असे वाटले नव्हते. ते कुणालला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेले. गेली ३४ वर्षे मुक्तांगण ड्रग्ज, दारू, गांजा, इंटरनेट वगैरेंच्या आहारी गेलेल्या रुग्णांना व्यसनमुक्त करण्यासाठी झटत होते. व्यसनाधीनता वाढल्याने स्त्रियांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू झाला होता. सोशल ड्रिंक्स म्हणून सुरू केलं पण व्यसनाधीन कधी झालो कळलेच नाही म्हणणारे कित्येक तरुण/तरुणी तिथं भेटले. अनेक संसार उध्वस्त झाले होते. मद्य हे socially acceptable poison आहे असे तिथले डॅाक्टर म्हणाले. कुणाल अस्वस्थ झाला. 
“दिव्या हे बावनकशी सोनं आहे, कुणाल ! अशा मुली हल्ली भेटत नाहीत. तू नशीबवान आहेस.  I am all for her!” सर म्हणाले. 
संध्याकाळी गोखले सरांकडे कुणाल व दिव्याला भेटायला बोलावलं होतं. त्याप्रमाणे ते आले. काकूंनी गरम पोहे व चहा दिला. दिव्या काकूंना म्हणाली, “काकू, कुणालला चहा न पिणारी मुलगी हवी आहे म्हणून मी चहा सोडला आहे.”
कुणालने घेतलेला चहाचा घोट त्याच्या घशातच अडकला. “अग, मी ते फक्त युक्तीवादासाठी वापरत होतो. तू घे ना चहा ! माझी काहीच हरकत नाही !”
सर गालातल्या गालात हसत कुणाल कडे बघत होते. कुणाल म्हणाला, “दिव्या, मी शपथ घेतो की यापुढे मी एथिल अल्कोहोल युक्त कुठलेही ड्रिंक, मद्य, बिअर, वोडका, जिन, व्हिस्की वगैरेला स्पर्श करणार नाही.” 
दिव्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. सर म्हणाले,” दिव्या, तुझ्या पॅाडकास्ट वर मी गेस्ट म्हणून नक्की येईन. आपल्या देशांतल्या लोकांना मद्यापासून परावृत्त करण्याचा तुझा प्रयत्न कौतुकास्पद आहे.”
दिव्या म्हणाली, "मनु-याज्ञवल्क्य यांनी मद्यपानाबद्दल शिक्षा उगीच का सांगितल्या असतील? युरोप अमेरिकेत हवा थंड म्हणून ड्रिंक्स घेतात ते बरोबर का चूक न बघता त्याची कॉपी करणारा आपला समाज बदललाच पाहिजे. प्रत्येक इंद्रियाचा नाश करणारं हे द्रव्य क्षणिक हाय साठी असलं तरी याचा लो भयानक आहे. आनंदाशी या द्रव्याची सांगड पाश्च्यांत्याकडे बघून घालणं अन् आनंद म्हणजे शॅंपेनची बाटली उघडणं मला मान्य नाही.”
कुणाल आश्चर्याने ऐकत राहिला. सर व काकूंना नमस्कार करून बाहेर पडताच कुणालने खिशातून सोन्याची अंगठी बाहेर काढली. त्यात बसवलेला हिरा सूर्यकिरणात तळपू लागला. तो गुडघ्यावर बसला. तो काही बोलण्यापूर्वी दिव्या म्हणाली,”कुणाल, मी तुझ्याशी लग्न करेन पण या बाहेरच्या देशातल्या रिवाजांची जरूर नाही ! घरच्यांच्या आशीर्वादाने साखरपुडा करू तेव्हाच घाल अंगठी !”
कुणालच्या हातातील सोन्याची अंगठी चमकत होती पण दिव्याच्या चेहऱ्यावरील बावनकशी विचारांची झळाळी अंगठीला मागे टाकत आहे असे त्याला वाटलं. अत्यंत समाधानाने हसत तो दिव्याकडे बघत राहिला !

©® ज्योती रानडे

1099. वर्तुळ

      रघुनाथ रावांना अग्नी देऊन सगळी मंडळी घरी आली. पुरुष मंडळींनी मागे विहिरीवर अंघोळी उरकल्या. महिला मागील बाजूला असलेल्या दोन बाथरूमच्या बाहेर रांगेने थांबल्या. सर्वात आधी राधा आत गेली. राधा म्हणजे प्रसादची बायको. प्रसाद रघुनाथ रावांचा सर्वात मोठा मुलगा. त्याच्या मागे सुरेश आणि मग  किशोरी. किशोरीच्या जन्मानंतर वर्षभरातच तिन्ही पोरांना रघुनाथ रावांच्या सुपूर्त करून आनंदी बाई म्हणजे मुलांच्या आईने क्षय रोग होऊन जगाचा निरोप घेतला. त्या गेल्यावर कोकणातलं ते घर, रघुनाथ राव आणि दोन दोन वर्षांच्या अंतराने झालेली तिन्ही मुलं पोरकी झाली. घरची भरपूर शेती होती. आंब्याची कलम होती. नारळ आणि पोफळीची झाडं होती. घरामागेच मोठी वाडी होती. आनंदी बाई गेल्यावर अनेकांनी रघुनाथ रावांना दुसरं लग्न करायचा सल्ला दिला. तुम्हाला साथीची गरज आहे आणि मुलांना आईची असं लोक म्हणत. पण रघुनाथ रावांना मुलांसाठी सावत्र आई आणण मान्य नव्हतं. त्यांनी स्वतःच मुलांना वाढवायचा निर्णय घेतला. 
      मुलं लहान होती. किशोरी तर अगदी तान्ही होती. रघुनाथ रावांनी आजवर कधी साधा भातही शिजवला नव्हता. पण बायको गेल्यावर काही दिवसातच ते सगळा स्वयंपाक करू लागले होते. घराच्या पुढल्या बाजूलाच किराणा मालाच मोठं दुकान होत त्यांचं. रघुनाथ राव घर, वाडी, मुलं, दुकान सगळं एकट्याने बघू लागले. संध्याकाळ झाली की अगदी दमून जात ते. मग विहिरीवर अंघोळ करून, अंग पुसून, त्यांची खाकी चड्डी घालून उघड्याबंब देहाने त्यांच्या आरामखुर्चीत बसत हातात चहाचा कप घेऊन. वर पंखा फिरत असे. दिवस, महिने आणि वर्ष भुर्र उडून गेली. त्यांनी तिन्ही मुलांना मुंबईला त्यांच्या बहिणीकडे शिकायला पाठवली. दर महिन्याला न चुकता पैसे घेऊन ते मुंबईला जात. बहिणीच्या हातात ती नको नको म्हणत असताना भरपूर पैसे कोंबून "पोरांना काही कमी पडू देऊ नको मालू" इतकं सांगून एक रात्र पोरांबरोबर मालूच्या चाळीच्या गच्चीत झोपून, रात्रभर मुलांचे चेहरे न्याहाळून, त्यांना थोपटून जाग्रणाने लाल झालेल्या डोळ्यांनी पहाटेची बस पकडून कोकणात परत जात. काही वर्षांनी त्यांनी त्यांच्याकडे घरकाम करायला बायजा म्हणून बाई ठेवली होती. घरकामा बरोबरच रघुनाथ राव कधी आजारी पडले तर बायजा त्यांची सेवा करत असे. गावात रघुनाथ राव आणि बायजा बद्दल लोक कुजबुजत असत. पण त्यांच्यात जे काही होतं ते त्या दोघांनाच माहीत होतं. मुलं गावाला राहायला आल्यावर मात्र बायजा कामावर येत नसे. प्रसाद कॉलेजात जायला लागल्यावर त्याने त्याच चाळीत एक खोली भाड्याने घेतली आणि तिघ भावंडं तिथे राहू लागली. गावात रघुनाथराव शेती आणि दुकान चालवून एकटे दिवस काढत होते. मेहेनत करून मुलांना पैसे पाठवत होते. 
     प्रसाद कॉलेज संपल्यावर बँकेची परीक्षा देऊन लगेच स्टेट बँकेत लागला. सुरेशला गाण्याची आवड होती. तो आधी ऑर्केस्ट्रा मध्ये गाऊ लागला आणि पुढे एक यशस्वी पार्श्र्वगायक झाला. किशोरी इंजिनियर झाली. तिचा नवराही इंजिनियर. इंटरकास्ट प्रेम विवाह. प्रसादचा त्याला विरोध होता. पण रघुनाथ रावांनी त्याची समजूत घालून लग्न लावून दिलं. किशोरी आता नवरा आणि दोन मुलांसह अमेरिकेत असते. प्रसादला एक मुलगा एक मुलगी. दोघेही फायनल इयरला. मुलगी अर्पिता पुढल्या शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. प्रसादचा मुलगा आदी म्हणजे तरुण वयातले रघुनाथ राव. दिसणं, विचार , बोलायची लकब सगळं सेम. गणित त्याचा आवडता विषय. गणितातच पुढे मास्टर्स करायला परदेशात जायचा विचार आहे त्याचा. त्याला शेयर बाजाराची प्रचंड आवड आणि त्यात अभ्यास आहे त्याचा. आत्ताच तो शेयर बाजारातून इतके पैसे कमावतो की प्रसादला सांगतो "बाबा व्हीआरएस घेऊन टाका. मी आहे ना!" पण प्रसाद तयार नाही.  प्रसादच्या नोकरीची शेवटची काही वर्ष बाकी आहेत. अर्पिता परदेशात गेल्यावर कदाचित तो निवृत्तीचा विचार करेल. बाकी सुरेशला एक मुलगा. तो कॉलेजात आहे. तो पण गाण्यात करियर करणार आहे.
     दहा वर्षांपूर्वी बायजा गेली. त्या नंतर मात्र रघुनाथ राव अगदी एकटे पडले. आणि गेली सहा सात वर्ष तर ते खूप थकले होते. आयुष्यभर फक्त मेहेनत केलेला तो देह आता दमला होता. त्यांच्याने कामं होत नसत. गडी लावून ते कामं करून घेत असत. पण बायजा सारखी साथ नव्हती. ते मुलांना फोन करून सांगायचे की "अरे गावी या. हे घर, वाडी, झाडं, दुकान बघा. मला होत नाही रे आता." पण मुंबईत आपापल्या व्यापात व्यग्र असलेल्या कोणालाच कोकणात जायला वेळ मिळायचा नाही. वर्षातून एखादी फेरी व्हायची सगळ्यांची आंब्याच्या दिवसात. रघुनाथ राव सर्वांसाठी स्वतःच्या हाताने आंबे पिळून पातेलीभर रस दोन्ही वेळेला काढत असत. रात्रीची जेवणं झाली की ते आपल्या आराम खुर्चीत बसत. बाकी सगळे त्यांच्या भोवती कोंडाळे करून बसत. ते परत तेच सांगत की आता तुम्ही सगळी जबाबदारी घ्या. मला होत नाही. मुलं म्हणायची हे सगळं विकू. तुम्ही मुंबईला या. पण ते पिढ्यानपिढ्यांच घर आणि जमीन विकायला तयार नव्हते. "माझे डोळे इथेच मिटणार. माझ्या नंतर तुम्ही हवं  ते करा!" असं ते म्हणत. चार दिवस राहून सगळे परत जात. रघुनाथ राव त्यांच्या गाडीने उडवलेला धुरळा बघत डोळे पुसत. 
      आज सगळी मंडळी अंघोळी करून त्यांच्या आराम खुर्ची जवळ बसली होती. त्यांच्या डोक्याच्या तेलाने आराम खुर्चीवर जिथे डोकं टेकल जातं तो भाग काळसर तुकतुकीत झाला होता. त्यांचे पाय तिथे गुडघ्याजवळ खुर्चीच्या फ्रेमला लागत तिथे पॉलिश उडालेल होतं. आराम खुर्चीच्या शेजारी ते गेल्यावर लावलेला दिवा तेवत होता. बाजूला पाटावर त्यांचा फोटो होता. कोणीच काहीच बोलत नव्हतं. इतक्यात राधा सर्वांसाठी चहा घेऊन आली. तिने सर्वात आधी अंघोळ करून चहा टाकला होता. सर्वांनी चहाचे कप घेतले. कोणीच काहीच बोलत नव्हतं. इतक्यात सुरेशच्या मोबाईल वर किशोरीचा व्हिडिओ कॉल आला. ती, तिचा नवरा आणि मुलं सर्वांशी बोलले. आणि किशोरी ने विषय काढला.
किशोरी - मला माहित आहे की This may not be the best time to discuss this. पण कधीतरी हे बोलावच लागणार आहे. सो तुम्ही गावाला आहात तेव्हाच बोललेल बर. दादा, गावच्या प्रॉपर्टी च काय करायचं ठरवलं आहेस? आपण कोणीच तिथे जाणार नाही. ते सगळं पडून जाईल. त्या पेक्षा विकून टाकलेलं बर. बाबा होते तोवर.
सुरेश - बरोबर आहे. बाबांनी हे आधीच करायला हवं होतं. 
प्रसाद - मी बाबांना किती वेळा सांगितल की तुम्ही मुंबईला या. मस्त आमच्या बरोबर रहा. कुठे एकटे रहाताय गावात.
किशोरी - ह्मम..आणि आपल्या इथे तो नवीन रिफायनरी प्रोजेक्ट पण येतोय ना? रेट चांगला मिळेल आता. We have a goldmine. दादा तू जरा चौकशी कर आणि विकून टाक शक्य तितक्या लवकर.
प्रसाद - हो.
किशोरी - आणि हे बघा. त्या व्यवहारातून मला काहीच नकोय. माझं इथे उत्तम आहे. जे आहे ते बाबांमुळेच आहे. माझी इतकीच इच्छा हे की ते घर आणि प्रॉपर्टी आपलं लक्ष नाही म्हणून फुकट जाऊ नये, खराब होऊ नये. मला त्यातून काहीही नकोय. तुमचं ठरलं की मला कळवा. मी येईन आणि सांगाल तिथे सह्या करेन. 
सुरेश - बरोबर आहे तुझं. आम्ही करतो प्रयत्न. गावात इस्माईल शेठचा मुलगा जमिनीचे सगळे व्यवहार करतो. त्याच्याकडे गिऱ्हाईक नक्की असेल. त्याने मला अनेकदा फोन केले होते की बाबांना तयार कर जागा विकायला. चांगल गिऱ्हाईक आहे म्हणून. मी बोलतो त्याच्याशी. 
फोन कट झाला. सगळे फोटोला नमस्कार करून झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सुरेश इस्माईल शेठ चा मुलगा रफिकला भेटला. रफिक ने एका महिन्यात व्यवहार करायची ग्वाही दिली. उद्या पहाटे सगळे परत निघणार होते. आजही खिचडी खाऊन मंडळी झोपी गेली. पहाटे चारला गजर वाजला आणि प्रसाद उठला. आपलं आवरून इतरांना उठवणार होता तो. दोन गाड्या होत्या. साडे पाचला निघायचा प्लॅन होता. तो त्याचं आटोपून बाकीच्यांना हाका मारून बाहेरच्या खोलीत आला. फोटो शेजारी लावलेल्या दिव्याचा खोलीत मंद प्रकाश होता. प्रसाद पुढे आला आणि अंधारात असलेल्या आराम खुर्चीत रघुनाथ रावांना बसलेलं पाहून दचकला. त्याच्या अंगावर काटा आला. 
प्रसाद - ब..बाबा..
आदी - नाही बाबा. मी आदी. 
प्रसाद पुढे झाला. आदी त्याच्या आजोबांची खाकी चड्डी घालून त्यांच्या सारखाच उघडा बंब आराम खुर्चीत बसला होता. 
प्रसाद - काय रे? हे काय? तयार हो पटकन. मुंबईला निघायचं आहे. क्षणभर दचकलो ना मी तुला बाबांच्या खुर्चीत बसलेला बघून. बाबा तरुण असताना सेम असेच दिसायचे. त्यात तू त्यांची चड्डी घातली आहेस आणि सेम दिसतो आहेस.  
इतक्यात बाकीचे सगळे तिथे आले. आदी उठून उभा राहिला आणि बोलू लागला. 
आदी - बाबा काल आजोबा माझ्या स्वप्नात आले. मला म्हणाले "आदी हे घर, ही जमीन आपल्या पूर्वजांची मिळकत आहे. ती विकू नको देऊ. तुझ्यात मला मी दिसतो. तू सांभाळू शकशील हा वारसा अस मला वाटतं." मी त्यांचं ऐकायचं ठरवलं आहे.
सुरेश - काहीही काय आदी. अरे राफिकला शब्द दिलाय आपण. 
राधा - आदी अरे तुझ मास्टर्स..परदेशी जायचं स्वप्न?
आदी - आई, मास्टर्स करून मी अमेरिकेत राहणार ना? म्हणजे मुंबई तसाही सोडणार आहे. आणि तिथे काय चार पैसे जास्त कमावेन इतकंच ना? ते तर मी इथेही कमवू शकतो. मी पहाटे पासून ह्या खुर्चीत बसून विचार करतोय. आजोबांनी जे सांभाळलं ते मी वाढवू शकतो. ह्या घरात रिसॉर्ट करू शकतो, दुकान छान डिपार्टमेंट स्टोर करू शकतो. शेती अत्याधुनिक करून उत्पन्न वाढवू शकतो. त्यातून खूप पैसे मिळतील. आणि माझा शेयर बाजार आहेच काही कमी पडलं तर. आपण हे काहीच विकायचं नाही. जे उत्पन्न मिळेल ते आपण आणि काका वाटून घेऊ. आत्याला काही नको असलं तरी घरचे आंबे, काजू पाठवू. उद्या इथे प्रकल्प झाला की बिझनेस खूप मोठा होईल बाबा. प्लीज ऐका माझं. 
राधा - इथे गावात राहिलास तर तुला मुलगी नाही मिळायची तोला मोलाची.
आदी - नाही तर नाही. पण आई मला इथेच राहू दे प्लीज. 
त्या नंतर सर्वांनी दिवसभर चर्चा करून, आदीला समजवायचा प्रयत्न केला. पण तो तयार नसल्याने शेवटी त्याला तिथेच राहू द्यायचा निर्णय घेतला आणि सगळी मंडळी दुसऱ्या दिवशी पहाटे मुंबईला परतली. आदी तिथे राहू लागला. घराचा त्याने चेहरा मोहरा बदलून तिथे दहा खोल्यांचं अद्यावत रिसॉर्ट सुरू केलं. त्याला मुंबई पुण्यातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुकानाचा कायापालट करून त्याने तिथे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केलं. ते देखील जोरदार चालू लागलं. दुकानात, घरात रघुनाथ रावांचे फोटो होते. त्यांना नियमित हार घालत असे आदी. शेयर बाजार सुरू होताच. अशी सहा सात वर्ष गेली. आता आदिला गावात आणि तालुक्यात आदी शेठ म्हणून लोक ओळखू लागले होते. 
त्या दिवशी आदी त्याच्या ऑफिस मध्ये बसला होता. इतक्यात दारावर टकटक झाली. त्याने मान वर करून पाहिलं तर एक सुंदर मुलगी उभी होती. जीन्स, त्यावर शॉर्ट कुर्ता, डोळ्यावरचा गॉगल डोक्यावर चढवलेला, चेहऱ्यावर आत्मविश्वासाच तेज. 
मुलगी - मी आत येऊ का?
आदी - या ना.
मुलगी - हाय.. मी तन्वी. 
आदी - मी आदी. हाय..रूम हवी आहे का?
तन्वी - हो. म्हणजे दोन वर्षांसाठी रूम हवी आहे. मी naturopathy मध्ये phd करते आहे आणि ह्या भागात काही रिसर्च करायचा आहे. पूर्वी इथे ह्या गावात माझ्या आजीची सख्खी बहीण राहायची. She was unmarried. बायजा नाव होतं तिचं. तिचं घर होतं इथे. पण आता फक्त चौथरा आहे. मला काही वर्षात खरं तर ते घर पण परत बांधायचं आहे. तिथे naturopathy var based एक सेंटर सुरू करायचं आहे. पण तो नेक्स्ट प्रोजेक्ट असेल. सध्या phd संपवणार आहे asap. बायजा आजी passed away some years ago. आमच्याच घरी होती पुण्याला. Anyway.. प्लीज तुम्ही मला एक रूम २ वर्षांसाठी रेंट करू शकता का? माझे फ्रेंड्स पुण्याहून इथे येऊन राहून गेले. त्यांनी recommend केलं आहे हे. Vibe खूप मस्त आहे इथला म्हणून. पण मला रूम वार्षिक भाड्यावर हवी हे.  तुमच्या रिसॉर्टच्या रेट ने नाही. मला ते परवडणार नाहीत. 
आदी तन्वी ला पाहून गार झाला होता. ती होतीच तितकी गोड आणि आकर्षक. तन्वीला देखील आदी छान वाटला होता. 
तन्वी - हॅलो. आहे का रूम अव्हेलेबल?
आदी - हो आहे ना. 
तो आणि तन्वी टर्म आणि कंडीशन डिस्कस करू लागले. इथे रघुनाथ राव त्यांच्या आराम खुर्चीत बसून समाधानाने हसत होते. त्यांच घर, त्यांची वडिलोपार्जित शेती, जमीन ह्यांना नव्या स्वरूपात राखणारा आदी आता त्यांच्या आणि बायजाच्या अपूर्ण राहिलेल्या, नाव नसलेल्या नात्याला देखील पूर्ण करणार, नाव देणार ह्याची त्यांना खात्री होती. ते आनंदाने आराम खुर्चीत बसून झुलत होते. आदीला तन्वीच्या मागे लांबवर असलेली आराम खुर्ची आजही आपोआप हलताना दिसली, गेली अनेक वर्ष दिसायची तशी. फक्त त्याला जाणवतं असलेलं आजोबांचं त्या वास्तू मधील ते अस्तित्व आदीला हवं होतं आणि आवडत देखील होतं ! एक अपूर्ण वर्तुळ पूर्ण होणार होतं ! 

©मंदार जोग

1098. कॉफी आणि बरंच काही गोष्ट एका प्रेमाची

    अदिती ऑफिसमधून निघणारच होती पण बघते तर काय बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती बाहेर बघत जरा चिडचिड करत मनातच पुटपुटली,
"नेमकी मी छत्री ☔ विसरते त्याच दिवशी पाऊस येतो. आधीच कामामुळे उशीर आणि त्यात हा पाऊस...🙄 कधी थांबतो कुणास ठाऊक....चला तोपर्यंत कॉफी तरी घेऊया.. तितकाच काय तो वेळ जाईल.."
अदिती कॉफी घ्यायला निघाली आणि जाताना आजुबाजूला फ्लोअर वर एक नजर टाकली तर मोजकेच लोक होते.. शुक्रवार असल्याने बरेच जण लवकर निघून गेलेत वाटतं असा विचार करून ती कॅन्टीन मध्ये निघून गेली. एका टेबल खुर्ची वर बसून कॉफी घेत समोरच्या काचेतून बाहेरचा पाऊस बघत ती मग्न झालेली असतानाच एक आवाज आला,
"excuse me miss Aditi....मी इथे बसलो तर चालेल..😉" 
तो आवाज ऐकताच तिने वळून पाहिले , "अविनाश तू...अरे बस ना... कधी आलास इकडे..तू UK ला होतास ना.." 
अविनाश समोरच्या खुर्चीवर बसून, अदिती च्या निरागस चेहऱ्याकडे पाहून आनंदी होत बोलला.
"आजच जॉइन झालो अगं इकडे. मागच्या आठवड्यात आलो परत. दोन वर्षांचा प्रोजेक्ट होता. संपला. आलो परत. तू सांग कशी आहेस. अजूनही तशीच दिसतेस. जशी ऑफिसच्या पहिल्या दिवशी दिसत होती 😉 आठवतोय मला तो दिवस. तेव्हाही असाच पाऊस सुरू होता.आठवतो ना..."
अदिती जरा लाजत, मनातल्या भावना, आनंद लपवत म्हणाली, "काहीही काय रे. तू पण ना. मी मजेत आहे. तू सांग कसं वाटलं दोन वर्षे आणि आज दिवसभर तर दिसला नाहीस. आता अचानक इथे कसा? म्हणजे उशीर झाला ना म्हणून म्हणतेय.."
अविनाश एकटक अदितीला बघत होता, तिचा नाजूक चेहरा, तिला शोभून दिसणारे कुरळे केस, तिच्या गालावरची ती खळी, मध्यम उंचीची साधी सिंपल पण अगदीच गोड मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबातली, आई वडिलांना एकुलती एक. हुशार, समजुतदार आणि मेहनती, त्यामुळे कामात परफेक्शन. स्वभावाने जरा लाजाळू, अबोल पण हसरी मुलगी. 🙂 तिच्या डोळ्यातले भाव टिपत तो म्हणाला, 
"दिवसभरात किती वेळा तुझ्याशी भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत येऊन बघितलं पण मॅडम बिझी. एकदा कॉलवर, एकदा  मिटिंगमध्ये. लक्षही नव्हतं तुझं. कामात मग्न होतीस, व्यत्यय नको आणायला म्हणून काही तुला डिस्टर्ब केलं नाही. म्हंटलं आता आज भेटतात मॅडम की नाही काय माहित. म्हणून थांबलो तुमची वाट बघत."
"म्हणजे तू मला भेटायला थांबलास. अरे, सध्या खूप काम आहे त्यामुळे कुठेच आजुबाजूला लक्ष नसतं. रोज घरी जायला उशीर होतो." अदिती.
"हो, खरं तर तुला भेटायलाचं थांबलो. किती कॉल, मेसेज, इमेल केले तुला. ऑफिसच्या मेसेंजर वर सुद्धा किती तरी वेळा मेसेज केला पण तू मात्र काहीच उत्तर दिले नाही. आज ठरवलं होतं तुला भेटूनचं जायचं घरी." अविनाश.
अदिती विषय बदलत म्हणाली, "कॉफी घ्यायची का अजून एक. बोलता बोलता ही कॉफी कधी थंड झाली कळालेच नाही."
"अजूनही तशीच कॉफी प्रेमी आहेस वाटत तू. थांब मी घेऊन येतो" अविनाश.
अदिती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. 
(अविनाश उंच पुरा, गोरापान, रूबाबदार व्यक्तीमत्व, हुशार, आत्मविश्वास असलेला होतकरू मुलगा. अगदीच मॉडर्न विचारांचा, घरी मोठा व्यवसाय असूनही पारंपरिक व्यवसाय नको म्हणून स्वबळावर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोहोचला होता. घरचा व्यवसाय वडील आणि भाऊ सांभाळायचे. दोघेच भाऊ. घरी आई वडील, भाऊ ,वहिनी आणि अविनाश सगळ्यात लहान. )
अविनाश दोघांसाठी कॉफी घेऊन आला.  अदिती आधीच्या गोष्टींवर बोलण्याच्या मूड मध्ये नाही हे लक्षात घेऊन अविनाश तिला चिडवत म्हणाला, "काय मग, पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही.. कशी जाणार आहेस घरी.."
अदिती बाहेर एक नजर टाकत, "हो ना. पाऊस कधी थांबतो काय माहीत. आई-बाबांना कळवायला पाहिजे. काळजी करत असतील ते.  कॅब मिळते का बघते आता. बसने जाणे तर अशक्यच वाटतेय."
"तुझी हरकत नसेल तर मी सोडतो ना तुला. पावसाचं काही सांगता येत नाही म्हणून कार घेऊन आलेलो आज." अविनाश.
"नको अरे मी बघते कॅब मिळते का. तुला उगाच चक्कर होईल मला सोडून घरी जायला." अदिती.
"अगं, किती ही औपचारिकता. खरंच इतक्या पावसात आता कॅब मिळेल का? मिळाली तरी मी नाही जाऊ देणार तुला एकटीला. नऊ वाजत आलेत आता. चल मी सोडतो. काही चक्कर वगैरे होणार नाही मला." अविनाश.
"बरं ठीक आहे, मी आईला फोन करून कळवते तसं आज उशीर होईल ते सांगितलं होतंच पण इतका उशीर होईल वाटलं नव्हतं. हा पाऊस पण ना." अदिती.
"बरं झालं आला ना पाऊस.. नाही तर काम आटोपून निघून गेली असतीस. मला तुझ्याशी भेटताही आलं नसतं." अविनाश.
"चला, निघायचं का..." अदिती.
दोघेही पार्कींग कडे निघाले. दोन वर्षांपूर्वी अदिती मुलाखतीसाठी आलेली तेव्हा बाहेर असाच जोरात पाऊस सुरू होता, त्यामुळे तिला जरा उशीर ही झाला होता. लगबगीने ती ऑफिसमध्ये पोहोचली आणि आल्यावर कॉन्टॅक्ट पर्सन मिस्टर महेश शर्मा यांना भेटायचं आहे असं सिक्युरिटी कडे सांगितलं. सिक्युरिटीकडून कळाले की काही तरी तातडीचे काम आल्यामुळे महेश सर आज उशीरा येणार आहेत पण त्यांनी तुम्हाला मिस्टर अविनाश यांना भेटायला सांगितले आहे. पावसात तासभर प्रवास करून भिजली जरी नसेल तरी अंगात थंडी भरलेली होती. सिक्युरिटी ने पहिल्या मजल्यावर जाऊन उजवीकडे आत जा, तिथे तुम्हाला अविनाश सर भेटतील असं सांगितलं. जाताना अदिती विचार करत होती, "सर उशीरा येणार म्हणताहेत, आता हे अविनाश कोण बघुया. इंटरव्ह्यू चांगला झाला म्हणजे बरे. मोठ्या हुद्द्यावर असलेल्या लोकांचे बरे बाबा. उशीर झाला की कळवून मोकळे. आपण मात्र लगबग करत वेळेत पोहोचण्याच्या तयारीत. असो त्यांनाही कधी तरी अशाच परिस्थितीतून जावे लागले असणार."
उजवीकडून आत आले, आता कुणाला तरी विचारायला पाहिजे अशा विचारात असतानाच तिची गाठ पडली अविनाश सोबत पण तिला कुठे मी माहित की हाच अविनाश आहे. ती त्याला म्हणाली, "Excuse me, मिस्टर अविनाश पाठक कुठे भेटतील सांगू शकता का? मी मुलाखतीसाठी आलेली आहे."
अविनाशने तिच्याकडे बघितले तशीच त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली पण तिला न कळू देण्याच्या आवेशात तो म्हणाला, " समोर मिटिंग रूम आहे, तुम्ही बसा तिथे. अविनाश ला सांगतो मी तुम्ही आलात म्हणून.."
अदिती मान हलवून थॅंक्यू म्हणत मिटिंग रूम कडे निघाली. आत एका खुर्चीत बसून अविनाश सर येण्याची वाट बघत होती. अविनाश पुढच्या पाच मिनिटात आत आला आणि हात पुढे करून म्हणाला, 
"हॅलो,मी अविनाश पाठक. "
अदिती जरा गोंधळून हसू आवरत जरा घाबरत म्हणाली, "हॅलो सर, मी अदिती. म्हणजे मी तुम्हालाच तुमच्याविषयी विचारले तर..सो सॉरी..मला माहित नव्हतं त्यामुळे जरा कन्फ्युजन झालं असावं.."
"डोन्ट बी सॉरी..मिस अदिती.. होतं असं कधी कधी.."
"अदिती, आज महेश सर उशीरा येणार असल्याने तुमची मुलाखत त्यांनी मला घ्यायला सांगितली आहे. पुढचा राऊंड सर घेतील. ते येतीलच तासाभरात." अविनाश.
अदिती -"ओके सर..नो प्रोब्लेम.."
अविनाश ने अदितीची मुलाखत घेतली, थंडी अंगात भरल्याने तिच्या अंगावर काटे उभे झाले होते आणि resume अविनाश च्या हातात देताना तिच्या हातावरचे काटे अविनाश च्या नजरेतून ते सुटले नव्हते. तिची एकंदरीत परिस्थिती पाहता तो म्हणाला, "मिस अदिती, तुम्हाला फ्रेश होवून यायचे असेल तर तुम्ही दहा मिनिटे जाऊन येऊ शकता, त्यानंतर आपण मुलाखत घेऊ. "
"इट्स ओके सर, मी तयार आहे मुलाखतीसाठी." असं म्हणत अदितीने त्याचा प्रस्ताव नाकारला.
अविनाशने अदितीची मुलाखत घेतली, पाच मिनिटां पूर्वी थंडीने जरा कुडकुडत असलेली अदिती आत्मविश्वासाने उत्तर देत होती. तिची एकाग्रता, चेहऱ्यावर आत्मविश्वास, तिचे भाव टिपत अविनाश मधूनच हरवल्या सारखा होत होता. तिच्या एकंदरीत मुलाखतीनंतर तो अजूनच तिच्यावर इंप्रेस झाला. उत्तर देताना तिचा सखोल अभ्यास, प्रत्येक गोष्ट पटवून देताना तिच्या चेहऱ्यावरचे तेज त्याला भाळले. अर्धा तास कसा गेला कळाले सुद्धा नाही. नंतर अविनाश ने वेल डन मिस अदिती म्हणताच ती मनोमन आनंदी झाली. आता महेश सर आले की पुढची प्रोसेस होईल तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल असं अविनाश ने सांगितले. 
अदिती त्यावर म्हणाली," थॅंक्यू सर. एक विचारायचं होतं, इथे कॅन्टीन कुठे आहे.."
अविनाश-"चला मी नेतो तुम्हाला. मलाही कॉफी घ्यायला जायचेच आहे."
अदिती आणि अविनाश एकत्र कॉफी घ्यायला ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये गेले. अदिती जरा गप्प गप्प आहे बघून अविनाश म्हणाला "तुम्ही टेंशन मुळे अशा गप्प आहात की मुळातच कमी बोलता. मला घाबरलात तर नाही ना. मी साधा एम्प्लॉयी आहे बस.. गेल्या चार वर्षांपासून इथे नोकरीला आहे, माझं काम बघून सर काही महत्वाच्या जबाबदारी सोपवितात माझ्यावर विश्वासाने बाकी काही नाही. घाबरण्याचे कारण नाही.😀 तेव्हा अदितीला जरा हायसे वाटले. ती जरा का होईना पण बोलायला लागली. दोघांची ती पहिलीच भेट आणि पहिलीच एकत्र कॉफी. जरा एकमेकांची ओळख करून देत त्यांनी औपचारिक गप्पा मारल्या. काही वेळाने महेश सरांचा अविनाश ला फोन आला. अदिती ला घेऊन तो महेश सरांना भेटायला गेला. अदितीची महेश सरांनी पुढची मुलाखत घेतली. तिची हुशारी , आत्मविश्वास असं एकंदरीत सगळं बघता तिला त्यांनी सिलेक्ट केले. पुढच्याच आठवड्यात तिला कंपनीत रूजू व्हायचे होते. ती अविनाश ला नोकरी मिळाल्याची बातमी आनंदाने सांगून थॅंक्यू म्हणत घरी परतली. अविनाश ला त्या दिवसापासून अदिती चा चेहरा सतत डोळ्यापुढे दिसत होता, किती निरागस मुलगी आहे ही.. स्वभावाने शांत वाटली पण एक वेगळाच आत्मविश्वास आहे तिच्यात असा विचार करून तो स्वतः वर हसत स्वतः ला म्हणाला, 
"मी का इतका विचार करतोय तिचा.."
वरवर स्वतः ची समजुत काढत असला तरी मनातून ती कधी एकदा कामावर रूजू होते असं त्याला वाटत होते. अदितीला मनासारखी नोकरी मिळाल्याने ती आणि तिच्या घरचे ही खूप आनंदी होते. आठवड्यानंतर अदिती ऑफिसमध्ये आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस हा होताच. ती आॅफिसला पोहोचली, पहिल्या दिवशी महेश सरांनी तिची टीम मध्ये सगळ्यांशी ओळख करून दिली, तिची नजर अविनाश ला शोधत होती तितक्यात अविनाश एका मिटिंगमध्यून बाहेर येताना तिला दिसला. त्याला बघताच एक गोड स्माइल देत दोघांनी हाय हॅलो केले. अविनाश ने काही वेळाने तिला कॉफी घ्यायला येणार का विचारले आणि क्षणाचाही विचार न करता ती गेली. कॉफी तिला खूप प्रिय, त्यात असा संततधार पाऊस मग तर काय विचारायलाच नको. अविनाशला त्या दिवशी कळाले अदिती आणि कॉफी मधलं प्रेम. 
     अविनाश ऑफिसमधला पहिलाच मित्र होता तिचा. तशी जरा अबोल असल्याने फारसे मित्र मैत्रिणी नव्हते. एकाग्रतेने आणि प्रमाणिक पणे काम करणे हे तिचं खरंच कौतुकास्पद होतं. पुढे कामात कुठे काही अडकले की अविनाश तिला मदत करायचा. आता रोजचा एकत्र कॉफीचा कार्यक्रम हा ठरलेला होता दोघांचाही. अविनाश देखणा, आकर्षक, मॉडर्न राहणीमान त्यामुळे ऑफिसमध्ये अतिशय फेमस पर्सनालीटी. अदिती ला सुध्दा मनातून आवडायला लागला होता तो पण त्याच राहणीमान, श्रीमंत घरातला मुलगा आपल्याला का म्हणून पसंत करणार तेव्हा मनातल्या भावना मनातच ठेवलेल्या बर्‍या या विचाराने ती अविनाश ला काही जाणवू देत नव्हती. अविनाश ला मात्र ती पहिल्या भेटीतच आवडली होती, आता तर तिच्या सहवासात तिचं निरागस रूप, साधं राहणीमान त्याला अधिकच आवडू लागलं होतं. अदिती सारखी मुलगी आयुष्यात असतं किती सुखकर आहे हे त्याला कळू लागलं. दोघांची छान मैत्री झाली, तुम्ही आम्ही चे नाते मैत्री झाल्याने तू मी वर आले. 
     असेच सहा महिने गेले. आज अदितीचा वाढदिवस होता, ती मस्तपैकी तयार होऊन सगळ्यांसाठी मिठाई , नमकिन घेऊन ऑफिसला आली, बघते तर काय अविनाश आणि इतर सहकार्‍यांनी मिळून तिचं क्युबिकल छान सजवलंं होतं. ते बघून ती अजूनच आनंदली, हा वाढदिवस खूप खास आहे असं तिला वाटत होतं. अविनाश सोबत कॉफी घ्यायला गेल्यावर त्याने तिला छान नाजूक असं ब्रेसलेट गिफ्ट दिलं आणि म्हणाला "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अदिती. तू खूप खास मैत्रीण आहेस माझी म्हणून तुझ्यासाठी माझ्याकडून हे खास गिफ्ट.." 
अदिती त्यावर म्हणाली," थॅंक्यू अविनाश पण असं महागडं गिफ्ट मी नाही घेऊ शकत. प्लीज समजुन घे. आई बाबांना सुद्धा नाही आवडणार अरे. त्यांना काय सांगणार ना मी.."
अविनाश जरा नाराज होऊन, "अगं वेडाबाई, गिफ्ट आहे ते. स्वस्त महाग असं काही नसतं. तुझ्यासाठी खास निवडून आणलं मी. खरंच खूप आवडीने आणलं. असं नाही म्हणून नाकारू नकोस ना.. प्लीज.."
अदितीला अविनाश चे बोलणे आज नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते, त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव तिला दिसत होते. तिलाही त्याच असं खास मैत्रीण म्हणनं, वाढदिवसाचं छान सरप्राइज देणं मनापासून आवडलं होतं पण तिचं मन मात्र मानत नव्हतं. नकळत ती बोलून गेली, "इतकी खास मैत्रीण आहे का रे मी तुझी. माझा वाढदिवस लक्षात ठेवून असं दिवसभर स्पेशल वागणूक देतोय तू आज मला. सगळं असं छान वाटतंय...आजचा वाढदिवस सगळ्यात खास आहे असं वाटतंय अविनाश मला. फक्त तुझ्यामुळे. तुझ्यासारखा मित्र मिळाला याचा खूप आनंद वाटतो मला.. थॅंक्यू सो मच."
अविनाश तिच्या डोळ्यात बघत , "अदिती, खास मैत्रीण तर आहेच तू माझी पण त्या पलिकडे ही काही तरी वाटतयं मला..तू आवडतेस मला.."
अदितीला हे सगळं खूप हवंहवंसं वाटत होतं, तो अगदी आपल्या मनातलं बोलतोय असं वाटत होतं पण का कोण जाणे तिचं मन मात्र मानत नव्हतं.आपण अविनाश पुढे काहीच नाही. तो घरंदाज, श्रीमंत, देखणा. आपण साधारण कुटुंबात वाढलेलो शिवाय दिसायला त्याच्या मानाने साधारण असा विचार तिला त्याच्या आयुष्यात जाण्यापासून तिला अडवत होता. त्याला आपल्यापेक्षा खूप देखणी, त्याच्या तोलामोलाची मुलगी मिळेल तेव्हा वेळीच आपण थांबलेले, भावनांना आवरलेले बरे असा विचार करून ती त्याच्या विचारातून मागे फिरली आणि म्हणाली, "अविनाश, तू काय बोलतोय, अरे आपण चांगले मित्र आहोत पण. नाही अविनाश आपण इथेच थांबलेलं बरं.."
अविनाश नाराज होऊन, "अदिती तुला दुखवायचं नाही गं, पण का कोण जाणे आज नकळत मनातलं सगळं बाहेर आलं..But I really mean it..मला मनापासून आवडतेस तू."
त्यावर अदिती निरूत्तर होती, त्याने दिलेलं गिफ्ट सुद्धा तिने नाकारलं. 
     अचानक अदितीच्या वागण्यातला बदल त्याला जाणवू लागला. ती शक्य तितकं त्याला टाळायचा प्रयत्न करत होती, मनातून तिलाही तसं वागायला आवडत नव्हतं पण तरीही त्याला टाळत तिने स्वतःला कामात झोकून दिलं. अविनाश ला सगळं खूप विचित्र वाटलं, मनोमन तो खूप दुखावला गेला होता. शक्य तो प्रयत्न करून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता, आता एकत्र कॉफी सुद्धा कधीतरीच त्यांच्या नशीबी यायची. अविनाश ने विचारल्यावर ती इतकंच म्हणायची, मला आता तरी करीअर वर लक्ष द्यायचे आहे..तू माझा विचार करू नकोस.
अविनाश तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणायचा "अदिती, तू हवा तितका वेळ घे. तू माझं प्रेम स्विकारावे असा हट्ट नाही माझा पण असं टाळून मला दुखवू नकोस गं.आपण मित्र म्हणून तर राहूच शकतो ना."
तिलाही त्याच पटत होतं पण आता मैत्री सुद्धा पूर्वीप्रमाणे राहीली नव्हती. अविनाश ला दुखवायला नको म्हणून ती न चुकता त्याच्या  सोबत कॉफी घ्यायला जायची पण पूर्वीसारखा संवाद राहीला नव्हता. इतर सहकार्‍यांचीही दोघांविषयी काही तरी कुजबुज सुरु झाली होती. अविनाश ला त्याच्या कामातील हुशारी मुळे प्रमोशन मिळाले. दुसऱ्या एका टिम मधून एक नविन प्रोजेक्ट UK मध्ये सुरू होणार होता आणि त्यासाठी अनुभवाच्या जोरावर योग्य व्यक्ती म्हणून अविनाश ची निवड झाली. दोन वर्षांसाठी अविनाश UK ला जाणार होता. ते कळाल्यावर अदितीला मनोमन आनंद तर  झालाच पण तो सोबत नसणार म्हणून एक अस्वस्थताही वाटू लागली. अविनाश ची अवस्था सुद्धा अशीच झाली होती. एकीकडे UK ला जाण्याची संधी, प्रमोशन याचा आनंद तर दुसरीकडे अदितीला सोडून जावं लागणार म्हणून वेगळीच अस्वस्थता. परत येईपर्यंत अदिती च्या मनात काय असणार, दुर गेल्यावर तिचं मन बदलेल का, तिला माझ्या प्रेमाची जाणीव होईल का अशे अनेक विचार त्याच्या मनात गोंधळ घालत होते. अविनाश साठी जाण्यापूर्वी सगळ्यांनी छोटीशी पार्टी ठेवली होती, त्या पार्टीत अविनाश आणि अदिती वरवर आनंदी वाटत असले तरी मनातून एकमेकांसाठी झुरत होते. 
अदिती माझ्या संपर्कात राहशील ना..I will really miss you.. specially will miss our coffee.." असं तिला म्हणताच तिच्या डोळ्यात त्याला अश्रू दिसले. कसं बसं अश्रु आवरत ती हसून म्हणाली ,"All the best अविनाश..I will miss you too.." अविनाश ठरलेल्या दिवशी UK ला रवाना झाला. 
     अदिती त्याची आठवण काढून खूपदा रडायची. तिला मनांतून वाटायचं त्याला फोन करावा. त्याचा फोन मेसेज आला की बोलावं. मन हलकं करावं पण स्वतःच्या भावना आवरत ती त्याला टाळत होती. सध्या कामाचा व्याप वाढलाय. नंतर बोलते म्हणत वेळ मारायची. हळूहळू त्याला पूर्णपणे टाळायला सुरू केले तिने. असं कुणाला दुखावणे योग्य नाही हे कळत असून भावना आवरण्याच्या नादात ती असं वागायला लागली. मनात रोज आठवण काढून, जुन्या आठवणी, सोबतचे क्षण आठवायची आणि मग अचानक भानावर येत स्वतः ला दुसरीकडे गुंतवू पाहायची. असेच दोन वर्ष गेले. आज अविनाश आणि अदितीची पुन्हा भेट झाली. दोघेही पार्कींग कडे निघाले. अदितीला जरा अवघडल्या सारखे वाटत होते पण अविनाश तिला कंफर्टेबल करण्याचा प्रयत्न करीत होता. कार मधून दोघेही निघाले, रेडिओ वर मंद आवाजात गाणे सुरू झाले,
"तेरे बिना जिया जाए ना...
बिन तेरे...तेरे बिन....साजना
सांस में सांस आये ना..."
अदितीने चॅनल बदलले..
दुसऱ्या चॅनल वर गाणे लागले,
"बहुत प्यार करते है...तुमको सनम..."
अदितीला जास्तच अवघडल्यासारखे वाटले आणि तिने रेडिओ बंद केला.
अविनाश तिची घालमेल बघत होता, तो लगेच म्हणाला, "आपल्या सिच्युएशन वर गाणे लागताहेत असं वाटतंय ना.."
अदिती त्यावर काही बोलली नाही, नजर चुकवत इकडे तिकडे बघत विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली.
अविनाश - "अदिती, मी खूप मिस केले गं तुला दोन वर्ष. तू अचानक पूर्ण पणे संपर्क तोडला माझ्याशी तेव्हा मी खूप झुरलो तुझ्यासाठी. एका सहकार्‍याकडून तुझी चौकशी केली, तू स्वतः ला कामात झोकून घेतलं असं कळालं. तुझी कंपनीतील प्रगती ऐकून आनंदी झालो पण तू माझ्या पासून दूर जातेय हा विचार सहन होत नव्हता गं मला. असं वाटत होतं यावं, भेटाव तुला पण कुठलही नातं तुझ्यावर लादायचं नव्हतं मला. दोन वर्षांनंतर आज आपली भेट झाली. अख्खा दिवस तुला भेटण्यासाठी तळमळत होतो पण तू कामात गुंतलेली बघून डिस्टर्ब नाही केलं तुला शिवाय तू आज मला बघून काय प्रतिक्रिया देशील याचीही खात्री नव्हती. खूप छान वाटतंय आज तुझ्यासोबत.भावना आवरू नाही शकलो मी. म्हणून सगळं बोलून गेलो."
अदिती त्याचं बोलणं ऐकून रडायला लागली जणू दोन वर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना अश्रू रूपात बाहेर पडत होत्या. ती अशी रडताना पाहून अविनाश ला अपराधी वाटू लागले तो गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून तिची समजुत काढत म्हणाला, 
"अदिती, तुला दुखवायचं नाही गं..सो सॉरी..मी नको होतं असं सगळं अचानक बोलायला. माफ कर मला. प्लीज रडू नकोस..शांत हो."
अदिती त्यावर उत्तरली,
 "तुला काय वाटतं रे. मी खूप निर्दयी आहे. तुला दोन वर्ष अवघड गेली पण इकडे माझं काय. कितीही आवरलं स्वतः ला तरी एक दिवस असा नव्हता की तुझी आठवण आली नसेल. मीही तितकीच झुरले तुझ्यासाठी फक्त मला व्यक्त होता येत नव्हतं. तुझ्याशी संपर्कात राहीले तर अजूनच गुंतल्या जाईल मी तुझ्यात असं वाटायचं म्हणून टाळत आले तुला. तू कदाचित वेळेनुसार मला विसरशील. तुझं आयुष्य आनंदाने जगशील असं वाटलं होतं. तू गेल्यावर हा पाऊस, ती कॉफी सुद्धा नको वाटायची मला. कारण त्यात आपल्या अनेक आठवणी दडलेल्या होत्या. आज तू समोर दिसताच वाटलं मोकळं करावं मन, सांगावं तुला की माझंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर पण हिम्मत होत नव्हती माझी. इतक्यात आई बाबांनी काही स्थळ आणले माझ्यासाठी तेव्हा खूप गरज वाटली होती मला तुझी. दुसऱ्या कुणाचा विचार करूच शकत नव्हते मी. आई बाबांनाही कळाल होतं माझ्या मनात काही तरी गोंधळ उडाला आहे पण कसं विचारावं कदाचीत त्यांना सुद्धा कळत नव्हतं. अगदी वेळेत परत आलास तू. आज तू व्यक्त झालास आणि मी कमजोर पडले. आवरले नाही मला अश्रू. तेव्हाही आवडायचा तू मला पण मन मानत नव्हतं. आजही आवडतोस, हवाहवासा वाटतो तुझा सहवास.आय लव्ह यू अविनाश."
अविनाश अदितीचा हात हातात घेत म्हणाला "आय लव्ह यू टू अदिती. आजचा दिवस खुप खास आहे माझ्यासाठी. चल पुढे कॉफी शॉप आहे. आपला हा आनंद साजरा करायलाच पाहिजे ना."
अदितीने गोड स्माइल देत होकार दर्शविला आणि तिच्या गालावरची खळी बघून अविनाश अजूनच घायाळ झाला.
दोघांनीही मस्त कॉफी घेतली, अविनाश ने अदितीला घरी सोडले. वाटेत मंद आवाजात गाणे सुरू होते,
"पहला नशा, पहला खुमार नया प्यार हैं नया इंतज़ार करलूँ मैं क्या अपना हाल ऐ दिल-ए-बेक़रार मेरे दिल-ए-बेक़रार तू ही बता......"
दोघांच्याही भावना आज नकळत बाहेर पडल्या आणि त्यांच्या प्रेमाची गोड सुरवात झाली.

© अश्विनी कपाळे गोळे

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

1097. अंगाला लावून न घेणे

 अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल ! 
बालपणी कोणी काही बोलले की रागावून आपण आईजवळ तक्रार करायचो. त्यावर आईचे ठरलेले उत्तर असे, 'जाऊदे, लक्ष देऊ नकोस. तू चिडलास तर तर ते आणखी चिडवतील ! "
किती सोपा कानमंत्र होता, पण तो अमलात आणणे आजतागायत आपल्याला जमलेले नाही. तेच जमवता आले पाहिजे...! कधी कधी आपण इतके संवेदनशील होतो, की कोणाच्याही वाईट बोलण्या-वागण्याचा आपल्या मानसिकतेवर, कामावर, स्वभावावर विपरित परिणाम होतो. बोलणारा बोलून जातो, आपण मात्र अश्रू ढाळत बसतो. संवेदनशील असणे, माणुसकीच्या दृष्टीने चांगले आहे.  परंतु अति संवेदनशील होत आपली प्रगती खुंटवून घेणे, वेडेपणाचे ठरू शकते. सद्यस्थितीत आपण आपल्या मनस्थितीचे अधिकार विनाकारण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवले आहेत.  आपल्या कामाला जोवर दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळत नाही, तोवर आपल्याला आपल्याच कलाकृतीचा आनंद मिळत नाही. 
     समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचे, तर लाईक, कमेंट, शेअर यावर आपला आनंद अवलंबून असतो. कमी लाईक आले, खोचक कमेंट आली, कोणी जाहीर सल्ला दिला, की आपल्या मन:शांतीला सुरूंग लागलाच म्हणून समजा. या आभासी जगात आपण एवढे गुंतून जातो, की चांगले वाईट याची समज गमावून बसता़े. आपल्या कामाचे आपल्याला समाधान मिळणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. इतरांनी प्रशंसा केली तर ठीक, नाही केली तरी ठीक. एवढी स्थितप्रज्ञता अंगी बाणता आली पाहिजे. आपल्याला चांगल्या वाईट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा उद्देश नेहमी निर्मळ असतोच असे नाही. कोणी खरी प्रशंसा करतात, कोणी खोटी, कोणी उगीच चुका काढतात, तर कोणी फक्त चुकाच शोधतात. म्हणून अशा चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा, परंतु चांगले म्हटले म्हणून हुरळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका. 
     'हाथी चले बाजार, कुत्ते भोंकें हजार'  ही म्हण आत्मसात करा. यालाच मराठीत 'अंगाला लावून न घेणे' असे म्हणतात. आपण राजकारणी, सिनेमा, कला, क्रिडा जगतातील प्रसिद्ध लोकांना पाहतो. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो तसेच अगदी हीन दर्जाची शेरेबाजीदेखील होते. त्यांनी जर प्रत्येक प्रतिक्रिया मनाला लावून घ्यायची ठरवली, तर त्यांची प्रगती होऊ शकेल का? नाही ना? स्वत:ला सेलिब्रेटी समजा आणि प्रतिक्रियांचे स्वागत करा पण त्यात अडकून राहू नका.या सवयीने तुमचे मन एवढे कणखर बनेल, की कोणी काहीही प्रतिक्रिया दिली, तरी तुमच्या आनंदावर विरजण पडणार नाही. चेहऱ्यावर क्षणिक प्रतिक्रिया उमटेल, पण त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झालेली असेल. एकाने दुसऱ्याच्या हातावर चापटी मारण्याचा खेळ आठवतो? तेव्हा एखाद दुसरा फटका बसतो, परंतु त्यानंतर आपण एवढे सावध होतो, की मारणारा निशाणा धरून कंटाळतो. हाच खेळ आपल्याला आपल्या मनाला शिकवायचा आहे. एखाद दुसरा फटका बसेल, पण पुढच्यावेळेपासून मन सावध पवित्रा घेईल आणि कोणत्याही स्थितीत मन:शांती गमावणार नाही.

1096. थोडा वाईटपणा घेण्यासाठी

     काही दिवसांपूर्वी घराजवळ असलेल्या हार्डवेअरच्या दुकानात गेलो होतो. नेहमीच्या प्लंबरचा नंबर बंद येत असल्यामुळे दुकानदार कोणी प्लंबर देऊ शकेल का? हे बघायचं होतं. सकाळची वेळ होती, दुकानाबाहेर काही लोक आपापल्या दुचाक्यांवर मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते. मी माझी गरज दुकानाच्या मालकाला सांगितल्यावर त्याने जोरात दोन जणांना हाका मारल्या. पण त्यातल्या कोणीही त्याला उत्तर दिलं नाही. शेवटी संतापून तो बाहेर आला आणि गाड्यांवर बसलेल्या लोकांना ओरडून म्हणाला, "काम नकोय का तुम्हाला?" इतकं होऊनही आपल्या मोबाईलबाहेर‌ डोकं न काढता एक जण म्हणाला, "पत्ता घेऊन ठेवा... दुपारनंतर येईन म्हणून सांगा." वैतागलेला दुकानदार मला म्हणाला, "यांना रमी खेळण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. माझ्या ओळखीचा आणखी एक प्लंबर आहे. त्याच्याशी बोलून तुम्हाला कळवतो" 
सकाळी सकाळी रमीत असे गुंगलेले‌ लोकं बघणं माझ्यासाठी नवीन होतं. तेवढ्यात त्या लोकांमधला संवाद सुरू झाला. कोण किती जिंकलं? ह्याचं बोलणं ऐकल्यावर हेही समजलं की त्यातल्या एकाला आणखी खेळण्यासाठी कर्ज हवं होतं. त्यासाठी तो ऑनलाइन इन्स्टंट कर्ज देणारी कंपनी शोधत होता. अगोदरच त्याच्या नावावर तशी दोन कर्ज होती. पण खेळण्याची... थोडक्यात एक दिवस जॅकपॉट लागून 'मालामाल' होण्याची त्याची हौस फिटत नव्हती. गेमिंगच्या इतक्या थराला आहारी गेलेले लोक आणि त्यांना आयडी व्हेरिफिकेशनवर पटकन कर्ज देणाऱ्या कंपन्या पाहून अंगावर काटा आला. 24 फेब्रुवारीला बिझनेस टुडेमध्ये आलेली एक बातमी डोळ्यासमोर उभी राहिली: 
Indians remain poor because they are generating lower returns than inflation: Nilesh Shah, Kotak Mahindra AMC. Sharing his views on investment trends, Shah shared that around 10 crore individuals are losing money while playing fantasy games, nearly 2 crore Indians have lost more than Rs 2 lakh crore in Ponzi schemes.
मी अजून तिथेच आहे, हे पाहून दुकानदाराने मला आणखी एकाचा नंबर दिला आणि बोलता बोलता माझ्या नेहमीच्या प्लंबरचा उद्धार करत म्हणाला, "या रमीच्या नादात कंपन्यांची कर्ज करून तो गावी पळून गेलाय, त्यामुळे माझाही खोळंबा झालाय. शिवाय माझ्याकडून जे कर्ज घेतलं आहे ते वेगळंच.”  हे ऐकल्यावर काय बोलावं? हे मला समजेना. त्या प्लंबरला नुकतीच शाळेत जायला लागलेली दोन लहान मुलं आहेत, हे मला माहिती आहे. त्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नाही याचीही कल्पना आहे.  ऑनलाइन गेमिंग, त्यामुळे होणारी कर्ज आणि उद्ध्वस्त होणारी माणसं हे मी कधीही थेट न अनुभवल्यामुळे मला हा किती गंभीर प्रश्न आहे... याची पहिल्यांदा जाणीव झाली. थोडं संशोधन केल्यावर हे लक्षात आलं की हा प्रश्न कोणत्याही ठराविक आर्थिक वर्गापुरता, प्रदेशापुरता, भाषेपुरता मर्यादित नाही. 'मालामाल' होण्याच्या आमिषाने असंख्य लोकांना आपल्या कवेत घेतलं आहे... पछाडलेलं आहे. इंजिनीअर होऊन उत्तम पगारावर काम करणारे, चांगला व्यवसाय करणारे लोकही याचे बळी ठरले आहेत.  हे लिहिण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे – आपल्या ओळखीत कोणीही कोणत्याही फॅन्टसी गेमचे एप्लीकेशन डाउनलोड केले असेल आणि 'एकदाच खेळून बघतो', 'आज खेळतो उद्या खेळणार नाही', 'नेहमी खेळत नाही... कंटाळा आला तरच खेळतो', 'मला आजपर्यंत कुठलंही व्यसन लागलेलं नाही तेव्हा हेही लागणार नाही' असं काहीही कारण देऊन खेळत असेल, तर त्याला वेळीच सावध करा (यात क्रिकेटचची टीम बनवणारेही आलेच). अर्थात सावध केल्यामुळे आपल्यालाच वाईटपणा येऊ शकतो. पण कर्जाच्या बोजामुळे भविष्यात काही भयंकर‌ घडणार असेल... कोणाचं आयुष्य कायमंच उद्ध्वस्त होणार असेल आणि त्याची बोच आयुष्यभर आपल्याला राहणार असेल - तर थोडा वाईटपणा घेऊन, पण अशा व्यक्तीशी संवाद साधायला हवा. किमान तसा प्रयत्न तरी करायलाच हवा.

@योगेश शेजवलकर

1091. खोटारडी

 जगदीशची आई म्हणजे नंबर एकची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी 'आई' जगाच्या पाठीवर नसेल, हे माझे नाही तर, जगदीशचेच म्हणणे आहे. आयुष्यभर (अर्थात तिच्या) ती आपल्या लाडक्या जगूला खोटंच बोलत आली म्हणे. जगूचा बाप घराच्या भिंतींना रंग लावणारा रंगारी होता. कूणीतरी रंगकामाची गुत्ते घेणाऱ्या गुत्तेदाराकडे रोजंदारीवर जायचा. एका इमारतीच्या बाहेरच्या भिंतींना रंग लावण्यासाठी तो झुल्यावर, रंगाचा डबा आणि ब्रश घेऊन बसला. झुला चौथ्या मजल्याच्या गच्चीतून, खाली सोडण्यात आला. झुल्याचे दोर ज्यांनी धरले होते, त्यातील एकाला चक्कर आली. दोर सुटला. जगदीशचं बाप झुल्यावरून वेडावाकडा खाली पडला आणि जग सोडून गेला.   जगू लहानाचा मोठा होऊ लागला. खर्च वाढू लागला. दिवस गरिबीचेच होते. आईने दोन, घर धुण्या-भांड्याची वाढवून घेतली. मग जगूसाठी, भातासोबत वरण, भाजी मिळू लागली. कधी एखादा आंबा, केळ पण मिळू लागले. जगू आईला म्हणाला. आई तू पण खाना माझ्या सोबत. 
       आई त्याला वरण भात भरवताना म्हणाली बाळा, तू खा. मला भूक नाही. हे तिचे पहिले 'खोटे' बोलणे होते. जगू मोठा होवू लागला. ती कूठे कूठे कामे करू लागली. जगू शाळेत जाऊ लागला. खर्च वाढू लागला. मग तिने एका शिंप्या कडून, काजे बटणांचे काम घेतले होते. रात्री जागून, ती ते काम करायची. आई झोप आता. खूप रात्र झालीय. दिवसभर काम करून थकली असशील. तुला सकाळी कामाला पण जायचं असत ना ? झोप ना? 
अरे, मला झोपच येत नाही. म्हणून तर हे काम करतीयय. अन थकवा कसला ? याला, असे कोणते कष्ट पडतात ? तू मात्र आता झोप. सकाळी सातला शाळा आहे ना ? जगूला मऊसूत गोधडीचे पांघरून घालून झोपवायची. हे तिचे बोलणे खोटेपणाचेच होते.
     वाढत्या खर्चाने ओढाताण रोजचीच होती. अडचणी शिवाय दिवस उगवतच नसे. पोरी, तुझी परीस्थिती आमच्याने बघवत नाही. पदरी पोर आहे. तुझं  ही  वय फारस नाही. तुझ्यापुढे खूप मोठे आयुष्य पडलंय. तुलाही प्रेमाची, आधाराची गरज आहे. माझा एक अनुभवाचे म्हणणे ऐकशील ? तू दुसरे लग्न करावे, असे, तुझा एक हितचिंतक म्हणून वाटते. तुझी तयारी असेल तर सांग. एखादा सालस मुलगा पहातो. जवळच्या एका वृद्धाने जगूच्या आईला सल्ला दिला. धन्यवाद काका तुम्ही, हे माझ्या मायेपोटीच सांगत आहात, हे मला ठाऊक आहे. काहीच दिवसांचा प्रश्न आहे. हे हलाकीचे दिवस पालटतील आणि माझा जगू, माझ्या जवळ आहे, तोवर मला वेगळ्या प्रेमाची आणि आधाराची गरजच काय ? हा मला गरज आहे ती, फक्त तुमच्या आशीर्वादाची. तिला त्या काळात आधाराची आणि प्रेमाची खरेच गरज नव्हती का ? पण ती खोटं बोलतच राहिली.
     जगू हुशार होता. स्कॉलरशिप मिळाली. कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये नोकरी पण लागली. गावापासून लांब, बेंगलोरला. जगू आईस पैसे पाठवू लागला. पण तिने ते नाकारले. मला, असे कितीशे पैसे लागणार? आणि तितके आहेत माझ्या पाशी. तूच परक्या गावात राहतोस. रोज ऑफिसला जाताना आणि येताना बस, टॅक्सी साठी लागतील, तुझ्याकडेच राहू दे. स्वतःची आबाळ करून घेऊ नकोस. तुम्हीच सांगा यात कितपत सत्य होत? भयानक परस्थिती होरपळलेली, शक्तीच्या बाहेर देह कष्टावलेला, वाढते वय.  किरकोळ दुखणी तिने अंगावरच काढली. जगूला कळवलेच नाही. उगाच लेकराला त्रास कशाला द्या?  दुखणी काय आजची  आहेत? या आधीही, अशी किती तरी दुखणी, आपल्या देहाने सोसली आहेत. त्यात भिण्या सारखे काही नाही. 
     शेवटी व्हायचे तेच झाले. एकदा ती पाय घसरून बाथरूम मध्ये पडली. मांडीचे हाड नको त्या ठिकाणी, मोडलं. असह्य किंचाळी. शेजाऱ्यांनी दवाखान्यात ऍडमिट केलं. जगू धावत एरपोर्टवरून सरळ दवाखान्यात पोहचला. तिला त्या अवस्थेत पाहून तो वेडापिसा झाला. ती अश्या स्थितीत ती, नजरेला पडेल हा, त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तशा ही परिस्थितीत तिच्या डोळ्यात मात्र समाधानच तरळत होत. जगूचे अश्रू मात्र आवरत नव्हते. फार दुखतंय का ग? तिच्या दुखावलेल्या पायावरून, आपला हात हळुवारपणे फिरवत जगूने विचारले. नाही रे मला आता खूप बर वाटतंय तुला डोळेभरून पहाण्यासाठी जीव धरून ठेवला होता बघ. हे हि खोटेच होते. पायातून वेदनांचा डोंब उसळतच होता. हे फक्त तिलाच माहित होत. आई असे म्हणू नकोस. तुला काही होणार नाही. मी, तसे होऊ पण देणार नाही. जगू तिला मिठीत घेत म्हणाला. पण - पण तिने जागूच्या मिठीतच प्राण सोडला होता. हे मात्र सत्य होते. शेवटचे सत्य. मित्रांनो, जगू आणि त्याची आई, भले ही गोष्टीतली असतील, पण त्यांच्या भावना खऱ्या आहेत. आपल्या आईला, शक्य तितक्या लवकर जवळ करा. खूप दिवस तिच्या कुशीत रहा. तीच म्हातारपण जपा.

डॉ. सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.

1093. अंडे, दूध आणि नारळ !

     माझा एक कारागिर मित्र आहे. हार्मोनियम ट्यून करणं आणि दुरूस्तीची कामं तो करतो. साधारण दहावी पर्यंत शिकला असेल. अमराठी आहे. पण, पेटीदुरूस्तीच्या कामात मात्र तरबेज आहे. दिवसाला केवळ दोन-तीनच कामं तो करतो. कामातली गुणवत्ता उत्तम आहे. स्वभावात प्रामाणिकपणाही आहे. बोलणं गोड आहे आणि आवळा देऊन कोहळा काढण्याचा स्वभाव नाही. त्यामुळं कामाला तोटा नाही. तसाच आमचा एक सुतारकाम करणारा मित्र आहे. गडी एकदम चलाख आहे. हिकमती आहे. शालेय शिक्षण झालेलं नाही. पण, कामातली गुणवत्ता उत्तम आहे. त्यानं मला नुकत्याच केलेल्या एका कामाचा फोटो दाखवला. फ्लॅटच्या दरवाजाचं काम होतं. कोरीवकाम बरंच होतं.तो दरवाजा तयार करून बसवण्याचे त्याने जवळपास पन्नासएक हजार रूपये घेतले होते. त्याच्याकडे आत्ता अशी जवळपास आठ-दहा कामं सुरू आहेत. कामाची मागणी वाढतेच आहे.  अशी खूप उदाहरणं समाजात आहेत. पण, आपल्याला ती दिसत असूनही आपलं मात्र तिकडे लक्ष जात नाही. 
     माझ्या मनात वारंवार एक प्रश्न येतो, पण त्याचं समाधानकारक उत्तर मात्र सापडत नाही. मला सांगा - दरवाजा तयार करणाऱ्या माणसाला जर तो केवळ ३५% च करता आला तर? किंवा हार्मोनियम दुरूस्त करणाऱ्याला ती केवळ ३५% च दुरूस्त करता आली तर? अशा माणसांना आपण ‘अर्धवट’ म्हणतो आणि त्यांना आपण काम देत नाही. व्यवहारात ३५% या आकड्याला गुणवत्तेच्या दृष्टीनं काडीचीही किंमत नाही. मग ती शिक्षणात का दिली जात आहे? “३५% गुण मिळाले की परीक्षेत पास करणं” हेच बहुतांश प्रश्नांचं मूळ आहे. ६५% कच्चा राहिलेला आलू पराठा, ६५% कच्ची राहिलेली इडली, ६५% कुजलेली पालेभाजीची जुडी, डझनातली ८ केळी खराब असणं, अशा गोष्टींकडे आपण ढुंकूनही पाहत नाही. का? तर आपल्या दृष्टीनं अशा गोष्टींचा दर्जा अत्यंत खराब असतो. मग जरा विचार करूया : ६५% चा पत्ताच नसलेल्या आणि ३५% जेमतेम मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात कसं काय पाठवलं जातं? ६ पैकी ४ विषयांत नापास होऊनही विद्यापीठ त्या विद्यार्थ्यांना पुढची ॲडमिशन कशी काय घेऊ देतं? आपण शिक्षण घेतोय, ते नेमकं कशासाठी? याची पुरेशी स्पष्टता विद्यार्थ्यांना असते का? या विषयी आपण खोलात जाऊन शोध घेतला तर धक्कादायक निष्कर्ष मिळण्याची शक्यता आहे. “केवळ भरपूर पैसा कमावण्याकरिता शिक्षण घेणं हा शिक्षणाचा एकमेव उद्देश आहे आणि तोच असला पाहिजे” अशी सध्याची मानसिकता होत चालली आहे का?  जगभरातील विकसित देशांच्या प्रगतीची कारणं काय आहेत? याचा धांडोळा घेणं आपल्याला गरजेचंच वाटत नाही. शिक्षण महत्वाचं आहेच. पण, व्यावहारिकतेशी  जोडता आलं तरच त्याचा खरा उपयोग होतो. परीक्षेत विचारलेल्या आठ पैकी तीन ते चार प्रश्नांची उत्तरे लिहून जर किमान गुण मिळवून विद्यार्थी वरच्या वर्गात जात असेल तर, त्या विद्यार्थ्याकडून उत्तम भवितव्याची अपेक्षा करायची का? 
     खरं तर, विवेकबुद्धी आणि दैनंदिन जीवनातील शिस्त याही शिक्षणाशी खूप जवळच्या गोष्टी आहेत. या पैकी एकही गोष्ट नसेल तर, त्याचा फार मोठा तोटा त्या व्यक्तीला आयुष्यभर सोसावा लागतो. हा फटका बसलेल्यांची संख्या प्रगत समाजात खरं तर कालानुरूप कमी कमी होत जायला हवी. पण, वस्तुस्थिती निराळीच आहे. केवळ ‘शिस्तीचा लवलेशही नाही’ या एका कारणामुळं सुद्धा अनेकांचं करिअर धोक्यात आलेलं आहे. याविषयी एखाद्या सामाजिक संस्थेनं संशोधन केल्याचं आढळत नाही. वस्तुस्थितीतले दोष आपण मान्यच केले नाहीत तर त्यातून सुटका होऊन प्रगती तरी कशी होणार? म्हणूनच, वस्तुस्थिती स्वीकारणं आणि त्यावर उपाययोजना अंमलात आणणं आवश्यक आहे. माझ्या माहितीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलानं यावर्षी बीकाॅम ला प्रवेश घेतला. त्याला स्वत:ला खरं तर जिम इन्स्ट्रक्टर व्हायचंय. पण, “असावी एक डिग्री नावापुरती तरी” असा विचार करून त्यानं बीकाॅम ला प्रवेश घेतलाय. हे एकच उदाहरण नाहीय. अशी अक्षरश: लाखो उदाहरणं आहेत. आपल्या आजूबाजूला “साईड बाय साईड एखादी डिग्री जाता-जाता घ्यावी” म्हणून शिकणारी मुलं-मुली ढिगानं सापडतील. ती दरवर्षी साधारणपणे पास होण्याइतपत मार्क मिळवून पुढे-पुढे जातात आणि तीन वर्षात पदवीधर होतात. पदवी पर्यंत शिकलेल्या मुलांकडून समाजानं कोणकोणत्या अपेक्षा कराव्यात? यासंबंधी आपल्याकडे कुणी काही लिहून ठेवल्याचं आढळत नाही. पण, उद्योग-व्यवसाय किंवा नोकरी मध्ये मात्र काम देण्याकरिताच्या अपेक्षा स्पष्ट ठरलेल्या असतात. म्हणूनच, शिक्षण घेतलं तरी त्या क्षेत्रात काम मिळेलच, याची शाश्वती अजिबातच देता येत नाही. सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न यातूनच गंभीर रूप धारण करतो. 
     कोणत्याही डिग्री कोर्सचं उदाहरण घेऊन पहा. १०० विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी त्या विषयात उत्तम नैपुण्य प्राप्त करतात, हे शोधून पहा. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आणि निपुण विद्यार्थ्यांची संख्या यात बरीच तफावत आहे, असं दिसेल. म्हणूनच, शिक्षण घेऊनही भवितव्याविषयी शाश्वती वाटत नाही. एक साधं उदाहरण पहा : नवजात बाळाला अभ्यंग कसा करावा आणि आंघोळ कशी घालावी? या एका गोष्टीकरिता पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रूपये मोजावे लागतात. या करिता आपल्या शिक्षणव्यवस्थेत एखादा कोर्स आहे का? नाही. कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता, तान्ह्या बाळाला तेल मालिश आणि आंघोळ या एका कामामुळं एखाद्या महिलेला साधारणपणे तीस-चाळीस हजारांपर्यंत मासिक उत्पन्न मिळू शकतं, आणि पदव्या घेतलेले तरूण-तरूणी मात्र वर्षानुवर्षं बेरोजगार राहतात? याचाच अर्थ, कुठेतरी काहीतरी चुकतंय, हे निश्चित. कोणत्याही विषयाचं शिक्षण घेण्याच्या अगोदर त्या गोष्टीची उपयुक्तता किती आहे, कशी आहे,कोणत्या स्तराची आहे हे नीट पाहणं गरजेचं आहे. समाजाला नेमकी कोणकोणत्या गोष्टींची निकड असते, आवश्यकता असते, हेही पाहिलं पाहिजे. जर या गोष्टी आधीपासून पाहिल्या तर, आपलं शिक्षण आणि समाजाची गरज यांची सांगड व्यवस्थित जुळून येते आणि करिअर नीट यशस्वी होतं. आणि दुसरं म्हणजे, अंगभूत क्षमतांच्या अभावी पुस्तकी शिक्षणाला मर्यादा येतातच. मग जिथं आपल्या क्षमतांचा स्वत:च्या प्रगतीसाठी उपयोग होईल, अशा क्षेत्रातलं शिक्षणच का घेऊ नये? संगीत, नृत्य,नाट्य, चित्रकला, अशा विषयांमध्येच करिअर करू इच्छिणाऱ्यांनी केवळ ‘लोक काय म्हणतील?’ या एकाच विचारापायी विद्यापीठाची पदवी घेणं अनिवार्य आहे का? पाॅटरी मध्येच आवड असणाऱ्या मुलाला किंवा मुलीला ‘नावापुरती का होईना, पण डिग्री मात्र हवीच’ असा हट्ट धरून शिकायला का लावलं जातं? ओरिगामीची आवड आणि त्यातच उत्तम गती असणाऱ्या मुलीला ‘स्थळ कसं मिळणार?’ म्हणून ग्रॅज्युएट व्हायला का लावलं जातं? तबला उत्तम वाजवणाऱ्या आणि त्यात १३-१४ वर्षं गुरूंकडे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेल्या, अलंकार पर्यंत शिकलेल्या मुलाला ‘यावर तुला मुलगी कोण देणार?’ म्हणून डिग्री घ्यायला का लावलं जातं? प्रत्येकानं ग्रॅज्युएट झालंच पाहिजे, या हट्टाला नेमका कुठला तार्किक आधार आहे? या प्रश्नांची उत्तरं आधुनिक भारतातले तथाकथित सुजाण नागरिक कधी विचारताना किंवा चर्चा करताना दिसत नाहीत मला..! 
     चला, आता दुसरीही बाजू बघूया - न शिकलेला माणूस आम्हाला मुख्यमंत्री म्हणून चालतो, महापौर म्हणून चालतो, नगरसेवक म्हणून चालतो. न शिकलेल्या माणसाला केवळ त्याच्या वयाच्या आधारावर मतदानाचा अधिकार मिळतो, ड्रायव्हींग लायसेन्स मिळतं. न शिकलेल्या माणसाला सामाजिक संस्था, शिक्षण संस्था काढता येते. न शिकलेल्या माणसाला कारखाना काढता येऊ शकतो. न शिकलेला माणूस बिल्डर होऊ शकतो, डेव्हलपर होऊ शकतो, व्यापारी होऊ शकतो. न शिकलेल्या माणसाचं हाॅटेल उत्तम चालू शकतं, त्याची पतसंस्था चालू शकते, त्याचं झेराॅक्स दुकान चालू शकतं, त्याचं कपड्यांचं-मिठाईचं-भांड्यांचं-मोबाईल फोन्सचं-लाॅन्ड्रीचं- वाणसामानाचं दुकानही बिनबोभाट चालू शकतं. न शिकलेल्या माणसाला निरनिराळ्या गोष्टींच्या एजन्सीज् मिळू शकतात. न शिकलेल्या माणसाचं आॅटोमोबाईल शोरूम असू शकतं, त्याचं मल्टीप्लेक्सही असू शकतं. न शिकलेल्या माणसाला मंगल कार्यालय चालवता येऊ शकतं, वसतिगृह चालवता येऊ शकतं. न शिकलेल्या माणसाला स्वत:चं विमानही विकत घेता येऊ शकतं, आयपीएल ची टीम ही विकत घेता येऊ शकते. यातली कोणतीही गोष्ट करण्याकरिता औपचारिक शिक्षणाची पात्रतेची अट आहेच कुठे? 
       न शिकलेल्या माणसांचं जर वर उल्लेखलेल्या सगळ्या मूलभूत गोष्टींमध्ये कुठेही, काहीही कणभरानंही अडत नसेल तर मग केवळ औपचारिकता म्हणून डिग्रीचा अट्टाहास कशाकरिता? याचाच अर्थ असा की, शिक्षणाची मूळ आवश्यकताच आता नेमकेपणानं निश्चित करण्याची नितांत गरज आहे. हा नेमकेपणा एकदा सापडला की, साक्षरतेकरिता शिक्षण की सुसंस्कृततेकरिता शिक्षण? या प्रश्नाचंही उत्तर आपोआपच मिळून जाईल. ३५% गुण मिळाले की उत्तीर्ण होता येतं पण त्या गुणांवर पुढचं काहीच ठरवता येत नाही. असेच गुण असतील तर, पदव्युत्तर शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच असं नाही. मग, यावर उपाय काय? उपाय एकच आहे : तो म्हणजे - शिक्षणाची नेमकी गरज नव्याने निश्चित करणे आणि शिक्षणातली उत्तीर्ण होण्याविषयीची धोरणं बदलणे...!  माणसानं शिकूच नये, असा या मागचा दृष्टीकोन अजिबात नाही. माणसानं आपली अंगभूत क्षमता आणि खरी आवड यांनाच प्राधान्याने महत्व देऊन शिक्षण निवडावं, असं माझं मत आहे. आणि समाजानंही हा विचार आता स्वीकारला पाहिजे. वाढत्या स्पर्धेत आपण बेडकाचाही बैल करायला निघालो आहोत, यातला भविष्यातला अनर्थ वेळीच लक्षात घेतला पाहिजे. अगदी साध्या शब्दांतच सांगायचं झालं तर- कोंबडी, म्हैस आणि नारळाचं झाड यांच्यापैकी कुणाकडे अंडं, दूध आणि नारळ मागायचा, याचं लाॅजिक समजलं तरी पुष्कळ झालं. नारळाच्या झाडाकडं अंडं मागू नये, म्हशीकडून नारळाची अपेक्षा करू नये आणि कोंबडीकडे दूध मागू नये. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नैसर्गिक वकुबाप्रमाणं मनसोक्त वाढू द्यावं, फुलू-फळू द्यावं आणि आनंदानं जगू द्यावं, इतकं सरळ, साधं आणि सोपं गणित आहे हे.
     समाज म्हणजे तरी कोण हो? तुम्ही, मी, आपण सगळे म्हणजेच समाज ना? मग आपण आपला दृष्टीकोन बदलला तर आपसूकच समाजाचा दृष्टीकोन बदलायला सुरूवात होईलच ना..!

1092. ज्ञानबिडीतून खरोखर धूर निघाला होता

      बुलेट वाशिंग करावं म्हणून घरातून बाहेर पडलो. दादाच्या पेट्रोल पंपाजवल एक वाशिंग सेंटर आहे तिथे गेलो. बरीच गर्दी होती. नंबर लावून सौ ने दही आणायला सांगितलं होतं म्हणून दही आणण्यासाठी डेअरी कडे निघालो, सूतगिरणी चा सिग्नल ओलांडला अन एक बावळट गाडीसमोर आलं. 'मरायचं का रे !' मी ओरडलो..! 
समोर नाम्या होता. मी त्याला ओळखलं होतं पण त्याने मला कदाचित ओळखलं नाही पण मरायचं का म्हणल्यामुळे तो रागावलेला दिसत होता.
'आरं दमानी हाक की गाडी मग?' नाम्या
'पांढरी झालेली वाढलेली दाढी, बसलेली गालफाडं, डोळ्याच्या खोबणीत खोल गेलेली बुबुळ, काळीशार ओठं, रंगाचे शिंतोडे उडालेली पॅन्ट, वर वर्षानुवर्षे गाठोड्यात बंदिस्त असलेल्या कपड्याची नेमकीच सुटका झालेला शर्ट. क्षणभर त्याची अन माझी नजरानजर झाली, क्षणातच मी त्याला ओळखले होते. गाडी बाजूला घेतली. बंद केली. आता मात्र तो घाबरला होता, त्याने मला ओळखले नव्हते, तो दुरूनच बोलला,
'जावु द्या ना साहेब, गलती झाली.' अन जवळ आला.
त्याची फिरकी घ्यावी म्हणून मी बोललो, ' नाम्या, मरायची घाई झाली का रे ?'
आता मात्र त्याच्या डोळ्यातली भीती गेली अन अनपेक्षितपणे कसला तरी ओळखीचा प्राणी समोर आलाय खरा पण ह्या प्राण्याला आपण कुठे, केंव्हा, कधी भेटलो असन असा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता.
'साहेब, म्या ओळखीलं नाय तुम्हास्नी !' नाम्या
'साल्या, मी साहेब नाही. ओळख पहिले.' गाडीवरून उतरत मी बोललो.
त्यानं डोक्यावर बराच ट्रेस दिला पण त्याचा प्रश्न काही सुटेना. 
'मायच्यान, नाय ओळीखलं सायेब.' नाम्या म्हणाला.
नाम्या म्हणटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याचे नाव नाम्याच आहे याची मला खात्री झाली होती. 
आता जास्त अंत न पाहता मी त्याला बोललो, 'अरे मी तुझा क्लासमेट छोट्या.' 
त्याचा चेहरा चिंताक्रांत, अभ्यासक्रमात नसलेला प्रश्न वार्षिक परिक्षेत आल्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियेसारखा त्याचा चेहरा झाला होता. पण झटक्यात प्रश्नाचे उत्तर सापडावे तसा तो आनंदाने उद्गारला, 
" छोट्या, तू ? मायला,आरं ओळखुच आला नाय रं !'
पटकन त्यानं पुढं होऊन आपल्या कळकट अन माझ्या इस्त्रीच्या कपड्याची तमा न बाळगता घट्ट मिठी मारली, 
त्याच्या मिठीत मैत्रीचा, प्रेमाचा, जुन्या आठवणींचा अन लहानपणाचा ओलावा  स्पष्ट जाणवत होता.
त्याचे डोळे पाणावले. तब्बल वीस वर्षांनंतर आम्ही भेटलो होतो. आज मला मनस्वी आनंद झाला होता, क्षणभरातच अनेक स्मृती वर्षानुवर्षे दबून पडलेला ज्वालामुखी फुटावा अन लाव्हारस बाहेर पडून वाट मिळेल तिकडे स्वैरभर  पळावा तसे मन आठवणी घेऊन पळत होते. माझे डोळे सुद्धा पाणावले होते. रस्त्याने येणारे जाणारे आमचे हे मित्रप्रेमाचे मिलन पहात होते. पण,  त्याला ,अन मला ,त्यांची अजिबात पर्वा नव्हती. 
     नाम्या म्हणजे शालेय जीवनातलं मी अनुभवलेलं एक जबरदस्त रांगडं व्यक्तिमत्व. अभ्यासाकडं नेहमी दुर्लक्ष! आईच्या अन शिक्षकांच्या धाकाने आमच्या वह्या घेऊन त्याचा गृहपाठ पूर्ण व्हायचा त्यामुळं तो आमचा फॅन. कर्जामुळं बापानं आत्महत्या केली होती, आईनं तळहाताच्या फोडाप्रमानं जपून याचा सांभाळ केला. त्याच्या आईच्या हातच्या बाजरी, ज्वारीच्या भाकरी,आंब्याचं लोणचं अन ठेचा,कारळाची-जवसाची चटणी मी गृहपाठ पूर्ण करण्याच्या मोबतल्यात अनेक वेळा खाल्ली होती. सध्या आठवलं तरी तोंडाला पाणी सुटावं अशी स्वर्गीय चव ! त्याच्या रांगडेपणावर एक वर्गमैत्रीण पण फिदा होती नाम्यावर. पण गेले ते दिवस अन राहिल्या फक्त आठवणी. 
'चल चहा घेऊ.' मी म्हटले.
'मायला ह्यो काय च्या चा टाइम हाय का ?' नाम्या नेहमीच्या टोनिंग मध्ये बोलला.
'मग चल काहीतरी खाऊ.' मी म्हटले....
तसा तो खळखळून हसला, 'पाजायची तर, काटर पाज !'
त्याच्या या बोलण्यावर कमीतकमी त्याच्यासाठी तरी माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हते ! 
'चल'... मी बोललो.
अगदी दहा-पंधरा फुटाच्या अंतरावर एका नाल्यावर एक 'देशी दारूचे दुकान' अभिमानाने उभे होते. त्याला पुढे बार मध्ये जाऊ म्हणटलो पण हात झटकून नकार देत तो देशी दारुच्या दुकानाकडे निघाला देखील. शहरातील ५३ व्या दरवाजातून प्रवेश करावा तसा मी आत प्रवेश केला. माझे रोजच्या प्रतिज्ञेतील काही बांधव आपली मान मुरगळून पडले होते, काही पेंगत होते तर काही तरंगत बाहेर पडत होते. बऱ्याच दिवसापासून झाडू मारलेला नव्हता, दुर्गंधी पसरलेली अन आतच्या खोलीजवळ आलो की दारूचा उग्र दर्प सुटला होता, पण आज नाम्यामुळे सर्व सहन करणे होते. नाम्या काउंटर वर गेला, 'सेठ, काटर द्या !' म्हणत माझ्याकडे पहात होता. मी लगोलग खिशात हात घालून पाचशे ची नोट काढली अन त्याच्या जाळीच्या बंदिस्त खिडकीतून आत ढकलली. 
'सुट्टे दे रे !' आतला मनुष्य तावाने बोलला.
'किती ?' मी बोललो,
'पंचेचाळीस दे !' तो म्हणाला,
पाचशेची परत घेत त्याला पन्नासची दिली. पाच परत देण्याऐवजी त्याने एक फुटाण्याचे पाकीट फेकले. नाम्याने ते परत देत दोन पाणी पाऊच घेतले. माझ्यासाठी सर्व नवीन होते पण त्याची जणू पीएचडी झाली असा तो वावरत होता. त्याने समोरच्या नळावर एक पडलेला काचेचा ग्लास धुतला अन त्यात ती देशी ची क्वार्टर ओतली ! ....पूर्ण ..
अर्धा पाणी पाऊच दाताने फोडून ओतला अन ग्लास तोंडाला लावला. डोळे बंद, नरड्यातला मणी खालीवर करत अर्धा ग्लास त्याने हापसला. अर्धा रिचवल्यावर थांबला अन जवळ पडलेल्या मिठाच्या वाटीतून चिमूटभर मीठ घेऊन यज्ञात फेकावे तसे तोंडात फेकले, तोंड कसेतरी करत डोळे उघडून मला बोलला, 
'मग, काय चाललंय तुझं ? काय करतोस ?'
'आपली नौकरी अन दुसरं काय ?' 
'बरंय मर्दा तुह्यासारखं मोहं नशीब कुठं' नाम्या उदगरला.
'बरं म्हातारं, म्हातारी कशी हाइत ?' लगेच विषय बदलत तोच बोलला.
'बरे आहेत, आता आम्ही सगळे भाऊ, आई वडील इथेच एकत्र राहतो.' मी म्हणलो...
मान हलवत त्याने समाधान व्यक्त केले.
'आई कशी आहे? तू इकडं कधी आला ?' मी त्याला विचारलं.
उरलेला अर्धा ग्लास त्याने उचलला अन एका झटक्यात रिचवला, मिठाची चिमूट तोंडात टाकली अन माझ्या खांद्यावर हात टाकत,  मला बाहेर घेऊन आला. खिशातून गायछाप काढली, डाव्या हातावर तंबाखू टाकून पुडी खिशात ठेवली. चुना डब्बी काढली डब्बीतून अंगठ्याच्या नखाने चुना काढून तंबाखूवर लावला अन तंबाखू चोळू लागला. तंबाखू चोळता चोळता बोलू लागला.
'माय गेली ! आठ वरीस झालं. लगीन झालं अन पणोती लागली. दोन एकरात पोट कसं भरणार?  इथं साडू राहतू त्येच्या वळखीनं काम धंदा करायसाठी इथं आलो. हाताला मिळण ते काम करतु.' 
'मुलं किती आहेत ?' मी म्हटलं,
'मुक्ता अन सोपान दोघंच हाइत.' नाम्या उत्साहाने बोलला.
'त्यायची माय वरीस झालं, भांडण करून माहिरी गेली.' नाम्या तंबाखू चघळत  बोलला.
'पण मर्दा, माही मुक्ता लय हुशार हाय, लय समजदार पण हाय, सगळा सैपाक करती, सोपानचं समदं आवरती, त्येचा अभ्यास घेती अन स्वताचा अभ्यास करून वर्गात नेहमी पयली येती. लय गुणाची हाय माही मुक्ता.' भावुक होत तो बोलत होता. थोडा झिंगल्यासारखा वाटत होता ! पण मुलीचं कौतुक तोंडभरून करत मात्र थकत नव्हता.
'हाडळणीच्या पोटी जलमली माही मुक्ता पण तिची उलीशिक पण सावली पडली नाय तिच्यावर !' नाम्या बोलला.
बायकोबद्दल भयंकर राग अन मुलीबद्दल अत्यंत कौतुक असा संगम त्याच्या बोलण्यात होता.
'कितव्या वर्गात आहे रे ती ?' मी बोललो.
'नववीत हाय पण दहावीची पुस्तकं खाडखाड वाचती ती ! तिच्यासाठी म्या कायपण करणं पण तिला लय शिकवण अन मोठी सायब बनविनं !' बोलतांना त्याचे डोळे थोडे पाणावले.
'असं दारू पिऊन तिचं भविष्य कसं घडवशील तू ?' मला न राहवून मी बोललो.
'त्या अवदसामूळं लागली रं दारुची सवय !' नाम्या सयमाने बोलला.
'ती गेली पण तुझी सवय तशीच राहिली ना ! ती गेली ना आता तर तू पण दारू सोडून दे अन 'मुक्ता-सोपान' कडे लक्ष दे !  इथलं शिक्षण खूप महाग आहे रे राजा !' मी बोललो.
तितक्यात त्याला लांबवर त्याची मुलगी शाळेतून परत येतांना चौकात दिसली, 'मुक्ता आली शाळेतनं!' मला ये म्हणत तो तिच्याकडे आवाज देत धावला. मी गाडी वळवून चौक ओलांडून तिच्या जवळ गेलो. अतिशय गोड मुलगी होती. नाम्याने ओळख करून दिली, मी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत तिच्या शाळेबद्दल अन अभ्यासाबद्दल चौकशी केली, बोलण्यात अगदी चुणचुणीत होती, प्रश्नांची पटापट उत्तरे देत होती अन नाम्याच्या चेहऱ्यावर त्याचे समाधान अन तिचे कौतुक दिसत होते. गरिबी असूनही अगदी टापटीप दिसत होती. तिच्या पाठीवर अडकवलेल्या दप्तराकडे माझे लक्ष गेले, अनेक ठिकाणी सुईदोऱ्याने शिवलेले अन झिरझिर झालेले दिसत होते. मला राहवले नाही. मी तिला चल म्हणून हाताला धरून बाजूलाच एका स्टेशनरी वर नेले, दुकानदाराला दप्तर दाखवा म्हणटले.  त्याने चार-पाच प्रकारची दप्तरे दाखवली. एका दप्तरावर तिची नजर खिळली,  'Sky bag' लिहलेलं होतं त्यावर !
'हे आवडलं का तुला ?' मी दप्तरावर हात ठेवत तिला बोललो.
'नाही काका, मला काही नको !'
 ती नाम्याकडे बघत बोलली.
मी तिला बऱ्याच विनवण्या केल्या पण ती काही सांगेना. मी नाम्याकडे पाहिलं !
'आपलेच काका आहेत घे !' नाम्या म्हणाला.
मी ते दप्तर उचललं अन तिच्या हातात दिलं. 
'हे नको काका, हे खूप महाग असतं .' मुक्ता म्हणाली
'असू दे गं, तुझ्या आनंदापुढं खूप स्वस्त आहे.' 
'पण तुला कसं माहित कि हे महाग आहे ? मी म्हटले.
'आमच्या वर्गात दोन तीन मुलींकडे आहेत अशा बॅग, महाग महाग म्हणून मिरवत्यात त्या !' मुक्ता काहीश्या द्वेशाने बोलली.
'आता उद्यापासून तू पण मिरवायचं !' मी हसून बोललो. 
सोपानसाठी अन मुक्तासाठी चॉकलेट घेऊन दुकानदाराला पैसे दिले अन मुक्ताला घरी जाण्यास सांगून मी पुन्हा नाम्याकडे मोर्चा वळवला.
'बघ नाम्या, तुझ्या मुक्ताला माहित होतं की ते दप्तर महाग आहे म्हणून जुनं दप्तर शिवून शिवून ती वापरत होती अन तिला मी घेऊन देत होतो तरी ती महाग आहे म्हणून नको म्हणत होती. वर्गातल्या मुली तिच्या फाटक्या दप्तराला पाहून हसत असतील पण तिने तुला कधीच काहीच सांगितलं नसेल. ती एवढी समजदार आहे की स्वतःच्या भावना मनातच दाबून आपल्या मोलमजुरी करणाऱ्या बापाला त्रास होऊ नये म्हणून आपलं मन मारते. सगळं घर सांभाळते, अन तू असा..?  दारू सोडू शकत नाहीस तू ? दारू पिणाऱ्याला तर कारणच लागते पण तुझ्याकडे दारू सोडण्यासाठी कारण आहे, 'मुक्ताचं भविष्य' !!' मी माझ्यापरीने त्याला ज्ञानबीडी पाजून मोकळा झालो. नाम्या ढसाढसा रडत होता, मी त्याच्या पाठीवर हात ठेवला. नाम्याला गोष्ट पटली होती अन त्याने माझ्यासमक्ष निर्धार केला की या क्षणापासून दारू सोडणार ! पण दारुड्याचं काय खरं असत, आज सोडली अन उद्या धरली !  पण बालमित्र असल्याने त्याच्यावर विश्वास टाकत मी त्याचा निरोप घेऊन निघालो. 
    या घटनेला तब्बल एक वर्ष उलटलं आज ! आज सकाळीच मुक्ता, त्याच चौकात एका ATM जवळ भेटली. खूप आनंदी होती, कालच तिचा दहावीचा गणिताचा पेपर झाला होता अन ती मोठ्या आत्मविश्वासाने नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्क मिळतील असे सांगत होती. कुठेतरी जाणार होती, मैत्रिणीची वाट बघत होती.
"काका , THANK YOU बरं का ! " मुक्ता मला बोलली.
कदाचित दप्तरासाठी म्हणत असावी पण उत्सुकता असल्यानं, "कशाबद्दल गं ?" मी बोललो.
'तुमच्यामुळं बाबांनी दारू सोडली. आता घरी लवकर येतात. आमच्याबरोबर जेवतात अन आई पण परत आली अन मला अभ्यासासाठी खूप वेळ भेटला त्यामुळं माझा खूप अभ्यास झाला !' मुक्ताच्या डोळ्यात खळकन पाणी आलं.  एवढ्यात मुक्ताची मैत्रीण तिथे  आली, तीने स्वताःला सावरत माझा निरोप घेऊन निघाली, माझ्या ही  पाण्याने भरलेल्या डोळ्यातून तिची पाठमोरी आकृती दूरवर जातांना अस्पष्ट दिसत होती. तिचा 'Thank You' माझ्या हृदयावर कायमचा कोरला गेला.  छाती फुगल्यासारखी वाटू लागली. कधी नव्हे तो आज माझाच मला अभिमान वाटत होता.  कधीनव्हे ते माझ्या डोळ्यातून आलेले अश्रू हाताने पुसत घराकडे परतलो .
आज ज्ञानबिडीतून खरोखर धूर निघाला होता ....!!!

1095. शेवटचा निरोप समारंभ

 आज आयुष्यात पहिल्यांदाच,
तिला इतका मानपान मिळाला.
असा मानपान मिळण्यासाठी,
तिने पुनः जन्मा यावे,
असा विचार क्षणभर डोकावला.

आज तिच्या घरी सर्वच आले,
माहेरचे, सासरचे, मानाचे,
अन पानाचे...
तिने नाही कुणाच्या
पायाला हात लावला,
तरी कुणालाच तिचा
राग नाही आला...
खरचं आज तिचा,
पाहुणचार वेगळाच झाला..
खरंच हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

ती आज पहाटे उठली नाही,
म्हणून कुणीच तिला
हटकले नाही...
उशिरा का असेना तिने उठावे
सगळ्यांनीच तिच्या विनवण्या केल्या,
खरंच आयुष्यात असा
क्षण पहिल्यांदा आला... 
हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

नेहमीच आटप म्हणून
कटकट करणारा नवरा
आज स्वतःच तिची
तयारी करायला लागला,
तिने त्याचं
आज्ञा पालन नाही केलं
तरी साश्रू प्रेमाने तिला,
भिजवू लागला... 
खरंच आयुष्यात पहिल्यांदाच
नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला...
हा शेवटचा निरोप 
समारंभ थाटात पार पडला..

तिची नवी साडी नेहमीच
हसण्याचा विषय झाला, 
आज सर्वांनी तिला 
पैठणीचा आहेर दिला...
खणखणत्या बांगड्यांचा चुडा भरला, 
तरी आज कुणाच्या डोळ्यात
उपहास नाही दिसला... 
खरंच आयुष्यात पहिल्यांदा 
तिच्या सौंदर्याचा गौरव झाला... 
खरंच हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

आज तिच्या डोळ्यात
स्मित हास्य, 
दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र
आसवांचं रहस्य...
तिचे हात कुणाचे
अश्रू नाही पुसायला गेला, 
तरी प्रत्येकजण तिच्यासाठी हळहळला...
खरंच आयुष्यात पहिल्यांदाच
जग तिच्यासाठी रडला...
हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

आज तिला कुणाचीच
पर्वा नव्हती,
सगळ्या बंधनातून ती मुक्त होती...
आक्रोश करून पुनः तिला
बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला,
आज पहिल्यांदा जगाला
तिचा मोह झाला... 
खरचं हा शेवटचा निरोप 
समारंभ थाटात पार पडला...

जिवंतपणी नेहमीच तिच्यावर
जबाबदारी राहिली.
थोडीशी चुकली तर
तिला धारेवर धरली...
आज सर्व त्यागून ती
निर्धास्त झाली,
तरी गुलाबाची शेज सजवून
सर्वांनी तिची कदर केली...
आज पहिल्यांदा
काट्याशिवाय गुलाब 
तिच्या वाट्याला आला... 
खरंच हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

आज प्रत्येकाने तिचा
सोहळा पाहिला, 
बाकी ती शांत होती
तिला पाठवणारा प्रत्येकजण रडला...
घरचाही रडला, दारचाही रडला,
पाठचाही रडला, पोटचाही रडला...
लहानही रडला, मोठाही रडला,
जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला...
मुलांनी एकच गलका केला, 
तेव्हा तिच्या स्त्रीपणाला
खरा अर्थ प्राप्त झाला...
खरचं हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

कविता कुणाची आहे काय माहिती,
पण स्पर्शून गेली आपण या गृप वरील
सर्व जण स्त्रियांना योग्य सन्मान,प्रेम देतोच 
पण कविता वाचून अजून भरभरून प्रेम दया
त्या माऊलीला जी सर्वासाठी खपते, झिजते.
नेहमी सकारात्मक विचार करा...
स्त्री जन्माची कहाणी 
प्रत्येकाच्या डोळ्यात आसवे आणणारीच असते.

💙RESPECT WOMEN...💙💝💙

1094. ...आणि एक निर्णय

     एक ताबा सुटलेली भरधाव कार लग्नावरून परतणाऱ्या डॉ. उमेश आणि अश्विनी सावरकर आणि त्यांची केवळ ३ महिन्यांची बछडी मीरा, यांच्या कारला अमरावती जवळ जोरदार धडक देते. आई कमरेतले हाड तुटून आणि चिमुरडी मुलगी मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन बेशुध्द होतात. रस्त्यावरची काही माणसे गंभीर जखमी डॉ. उमेश आणि अश्विनी यांना एका हॉस्पिटलमध्ये आणि प्रसंगावधान ठेऊन लहानग्या मीराला एका पेडीएट्रीक हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. मीराला दाखल केल्या केल्याच व्हेंटिलेटर लावला जातो, दुसऱ्या दिवशी जरा सावरलेले डॉ. उमेश मिराच्या हॉस्पिटलमध्ये पोचतात. जवळपास ब्रेन-डेड झालेली मीरा काही केल्या वाचणं शक्य नाही हे डॉ उमेश यांच्या लक्षात येतं, कमरेचं हाड मोडल्याने गंभीर जखमी असलेल्या पण आता शुद्धीवर असलेल्या डॉ अश्विनी यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये परत येऊन जवळ घेतात, पतीचे डोळे पाहून डॉ अश्विनी यांचे डोळे सुद्धा पाण्याचे डबडबतात. पतीच्या कानात येऊन त्या कुजबुजतात,”ऑर्गन डोनेशन.” बांध फुटलेले दोघे एकमेकांना सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहतात.
     ते स्वतः डॉक्टर असल्याने आणि या प्रकारची पूर्ण माहिती असल्याने डॉ. उमेश आता ऑर्गन डोनेशनच्या तयारीला लागतात, स्वतःचे आभाळाएव्हढे दु:ख बाजूला ठेऊन स्वतःच्या पोटच्या पोरीचे ऑर्गन कुणाला उपयोगी ठरू शकतील याची देशभरातली यादी तपासायला लागतात, ज्यांच्यात मीराचे अस्तित्व जिवंत राहील अशी दोन नावे मिळतात. एव्हाना मीराला व्हेंटिलेटरवर ठेवून चार दिवस झालेले असतात, वेगाने पावले उचलली जातात, मीराचे अवयव काढून एअर ऍम्ब्युलन्सने शिफ्ट करायची तयारी केली जाते. हे सगळ करायला फक्त चार तास उरतात, डॉक्टर दांपत्य पोटाच्या पोरीला छातीशी कवटाळून बसतात, इतर डॉक्टर ऑर्गन डोनेशनची तयारी सुरु करतात. ग्रीन कॉरिडॉर सुद्धा तयार केला जातो आणि तितक्यात. ...तितक्यात मीराला जोरदार हार्ट अटॅक येतो. आई-वडलांच्या समोर मीरा अखेरचा श्वास घेते. दु:खाने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा आई-वडील फोडतात. पोटच्या पोरीचे अस्तित्व सुद्धा आता जपता येणार नाही या विचाराने आधार देण्यापलीकडे जाऊन कोलमडून जातात.
     हळूहळू दिवस, आठवडे, महिने जातात. कामे सुरु होतात. आई-वडील उभे राहायच्या प्रयत्नात असतात. अचानक एके दिवशी ब्रेकफास्ट टेबलावर, मीरा असली असती तर मीराचा वाढदिवस दोन महिन्यांवर आलेला दोघांना जाणवतो. आत्तापावेतो सांभाळलेले दोघेही जण पुन्हा एकदा फुटतात. एकमेकांना सावरत असताना धीरोदात्तपणे काही निर्णय घेतात. दोघांचेही डोळे अंतस्थ आनंदाने लकाकतात. दोन महिन्यांवर आलेल्या मिरच्या वाढदिवशी कुणा लहानग्याला, ज्याला सरकारी मदत मिळू शकत नाही अश्याला वैद्यकीय मदत देऊन जीवन देण्याचे ठरवतात. शोधाशोध सुरु करतात. मुंबईतल्या देवनार आणि अंबेजोगाई इथली दोन मुले सापडतात. दोघांचेही ओपन हार्ट ऑपरेशन होणार आहे आणि दोघेही फार गरीब असून त्यांना सरकारी कुठलीही मदत मिळण्याची शक्यता नाहीये. दोघांनाही संपर्क केला जातो. ऑपरेशनचा दिवस ठरतो. विख्यात हार्ट सर्जन तयार होतात. ऑपरेशनचा दिवस उजाडतो. त्याचं दिवशी दोन्ही मुलांमधल्या एकाला आयत्या वेळी सरकारी मदत जाहीर होते. त्याचे नाव यादीतून गळते. आता उरते मुंबईतल्या देवनार इथली रोजगारीवर काम करणाऱ्या आणि कुठल्याही सरकारी मदतीच्या निकषांवर न बसणाऱ्या श्री. पराटे यांची तिसरी मुलगी पायल. गेल्या तब्बल वर्षभरापासून पैश्यांअभावी ऑपरेशन टाळत असणाऱ्या पायलचे ऑपरेशन सुरु होते. ऑपरेशन संपते. पूर्ण खर्च डॉ. उमेश आणि अश्विनी उचलतात. ऑपरेशन झाल्या झाल्या आणि पायल शुद्द्धीवर आल्या आल्या पायललाही उचलून कडेवर घेतात. आत्मसमाधानाने .मीराला कडेवर घेतल्याच्या आत्मिक आनंदाने. आणि एक निर्णय घेतात. दरवर्षी मीराच्या वाढदिवशी एका ‘मीरा’ला जगवण्याचा.
    डॉ. उमेश आणि डॉ. अश्विनी दोघांचे आभार आणि तुम्हां दोघांच्या सामाजिक आनंदात आम्ही सर्व सव्वाशे कोटी भारतीय नागरिक सुद्धा सहभागी आहोत.

मिलिंद वेर्लेकर,
टीम भारतीयन्स

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

1090. घास

  खुप बेचैनीत रात्र संपली. मुश्किलीने सकाळी एक चपाती खाऊन, घरुन आपल्या शोरूमला निघालो. आज कुणाच्या पोटावर पहिल्यांदाच लात मारायला निघालोय, हा विचार आतल्या आत टोचत होता. जीवनात माझी वर्तणूक राहीली आहे की आपल्या आसपास कुणाला भाकरीसाठी तरसावे लागू नये. पण या वाईट काळात आपल्याच पोटावर मार पडत आहे.   
      दोन वर्षांपूर्वीच आपली सर्व जमा बचत गुंतवूण कपड्यांचं शोरुम उघडलं होतं. पण दुकानातील सामानाची विक्री निम्म्यावर आली आहे. आपल्या कपड्यांच्या शोरूममध्ये दोन मुलं आणि दोन मुली कामाला ठेवल्या आहेत मी ग्राहकांना कपडे दाखविण्यासाठी. लेडीज डिपार्टमेंटच्या दोन्ही मुलींना काढू नाही शकत. एकतर कपड्यांची विक्री त्यांच्यामुळेच जास्त होते आहे. दूसरं म्हणजे त्या दोघींचीही परिस्थिती खूपच गरीब आहे. दोन्ही मुलांपैकी एक जुना आहे आणि तो घरात एकुलता एक कमावता आहे. जो नवा मुलगा दीपक आहे, मी त्याचाच विचार केला आहे. बहुतेक त्याचा एक भाऊ ही आहे, जो चांगल्या ठिकाणी नौकरी करत आहे आणि तो स्वतः, हुशार, मनमिळाऊ आणि हसतमुख ही आहे. त्याला अजून दुसरीकडे कुठेही काम मिळू शकेल. या पाच महीन्यात मी बिलकुल उध्वस्त झालोय. परिस्थिति बघता एक कामगार कमी करणं ही माझी मजबूरी आहे. हाच सगळा विचार करत मी दुकानात पोहोचलो. चारहीजण येऊन पोहोचले होते. मी चौघांना बोलावलं व खूप दुःखी होत म्हणालो.
"बघा, दुकानाची आताची परिस्थिती तुम्हा सर्वांना माहीतच आहे. मी तुम्हा सर्वांना कामावर ठेऊ नाही शकत." 
त्या चौघांच्या कपाळावर चिंता स्पष्ट झळकू लागली. मी बाटलीतील पाण्याचा घोट घेत घसा ओला केला. "कुण्या एकाचा आज हिशोब करुन देतो. दीपक, तुला कुठे दूसरीकडे काम शोधावे लागेल."
"हो काका"  त्याला पहिल्यांदाच इतकं उदास झालेलं बघितलं. बाकिच्यांच्या चेहेऱ्यावर ही काही खास प्रसन्नता दिसत नव्हती. एक मुलगी जी बहुतेक दीपकच्याच घराजवळ रहाते, काही बोलता बोलता थांबली.  
 "काय आहे, बाळ ? तुला काही म्हणायचं आहे का?"
 "काका, याच्या भावाचं पण काम काही महिन्यांपूर्वीच सुटलं आहे, याची आईही आजारी असते."
 माझी नज़र दीपकच्या चेहऱ्यावर गेली. त्याच्या डोळ्यात जबाबदारीचे आँसू होते जे तो आपल्या हसतमुख चेहऱ्याने लपवत होता. मी काही बोलणार इतक्यात दुसरी मुलगी बोलली, "काका ! वाईट वाटणार नसेल तर एक बोलूं?"
 "हो... हो,  बोल ना ! " 
 " कुणाला काढण्यापेक्षा, आमचा पगार कमी करून द्या. बारा हजारांच्या जागी नऊ हजार करून द्या." 
 मी बाकिच्यांकडे बघितलं.
"हो साहेब ! आम्ही एवढ्या पगारावरच काम चालवून घेऊ." मुलांनी माझी अडचण आपसात वाटून घेण्याच्या विचाराने माझ्या मनावरील दडपण जरूर कमी केले‌.
"पण तुम्हा लोकांना हे कमी तर नाही ना पड़णार?"
"नाही काका ! कोणी साथीदार भूका रहावा यापेक्षा हे कधीही चांगले की आम्ही सर्व दोन घास कमी खाऊ."
     माझे डोळे ओले करून ही मुलं आपापल्या कामास लागली. माझ्या नज़रेत माझ्यापेक्षा कितीतरी मोठे होऊन.!

1089. ते दहा तास

       रेल्वेने नागपूरला इन्टरव्ह्यूसाठी चाललो होतोे. रेल्वेतून निव्रुत्त झालेल्या वडिलांच्या पासवर मी रिझर्वेशन केलं होतं.पावसाळा असल्याने गाडीला अजिबात गर्दी नव्हती.ए.सी.डब्यातले माझ्यासमोरचे बर्थ तर रिकामेच होते. नाशिक आलं तसा एक देखणा तरुण बँगा घेऊन आत चढला. माझ्यासमोरच्या बर्थखाली त्यानं बँग ठेवली. तेवढ्यात त्याच्यामागेच एक बाई आत आली. तिला पाहीलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माय गाँड ! काय सुंदर होती ती !
"कुठं जाताय?" तो तरुण मला विचारत होता.
"नागपूरला "मी शुध्दीवर येत म्हंटलं.
" थोडं लक्ष ठेवाल का? मिसेस गोंदीयाला जातेय. एकटीच आहे आणि मुलाची तब्येत जरा नरमगरम आहे." 
तिच्या कडेवरच्या बाळाकडे बोट दाखवून तो म्हणाला.
" हो ठेवेन की. त्यात काय विशेष ! "
मी त्याच्याशी बोलताबोलता तिच्याकडे नजर टाकली. गाडी निघाली तसा तो उतरुन गेला. तिनं खिडकीतून त्याला बायबाय केलं. समोरच्या बर्थवर तिनं मुलाला ठेवलं आणि ती त्याला थोपटू लागली. माझी नजर तिच्या चेहऱ्यावरच खिळली होती. खरोखर इतकी सुंदर स्त्री मी आयुष्यात आजपर्यंत पाहीली नव्हती. मी माझ्या काँलेजच्या मुली आठवून पाहील्या. त्यातली एकही तिच्या जवळपासही येणारी नव्हती. तिचे डोळे,नाक,ओठ, त्वचा,केस फारच सुरेख होते. विशेष म्हणजे तिनं मेकअपही नव्हता केला  तरीही ती अप्रतिम सुंदर दिसत होती. माझ्या लक्षात आलं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतली कोणतीही हिरोईन तिच्याइतकी सुंदर नव्हती. बाळंतपणानंतर बायका बेढब होतात म्हणे. पण तीची फिगर अतिशय सुरेख होती. मनात विचार आला, स्वर्गातील अप्सरा अशाच सुंदर असतील का? की हिच्यापेक्षा जास्त? नाही. यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. मी भान हरपून तिच्याकडे बघत होतो. ती मात्र तिच्या विश्वात मग्न होती. मुलाला बाटलीने दुध पाजतांना, त्याला काहीतरी खाऊ घालतांना ती त्याच्याशी गप्पा मारत होती.अधूनमधून तो किरकिर करायचा तेव्हा ती त्याला प्रेमाने थोपटत होती.
     एकदोनदा तिनं माझ्याकडे पाहीलं. तेव्हा मी घाईगडबडीने दुसरीकडे नजर फिरवली. नंतर मी मोबाईलशी चाळा करु लागलो पण माझी नजर तिच्याकडेच वारंवार वळत होती.जांभळ्या साडीत ती अप्रतिम सुंदर दिसत होती. पण त्या सौंदर्यात कुठेही उथळपणा, भडकपणा नव्हता. घरंदाजपणा आणि शालीनता त्यात ओतप्रोत भरलेली होती. काँलेजमध्ये असतांना या बाईने अनेकांना वेड लावलं असणार हे स्पष्टच होतं. ती जर विवाहित नसती तर मीसुद्धा  तिच्या प्रेमातच पडलो असतो यात शंका नव्हती. मी तिच्याकडे वारंवार बघतोय हे तिलाही कळत असावं पण ती ते चेहऱ्यावर दाखवत नव्हती. आठ वाजले तसा मी थोडा भानावर आलो. भुक लागल्याची जाणीव मला झाली. मी बँगेतून डबा काढून जेवण केलं.साडेआठ वाजता तिचा मुलगा झोपला असावा. तिनं बँगेतून एक सुबकसा मोठा डबा काढला आणि ती जेवायला बसली.
"या जेवायला"
अनपेक्षीतपणे तिच्याकडून आलेलं निमंत्रण ऐकून मी एकदम  गडबडून गेलो.
" मी आताच जेवलो बघा."
ती सौम्य हसली. मग म्हणाली
" हो पाहिलं मी. हे स्वीट तरी घ्या." एका डिशमध्ये बंगाली मिठाई ठेवून तिनं मला दिली. मी ओशाळलो कारण मी जेवत असतांना तिला विचारलंसुध्दा नव्हतं.
" नागपूरला रहाता?"
तिनं जेवता जेवता विचारलं.
"नाही. इंटरव्ह्यूला चाललोय"
" कोणत्या कंपनीत?"
मी कंपनीचं नाव सांगितलं.
"इंजीनियर आहात?"
"हो मी बी.ई. केलंय केमिकल मध्ये" मी जरा अभिमानानेच सागितलं.
"मी सुध्दा इंजीनियर आहे" ती म्हणाली."एम.ई.केलंय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये"
मी वरमलो. माझ्यापेक्षा ती जास्तच शिकली होती.
" मग जाँब करताय कुठे?"मी विचारलं
" नाही. करायची खुप इच्छा होती. पण एम.ई. झाल्यावर लगेच लग्न झालं आणि सगळंच राहून गेलं."
" मिस्टर काय करतात तुमचे?"मी थोडं इर्ष्येने विचारलं.
" ते सुध्दा इंजीनियर आहेत.एम.एस.केलंय अमेरिकेतून आणि आता फँक्टरीज सांभाळतात." 
" फँक्टरीज?"
" हो.नाशिकमध्ये आमच्या तीन फँक्टरीज आहेत आणि पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंग्लंड, आफ्रिका, अमेरिका आणि गल्फ कंट्रिजच्या मिळून सोळा फँक्टरीज आहेत.अर्थात माझे सासरे, हे आणि माझे दोन लहान दिर मिळून सगळं सांभाळतात."
बापरे !मी गार झालो. एका प्रचंड धनाढ्य आणि कर्तृत्ववान माणसाच्या बायकोसमोर मी बसलो होतो. तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत मी दरीद्री होतो. माझ्यासारखे अनेक इंजीनियर तिच्या फँक्टरीत पगारी नोकर असतील. तरी ती माझ्याशी सहजतेने बोलत होती. कोणताही गर्व किंवा अहंकार तिच्या बोलण्यातून जाणवत नव्हता.
" तुम्ही एकट्याच जाताय? नाही म्हणजे कुणी सोबत नाही आलं?"
एवढ्या सुंदर बाईसोबत रात्रीच्या प्रवासात कुणी नसावं याचं मला आश्चर्य वाटत होतं.
"का? कशासाठी? नाशिकला ह्यांनी गाडीत बसवून दिलं. गोंदियाला कुणीतरी घ्यायला येईलच. एका रात्रीचा तर प्रश्न होता. तसे हे येणार होते पण उद्या फँक्टरीत मुख्यमंत्री येणार आहेत. त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आणि माझ्या मामांची तब्येत सिरीयस आहे त्यामुळे मला तातडीने निघावं लागलं "
" तरीपण कुणीतरी..…."
"अहो मागच्या महिन्यात  मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले. आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे. इथं सोबतीची काय गरज? "
मी चुपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती. मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी ग्रुहिणी असावी पण फँक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिने मला सांगितलं. फँक्टरीच्या प्राँडक्ट्सची, त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगबद्ल तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती. जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता. त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि  कमालीची सुंदर असुनही तिच्यातला नम्रपणा, साधेपणा, तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी हे सर्व पाहून मी खुप  भारावून गेलो होतो.
"थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते"
मी होकारार्थी मान हलवली.
ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला. मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पँसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा ! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा. एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो गोड वाटत होता. मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला.
तेवढ्यात ती आली.
"रडत होता वाटतं !" तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.
थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हांला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पँसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.
"मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो. तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय." तिनं स्पष्टीकरण दिलं.
सकाळ झाली.आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो. कथाविश्व ग्रुप. एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.
"घरी कोणकोण असतं?"तिनं अचानक प्रश्न केला.
" मी,आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीय"
"म्हणजे तुम्हाला नोकरीची खरी गरज आहे"
"हो तर ! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार?"
तिनं पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली. बोलणं झाल्यावर मला म्हणाली "तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मँनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना एसएमएस करते"
मी नाव सांगितलं तिनं एसएमएस केला.
"तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून"
"संजना कोण?"मी विचारलं
"मीच. माझंच नांव संजना" ती हसून उत्तरली.
" थँक्यू व्हेरी मच अँड साँरी."
"साँरी? कशाबद्दल? "तिनं आश्चर्याने विचारलं
" काल मी तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो. मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात, एका मुलाची आई आहात. माझी चुक झाली. आय अँम एक्स्ट्रीमली साँरी फाँर दँट"
तीनं हलकसं स्मित केलं.म्हणाली. "फरगेट इट.अशा नजरांची मला सवय आहे. स्वतःची बायको सुंदर असतांना दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमँरीड आहात आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते."
थोडं थांबून ती म्हणाली" आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहीजेत. खरं ना?"
" नाही नाही" मी घाईघाईने म्हणालो "अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढेन" तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला. नागपूर आलं. मी खाली उतरलो. तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली. निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले. तो लगेच माझ्याकडे झेपावला. मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले. मग त्याला तिच्याकडे दिलं. रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.
"बेस्ट आँफ लक फाँर युवर इंटरव्ह्यू" ती म्हणाली.
"थँक्स" 
जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला. इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्नीकल प्रश्न विचारुन एकशेसाठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली. त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की. संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही. पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खुप चांगली शिकवणही देऊन गेली.

© दीपक तांबोळी

शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

1088. 'Honour' (सन्मान )

      हा तिसरा कॉल होता सागरला आलेला. त्या एका संस्थेकडून. 'स्वप्नपूर्ती' नावाची एक एनजीओ होती ती. जी समाजातील दिव्यांग लोकांसाठी, कामं करत असे. त्यांना शक्य तितकी शारीरिक, मानसिक मदत करून. ह्या समाजात वावरण्याकरिता सक्षम करण्यादृष्टीने, कार्यशील होती ही संस्था. अगदी पहिल्या कॉलमध्येच, सागरला ही माहिती देण्यात आली होती. सागरनेही थोडंफार ऐकून घेतलं होतं. पण जशी ती समोरची व्यक्ती अधिकच माहिती देऊ लागली, त्याने कामाच्या व्यापाचं कारण देत फोन कट केला होता. लगेच त्याने तो नंबर सेव्ह केला स्वप्नपूर्ती नावाने, नी पुढे कंसात लिहिलं 'Do not pick'. काही दिवसांपूर्वी मग ह्याच नंबरवरून त्याला कॉल आलेला, जो त्याने अर्थातच उचलला नव्हता आणि आता पुन्हा त्यांचाच कॉल आला होता तिसऱ्यांदा, जो सागरने पुन्हा इग्नोर केला होता. "डोनेशन साठी किती तो तगादा लावतात मागे, ह्या अशा संस्था. बरं दिलेल्या डोनेशनचा खरोखरंच सदुपयोग होतो की नाही, हे कोणी बघितलंय". असं स्वतःशीच पुटपुटत, सागर पुन्हा आपल्या कामात व्यग्र झाला होता. 
     सागर पारसनीस, एक प्रथितयश आर्किटेक्ट होता आणि त्याची स्वतःची फर्म होती. विसेक जणांचा स्टाफ होता त्याच्याकडे आणि चांगल्यापैकी प्रोजेक्ट्सही होते, हातात त्याच्या. गेल्याच आठवड्यात एका इंग्लिश न्यूज पेपरमध्ये, सागरची नी त्याच्या ह्या आर्किटेक्चर फर्मची सविस्तर माहिती आली होती. आणि त्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासूनच, हे कॉल प्रकरण सुरु झालं होतं. त्यामुळेच सागरचा ठाम समज होता की, डोनेशनसाठीच हे सगळं चालू आहे. संध्याकाळी पाचच्या दरम्यान, सागर एका क्लायंट मिटिंगसाठी बाहेर पडला. बरंच ट्रॅफिक होतं रस्त्यावर, त्यामुळे थांबत थांबतच गाडी चाललेली. कंटाळला होता सागर आणि तितक्यात त्याला त्या स्वप्नपूर्ती संस्थेची आठवण झाली, नी त्याने विचार केला. "तसाही काही टाइमपास नाहीचेय, तर करूया त्यांना फोन. बघू तर मजा, कसं गुंडाळू पाहतायत आपल्याला". म्हणून सागरने फोन लावला तिथे. पलीकडून एका स्त्रीने फोन उचलला. 
सागरने त्याची ओळख देताच, ती स्त्री पहिल्यांदाच बोलून मोकळी झाली की. 
"तुम्हाला केले गेलेले तिन्ही कॉल्स, तुमच्याकडून डोनेशन मिळेल ह्या हेतूने केलेले नाहीत". सागर खरंतर चपापलाच हे ऐकून. पुढे ती स्त्री म्हणाली. 
"आम्हाला अर्थात सवय असते अशा प्रतिसादाची, त्यामुळे आम्ही विशेष मनावर घेत नाही हे. मी तुम्हाला उद्या फोन करणारच होते. उचलला नसतात तर पुन्हा परवा". हे ऐकून बऱ्यापैकी वरमला सागर, नी विचारलं त्याने.
"पण जर तुम्हाला डोनेशन नकोचेय, तर का एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा इतका खाटाटोप?". हे ऐकून ती स्त्री उत्तरली.
 "Thanks for coming straight away on the point. म्हणजे पहिल्या कॉल वेळी मी किती बिझी आहे हे जे तुम्ही दाखवलंत, ते अगदीच काही खोटं नव्हतं. बरं मी ही मुद्द्यावरच येते फार वेळ न घेता. कारण एकदा कॉल कट करून, दोनदा न उचलून, तुम्हीच कॉलबॅक केलायत म्हणजे तुम्ही कुठेतरी चाल्लायत, नी तिथे पोहोचेपर्यंत तुम्हाला मे बी टीपी करायचाय". इतकं बोलून ती स्त्री स्वच्छ हसली, नी इथे सागरने कपाळाला हात लावला. तिनेच पुढे कंटिन्यू केलं. 
"आमच्या संस्थेबद्दल, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतंच त्या दिवशी. तर आमची संस्था दिव्यांगजनांसाठी, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते. ह्यावर्षी येत्या रविवारी, आम्ही 'Parasports' चं आयोजन केलेलं आहे. तेव्हा त्याच्या बक्षीस समारंभाला. बक्षीस वाटपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही यावत, अशी आमची इच्छा आहे. खेळ सकाळी दहा पासून सुरु होणारेत आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास, बक्षीस समारंभ सुरु होईल. तेव्हा तुम्ही अगदी चार पर्यंत आलात तरी चालेल". हे ऐकून सागरच्या मनात आलं की अरे देवा उगीच कॉल लावला. आणि तो म्हणाला.
"अहो काहीतरी काय. मी एक साधा आर्किटेक्ट आहे हो. आणि ह्या आधी असा कधीच कुठेही, प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो नाहीये. त्यातून भाषण वगैरे तर मला बिलकुल जमणार नाही. So it is not my cup of tea. तुम्हाला कितीतरी प्रतिष्ठित नागरिक मिळतील की ह्यासाठी. मी अगदीच रॉंग नंबर आहे हो. मुळात मला आता असं वाटतंय की, तुम्ही पहिल्यांदा मला कॉल केलात तो तर रॉंग नंबर नव्हता लागला ना ?".
ह्यावर त्या पलीकडील स्त्रीचा, पुन्हा एकदा निर्मळ हसण्याचा आवाज आला. शांतपणे म्हणाली ती.
"अजिबात नाही. तुमच्याशीच बोलायचं होतं मला. इनफॅक्ट गेली बरीच वर्ष, मी ह्याच प्रतीक्षेत होते. गेल्या आठवड्यात तुमची माहिती आली पेपरमध्ये, नी मला निमित्त मिळालं". हे ऐकून सागर आश्चर्यानेच उद्गारला. 
"काय? म्हणजे?". 
पलीकडून ती स्त्री पुन्हा खळाळून हसली. नी आणिक काहीही अवांतर न बोलता, जिथे यायचंय त्या ठिकाणाचा पत्ता दिला तिने. सागरने नाव विचारलं तिला, तेव्हा म्हणाली.
"प्रत्यक्षात भेटल्यावर सांगेन की". आणि पुन्हा एकदा छानसं हसत, तिने फोन कट केला. ह्या एवढ्या वेळात, सागर क्लायंटच्या ऑफिसपाशी पोहोचलाच होता. पण तिच्या त्या हसण्यात मात्र, अडकला होता सागर.
रविवार उजाडला. "त्यांनी चार पर्यंत बोलावलंय, म्हणून आपण अगदी तेव्हाच गेलं पाहिजे असं नाही. ज्यांना बक्षीसं द्यायचीयेत, त्यांचे खेळ जरा तरी बघू". असा विचार करून सागर दोनच्या सुमारास दिलेल्या पत्त्यावर, त्या इनडोअर स्टेडियमला पोहोचला. सागरची कार थांबली. ड्राईव्हर लगबगीने खाली उतरला. मागचा दरवाजा उघडत, त्याने फोल्डिंग व्हीलचेअर बाहेर काढून ती व्यवस्थित उघडली. पुढचा दरवाजा उघडला आणि सागरला अलगद पकडून बाहेर काढत, व्हीलचेअरवर बसवलं. दरवाजा बंद करून, गाडी लॉक करून, ड्राईव्हर व्हीलचेअर पकडणार तोच आणि कोणीतरी पकडली ती मागून. ड्राईव्हरने त्यांच्याकडे पाहिलं, तर ती स्त्री म्हणाली.
"तुमचे सर आता आमचा, ह्या संस्थेचा Honour आहेत. सो... मी नेते व्हीलचेअर पुढे". 
सागर संकोचून, नको नको म्हणतच होता तर ती स्त्री एकदम पुढ्यात येऊन उभी राहिली त्याच्या. 
"मी श्वेता पंडित. तिच श्वेता पंडित. जी वीस वर्षांपूर्वी, अगदी मरता मरता वाचली होती. कारण एका देवदूताने वाचवलं होतं तिला. ताबा सुटलेल्या एका भरधाव ट्रकने, उडवलंच होतं तिला की त्या अपरिचिताने तिच्या अंगावर उडी मारून, दूर ढकललं तिला. पण ह्या सगळ्यात त्या ट्रकचं एक चाक मात्र, खाली पडलेल्या त्याच्या कंबरेवरून गेलं. आणि... आणि त्यामुळे तो कायमचा कंबरेखालून.". इतकं बोलल्यावरच, श्वेताच्या गळ्यात हुंदका दाटून आला. सागरही एकदम शांत झाला, नी त्याने त्याच्या ड्राईव्हरला 'ठीकेय' ची खूण केली. चेअर सावकाशीने ढकलत, श्वेता आत घेऊन गेली सागरला. 
    खेळ संपले, बक्षीस समारंभ आटोपला, निघायची वेळ आली. त्यावेळी तिथे बाजूलाच उभा असलेला ड्राईव्हर, सागरपाशी येऊ लागला. श्वेताने पुन्हा त्याच्याकडे पाहून थांबवलं त्याला, नी सागरच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली ती. सागरकडे पाहून बोलू लागली. 
"त्या अपघातातून वाचल्यावर शरीराला जरी काही झालं नसलं, तरी मनाने प्रचंड धसका घेतला होता माझ्या. रस्त्यावरून चालण्याचाही कॉन्फिडन्स उरला नव्हता माझ्यात. ऐन विशीतच, अगदी पार गमावून बसले होते मी माझा आत्मविश्वास. किती मनसोपचार तज्ज्ञ झाले, त्यांची कित्येक सीटिंग्ज झाली. पण माझा अगदी गोळा झाला होता, एकाच जागी पडून असलेला. अशीच पाच वर्ष गेली. नी एकदा एका मराठी वर्तमानपत्रात, एका दिव्यांग तरुणाच्या जिद्दीने आर्किटेक्ट बनण्याच्या प्रवासाची माहिती आली. सागर पारसनीसच्या अफाट जिद्दीची कहाणी. ते सगळं वाचून माझ्या मनात आलं की. आपल्यावरचं संकट स्वतःवर ओढून घेणारा, ते रोज भोगणारा जर जिद्दीने स्वतःचा मार्ग आखू शकतो, मग मी का नाही? हा विश्वास मला त्या दिवशी मिळाला आणि मी उठले, पुन्हा एकदा नव्या जोमाने. तुम्ही... तुम्ही मला, पुन्हा एकदा वाचवलंत. पुढे मी राहिलेलं ग्रॅज्युएशन केलं, लॉ केलं, सोशल वर्कमध्ये मास्टर्स केलं. आणि फक्त नी फक्त तुमच्याच प्रेरणेने, ही संस्था स्थापन केली. दिव्यांगजनांच्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांची, पूर्ती करतो आम्ही. म्हणून ही त्यांची स्वप्नपूर्ती."
हे ऐकून सागरचे डोळेही भरून आले. नी त्याने दिलखुलासपणे हसत, श्वेताकडे पाहून टाळ्या वाजवल्या. श्वेताही तिचं हुकमी लाघवी हसली, नी पुढे म्हणाली.
 "इथे आत तुम्हाला घेऊन येतांना मी म्हणाले होते की तुम्ही आमचा, ह्या संस्थेचा Honour आहात इथे असेपर्यंत. पण आता इथून जातांना, मी विचारतेय तुम्हाला की यापुढे कायमस्वरूपी माझा, माझ्या एकटीचा Honour व्हाल? तसंही तुमचं लग्न झालेलं नाही, हे माहिती करून घेतलंय मी खूप आधीच. आणि मी तर तुमच्यासाठी लग्नाची थांबणारच होते. तसंही आता तुमच्या चाळीशीत माझ्याइतकी सुंदर, तुम्हाला मिळणारही नाही कोणी."
सागरने हसूनच मान हलवली, नी कपाळावर हात मारला. श्वेता सुद्धा मुक्तपणे जिवणी भरून हसू लागली. आणि तिथे बाजूलाच उभ्या असलेल्या ड्राईव्हरने, कडक सॅल्यूट ठोकला सागर आणि श्वेताला. 
एकीच्या प्रेमकथेला एकाने दुजोरा देत, 'Honour' प्राप्त करून दिला होता.

--सचिन श. देशपांडे

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...