मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

1032. हिरो

       जे काही धाडस करायचं ते पंचविशीतच करायचे म्हणून विशाल लहान गावातून मुंबईला येऊन पोचला. सहा फूट उंचीच्या तगड्या व गव्हाळ वर्णाच्या विशालला सिनेमात हिरो म्हणून अभिनय करण्याची इच्छा होती. तो गणित विषय घेऊन BA झाला होता. कॉलेजमध्ये त्याला अभिनयाची अनेक बक्षिसे मिळाली होती. अभिनय क्षेत्रात डाळ शिजली नाही तर एखाद्या शाळेत गणित शिकवण्याचा त्याचा बेत होता. गावातल्या तालमीत कमावलेलं शरीर होतं. प्रयत्नपूर्वक इंग्लिश वर काम केल्याने तो उत्तम इंग्लीश बोलत असे. हिरो होण्यासाठी या सर्व गोष्टींची जरुरी आहे हे त्याला माहित होतं पण मुंबई मध्ये त्याला कोणी मायबाप नव्हता. एक लहानशी खोली मित्राच्या मावशीने दिली होती. त्या खोलीचे भाडे देण्यापुरता पैसा मिळवणारी नोकरी तो शोधत होता. मावशीची ऑम्लेट,पावभाजीची गाडी होती. त्यातून बरा पैसा मिळत होता. मुलगा डबेवाला होता व सून मावशीला मदत करत असे. एक दिवस मावशीची सून तिच्या मुलांना परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून तारस्वरात ओरडत होती. त्याने मावशीला विचारले, “तुझ्या नातवंडाना मी जर शिकवलं तर मला खोली विनामुल्य देशील का?" मावशी हुशार होती. तिने थोडावेळ विचार केला आणि होकार दिला. सातवीतील मिनू व आठवीतला सचिन ही तिची नातवंडे विशाल कडे शिकवणीला येऊ लागली. मुले अभ्यासात ठीक होती पण त्यांना थोडाही आत्मविश्वास नव्हता. डोळे चोळत, केस पिंजारून, तोंडात बोटे घालत ती समोर येऊन बसतं. त्यांना चार चौघांशी कसे बोलायचे, बोलताना डोळ्याला डोळा देऊन बोलणे, बोटे तोंडात, नाकात न घालणे पासून सगळे शिकवायला त्याने सुरुवात केली. सतत कावरीबावरी दिसणारी मिनू चार महिन्यात वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ लागली होती. सचिनला पण चांगले मार्क पडू लागले होते.
     मध्यंतरी विशालने मुंबईच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळवली होती. मुलांना सकाळी शिकवणे, नंतर निर्मात्यांना फोटो व ई-मेल पाठवणे, युट्युब वर बघून मुलांच्या शिकवणीचे विषय तयार करणे व नंतर हॉटेलमध्ये काम असा त्याचा दिवस असे. पैसा बरा मिळू लागला होता पण मुलांना शिकवताना जेवढा आनंद मिळत होता तेवढा वेटरच्या कामात नव्हता. मिनू आणि सचिन मधले बदल बघून त्यांचे मित्र पण ट्युशन साठी विशालकडे येऊ लागले होते. गणित, सायन्स बरोबर, जगात घडणाऱ्या अनेक गोष्टी, त्यावर विचारविनिमय, इंग्लिशचा सराव, मराठी व हिंदी उत्तम करण्यावर विशालचा भर होता. ताठ चालणे, कपडे धुऊन, इस्त्री करून व्यवस्थित घालणे, शरीराची स्वच्छता व भरपूर व्यायाम यामुळे त्याची मुले उठून दिसू लागली. म्युनिसिपालिटीच्या शाळेत जाऊनही उत्तम मार्क मिळवून नंबरात येऊ लागली. बघता बघता मुलांचा नंबर वाढू लागला. त्याने स्वतःचा युट्यूब चॅनेल सुरु केला. “विशाल अंकल के साथ” हा युट्यूब शो लोकांना खूप आवडू लागला. अभ्यासातील ट्रिक्स, कसे वागायचे, कसे बोलायचे, फोनच्या आहारी कसं जायचं नाही, विनम्रता, व्यसनापासून लांब कसे राहायचे, समाजसेवा वगैरे शो viral झाले. युट्यूब चॅनेलला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला.Personality Development साठी तो प्रसिद्ध एक्सपर्टसना बोलवू शकेल एवढा पैसा आता मिळत होता. Global World मधे टिकाव लागण्यासाठी पुढच्या पिढीला हे सगळं शिकवलेच पाहिजे याचा त्याला ध्यास लागला होता.
      अशीच आठ वर्षे गेली. आता तो प्रथितयश युट्युबर झाला होता. अनेक कोवळ्या आयुष्यांना त्याने आकार दिला होता. परवडेल तेवढीच फी तो घेत असे. जवळच्या झोपडपट्टी मधील बऱ्याच मुलांना मोफत लिहायला वाचायला शिकवू लागला. त्याच्या कडे आता personality development coaches, लाईफ कोचेस, उत्तम शिक्षक होते. त्याच्या Flying High या स्टार्ट-अप चे नाव झाले होते. जगाच्या दृष्टीने तो यशस्वी झाला होता पण सिनेमात हिरो बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. अचानक एक दिवस त्याला एका निर्मात्याचा फोन आला. तो खूष झाला. एका सिनेमात त्याला बच्चन साहेबांचा बॉडीगार्ड असे काम देऊ केले होते.  एवढ्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली होती. साईड रोल का असेना पण बच्चन साहेबांच्या बरोबर काम होते. याच साठी केला होता अट्टाहास ! पटकन हो म्हणून टाकण्यासाठी त्याने ईमेल उघडली.
     पण तो थबकला. एकदा सिनेमाचे काम सुरू झाले की दिवस दिवस बाहेर रहावं लागेल. मुलांना शिकवणारे इतर लोक आहेत पण मुलांना विशाल अंकलला च भेटायचं असतं हे त्याला माहित होते. वडिलांनी दारू पिऊन मारले. आई आजारी आहे.  घालायला कपडे नाहीत एक ना दोन. अशा अनेक समस्यांसाठी मुलांना विशाल अंकलच हवा असे. त्यांना शेजारी बसवून त्यांचे ऐकून घेणारा ! त्यांना उचित सल्ला देणारा ! मावशीच्या गाडीवरून पावभाजी, ऑम्लेट मनसोक्त खायला घालणारा! त्यांचे डोळे पुसताना स्वत:चे डोळे पुसणारा ! त्याचा असिस्टंट सतीश कर्तबगार माणूस होता.  त्याच्यावर मुलांची जबाबदारी टाकावी का? अभिनय हे आपले स्वप्न पूर्ण करायची संधी आली आहे एकदाची ! त्याने दिवसभर खूप विचार केला व निर्माते साहेबांना ई-मेल पाठवली.
“अडवाणी साहेब, माझे फोटो तुम्हाला आवडले आणि तुमच्यासारख्या प्रथितयश निर्मात्याने मला भूमिका देऊ केली त्याबद्दल धन्यवाद. बच्चन साहेबांच्या समोर उभे राहण्याचे भाग्य फार कमी लोकांना लाभते. माझे नशीब मोठे म्हणून मला ही संधी मिळत आहे. पण साहेब, हे खरं असलं तरी मी Flying High मध्ये नसल्यास माझ्या मुलांचे नुकसान होईल. माझ्याकडे शिकवणीसाठी दिवसभर मुले येत असतात. काही झोपडपट्टीतून येणारी मुले उत्तम अभ्यास करत आहेत. तळागाळातून येणाऱ्या मुलांना शिक्षण दिले तरच आपला देश पुढे जाणार आहे. मी हिरो होण्यासाठी मुंबईला आलो होतो. मी चित्रपटात हिरो बनलो नाही पण या मुलांचा हिरो बनलो आहे. ती माझ्यासारखे बोलतात, वागतात आणि माझ्यामध्ये स्वतःला बघतात. झोपडीत राहणार शंकर वकील झाला तेव्हा पासून मी सुपरस्टार झालो आहे आणि हे सुपरस्टार पद मला जपायचे आहे. एकच विनंती आहे..बच्चन साहेबाना कधीतरी येऊन आमच्या मुलांना आशीर्वाद देतील का विचारा. मुलांचा उत्साह द्विगुणित होईल ! मी ही संधी नाकारत असल्यामुळे मला माफ कराल अशी आशा आहे.”
     ईमेल पाठवून दिल्यावर आपल्यावरचे खूप मोठे ओझे उतरल्यासारखे त्याला वाटले. तासाभरात अडवाणी साहेबांचे उत्तर आले, "तुम्ही उत्तम काम करत आहात ते चालू ठेवा. पुढेमागे Flying High असाच सिनेमा बनवू आपण. तुम्ही खऱ्या आयुष्यातील खरेखुरे हिरो आहात. हो आणि बच्चन साहेब मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येण्यास तयार आहेत !”
ते उत्तर वाचून त्याला आनंदाचे भरते आले. तो सद्गदित झाला. साक्षात बच्चन साहेब मुलांना आशीर्वाद देण्यास येणार होते. एका हिरोची दुसऱ्या हिरोला भेटण्याची वेळ आली होती. वास्तवातल्या हिरोचं पारडं चंदेरी पडद्यावरच्या हिरोपेक्षा कणभर जडच वाटत होतं. शंकर सारख्यांचं भविष्य घडवणारं त्याचं काम परमेश्वर चरणी नक्कीच ऋजू झालं होतं. हिरो फक्त सिनेमात व्हायचं असते असं कुणी सांगितलं? समोरच्या फ्रेममधे लावलेल्या गांधीजींच्या वाक्याकडे बघत  तो Flying High अवस्था नव्याने अनुभवत होता..
“A true hero is not defined by their strength, but by their ability to inspire and lead others!”

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...