आज कित्येक वर्षांनी महेशने गावात पाऊल टाकलं. त्याला वाटलेलं आपण जाताना गाव जसं सोडून गेलेलो अजूनही तसंच असेल. रेल्वे फाटक ओलांडून बाहेर पडलं की मारुतीचं देऊळ लागेल. त्याला लागूनच चंदूची टपरी असेल. तिथे कदाचित आपले जुने मित्र दिसतील सिगारेट फुकताना. आज आपण होऊन त्यांना ओळख द्यायचीच नाही. बघू तरी आपल्याला ओळखतात का ते! तिथे फुर्र फुर्र करून एक चहा आणि भजी खायची. बाहेर टांगेवाले उभे असतील, त्या टांग्यामध्ये बसून घराकडे जाताना छोटा बाजार लागेल. बाजारात दुतर्फा कपड्यांची, मिठाईची दुकानं लागतील. रस्त्याच्या वळणावर कोळणी बसल्या असतील मासे घेऊन. घरी जाताना थोडी खरेदी करून जावी का? बायकोसाठी तीच्या आवडीचं आकाशी रंगाचं पातळ घेऊ. लेकी साठी एखादा ड्रेस घ्यायला हवा. पोराला फूटबॉल घ्यावा का? आई बापासाठी काही घ्यावं का? पण आई बाप जिवंत तरी असतील का अजून? महेशला स्वतःच्याच विचाराची लाज वाटली. जाऊदे नकोच काही घ्यायला... आधी घरीच जाऊ.. सगळेजण वाटेकडे डोळे लावून बसले असतील.
तंद्रीमध्ये तो बाहेर आला. इतक्या वर्षात गावाचं रुपडंच पालटून गेलेलं. मुळात आता त्या गावाचं छोटं शहर झालं होतं. स्टेशन बाहेरचं मारुती मंदिर खूप आतल्या बाजूला गेलं होतं. चंदूच्या टपरीचं हॉटेलमध्ये रूपांतर झालं होतं. गल्ल्यावर चंदू नव्हता. एक पोरगा बसलेला होता. त्याच्या कपाळावरची जन्मखूण पाहूनच लक्षात आलं हा चंदूचा मधला पोरगा. काय बरं नाव ह्याचं? मेंदूला भरपूर ताण देऊनही महेशला त्याचं नाव काही आठवेना. गल्ल्याच्या मागच्या भिंतीवर फोटोमध्ये चंदू विराजमान झाला होता. फोटो पाहून महेशचं काळीज लक्क्कन हललं. टांगेवाल्यांच्या जागी रिक्षा उभ्या होत्या. रामनगर सांगून महेश एका रिक्षात बसला. दोन मिनिट वाट पाहून महेशने रिक्षावाल्याला सांगितलं, भाऊ चला की. डायरेक्ट जायचं आहे का घरी? पन्नास रुपये होतील. रिक्षावाला बोलला. पन्नास रुपये? नको डायरेक्ट नको. महेश रिक्षावाल्याला बोलला. चार पॅसेंजर आल्या शिवाय रिक्षा निघणार नाही. रिक्षावाला जरा मोठ्याने गुरकावला. दहा रुपये काढून ठेवा अगोदरच. महेशकडे बघत तो बोलला. आपल्या जवळ दहा रुपये सुद्धा नसतील असंच त्याला वाटलं असावं. महेश स्वतःशीच हसला. क्षणाक्षणाला महेश रिक्षाच्या बाहेर डोकावून बघत होता, कधी एकदा चार पॅसेंजर भरतील आणि रिक्षा निघेल. आज एकेक सेकंद त्याला एक भलं मोठं युग भासत होता. शेवटी भरली एकदाची रिक्षा. दादा लवकर चला ना. महेश अधीर होऊन विनवणी करत होता रिक्षावाल्याची. रिक्षावाल्या साठी महेश सारखे पॅसेंजर ही नेहमीचीच गोष्ट होती. त्यामुळे तो आपल्या हिशोबाने रिक्षा चालवत होता. मध्येच आरशात स्वतःला न्याहाळत होता. ह्याने दहावेळा आरशात बघण्यापेक्षा रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं तर कदाचित आपण लवकर पोचू घरी. महेशच्या मनात हा विचार राहून राहून येत होता. पण त्या ड्रायवरला काही बोलून दाखवण्याचा त्याला धीर होत नव्हता. तो रिक्षातून बाहेर बघत होता, आजूबाजूचा परिसर संपूर्ण बदललेला दिसत होता.
थोडयाच वेळात सगळे पॅसेंजर उतरले. महेश मात्र आतच बसून होता. रामनगर आलं, उतरा आता... तो ड्राइवर खेकसला तसा महेश भानावर आला. दहा रुपये देऊन खाली उतरला. काही वेळ त्याने आजूबाजूला पाहिलं, पण ओळखीच्या कुठल्याच खुणा त्याला दिसल्या नाही. चाळीनी गजबजलेल्या त्या जागी आता इमारती दिसत होत्या. ह्यातलं आपलं घर कुठे असेल? त्याला कसलीच टोटल लागत नव्हती.काही वेळापुरतं शांत उभं राहून त्याने चौफेर नजर टाकली. त्याला एक वडाचं झाड दिसलं. वडाच्या समोरील गल्लीत आपलं घर होतं. तो त्या गल्लीत शिरला. आपली चाळ पाडून त्या जागी नवीन इमारत उभी राहिली असेल, असा तर्क लावून तो एका इमारती जवळ आला. गुलाबी रंगाची ती तीन मजली इमारत दिसत होती. रोड साईडच्या एका गॅलरीत एक स्त्री दोरीवरचे वाळलेले कपडे काढत होती. सुलभा... ही आपली बायको आहे. महेशने तीला एका नजरेत ओळखलं. घर सोडून गेलेलो तेव्हा कशी रोडावलेली दिसत होती. पण आता तब्येतीने बरी दिसते आहे बायको. वयानुरूप केस थोडे पिकलेले दिसत आहेत इतकंच सुलभा... त्याच्या तोंडून हाक बाहेर पडणारच होती. इतक्यात तीच वळली. बाहेर हडकूळा माणूस उभा होता, त्याची वाढलेली दाढी, केसांच्या जटा झालेल्या असल्या तरी आपल्या नवऱ्याला तीने लगेच ओळखलं.
दहा वर्षापूर्वी संसार अर्ध्यावर टाकून निघून गेलेला हा माणूस आज अचानक समोर येऊन समोर उभं राहील अशी सुलभाला अजिबात अपेक्षा नव्हती. काही वेळासाठी तीच्या डोळ्यापुढे अंधारी आली. कट्ट्याला घट्ट धरून ती तशीच निश्चल उभी राहिली. थोडं सावध झाल्यावर घरातल्या कुणाला तरी उद्देशून ती म्हणाली. मी कोपऱ्यावरच्या गणपती मंदिरात जाऊन येते जरा. महेशला हा इशारा पुरेसा होता. तो थोडं बाहेर जाऊन थांबला. सुलभाने तोंडावर पाण्याचा हबका मारला. सकाळी अळू वडीचे उंडे बनवून ठेवलेले, त्यातलं थोडं अळू एका डब्यात घेतलं. पिशवीत पाण्याची बाटली घेतली. आरशात बघत वेणी घातली. साडी बदलली. आणि लगबगीने ती घराबाहेर आली. तीने बाहेर नजर टाकली. अपेक्षेनुसार रस्त्याच्या पलीकडे तीचा नवरा उभाच होता. त्याच्याकडे बघत ती मंदिराच्या दिशेने चालू लागली. तीच्या मागोमाग थोडं अंतर ठेवत तोही चालत होता. पाचच मिनिटात मंदिराजवळ दोघे पोचले. पण मंदिरात जायच्या ऐवजी ती अजून थोडी चालत राहिली. लवकरच ती बागेत एका बाकड्यावर जाऊन बसली.. दोन मिनिटात तो पण बागेत पोचला आणि तीच्या बाजूला थोडं अंतर ठेवून बाकड्यावर बसला. काही क्षण दोघांनी जीवघेणी शांतता अनुभवली. शेवटी त्यानेच भीत भीत बोलायला सुरुवात केली. सुलभा कशी आहेस गं?
काही न सांगता सावरता संसार अर्ध्यात सोडून गेलेल्या नवऱ्याची बायको जशी असायला हवी तशीच आहे मी, एकदम मजेत. नवऱ्याविषयी वाटणारी चीड तीच्या शब्दाशब्दात जाणवत होती.
तुझं चिडणं स्वाभाविक आहे गं. पण ओढाताणीच्या आपल्या संसाराचा मला खरंच कंटाळा आला होता. तुटपुंजा पगाराची माझी एकट्याची नोकरी. आणि खाणारी माणसं सहा. आपल्या मुलांचं वाढतं वय, आई बाबांचं आजारपण, सगळं एकट्याने सांभाळताना जीव मेटाकुटीला येत असे माझा. मन रमवायला म्हणून मी मंदिरात जाऊन बसत असे संध्याकाळी. देवाच्या पायाजवळ बसलं की क्षणिक समाधान वाटत असे मनाला. अध्ये मध्ये देवळात कीर्तन असायचं. मनाला शांती हवी असेल तर सोडून द्या हा संसार, संसारात अडकून नका पडू, देवाला शरण या, तरंच तुम्हाला मन:शांती लाभेल. रोज कानावर हेच पडत होतं. शेवटी मनाचा निर्धार करून एक दिवस मी घराबाहेर पडलो अंगावरच्या वस्त्रानिशी. वाटेवर एक दिंडी दिसली. ते सर्व पंढरपूरला निघाले होते. मीही त्यांना सामील झालो. सकाळी सहा वाजले की चालायला सुरुवात करायचो. वाटेवर जे काय मिळेल ते पूर्णब्रम्ह मानून खायचो.. पाय थकले की एखादा आडोसा बघून तिथेच आडवं व्हायचो. दुसऱ्या दिवशी परत चालायला सुरुवात. चालून चालून पाय थकत होते पण एक अत्यंत्यिक अभूतपूर्व शांती जाणवत होतं मनाला. त्यानंतर वाट फुटेल तिथे चालत राहिलो. किती देवळं पालथी घातली माझं मलाच माहित. अध्ये मध्ये तुमची सर्वांची आठवण यायची, नाही असं नाही. पण ते तेवढ्या पुरतंच असायचं. अंगात विरक्ती दिवसेंदिवस भिनत होती.
मग आज अचानक का यावंसं वाटलं परत? महेशला अपेक्षित असलेला प्रश्न सुलभाने केला.
इतक्या वर्षात गाठी जमा झालेलं असलेलं पुण्य असेल कदाचित, पण कुठे तरी मनाला जाणवू लागलं होतं. आयुष्याचा पैलतीर दिसू लागला आहे, डोळे मिटण्या अगोदर तुम्हाला डोळे भरून बघावं असं खूप वाटत होतं, जे काही थोडे दिवस, महिने शिल्लक राहिले आहेत तेवढे कुटुंबा सोबत व्यतीत करावेत, म्हणून मी परत आलोय. बोलताना महेशचा स्वर नकळत कातर झाला.
तुम्ही आमच्या घरात, आमच्या आयुष्यात परत पाऊल नाही ठेवायचं. सुलभाच्या मनातील अंगार महेशवर बरसु लागला. तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही एक दिवस सगळा संसार सोडून निघून गेलात. तुमच्या पाठी म्हाताऱ्या आई वडिलांचं काय होईल? विचार आला तुमच्या मनात? नाही आला. बारा तेरा वर्षांची आपली दोन मुलं, त्यांच्या मनावर काय परिणाम होतील? ह्याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नव्हतं. तुमच्या पाठी संसार मी एकटीने कसा सावरेन, कधी काळजी वाटली तुम्हाला? नाही वाटली. तुमच्या आई वडिलांनी आयुष्यभर मलाच दोष दिला. माझ्यातच काही कमतरता होती म्हणून नवरा मला सोडून गेला. शेवटचा श्वास घेई पर्यंत ती दोघं तुमच्या वाटेकडे डोळे लावून राहिले होते. त्यांचं आजारपण मी एकटीने निभावून नेलं. मुलांचं शिक्षण, वाढतं वय, वाढता खर्च ह्या सगळ्याचा मी एकटीने भार वाहिला आहे. बोलता बोलता सुलभा नकळत रडू लागली. खाली मान घालून ऐकण्यापलीकडे महेशच्या हातात काहीच नव्हतं.
मला समजतो आहे तुझा त्रागा. पण मला काही काळ माझ्या कुटुंबासमवेत घालवावा असं वाटतो आहे. मी येऊ घरी? तो काकूळतीला येऊन विचारत होता.
अजिबात नाही. तीच्या बोलण्यातून तीचा नकार स्पष्ट दिसत होता. एवढी वर्ष नवरा असूनही मी विधवेसारखं जगले आहे. आजूबाजूची लोकं देखील हे विसरून गेलेत की माझा नवरा पळून गेला आहे. त्यांच्या नजरेत मी विधवाच आहे आता. मी, माझी मुलं नीता आणि चैतू आम्ही आमचं आयुष्य आपापल्या परीने आखून घेतलं आहे. तुम्ही अचानक येऊन ते परत ढवळून काढू नका. नीताचं लग्न ठरलं आहे. अचानक घरी आलेल्या नवऱ्याला घेऊन तीच्या सासरच्या लोकांसमोर मिरवावं असं मला अजिबात वाटत नाही. निघते मी. एवढं बोलून सुलभा जायला निघाली.
असं नको गं बोलूस सुलभा. मला माझ्या मुलांना भेटायचं आहे. महेश अक्षरश: रडू लागला होता. काही क्षणासाठी सुलभाला वाटून गेलं की आपण खूपच निर्दयी होतोय. पण तीचा नाईलाज होता. महेशने आपल्या आयुष्यात आता येवू नये. इतक्या वर्षानंतर बापाला असं अचानक आलेलं पाहून मुलांच्या मनावर खरंच आघात होऊ शकतो.
बास... मला आता ह्यावर अजून काही बोलायचं नाही आहे. हा डबा घ्या. आज अनायासे घरी उंडे बनवून ठेवले होते म्हणून आठवणीने तुमच्यासाठी अळू वडी घेऊन आले, तुम्हाला आवडते म्हणून. ही पाण्याची बाटली घ्या. हे थोडे पैसे आहेत ठेवा तुमच्या जवळ. तुमच्या साठी मी एवढंच करू शकते. येते मी.
एवढं बोलून सुलभा घराकडे चालती झाली. ती नजरेआड होईपर्यंत महेश तीच्या कडे बघत होता. कदाचित तीचं मन बदलेल, तीला माझी दया येईल आणि म्हणेल चला घरी. पण असं काही होणार नाही ह्याची सुद्धा त्याला खात्री होती. बराच वेळ तो तसाच बसून राहिला. बाग बंद करायला आलेल्या वॉचमनने सर्वाना बाहेर काढलं तेव्हा जड पावलांनी तो बाहेर पडला.
बाहेर एक म्हातारी बाई बसली होती रस्त्याच्या कडेला. महेशने अळूवडीचा डबा, पाण्याची बाटली आणि पैसे तीला दिले आणि तो उलट दिशेला निघून गेला.
आज खऱ्या अर्थाने त्याचा ह्या घराशी असलेला ऋणानुबंध संपला होता.
समाप्त
राजेंद्र भट ✍️
१६ फेब्रुवारी २०२४
©®
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा