लहान गावातल्या एका उच्चशिक्षित कुटुंबात विदुला लहानाची मोठी झाली. वडील डॉक्टर होते व आई कॉलेजमध्ये प्रोफेसर होती. वडील उत्तम प्रवचनं करीत असतं. घरात उपासना होती, पूजा पाठ होते व नियमित व्रतवैकल्यं होती. "कर्ता करविता वेगळाच असतो. आपण केवळ निमित्तमात्र.". हे बाबांचे वाक्य तिच्या मनावर कोरले गेले होते. देव ही केवळ संकल्पना नसून आपल्या कुटुंबाचाच भाग आहे अशा संस्कारात ती वाढली होती. विदुला इंजिनीअर झाली. तिचे लग्न जवळच्या शहरातील किरण बरोबर झाले. किरण IIT मधे शिकलेला इंजिनिअर होता. एकमेकाला अत्यंत अनुरूप असणारे विदुला व किरण लक्ष्मी-नारायणा सारखे दिसत होते. विदुलाचा गृहप्रवेश झाला..नवीन घरी देवाला नमस्कार करूया म्हणून ती देवघर शोधत होती. किरणच्या ते लक्षात आले. तो कुजबुजला,
“आमच्याकडे देवघर नाही, देव्हारा नाही व देवही नाहीत.”
घरात देव नाहीत? देवाचा एकही फोटो नाही? तिला धक्का बसला. पहिल्या वेळी ती किरणला भेटायला गेली होती तेव्हा देव धर्म हा विषय बोललाच गेला नव्हता. दोन वेळा किरण माहेरी आला तेव्हा त्यानं देवाला नमस्कार केला नाही हे एकदम आठवलं व तिच्या काळजात धस्स झालं. माहेरून आलेला बाळकृष्ण तिनं हातात घेऊन अजूनच घट्ट पकडून ठेवला. बेडरूम मधल्या कपाटात ठेवून त्याला नमस्कार केला. रजिस्टर लग्न करूया व एक रिसेप्शन फक्त करूया हा त्यांचा आग्रह होता. लग्नासाठी अति पैसा न खर्च करता ते पैसे तुम्ही तुमच्या संसारासाठी वापरा असं त्यांनी सुचवलं होतं. बाकी सर्व उत्तम होतं म्हणून विदुला व तिच्या आई बाबानी ते मानलं होतं. सासु-सासरे प्रेमळ होते. दोघेही सीए असून स्वत:ची फर्म चालवत होते. किरण व विदुला उत्तम पैसा मिळवत होते. मोठा बंगला होता पण घरात फुले, दुर्वा, पूजा नव्हती. पळी, पंचपात्र, ताम्हन, समई नव्हती व आरती बरोबर होणारा घंटानाद नव्हता. आंघोळ करताना बाबांसारखा मंत्रोच्चार नव्हता. विदुलानं पूजाअर्चा करायची ठरवली तर त्याला कुणाची आडकाठी नव्हती. पण कुणाची साथ ही नव्हती.
त्या घरात एक थंडपणा, एक अलिप्तपणा तिला जाणवत असे. हे जग कोण चालवतं, मनुष्याच्या हातात काय आहे. लग्न, जन्म, मृत्यू कोण ठरवतं हे विचार सासु-सासऱ्यांशी बोलावे असे वाटत होते. एक दिवस तिनं हळूच सासुबाईंना विचारलं की त्या जेव्हा सासरी आल्या तेव्हा त्यांना देव नसल्याचा कितपत त्रास झाला. त्या म्हणाल्या, “माझाच विश्वास नाही म्हणून मी कधी व्रत वैकल्य केली नाहीत. किरणच्या बाबांना ते पटलं म्हणून प्रश्न आला नाही. किरणला एक बहिण होती. ती लहानपणीच गेली त्यामुळे जी थोडीफार श्रद्धा होती ती पण तिच्याबरोबर गेली.”
विदुला काही बोलली नाही. ओठांवर आलेले सारे शब्द आतच ठेवून ती जड अंत:करणाने उठली. देवघरात तेवणाऱ्या समईचा केवढा आधार वाटतो हे कसं सांगायचे? “त्याच्या“ कृपेविना जगातलं पानही हलत नाही हे कसं पटवायचं? कर्ता करविता तो असतो व आपण केवळ निमित्तमात्र हे कसं समजावयाचं? किरणशी काही बोलल्यास तो म्हणे, “अग मला याचीच सवय आहे. त्यामुळे वेगळं काही माहित नाही पण तुला जे हवं ते तू कर!” किचन मधे सुबक देव्हारा ठेवावा असं मनात आलं होतं पण जिथे भाव नाही तिथे देव मांडून काय साधणार आहे असे तिला वाटे.
काही महिन्यात तिनं गोड बातमी दिली म्हणून सगळे तिचे लाड करत होते. पाचव्या महिन्यात ती किरणला म्हणाली,“ किरण, आपण आपली अशी एक जागा घेऊया का? अगदी समोरच्या गल्लीतच घेऊ म्हणजे आई दादा पण अगदी जवळ असतील आणि मुलं झाली की आपलाही संसार वाढेल.. तर इनवेस्टमेंट म्हणून घेऊ.” आधी किरण नाही म्हणाला पण इनवेस्टमेंटची कल्पना त्याला आवडली आणि work from home चे दिवस आल्याने आपली वेगळी जागा महत्वाच्या मिटींग्जसाठी सोयीची पडेल असा विचार करून त्यांनी जवळच तीन बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला. सर्वप्रथम विदुलानं किचन मधे एक मोठा कोनाडा करून त्यात देवघर करून घेतलं. कोनाड्याला वर सुंदर कमान व बाजूला नाजूक महिरप करून घेतली. कपाटातला बाळकृष्ण तिथे चांदीच्या आसनावर विराजमान झाला. सासुबाईंनी घर सजवायला खूप मदत केली. साग्रसंगीत वास्तुशांत झाली. सासू-सासरे जेवायला आले पण पूजेला नव्हते. किरणला पूजेचे फारसे माहित नव्हते म्हणून विदुलाच पूजेला बसली. प्रथम कामाच्या मिटींग्ज, नंतर शनिवार रविवार असं करत करत ते दोघे हळूहळू तिथे राहू लागले. त्या कॉम्प्लेक्स चे नावही "स्वप्नपूर्ती" होते! सोहमच्या जन्माच्या वेळी विदुलाचे आई बाबा तिथे येऊन राहिले होते. बाबा मंत्रपुष्पांजली म्हणत असताना ते मंत्रोच्चार तान्ह्या सोहमच्या कानावर पडत होते. समईचा मंद प्रकाश, उदबत्तीचा वास, घंटानादासह आरती अशा वातावरणात सोहम मोठा व्हावा ही तिची इच्छा साकार होत होती. तिला सासु- सासऱ्यांना कुठल्याही प्रकारे दोष द्यायचा नव्हता. त्यांची जीवन मुल्ये वेगळी होती व तिची जीवनपद्धती वेगळी होती एवढचं. सासुबाई व सासरे सोहमला बघायला रोज येत. एक दिवस ते आले तेव्हा ती म्हणाली, “आई-दादा मला तुमचे खूप खूप आभार मानायचे आहेत. आपल्या घरात उपासना नसण्याचा मला फार त्रास होत होता म्हणून मी त्यातून हा मार्ग काढला हे तुमच्या लक्षात आलं होते पण तुम्ही कशालाही आडकाठी केली नाही. किरणनं कधी वाद घातला नाही. आपले विचार माझ्यावर लादले नाहीत. अशी माणसं मला माझं नशीब म्हणून मिळाली आहेत. या एका कारणावरून हजार वाद होऊ शकले असते. मी तुमचे कसे आभार मानू कळत नाही.” तिचे डोळे भरून वहात होते.
सासरे शांतपणे म्हणाले, "विदुला, भक्ती कुणावर लादली जाऊ नये. आम्ही जे करतो ते आमच्या पुरते. ते आम्ही कुणावरही लादत नाही व इतरांनी पूजापाठ आमच्यावर लादू नयेत. माणसाची कदर करणं, त्याला स्वातंत्र्य देणं, त्याचा भावनांचा अपमान न करणं हा आमचा धर्म आहे तो आम्ही निभावला एवढच ! किरणनं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. देव-धर्म एकमेकाला समजून घेण्यासाठी आहे. दुखावण्यासाठी नाही. प्रत्येकाची श्रद्धास्थानं वेगळी ! तुझं श्रध्दास्थान बाळकृष्ण असेल आणि माझं ते बाहेरचं चाफ्याचे झाड असेल ! आणि बर का सुनबाई. फक्त हात जोडल्याने कुणी आस्तिक बनत नाही व हात न जोडल्याने कुणी नास्तिक बनत नाही.
किरण हसून म्हणाला,”बाबा, मी अजून तळ्यात मळ्यातच आहे. तुमचं बरोबर आहे व विदुलाचंही ! विदुला देवाबद्दल खूप बोलते माझ्याशी and..I am open to all these discussions. परवा मला कुठेतरी वाचलेला एक जपानी हायकू आठवला.
मी झाडाला विचारलं..
“झाडा,झाडा, मला ईश्वराविषयी सांग. आणि झाड फुलांनी बहरून आलं”..
असं देवपण मला कळतं. बाकीचं फारसं कळत नाही पण विदुलाच्या श्रध्देचा अपमान माझ्याकडून कधीही होणार नाही. सासऱ्यांनी पिशवीतून एक मोठा गणपतीचा फोटो बाहेर काढला. “वास्तूशांतीची भेट घे, सुनबाई ! ” म्हणून भेट दिली व ते दोघे बाहेर पडले. “काही लागलं तर कधीही बोलव ग ! संकोच करू नको !” म्हणत सासूबाई बाहेर पडल्या. किरण गणपतीचा फोटो देव्हाऱ्यावरच्या भिंतीवर लावण्यात गुंग होता. ती डोळे भरून ते दृश्य पहात होती ! कर्ता करविता माझ्या पाठीशी आहे म्हणत तिनं डोळे पुसले आणि देव नसलेल्या घरातल्या लोकांमधला देव ती नि:शब्द होऊन बघत राहिली. त्या देवत्वाची प्रचिती येऊन आपोआप तिचे कर जुळले होते !
©® ज्योती रानडे 2024 JyotiRanade.
All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा