मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

1100. बावनकशी

      कुणाल आणि दिव्या कॅफेमधे बसून एकमेकाच्या मनात डोकावून बघण्याच्या प्रयत्नात होते. भेटून वर्ष झालं होतं. दोघे एकमेकाला अनुरूप होते. आता पुढं जायचं का नाही हा निर्णय घेण्याची वेळ आली होती. कुणाल निष्णात वकील होता. दिव्यानं संस्कृत मध्ये डॉक्टरेट मिळवली होती. खरतर पूर्वीचा काळ असता तर लग्न देखील उरकून गेलं असतं. पण सर्व काही मनासारखं हवं या आजच्या जमान्यात कुठेतरी काहीतरी कमी पडत होतं. पांढऱ्या शुभ्र कपात आलेल्या कॅपचिनोमधील क्रिम फोमच्या हार्टकडे बघत दिव्यानं थेट मुद्द्याला हात घातला,
”कुणाल, तू ड्रिंक्स घेतोस?” 
कुणाल म्हणाला, "हो.कधीतरी. काही स्पेशल कारण असल्यास घेतो."  
दिव्याचा चेहरा बदलला. तिला कधीही मद्यपान न करणारा मुलगा नवरा म्हणून हवा होता. ऑकेजनली घेतो म्हणणाऱ्यांचे काही कळत नाही. आनंद झाला की ड्रिंक! दु:ख झालं की तर देवदास बनायला वेळ लागत नाही. कधी पीअर प्रेशर म्हणून ड्रिंक तर कधी नवीन वर्षात कोरडे कसं जायचं म्हणून ड्रिंक! ही कधीपासून झाली आपली संस्कृती? कुणालला दिव्या खूप आवडली होती पण ड्रिंक्सच्या बाबतीत ती पराचा कावळा करत आहे अस त्याला वाटत होत. ड्रिंक्स घेण्याची अनेक कारणं त्याच्याकडे होती पण आता ही टोकाची भूमिका घेणारी सोळाव्या शतकातील मुलगी ते ऐकून घेण्यास तयार नव्हती! 
“No drinks means no drinks, Kunal! माझी काही प्रिन्सिपल्स आहेत. Occasionally पण चालणार नाही. तुला हे पटत असेल तरच आपण पुढे जाऊ.” ती म्हणाली. 
“अग मग कॅपचिनो का पितेस? चहा का पितेस? चहा कॉफी घेणं उचित हे कुणी ठरवलं?” कुणाल मधला वकील जागा झाला होता. 
“चहा-कॅाफीनं झिंग येत नाही, कुणाल! तोल जात नाही.” ती म्हणाली. 
कुणालला अनेक युक्तिवाद सुचले होते पण इथे पालथ्या घड्यावर पाणी म्हणून तो काही बोलला नाही. कॅफेमधून निराश होऊन तो बाहेर पडला. एवढी हट्टी मुलगी बायको म्हणून नकोच आहे अशी त्यानं स्वत:ची समजूत काढली खरी.. पण तिचे काळेभोर बोलके डोळे, वेगळे विचार, आणि ते तेजस्वी व्यक्तीमत्व त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हतं. 
दुसरे दिवशी कुणाल गोखले सरांना भेटायला गेला. कॅालेजमधे केमिस्ट्री शिकवणाऱ्या गोखले सरांचा गाढा व्यासंग होता. सर केवळ केमिकल रिॲक्शन्स  शिकवून कधीच थांबले नाहीत.  विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील रिॲक्शन्सचा कसा कुठे समतोल साधायचा हे पण शिकवत असत. सर दिसताच त्याला आधार वाटला. त्याने सरांना दिव्याबद्दल सांगितलं. तिला सरच पटवून देऊ शकतील की कोणतीही गोष्ट in moderation केली तर काही बिघडत नाही. सर हसून म्हणाले, “कुणाल, मी आधी तुझ्याशी बोलेन. मद्य म्हणजे झिंग आणणारं पेय. एथिल अल्कोहोल ज्या पेयात असत त्या पेयांना मद्य म्हणतात. तू आता सायंटिफिकली विचार कर. शर्करायुक्त किंवा पिष्टमय पदार्थ आंबवून मद्य बनवले जाते. यात प्रथिने नाहीत, फॅटस् नाहीत, व तांत्रिक दृष्टया कर्बोदके पण नाहीत. म्हणजे याचे पौष्टिक मूल्य शून्य आहे. वजन वाढीसाठी भरमसाठ कॅलरीज मात्र आहेत. सरांनी फळ्यावर चित्र काढून Fermentation नंतर इतर कोणती केमिकल्स कोणत्या मद्यप्रकारात कशी घातली जातात, अतिरिक्त कार्बन डाय ॲाक्साईड मुळे वाईन कशी उफाळते वगैरे दाखवलं. सर  म्हणाले,” आता सांग, ही केमिकल्स शरीरात ढकलून काय फायदा आहे? “उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म” शिकलेल्या आम्हाला हल्ली बिअर बेली का असते? बायकाही यात मागे नाहीत. अल्कोहोल मुळे डोपामिन या हार्मोनचा जो हाय जाणवतो तो हाय मोकळ्या हवेत व्यायाम केला तरी जाणवेल with no side effects!
“सर, पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. मिटींग्ज, कॅानफरन्सेस मधे मॅनर्स म्हणून ड्रिंक्स घ्यावी लागतात.” कुणाल म्हणाला. 
“कुणाल मनुस्मृतीने सुरापान करू नये म्हटले आहे. वाल्मिकींनी लिहलय, मद्य सेवनाने धर्म, अर्थ, काम नष्ट पावतात. तुमच्या जगप्रसिद्ध “द लॅन्सेट” या मेडिकल जर्नल मधे म्हटलंय की दारूचा माणसाला काहीही फायदा नाही. नवे संशोधन सांगते की अल्कोहोलमुळे हार्टला अपाय होतो. शिवाय अल्कोहोल २१ प्रकारचे कॅन्सर निर्माण करणारा कार्सिनोजेन आहे. राहता राहिली मॅनर्स ची गोष्ट ! बाहेरच्या चार लोकांना हे मॅनर्स दाखवून खूष करायचं का आपल्या गृहलक्ष्मीच्या विनंतीचा मान राखणं याला मॅनर्स म्हणायचं ते तुझं तू ठरव.” सरांचा चेहरा गंभीर दिसत होता. 
कुणाल थक्क झाला होता. सर थोडाही सपोर्ट करणार नाहीत असे वाटले नव्हते. ते कुणालला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेले. गेली ३४ वर्षे मुक्तांगण ड्रग्ज, दारू, गांजा, इंटरनेट वगैरेंच्या आहारी गेलेल्या रुग्णांना व्यसनमुक्त करण्यासाठी झटत होते. व्यसनाधीनता वाढल्याने स्त्रियांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू झाला होता. सोशल ड्रिंक्स म्हणून सुरू केलं पण व्यसनाधीन कधी झालो कळलेच नाही म्हणणारे कित्येक तरुण/तरुणी तिथं भेटले. अनेक संसार उध्वस्त झाले होते. मद्य हे socially acceptable poison आहे असे तिथले डॅाक्टर म्हणाले. कुणाल अस्वस्थ झाला. 
“दिव्या हे बावनकशी सोनं आहे, कुणाल ! अशा मुली हल्ली भेटत नाहीत. तू नशीबवान आहेस.  I am all for her!” सर म्हणाले. 
संध्याकाळी गोखले सरांकडे कुणाल व दिव्याला भेटायला बोलावलं होतं. त्याप्रमाणे ते आले. काकूंनी गरम पोहे व चहा दिला. दिव्या काकूंना म्हणाली, “काकू, कुणालला चहा न पिणारी मुलगी हवी आहे म्हणून मी चहा सोडला आहे.”
कुणालने घेतलेला चहाचा घोट त्याच्या घशातच अडकला. “अग, मी ते फक्त युक्तीवादासाठी वापरत होतो. तू घे ना चहा ! माझी काहीच हरकत नाही !”
सर गालातल्या गालात हसत कुणाल कडे बघत होते. कुणाल म्हणाला, “दिव्या, मी शपथ घेतो की यापुढे मी एथिल अल्कोहोल युक्त कुठलेही ड्रिंक, मद्य, बिअर, वोडका, जिन, व्हिस्की वगैरेला स्पर्श करणार नाही.” 
दिव्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. सर म्हणाले,” दिव्या, तुझ्या पॅाडकास्ट वर मी गेस्ट म्हणून नक्की येईन. आपल्या देशांतल्या लोकांना मद्यापासून परावृत्त करण्याचा तुझा प्रयत्न कौतुकास्पद आहे.”
दिव्या म्हणाली, "मनु-याज्ञवल्क्य यांनी मद्यपानाबद्दल शिक्षा उगीच का सांगितल्या असतील? युरोप अमेरिकेत हवा थंड म्हणून ड्रिंक्स घेतात ते बरोबर का चूक न बघता त्याची कॉपी करणारा आपला समाज बदललाच पाहिजे. प्रत्येक इंद्रियाचा नाश करणारं हे द्रव्य क्षणिक हाय साठी असलं तरी याचा लो भयानक आहे. आनंदाशी या द्रव्याची सांगड पाश्च्यांत्याकडे बघून घालणं अन् आनंद म्हणजे शॅंपेनची बाटली उघडणं मला मान्य नाही.”
कुणाल आश्चर्याने ऐकत राहिला. सर व काकूंना नमस्कार करून बाहेर पडताच कुणालने खिशातून सोन्याची अंगठी बाहेर काढली. त्यात बसवलेला हिरा सूर्यकिरणात तळपू लागला. तो गुडघ्यावर बसला. तो काही बोलण्यापूर्वी दिव्या म्हणाली,”कुणाल, मी तुझ्याशी लग्न करेन पण या बाहेरच्या देशातल्या रिवाजांची जरूर नाही ! घरच्यांच्या आशीर्वादाने साखरपुडा करू तेव्हाच घाल अंगठी !”
कुणालच्या हातातील सोन्याची अंगठी चमकत होती पण दिव्याच्या चेहऱ्यावरील बावनकशी विचारांची झळाळी अंगठीला मागे टाकत आहे असे त्याला वाटलं. अत्यंत समाधानाने हसत तो दिव्याकडे बघत राहिला !

©® ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...