यु. एस. ए. मधून सकाळी सकाळीच उमेशदादाचा विडीओ काॅल आला. मला आश्चर्य वाटले की, चार-चार महिने साधा फोन न करणारा उमेशदादा आज कसा काय फोन करतोय?
मी लगेच फोन घेतला व म्हणाले,"हॅलो,दादा नमस्ते.!"
" ठिक आहे. ठिक आहे,"
दादा त्याच्या नेहमीच्या सवंयीप्रमाणे बोलायला लागला. आमच्या दोघांमध्ये बारा वर्षाचे अंतर होते. मला आता दोन मुलंही झालीत. तरी सुद्धा तो मला लहानच समजतो. मला जणु काहीच कळत नाही. दादा पुढं म्हणाला," रत्ने तु बाबांबद्दल काही ऐकलंस काय? पप्पा आता दुसरं लग्न करताहेत म्हणे..ते त्या नर्ससोबत. जिला आपण आई गेल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी ठेवलेले होते. मला तर या गोष्टीची फार लाज वाटायला लागली आहे. या वयात हे म्हातारचळ...! मला तर येता येणार नाही,कारण मी कंपनीमुळं फार बिजी आहे. त्यांना तु समजावं.कारण ते माझं कधीच ऐकत नाही."
मला नक्की माहीत नाही, परंतु बाबांच्या शेजारी राहणाऱ्या काकांनी त्यांना फोन केला असावा आणि इत्यंभूत माहिती त्यांना दिली असावी. मी लहान जरूर आहे पण मी दादाला पप्पांबद्धल वापरलेल्या त्या वाईट शब्दाबद्दल त्याला खडसावले. 'तु त्यांचा मोठा मुलगा आहे .तरी सुद्धा अशी विचित्र भाषा..! तुला काही संस्कार आहेत का? पुन्हा असं बोलु नकोस."
"साॅरी, साॅरी. तरी तु त्यांना तुझ्या भाषेत समजावून सांग. ते तुझं जरूर ऐकतील.."
मी म्हटलं," आता तर दोन दिवसांपूर्वी मी पप्पांशी बोलले. पण त्यांनी तर मला असं काही बोललेच नाहीत. आमचा दिवसा आड विडिओ काॅल सुद्धा होतो. परंतु आता बरेच दिवस झाले आम्ही पप्पांना जाऊन भेटलो नाही. दोन तासांचा तर रन आहे. उद्या आम्हा दोघांनाही सुट्टी आहे. मनोज मागच्या आठवड्यातच म्हणत होता. पण मुलांच्या टेस्टमुळे मी टाळले होते. चला, त्यांना भेटून येऊ या."
मी गेल्या गेल्या पप्पांच्या शेजारी पलंगावर बसले.इकडच्या -तिकडच्या गप्पा केल्या.हळुच विषय काढणार तेंव्हा पप्पाच म्हणाले," बेटा,ऐक..माझी जी नर्स आहे ना, कस्तुरी तिच्या सोबत मी उद्या लग्न करणार आहे. माझं पहिल्यांदा ऐक. नंतर तु बोल." आणि मी शांत चित्ताने ऐकायला लागले.
" बघ बेटा, तुझी आई जाऊन आता पंधरा वर्षे झालीत. तेंव्हापासून ही नर्स कस्तुरी व तिची मुलगी माझी खुप मनापासून सेवा करतात. मला त्या दोघीही घरच्या प्रमाणेच समजतात. आज माझं वय ऐंशी वर्षें झालेले आहे. मला आता कसलंच नियंत्रण राहिलेले नाही. कधी कधी अंथरूणातच माझे विधी होतात आणि मला कळतही नाही. परंतु तरीही कसलीही तक्रार न करता कस्तुरी निमुटपणे साफसफाई करीत असते. तिची मुलगी सुद्धा माझी काळजी घेत असते. ती आता कुठल्यातरी काॅलेजात शिकत आहे. कस्तुरी विधवा आहे. ती एका प्रायव्हेट हाॅसपिटलमध्ये नोकरी करते. तिला महिना नऊ हजार रुपये मिळतात. मला सांग, आजच्या काळात नऊ हजारात काय होते? माझं असं उतार वय असल्याने मला कधीही वरून बोलावणे येऊ शकते. मला पन्नास हजार पेंशन आहे. मी गेल्यावर हिला फॅमिली पेंशन म्हणून पंचवीस हजार रुपये नक्कीच मिळतील. मी तर निघुन जाईलच, परंतु जाता जाता जर माझ्या कडून कस्तुरीचे कल्याण झाले तर काय वाईट थोडीच होणार आहे?
मी आपल्या वकीलाला परवाच घरी बोलावले होते. त्याला सगळी पेपर्स तयार करायला सांगितले आहे. मला वाटते तुही त्या वकीलांना एकदा भेटुन घे. आणि लक्षात ठेव. तु आनंदीच व्हायचंय आणि येणाऱ्या नवीन आईचं प्रेमानं स्वागत करायचं."
पप्पांच्या या बोलण्यानं मी तर अवाक झाले होते. मी आता काय बोलणार !
प्रा.पंढरीनाथ सारके.
9766983101.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा