सभागृह तुडुंब भरलेलं होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आयोजक माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "सर, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे जरा स्टेजवर येता का?"
हो म्हणण्या शिवाय पर्यायच नव्हता. मला त्यानी स्टेजवर नेलं. "आज आपल्याकडे "गाव गाता गजाली" चे लेखक व कथा कादंबरीकार मा. श्री प्रभाकर भोगले सर आले आहेत." अशी सुरूवात करून माझा थोडाफार परिचय करून दिला गेला. त्यानंतर माझा सत्कार करण्यात आला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला परत माझ्या जागेवर नेऊन बसवण्यात आलं. मध्यंतरात काही लोक मला भेटायला, ओळख करून घ्यायला आले. मी त्यांच्या घोळक्यात उभा असतानाच एक बाई वाट काढत माझ्याजवळ आल्या. त्या माझ्याच वयाच्या होत्या. त्या हसल्या आणि विचारलं,
"ओळखलंस का रे प्रभाकर?"
एकदम अरे तुरे? मी जरा गोंधळलोच. मी त्यांच्याकडे नीट पाहीलं पण ओळख पटेना.
मग त्याच म्हणाल्या,
"अरे, मी सुलू. सुलोचना दळवी तुझी वर्ग मैत्रीण !"
"अरे! मी ओळखलंच नाही आधी."
"कसा ओळखशील? पन्नास वर्षे झाली शाळा सुटल्यावर. मी तरी कशी ओळखणार होते. पण मघाशी स्टेजवर नाव सांगितलं तेव्हा ओळखलं. बरं.. कार्यक्रम संपल्यावर भेटू... जाऊ नकोस"
"बरं." मी म्हणालो.
मी पुन्हा जागेवर येऊन बसलो. कार्यक्रम सुरू झाला. पण मी होतो कुठे तिथे? मी पन्नास वर्षे मागे जाऊन आमच्या वर्गात बसलो होतो.
आठवी ते अकरावी आम्ही आमच्या गावच्या हायस्कूलमधे शिकत होतो. वर्गात सातआठच मुली होत्या. त्यापैकी सुलू एक. सुलू मला आवडायची. त्या वयात बर्याचजणी आवडतात. पण ही जरा जास्तच आवडायची. दहावीत असताना (तेव्हा अकरावी हे शालान्त वर्ष होतं) तर मला तिच्याबद्दल खूपच ओढ निर्माण झाली. त्याला कारणही तसंच होतं. विज्ञानाच्या शिक्षकांनी ज्यांची चित्रकला थोडीफार बरी आहे अशी आमच्या वर्गातली चारपाच मुलं निवडली होती आणि वर्गाच्या भिंतींवर लावण्यासाठी काही आकृती काढण्याचं काम त्यांच्यावर सोपवलं होत. त्यात एकमेव मुलगी होती आणि ती सुलू होती. आमच्या लॅबमधे एक लांबच्यालांब टेबल होतं. त्यावर आम्ही चित्र काढत होतो. कान, उर्ध्वपातन ह्रदय इत्यादी चित्र काढायची होती. चित्रं जवळजवळ पूर्ण होत आली होती एवढ्यात तिने माझ्या चित्राकडे पाहिलं आणि मोठ्याने म्हणाली,
"किती छान काढलंयस प्रभाकर, ए हा माझा कान तुला घे आणि तुझं ह्रदय मला दे ना."
एवढ्यात सर ओरडले, "अरे, कोण ह्रदयाची देवाणघेवाण करतंय?"
हे ऐकून मी तिच्याकडे पाहिलं. माझ्या ह्रदयाची तार झंकारली. तीही लाजली. तेव्हापासून वर्गात संधी मिळेल, तेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. बोलू लागलो. वर्गात मी नेहमीच पहिल्या तिनात असल्यामुळे प्रश्नाचं उत्तर द्यायला उभा राहात असे आणि ती संधी साधून ती माझ्याकडे पाहात राहात असे. उत्तर देऊन बसताना मीही तिच्याकडे पाहून घेत असे. एकदा अचानक आमची गाठ दुकानाकडे जाणाऱ्या वाटेत पडली. ती अकरा साडे अकराची वेळ होती. उन होतं. आम्ही एका झाडाच्या सावलीत थांबलो. मी प्रथमच तिला इतक्या जवळून पाहात होतो. काय बोलावं आम्हाला सूचत नव्हतं. आम्ही मूकपणे फक्त एकमेकांकडे पाहात होतो. माझं काळीज कमालीचं धडधडत होतं. धडधडत कसलं अक्षरशः थडथडत होतं. छाती फुटून ते बाहेर येईल की काय असं वाटत होतं. तिचीही तिच अवस्था झाली असावी. कुणी पाहात तर नाही ना, हे पाहण्यासाठी ती अधूनमधून वाटेच्या दोन्ही बाजुला पाहात होती. मधेच पायाखाली पाहात होती. ती खूपच छान दिसत होती. तिचा रंग गव्हाळ असला, तरी तिची कांती तजेलदार होती. तिचे दात सुंदर होते. केस भरपूर आणि लांब होते. तिच्या केसांना भुंग्याच्या निळसर रंगाची झाक होती. त्यावर उन पडलं की ते चमकायचे. ती नेहमीच दोन वेण्या घालायची. ती रूपवती नसली तरी आकर्षक होती. समोरच्याला घायाळ करण्याची ताकद तिच्या रूपामधे होती. तिचं सौष्ठवही नजरेत भरण्यासारखं होतं. त्यावेळी मी नजरेत साठवून ठेवलेलं तिचं रुप मी कधीच विसरलो नाही. पुढे जेव्हा जेव्हा मला तिची आठवण यायची, तेव्हा तेव्हा तिचं तेच रुप माझ्या डोळ्यासमोर यायचं. अगदी अलिकडेपर्यंत मला ती तशीच दिसायची. सतरा वर्षांची !
आज ती समोर आली ती सत्तरीकडे झुकलेली. पांढर्या केसांची, सुरकुतलेल्या चेहर्याची. मीही काही आता तरूण राहिलेलो नाही. माझीही अवस्था तशीच झालेली आहे. इतक्या वर्षांनी दिसली, भेटली याचा आनंद मला होतच होता, पण कुठेतरी ती अशी भेटायला नको होती असंही वाटत होतं. आता तिची आठवण येईल तेव्हा पुर्वीचं ते रेखीव घाटदार शिल्प नजरेसमोर येणार नाही. येईल ते झीजलेलं. रया गेलेलं शिल्प. खरंच, सुलू तू आज भेटायला नको होतंस. आता तूझं माझ्या मनातलं ते चित्र धूसर झालंय आता तू आठवशील तरी की नाही कुणास ठाऊक !
लेखक- प्रभाकर भोगले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा