सगळे काढे पिशवीत ठेवत असताना त्याचे कान हकिम बुवांकडेच होते. "ही सगळी पथ्य सांभाळा तुम्ही मग होतील बऱ्या त्या आता सगळं परवरदिगरच्या हातात आहे." त्या हकिमाच्या डोळ्यातली कणव त्याला जाणवली फार आशेने सगळे डॉकटर फिरून तो आता ह्या झाडपाल्याच्या औषधांवर विश्वास ठेवू पाहात होता. फुलपाखरासारखी बागडणारी त्याची राधा ह्या सांध्यांच्या दुखण्याने इतकी गळून गेली की गोगलगायीसारखं सरपटण देखील तिला जमेना. तिचा नीटनेटकेपणा कुठल्याकुठे हरवून गेला. हे काय विचित्र दुखणं अगदी म्हातार करून टाकलं त्यानी ह्या राजराणीच्या संसाराला? भोग आपले म्हणत दोघेही आला दिवस रेटत होते पण आशाही सुटत नव्हती,कोणी काही उपाय सांगितला की तो करूनच बघायचा. दोन दिवस उगाच आता खरंच छान वाटतंय मला,बरं वाटतंय अश्या तिच्या प्रतिक्रिया बघून तो तेवढाच आंनदी होणार की संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर परत रडका चेहरा. सुजलेले हात सगळं तसच. तो मोठ्या जडपणाने हे सगळं स्वीकारून तिलाही उभारी द्यायचा होशील ग बरी. जातील हे ही दिवस. लेकरांनाही आता आईच्या ह्या दुखण्याची सवय झाली होती. हे सगळं कुठेतरी थांबावं असं वाटायचं म्हणून तर कोणी कुठला वैद्य सांगितला की तिथं जायचंच हे ह्याने ठरवलेलं म्हणून तर आज लांबचा प्रवास करून तो इथवर आला होता. सगळ्या बाटल्यांना सील बरोबर आहे ना हे त्याने तपासलं आणि तो स्टेशनवर निघाला. खम्बीर असला तरी तसा ह्या सगळ्या परिस्थितीने आलेलं वयापुर्वीच म्हातारपण त्याला आणखी उदास करत होत. लेकरांसाठी आणि तिच्यासाठी तो चेहेऱ्यावर हसू टिकवून होता पण त्याच त्यालाच ते आता असाह्य होत होतं.
आता ह्या क्षणी ह्या शांत स्टेशनवर जोरात हंबरडा फोडवा का असं त्याला वाटलं? गेल्या आठ एक वर्षात ती किती क्षीण दिसायला लागली होती. केस तर काहीच राहिले नाही. सगळं हरवत गेलं. सुरवातीची काही वर्ष किती सुंदर होती अगदी स्वप्नवत. तिची ती आपल्या मागेमागे फिरण्याची लकब. ऑफिसला निघताना काळजीने सगळं देऊन हसून निरोप देण्याची पद्धत. ऑफिसात तर आपला डबा बघून लोकं स्वतःच्या बायकोच्या नावाने ओरडायचे. सुंदर रंगीत डबा अगदी सगळ्या चवी त्यात नीट बसलेल्या आणि त्यात कोपऱ्यात असलेली एक चार ओळीची चिठ्ठी. रोज वेगळ्या शब्दांनी मांडलेल प्रेम. ती चिठ्ठी क्षणात सार्वजनिक व्हायची. ती वाचायला तर सगळ्यांची धडपड असायची. कुठं हरवलं हे सगळं. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं त्याने ते पुसलं.
त्या धूसर नजरेतून त्याला रेल्वे येताना दिसली. तो यंत्रसारखा उठला आणि गाडीत चढला. त्याच्या रिजर्व सीटवर बसणार तेवढ्यात तिथे ती दिसली कॉलेजातील सावी. कधीतरी त्याला आवडणारी आजही तशीच दिसते. तो तिला उठवणार पण पलीकडे तिने तिचे झोपवलेले बाबा दिसले तेंव्हा तो काहीच बोलला नाही. तिच्या शेजारचं सीट रिकामं होत. तो तिथे बसला. तिनेही त्याला ओळखलं होतं. प्रेम कोणी विसरत नाही हेच खरं. ती फक्त हसली. तो मात्र स्वतः बोलला, कुठे असतेस?
तिने त्याच्याकडे वळून तोंडावर बोट ठेवत थांब बाबांना झोप लागतीये असं डोळ्यांनी सांगितलं. तो काही वेळ गप्प बसला. तिच्या त्या आठवणीतल्या परफ्यूमचा आता त्याला प्रत्यक्ष आंनद घेता येत होता. गेल्या काही वर्षात बायकोला औषधीतेल मालिश करून त्या तेलकट वासाने जणू सुगंधाची अनुभूती तो विसरला होता. तिच्या ओढणीचा होणारा रेशीम स्पर्श त्याला उगीच गुदगुल्या करून जात होता. तिची आजही गालावर रुळणारी बट आणि त्या खालोखाल असणारी खळी आताही स्पष्ट दिसली त्याला. बाबा झोपल्यावर त्याच्याशी बोलायला ती त्याच्याकडे वळली अगदी गोड हसत.
तो जरासा गडबडला तिला इतकं जवळून बघून आणि तिच्या त्या कमळ पाकळ्यांच्या डोळ्यात खोलवर बघून. जणू काळ मागे गेला. विस्तीर्ण वडाच्या दाट सावलीत होणाऱ्या भेटीगाठींची उजळणी त्या डोळ्यात दिसत होती. तिच्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक असणाऱ्या वृत्तीवर आपण केलेलं प्रेम त्याला आठवायला लागलं. आता हिला ते आपल्या डोळ्यात दिसेल ह्याची भीती वाटून तो गडबडला. ती मात्र स्थिर आणि शांत होती तेव्हासारखीच आताही ती तिच्या नेहमीच्या समजवणीच्या सुरात गप्पा मारायला लागली,."बाबांना एका हकिमाकडे दाखवायला आणलं होतं, आशा सुटत नाही आणि देव भेटत नाही रे. आज वीस वर्ष झाली हा वनवास त्यांच्या नशिबी आहे. पण कुठेतरी त्यांना औषध लागू होईल आणि होतील ते बरे ह्या आशेवर चालु आहे आयुष्य माझं." ती बोलत होती आणि तेवढ्यात बाबांना झोपेत ठसका लागला ती लगबगीने उठली. तो बघत राहिला तिला आहे तशीच परिस्थितीचा कुठलाही परिणाम तब्येत, चेहऱ्यावर झालेला नव्हता. वय वाढलं असलं तरी त्याला छानपैकी ताब्यात ठेवलं होतं तिने. लग्न कदाचित केलेलं दिसतच नाही हा विचार डोक्यात आल्यावर त्यानं तिच्या पायात जोडवे किंवा गळ्यात मंगळसूत्र दिसतंय का हे बघण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण नाही दिसलं. त्याला आठवलं आपण हिला मागणी घातली आणि आठ दिवसात हिच्या वडिलांना आलेला हा अर्धांगवायू झटका. ती स्पष्ट म्हणाली,"मला आई, भाऊ कोणी नाही माझ्या आनंदासाठी मी माझ्या वडिलांना एकटं सोडू शकत नाही आणि मला माहित आहे त्यांच्यासह तू मला स्वीकारणार नाहीस त्यामुळे तू तुझं आयुष्य जग."
खुप दुःखद असला तरी तिच्या पासून प्रेम तोडावं लागलं होतं आपल्याला. आपण तयारी दाखवली तरी घरचे नसतेच तयार झाले. ती शेवटची भेट किती वेदनादायक होती दोघांनाही. विस्तीर्ण वडाची सावली त्यादिवशी उदास होऊन आपल्या मनावर पडली होती. ती मात्र तेंव्हाही शांत आणि स्थिर होती, "स्वीकार हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. मला माझं आयुष्य स्वीकारावं लागेल तू जग पण मला माझ्या बाबांना जगवू दे."
ती निघून गेली त्यांनतर आजच भेटली आपणही जेंव्हा जबाबदारीच्या विळख्यात अडकलोय तेंव्हा. कशासाठी?? त्याने मनाला प्रश्न केला .ती परत त्याच्या जवळ येऊन बसली. ती स्वतःच बोलायला लागली. आयुष्यात सगळेच फासे आपल्या मनासारखे पडत नसतात. मग जे दान पडलंय ते असं का पडलं हे रडत शोधत बसण्यापेक्षा ते पडलेलं दानच आपलं आयुष्य आहे हे स्वीकारलं की सगळं सोपं होतं. तुझं प्रेम हेच काही क्षणांच दान मला आयुष्यभरासाठी जगवत त्या आठवणी मला सतत ताज्या वाटतात आणि मी मग त्यातच रमून अशी तरुण राहते. बाबांसाठी मला तुझ्यापासून दूर राहावं लागलं पण तेच कदाचित माझ्यासाठी आयुष्याच दान होतं नाही का? तू सांग कसा आहेस?
तिच्या सगळ्या बोलण्यावर त्याने विचार केला आणि म्हणाला, "तुझ्यावर प्रेम केल्यावर तुझ्यासारखंच आयुष्य आलंय. वाट्याला बायको खुप आजारी असते पण प्रेम करते माझ्यावर. सगळं असुनही कधीतरी खुप उदास वाटत का हे आयुष्य आपल्या वाट्याला? पण आता तुला भेटल्यावर वाटतं स्वीकार करायला हवा आणि आठवणीतलं हे प्रेम आठवून सतत तरुण राहावं नाही का? पुढच्या स्टॉपवर उतरायचं म्हणून तिने तयारी केली. बाबा जीवंत मूर्ती होते ती मूर्ती तिने जपली होती आपलं आयुष्य पणाला लावून. तिच्या आधारे ते उतरले. तिने त्यांना बाकड्यावर बसवलं आणि वळून खिडकीशी आली. त्याचा हात हातात घेतला. आतापर्यंत निग्रहाने अडवलेलं पाणी डोळ्यातून खळकन बाहेर आलं होतं. तिने त्याच्या हातावर ओठ टेकले आणि म्हणाली, "कमी काळातच तू दिलेल्या प्रेमाने मी आजही चिरतरुण आहे खुप थँक्स डिअर."गाडी निघाली ती ओढणीत तोंड लपवून रडत उभी होती.
तो खिडकीबाहेर अजूनही निरोपाचा हात हलवत होता. काही वेळाने त्याने हात आत घेतला. त्या हाताला तोच सुगंध आला त्याने दिर्घश्वासाने तो भरून घेतला. त्याला क्षणात मळभ दूर झाल्यासारखं झालं. त्या हाताने,सुगंधाने एक जादू केली. मघाशी स्टेशनवर चढताना आलेले उदासावाणे विचार हरवून गेले. त्याला आता परत तरुण झाल्यासारखं वाटत होतं. तो मनात म्हणाला देखील, "ह्या प्रेमाच्या आठवणी आणि त्याग आपल्याला नक्कीच चिरतरुण ठेवेल."
© स्वप्ना मुळे (मायी) छत्रपती संभाजीनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा