कोकणातल्या घरांची आवारे मस्त लाल हिरवीकंच असतात. देखणी असतात. गर्द सावली देणारी असतात. आज्या पणज्यांनी लावलेले फणस. आंबे काजू माड पोफळी छपरावर सावली धरतात आणि मधोमध तुळशीवृंदावन. सायंकाळी दिवा धरून संथपणे प्रकाशित असते. चांदण्या रात्री ही आवारे दुधाने न्हाऊन निघतात. या सगळ्या हिरवळीवर कोकणी माणसाचे अपार प्रेम असते. घरातील भिंतीवर गेलेल्या वाड वडीलांचे फोटो आधार देत असतात आणि त्यांनी लावलेले वृक्ष आवारात सावली देत असतात. न्हाणी घरामागे केळी अळू वाढतात आणि देवाला वाहायला फुले देणारी छोटी छोटी झाडे आपापली जागा धरून राहतात. अगदी भरदुपारी सुद्धा किरणांना अडवणारी झाडी असते. एखादी आरामखुर्ची टाकून दोन्ही हात डोक्याखाली घेऊन पाय समोर स्टूलावर ठेऊन विसावले की समाधी लागावी अशी सुंदर आवारे. फार फार आधीपासून मला अशा आवारांचे प्रचंड आकर्षण होते. म्हणुनच हॉस्पिटल बांधताना अस ऐसपैस आवार मिळेल अशीच जमीन घेतली आणि बांधकाम झाल्यावर त्यात काजू आंबे माड गुलमोहर चाफा आवळा अशी रोपे सुचतील तशी लावली. आता इतक्या वर्षानी कधी तरी रात्री गच्चीतून नजर टाकली की ती 15/18 वर्षांची वाढलेली झाडे बघून समाधान होते. मन निवते आणि सगळे ताण विसरायला होते. पौर्णिमेच्या रात्री तर मी हमखास हा आनंद घेतोच. जवळजवळ 1/2 एकराचं आमच हिरवं आवार फार प्रेमळ आणि सुंदर आहे.
दोन वर्षापूर्वी पावसाळय़ात ठरवले की, आणखी चार सहा झाडे लावूया. म्हणून दोन बदाम दोन पोफळी आणल्या आणि लावून टाकल्या. त्यातला एक बदाम इमारतीच्या अगदी जवळ लागला. त्या बदामाचे काहीतरी वेगळे गणित होते. तो असा काही जोमाने वाढू लागला की बस रे बस. एका वर्षात तो गर्द असा वाढला. रूबाबदार फांद्या वागवत तो एखाद्या लाडावून वाढलेल्या पोरा सारखा उंच आणि हिरवागार झाला. इमारतीच्या उंची शी स्पर्धा करायला लागला. रसरसून तो बहरला. त्रिशूल सारख्या तीन फांद्या घेऊन तो डवरला. पेशंट येता जाता म्हणू लागले. भाऊ कशाक लावलास त्यो?? त्याला ना फळ ना फूल. ढीगभर पानांचा कचरा मात्र करील. मी हसून दुर्लक्ष करायचो. त्या झाडाला काही कुणाची दृष्ट लागली नाही. सायंकाळी रोज मी त्या झाडा समोर उभारून त्याला कौतुकाने बघायचो. नको फळ नको फूल. तू असा मस्त वाढतोय. हिरवा रंग उधळतोय. उधळ तू. मस्त अजून जाड हो... मोठा हो... उंच हो ....!
दोन पावसाळे झाले, अणि हे आमचं लाडकं झाड भलतेच भरले. एखाद्या छोट्या पोराचा बापमाणूस व्हावा, तसा तो बदाम फोफावला. आता आवारातल्या खारी पक्षांनी त्याला मान द्यायला सुरवात केली. त्याच्या अंगाखांद्यावर खेळून. मी ऋचाला कौतुकाने त्याची वाढ दाखवायचो. तीही त्याच्यावर खूश होती. एका सकाळी मात्र आम्ही दोघेही चांगलेच काळजीत पडलो. कारण आमचा मेडिकल वाला सचिन आला आणि म्हणाला की, तो बदाम तुम्ही इमारतीच्या इतका जवळ लावलाय खरा. पण त्याची मुळे इमारतीला त्रास देणार. हा म्हणजे प्रॉब्लेम झाला. सचिन म्हणाला की, बदाम तोडायला हवा. आम्ही दोघे घायाळ झालो. इतकं कौतुकाने वाढवलेले झाड काढायच? मी दोन तीन तज्ञांना बोलावले. त्यांना झाड आणि इमारत दाखवली. झाड काढायलाच हवं का. बदामाची मूळे किती पसरतात. इमारतीला धोकादायक असतात का. ही सगळी चर्चा केली. कुणी स्पेसिफिक काही सांगेना. पण इमारतीच्या इतक्या जवळ इतके मोठे झाड असणे बरे नव्हे, हे सर्वानी एकमुखी सांगितले. मी हैराण झालो. इतक्या कौतुकाचे झाड काढायच्या विचाराने हळवा झालो. रोज सकाळी opd मध्ये जाताना त्या बदामाकडे प्रेमाने नजर टाकायची सवय झाली होती. आपलं वाढतं पोर पहावे, तशी नजर झालेली.... त्याला तोडायचे म्हणजे अशक्यच होते. मी आता opd मध्ये जाताना झाडाची नजर टाळायला लागलो. पण opd च्या खिडकीशी नजर गेली, की ते झाड दिसायचे. त्या प्रेम केल्या झाडाला तोडायचे आहे, हे मान्य होईना. ऋचाला अस्वस्थता शेअर केली. तिलाही झाड तोडणे पटत नव्हतं. एका रात्री गच्चीत आम्ही दोघेही उभे होतो. खाली मधले मोकळे अंगण दिसत होते. आणि ऋचाला आयडिया सुचली. ती म्हणाली पेशंटच्या जाण्यायेण्यासाठी मधले आवार पूर्ण मोकळे ठेवलय, त्याच्या मधोमध आपण हे झाड असंच्या असं काढून लावूया. आयला... भन्नाट कल्पना..... लगेच कामाला लागलो. परत त्या चार तज्ञांना बोलावले आणि विचारले असं झाड मुळासकट उपटून दुसरीकडे लावले, तर ते जगेल का? या तज्ञ लोकांचं एक लफडं असतं. क्रमांक 1_ते कधीही हो किंवा नाही या दोन शब्दात न अडकता जर तर च्या गोष्टी बोलतात आणि क्रमांक 2= त्यांच्यात एक एकमत कधीही नसते. मरो ते तज्ञ. आपण हा प्रयोग करायचाच. चांगल्या भावनेने करूया. प्रेमाने करूया. जगेल ते झाड. दोन कामगारांना बोलावले. आवाराच्या मधोमध खड्डा खणून घेतला. चांगला चार फूट रुंद आणि चार फूट खोल. आमच्या सगळ्या स्टाफला कल्पना सांगितली. सगळे कामाला लागले. सचिन शेणखत आणि सेंद्रीय खत घेऊन आला. कामगार मग झाड मोकळे करण्यासाठी खणू लागले. काही मुळे तुटायला लागली. मी कळवळून त्यांना जपून खणायला सांगितले. आणि अगदीच बघवेना तेव्हा तेथून निघूनच गेलो. दृष्टी आड सृष्टी. कामगारांनी झाड मोकळे केले आणि मला बोलावलं. झाड गडग्याला टेकवून ठेवले होते. आम्ही सगळ्यानी मिळून ते जडशीळ झाड खड्ड्याकडे आणले. आता ठेऊन बाजूने माती, खत चेपल. कामगारांनी आळं केलं. पाणी घातलं. त्या आमच्या आवाराला काय शोभा आली म्हणून सांगू? हिरवेगार झाड त्या आवाराच्या कपाळावर शोभून दिसत होतं. कामगारांना ठरलेले पैसे दिले आणि सांगितलं. झाड जगले तर अजून पैसे आणि पार्टी पण देणार.
दिलीप आमचा कामगार म्हणाला सर, झाड जगणार. सगळे हसले. मी उत्साहाने फसफसून गेलो होतो. आमचे पेशंट हा सगळा सोहोळा कौतुकानं पाहत होते. सल्ले देत होते. आशा दाखवत होते. गाड्यांना यायला जायला अडचण होणार म्हणुन भीतीही दाखवत होते. मी वर आलो. गच्चीतून त्या झाडाकडे पाहिले. ते जराही कोमेजलं नव्हतं. पूर्वीच्याच रुबाबदार पणे ते जागा बदलून उभे होते.. रात्री पुन्हा खाली गेलो. परत एकदा पाणी घातलं. त्याच्या बुंध्यावर हात फिरवला आणि म्हटलं. जग रे बाबा. मला फसवू नको. खूप छान वाटत होतं. रात्रि उशिरा पुन्हा एकदा गच्चीतून झाड पाहिलं.. बेटा दिमाखात होता. मी मानेचा अँगल बदलून बदलून त्याच्याकडे पाहात खूश होत राहिलो.
रात्री उशिरा जाग आली. हळूच खाली गेलो. हलक्या हाताने दरवाजा उघडला आणि झाडापाशी गेलो. त्याच्या खोडावर हात फिरवला. सिस्टर्सना जाग आली होती. त्या बाहेर आल्या. मी एवढ्या रात्री कशाला खाली आलोय त्यांना समजेना. मी आपलं सरळ सांगून टाकलं. झाडाला बघायला आलोय. त्या दोघीही समजूतदारपणे हसल्या. त्यांना सांगितलं. सकाळी आठवणीने याला पाणी घाला. आपण सर्वानी हे झाड जगवायचे. त्यांनी खात्री दिली. हो सर म्हणाल्या. एका पेशंट चा नातेवाईक जागा होता. तो आला म्हणाला साहेब, त्याला जास्त पाणी पण चांगले नाही. मूळ कुजतात. मी होय म्हणालो, वर आलो. झोपलो समाधानाने आणि शांतीने. सकाळी जाग आली. पहिल्यांदा गच्चीत गेलो. झाडाकडे बघितलं. पानं मस्त दिसत होती.. आळं ओलं दिसत होतं. सिस्टर्स नि आपल काम चोख बजावले होतं. Opd la जाताना झाडापाशी गेलो. प्रेमाने कौतुकाने आणि अभिमानाने त्याच्या खोडावर हात फिरवला. बसलेले पेशंट हे सगळ बघत होते. त्यांच्या नजरेत चक्क दिसत होत. डॉक्टर खुळावलाय.
मी त्याना आत जाताना सांगितलं, अहो ते जागा सोडून लावलाय. जगायला पाहिजे. पेशंट नि पण आशीर्वाद दिला. भाऊनु जगेल ते. काळजी करू नका. त्या दिवशी येणार्या जाणार्या प्रत्येकाशी मी झाडाच्या स्थलांतर बद्दल बोलत होतो. त्या कालच्या नातेवाईकांनी मुंग्यांची पावडर आणून अळ्यात आणि बुंध्यावर टाकली होती. सायंकाळी पुन्हा त्या झाडापाशी गेलो आणि मूकपणे त्याच्याशी बोललो. गच्चीतून पाहिलं, तर पाने जशीच्या तशी दिसत होती. समाधानाने झोपलो. सकाळी उठल्यावर गच्चीतून पाहिलं, आणि चांगलाच चरकलो. बहुतेक सर्व पाने कोमेजलेली होती, आणि त्यांनी माना खाली टाकल्या होत्या. पाने हिरवीच खरी पण मलूल दिसत होती. मला चांगलंच वाईट वाटले. कुणीतरी समजावून सांगितले की, ही पाने जाणार आणि नवीन येणार. आशा वाटली. माझे सगळे पेशंट प्रामुख्याने ग्रामीण भागातील. शेतकरी आणि बागायतदार त्यांच्यापैकी काहीनी सांगितलं,डॉक्टर तुम्ही हे पावसाळ्यात हे केले असते, तर ते झाडाला सोसले असते. जगले असते. या दिवसात अवघड आहे. मी निराश झालो. सगळा दिवस आशा निराशेच्या हिंदोळ्यावर गेला. तिसर्या दिवशी सकाळी पानांचा हिरवा रंग पण गेला. मरणकळा पानोपानी पसरली. मी हट्टाने पाणी घालायचेच ठरवले होते. पण आता मनातून खचलो होतो. त्या सायंकाळी ऋचाने मला झाडापाशी बोलावले आणि दोन हिरवीगार पाने दाखवली. मी मनापासून खूश झालो. म्हणजे काहीतरी जिवंत आहे. झाडाने जगायचे ठरवलेय. सगळ्या स्टाफला बोलावून सांगितलं ही पाने बघा. पाणी बंद करूया नको. सगळ्या स्टाफने मनापासून ठरवले की याला जगवायचे. पोरी म्हणाल्या, सर तुमचं झाड जगणार. ती दोन हिरवी पाने त्याची खूण आहे. पेशंट सांगायला लागले भाऊ पाने बावली. पिवळी झाली. उगी खटाटोप केलास. अशी मोठी झाडे जागा बदलून जगत नसतात.
मी मात्र त्या दोन पानांच्या आशेवर होतो. येता जाता मी ती दोन पाने पाहायचो. दहाबारा दिवसानी त्या पानांनीही दगा दिला. ती पानेही पिवळी झाली. गळून पडली. आणि उघड्या बोडक्या फांद्या रुक्षपणे सांगाडा दाखवत उभ्या राहिल्या. मी आणि स्टाफ मात्र चिवटपणे पाणी घालत राहिलो. त्या पोरी ही समजून गेल्या होत्या. पण माझ्या समाधानासाठी पाणी घालत होत्या. मला आठवले की, आफ्रिकेत एक जमात हिरवं झाड तोडत नाही. ते सगळे जमतात. त्या झाडाभोवती गोलाकार उभारतात आणि त्या झाडाला अभद्र बोलतात. शिव्याशाप देतात. नकारात्मक लाटा सोडतात. ते झाड आपोआपच मरून जातं. मग ते तोडतात.. पण मग याच्या उलट ही होईल की मरत चाललेल्या झाडाला जर आतून हाक मारली. साद घातली. तीव्र इच्छेने सकारात्मक त्याला स्पर्श केला. तर झाड जगायला हवं. एक गम्मत आठवली. झाडांना माणसांचा सहवास आवडतो. माझ्या आंब्याच्या बागेत एकाकी झाडे जेव्हढी फळं धरतात, त्यापेक्षा जास्त माझ्या हॉस्पिटल मधला गजबजलेल्या जागेत लावलेला आंबा जास्त धरतो. त्यानंतर एक कार्यक्रमच सुरू केला. प्रत्येकवेळी opd ला जाताना अणि येताना त्या झाडापाशी उभारायचे. प्रेमाने अगदी आतून त्याच्या खोडावर हात फिरवायचा आणि जग रे. एव्हढाच म्हणायचं सकाळी दुपारी रात्री पेशंट आणि नातेवाईक यांना ना लाजता त्या झाडावर मी हात फिरवत राहिलो. पोरी पाणी घालत राहिल्या असे 28 दिवस गेले.गच्चीतून ते झाड आता उदास दिसायचे. हात आकाशात पसरून ते मुक्ती मागतंय असं वाटायचं. मीही थकलो. आता रोज हात फिरवायचा म्हणजे कर्मकांड वाटायला लागले. मी एकतर नास्तिक अणि बुद्धिवादी. हे मधल्या काळातले हळवेपण मलाच मूर्खपणा वाटायला लागले. मी नाद सोडून दिला.
एके दिवशी सकाळी चहा घेताना ऋचाने मला मोबाईलवर एक क्लोजअप दाखवून काय ते ओळखायला सांगितलं. मला काही समजेना. ऋचा हासत म्हणाली. अहो तुमच्या झाडाला दोन कोंब फुटलेत त्याचे क्लोजअप आहेत. चहा टाकून दोघे खाली गेलो. ऋचाने ते कोंब दाखवले. मी उडालोच. अगदी सूक्ष्म कोंब. शेवाळी रंगाचे. गोगलगाय सारखे दिसणारे. थरारून जायला झालं.. सगळ्या स्टाफला बोलावून ते कोंब दाखवले. एखाद्या नवजात बाळाला पहावे, तसं सगळ्यांच्या चेहर्यावर दाटले. आठ दहा दिवसात पानं वाढलीच. त्यांनी चांगलं बाळसं पकडल. तीनही मुख्य खोडांवर पाने फुटली. जुनी पिवळी पाने असतानाच मुख्य खोडावर हा हिरवा चमत्कारिक फुलला होता. आता हे झाड जगणार आणि आवारातल्या लाल मातीवर हिरवीकंच नक्षी धरणार हे नक्की झालं. ही कथा माहीत असणारे पेशंट. मित्र. मंडळी यांनी दाद द्यायला सुरवात केली. ते कौतुकाने त्या झाडाकडे पाहायला लागले. सापडेल त्याला मीही ही हिरवी गोष्ट सांगायला लागलो. आता पानांनी जोर धरलाय. येता जाता परत एकदा मी त्याच्या खोडावर हात फिरवतो आहे. तुम्ही आता माझ्या आवारात आलात कि प्रथम तो हिरवा चमत्कार पहा. त्याला हात लाऊन जरा दाद द्या, आणि मग त्याची सुरस कथा ऐकायला माझ्याकडे या. हिरव्या हिरव्या हृदयाने.
डॉ मिलिंद कुलकर्णी, तळेरे
9422054785
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा