रघुनाथ रावांना अग्नी देऊन सगळी मंडळी घरी आली. पुरुष मंडळींनी मागे विहिरीवर अंघोळी उरकल्या. महिला मागील बाजूला असलेल्या दोन बाथरूमच्या बाहेर रांगेने थांबल्या. सर्वात आधी राधा आत गेली. राधा म्हणजे प्रसादची बायको. प्रसाद रघुनाथ रावांचा सर्वात मोठा मुलगा. त्याच्या मागे सुरेश आणि मग किशोरी. किशोरीच्या जन्मानंतर वर्षभरातच तिन्ही पोरांना रघुनाथ रावांच्या सुपूर्त करून आनंदी बाई म्हणजे मुलांच्या आईने क्षय रोग होऊन जगाचा निरोप घेतला. त्या गेल्यावर कोकणातलं ते घर, रघुनाथ राव आणि दोन दोन वर्षांच्या अंतराने झालेली तिन्ही मुलं पोरकी झाली. घरची भरपूर शेती होती. आंब्याची कलम होती. नारळ आणि पोफळीची झाडं होती. घरामागेच मोठी वाडी होती. आनंदी बाई गेल्यावर अनेकांनी रघुनाथ रावांना दुसरं लग्न करायचा सल्ला दिला. तुम्हाला साथीची गरज आहे आणि मुलांना आईची असं लोक म्हणत. पण रघुनाथ रावांना मुलांसाठी सावत्र आई आणण मान्य नव्हतं. त्यांनी स्वतःच मुलांना वाढवायचा निर्णय घेतला.
मुलं लहान होती. किशोरी तर अगदी तान्ही होती. रघुनाथ रावांनी आजवर कधी साधा भातही शिजवला नव्हता. पण बायको गेल्यावर काही दिवसातच ते सगळा स्वयंपाक करू लागले होते. घराच्या पुढल्या बाजूलाच किराणा मालाच मोठं दुकान होत त्यांचं. रघुनाथ राव घर, वाडी, मुलं, दुकान सगळं एकट्याने बघू लागले. संध्याकाळ झाली की अगदी दमून जात ते. मग विहिरीवर अंघोळ करून, अंग पुसून, त्यांची खाकी चड्डी घालून उघड्याबंब देहाने त्यांच्या आरामखुर्चीत बसत हातात चहाचा कप घेऊन. वर पंखा फिरत असे. दिवस, महिने आणि वर्ष भुर्र उडून गेली. त्यांनी तिन्ही मुलांना मुंबईला त्यांच्या बहिणीकडे शिकायला पाठवली. दर महिन्याला न चुकता पैसे घेऊन ते मुंबईला जात. बहिणीच्या हातात ती नको नको म्हणत असताना भरपूर पैसे कोंबून "पोरांना काही कमी पडू देऊ नको मालू" इतकं सांगून एक रात्र पोरांबरोबर मालूच्या चाळीच्या गच्चीत झोपून, रात्रभर मुलांचे चेहरे न्याहाळून, त्यांना थोपटून जाग्रणाने लाल झालेल्या डोळ्यांनी पहाटेची बस पकडून कोकणात परत जात. काही वर्षांनी त्यांनी त्यांच्याकडे घरकाम करायला बायजा म्हणून बाई ठेवली होती. घरकामा बरोबरच रघुनाथ राव कधी आजारी पडले तर बायजा त्यांची सेवा करत असे. गावात रघुनाथ राव आणि बायजा बद्दल लोक कुजबुजत असत. पण त्यांच्यात जे काही होतं ते त्या दोघांनाच माहीत होतं. मुलं गावाला राहायला आल्यावर मात्र बायजा कामावर येत नसे. प्रसाद कॉलेजात जायला लागल्यावर त्याने त्याच चाळीत एक खोली भाड्याने घेतली आणि तिघ भावंडं तिथे राहू लागली. गावात रघुनाथराव शेती आणि दुकान चालवून एकटे दिवस काढत होते. मेहेनत करून मुलांना पैसे पाठवत होते.
प्रसाद कॉलेज संपल्यावर बँकेची परीक्षा देऊन लगेच स्टेट बँकेत लागला. सुरेशला गाण्याची आवड होती. तो आधी ऑर्केस्ट्रा मध्ये गाऊ लागला आणि पुढे एक यशस्वी पार्श्र्वगायक झाला. किशोरी इंजिनियर झाली. तिचा नवराही इंजिनियर. इंटरकास्ट प्रेम विवाह. प्रसादचा त्याला विरोध होता. पण रघुनाथ रावांनी त्याची समजूत घालून लग्न लावून दिलं. किशोरी आता नवरा आणि दोन मुलांसह अमेरिकेत असते. प्रसादला एक मुलगा एक मुलगी. दोघेही फायनल इयरला. मुलगी अर्पिता पुढल्या शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. प्रसादचा मुलगा आदी म्हणजे तरुण वयातले रघुनाथ राव. दिसणं, विचार , बोलायची लकब सगळं सेम. गणित त्याचा आवडता विषय. गणितातच पुढे मास्टर्स करायला परदेशात जायचा विचार आहे त्याचा. त्याला शेयर बाजाराची प्रचंड आवड आणि त्यात अभ्यास आहे त्याचा. आत्ताच तो शेयर बाजारातून इतके पैसे कमावतो की प्रसादला सांगतो "बाबा व्हीआरएस घेऊन टाका. मी आहे ना!" पण प्रसाद तयार नाही. प्रसादच्या नोकरीची शेवटची काही वर्ष बाकी आहेत. अर्पिता परदेशात गेल्यावर कदाचित तो निवृत्तीचा विचार करेल. बाकी सुरेशला एक मुलगा. तो कॉलेजात आहे. तो पण गाण्यात करियर करणार आहे.
दहा वर्षांपूर्वी बायजा गेली. त्या नंतर मात्र रघुनाथ राव अगदी एकटे पडले. आणि गेली सहा सात वर्ष तर ते खूप थकले होते. आयुष्यभर फक्त मेहेनत केलेला तो देह आता दमला होता. त्यांच्याने कामं होत नसत. गडी लावून ते कामं करून घेत असत. पण बायजा सारखी साथ नव्हती. ते मुलांना फोन करून सांगायचे की "अरे गावी या. हे घर, वाडी, झाडं, दुकान बघा. मला होत नाही रे आता." पण मुंबईत आपापल्या व्यापात व्यग्र असलेल्या कोणालाच कोकणात जायला वेळ मिळायचा नाही. वर्षातून एखादी फेरी व्हायची सगळ्यांची आंब्याच्या दिवसात. रघुनाथ राव सर्वांसाठी स्वतःच्या हाताने आंबे पिळून पातेलीभर रस दोन्ही वेळेला काढत असत. रात्रीची जेवणं झाली की ते आपल्या आराम खुर्चीत बसत. बाकी सगळे त्यांच्या भोवती कोंडाळे करून बसत. ते परत तेच सांगत की आता तुम्ही सगळी जबाबदारी घ्या. मला होत नाही. मुलं म्हणायची हे सगळं विकू. तुम्ही मुंबईला या. पण ते पिढ्यानपिढ्यांच घर आणि जमीन विकायला तयार नव्हते. "माझे डोळे इथेच मिटणार. माझ्या नंतर तुम्ही हवं ते करा!" असं ते म्हणत. चार दिवस राहून सगळे परत जात. रघुनाथ राव त्यांच्या गाडीने उडवलेला धुरळा बघत डोळे पुसत.
आज सगळी मंडळी अंघोळी करून त्यांच्या आराम खुर्ची जवळ बसली होती. त्यांच्या डोक्याच्या तेलाने आराम खुर्चीवर जिथे डोकं टेकल जातं तो भाग काळसर तुकतुकीत झाला होता. त्यांचे पाय तिथे गुडघ्याजवळ खुर्चीच्या फ्रेमला लागत तिथे पॉलिश उडालेल होतं. आराम खुर्चीच्या शेजारी ते गेल्यावर लावलेला दिवा तेवत होता. बाजूला पाटावर त्यांचा फोटो होता. कोणीच काहीच बोलत नव्हतं. इतक्यात राधा सर्वांसाठी चहा घेऊन आली. तिने सर्वात आधी अंघोळ करून चहा टाकला होता. सर्वांनी चहाचे कप घेतले. कोणीच काहीच बोलत नव्हतं. इतक्यात सुरेशच्या मोबाईल वर किशोरीचा व्हिडिओ कॉल आला. ती, तिचा नवरा आणि मुलं सर्वांशी बोलले. आणि किशोरी ने विषय काढला.
किशोरी - मला माहित आहे की This may not be the best time to discuss this. पण कधीतरी हे बोलावच लागणार आहे. सो तुम्ही गावाला आहात तेव्हाच बोललेल बर. दादा, गावच्या प्रॉपर्टी च काय करायचं ठरवलं आहेस? आपण कोणीच तिथे जाणार नाही. ते सगळं पडून जाईल. त्या पेक्षा विकून टाकलेलं बर. बाबा होते तोवर.
सुरेश - बरोबर आहे. बाबांनी हे आधीच करायला हवं होतं.
प्रसाद - मी बाबांना किती वेळा सांगितल की तुम्ही मुंबईला या. मस्त आमच्या बरोबर रहा. कुठे एकटे रहाताय गावात.
किशोरी - ह्मम..आणि आपल्या इथे तो नवीन रिफायनरी प्रोजेक्ट पण येतोय ना? रेट चांगला मिळेल आता. We have a goldmine. दादा तू जरा चौकशी कर आणि विकून टाक शक्य तितक्या लवकर.
प्रसाद - हो.
किशोरी - आणि हे बघा. त्या व्यवहारातून मला काहीच नकोय. माझं इथे उत्तम आहे. जे आहे ते बाबांमुळेच आहे. माझी इतकीच इच्छा हे की ते घर आणि प्रॉपर्टी आपलं लक्ष नाही म्हणून फुकट जाऊ नये, खराब होऊ नये. मला त्यातून काहीही नकोय. तुमचं ठरलं की मला कळवा. मी येईन आणि सांगाल तिथे सह्या करेन.
सुरेश - बरोबर आहे तुझं. आम्ही करतो प्रयत्न. गावात इस्माईल शेठचा मुलगा जमिनीचे सगळे व्यवहार करतो. त्याच्याकडे गिऱ्हाईक नक्की असेल. त्याने मला अनेकदा फोन केले होते की बाबांना तयार कर जागा विकायला. चांगल गिऱ्हाईक आहे म्हणून. मी बोलतो त्याच्याशी.
फोन कट झाला. सगळे फोटोला नमस्कार करून झोपायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सुरेश इस्माईल शेठ चा मुलगा रफिकला भेटला. रफिक ने एका महिन्यात व्यवहार करायची ग्वाही दिली. उद्या पहाटे सगळे परत निघणार होते. आजही खिचडी खाऊन मंडळी झोपी गेली. पहाटे चारला गजर वाजला आणि प्रसाद उठला. आपलं आवरून इतरांना उठवणार होता तो. दोन गाड्या होत्या. साडे पाचला निघायचा प्लॅन होता. तो त्याचं आटोपून बाकीच्यांना हाका मारून बाहेरच्या खोलीत आला. फोटो शेजारी लावलेल्या दिव्याचा खोलीत मंद प्रकाश होता. प्रसाद पुढे आला आणि अंधारात असलेल्या आराम खुर्चीत रघुनाथ रावांना बसलेलं पाहून दचकला. त्याच्या अंगावर काटा आला.
प्रसाद - ब..बाबा..
आदी - नाही बाबा. मी आदी.
प्रसाद पुढे झाला. आदी त्याच्या आजोबांची खाकी चड्डी घालून त्यांच्या सारखाच उघडा बंब आराम खुर्चीत बसला होता.
प्रसाद - काय रे? हे काय? तयार हो पटकन. मुंबईला निघायचं आहे. क्षणभर दचकलो ना मी तुला बाबांच्या खुर्चीत बसलेला बघून. बाबा तरुण असताना सेम असेच दिसायचे. त्यात तू त्यांची चड्डी घातली आहेस आणि सेम दिसतो आहेस.
इतक्यात बाकीचे सगळे तिथे आले. आदी उठून उभा राहिला आणि बोलू लागला.
आदी - बाबा काल आजोबा माझ्या स्वप्नात आले. मला म्हणाले "आदी हे घर, ही जमीन आपल्या पूर्वजांची मिळकत आहे. ती विकू नको देऊ. तुझ्यात मला मी दिसतो. तू सांभाळू शकशील हा वारसा अस मला वाटतं." मी त्यांचं ऐकायचं ठरवलं आहे.
सुरेश - काहीही काय आदी. अरे राफिकला शब्द दिलाय आपण.
राधा - आदी अरे तुझ मास्टर्स..परदेशी जायचं स्वप्न?
आदी - आई, मास्टर्स करून मी अमेरिकेत राहणार ना? म्हणजे मुंबई तसाही सोडणार आहे. आणि तिथे काय चार पैसे जास्त कमावेन इतकंच ना? ते तर मी इथेही कमवू शकतो. मी पहाटे पासून ह्या खुर्चीत बसून विचार करतोय. आजोबांनी जे सांभाळलं ते मी वाढवू शकतो. ह्या घरात रिसॉर्ट करू शकतो, दुकान छान डिपार्टमेंट स्टोर करू शकतो. शेती अत्याधुनिक करून उत्पन्न वाढवू शकतो. त्यातून खूप पैसे मिळतील. आणि माझा शेयर बाजार आहेच काही कमी पडलं तर. आपण हे काहीच विकायचं नाही. जे उत्पन्न मिळेल ते आपण आणि काका वाटून घेऊ. आत्याला काही नको असलं तरी घरचे आंबे, काजू पाठवू. उद्या इथे प्रकल्प झाला की बिझनेस खूप मोठा होईल बाबा. प्लीज ऐका माझं.
राधा - इथे गावात राहिलास तर तुला मुलगी नाही मिळायची तोला मोलाची.
आदी - नाही तर नाही. पण आई मला इथेच राहू दे प्लीज.
त्या नंतर सर्वांनी दिवसभर चर्चा करून, आदीला समजवायचा प्रयत्न केला. पण तो तयार नसल्याने शेवटी त्याला तिथेच राहू द्यायचा निर्णय घेतला आणि सगळी मंडळी दुसऱ्या दिवशी पहाटे मुंबईला परतली. आदी तिथे राहू लागला. घराचा त्याने चेहरा मोहरा बदलून तिथे दहा खोल्यांचं अद्यावत रिसॉर्ट सुरू केलं. त्याला मुंबई पुण्यातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुकानाचा कायापालट करून त्याने तिथे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केलं. ते देखील जोरदार चालू लागलं. दुकानात, घरात रघुनाथ रावांचे फोटो होते. त्यांना नियमित हार घालत असे आदी. शेयर बाजार सुरू होताच. अशी सहा सात वर्ष गेली. आता आदिला गावात आणि तालुक्यात आदी शेठ म्हणून लोक ओळखू लागले होते.
त्या दिवशी आदी त्याच्या ऑफिस मध्ये बसला होता. इतक्यात दारावर टकटक झाली. त्याने मान वर करून पाहिलं तर एक सुंदर मुलगी उभी होती. जीन्स, त्यावर शॉर्ट कुर्ता, डोळ्यावरचा गॉगल डोक्यावर चढवलेला, चेहऱ्यावर आत्मविश्वासाच तेज.
मुलगी - मी आत येऊ का?
आदी - या ना.
मुलगी - हाय.. मी तन्वी.
आदी - मी आदी. हाय..रूम हवी आहे का?
तन्वी - हो. म्हणजे दोन वर्षांसाठी रूम हवी आहे. मी naturopathy मध्ये phd करते आहे आणि ह्या भागात काही रिसर्च करायचा आहे. पूर्वी इथे ह्या गावात माझ्या आजीची सख्खी बहीण राहायची. She was unmarried. बायजा नाव होतं तिचं. तिचं घर होतं इथे. पण आता फक्त चौथरा आहे. मला काही वर्षात खरं तर ते घर पण परत बांधायचं आहे. तिथे naturopathy var based एक सेंटर सुरू करायचं आहे. पण तो नेक्स्ट प्रोजेक्ट असेल. सध्या phd संपवणार आहे asap. बायजा आजी passed away some years ago. आमच्याच घरी होती पुण्याला. Anyway.. प्लीज तुम्ही मला एक रूम २ वर्षांसाठी रेंट करू शकता का? माझे फ्रेंड्स पुण्याहून इथे येऊन राहून गेले. त्यांनी recommend केलं आहे हे. Vibe खूप मस्त आहे इथला म्हणून. पण मला रूम वार्षिक भाड्यावर हवी हे. तुमच्या रिसॉर्टच्या रेट ने नाही. मला ते परवडणार नाहीत.
आदी तन्वी ला पाहून गार झाला होता. ती होतीच तितकी गोड आणि आकर्षक. तन्वीला देखील आदी छान वाटला होता.
तन्वी - हॅलो. आहे का रूम अव्हेलेबल?
आदी - हो आहे ना.
तो आणि तन्वी टर्म आणि कंडीशन डिस्कस करू लागले. इथे रघुनाथ राव त्यांच्या आराम खुर्चीत बसून समाधानाने हसत होते. त्यांच घर, त्यांची वडिलोपार्जित शेती, जमीन ह्यांना नव्या स्वरूपात राखणारा आदी आता त्यांच्या आणि बायजाच्या अपूर्ण राहिलेल्या, नाव नसलेल्या नात्याला देखील पूर्ण करणार, नाव देणार ह्याची त्यांना खात्री होती. ते आनंदाने आराम खुर्चीत बसून झुलत होते. आदीला तन्वीच्या मागे लांबवर असलेली आराम खुर्ची आजही आपोआप हलताना दिसली, गेली अनेक वर्ष दिसायची तशी. फक्त त्याला जाणवतं असलेलं आजोबांचं त्या वास्तू मधील ते अस्तित्व आदीला हवं होतं आणि आवडत देखील होतं ! एक अपूर्ण वर्तुळ पूर्ण होणार होतं !
©मंदार जोग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा