शहरात येऊन विजयला १ वर्ष झाले होते. एका अपार्टमेंटमधील फ्लॅट त्याने भाड्याने घेऊन तो राहत होता. १ वर्षात त्याने बरीच माहिती गोळा केली होती. रात्री ११ वाजता विजय फ्लॅटला कुलूप लावून बाहेर पडला. मोटारसायकल घेऊन डोंगराळ भागातील एका खेडेगावात पोहोचला. ४ तासांचा प्रवास.... शेवटी त्याला ज्या ठिकाणी पोहचायचे होते तेथे पोहचला... जुनी चाळ होती ती. विजयने गाडी चाळीच्या शेजारी लावली व चाळीत प्रवेश केला. चाळीच्या गेटजवळ वाचमॅन झोपला होता. गेटला कुलूप होते. पण गेटचा छोटा दरवाजा उघडा होता. विजयने गेटमधून चाळीत प्रवेश केला. हळूहळू चालत जिन्यावरून तो पहिल्या मजल्यावरील चाळीच्या एका रूमसमोर आला. दरवाज्याशेजारील बेल वाजवली. परंतु आतून काही प्रतिसाद येत नव्हता. परत पुन्हा बेल वाजवली. पण काही उपयोग झाला नाही. तिस-या वेळेस आतून दरवाजा उघडला गेला. दरवाजासमोरील व्यक्ती झोपेच्या नशेत जांभई देत विजयला म्हणाली,
"कोण पाहिजे आपणाला?"
"तू... तू पाहिजे होतास." म्हणत विजयने लगेच त्याच्या तोंडावर एक हात ठेऊन दुस-या हाताने त्याला खोलीत ढकलले. ती व्यक्ती आरडा-ओरड करणार इतक्यात विजयने कमरेतील चाकू काढला व त्याच्या पोटात तीन वेळा खुपसला. तो मृत झाला आहे याची खात्री झालेवर त्याने त्याच्या तोंडावरील हात काढला. त्या व्यक्तीचे शरीर हळूहळू भिंतीला घसरत खाली पडणार होते इतक्यात विजयने त्याला धरून पलंगावर ठेवले. दरवाजा बंद केला. चाकू पाण्याने धुऊन काढला. मृत शरीराजवळ स्प्रे मारला. रूममधील त्यांच्या झालेल्या हालचालींमुळे थोड्या वस्तू विस्कटलेल्या होत्या. त्या व्यवस्थित लावल्या. खोलीतील लाईट बंद करण्यापूर्वी बॉडीच्या हातात एक चिट्ठी ठेवली. लाईट बंद करून दरवाजा लावून विजय चाळीतून बाहेर पडणार इतक्यात वॉचमॅनला जाग आली. तो झोपेच्या नशेतच होता. कोणीतरी जिन्यावरून खाली येत आहे म्हणून तो आळसातच खुर्चीवरून उठला व थेट बॅटरीचा प्रकाशझोत विजयच्या चेह-यावर मारला. आता विजय त्याच्या समोर आला. विजयने चेह-यावर रुमाल बांधलेला होता. वॉचमॅनच्या ज्यावेळी हे लक्षात आले त्यावेळी मात्र त्याची झोप उडाली. विजय गेटमधून बाहेर पडणार इतक्यात त्याच्या समोर जाऊन त्याने विजयला आडवले व तो म्हणाला,
"तुम्ही कोण? इतक्या रात्री इथे कसे काय आला? तुम्ही इथे कोणाकडे आला होता?"
वॉचमॅनच्या प्रश्नांचा भडीमार चालूच असतानाच विजयने खिशातून एक बाटली काढली. बाटलीतील द्रव पदार्थ आपल्या रुमालावर ओतला व तो रुमाल जलद गतीने वॉचमॅनच्या तोंडाला लावला. हे सर्व होत असताना वॉचमॅनने विजयला विरोध केला परंतु त्याला यश आले नाही. वॉचमॅनला बेशुद्ध अवस्थेत खुर्चीवर बसविले. आपली गाडी घेऊन विजय परत फ्लॅटमध्ये आला.
दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजता चाळीतील एका व्यक्तीने वॉचमॅनला झोपलेल्या अवस्थेत पाहून उठवण्याचा प्रयत्न केला. वॉचमॅन शुद्धीवर येताच त्याने मोठ्याने ओरडायला सुरवात केली.
"चोर... चोर... चोर..."
"अहो काका... असं काय करताय. मी चोर नाही... मी सागर... इथे चाळीतच राहतो. सकाळी व्यायामासाठी बाहेर धावण्यासाठी गेलो होतो. परत फ्लॅटमध्ये जात असताना माझे लक्ष तुमच्याकडे गेले. तुमची झोप लागली वाटतं म्हणून मी तुम्हाला उठविण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही असे ओरडायला लागलात."
"नाही... मी तुम्हाला चोर म्हणालो नाही... इथे काल रात्री एक माणूस आला होता. माहित नाही कोण होता. त्याने तोंडावर रुमाल बांधला होता. मी त्याची चौकशी करत असताना त्याने माझ्या तोंडावर रुमाल धरून मला बेशुद्ध केले."
दोघांचे संभाषण चालू असताना चाळीतील लोक गोळा झालेत. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन वस्तू व इतर साहित्यांची तपासणी करू लागले. वॉचमनसुध्दा वरती येऊन पाहणी करू लागला. अचानक त्याला एक दरवाजा बंद दिसला. त्या दरवाज्यासमोर उभे राहून पहिले तर बाहेरून कडी लावली होती. त्याने दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर काय पलंगावर एका व्यक्तीचा मृतदेह पडला आहे.
"खून... खून... खून.." म्हणत वॉचमॅनने ओरडायला सुरवात केली. त्याच्या ह्या आवाजाने चाळीतील लोक गोळा झाले. बघता-बघता हि बातमी थोड्याच वेळात पोलिसांपर्यंत गेली. मग थोड्या वेळाने पोलीस चाळीत हजर झाले. त्यांनी जागेची पाहणी करून बॉडी ताब्यात घेतली व वॉचमॅनला बोलावले.
"नमस्कार साहेब..." वॉचमॅनने आल्या-आल्या नमस्कार केला. इन्स्पेक्टर कदम या केसचे मुख्य अधिकारी होते. त्यांच्यासोबत चार हवालदार होते.
"तुमचे नाव काय?" इ. कदम यांनी वॉचमॅनला विचारले.
"संदीप." वॉचमॅन म्हणाला.
"बर... ज्या व्यक्तीचा खून झाला त्याचे नाव काय?"
"विकास पाटील."
"तुम्ही सर्वप्रथम बॉडीला पहिले होते ना?"
"होय साहेब."
"तुम्हाला कसे समजले कि येथे खून झाला आहे."
"साहेब... मला ह्याबद्दल काही कल्पना नव्हती. हां... पण काल रात्री एक माणूस आला होता. त्याने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. मी त्याची चौकशी करत असताना त्याने मला बेशुद्ध केले. सकाळी मला जेंव्हा जागे केले तोपर्यंत तो निघून गेला होता. मग मला वाटले तो चोरच असणार. मी याबाबत येथील अध्यक्षांना कल्पना दिली. मग त्यांनीच तुम्हाला फोन करून बोलावून घेतले. इतक्यात अध्यक्ष तेथे हजर झाले.
"नमस्कार सर..." अहुजा म्हणाले.
"ह्म्म्म... तुम्ही बॉडीला कधी पहिले?"
"संदीपने सर्वप्रथम मला कल्पना दिली व त्यानंतर मी तुम्हाला कॉल केला." इ. कदम यांनी सर्वप्रथम पंचनामा केला. त्यांचे सर्व आटोपल्यानंतर ते म्हणाले,
"बरं... आम्ही आता बॉडी पोस्टमार्टमसाठी घेऊन जात आहोत. जर काही आवश्यकता भासली तर तुम्हाला व संदीपला चौकशीसाठी बोलावले नंतर यावे लागेल."
"ठीक आहे साहेब..." संदीप व अहुजा दोघेही एकदम म्हणाले.
बॉडी ताब्यात घेऊन इ. कदम पोस्टमार्टम करण्यासाठी हॉस्पिटलकडे निघाले. हवालदार शिंदे व इ. कदम यांची चर्चा सुरु झाली.
"सर... काय वाटते तुम्हाला?"
"आता तसे काही सांगता येणार नाही. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर काहीतरी सुगावा लागेल. शिवाय बॉडीजवळ एक चिट्ठी होती. त्यामध्ये फक्त 'ल' हे अक्षर टाईप केलेले आहे. यावरून तर काहीच समजत नाही. बघू... पुढे काय होते ते." बोलता-बोलता ते हॉस्पिटलमधून पोलिस स्टेशनला पोहचले.
सायंकाळी ४ वाजता पोस्टमार्टमचा रिपोर्ट घेऊन शिंदे हवालदार आले. रिपोर्टमध्ये फक्त चाकूचा वापर करून खून करण्यात आलेला असावा. तसेच तो चाकू तीन वेळा एकाच ठिकाणी खुपसण्यात आला आहे असे निदर्शनास आले. इ. कदम यांनी विकास पाटील याची सखोल माहिती काढण्यास शिंदे व इतर हवालदाराना सांगितले.
या घटनेच्या दोन दिवसानंतर विजय पुन्हा आपल्या बाईकवरून रात्री एका ठिकाणी आला. सुरवातीला विजय ज्या डोंगराळ भागात गेला होता तेथून ५ किलोमीटर अंतरावर एक खेडेगांव होते. त्या खेडेगावाजवळ असलेल्या शेतीत एक फार्म हाऊस होते. गावातील सरपंच यांची १० एकर शेती होती. रात्री २ च्या दरम्यान विजय तेथे पोहचला. गाडी मुख्य रस्त्याच्या एका बाजूला लावली. तोंडावर रुमाल बांधलेला होताच. हातमोजेसुद्धा घातलेले होते. फार्महाऊसच्या शेजारी एक छोटीशी खोली होती. विजयने त्या खोलीजवळ जाऊन दरवाजा ठोठावला. सुरवातीला काही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु सारखा दरवाजा ठोठावल्याने त्यामुळे होणा-या आवाजाने एक व्यक्ती दरवाज्याजवळ आली व तिने दरवाजा उघडला. त्या व्यक्तीने झोपेच्या अवस्थेतच प्रश्न केला,
"तुम्ही कोण आहात आणि कोण पाहिजे तुम्हाला?" विजयचा चाकू त्याच्या हातात तयार होताच.
"तूच पाहिजे होतास." म्हणत त्याच्या तोंडावर हात धरला. त्याचे तोंड दाबून त्याला आत भिंतीवर ढकलले आणि त्या व्यक्तीला काही कळायच्या आत चाकूने भोकसले ते पण सलग तीन वेळा. त्या व्यक्तीची धडपड पूर्णपणे थांबली कारण त्याने प्राण सोडला होता. विजयने त्याला खाटावर झोपवले. हातात एक चिठ्ठी ठेवली व निघून गेला.
त्या रात्रीच्या दुस-या दिवशी सकाळी १० वाजता इ. कदम यांना call आला.
"साहेब, मी सरपंच हणमंत पाटील बोलत आहे. आमच्या फार्महाऊसमध्ये एका नोकराचा खून झाला आहे. तुम्ही ताबडतोब येथे या."
"ठीक आहे." म्हणत इ. कदम यांनी गाडी काढली व थोड्या वेळात सरपंचांच्या फार्महाऊसमध्ये पोहचले. बॉडी ताब्यात घेतली व सरपंचांना म्हणाले,
"तुम्हाला कसे समजले आणि ज्याचा खून झाला त्याचे नाव काय?"
"साहेब, त्याचे नाव राम होते. तो एक वर्षांपूर्वी आमच्या येथे कामासाठी आला होता. घरकामासाठी अगोदरच एक मोलकरीण आमच्या येथे आहे. परत दुसरीकडे कुठेतरी काम बघ असे सांगितले. पण तो तयार नव्हता. म्हणाला, की खूप ठिकाणी चौकशी केली पण काम काही मिळाले नाही. खूप आशा घेऊन आलो आहे तुमच्याकडे. कृपया नाही म्हणू नका असे म्हणत त्याने माझे दोन्ही पाय धरले."
"अरे... अरे.. हे काय करतोस? आधी उठ बर." म्हणत मी त्याला वर उठवले.
"बरं... घरामधील काम मी तुला देऊ शकणार नाही पण शेतात काम करणार असशील तर ते देऊ शकतो."
"चालेल साहेब."
"पण शेतामध्ये तुला राहावे लागेल. महिन्यातून एकदा तुला घरी जाता येईल. ठीक आहे."
"बरं साहेब..."
त्याने हे सर्व मान्य केल्यावर मी त्याच्यासाठी एक छोटीशी खोली बांधली. रामचे नातेवाईक येथे जवळपास कोणी नव्हते. शिवाय त्याचे लग्नसुद्धा झाले नव्हते. तो दररोज सकाळी ७ वाजता चहापाणीसाठी आमच्या घरी न चुकता येत होता. आज सकाळी तो का आला नाही ते पाहण्यासाठी मी फार्महाऊसवर आलो असता त्याच्या खोलीजवळ जाऊन त्याला हाक मारली. २ मिनिटे मी फक्त हाक मारत होतो. पण आतून काही उत्तर मिळत नव्हते. शेवटी त्याला फोन केला असता फोन स्वीच ऑफ आहे असे ऐकू येत होते. नकळत माझी नजर खाली गेली त्यावेळी दरवाजाला बाहेरून काडी असल्याचे निदर्शनास आले. दरवाजा उघडला असता समोरच रामचा मृतदेह खाटावर पडलेला मला दिसला. हे पाहून मला धक्काच बसला. मी खूप घाबरलो होतो. काय करावे सुचत नव्हते. मग लगेच तुम्हाला कॉल केला.
"बरं... तुमचा कोणावर संशय वगैरे."
"नाही साहेब. रामला दारू पिण्याची सवय होती. ज्यावेळी तो कामावर हजर झाला होता त्यावेळी त्याने ह्याबद्दल काही सांगितले नव्हते. पण काही दिवसात ही बातमी समजली. मी त्याला रंगेहाथ पकडले व तू जर दारू पिणार असशील तर कायमचे काम सोडून जाऊ शकतोस असे बजावले. त्याने गयावया करून माझी माफी मागितली व दारू सोडण्याचे वचन दिले. त्यानंतर त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही.
"ठीक आहे. पंचनामा करून आम्ही बॉडी पोस्टमार्टमसाठी घेऊन जात आहोत. जर काही माहिती मिळाली तर आम्हाला call करा. शिवाय चौकशीसाठी जर आम्ही तुम्हाला बोलवले तर पोलीस स्टेशनला यावे लागेल."
"ठीक आहे" सरपंच म्हणाले.
गाडीतून जात असताना इ. कदम व शिंदे यांचे संभाषण सुरु झाली.
"सर, तुम्हाला काय वाटते? कोण खून केला असेल?"
"मला वाटते. दोन दिवसापूर्वी ज्याने चाळीत खून केला आहे त्यानेच रामला मारले असणार."
"एव्हढ्या खात्रीने तुम्ही कसे काय सांगू शकता?"
"पहिली गोष्ट, खुनाची वेळ रात्रीची होती. दुसरी खून चाकूने भोकसून केला आहे असे बॉडीवरून दिसत होते. पण पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्याशिवाय नक्की काही सांगता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या व्यकितच्या हातातील चिट्ठी ज्यावर टी हे अक्षर टाईप केलेले होते."
"असं आहे तर... मग सर तुम्हाला काय वाटते... ती व्यक्ती तिसरा खून करेल"
"शक्यता आहे. पण त्या अगोदर आपणाला त्या व्यक्तीला म्हणजेच खुनीला शोधून काढावयाचे आहे.
"बर... सर." शिंदे म्हणाले. बोलता बोलता दोघेही पोलीस स्टेशनला पोहचले. पोस्टमार्टमचे रिपोर्ट पहिल्या खुनासारखेच होते. इ. कदम यांना काहीच समजत नव्हते. हे नेमके काय चाललयं आणि कोण या पाठीमागे असेल आणि हे सर्व का करत असेल ?"
एक आठवड्यानंतर विजयने नितीनला फोन लावला.
"हॅलो... नितीन..."
"हा.... बोलतोय... आपण कोण?"
"मी विजय बोलतोय."
इतक्या दिवसांनी विजयचा फोन आल्यावर नितीनला धक्का बसला. पण आनंदही झाला होता. मग लगेचच त्याने प्रश्न केला,
"अरे... हा नंबर कुणाचा आणि तुझा पहिला नंबर का लागत नाही?"
"हा माझा नवीन नंबर आहे. सेव्ह करून ठेव. पहिला नंबर बंद ठेवला आहे. मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे."
"बोल ना..."
"फोनवर नाही. प्रत्यक्षात भेटूया. चालेल का?"
"चालेल... पण नक्की कुठे?"
"मी तुला पत्ता sms करतो. तू त्या पत्त्यावर उद्या सकाळी ठीक ११ वाजता ये."
"Ok... येईन मी." म्हणत नितीनने फोन कट केला. संध्याकाळी घरी परत यायच्या अगोदर किरकोळ रजेचा अर्ज नितीनने ऑफिसमध्ये दिला व घरी आला.
दुस-या दिवशी विजयने सांगितलेल्या पत्त्यावर नितीन पोहचला. विजय नितीनच्या अगोदरच तेथे आला होता. नितीन विजयच्या समोरील खुर्चीत जाऊन बसला तसाच त्याने बोलायला सुरवात केली,
"अरे काय हे?... कुठे आहेस तू? आणि आपण इथे ह्या हॉटेलमध्ये काय करत आहोत?"
"सांगतो... सगळं काही सांगतो... तत्पूर्वी काहीतरी खाण्याची ऑर्डर करूया." म्हणत विजयने वेटरला हाक मारली. दोघांच्या आवडीचा वडापाव व त्यानंतर चहा आणण्याची ऑर्डर दिली. विजयने बोलायला सुरवात केली.
"कसा आहेस?"
"कसा असेन?... ठीक आहे. तू इतके दिवस होतास कुठे? तुला माहित आहे का बॉस तुझ्या नावाने दररोज ओरडायचे. मी कशीतरी त्यांची समजूत काढायचो. परंतु शेवटी एक महिन्यानंतर त्यांनी तुझ्या जागी दुस-या व्यक्तीची नेमणूक केली. मला काही करता आले नाही मग त्यासाठी. माफ कर."
"तू का माफी मागत आहेस? चूक तर माझी आहे. मीच ऑफिसला आलो नाही. जाऊ दे. बर मला तुझी मदत हवी आहे." इतक्यात वेटर वडापाव घेऊन आला व दोघांसमोर ठेवला.
"कशाबद्दल?" वडापावचा पहिला घास तोंडात घेत नितीन बोलत होता.
"चोरी करायची आहे." विजयने असे बोलताच त्याला त्या पहिल्या घासालाच जोराचा ठसका आला. विजयने त्याला पाणी दिले. पाणी पिऊन तो म्हणाला,
"काय?"
"हो..."
"पण का? कशासाठी आणि कोणासाठी?"
"मला फक्त एव्हढच सांग की तू मला मदत करणार आहेस की नाही."
"अजिबात नाही. असले वाईट काम करताना मी तुला मदत करेन असे तुला वाटले कसे?"
"कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि काम वाईट असले तरी त्या कामामागील हेतू चांगला आहे. पण हे सर्व मी एकटे करू शकत नाही. म्हणून करशील ना मदत मित्रा?"
नितीनला त्याक्षणी काही कळत नव्हते. त्याला ह्यावर काय बोलावे काय करावे काही समजत नव्हते. सुरवातीला ५ मिनिटे तो शांतच होता. मग त्यानंतर वडापावचा तुकडा तोंडात घेत बोलला,
"बोल, काय करायचे आहे?"
"कलेक्टरच्या पी. ए. च्या घरात चोरी करायची आहे."
"बरं... पण तिथे सिक्युरिटी असेल ना? शिवाय कुत्री व गार्डस पण असतील. चोरी कशी करणार?"
"सांगतो. लक्षपूर्वक ऐक. हे बघ." असे बोलून विजयने कलेक्टरच्या पी. ए. च्या घराच्या नकाशा नितीन समोर उघडा केला."
"हे काय?" नितीन म्हणाला.
"हा त्या पी.ए. च्या घराचा नकाशा आहे."
"तुला कसा मिळाला?"
"मी स्वतः हाताने तयार केला. शिवाय इतर लोकांच्याकडून त्यांना थोडे पैसे देऊन त्यांच्याकडून मदत घेऊन आणखी माहिती काढली. ह्या नकाशाप्रमाणे आपण मागील कंपाउंड वॉल वरून आत शिरायचे." बोलत बोलत विजयने सगळा प्लॅन सांगितला. शिवाय आपण हे का करत आहोत? ह्यामधून काय साध्य होणार आहे? हेसुद्धा सांगितले. नितीन लक्षपूर्वक ऐकत होता.
"ठीक आहे. मी येईन रात्री. बरोबर ११ वाजता."
"बरं... मी पण सर्व तयारीने येतो." म्हणत हातात हात देऊन विजय तेथून निघून आला. नितिनसुद्धा त्याच्या पाठोपाठ घरी निघाला.
रात्रीचे ठीक ११ वाजता दोघेही ठरलेल्या ठिकाणी पोहचले. नितीन विजयला म्हणाला,
"ही कंपाऊंड वॉल तर खूप उंच आहे. आपण तिच्या पलीकडे कसे जाणार?"
"काळजी करू नकोस..." म्हणत विजयने आपल्या बॅगेतून एक मोठी जाड दोरी काढली. नंतर तिला समोर एक हुक अडकवला. ती दोरी फिरवून त्याने त्या दोरीची हुकाकडील बाजू कंपाऊंड वॉलच्या मागे टाकली व दुसरी बाजू आपल्या हातात धरली. दोघेही दोरीचा आधार घेऊन कंपाऊंड वॉल वरती चढले. ज्या ठिकाणी दोरी अडकली होती तेथे एक झाड होते. त्या झाडाचा आधार घेऊन खाली उतरले. सर्वप्रथम त्यांनी सिक्युरिटी गार्ड्सना रुमालावर बेशुद्ध पडायचे औषध पसरून पाठीमागून हळूच हल्ला करून बेशुद्ध केले. त्यांच्या ह्या हालचालींची चाहूल कुत्र्यांना जाणवल्यामुळे त्यांनी भुंकायला सुरुवात केली. कुत्र्यांचा आवाज ज्या दिशेने येत होता त्या दिशेचा अंदाज घेऊन त्या बाजूंला दोघांनी मांसाचे तुकडे फेकायला सुरवात केली. मग ५ मिनिटात कुत्र्यांचा आवाज बंद झाला. कारण त्या मांसामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. आता घरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी काचेच्या खिडकीवर दगड मारून काचा फोडल्या. त्या आवाजाने पी. ए. ला जाग आली. त्याने रूममध्ये लगेच लाईट लावली. तोपर्यंत नितीन व विजय आत आले होते. लाईटच्या उजेडाने पी. ए. ची पत्नी जागी झाली व म्हणाली,
"अहो... काय झालं? तुम्ही जागे का झालात?"
"काही नाही... मला कसलातरी आवाज ऐकू आला म्हणून जागा झालो."
"काही नाही... तुम्ही झोपा आता. सकाळी तुम्हाला लवकर मिटींगला जायचे आहे." झोपेच्या नशेतच त्याची पत्नी बोलत होती. पी.ए. च्या खोलीतील लाईटचा उजेड काचेच्या खिडकीवर पडल्याने विजय व नितीन त्या उजेडाच्या दिशेने वरती आले. खालच्या मजल्यावर नोकर झोपला होता त्यालासुद्धा त्यांनी बेशुद्ध केले. ते त्या रूमसमोर आले. त्यांनी दरवाजा ठोठावला.
"इतक्या रात्री कोण आले असेल?" दोघेजण विचार करू लागले.
"कदाचित नोकर असेल. मी बघून घेतो. तू झोप." असे पत्नीला सांगून पी.ए. ने दरवाजा उघडला. इतक्यात विजयने त्याच्यासमोर बंदूक धरली व म्हणाला,
"हात वर...."
"कोण आहात तुम्ही? आणि काय पाहिजे तुम्हाला?" हात वरती केलेल्या अवस्थेत पी. ए. म्हणाला. इतक्यात पी. ए. ची पत्नी जागी झाली.
"खबरदार... आवाज केला तर दोघांना पण उडवून टाकीन." विजय म्हणाला.
"तिजोरीची चावी पाहिजे .. नको... नको... एक काम कर.. तिजोरीतून पैसे काढून आण." म्हणत नितीनने एक बॅग त्याच्यासमोर फेकली.
"नाही... मी नाही देणार..."
"मग हिला मरावे लागेल..." म्हणत विजयने तिच्या पत्नीकडे बंदूक रोखली. पी. ए. च्या पत्नीला घाम फुटला.
"थांबा... थांबा... तिला मारू नका. मी देतो.. सगळे पैसे देतो." पी. ए. ने तिजोरीतून पैसे काढून त्या बॅगेत भरले व बॅग त्यांच्या हवाली केली. नितीनने दोघांच्या तोंडावर बेशुद्ध करायचा गॅसचा फवारा मारला. विजयने दोघेही बेशुद्ध झालेवर पी.ए. च्या हातात एक चिट्ठी ठेवली व दोघेही ज्या मार्गाने आत आले होते त्याच मार्गाने बाहेर पळून आले.
दुस-या दिवशी हि बातमी ब्रेकिंग न्युज म्हणून मीडियाने पसरवायला सुरवात केली. त्यांना ही बातमी कोणी सांगितली हे पी.ए. ला देखील समजले नाही. ह्या घटनेनंतर कमिशनरांनी पोलिसांची मिटिंग बोलावली. कमिशनर चौगुले हे ह्या केसचे मुख्य होते. त्यांनी बोलायला सुरवात केली.
"आज शहरामध्ये काय चालू आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? सलग दोन खून झालेत व एका ठिकाणी चोरी. चोर व खुनी अजून सापडले नाहीत. आपले पोलीस डिपार्टमेंट झोप काढत आहे कि काय? मला उत्तर हवंय. . तुम्हाला जी सिक्युरिटी, जी काही परमिशन व इतर कोणत्याही गोष्टीची गरज असेल ती मी तुम्हाला देईन. परंतु रात्रीचा दिवस करावा लागला तरी चालेल. पण हे दोघे लवकरात लवकर सापडले पाहिजेत. या केसचा निकालही लवकरात लवकर लागावा अशी मी आशा धरतो." इ. कदमसुद्धा आले होते. कमिशनर साहेब बाहेर उठून जाणार इतक्यात ते म्हणाले,
"Excuse me... Sir" सर्वांनी इ. कदम ह्यांच्याकडे पहिले. कमिशनरही त्यांच्याकडे पाहून म्हणाले,
"बोला कदम."
"सर... मला वाटते. चोर व खुनी दोघे नसून एकच आहे."
"कशावरून?"
"सर, सुरवातीला जे दोन खून झालेत त्यांना चाकूने खुपसून ठार करणेत आले होते. त्यांचा हातात एक चिठ्ठी ठेवणेत आली होती. आणि काल ज्यांच्या घरी चोरी झाली तेथे मी चौकशीसाठी गेलो होतो. त्यांच्या हातातसुद्धा एक चिठ्ठी होती. त्यामध्ये 'पा' हे अक्षर टाईप केलेले आहे. ही बघा सर..." म्हणत कदमांनी ती चिट्ठी कमिशनर साहेबांना पाहावयास दिली. त्यावर ते म्हणाले,
"मग ह्यावरून ती व्यक्ती एकच आहे हे कसे सिद्ध होते. चोरानेसुद्धा चिट्ठी ठेवली असेल?"
"सर, हा योगायोग असणे शक्य आहे. पण सर, जर त्याला खूनच करायचा असता तर त्याने ज्यांचा घरी चोरी केली त्यांना बेशुद्ध न करता सहजपणे ठार केले असते. पण तसे घडले नाही. शिवाय पहिला खून ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वॉचमॅनने त्याला पहिले होते. मग त्याक्षणी तो खुनी त्याला ठार मारू शकत होता. परंतु त्याने त्याला फक्त बेशुद्ध केले."
"ह्म्म्म... असू शकते. कदम या केससाठी मी तुम्हाला खास परवानगी देतो. तुम्ही या केसचे मुख्य सूत्रधार असणार. तुम्हाला जर आपल्या एरियातून बाहेर चौकशीसाठी जावे लागले तर त्याची काळजी करू नका. त्यासाठीही तुम्हाला कोणाची परवानगी हवी असेल तर मी आणून देईन पण या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी मी अपेक्षा करतो."
"Thank You... सर..." इ. कदम म्हणाले. त्यानंतर कमिशनर निघून गेले. इतर सर्व पोलिसही आपापल्या ड्युटीवर निघाले. इ. कदम गाडीत बसले. लगेच हवालदार शिंदेनी गाडी सुरु केली व त्यांना विचारले.
"काय झाले सर...?"
"कमिशनर साहेबांनी ह्या केसची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
"मग आता काय करायचे?..."
"लवकरात लवकर ह्या आरोपीला पकडायला हवे. नाहीतर तो यापुढे काहीही करू शकतो."
बोलता-बोलता पोलीस स्टेशन आले. रात्री सर्व पोलीस व हवालदार घरी गेले. पण इ. कदम अजून पोलीस स्टेशनमध्ये होते. ते या केसबद्दल अजून काही माहिती मिळते का ते पाहत होते. त्या रात्री कदम उशिरा घरी आले.
दोन दिवसानंतर विजय आणि नितीन परत एका दुस-या हॉटेलमध्ये भेटतात.
"आता पुढे काय?" चहाचा घोट घेत नितीन म्हणाला,
"मुख्यमंत्री यांच्या घरी चोरी..." विजय बोलला.
चहाचा घोट घशातून खाली न सरकता सरळ तोंडातून बाहेर येऊन टेबलावर पडला. तोंड साफ करत तो म्हणाला,
"काय?... तू शुद्धीवर तर आहेस ना? काय बोलतोस तुला तर समजते का? कसं शक्य आहे?"
"हे बघ मला माहित आहे कि रिस्क आहे. पण हे करावंच लागेल."
"पण एव्हढ्या सर्व सिक्युरिटीना सामोरे कसे जायचे? आणि समजा आपण कशीबशी खटपट करून घरात शिरलो तर बाहेर कसं पडायचं? जर काही गडबड झाली तर दोघेही फासावर नक्कीच."
"काही गडबड होणार नाही. प्लॅन पहिल्या चोरीसारखाच आहे पण थोडा वेगळा आहे. आणि समज काही गडबड झाली आणि त्यामध्ये दोघांपैकी कोणी सापडलो किंवा दोघेही सापडलो तर ह्या बाटलींचा वापर करून स्वतःला संपवायचे." म्हणत विजयने दोन बाटल्या नितीनला दिल्या व दोन आपल्या खिशात ठेवल्या . मग थोड्या वेळाने दोघेही तेथून निघून गेले.
ठरल्याप्रमाणे दोघेही रात्री १ वाजता घराजवळ आले. वॉचमॅन व इतर दोन गार्डसना बेशुद्ध केले. अजून काही गार्डस तेथे होते. पण घरात शिरण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याने त्यांनी त्या इतर गार्डसकडे दुर्लक्ष करून घरात प्रवेश केला. घरात घुसायच्या अगोदर बाहेर जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यांना लांबूनच पिस्तुलीने फोडून काढले. पिस्तुलीमध्ये रबरी गोळ्यांचा वापर त्यांनी केला होता. घरात प्रवेश करताच टॉर्चच्या साहाय्याने हळूहळू मुख्यमंत्रांच्या रूमजवळ आले. दरवाजा ठोठावला. मुख्यमंत्री घरात एकटेच होते. त्यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. अचानक आणि एवढ्या रात्री दरवाजा ठोठावल्याचा आवाज आल्याने त्यांनी आपल्याजवळ असलेल्या लॉकरमधील पिस्तूल काढली. दरवाज्याच्या आतून काचेतून बाहेर पलीकडे पहिले असता कोणी दिसत नव्हते. दरवाजा उघडून पहिले असता समोर कोणी नव्हते. बाहेर डोकावून विजयकडे पहिले असता मागून नितीनने त्यांच्या डोक्यात वार केला. मुख्यमंत्री बेशुद्ध पडले. ज्यावेळी त्यांना शुद्ध आली त्यावेळी त्यांचे हातपाय बांधलेले होते आणि तोंडावर चिकटटेप लावण्यात आला होता. एक तासांनी ते शुद्धीवर आले. विजय समोर पिस्तुल धरून उभा होता. नितीनच्या हातात मुख्यमंत्र्यांची पिस्तुल होती. त्याची पिस्तुल त्याने बॅगेत ठेवली होती. नितीन म्हणाला,
"सर, तिजोरीच्या चाव्या हव्या होत्या. कुठे आहेत ते शांतपणे सांगा नाहीतर दोघांच्या पिस्तुलातील सर्व गोळ्या तुमच्या डोक्याच्या व शरीराच्या आरपार जातील." त्यांना बोलू देण्यासाठी विजयने तोंडावरील चिकटटेप काढला,
"बेडच्या खाली आहेत." चाव्यांचा जुडगा सापडला. मग विजय तिजोरीतून पैसे काढण्यात मग्न होता व नितीन मुख्यमंत्र्यांकडे लक्ष ठेऊन होता. तिजोरी लहान होती. पैशाचा पहिला पुंजका हातात घेणार इतक्यात अलार्म वाजला. त्यामुळे बाकीचे आसपासचे गार्डस सावध झाले. नितीन विजयला म्हणाला,
"चल... पळून जाऊ... पैसे राहू देत... नाहीतर दोघेपण पकडले जाऊ."
"नाही... मला जास्त वेळ लागणार नाही. एक मिनिट थांब." विजय उत्तरला.
"अरे पण..."
"इतकी मेहनत करून आत आलो आहोत. रिकाम्या हाताने परत जायचे का? अजिबात नाही."
"तुम्ही येथून पळू जाऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला सोडणार नाही." मुख्यमंत्री म्हणाले.
"ते आमचे आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवा." नितीनने सांगितले. मग नितीन सुद्धा विजयला मदत करू लागला. दोघांनी शक्य तितक्या लवकर तिजोरी रिकामी केली. इतर चोरीसारखे मुख्यमंत्र्यांना बेशुद्ध केले. त्यांच्या हातात चिट्ठी ठेवली.
"चल... पळून जाऊ..."
दोघेही धावत बाहेर पडत होते. पण पळत असताना नितीनचा जिन्याच्या पायरीवरून पाय घसरला व तो घसरत खाली पडला. ओलांड्या खात समोरील टेबलावर त्याचा पाय जोरात आदळला. विजयाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. बहुतेक फ्रॅक्चर झाला होता. मग नितीनच विजयला म्हणाला,
"तू जा... माझी काळजी करू नकोस."
"अरे.... पण तुला असे एकटे सोडून कसे जाऊ?"
"हे बघ... मूर्खपणा करू नकोस... माझ्यासाठी थांबलास तर आपण दोघेही सापडू. तू जा... मी आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे पुढे नेईन." विजयने नाइलाजस्तव तेथून पळ काढला. नितीन एक पॉईजनची बाटली प्याला व लगेच दुसरी बाटली त्याने आपल्या चेह-यावर ओतली ज्यामध्ये acid होते. विषाने मृत्यू व्हायच्या अगोदरच त्याचा चेहरा जळाला होता. मग काही क्षणात त्याचा मृत्यू झाला.
नेहमीप्रमाणे मिडीयाने मुख्यमंत्री यांच्या घरातील चोरीची बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली. इ. कदम यांनी नितीनची बॉडी ताब्यात घेतली. मुख्यमंत्र्यांबरोबर थोडीशी चर्चा केली. व त्यांच्याकडील चिट्ठी घेऊन ते पोलीस स्टेशनला आले. शिंदे हवालदार त्यांना म्हणाले,
"सर, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते?"
"परत त्याच चोराने व खुनीने हे केले आहे. चौथ्या चिट्ठीवर 'य' असे लिहले आहे. बघू... शोधायचा व पकडण्याचा प्रयत्न चालू ठेऊ."
"पण सर, ही जी बॉडी आहे ती कोणाची असू शकते?"
"त्याच्याच ओळखीमधील एक व्यक्ती असेल किंवा त्याचा मित्र पण असू शकेल."
"म्हणजे सुरवातीपासून हे दोघे एकत्र काम करत होते."
"असेल कदाचित..."
"कदाचित म्हणजे?"
"म्हणजे... सुरवातीला दोन खून झाले. खून करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज लागते असे नाही. एक व्यक्तीसुद्धा खून करू शकतो. पण चोरी करण्यासाठी कोणाचीतरी मदत नक्की घ्यावी लागते. हा माझा तर्क आहे. निश्चित काही सांगता येणार नाही. कदाचित दोघेही सुरवातीपासून एकत्र असू शकतात."
"मग आता काय करायचे?"
"पंचनामा झाल्यानंतर बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवून देऊ. तेथून काय रिपोर्ट येतात ते पाहू." बॉडी पोस्टमार्टमला पोहच करून इ. कदम व इतर हवालदार पोलीस स्टेशनला पोहचले.
विजय आता एकटा पडला होता. त्याचा एकमेव आधार नितीन या जगात आता नाही याची त्याला जाणीव होती. खूप वाईट वाटत होते. खूप रडला तो. या अनपेक्षित घटनेने तो खचला होता. मग थोड्या वेळाने डोळे पुसून घेतले व पुढच्या कामासाठी तयारी करू लागला.
३ दिवसानंतर विजय पुन्हा रात्रीचे ठीक ११ वाजता आपल्या बाईकवरून बाहेर पडला. २ तासांनी एका ठिकाणी पोहचला. ज्या घरात शिरून चोरी करायची आहे त्या घराच्या मागील बाजूस गाडी लावली. नेहमीप्रमाणे कंपाऊंड वॉलच्या मागील बाजूने प्रवेश केला. सिक्युरिटी गार्डला बेशुद्ध केले. बाहेर फक्त दोन सिसिटीव्ही कॅमेरे होते. ते पिस्तुलने रबरी गोळ्यांच्या साहाय्याने फोडले. खिडकीची काच फोडून विजय घरात शिरला. विजय ज्या घरात शिरला होता ते घर आमदाराच्या पी. ए. चे होते. इतक्यात पी. ए. ला जाग आली. त्याने खोलीतील लाईट लावली. लाईटच्या उजेडाने व पी.ए. च्या हालचालीने त्याची पत्नी जागी झाली व त्याला म्हणाली,
"अहो, काय झालं?"
"काही नाही. खाली कसलातरी आवाज झाला म्हणून जागा झालो."
"काही नाही ओ ... झोपा आता."
दोघांचे बोलणे चालू असताना विजयने जिन्यावरून जाऊन पी.ए. च्या बेडरूमच्या दरवाजावर थाप मारली.
मग आता दोघेही जागे झाले. इतक्या रात्री कोण आले असेल असा विचार करत पी.ए. दरवाजाजवळ आला व दरवाजा उघडण्याआगोदर आतील काचेतून पहिले तर समोर कोणी दिसत नव्हते. मग म्हणाला,
"कोण आहे?"
बाहेरून काही प्रतिसाद नाही. मग दरवाजा उघडून पहिला तर समोर कोणी नव्हते. बाहेर येऊन पुढे पाहणार इतक्यात विजयने मागून पिस्तूल डोक्याला लावली.
"मागे वळून पाहू नका. नाहीतर पिस्तुलातील गोळी तुमच्या डोक्याच्या आरपार जाईल. दोन्ही हात वर करा आणि तसेच रूममध्ये चला." त्या अवस्थेत पी.ए. ला आत आणले. विजय पी.ए. च्या पत्नीला म्हणाला,
"वाहिनीसाहेब, मला पैसे हवेत. तिजोरीतून पैसे आणून ह्या बॅगेत मला भरून द्या." म्हणत विजयने एक बॅग त्यांच्यासमोर फेकली.
"आरडाओरड करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर दोघांना येथेच ठोकून देईन." पी.ए. च्या पत्नीने बॅगेत पैसे भरून बॅग विजयच्या हवाली केली व बेडवर जाऊन बसली. विजयने पी.ए. च्या डोक्यात वार करून त्याला बेशुद्ध केले व त्याला बेडवर त्याच्या पत्नीशेजारी ठेवले. मग पी.ए. च्या पत्नीच्या तोंडावर बेशुद्ध करायचा फवारा मारला व तेथून पळ काढला. जाता-जाता पी.ए. च्या हातात एक चिट्ठी ठेऊन गेला.
दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे मिडिया ह्या चोरीची बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून पसरवत होती. इ. कदम यांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. पी.ए. सोबत थोडी चर्चा केली व निघून आले. शिंदे त्यांना म्हणाले,
"सर, आता काय करायचे?"
"पाचवी चिट्ठी सापडली आहे. त्यामध्ये 'ज' हे अक्षर टाईप केलेले आहे.
"मग आता..."
"प्रयत्न चालू ठेऊ... तुम्हाला जी माहिती गोळा करायला सांगितली होती ती मिळाली का?"
"हो सर. पहिला खून झाला त्या व्यक्तीचे नाव विकास पाटील नव्हते. तर हे होते." म्हणत शिंदेनी गाडीतील एक कागद कदम यांचेकडे दिला. त्यामध्ये पहिल्या खून झालेल्या व्यक्तीचे खरे नाव व त्याची इतर माहिती होती.
"बर... असं आहे तर..." मग शिंदे पुन्हा म्हणाले,
"दुसऱ्या खुनाबद्दलची सविस्तर माहिती ही घ्या सर." म्हणत शिंदेनी दुसरा कागद इ. कदम यांचेकडे दिला. कदम यांनी तो संपूर्ण वाचला.
"आणखी एक सर, यानंतर दुस-या चोरीच्या ठिकाणी जी बॉडी मिळाली त्याबद्दल अजून तपास चालू आहे. लवकरच आम्ही ती माहिती तुम्हाला पोहच करू."
"OK..." इ. कदम म्हणाले.
बोलता-बोलता पोलीस स्टेशन आले. थोड्या वेळाने इ. कदम त्याचबरोबर इतर सर्व स्टाफ आपल्या घरी निघून गेले. त्याच दिवशी रात्रीचे ११.३० वाजता इ. कदम जेंव्हा आपल्या घरी होते. त्यावेळी अचानक दरवाजावरील बेल वाजली. ते त्या वेळी जागेच होते कारण ह्या केसमुळे त्यांची झोप उडाली होती. दरवाजातील काचेतून बाहेर पहिले असता कोणी दिसत नव्हते. त्यांनी रिव्हॉल्वर हातात घेतली. दरवाजा उघडताच रिव्हॉल्वर समोर धरली. परंतु समोर कोणीच नव्हते. बाहेर येऊन पहिले असता आसपास कोणी दिसत नव्हते. आत येऊन दरवाजा बंद करणार इतक्यात त्यांचे लक्ष त्या दरवाज्या खालील फरशीवर गेले. तेथे एक चिट्ठी ठेवली होती. त्यामध्ये फक्त एकच वाक्य लिहले होते. मला पकडण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर याचे परिणाम वाईट होतील." मग कदम लगेच धावत आपल्या गेटजवळील सिक्युरिटी गार्ड जवळ गेले. तेथे पहिले असता गार्ड बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसला. त्यांनी थोडे पुढे जाऊन पहिले असता त्यांना कोणी दिसले नाही. निराश अवस्थेत घरी आले. गार्डला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही शुद्धीवर आला नाही. सकाळी गार्डला बोलवून चौकशी करू असा विचार त्यांच्या मनात आला. मग घरी येऊन झोपी गेले.
सकाळी गार्डला जेंव्हा जाग आली तेंव्हा इ. कदम यांचा चेहरा त्याच्यासमोर दिसत होता. तो अचानक दचकला. लगेच खुर्चीवरून उठून त्याने सॅल्यूट केला व इ. कदम यांना म्हणाला,
"नमस्कार सर..."
"नमस्कार... बसा... बसा... अगोदर तुम्ही खाली खुर्चीवर बसा." गार्ड खाली बसला.
"काळ रात्री ११.३० च्या दरम्यान येथे कोणी आले होते का?"
"होय साहेब.. एक व्यक्ती आली होती. तिने डोक्यावर हेल्मेट घातले होते. मला म्हणाली, 'काका थोडेसे पाणी मिळेल का?' मी कारण विचारले असता तिने आपला हात माझ्यासमोर केला. तिच्या हाताला जखम झाली होती. थोडे रक्त पण आले होते आणि येत होते. मी गेट न उघडताच पाण्याची बाटली देत होतो तर ती व्यक्ती म्हणाली, काका जखम मोठी आहे. कृपया बाहेर येऊन हातावर पाणी घालता का? मी गेट उघडून बाहेर पाणी घालण्यासाठी आलो इतक्यात त्याने जलद गतीने पाठीमागे दुस-या हातात लपवलेला रुमाल माझ्या तोंडावर धरला व माझे डोके पहिल्या रक्त आलेल्या हाताने धरले. मी बेशुद्ध झालो. सकाळी जाग आली तेंव्हा तुम्ही माझ्या समोर आहात."
"बरं... पण इथून पुढे जर कोणी तुम्हाला कोणत्याही कारणास्तव बोलवत असेल किंवा गेट उघडायला सांगत असेल तर याबाबतची पूर्व कल्पना मला देत चला."
"ठीक आहे साहेब..." गार्डने बोलता बोलता मान हलवली. इ. कदम नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशनला गेले.
एक आठवड्यानंतर परत पुन्हा एकदा विजय आपल्या बाईकवरून कोठेतरी निघाला. त्या दिवशी रविवार होता. त्याच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते. ' आता हे माझे शेवटचे काम आहे. हे पूर्ण झालेनंतर मला कुठेही जायची गरज नाही.' विजयला ज्या ठिकाणी जायचे होते तेथे तो पोहचला. गाडी बाजूला लावली. रात्रीचे २ वाजले होते. सिक्युरिटी गार्ड झोपला होता. गेटवर 'ठाण-ठाण' असा दगडाने आवाज केला व गेटच्या एका बाजूला लपून बसला. त्या आवाजाने गार्ड जागा झाला पण तो झोपेच्या नशेतच होता. त्याने खुर्चीवरून उठून समोर पहिले असता कोणीही नव्हते. मग तो पुन्हा झोपी गेला. विजयने पुन्हा तोच आवाज केला. आत मात्र गार्डची झोप उडाली. तो गेट उघडून बाहेर आला. इतक्यात मागून विजयने त्याचे डोके धरले. तोंडावर रुमाल ठेऊन त्याला बेशुद्ध केले. गार्डला गेटच्या एका कोप-यात झोपवले.
विजय ज्या ठिकाणी आला होता ती एक सहकारी बँक होती. बँकेची कुलुपे त्याने लेजर बीमच्या साहाय्याने तोडली. मुख्य दरवाजाचे शटर उघडले व परत बंद केले. टॉर्चच्या साहाय्याने लाईटचा स्वीच शोधला. तो शटर शेजारीच होता. लाईट लावली. आत पाय ठेवण्याअगोदर आजूबाजूस नजर फिरवली. त्याच्या डोक्यावर फक्त एक सीसीटीव्ही कॅमेरा होता. विजयकडे अत्याधुनिक कॅमेरा होता की ज्याने फोटो काढला तर काही सेकंदात त्याची प्रत त्या कॅमेरातून बाहेर येत होती. विजयने त्या रूमचा एक फोटो काढला व तो फोटो सीसीटीव्ही कॅमेरासमोर लावला म्हणजे रेकॉर्डिंग पाहणा-या व्यक्तीला त्या खोलीमध्ये कोणीच आले नाही असे भासावे. मग परत लेजर बिमच्या साहाय्याने कॅशरच्या रूमचा दरवाजाचे लॉक तोडले. कॅश जेथे ठेवली होती ते सुद्धा लॉक तोडून पैसे घेऊन विजय तेथून पळून आला. पण तेथून येण्याअगोदर एक चिट्ठी तेथे ठेवली होती.
ती बँक इ. कदम यांचे घरापासून जवळच होती. त्यांनी सिक्युरिटी व इतर कर्मचा-यांशी चर्चा केली व पोलीस स्टेशनला आले.
रात्रीचे ११ वाजले होते. फक्त शिंदे व इन्स्पेक्टर कदम पोलीस स्टेशनमध्ये होते. दोघांची चर्चा सुरु झाली. शिंदे म्हणाले,
"सर.. आता काय?"
"ही सहावी चिट्ठी आहे ज्यामध्ये 'वि' असे लिहले आहे. चला आपण सुरवातीपासून पहिला खून ज्या ठिकाणी झाला तेथे एक चिट्ठी सापडली ज्यावर 'ल' असे टाईप केले आहे. दुस-या खुनाच्या ठिकाणी परत एक चिट्ठी सापडली त्यावर 'टी' असे टाईप केले आहे. त्यानंतर चार ठिकाणी चो-या झाल्या. तेथे ज्या चिट्ठ्या सापडल्या त्यामध्ये 'पा', 'य', 'ज', व शेवटी 'वि' असे टाईप केलेले आढळले. ह्या सहा चिट्ठ्या क्रमाने लावल्या असता तर अक्षर तयार होते 'लटीपायजवि'. त्यांना काही समजले नाही. बराच वेळ विचार करत होते. मग थोड्या वेळाने घरी जात असताना वा-याचा एक मोठा झोत त्यांच्या खिडकीतून आत आला व त्यांनी क्रमाक्रमाने लावलेल्या चिट्ठ्या विस्कटल्या गेल्या. त्या गोळा करत असताना तीन चिट्ठ्या अशा क्रमाने खाली पडल्या होत्या त्यातून त्यांना एक मार्ग सापडला. त्या तीन चिट्ठ्यापासून 'पाटील' हे अक्षर तयार झाले होते. मग त्यांनी उरलेल्या तीन चिठ्ठयांचा क्रम बदलला आणि थोड्या वेळाने त्यांना दुसरे एक नाव माहित झाले आणि ते होते 'विजय'.
इ. कदम यांनी कमिशनर यांना बोलावून त्याच रात्री एक मिटिंग आयोजित केली. त्याचबरोबर इतर पोलीस स्टाफला देखील कळविण्यात आले. इ. कदम यांनी बोलायला सुरवात केली.
"गेल्या दोन आठवड्यापासून ज्या खूनीला तसेच चोराला आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्याबद्दल कोणाकडेही काहीच माहिती अथवा पुरावा नाही. पण मला एक छोटासा मार्ग सापडलेला आहे. त्याचे नाव विजय पाटील आहे. कारण प्रत्येक ठिकाणी त्याने एक चिट्ठी ठेवली होती. ह्या सर्व चिट्ठ्या जर उलट क्रमाने लावल्या तर त्याचे नाव तयार होते. आता तुम्ही सर्वानी एक काम करा. शहरामध्ये जेव्हढे विजय पाटील आहेत त्यांची माहिती शोधून काढा. काहीही करा. पण मला दोन दिवसांच्या आत ती माहिती मिळाली पाहिजे. शिवाय ज्या कोणावर संशय वाटतो त्याला अटक करा." त्यानंतर मिटिंग संपली.
विजय पाटील बरेच होते. पण अचूक व्यक्ती कोण हे पोलिसांना नक्की सापडत नव्हते. शेवटी या सर्व विजय पाटील मधून ४ विजय पाटील ज्यांच्यावर जास्त संशय होता त्यांची उद्यापासून चौकशी करण्याचे इ. कदम यांनी ठरवले. यादरम्यान एक आठवडा निघून गेला.
एक आठवड्यानंतर सकाळी ११ वाजता इ. कदम यांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आली. हवालदाराने त्यांना कदम सरांची केबिन दाखवली व परवानगी घेऊन ती व्यक्ती त्यांच्या समोर बसली. इ. कदम व ती व्यक्ती या दोघांचे बोलणे सुरु झाले. त्या व्यक्तीने बोलायला सुरवात केली,
"मला तुम्हाला काही सांगायची आहे."
"तुमचे नाव काय? आणि तुम्ही कोठून आलात?"
"ते मी नंतर सांगतो. मला तुम्हाला काहीतरी महत्वाची माहिती सांगायची आहे."
"बोला.. मी ऐकतोय... तुम्हाला कसली माहिती द्यायची आहे."
"सर, गेल्या तीन आठवड्यामध्ये जे दोन खून आणि चार चो-या झाल्या आहेत त्याबद्दल थोडेसे बोलायचे होते."
"सांगा..."
"सर, हाच तो चाकू ज्याने सुरवातीचे दोन खून करण्यात आले. दुस-या खुनाच्या वेळी गुन्हेगाराचे ठसे ह्या चाकूवर उमटलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता." म्हणत त्या व्यक्तीने तो चाकू इ. कदम यांच्या समोर ठेवला.
"इतक्या खात्रीने तुम्ही कसे काय सांगू शकता आणि याबद्दल तुम्हाला कसे माहित?" मग परत त्या व्यक्तीने बोलायला सुरवात केली.
"ज्यावेळी खून झालें त्यानंतर तेथे चिट्ठी ठेवण्यापूर्वी एक मिनिटांचे व्हिडिओ शूटींग केले गेले ते या मेमरी कार्डमध्ये आहे आणि त्या खुनी व्यक्तीचा चेहरपण." म्हणत परत त्या व्यक्तीने एक मेमरी कार्ड इ. कदम यांना दिले."
"ते ठीक आहे पण तुम्हाला कसे माहित?"
"माहित आहे सर... कारण हे सर्व मीच केले आहे. माझे नाव विजय पाटील." विजयने सांगितले.
इ. कदम यांना धक्काच बसला. लगेच त्यांनी रिव्हॉल्वर काढली. विजयसमोर धरून त्याला म्हणाले,
"Hands Up...." विजयने केले.
"घाबरू नका सर. मी शरणागती पत्करण्यासाठी आलो आहे. माझ्याजवळ इतर कोणतेही हत्यार नाही."
"माझा विश्वास नाही. शिंदे, जरा आत या." इ. कदम यांनी शिंदे हवालदार यांना जोरात हाक मारली. शिंदे आत येऊन म्हणाले,
"सर, तुम्ही मला बोलावलंत..."
"ज्या खुनी व चोराला आपण शोधात होतो तो स्वतःहून येथे आला आहे. त्याला लॉकअपमध्ये डांबून ठेवा." शिंदेनासुद्धा धक्का बसला. त्यांनी विजयला हातकडी लावली व लॉकअपमध्ये डांबले. नंतर शिंदे व इ. कदम यांची चर्चा सुरु झाली,
"काय विचित्र माणूस आहे. स्वतःच मूर्खपणा करून येथे सापडण्यासाठी आला." शिंदे बोलले.
"ह्म्म्म... ठीक आहे. मला त्याच्याशी थोडं बोलायचं आहे. मी नंतर त्याची चांगलीच चौकशी करून घेईन." सर्वप्रथम इ. कदम यांनी कमिशनर साहेबांना फोन करून ही बातमी कळवली. त्यानंतर मिडीयाला बोलावून सर्वकाही सांगितले. ब-याच दिवसानंतर मिडिया पोलिसांचे थोडेफार कौतुक करत होती.
रात्रीच्या वेळी इ. कदम विजयच्या लॉकअपमध्ये गेले व दोघांमध्ये चर्चा सुरु झाली,
"बोला... पाटील साहेब.... बोला... तुम्हाला हे सर्व करताना लाज वाटली नाही. का तुम्ही असे केले? तुम्हाला कल्पना आहे ना तुम्ही केलेल्या गुन्ह्यासाठी फक्त एकाच शिक्षा आहे आणि ती म्हणजे फाशी..."
"हो... माहित आहे सर..."
"मग तरीसुद्धा तुम्ही असे करण्याचे धाडस दाखविले. यामागील कारण मला समजले नाही."
"ते मी कोर्टात सांगेन. इथे नाही."
"बर... ज्या चो-या केल्यात तो पैसे कोठे आहे."
"माफ करा सर... याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही."
"मी सरळ आणि सौम्य भाषेत तुम्हाला विचारात आहे पाटील. जर तुम्ही मला काही सांगितलं नाही तर माहिती काढण्यासाठी आमच्याकडे दुसरे भरपूर पर्याय आहेत."
"मी परत सांगतो सर... मी आपणाला काही सांगू शकत नाही."
"ठीक आहे.. तुम्ही असे सरळ नाही सांगणार." इ. कदम यांनी शिंदेला हाक मारली.
"शिंदे, तुम्हाला जे काही करायचे ते करा पण ह्यांच्याकडून तुम्ही पैशाबद्दल सर्व माहिती काढा." एव्हढे बोलून कदम आपल्या केबिनमध्ये निघून गेले.
शरीरावर तसेच तळ पायावर लाठीचा मार देऊन त्याचबरोबर इतर अनेक प्रकारचे शारीरिक त्रास देऊन हवालदार शिंदेनी विजयकडून पैशाबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विजय काही बोलला नाही. थोड्या वेळाने शिंदे इ. कदम यांच्याकडे गेले व त्यांना म्हणाले,
"सर.. आम्ही खूप प्रयत्न केला पण विजय काही बोलला नाही. आता काय करायचे सर?"
"त्याला उद्या कोर्टात हजार करू. बघू काय होते ते." दुस-या दिवशी कोर्टात विजयला दोषी ठरविण्यात आले व केसचा अंतिम निर्णय दोन दिवसांनी होईल असे न्यायाधीशांनी सांगितले.
आज ह्या केसचा अंतिम निर्णय होता. विजय आणि इतर वकील तसेच काही लोकांचं जमाव कोर्टामध्ये हजर होता. दिपकसुद्धा आला होता. थोड्या वेळांनी न्यायाधीश आले व केसला सर्वात झाली.
"श्री विजय पाटील. तुम्हाला काही बोलायचे आहे का? मी हे शेवटचे विचारत आहे."
"होय सर..." कित्येक दिवसांनी विजयच्या तोंडातून आज शब्द बाहेर पडले. "तुम्ही मला शिक्षा सुनावण्यापूर्वी मला तुम्हाला व इथे जमलेल्या कोर्टातील लोकांना काहीतरी सांगायचे आहे."
"बोला..." न्यायाधीश म्हणाले. विजयने बोलायला सुरवात केली,
"सर.. प्रत्येक व्यक्ती आपले कुटुंब सांभाळण्यासाठी धडपडत असतो. तसेच माझे एक कुटुंब होते. पण म्हणतात ना, चांगल्या गोष्टींना काहीवेळा कोणाचीतरी वाईट नजर लागते तशी कोणाचीतरी नजर माझ्या कुटुंबाला लागली. मग सुरवातीला मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर मुलाचा अपघातात मृत्यू झाला व त्यानंतर पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू. मी पूर्णपणे कोसळलो होतो. माझे संपूर्ण कुटुंब उध्वस्थ झाले होते. आता जगायचे तर कोणासाठी? मग डोक्यात विचार आला... नाही... आपण असे शांत राहून चालणार नाही. ज्यांच्यामुळे माझे कुटुंब उध्वस्त झाले त्यांना जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही. त्यानंतर मी शहरात आलो. सर्वप्रथम माझ्या मुलगीने आत्महत्या केली त्या अजयला मी ठार मारले. नंतर मुलाचा अपघात ज्या ट्रकने त्याला धडक मारली त्या ट्रक ड्राइव्हरला मी ठार केले. माझे काम पूर्ण झाले. मी एका ठिकाणी भाषणात ऐकले होते. 'माझी नरकात जाण्याचीसुद्धा तयारी आहे पण त्याला कारण स्वर्गीय असले पाहिजे'... बस्स... मग आता दुस-यासाठी काहीतरी करायचे ठरवले व चार ठिकाणी चो-या केल्या. ज्या ठिकाणी चो-या केल्या ते लोक भ्रस्टाचारी होते. साहेबांनी पैसे मागितले आहेत असे सांगून हेच लोक पैसे खात होते. तो पैसा ज्या ठिकाणी गरजेचा होता त्या ठिकाणी पाठविला." विजयचे बोलणे संपले.
"तो पैसा तुम्ही कोठे ठेवला?"

विजयचे बोलणे ऐकल्यानंतर कोर्टाने कलम ३०२ अन्वये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. ज्या दिवशी त्याला फाशी देण्यात येणार होती त्या दिवशी त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली. त्याने नकारार्थी मान हलवली. विजयचे जल्लादाने तोंड झाकले. गळ्यात फास अडकवला. शेवटचा विचार त्याच्या मनात तरंगला,
"मी ते पैसे अनाथाश्रम, अपंग व निराधार तसेच इतर गरजू लोकांना अप्रत्यक्षरीत्या दिले. मी एका वाईट मार्गाने निघालो होतो. मला याचा अजिबात पश्चाताप होत नाही. कारण मी गरजू लोकांनां थोडीफार मदत केली. शेवटी आयुष्य थोडेच आहे. शक्य असल्यास परमेश्वर मला माफ करेल."
पण कोर्टाने अगोदरच निकाल जाहीर केला होता. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून विजय पाटील यांचा निर्णय चुकीचा होता. .... निर्णय... आयुष्याचा....
-------------------------------------------------------------- समाप्त -----