पांडू तात्यांची नात केतकी हीचं यावर्षी पदवीचे शिक्षण पूर्ण झालं होतं त्यामुळे तिच्या लग्नाचा विषय घरामध्ये सुरू होता. केतकी हुशार आणि दिसायला सुंदर होती. यावर्षी तिचं लग्न करायचं असल्यामुळे तिच्यासाठी वर संशोधन सुरू होतं. जवळपासच्या मित्रमंडळी आणि पाहुण्यांना तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ शोधण्यासाठी सांगितलं होतं. लग्नासाठी बायोडाटा तयार करून तो मित्रमंडळी आणि पाहुण्यांमध्ये देण्यात आला होता.
पुण्यातील एका पाहुण्यांनी एक स्थळ आणलं होतं. पाहुण्यांनी आणलेलं स्थळ श्रीमंत होतं. मुलाने सुद्धा पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. दोन्ही बाजूला एकमेकांची पत्रिका पाठवण्यात आली होती. विवाहासाठी आवश्यक असणारे गुण जुळल्यामुळे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. पुढच्याच आठवड्यात पाहुणेमंडळी केतकीला पाहण्यासाठी आली. पाहुण्यांचा रुबाब काही वेगळाच होता. पाहुण्यांचा एकंदरीत पेहराव पाहून त्यांच्याकडे चांगली श्रीमंती असावी असा एक वेगळाचं रुबाब त्यांच्या वागण्यात होता. एका अलिशान गाडी मधून सर्व पाहुणे मंडळी आली होती. मुलाचे वडील, आई, बहीण, नवरदेव मुलगा आणि लग्नासाठी मध्यस्थी असणारे पाहुणे, अशी मंडळी मुलगी पाहण्यासाठी आली होती.
मुलाच्या आईच्या अंगावर खूप सोन्याचे दागिने होते. वडिलांच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन, हाताच्या बोटात अंगठ्या तसेच नवऱ्या मुलाच्या हाताच्या बोटात सुद्धा सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये सोन्याचा गोफ, हातामध्ये सोन्याचे ब्रेसलेट असा सगळा एकंदरीत थाट होता. एवढं सगळं सोनं पाहून पांडुतात्या आणि त्यांच्या घरच्या मंडळीच्या वर एक प्रकारचे दडपण आल्यासारखे वाटत होते. जरी दडपण आले असले तरी एक चांगलं मातब्बर स्थळ आपल्या मुलीला मिळतंय याचा एक वेगळा आनंद सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर होता. पाहुण्यांच्या सरबराईत मध्ये कुठेही कमी पडायचं नाही, असं मनोमन त्यांच्या घरच्या मंडळींनी ठरवलं होतं. तात्यांच्या घरी सर्व पाहुणे मंडळी आल्यानंतर तात्यांच्या मुलांनी पाहुण्यांना पाणी दिले. नंतर केतकी स्वतः पाहुण्यांसाठी चहा घेऊन आली. चहा पाणी झाल्यानंतर पाहुण्यांना खाण्यासाठी कांदेपोहे देण्यात आले. कांदेपोहे खाल्ल्यानंतर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम होणार होता.
पाहुण्यांमध्ये आणि तात्यांमध्ये पोहे खाता खाता गप्पा सुरू झाल्या. लग्नाची मध्यस्थी करणारे पाहुणे पाहुण्यांची ओळख करून देत होते. पाहुण्यांबद्दल माहिती सांगत होते .पोहे खाताखाता तात्यांनी मुलाच्या वडिलांना विचारले, "पाहुणे तुम्ही काय व्यवसाय करता?"
त्यावर मुलाचे वडील म्हणाले, "आम्ही काहीच व्यवसाय करत नाही. आम्हाला व्यवसाय करायची गरजच काय ?"
"म्हणजे, मी काही समजलो नाही. तुम्ही एवढे श्रीमंत आहात म्हणजे तुमचा काहीतरी व्यवसाय असेलच ना ?" तात्यांनी पाहुण्यांना प्रतिप्रश्न केला.
"आम्ही औद्योगिक परिसरात राहतो. आमच्या भागात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. आमच्याकडे जमिनीला खूप मोठा भाव आहे त्यामुळे आम्ही काही काम धंदा करत नाही." मुलाचे वडील हातातल्या बोटात असणारी अंगठी फिरवत बोलले.
"काम धंदा करत नाही, मग एवढं वैभव आलं कुठून तुमच्याकडे" तात्यांनी पुन्हा विचारले.
"अहो आमच्याकडे पाच एकर जमीन होती. त्यातली तीन एकर आम्ही विकून टाकली. त्यातून सोनं-नाणं, बंगला, गाडी असं खरेदी केलं आणि राहिलेले पैसे बँकेमध्ये टाकलेले आहेत आणि त्याचं व्याज आम्हाला येत आहे. त्यामुळे आम्हाला काम करण्याची काहीच गरज नाही." मुलाच्या वडिलांनी तात्यांच्या प्रश्नावर अधिक खुलासा करत म्हटले.
"अहो मग मुलगा काय करतो ? तो तरी काही काम धंदा करत असेल ना?" तात्यांनी पुन्हा विचारले.
तात्यांच्या या प्रश्नावर मध्यस्थी असणारे पाहुणे म्हणाले, "अहो तो सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे. मागच्या निवडणुकीत तो चांगल्या मतांनी निवडून आला आहे. गावचे राजकारण बर्यापैकी तोच सांभाळत असतो."
"असं होय, त्याचा भविष्यकाळासाठी काय प्लॅन आहे?"
तात्यांनी पाहुण्यांना विचारलं.
"अहो तात्या, पुढच्या महिन्यात होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तो उभा राहणार आहे. त्याचा लोकांशी आणि तरुणांशी चांगला संपर्क आहे आणि निवडणुकीसाठी लागणारा पैसा त्यांच्याकडे आहे त्यामुळे भविष्यकाळात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि कदाचित आमदार सुद्धा होऊ शकतो." पाहुणे मुलांबद्दल अधिक माहिती देत म्हणाले.
"अरे वा...अगदी चांगलं आहे म्हणायचं, किती पैसे आहेत म्हणायचं तुमच्याकडे? जरा अधिक खोलात विचारतोय म्हणून राग मानू नका" तात्या म्हणाले.
"तसं काही नाही बिनधास्त विचारा, आम्हाला राग येणार नाही. आमचे पन्नास लाख रुपये बँकेत शिल्लक होते पण आत्ताच ग्रामपंचायत निवडणुकीला एक दहा बारा लाख रुपये खर्च झाले आणि आता शिल्लक पैसे बँकेमध्ये आहेत आणि पैशाची काही चिंता नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. अजून आपली दोन एकर जमीन शिल्लक आहे, वेळप्रसंगी कमी पडली तर ती वापरू" पाहुण्यांनी अधिक खुलासा करत सांगितले.
"अहो तात्या, तुमच्या नातीला या घरात कसलंच काम करावं लागणार नाही, घरात सगळ्या सुखसुविधा आहेत, मुलगा चांगला आहे, विशेष म्हणजे त्यांच्याकडे चांगली संपत्ती आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका." मध्यस्थी पाहुण्यांनी माहिती दिली.
बोलता-बोलता पोहे कधी संपले ते कळलेच नाही. तात्या पाहुण्यांशी अधिक संवाद साधत होते तेवढ्यात नवरी मुलगी तयार होऊन बाहेर आली. मुलाने, मुलाच्या वडिलांनी, त्याच्या आईने काही प्रश्न मुलीला विचारले. मुळातच केतकी ही दिसायला सुंदर हुशार आणि सोज्वळ असल्यामुळे पाहुण्यांना ती पसंत पडली होती. मुलीला पाहून एक वेगळा आनंद पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत होता. मध्यस्थी पाहुण्यांच्या मार्फत मुलगी आवडली असल्याचा निरोप त्यांनी तात्यांना आणि त्यांच्या घरच्यांना दिला.
लवकरच लग्नाची पुढची बोलणी सुरू करण्याचा विचार होता परंतु तात्यांनी एक आठवड्याचा अवधी मागून घेतला. पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुणे त्यांच्या घरी निघून गेले. तात्यांच्या घरी लग्नाच्या पुढच्या बोलणीसाठी सगळे एकत्र जमले होते. त्यांचा मुलगा तात्यांना म्हणाला,
"तात्या, चांगलं स्थळ आपल्या मुलीला मिळाले आहे, त्यामुळे हे चांगलं स्थळ हातचं जाऊन द्यायचं नाही, त्यामुळे थोडेफार कर्ज झालं तरी हे लग्न आपण जमवायचं, तुमचं काय मत आहे, पाहुण्यांना कधी बोलवायचं लग्न पक्कं करण्यासाठी ?"
"अरे जरी हे स्थळ चांगलं वाटत असलं तरी मला मात्र हे मुळीच पसंत नाही. मला वाटतं आपली केतकी या घरांमध्ये देऊ नये" तात्यांनी आपले मत मांडले.
"अहो तात्या काय म्हणताय तुम्ही, एवढं चांगलं स्थळ आहे आणि त्याला तुम्ही नकार देत आहात," तात्यांचा मुलगा थोडासा रागानेच म्हणाला.
"अरे बाबा, स्थळ जरी चांगल असलं तरीपण या पाहुण्यांकडे किंवा मुलाकडे कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नाही, यांच्याकडे सगळा पैसा हा बिना कष्टाने मिळालेला आहे, त्यामुळे यांना पैशाची किंमत नाही, कष्टाची किंमत नाही आणि असा पैसा कितीही असला तरी तो पुरत नाही, त्यामुळे अशा घरी आपण आपली मुलगी देऊ नये" तात्यांनी आपले मत मांडत म्हटले.
"अहो तात्या, त्यांच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे म्हणून ते काम करत नाहीत. एवढा पैसा असल्यानंतर कोण माणूस काय काम करेल, आणि शेवटी पैसाच महत्त्वाचा आहे ना? आपल्या मुलीला सगळी सुखं मिळतील मग आपल्याला आणखी काय पाहिजे!"
तात्यांचा मुलगा या स्थळाच समर्थन करत म्हणाला.
"अरे बाबा, असा किती पैसा असला तरी त्याला कर्तृत्वाची आणि कष्टाची जोड नसेल तर तो पैसा पुरत नाही आणि सहजपणे ज्यांना पैसा उपलब्ध झाला आहे ती माणसं पैसा सुद्धा अगदी सहजपणे उधळत असतात आणि भविष्य काळामध्ये यांच्यावर वाईट प्रसंग येत असतात. आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवून तो अधिक कसा वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला कष्टाची जोड दिली तर तो अधिक काळ टिकत असतो, त्यातून प्रगती होत असते, परंतु या पाहुण्यांच्या बाबतीत मला तसं काही दिसत नाही, त्यामुळे आपण या स्थळाला नकार दिलेला बरा."
तात्यांचं हे म्हणणं तात्यांच्या घरच्यांना आणि मुलांना पटले. त्यामुळे तात्यांनी पाहुण्यांना नकार कळवला.
पुढे दुसऱ्या एका मुलाशी केतकीचा विवाह संपन्न झाला. एका सामान्य आणि होतकरू मुलाबरोबर त्यांच्या नातीचा विवाह झाला. दहा बारा वर्षानंतर एका कार्यक्रमात तात्यांना केतकीला पाहायला आलेले पाहुणे भेटले. खरंतर दहा-बारा वर्षातच त्यांची खूप अधोगती झाली होती. राहिलेली दोन एकर जमीन सुद्धा त्यांनी विकून टाकली होती. निवडणूक आणि इतर मोठेपणाच्या गोष्टी याच्यावर त्यांच्याकडचा बराच पैसा खर्च झाला होता आणि त्यांचा सगळा पैसा संपून गेला होता. त्या पाहुण्यांना कुठेतरी एक नैराश्य आल्यासारखं जाणवत होतं.
तात्यांनी आपल्या मुलांना त्या पाहुण्याबद्दल माहिती सांगितली. त्या वेळेस तात्यांचा तो निर्णय कसा योग्य होता, याची खात्री मुलांना पटली. तात्या आपल्या मुलांना त्या पाहुण्यांबद्दल सांगत असताना म्हणाले,
"अरे जीवनात पैसा कमवत असताना त्या पैशाला कष्टाची, प्रामाणिकपणाची जोड हवी. अचानकपणे आलेला पैसा हा माणसाला बेधुंद बनवत असतो. ज्या पैशाला कष्टाची परिश्रमाची जोड असते तो पैसा कसा खर्च करावा याची जाणीव त्या व्यक्तीला असते. त्यामुळे ती व्यक्ती तो पैसा योग्य कारणासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी वापरत असते आणि यातून जी प्रगती साधली जाते ती दीर्घकाळ आणि चिरकाल टिकणारी असते हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे."
तात्यांचं म्हणंण घरातल्या सर्व मंडळींनी ऐकून घेतलं आणि खरंच घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्यासाठी जो सल्ला देत असतात, जे काही सांगत असतात तो किती अनमोल असतो याची त्यांना जाणीव झाली.



