ब्रिटीश फोटो जर्नालिस्ट हॅझेल थॉमसन 2002 मध्ये मुंबईच्या रेड लाईट एरियात आली होती तेव्हा कित्येक रात्री ती झोपू शकली नाही. 2013 मध्ये ती परत तिथेच आली. दरम्यानच्या 11 वर्षात अगदी किंचित फरक झाल्याचे तिला जाणवले. योगायोगाने ती कामाठीपुऱ्याच्या ज्या चौदाव्या लेनमध्ये आली होती तिथल्या एका बिल्डिंगमध्ये ती गेली. त्या कुंटणखाण्याची मालकीण हॅझेलला पुन्हा तिथे आलेली पाहून तडक आतल्या खोलीत निघून गेली. ती संधी साधत आठ फूट उंचीच्या त्या खोलीतील पोटमाळयाकडे गेली. पोटमाळ्याच्या अर्धवट उघड्या दिसणाऱ्या फळीलगत लाकडी तुकडयांची शिडी उभी करुन ठेवली होती. हॅझेलने शिताफीने शिडी त्या माळ्याला लावली. झपाझपा पायऱ्या चढत ती वर गेली. आणि तिला पहिल्यांदा बॉक्स केज (कपाटवजा भिंतीमध्ये बंदिस्त केलेली जागा) दिसली. तिने केजची झडप उघडली तर आत एक तेरा चौदा वर्षाची मुलगी होती. हॅझेलने तिथे येताना भारतीय वेष परिधान करून त्यातल्या ओढणीत कॅमेरा लपवला होता. त्या कॅमेऱ्यानेच तिने त्या मुलीची छबी टिपली. नंतर तिने जेव्हा कधीही हा फोटो पाहिला तेव्हा तिचा जीव कासावीस झाला, कारण फोटोतल्या कुमारीकेचे आर्त, करुण, भावविभोर डोळे! असे वाटते की आता निमिषार्धात त्यातून अश्रू वाहू लागतील...
पूर्वी केवळ दिल्लीच्या जीबी रोडवर, मुंबईच्या कामाठीपुऱ्यात आणि कोलकत्याच्या सोनागाछीत आढळणारे बॉक्स केजेस आता सर्वत्र कॉमन झालेत. काही दिवसापूर्वी आपल्या औरंगाबादमध्ये खबरी मित्रांच्या निरोपाच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या रेडमध्ये देखील या छळपेट्या आढळल्या होत्या. सोनागाछीत तर मुली दिवसा वर कोंडल्या की भिंतीला लाकडी खिळे मारून प्लायवूड पक्के केले जाते, ते अंधार पडल्यावरच खोलले जाते. हा अंधारच त्यांना मोकळा श्वास घेऊन येतो. इतर सर्व वेश्या अंधाराला कंटाळून गेलेल्या असतात आणि या कोवळ्या मुली अंधाराची वाट बघत घुस्मटत जगत असतात. एनजीओंची ताकद नखाएव्हढी आणि समस्या डोंगराएव्हढी असा सगळा कारभार आहे. पोलीस आणि स्कीन करन्सीचे दलाल यांचे इतके मोठे रॅकेट देशभर आहे की त्याला धक्का लागणे देखील कठीण झालेय. मोबाईलने त्यात भर घातलीय. या मुलींची दुःखे आणि त्यांचं जगणं यावर लिहवत नाही. असो ...
त्या मुलीचे फोटो काढून हॅझेल जेव्हा इंग्लंडला परत गेली तेव्हा तिला डिप्रेशन आल्यासारखे झाले होते. जर फोटो काढणारा कासावीस होतो, पाहणाराही त्यांच्या दुःखासाठी व्याकुळ होतो मग त्या तलम पंख छाटलेल्या कोवळ्या फुलपाखरांची काय अवस्था होत असेल ?... फोटोतल्या मुलीशी हॅझेलला बोलता आले नाही ही बाब तिला अस्वस्थ करत होती.
ती तिसऱ्यांदा पुन्हा तिथे गेली. तिने त्या मुलीच्या मालकिणीचे हात ओले केले अन् त्या मुलीशी दुभाषाच्या मदतीने संवाद साधला. नंतर तिची सुटकाही केली. पुढे जाऊन आपल्या अनुभवावर पुस्तक लिहिले. (तिच्या ईबुकची लिंक कमेंटमध्ये आहे.) ....अगतिकता, निराशा, वैफल्य, थकवा, भूक, उदासीनता, परात्मभाव, दुःखवेदनांचे अनेक कढ, हे सगळं या फोटोतल्या मुलीच्या डोळ्यात तरळतंय. तिचं कुस्करलेलं बालपण आणि विदीर्ण झालेलं भविष्य यांची विमनस्कता तिच्या चेहऱ्यावर साफ दिसते... तिला प्रतीक्षा आहे अंधाराची...खोल खोल काळ्या कुट्ट अंधाराची....
म्हणूनच सांजेला घरी असलो की कधी कधी अंधार लवकर व्हावा म्हणून मी प्रार्थना करतो... उजेड असतानाच तुळशीपाशी दिवा लावायचा आग्रह बायकोजवळ धरतो.. ती दिवा लावते तेव्हा अशा मुलींचे डोळे त्या ज्योतीत तरळतात आणि माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावतात....
समीर गायकवाड.
( हॅझेल थॉमसनने काढलेला 'तो'च फोटो पोस्टसोबत दिला आहे.. या विषयावर लेखन करताना मी आजवरचे फोटो ब्लर्ड करून वा स्त्रियांचे/ मुलींचे चेहरे न दिसतील अशा पद्धतीने दिलेले आहेत पण हा फोटो मलादेखील खूप अस्वस्थ करून गेला आणि विथ परमिशन इथे शेअर केला. कारण, नुसतं सांगून हे अनेकांना तंतोतंत पटलं नसतं. आता या मुलीने संसार थाटलाय, हॅझेलने तिला नवी ओळख दिलीय, स्वावलंबी केलेय आणि स्वाभिमान मिळवून दिलाय. ही पोस्ट आठ वर्षांपूर्वीची आहे, मात्र या व्यवसायातली स्थिती आणि स्वरूप सारेच नव्या रंगात पण जसेच्या तसे आहे)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा