सकाळचे साडेआठ वाजत होते. कुंजुराणी तयार होऊन ड्युटीवर जायला निघणारच होती, एवढ्यात खोलीतला फोन वाजला. अरे बापरे ! काहीतरी इमर्जन्सी आलेली दिसतेय, असा विचार करत तिनं पटकन फोन उचलला. कुंजुराणी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात परिचारिका होती. रूग्णालयापासून जवळच असलेल्या नर्सेस क्वार्टरमध्ये ती राहात होती. फोन गेटवरच्या सिक्युरिटी गार्डचा होता.
' मॅडम, तुम्हाला भेटायला कोणीतरी सूरजमल राठोड म्हणून आले आहेत. बरोबर एक बाई आणि तरूण मुलगा पण आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता ड्युटीवर जायच्या घाईत आहात, पेशंटसंबंधी काही असेल तर मॅडमना हाॅस्पिटलमध्येच भेटा. पण त्यांचं वैयक्तिक काम आहे म्हणतात. काय करू? पाठवू का त्यांना वरती रूममध्ये? '
कुंजु बुचकळ्यात पडली. या नावाच्या कोणाला ती तर ओळखत नव्हती. तिला आठवतं तेव्हापासून ती जोधपूरच्या निवासी शाळेत शिकत होती , तिला जवळचं असं कोणी नात्यातलंही नव्हतं.
' त्यांना खाली काॅमन हाॅलमध्येच बसायला सांग. मी ड्युटीवर जाता-जाता भेटते त्यांना. ' फोन ठेवून आपली छोटीशी बॅग खांद्याला लटकावून कुंजुनी रूम लाॅक केली आणि लिफ्टने ती खाली आली.
व्हिजिटिंग हाॅलमध्ये सोफ्यावर तीन व्यक्ती बसलेल्या होत्या. पांढराशुभ्र कुर्ता-पायजमा घातलेले, साधारण ५०-५५ वयाचे एक गृहस्थ, साधारण ५० ची एक स्त्री, बहुधा त्यांची पत्नी असावी आणि त्यांच्या बाजूलाच साधारण २५ चा वाटणारा एक तरूण. चेहऱ्यावरून त्यांचा मुलगा असावा, असं वाटत होतं. तिघांच्याही चेहऱ्यावरून ते खानदानी श्रीमंत असावेत असा अंदाज सहज येत होता.
कुंजुने त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या येण्याचं प्रयोजन विचारलं. तशी ती स्त्री झटकन उठून तिच्याजवळ आली आणि तिने तिला मिठीत घेतलं. त्या माऊलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. ' बेटी, तेरे कारणही हम ये आजका दिन देख रहे है! तेरा कर्जा तो हम कभी चुका ही नहीं पाएंगे! करण बेटा ये ही वो देवता है, जिसके कारण तुम जिंदा हो!'
त्या तरूणाने, करणनेही तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला. कुंजुला हे काय चाललंय तेच समजत नव्हतं. ती अगदी गोंधळून गेली होती. शिवाय तिला ड्युटीवर जायला उशीरही होत होता. तिचं लक्ष घड्याळाकडेही जात होतं
' बेटी, परेशान नहीं होना! हम आपको हमारे नये अस्पताल के उद्घाटन का आमंत्रण देने आये है! बाकी सारी कहानी हम आपको
बाद में बताएंगे! अभी आप ड्युटीपर चले जाना! शाम का खाना आज हम साथमें खाएंगे और बातें करेंगे! अगले चौराहे में ' राॅयल राजस्थान', होटल है ना, वहीं पर आ जाना साढेसात बजे |हम तीनों आपका इंतजार करेंगे वहाँ |'
असं म्हणून सूरजमलजींनी तिच्या हातात एक आमंत्रण पत्रिका आणि मिठाईचा बाॅक्स ठेवला आणि ते तिघे तिथून बाहेर पडले आणि आपल्या कारमध्ये बसलेसुद्धा!
ड्युटीची वेळ होत आल्याने, मनातलं आश्चर्य आणि गोंधळ बाजूला ठेवून कुंजू तशीच हाॅस्पिटलकडे निघाली. गेल्या सहा-सात वर्षांत अनेक पेशंटची सेवा केली होती, त्यापैकीच कुणीतरी असेल कदाचित!
आज रक्षाबंधनाचा दिवस म्हणून दोघीजणी सुट्टीवर होत्या. त्यामुळे कामाचा ताण जास्तच होता. शिवाय दोन इमर्जन्सी ऑपरेशनच्या केसेससाठीही डाॅ. नी तिलाच बोलावलं, त्यामुळे एक कधी वाजला ते तिला कळलंच नाही. जेवण जेमतेम झालं तोवर परत एक इमर्जन्सी सिझरियनची केस आली. तो सगळा गोंधळ आटपेपर्यंत साडेचार वाजून गेले. तोवर तिची रिलिव्हर पण आली होती. कुंजुने मग तिला चार्ज सोपवला आणि ती आपल्या दोघी सहकाऱ्यांसोबत रूमवर परतली. लिफ्टकडे जायला त्या हाॅलपाशी आल्यावर तिला सकाळचा प्रसंग आठवला.
अशा अनोळखी लोकांसोबत जेवायला कसं जायचं? तिनं आपल्या दोघी मैत्रिणींना पण ही हकीकत सांगितली. तिची उत्सुकता तिला जायला प्रवृत्त करत होती तर एकीकडे मन साशंकही होतं.नवीन हाॅस्पिटल तर जैसलमेरला होणार होतं, तिनं आमंत्रणपत्रिकेवर एक नजर टाकली.
आज रक्षाबंधन, सणाचा दिवस आहे, तर आपण तिघी बाहेर जेवून साजरा करू असं त्यांनी आधी ठरवलं होतंच! तिच्या दोघी मैत्रिणींनी पण ' राॅयल राजस्थान' ला जेवायला यायचं आणि दुरून तिच्यावर लक्ष ठेवायचं असं आता त्यांनी ठरवलं.
बरोबर साडेसातला कुंजु तिथे पोचली. मैत्रिणी दहा मिनिटांनी येणार होत्या आत! करण तिची वाट पहात जिन्याजवळ उभा होता आणि मग तिला वरती घेऊन गेला. ए. सी. डायनिंग हॉल वरती होता. त्याचे आई-वडील आधीच तिथे येऊन बसले होते.
जेवणापेक्षा कुंजुला त्यांची हकीकत ऐकण्यात जास्त रस होता. सूप आणि स्टार्टरची
ऑर्डर देऊन झाली. मग सूरजमल बोलू लागले.
करण तेव्हा एक वर्षाचा होता. अतिशय अशक्त होता.औषधोपचार, टाॉनिक सगळं चालू होतं. सूरजमल तर मोठे उद्योगपती. हिरे-मोत्यांच्या दोन-तीन पेढ्या होत्या त्यांच्या मुंबईत. शिवाय कपडे, धान्याचाही मोठा व्यापार होता. पैशाची काहीच कमी नव्हती. सर्व प्रकारचे उपचार चालू होते. पण करणच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. मग घरातल्या वडिलधाऱ्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांनी राजस्थानमधील आपल्या मूळ गावी, कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं ठरवलं, घडसीसरजवळ. शिवाय काही लोकांनी या अशक्तपणावर उंटिणीचं दूध हा प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं होतं. म्हणून दोन-तीन महिन्यांसाठी, जैसलमेरला राहणाऱ्या आपल्या मावशीच्या हवेलीत सूरजमल आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन राहायला आले होते. तसं व्यवसायासाठी अधून-मधून ते मुंबईला फेरी टाकत होते. मावशीने एका उंटवाल्याला सांगून उंटिणीचं दूध रोज मिळण्याची व्यवस्था करून ठेवली होती. त्यासाठी हवेलीच्या जवळच तंबू ठोकून राहायला उंटवाल्याला जागा दिली होती. तो उंटवाला म्हणजेच कुंजीचा बाप खेमू ! कुंजीची आई तिला जन्म देतानाच देवाघरी गेली होती. खेमूच्या आईनेच तिचा सांभाळ केला होता. खेमूच्या आईला एकाच डोळ्याने दिसत होतं. आजारपणात एका डोळ्याची दृष्टी गेली होती. खेमू सकाळी ताजं दूध हवेलीत आणून द्यायचा. काहीवेळा कुंजीपण त्याच्यामागे लागून सोबत यायची.जेमतेम पाच वर्षाची होती ती! करणला हळूच बघायचं, हसायचं आणि परत जायचं हा तिचा छंद बनला होता. नंतर दिवसभर खेमू उंटावरून प्रवाशांना फिरवण्याचं काम करायचा. त्यावरच तर त्याच्या कुटुंबाचा निर्वाह कसाबसा चालायचा. कुंजीदेखील कधी कधी त्याच्यासोबत जायची.त्याची आई हवेलीत
करणला अंघोळ घालणं, तेलाचा मसाज करणं अशी काम करायची.काहीवेळा कुंजी आजीचं शेपूट बनून हवेलीत फिरायची. करणची नवनवीन खेळणी बघण्याची तिला उत्सुकता असायची. तिनं कधी हे सगळं बघितलंच नव्हतं ना! मालकिणीच्या कृपेने दोघींना गोळाभर अन्नही मिळायचं.
देवीची कृपा की उंटिणीच्या दुधाचा असर, पण करणच्या तब्येतीत थोडी सुधारणा वाटत होती.
तो मार्चचा महिना होता, त्यामुळे आता लवकरच मुंबईत परतायचं सूरजमलनी ठरवलं. कारण इथला उन्हाळा आता वाढायला लागणार आणि तो सहन करणं कठीण! मुंबईला जाण्यापूर्वी आजूबाजूचा भाग बघायला आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन जायचं त्यांच्या मनात आलं. त्यांची पत्नी मारवाडी समाजातली असली तरी मुंबईत वाढलेली होती. तिलाही उंटावरून फिरण्याची, तंबूत राहण्याची हौस वाटत होती.
खेमूच्या मदतीने त्यांनी जैसलमेरच्या बाहेर एका ठिकाणी राहण्याची व्यवस्था करून घेतली. तिथे बाहेरून येणारे प्रवासी, पर्यटकांना राहायला तंबू, खास राजस्थानी जेवण, आजूबाजूला उंटावरून फिरण्याची व्यवस्था असं सगळं काही होतं. उंटावरून फिरवायला खेमू आणि इतर काही उंटवालेही तिथे होते.
करणला सांभाळायला म्हणून खेमूची आई आणि तिच्याबरोबर कुंजीदेखील त्यांच्यासोबत तिकडे गेली.
जैसलमेर भारत पाकिस्तानबाॅर्डरपासून अगदी जवळ. आठवड्यापूर्वीच तिथे फायरिंग झाली होती. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर तिथे फिरायला बंदी होती. तसंही सहाच्या आधीच तिथे सूर्यास्त होतो. म्हणून साडेचारच्या सुमारास मंडळींनी उंटावरून सूर्यास्त बघायला जायचं ठरवलं होतं. तास-दीड तासात परत यायचं. पण चारच्या सुमारास नेमका करण झोपून गेला. नाहीतर त्यालाही घेऊन जायचं होतं. खेमूची आई लक्ष ठेवायला होतीच. म्हणून मग सूरजमल आणि त्यांची पत्नी दोघंच जायला निघाले. कुंजीदेखील आजीजवळ तंबूतच थांबली होती. करण झोपला असल्याने त्याच्या खेळण्यांशी तिला खेळता आलं असतं ना!
त्यानंतर साधारण एक तास गेला असेल आणि अचानक खूप जोरात वारं सुटलं. वादळंच म्हणायचं. चौफेर वाळूचे लोटच्या लोट उठले. तंबू खरंतर जमिनीत मोठमोठे लोखंडी खिळे ठोकून भक्कम केलेले, सहजी न हलणारे, पण तेही उखडून निघाले. तंबूचं जाड भक्कम कापड पण तेही त्यामुळे फाटलं, वाऱ्यावर उडून लांब गेलं. वीज गायब झाली आणि भरदिवसा मिट्ट काळोख झाला.जमिनीला हादरे बसू लागले भूकंपाचे! एकच हलकल्लोळ माजला. लोकांच्या किंकाळ्या, रडणं, ओरडणं, आसमंतात भरून राहिलं. कुंजीची आजी कशीबशी करणला उचलून आणि कुंजीचा हात धरून, मोडक्या तंबूच्या बाहेर आली खरी, पण वाळूच्या वावटळीपुढे तिचा टिकाव लागला नाही. ती हेलपाटली, हातातून करण फेकला गेला. कुंजीही वाऱ्याच्या वेगामुळे दूर फेकली गेली. त्यात गडगडाट आणि जोरदार पाऊस सुरू झाला. तिकडे उंटावरून फिरणाऱ्यांचीही दैना झाली. वादळी वाऱ्यांमुळे सगळे इतस्ततः फेकले गेले. वावटळ आणि अंधाराचं साम्राज्य, यामुळे कोणाचा कोणाला पत्ता लागणं अशक्यच! अनेक ठिकाणी उंटही मरून पडले होते, काही वाळूत अर्धवट गाडले गेले होते, पण जिवंत होते.
जैसलमेरसारख्या वाळवंटी प्रदेशात वाळूचं वादळ फार भयानक असतं. वाळूच्या टेकड्यांच्या टेकड्या निर्माण होतात आणि एका जागेवरून खूप दूरवर त्या उडून जातात. पाच-सहा तास हे तांडव चालू होतं. त्यानंतर वादळाचा जोर कमी झाला. पण पाऊसजीवावर जोरदार पडत होता. तो सकाळी पाचच्या सुमारास थांबला. त्यानंतर फायरब्रिगेड,पोलीस मिलिटरी यांचं मदतकार्य सुरू झालं. सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं. जिथे कुठे जिवंत माणसं दिसत होती, त्यांना उचलून स्ट्रेचरवरून हाॅस्पिटलमध्ये पाठवण्यात येत होतं. अनेकांना जबर दुखापत झाली होती. नाकातोंडात वाळू जाऊन काही लोकांचा गुदमरून मृत्यू ओढवला होता. सूरजमलचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यांची पत्नी खूप दूरवर फेकली गेली होती. तिच्या हाताला, कमरेला जबरदस्त दुखापत झाली होती. दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तातडीने जैसलमेरच्या मिलिटरी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दुसर्या दिवशी शुद्धीवर आल्यावर त्यांनी करणची चौकशी केली. काय झालं असेल त्याचं या विचारानेच ते हवालदिल झाले. आजूबाजूच्या सगळ्या हाॅस्पिटलमध्ये शोध सुरू झाला. सगळ्या यंत्रणांवर खूपच ताण होता. तीन दिवसांनंतर करण आणि कुंजीला जैसलमेरच्या लहान मुलांच्या हाॅस्पिटलमध्ये भरती केल्याचं समजलं. दोन्ही मुलांना थोडीफार दुखापत झाली होती पण ती जिवंत होती. पावसात भिजल्या मुळे त्यांना ताप-सर्दी भरपूर होती.औषधोपचार आणि काळजी घेणं आवश्यक होतं. पण इतर गंभीर इजा झाली नव्हती. आणि याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. हे कसं झालं?
वादळाने तंबू उखडला आणि खेमूच्या आईच्या हातातून दोन्ही मुलं फेकली गेली. खेमूच्या आईचा मृतदेह काही अंतरावर चिखलात अडकून पडलेला सापडला. कुंजी वाऱ्यावर भरकटली पण काही अंतरावर तंबू उखडून झालेल्या खड्ड्यात पडली. रात्रभर ती तशीच कुडकुडत होती. मध्येच वीज चमकल्यावर तिला काही अंतरावर एक उंट बसलेल्या अवस्थेत दिसला. बहुतेक तोही एखाद्या खड्ड्यात अडकला होता. जीवावर बेतलं की माणूस अशक्यप्राय गोष्टी करतो, तसं तिचं झालं. धडपड करत ती त्या खड्ड्यातून बाहेर पडली आणि कशीबशी उंटाजवळ पोचली. सरपटत उंटाच्या चार पायांमध्ये सरकली. उंटाच्या पुढच्या दोन पायांपैकी एक पाय खड्ड्यात फसला होता. पण तिला त्याच्या पोटाखाली सरकून जेमतेम बसता आलं. उंटाच्या शरीराची थोडी ऊब मिळाली. त्या मुक्या जनावरानेही परिस्थिती ओळखून काही गडबड केली नाही. त्यामुळे निदान वरून पडणाऱ्या पावसाचा तडाखा तिला चुकवता आला. अंधारात भीतीने कापत असताना तिची नजर भिरभिरत होती, आजूबाजूला कोणी दिसतंय का याचा वेध घेत होती. उंटाच्या दुसर्या बाजूला तिला काहीतरी गाठोड्यासारखं पडलेलं दिसलं. परत परत निरखून पाहिल्यावर लहानसे हातपाय दिसले. तिला एकदम आठवण आली, करणबाळाने असेच लाल कपडे घातले होते आज! तो तर नसेल? जरा पावसाचा जोर कमी झाल्यावर ती घसपटत, धडपडत त्या मुटकुळ्यापाशी पोचली. तो करणबाळच होता. पण निपचित पडला होता. कुंजीचा जीव तरी केवढा पण त्याला उचलून कसंबसं सांभाळत ती पुन्हा तिच्या सुरक्षित जागी उंटाजवळ पोचली. तिनं त्याला आपल्या शरीराला चिकटून धरून ठेवलं. नंतर कधीतरी तिचीही शुद्ध हरपली. सकाळी मदतकार्य सुरू झाल्यावर ती मिलिटरीच्या लोकांच्या नजरेस पडली. मग त्यांनी त्या उंटाला खड्ड्यातून बाहेर काढलं आणि या दोघांनाही हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं. कुंजीचा बाप खेमू देखील दुसर्या दिवशी चिखलात फसलेला सापडला. पण हाॅस्पिटलमध्ये दाखल करूनही तो शुद्धीवर आलाच नाही. तीन दिवसातच त्याने राम म्हटला. कुंजी अनाथ झाली.
तिच्यामुळेच करण वाचला आणि आपल्याला मुलगा परत मिळाला याची सूरजमल आणि त्यांच्या पत्नीला जाणीव होती. त्यांनी तिची सगळी जबाबदारी घेतली. उपचारानंतर बरी झाल्यावर तिला त्यांनी जोधपूरच्या निवासी शाळेत दाखल केलं. तिच्या सर्व खर्चाची तजवीज केली. परंतु ही आपल्यावरील उपकाराची काही अंशी परतफेड आहे या जाणिवेने, त्यांनी आपलं नाव उघड करू नये अशी व्यवस्थापकांना अट घातली. म्हणजे कुंजीला कधी या मदतीचा मिंधेपणा वाटणार नाही, असं त्यांना वाटलं. तिच्या प्रगतीचा अहवाल मात्र दरवर्षी त्यांना मिळत होता. कुंजी प्रामाणिकपणे अभ्यास करून पुढे जात होती. बारावीनंतर तिनं नर्सिंगला प्रवेश घेतला आणि तो कोर्स चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली. इकडे करणही मेडिकलपर्यंत गेला आणि अस्थितज्ञ आणि शल्य चिकित्सक म्हणून उत्तमप्रकारे त्याने पदवी मिळवली.
जैसलमेरजवळ सूरजमलचं मूळ गाव होतं, शिवाय तिथेच करणचा पुनर्जन्म झाला. त्यामुळे त्याने तिथं हाॅस्पिटल काढावं अशी सूरजमलची इच्छा होती. आधी करण तयार नव्हता या गोष्टीला, पण जेव्हा ही सगळी कहाणी त्याच्या आई-वडिलांनी सांगितली, तेव्हा तो तयार झाला. त्याने आपल्या उपकारकर्तीची चौकशी केली आणि तिला भेटायची इच्छा व्यक्त केली. मग कुंजीचा मुंबईतील पत्ता मिळवून, ही मंडळी आज तिला भेटायला आली. तिने आपल्या हाॅस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहावं असं करणला वाटत होतं. म्हणून ते निमंत्रण घेऊनच ते तिला भेटायला आले होते.
ही सगळी कहाणी ऐकून कुंजी भारावून गेली होती. सूरजमलनी केलेल्या मदतीमुळेच आपण इथवर पोचू शकलो याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. तिचे डोळे तुडुंब भरले होते आणि काय बोलावं हेच तिला सुचत नव्हतं.
'दीदी, आपको हमारे साथही चलना है जैसलमेर, अगले हफ्ते!' करणनी तिला सांगितलं. नकार देणं तिला शक्यच नव्हतं.
तोवर टेबलवर सूप आणि स्टार्टर आलेलं होतं. जेवायला काय मागवायचं हे करणची आई कुंजीला विचारत होती. तिनं त्यांनाच हवं ते मागवा असं सुचवलं.
तिच्या मैत्रिणी फोन करून तिची चौकशी करत होत्या. तिनं सगळं आलबेल आहे, नंतर बोलू असं सांगून फोन ठेवला. पण करणनी त्यांना तिघींना एकत्र येताना बघितलं होतं, म्हणून तिला विचारलं. 'राॅयल राजस्थान' सूरजमलच्याच मालकीचं होतं. त्यामुळे कुंजीच्या मैत्रिणींकडूनही बिल घेतलं गेलं नाही.
रक्षाबंधनानिमित्त करणकडून त्यांना भेट म्हणून.
पुढच्या आठवड्यात कुंजी राठोड कुटुंबासोबत जैसलमेरला उद्घाटन समारंभासाठी गेली. तिथे तिला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का देणारी, आणखी एक घटना घडली. त्या हाॅस्पिटलमध्ये लहानमुलांसाठी जो स्वतंत्र विभाग होता, त्याचं उद्घाटन तिच्या हस्ते करण्यात आलं आणि त्या विभागाला नाव दिलं होतं.. कुंजुदीदी चाईल्ड केअर !
आणि ते बघून कुंजुचे डोळे मुक्तपणे अश्रूंची बरसात करत होते. एका भावाने बहिणीला दिलेली अनोखी भेट होती ही!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा